संजूबाबा, न्या. कोदे आणि न्यायव्यवस्था

आधीच स्पष्ट करतो की माझा बाबा बुवांवर विश्वास नाही. संजूबाबावरही नाही. आज त्याला सहा वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली. न्यायमूर्ती कोदे यांनी त्याचे पारडे झुकवले नाही, परंतु संजय दत्त खरंच ६ वर्ष तुरूंगात राहिल का? या काळात त्याने साईन केलेल्या चित्रपटांचे काय? त्याकरता त्याला बाहेर सोडण्यात येईल का? चित्रिकरणानिमित्ताने परदेशी जाण्याची संधी देण्यात येईल का? यापूर्वीही अनेक नेत्यांना शिक्षा ठोठवण्यात आली आहे. प्रत्यक्ष तुरूंगात फारच कमी गेले.

या खटल्यात जर संजूबाबा सुप्रीम कोर्टात गेला तर त्याला कायद्यातील पळवाटा शोधता येतील का? प्रसारमाध्यमे संजूला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करतील का?

उपक्रमावर कायद्याची जाण असणारे कोणी असतील तर त्यांच्याकडून या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेतच पण इतरांनीही आपले मत मांडावे ही विनंती.

प्रतिसाद उपक्रमाची ध्येयधोरणे लक्षात घेऊनच द्यावेत.

Comments

खरा न्याय

मुंबई स्फोटमालीकांचे निकाल पाहता कधी नव्हे ते सामन्य माणसाला आणि खरे म्हणजे देशालाच न्याय मिळू शकतो हे एक दिलासा देणारे चित्र निर्माण झाले आहे आणि सर्वच काही वर्तमानपत्रात वाचतो, कधी चित्रपटात पाहातो तसे सडलेले नाही असे वाटले. प्रसार माध्यमे पण अजून तरी कदाचीत न्यायालयाला आणि ज्या घटनेसंदर्भात शिक्षा झाली आहे त्या संदर्भात वचकून लिहीत आहेत.

त्याच्यावर हजारो कोटी अडकलेत म्हणणार्‍यांना इतकेच सांगावेसे वाटते की बाँबस्फोट झाला त्यात पण जिजिभॉय टॉवर मधे (शेअर मार्केट) याहूनही अधीक पैसे अडकले होते आणि त्यांना तर असे काही होईलयाची कल्पनापण नव्हती. त्या शिवाय निष्पाप कुटूंबे बरबाद झाली त्याची किंमत काय? इथे फिल्म इंडस्ट्रीला त्याल शिक्षा होवू शकते हे माहीत असतान इतके पैसे गुंतवायला कोणी सांगीतले होते?

या खटल्यात जर संजूबाबा सुप्रीम कोर्टात गेला तर त्याला कायद्यातील पळवाटा शोधता येतील का?

ते वकीलांचे काम आहे आणि त्यांनी ते जरूर करावेही . पण उगाच त्याला राष्ट्रपतींकडून शिक्षा माफ करून बाहेर काढायचा राजकीय नेत्यांनी प्रयत्न करू नये असे वाटते.

मला संजय दत्तचे सध्याच्या काळातील काही चित्रपट नक्कीच आवडलेत. सुनील दत्तचे राजकारण जरी मान्य झाले नसले तरी तो आणि संपुर्ण दत्त परीवार हा बर्‍यापै़की आदर्श अथवा चांगला आहे असे कायम ऐकून असल्यामुळे, तसेच संजयदत्तला तरूणपणी पासून व्यसन आणि दु:खानी घेरले वगैरे होते आणि म्हणून काही अंशी तो दुर्दैवी पण आहे हे ही मान्य.

पण शेवटी कायद्यासमोर सर्व सारखे हे आज आपल्याकडील पैसेवाल्या जगालापण समजले असेल आणि असंगाशी संग प्राणाशी गाठ या म्हणीचा अर्थ समजून जरा कमी माजरटासारखे वागले आणि ज्या जनतेमधे आपल्याला मोठेपणा/प्रसिद्धी मिळत आहे, ज्या देशात आपण सुखाने जगत आहोत त्याच्याशी चुकूनही गद्दारी करता कामा नये असे वाटले तर संजय दत्तला झालेली सहा वर्षांची शिक्षा, मग तो अगदी कमी वेळ राहीला तरी, नुसत्या न्यायापेक्षाही खूप काही देऊन गेली असे म्हणता येईल आणि तशीच आपण अपेक्षा करूया.

न्यायव्यवस्था !

इतरांनीही आपले मत मांडावे
मत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आभारी.
संजूबाबाला शिक्षा होणारच नाही,झाली तरी सहा महिन्यांची होईल,हाय लेवलवर सारे फिक्सिंग करता येते, असे म्हणणारे अनेक होते,खोटे कशास सांगावे आम्हीही त्याच्यात पुढे होतो.पण या प्रकरणामुळे न्यायव्यवस्थेवरचा विश्वास राखण्यास मदत झाली असे वाटते.आता तो सुप्रीम कोर्टात सुटेल का ! नाही सुटला तरी, देशाचे फार नुकसान नाही.निर्मात्याचे आर्थिक नुकसान होईल .पण त्या पातळीवर हा घाटा सहन करणारेही असतात,अन नुकसान झाले तरी कोणी तरी भाई सर्व देणी चुकती करतील. काहींना पोराचे पाय तुरुंगात दिसल्यावर आम्हाला नाही वाटत बीग बजेट चित्रपटांचे करार झाले असतील.प्रसार माध्यमांचे काही सांगू नका ! टीआरपी रेट साठी ते वाट्टेल ते करतील आणि त्याची आता संजूबाबाला मदत होईल असे वाटत नाही.

अवांतर :-( संजूबाबाची व्यसनाधिनता,त्यातुन सुटने हा बदल मात्र वाखाणण्याजोगा आहे.त्याचा अभिनय,चित्रपटात पाहणा-यासारखा असतो.बाय द वे जरा वाईटच वाटतंय राव ! शिक्षा जरा जास्तच वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कायदा आणी माणूस

कायदा आणी माणूस हे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश श्री नरेन्द्र चपळगावकर याम्चे पुस्तक वाचनीय आहे.
प्रकाश घाटपांडे

शिक्षा योग्य आहे

आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की या सर्व सिने तारकांचे दाऊदसारख्या समाजकंटकांशी असलेले संबंध निषेधार्ह आहेत.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

शिक्षा

यापूर्वीही अनेक नेत्यांना शिक्षा ठोठवण्यात आली आहे. प्रत्यक्ष तुरूंगात फारच कमी गेले.

तुम्ही मारल्यासारख करा आम्ही लागल्यासारख करतो. आपण सगळे मिळून जनतेला फसवू.
Public memory is always short.

प्रकाश घाटपांडे

अशीही ढवळढवळी

केंद्रिय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांनी जाहीर केले की आम्ही संजयच्या विरुद्धच्या निकालाविरुद्ध सुप्रिम कोर्टात अपील करू!

काही प्रश्न

या चर्चेच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित करते. या गोष्टींत जरा घोर अज्ञान आहे याची जाणीव ठेवावी.

१. संजयची सहा वर्षे शिक्षा ही सक्त मजूरी आहे का?
२. आज टाईम्समध्ये बातमी आहे की संजयने रात्र सिगारेटी ओढत जागून काढली? तेथे पंखा नाही इ. इ. सांगण्यात आले होते पण कैद्यांना सिगारेटी आणि इतर चैनीच्या गोष्टी मिळतात का?
३. सहा वर्षांच्या पक्क्या कैदेसाठी त्याला कोठे हलवण्यात येईल? ठाण्याला मागे होता तेथेच का?

जे माहीत आहे ते...

१. संजयची सहा वर्षे शिक्षा ही सक्त मजूरी आहे का?

हो सक्त मजूरी त्यातील दिड वर्षे त्याची आधीच भोगून झाली आहे

२. आज टाईम्समध्ये बातमी आहे की संजयने रात्र सिगारेटी ओढत जागून काढली? तेथे पंखा नाही इ. इ. सांगण्यात आले होते पण कैद्यांना सिगारेटी आणि इतर चैनीच्या गोष्टी मिळतात का?

सिगरेट मिळणे बेकायदेशीर आहे - जर खरे असेल तर चुकीचे तर अर्थातच आहे.

३. सहा वर्षांच्या पक्क्या कैदेसाठी त्याला कोठे हलवण्यात येईल? ठाण्याला मागे होता तेथेच का?

ठाणे/औरंगाबाद/नाशिक अथवा कोल्हापूर (दुवा) थोडक्यात कुणाला माहीत नाही !

आमचे पुणे

आता मुक्काम पोस्ट येरवडा म्हणे !!

आमचं म्हणणं..

आमचं म्हणणं इतकंच की 'भारतीय संविधान कायदा' किंवा 'इंडियन पिनल कोड' पेक्षा कुणीही मोठा नाही. आणि त्यानुसार जो गुन्हा आहे तो गुन्हाच आहे आणि त्याकरता शिक्षा ही झालीच पाहिजे. मग तो गुन्हा करणारा/करणारी व्यक्ति कलाकार, राजकारणी वगैरे कुणीही असो..

आपला,
(न्यायप्रिय) तात्या.

सक्तमजूरी

संजय दत्त खरंच ६ वर्ष तुरूंगात राहिल का? या खटल्यात जर संजूबाबा सुप्रीम कोर्टात गेला तर त्याला कायद्यातील पळवाटा शोधता येतील का?
-या दोन प्रश्नांची उत्तरे एकत्र.
संजय दत्त याला टाडाखाली शिक्षा झालेली नाही. इल्लिगल पझेशन ऑफ आर्मस् किंवा शस्त्रांची बेकायदा बाळगणी या कलमाखाली ही शिक्षा झलेली आहे. त्याला ९ मिमि पिस्तुल आणि एके५६ बंदूक पुरवणारे अणि ती नष्ट करणारे - या सर्वांनी ते मान्य केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने स्वतःच त्याचा कबुलीजबाब दिला आहे.
पुरावा म्हणून नष्ट केलेल्या एके५६ रायफलीचे स्प्रिंगसारखे किरकोळ भाग मिळाले. संजयने जर कानावर हात ठेवले असते तर तो कदाचित् सुटलाही असता. पण त्यानेच कबुलीजबाब दिल्याने या कलमाला कायद्यात असलेल्या ५ ते १० वर्षे सक्तमजूरी शिक्षेमधली ६ वर्षे त्याला शिक्षा झाली.
सुप्रीम कोर्टात कोणताही नवा जबाब / पुरावा नोंदवणे (मला वाटते) शक्य नाही. जुन्या जबाब आणि तपासाप्रमाणे त्याची शिक्षा कमी झाली तरीही ५ वर्षांपेक्षा कमी होऊ शकत नाही. निर्दोष सुटणे अशक्यप्राय आहे.
एकच शक्यता आहे - ती म्हणजे संजयचे वकील सतीश मानेशिंदे कदाचित काहीतरी कायदाविषयक युक्तिवाद करतील. जसे - ही शिक्षा 'टाडा' खाली नाही. न्या. कोदे/कोडे याचे "टाडा कायदा विशेष न्यायालय " फक्त 'टाडा' कायद्याखाली झालेल्या गुन्ह्यांची शिक्षा मुक्रर करू शकते. त्यामुळे ही शिक्षा रद्द करून हा खटला एका साध्या फौजदारी (क्रिमिनल) न्यायालयात नव्याने चालवण्यात यावा.
(हा एक अंदाज आहे.) असे झाले तर मग संजय दत्त तहहयात बेलवर तुरुंगाबाहेर राहू शकेल. फौजदारी खटले, अपिले हे सारे मारुतीचे शेपूट आहे.

या काळात त्याने साईन केलेल्या चित्रपटांचे काय? त्याकरता त्याला बाहेर सोडण्यात येईल का?
-सुप्रीम कोर्टातील अपील दाखल झाल्यावर तो बेलवर बाहेर येईल हे तर न्या. कोदे यांनीच सांगितले आहे. त्यामुळे अपील ते सुप्रीम कोर्टाचा निकाल या काळात तो बाहेरच असेल. त्याकाळात त्याला चित्रीकरण करता येईल.
जरी सु.कोर्टात शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले तरी तो एक-दोन वर्षानंतर पॅरोलवर बाहेर येऊ शकतो. तसेच चांगल्या वर्तणुकीसाठी त्याची शिक्षा माफही होऊ शकते. (आणखी एक-दोन वर्षानंतर)
(मूळ शिक्षा कमी होऊन ५ वर्षे (वजा )१८ महिने अगोदरचा तुरूंगवास (वजा) एक-दीड वर्षे पॅरोल (वजा) एक वर्ष सजा माफी. फारतर एखादे वर्ष त्याला तुरुंगात काढावे लागेल. अपिले करत बसण्यापेक्षा हे जास्त सोपे असल्याने हेच करण्याचा आणि शिवाय फुकटातली सहानुभूती व प्रसिद्धी मिळवण्याचा सल्ला त्याला वकीलानेही दिला असेल. शिवाय डोक्याची कटकट जाईल. )

चित्रिकरणानिमित्ताने परदेशी जाण्याची संधी देण्यात येईल का?
-नाही. गुन्हेगारी स्वरूपाच्या न्यायप्रविष्ट प्रकरणात शक्यतो पासपोर्ट जप्त केला जातो. परंतु कौटुंबिक कारण सांगून तशी परवानगी घेता येईल. पण चित्रीकरण केलेले न्यायालयाच्या लक्षात आले तर गंभीर परिणाम होतील.

यापूर्वीही अनेक नेत्यांना शिक्षा ठोठवण्यात आली आहे. प्रत्यक्ष तुरूंगात फारच कमी गेले.
- खुनाची शिक्षा झालेले आत बसले आहेत तरी आत नसल्यासारखेच आहेत. झारखंडातले गुरुजी शिबू सोरेन तर काही दिवस तुरुंग म्हणून सरकारी गेस्ट हाऊसमध्ये राहिले आणि तेथे त्यांनी दरबार भरवला असेही वाचले. बरेच जण प्रकॄती अस्वस्थ्याचे कारण दाखवून इस्पितळात रहातात.

प्रसारमाध्यमे संजूला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करतील का?
- मदत नाही. संजय सेलेब्रिटी असल्याने तो रहातो तिथले हे कसे आहे, ते कसे आहे असल्या बातम्या मात्र देत राहतील. शिवाय अपिलाच्या सविस्तर बातम्या येतीलच. त्यांना काहीही हवंच आहे. विकतं ना?

ही शिक्षा खर्‍या शिक्षेऐवजी सिंबॉलिक पनिशमेंट (दार्शनिक शिक्षा) आहे असे वाटते.

इदं मम -
(ही सर्व वैयक्तिक मते असून मी कोणीही जाणकार-बिणकार नाही.)

धन्यवाद

प्रतिसाद नोंदवणार्‍या सर्वांचे धन्यवाद. आमच्या सरांचे विशेष.

जामीन मिळणार ?

आमच्या सरांचे विशेष.

:) क्या बात है सेठ ! कौतुक केलंच आहे तर, एक मुद्दा सांगूनच जातो.
या प्रकरणात एक गोष्ट महत्वाची दिसतेय ती म्हणजे,संजूबाबाला टाडा तून पध्दतशीरपणे बाजूला काढल्याचे आता वाटायला लागले आहे.तो सर्वोच्च न्यायालयात अपील करतांना टाडा कोर्टाला बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याबद्दल शिक्षा ठोठावण्याचा अधिकार आहे का ? असा मुद्दा उपस्थित करुन किमान जामिनावर स्वतःची सुटका करुन घेण्याची शक्यता दिसते आहे.प्रख्यात कायदेतज्ञ आणि माजी ऍटर्नी जनरल सोली जे.सोराबाजी यांनीही संजूबाबाला सर्वोच्च न्यायालयात जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.कानून के हाथ लंबे होते है अशा प्रतिक्रिया म्हणजे आपला उथळपणा होता आणि येणा-या काळात लोकांना जोरदार धक्के बसू नये,याची उपाययोजना ठरवून केल्याप्रमाणे दिसत आहे.

अवांतर :) शुद्धलेखनाच्या फेरबदलात तेराव्या नियमातील पूर्वार्ध ठेवावा,तर उत्तरार्ध नसावा, असे वाटते!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दांडीया...

पोलिसांचा लाठीमार

संजय दत्त येरवडा तुरुंगात, जमावाला पांगविण्यासाठी किरकोळ लाठीमार

पुणे, ता. २ - मुंबई बॉंबस्फोट खटल्यात सहा वर्षांची शिक्षा झालेला अभिनेता संजय दत्त याला आज रात्री येथील येरवडा तुरुंगात हलविण्यात आले. त्याला पाहण्यासाठी तुरुंगाबाहेर सुमारे पाच हजार नागरिकांचा जमाव होता. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना किरकोळ लाठीमार करावा लागला. ........
पांढरा शर्ट व पांढरी पॅंट घातलेला संजय रात्री साडेदहाला येरवडा तुरुंगाजवळ आला. याच खटल्यात शिक्षा झालेला युसूफ नळवाला त्याच्यासोबत होता. त्यांच्यामागोमाग दुसऱ्या गाडीतून त्याची मैत्रीण व अन्य दोन-तीन मित्र आले होते.

मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातून सायंकाळी पावणेसातच्या सुमारास या दोघांना हलविण्यात आले. संजयला मुंबईतून हलविण्यात आले असता, दूरचित्रवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी पोलिसांच्या वाहनांचा पाठलाग केला; तसेच अनेक "ओबी व्हॅन' वाशी, पनवेल टोलनाक्‍याजवळच आधीपासूनच थांबल्या होत्या. येरवडा तुरुंगाबाहेरही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी होती. त्याला कोणत्या कोठडीत ठेवणार हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

कामे करावी लागणार
सक्तमजुरीची शिक्षा झालेल्या कैद्यांना तुरुंगात विविध प्रकारची कामे करणे सक्तीचे असते. संजयला त्यासाठी सूट मिळणार नाही, असे तुरुंग प्रशासनाने सांगितले. वैद्यकीय कारणास्तव फक्त त्यातून सूट मिळू शकते. सक्तमजुरीच्या कैद्यांना भटारखाना, हातमाग, पेंटिंग, चांभारकाम, लाकूडकाम, स्वच्छतेची कामे, प्रशासकीय कामात मदत आदी कामे करावी लागतात. सुरवातीचे दोन-तीन दिवस त्यांना सर्व नियम समजावण्यात येतात. त्यानंतर इच्छेनुसार काम दिले जाते. निवडलेले काम करता येत नसल्यास त्याचे प्रशिक्षणही दिले जाते. दरमहा १५०० रुपयांपर्यंत खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंची तुरुंगाच्या भांडारातून कुपनाद्वारे कैद्याला खरेदी करता येते.

तपासाधिकारीच तुरुंगाचे प्रमुख
कारागृह प्रशासनाचे प्रमुख असलेले सध्याचे विशेष महानिरीक्षक सतीश माथूर यांनी बॉंबस्फोट खटल्याच्या तपासातही भाग घेतला होता. ते १९९६ ते २००२ दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) अधीक्षक, उपमहानिरीक्षक पदावर होते. त्यांची नियुक्ती मुंबईत होती. बॉंबस्फोटांचा तपास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या "टास्कफोर्स'मध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

"देशाच्या न्यायसंस्थेवर माझा विश्‍वास आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा.'
- संजय दत्त (मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगातून येरवड्याच्या कारागृहात निघताना.)

"देशाच्या न्यायसंस्थेवर माझा विश्‍वास आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा." - संजय दत्त (मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगातून येरवड्याच्या कारागृहात निघताना.)

------

तुला शिक्षा झालेली पाहून आता आमचा पण विश्वास दूढ झाला आहे. तू जर स्वतःची चूक मान्य करून आपणहून प्रायश्चित्त घेतलेस तर आमचा तुझ्या गांधीगिरीवर पण विश्वास पण बसेल. आपल्या रिकामटेकड्या जनतेला पण असे वाटले तर सोन्याचा दिवस उगवेल...

भावासाठी बहिण सोनियांच्या दारी

भावासाठी बहिण सोनियांच्या दारी

[ Friday, August 03, 2007 06:28:03 pm]
नवी दिल्ली,
म. टा. ऑनलाइन प्रतिनिधी
आपल्या भावाला वाचवण्यासाठी खासदार प्रिय दत्तने थेट धाव घेतलीय ती काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या दारी. हायकमांडला कौल लावून आपल्या वडिलांच्या पुण्याईचा वास्ता देऊन भावाला सोडवण्याचा प्रयत्न तिने केला.

प्रिया दत्तने सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्लीकडे घेतलेली धाव ही पक्षकार्यासाठी नव्हती, हे सर्वांनाच माहित होतं. लोक आधीपासूनच या भेटीची चर्चा करत होते. त्याबद्दल संजय दत्तच्या सुटकेचा किंवा शिक्षा कमी करण्याचा संबंध होता असा अंदाजही व्यक्त केला जात होता. भेटीनंतर प्रिया दत्त आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही याची आडमार्गाने कबुली दिली असल्यामुळे लोकांना आपल्या संशयाचा रोख बरोबर असल्याचो लोकांना विश्वास बसला आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी उघडपणे संजय दत्तची बाजू घेतली आहे. सुनील दत्त यांची आठवण काढत त्यांनी दत्त कुटुंबाच्या मागे उभी राहण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.

घ्या पेढे !

मिळाला एकदाचा संजूबाबाला जामीन.चला आता न्यायव्यवस्थेवर नव्याने चर्चा करु या ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संजूबाबाभक्तांचे अभिनंदन

सुप्रीम कोर्टातील अपील दाखल झाल्यावर तो बेलवर बाहेर येईल हे तर न्या. कोदे यांनीच सांगितले आहे. त्यामुळे अपील ते सुप्रीम कोर्टाचा निकाल या काळात तो बाहेरच असेल. त्याकाळात त्याला चित्रीकरण करता येईल.

हे खरे ठरले. संजूबाबा मंगळवारी बाहेर येतील.
संजूबाबाभक्तांचे अभिनंदन.

अखेर

अखेर "सट्ट्याचा" जय झाला!

:-)

:-)

ये क्या हो रहा है!

येरवडा तुरूंगात गांधीजी आणि आंबेडकर होते, पुणे करार झाला वगैरे वगैरे. पण संजय दत्त नी काही पराक्रम केला आहे का?

वेलकम टू होम

[ Thursday, August 23, 2007 10:28:17 am]

मुंबई
मटा ऑनलाइन प्रतिनिधी
जामीनावर सुटलेल्या संजयचे घरी जोषात स्वागत झाले. बहीण खासदार प्रिया दत्त आणि नम्रता, आमदार बाबा सिद्दीकी, मित्र बंटी वालिया, संजय गुप्ता आणि अन्य नातलग संजयच्या घरी इंपिरिअल हाईटस्मध्ये जमले होते.

त्याआधी पुण्याला सतिश मानेशिंदे यांनी जामीनाचे कागद सादर करुन संजयला जेलबाहेर आणले. वाढलेली दाढी आणि बारीक कापलेले केस, निळी जीन्स आणि पांढरा शर्ट अशा अवतारातला संजय दत्त येरवडा जेलबाहेर आला. मोकळ्या हवेत प्रदीर्घ काळानंतर श्वास घेत असल्याचा त्याच्या चेह-यावर तेव्हा स्पष्ट दिसत होता. बाहेर पडताच जेलबाहेर उभ्या असलेल्या रक्षकाला मिठी मारुन त्याने आनंद व्यक्त केला. त्यानंतर तो लगेच खास विमानाने मुंबईसाठी निघाला. त्याच्यासोबत जामीनावर सुटलेला युसुफ नळवालाही होता.

मुंबईत निवासस्थानी काळ्या टी-शर्ट मधल्या प्रिया दत्तने मिठी मारुन वेलकम टू होम म्हणत त्याचे स्वागत केले. त्याला ओवाळण्यात आले. नारळ फोडण्यात आला. त्यानंतर पत्रकारांना प्रेस कॉन्फरन्स घेण्याचे संकेत देऊन तो घरात गेला.

संजू आला पण सल्लू गेला...

संजय दत्तच्या सुटकेमुळे खुष झालेल्या बॉलीवूडला नवा धक्का बसला. चिंकारा हरणांच्या शिकार प्रकरणी सलमान खानला जोधपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने, छोट्या कोर्टाने दिलेली पाच वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे.

सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा

[ Friday, August 24, 2007 11:25:54 am]

जोधपूर
मटा ऑनलाइन प्रतिनिधी
हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान याला चिंकारा जातीच्या हरणाची शिकार केल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. मुख्य शहर दंडाधिका-यांनी दिलेली शिक्षा जोधपूर जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे.

न्यायालयात गैरहजर राहीलेल्या सलमानविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. जामीन रद्द करुन सलमानला लगेच अटक करुन जेलमध्ये टाकण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला. न्यायालयात गैरहजर राहण्यासाठी त्याने केलेला माफीचा अर्जदेखील रद्द करण्यात आला.

बिष्णोई समाजाने चिंकारा जातीच्या हरणाची शिकार केल्याप्रकरणी सलमानविरोधात खटला दाखल केला होता. या खटल्यात मुख्य शहर दंडाधिका-यांनी त्याला १० एप्रिल २००६ रोजी दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा दिली होती. सलमानला पंचवीस हजार रुपयांचा दंडदेखील केला होता. मात्र जामीन मिळवून त्याने जिल्हा आणि सत्र न्यायालयात शिक्षेविरोधात अपिल केले होते.

करमणूक पुढे चालू!

संजूच्या हस्तांदोलनाने पोलिसांचे पोळले हात

[ Sunday, August 26, 2007 10:53:34 pm]

मुंबई,
मटा ऑनलाइन प्रतिनिधी
येरवडा तुरूंगातून बाहेर पडल्यावर अभिनेता संजय दत्त याने ज्या सात पोलिसांशी हस्तांदोलन केले होते, त्यांना आता आपले हात पोळल्याची जाणीव होत आहे. यातील एका पोलिसाला हस्तांदोलन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले तर इतर सहा जणांविरुद्ध चौकशी करण्यात आली आहे.
अवैधरित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी आर्मस् अॅक्ट खाली सहा वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्त याची गुरूवारी सकाळी सुटका झाली. यावेळी तुरुंगाच्या मुख्यप्रवेशद्वारवर सात पोलिस कर्मचा-यांनी शिक्षा भोगत असलेल्या गु्न्हेगाराशी हस्तांदोलन केले होते.

हे निलंबन नक्की सजा की पगारी सुटी?

आपले घाटपांडेसाहेब खुलासा करु शकतील. हे निलंबन म्हणजे काय? खातेनिहाय चौकशी, तोवर अर्धा का पुर्ण पगार चालू, जरा शांत झाले की एखादे प्रतिज्ञापत्र भरुन किंवा तसेच काहीसे अन निलंबन मागे घेणे.

खर म्हणाल तर संजय दत्तला मोबाईल किंवा असे काहीतरी तुरुंगात मिळू दिले म्हणून रखवालदाराचे निलंबन समजू शकतो. बाहेर जाताना एक "जादुकी झप्पी" दिली म्हणून निलंबन हा फार्स वाटतो.

अर्धपगारी सुटी

निलंबन हे कमी वेळा शिक्षा आणि बहुतांशी इष्टापत्ती असते. त्याकाळात अर्धा पगार हा हजेरीवर चालूच असतो. सहामहिन्यापर्यंत अर्ध पगार असण्यात काही प्रत्ययाव नसतो., तोपर्यंत खातेनिहाय चौकशी चालूच राह्ते. खात्यात आपले सहकारी हेच खरे आपले शत्रू असतात, याची जाणीव प्रत्येकाला असते. निलंबित झाल्याची बातमी होते पण पुन्हा कामावर रुजु झाल्याची बातमी होत नाही. खात्यातून डिस्मिस झाल्याची उदाहरणे फारच कमी. डिसमिस होउन देखिल गृहखात्याची ऑर्डर घेउन परत कामावर आलेली उदाहरणे पण आहेत. निर्दोष सापडल्यावर संपुर्ण कालाचा पगार द्यावा लागतो. (कुठल्याही सरकारी यंत्रणेत एकटी व्यक्ती दोषी असे नसते) थोडक्यात निलंबन ही कारवाई नसुन तांत्रिकदृष्ट्या केलेली कार्यवाही असते.

प्रकाश घाटपांडे

 
^ वर