शेअर मार्केट

नमस्कार
'सन्सेक्स चढला' 'सन्सेक्स उतरला' वर्तमानपत्रात येणार्‍या बातम्या वाचताना वाटते की बघावं एकदा आपले नशीब देखिल.
मग आठवण होते ती हर्षद मेहताची. पण जाणकार लोक सांगतात व्यवस्थित अभ्यासाने खेळी केली तर हा विषय तसा कठीण नाही.
'अभ्यास' हा शब्द्च कठीण बुवा. ठीक आहे करूया अभ्यास पण मास्तर नको का? उपक्रम विभागात या विषयाचे गुरू नक्कीच असतील.
इंडेक्स, नीफ्टी, सन्सेक्स, पोर्टफोलीओ, लिक्विडीटी, ब्रोकरेज वगैरे विषयावर कोणी शिकवणी देईल काय?
'फी'चे किती होतील तेही कळुदेत.

आपला
हेमंत

लेखनविषय: दुवे:

Comments

हेमंतराव,

आम्ही बाजारगप्पा या शीर्षकाने येथे शेअरबाजारविषयक लेखमाला लिहायला सुरवात केली आहे, परंतु हल्ली सवडच मिळत नाही. तरीही आम्ही आमच्या सवडीप्रमाणे ती लेखमाला पुढे सुरू ठेवूच, परंतु त्या व्यतिरिक्त येथील इतरही मंडळींनी येथे या विषयी लिहिले तर बरेच होईल..

आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.

सेन्सेक्स व इतर निर्देशांक

हेमंत, उपक्रमावर आपले स्वागत आहे!
या विषयामध्ये तुम्हाला रुची आहे हे पाहून आनंद वाटला.

सेन्सेक्स ही संकल्पना तुम्हाला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्यावरुन तुम्हाला निफ्टी व इतर निर्देशांकांचा अंदाज येईल. तात्यांसारखे बाजारातील धुरंधर येथे आहेतच... काही चुकले तर ते दुरुस्त करतीलच असे वाटते.

सेन्सेक्स हे सेन्सिटिव्ह इंडेक्स या शब्दप्रयोगाचे लघुरुप आहे. त्याचा मराठीतील अर्थ म्हणजे संवेदी निर्देशांक.
हा निर्देशांक भारतीय शेअर बाजारातील एक प्रमाणभूत निर्देशांक आहे.

आता निर्देशांक म्हणजे काय हे समजावण्यासाठी या निर्देशांकाचे काय काम आहे ते जाणून घ्या.

निर्देशांकाचे काम एकच आणि ते म्हणजे किंमतीमधील चढउतार सूचित करणे. मग जर एखादा निर्देशांक समभागाधारित असेल तर तो समभागांच्या किंमतीमधील चढउतार सूचित करतो. या उलट एखादा निर्देशांक बाँड्स वर आधारित असेल तर तो बाँडच्या किमतीमधील चढउतार सूचित करतो.

सेन्सेक्स हा निर्देशांक मुंबई बाजारातील समभागांच्या किंमतीमधील चढउतार सूचित करतो. जेव्हा आपण सेन्सेक्स वर गेला असे म्हणतो तेव्हा शेअरबाजारामधील शेअर्सच्या किमती वाढलेल्या असतात. समभागांच्या किमती या नेहमीच त्या कंपनीच्या भविष्यातील कामगिरीचे द्योतक असतात असे म्हटले जाते. त्यामुळे समभागाची वाढणारी किंमत म्हणजे कंपनीच्या भविष्यातील कामगिरीची खात्री असे समीकरण मांडले जाते. यावरुन सेन्सेक्स वाढतो तेव्हा एकंदर कंपन्यांच्या भविष्यातील कामगिरीबाबत बाजाराची खात्री आणि एकूण अर्थव्यवस्थेबाबत आशादायी चित्र आहे असे मानले जाते.

सेन्सेक्स म्हणजे नक्की काय?
सेन्सेक्स म्हणजे ३० शेअर्स. होय! फक्त ३० शेअर्स तुम्हाला बाजाराची एकूण दिशा सांगतात.
तुम्ही म्हणाल केवळ ३० शेअर्स संपूर्ण बाजाराची दिशा कसे सांगतील?
तर त्याचं उत्तर पुढीलप्रमाणे.
हे शेअर्स हे बाजारातील सर्वाधिक उलाढाली होणारे शेअर्स असतात. मुंबई बाजारातील निम्म्याहून अधिक भांडवल हे या शेअर्समध्ये असते. शिवाय हे शेअर्स १३ हून अधिक सेक्टर्सचेही प्रतिनिधित्व करतात.

निर्देशांकातील शेअर्स निवडण्यासाठी साधारण मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे:
समभागामध्ये कामाच्या प्रत्येक दिवशी व्यवहार होणे आवश्यक आहे.
गेल्या एक वर्षात सरासरी उलाढालींच्या संख्येमध्ये तसेच व्यवहाराच्या किंमतीमध्ये (विक्री किंवा खरेदी) हा समभाग पहिल्या १५० कंपन्यांमध्ये असणे गरजेचे आहे.
मुंबई शेअर बाजारात हा समभाग व्यवहारासाठी किमान एक वर्षापूर्वी नोंदणी झालेला असावा.

याचप्रमाणे निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजारातील निर्देशांक असून त्यामध्ये ५० समभागांच्या किमतीचे चढउतार निर्देशित होतात. नॅशनल + फिफ्टी = निफ्टी असे सूत्र आहे.

याच धर्तीवर
बीएसई १००, बीएसई ५०० असे सर्वसमावेशक निर्देशांक तर
बँकेक्स, बीएसई आयटी हे सेक्टोरल निर्देशांक आणि
मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांक हे भांडवलावर आधारित निर्देशांक आहेत.

भारतातील सेन्सेक्स व निफ्टी प्रमाणेच अमेरिकेतील डाऊ जोन्स इंडस्ट्रीयल ऍवरेज, जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँग सेंग, सिंगापूरचा स्ट्रेट टाईम्स इंडेक्स, कोरीयाचा कोस्पी इंडेक्स ह्या लोकप्रिय निर्देशांकांवर लक्ष ठेवले जाते.

ब्रोकरेज

आपली व्यवहाराची क्षमता व तयारी यानुसार ब्रोकरेज आकारणी केली जाते. खरेदी केलेले शेअर्स तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तुमच्या डीमॅट खात्यात हवे असतील (डिलिव्हरी) तर साधारण व्यवहाराच्या ०.५% ते ०.८% पर्यंत ब्रोकरेज द्यावे लागते. लिया-दिया प्रकाराच्या सट्टेबाजी व्यवहारामध्ये (ट्रेडिंग) एकूण किंमतीऐवजी "उक्ते" (लंपसम) ब्रोकरेज उदा. एका व्यवहाराला समजा ५ रुपये असे ब्रोकरेज आकारले जाते.
या क्षेत्रात नव्याने उतरलेल्या रिलायन्स मनी सारख्या कंपन्या जम बसवण्यासाठी २०० रुपये ब्रोकरेजमध्ये कितीही व्यवहार करा अशा पद्धतीच्या आकर्षक योजना आणतात.
किती ब्रोकरेज द्यायचे असा काही नियम नसला तरी वर उल्लेख केलेल्या डिलिवरी प्रकारामध्ये ब्रोकरेज + सेक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स मिळून १ टक्क्यापर्यंत खर्च अपेक्षित धरावा.

म्हणजे १०० रुपये व्यवहारावर (खरेदी किंवा विक्री) ब्रोकरेज + सेक्युरिटी टॅक्स + सर्विस टॅक्स असा १ रुपये खर्च होईल असे समजावे.

ऑनलाईन ब्रोकर्स उदा. आयसीआयसीआय डायरेक्ट, कोटक व शेरखान सारख्या कंपन्यांचे ब्रोकरेज हे थोडेसे जास्त असते. कारण तुम्हाला देण्यात येणारी व्यवहाराची सुलभता. याउलट कागदोपत्री व्यवहार करणार्‍या स्थानिक ब्रोकर्सचे ब्रोकरेज कमी असते.

- ब्रोकरकर्ण

कर्णा !

माहिती आवडली.डीमॅट खाते उघडावे आणि चान्स घेऊन पाहावे की काय ?
पण लाखाचे हजार नको व्हायला :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही शंका

हे शेअर्स हे बाजारातील सर्वाधिक उलाढाली होणारे शेअर्स असतात

असं असेल तर हे ३० शेअर्स नेहेमीच बदलत असणार. ते किती कालावधीनंतर बदलतात? कोण ठरवतं? सेन्सेक्स आणि निफ्टी मधील शेअर्सची यादी देणारे अधिक्रुत संस्थळ कोणते?

स्पष्टीकरण

शेअरबाजारात प्रतिदिवशी सर्वाधिक उलाढाली होणारे शेअर्स बदलत असले तरी सलग १ वर्ष सर्वाधिक उलाढाल होणार्‍या पहिल्या १०० शेअर्समधील शेअर्सचाच विचार सेन्सेक्समध्ये अंतर्भूत करण्यासाठी केला जातो.
सेन्सेक्समध्ये शेअरचा अंतर्भाव करण्यासाठी इंडेक्स समिती विविध फंडांचे व्यवस्थापक, अर्थशास्त्रज्ञ, अर्थ-पत्रकार यांच्याशी चर्चा करते.

हे शेअर्स बदलण्यासाठी निश्चित असा कालावधी नसला तरी प्रत्येक त्रैमासिक मीटिंगमध्ये अशी चर्चा केली जाते. निर्देशांकामधील कोणताही बदल होण्यापूर्वी तशी सूचना सहा आठवडे आधी प्रसिद्ध केली जाते.

(या आधीच्या प्रतिसादात १५० ऐवजी १०० शेअर्स असे वाचावे)

सेन्सेक्स बद्दल अधिकृत माहिती देणारे संकेतस्थळ म्हणजे बीएसईइंडिया डॉट कॉम..
निफ्टीबद्दल अधिकृत माहिती देणारे संकेतस्थळ म्हणजे एनएसईइंडिया डॉट कॉम.

सेन्सेक्सविषयी अधिक माहिती इंग्रजीमध्ये येथे वाचता येईल.

वा! आजानुकर्ण!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
आपण अतिशय क्लिष्ट माहिती इतक्या सोप्या पद्धतीने मांडलीत त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन!

फारच छान आणि उपयुक्त माहीती.

आजानुकर्ण
मुद्देसूद माहीती बद्दल आभार. पोर्टफोलिओ बद्दल थोडे सांगाल? हा साधारण कसा असायला हवा. वेगवेगळे सेक्टर कसे निवडावे?

आपला
हेमंत

सेन्सेसचे फिक्सिंग होते का?

सेन्सेसचे फिक्सिंग होते का? मॅचमध्ये जसे होते तसे. सेन्सेक्स ला सर्कीट ब्रेकर लागतो का? कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे काही बडे ऑपरेटर हा खेळ खेळतात का? टेकनिकल ऍनालिसिस भारी की फंडामेंटल ऍनालिसिस?

प्रकाश घाटपांडे

उत्कृष्ट माहिती

बर्‍याच नविन गोष्टी समजल्या.
ह्या सगळ्याचा एक लेख बनवून तुमच्या ब्लॉगवर आणि मराठी विकिपिडियावर पण ठेवायला हरकत नाही. अजानुकर्णांचे अनेक आभार!!

पोर्टफोलिओ

आपला पोर्टफोलिओ बनवताना नेहमी दोन गोष्टींचा विचार करावा:
१. जोखीम घेण्याची क्षमता-ताकद (कपॅसिटी)
२. जोखीम सहन करण्याची तयारी (टॉलरन्स)

जोखीम घेण्याची क्षमता ही तुमच्या वयावर, तुम्ही कौटुंबिक, वैयक्तिक आयुष्यात पार पाडत असलेल्या जबाबदारीवर, तुमच्या आर्थिक आरोग्यावर अवलंबून असते तर जोखीम सहन करण्याची तयारी ही एक मानसिक वृत्ती आहे.
या दोन्हींच्या संयोगाचा तुमच्या पोर्टफोलिओवर अतिशय प्रभाव पडतो.
प्रत्येक व्यक्तीसाठी हे दोन गुणधर्म वेगळे असल्यामुळे एका व्यक्तीसाठी उत्तम असलेली गुंतवणूक ही दुसर्‍या व्यक्तीसाठी उत्तम असेलच असे नाही.

हे दोन्ही गुणधर्म जर तुमच्या बाजूने असतील उदा. जोखीम घेण्याची अधिक क्षमता व पैसे गेले तरी चालतील अशी मानसिक वृत्ती तर अधिक जोखीम व पर्यायाने अधिक परतावा देणार्‍या साधनांमध्ये गुंतवणूक करणे शक्य होते. याउलट असेल तर कमी जोखीम व त्यामुळे कमी परतावा देणार्‍या साधनांमध्ये गुंतवणूक करावी लागते.

तुम्ही अतिशय मुलभूत प्रश्न विचारल्यामुळे सावधानताचा इशारा म्हणून येथे एक गोष्ट ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. अधिक जोखीम घेतल्यावर अधिक परतावा मिळतोच मिळतो असे नाही. अधिक जोखीम घेतल्यावर अधिक परतावा मिळण्याची शक्यता फक्त वाढते.

पोर्टफोलिओ तयार करताना वर दिलेला "क्षमता" हा गुणधर्म ज्या गोष्टींवर अवलंबून असतो त्याचा विचार करावा. जर तुम्ही अविवाहित, तरुण व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असाल व पुढील काही वर्षे तरी शिल्लकीत टाकत असलेले पैसे वापरण्याची काहीही गरज नाही असे वाटत असेल तर समभाग किंवा त्यापेक्षा उत्तम म्हणजे समभागाधारित म्युच्युअल फंडांमध्ये अधिक गुंतवणूक करावी. याउलट जर पैशाची निकड नजीकच्या भविष्यात लागेल असे वाटत असेल तर बाँड/डेट आधारित म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी.

थेट समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असल्यास आधी कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करणार आहात त्या क्षेत्राचा थोडासा अभ्यास करावा.
सध्या तेजीत असलेल्या क्षेत्रामधील वाईट कंपन्याही चांगला परतावा देतात तर सध्या साडेसाती असलेल्या क्षेत्रामधील अतिशय चांगल्या कंपन्या लाखाचे बारा हजार करु शकतात हे ध्यानात ठेवावे.
उदा. सध्या रुपया तेजीत असल्यामुळे डॉलरच्या विनिमयदरावर फायदा आधारित असलेल्या तंत्रज्ञान क्षेत्राचे बूच लागलेले आहे. त्यामुळे इन्फोसिस सदृश कंपन्या ह्या कितीही चांगल्या असल्या तरी क्षेत्राला चांगले दिवस नाहीत. याउलट क्यापिटल गुड्स, ऊर्जा क्षेत्राला सरकारी सवलती मिळत असल्यामुळे तसेच बांधकामे करणार्‍या क्षेत्रालाही चांगले दिवस असल्यामुळे ही क्षेत्रे चांगली आहेत. बांधकाम करणार्‍या क्षेत्रावर अवलंबून असेलेले सीमेंट क्षेत्रही चांगले वाटेल. मात्र सीमेंटच्या किमती नियंत्रित करण्याच्या सरकारच्या धरसोड धोरणामुळे तेथे काहीही होऊ शकते. साखरेचीही तशीच गत आहे. अशा प्रकारचा जुजबी अभ्यास प्रत्येक क्षेत्राबद्दल ठेवावा.

एकदा कोणती क्षेत्रे निवडायची हे ठरले की त्यात्या क्षेत्रामधील अग्रगण्य व फायदेशीर कंपन्या शोधून त्यांचा थोडासा अभ्यास करावा. गेल्या काही वर्षांमध्ये कंपन्यांनी किती फायदा कमावला आहे. पुढे कितपत फायदा कमावतील याबाबत त्यांची दिशा कशी आहे हे पहावे. एकाच क्षेत्रातील दोन कंपन्यांचे फायदे व शेअरची किंमत यांचे गुणोत्तर तपासून कोणती कंपनी घेण्यास स्वस्त आहे हे पहावे.

हा सर्व प्रकार वेळखाऊ असला तरी फार इंटरेस्टिंग आहे. मात्र हे सर्व करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर साधारण शेअर्सइतकाच परतावा देणार्‍या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी. याविषयी थोडी माहिती इथेच तुम्हाला मिळेल.

हाही खेळच आहे!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
बाजार चढवणे आणि उतरवणे हे काही लोकांच्या हातात नक्कीच असते.ह्यात चढवणार्‍याना ’बुल’ आणि उतरवणार्‍याना ’बेअर’ म्हणतात.हे लोक आपापसात समजून उमजून व्यवहार करत असतात आणि मधल्या मधल्या मधे गरीब गुंतवणुकदार मार खातो. तेव्हा हे व्यवहार करताना आपण योग्य ती काळजी(खरेदी/विक्रीची योग्य वेळ आणि ज्याची रोखता(लिक्विडिटी)सहज होऊ शकते अशा शेयर्समधेच व्यवहार करणे इत्यादि) घेतली तर बर्‍यापैकी फायदा देखिल कमावता येऊ शकतो. हावरटपणा टाळावा(हे सांगणं सोपं आहे पण भले भले ह्यात मार खातात हे मात्र वास्तव आहे).
एखाद्या कंपनीचे शेयर्स खरेदी करताना अजून काही गोष्टींची नोंद घेणे आवश्यक आहे. तिचा पूर्वेतिहास,मागील तसेच वर्तमान कामगिरी,उत्पादित मालाला असणारी बाजारपेठ,त्यातले त्या कंपनीचे स्थान,कंपनीचे संचालक मंडळ अशा बर्‍याच गोष्टींचा अभ्यास करून गुंतवणुक केल्यास कमीत कमी धोका असू शकतो.

खरे आहे.

बाजार चढवणे आणि उतरवणे हे काही लोकांच्या हातात नक्कीच असते.ह्यात चढवणार्‍याना ’बुल’ आणि उतरवणार्‍याना ’बेअर’ म्हणतात.हे लोक आपापसात समजून उमजून व्यवहार करत असतात आणि मधल्या मधल्या मधे गरीब गुंतवणुकदार मार खातो. तेव्हा हे व्यवहार करताना आपण योग्य ती काळजी(खरेदी/विक्रीची योग्य वेळ आणि ज्याची रोखता(लिक्विडिटी)सहज होऊ शकते अशा शेयर्समधेच व्यवहार करणे इत्यादि) घेतली तर बर्‍यापैकी फायदा देखिल कमावता येऊ शकतो. हावरटपणा टाळावा(हे सांगणं सोपं आहे पण भले भले ह्यात मार खातात हे मात्र वास्तव आहे).

वॉलस्ट्रीटवर याच अर्थाची Bulls make money, bears make money, pigs get slaughtered अशी प्रसिद्ध म्हण आहे.

सर्किट ब्रेकर्स बद्दल

सेक्युरिटी एक्चेंज बोर्ड ऑफ इंडियाची करडी नजर बाजारातील सर्व सदस्यांवर असल्यामुळे असे फिक्सिंग होणे अतिशय अवघड आहे. शिवाय भारतीय बाजारातील सूत्रे एफ आय आय - परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे असल्यामुळे स्वदेशी दलालांना अशा पद्धतीचे फिक्सिंग करणे अवघड आहे.

सर्किट ब्रेकर्स हा सेबीने गुंतवणुकदारांचे पैसे वाचवण्यासाठी आणलेला उत्तम मार्ग आहे.
१७ मे २००४ चा काळदिवस आठवा. भाजपाचे सरकार पडल्यामुळे बाजारातील खेळाडुंनी मार्केट जोरदार सटकवले होते. किंवा परदेशी गुंतवणूकदारांनाही कर द्यावा लागेल अशी पुडी अर्थमंत्र्यानी सोडल्यामुळेही गेल्या वर्षी मार्केट आपटले होते. अशा प्रसंगी हे सर्किट ब्रेकर्स मदतीला येतात.

बाजारात प्रमुख घटक हा मनुष्य असल्यामुळे मनुष्यस्वभावाचे मुख्य पैलू - लोभ आणि भीती येथे पाहायला मिळतात. वर सांगितलेल्या प्रसंगांसारख्या घटना घडल्या की अर्थशास्त्राचे मूलभूत नियम विसरुन भावनांवर स्वार झालेले खेळाडू मग जोरदार खरेदी किंवा विक्री सुरु करतात आणि पर्यायाने बाजार भरमसाट वधारतो किंवा सपशेल आपटतो. अशा प्रसंगी थोडा वेळ व्यवहार बंद करुन शांत डोक्याने विचार करण्यातच शहाणपणा असतो हे सूत्र आहे. त्यामुळे अशी असाधारण वाढ किंवा घट दिसली की सर्किट ब्रेकर्स लागतात.

माझ्या माहितीप्रमाणे बाजारात दोन प्रकारचे सर्किट ब्रेकर्स आहेत.
१. संपूर्ण बाजार/सेन्सेक्स/निफ्टी सर्किट ब्रेकर
२. प्रत्येक शेअरचा सर्किट ब्रेकर

संपूर्ण बाजाराचा सर्किट ब्रेकर हा उपरोल्लिखित घटनांमध्ये वापरला गेला आहे. तो लागू होण्याचे नियम साधारणतः असे.
अ. निर्देशांकामध्ये १० टक्क्याची वाढ किंवा घट.
दुपारी १ वाजण्यापूर्वी झाल्यास : १ तास व्यवहार बंद
दुपारी १ ते २.३० मध्ये झाल्यास : अर्धा तास व्यवहार बंद
२.३० नंतर झाल्यास: : व्यवहार सुरु राहतात.

ब. निर्देशांकामध्ये १५ टक्क्याची वाढ किंवा घट.
दुपारी १ वाजण्यापूर्वी झाल्यास : २ तास व्यवहार बंद
दुपारी १ ते २.०० मध्ये झाल्यास : १ तास व्यवहार बंद
२.०० नंतर झाल्यास : व्यवहार दिवसभरासाठी बंद.

क. निर्देशांकामध्ये २० टक्क्याची वाढ किंवा घट.
दिवसभरात केव्हाही : व्यवहार दिवसभरासाठी बंद

२. प्रत्येक शेअरचा सर्किट ब्रेकर:
यामध्ये प्रत्येक शेअरच्या किमतीच्या चढ-उताराची मर्यादा निश्चित केली जाते. याला अपवाद म्हणजे सेन्सेक्स मध्ये अंतर्भूत असलेल्या ३० शेअर्सना व निफ्टीमधील ५० शेअर्सना कोणताही स्वतंत्र सर्किट ब्रेकर नाही. मात्र इतर सर्व शेअर्सना स्वतंत्र/वैयक्तिक सर्किट ब्रेकर आहे.

शेअरचा सर्किट ब्रेकर या प्रत्येक दिवशी बाजारामध्ये जाहीर केला जातो. साधारण २%, ५%, १०% २०% अशा प्रकारचे सर्किट ब्रेकर्स आहेत. शेअर बाजाराच्या अधिकृत संकेतस्थळांवर व्यवहाराच्या दिवशी प्रत्येक शेअरचा सर्किट ब्रेकर समजू शकतो.

स्वतंत्र लेख

उपक्रमराव, आजानूकर्ण यांच्या या लेखातील माहितीपूर्ण प्रतिसादांचा स्वतंत्र लेख करण्यास हरकत नसावी.
(आम्हाला शेअर बाजारातले जास्त काही कळले नाही तरी काही सुरक्षित शेअरांची पुंजी आम्हीही बाळगून आहोत.)

स्वतंत्र लेख

उपक्रमरावांवरील कामाचा भार हलका करण्याच्या उद्देशाने आम्हीच स्वतंत्र लेख तयार केला आहे.

(आम्हाला शेअर बाजारातले जास्त काही कळले नाही तरी काही सुरक्षित शेअरांची पुंजी आम्हीही बाळगून आहोत.)

सर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी हेच धोरण योग्य आहे.

 
^ वर