राजांचा गड : राजगड

राजगड. राजांचा गड किंवा गडांचा राजा काहीही म्हणा पण मनाला भुरळ पाडणारा आहे खरा. मावळ खोर्‍यावर करडी नजर ठेवता येण्यासारख्या जागी असलेला. २६ वर्षे मराठी राज्याची राजधानी असलेला गड. राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली.

शनिवारीच राजगडावर जाण्याचा योग आला. एका व्यावसायिक ट्रेकर्स ग्रुप बरोबर आम्ही सहा मित्र राजगडावर गेलो. आपले आजानुकर्ण होतेच त्यात. पुणे सातारा रस्त्यावर नसरापूर फाट्याला आत वळालो आणि गुंजवणे गावात आलो. तशा गडावर जाण्याच्या तीन वाटा आहेत. चोर दरवाजा, पाली दरवाजा आणि गुंजवणे दरवाजा. सध्या थोड्या पडझडीमुळे गुंजवणे दरवाजा वाट बंद आहे म्हणून आम्ही चोरवाटेने गडावर जायचं ठरवलं.

गुंजवणे गाव एकदम टुमदार म्हणतात तसं आहे. भाताची खाचरं, विहीर, त्यावर पाणी शेंदण्यासाठी रहाट, शेजारून खळखळत वाहणारा ओढा, पलीकडे भवानीआईचं मंदिर आणि घनदाट झाडी. बस थांबली तिथे पोटापाण्याची सोय झालीच आणि फक्कड चहा पिऊन राजगडाच्या वाटेला लागलो. मोठ्या आणि सर्व वयोगटातील माणसांचा समावेश असलेल्या ग्रुपबरोबर असल्याने चालण्याचा वेग तसा मंदच होता. पण त्यामुळे आम्हाला भरपूर विश्रांती मिळाली आणि दमणूक झाली नाही. एकामागून एक डोंगर पार करत पद्मावती माचीच्या पायथ्याला पोहोचलो. अचानक उभी चढण समोर लागली. तशा छोट्या छोट्या पायर्‍या आणि बाजूला लोखंडी कठडे आहेतच. पण तरीही सवय नसणार्‍यांनी जरा काळजी घेणे आणि डोंगराच्या बाजूने चढणे उतरणे, शरीराचा भार चढताना पुढे व उतरताना मागे/सरळ देणे अशी पथ्ये पाळणे आवश्यक आहे. हा चढणीचा टप्पा ओलांडला की चोरवाटेचा छोटा दरवाजा अचानक समोर येतो. आणि लगेच आपण पद्मावती तळ्यासमोरच निघतो. इतक्या उंच ठिकाणी एवढं भव्य तळं पाहून डोळ्याचं पारणं फिटतं. पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेलं की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. पद्मावती मंदिरात ३० एक जण व्यवस्थित राहू शकतील. थोडा वे़ळ थांबून बॅगमधले खाण्याचे पदार्थ पोटात टाकून पुढे निघालो.

इथून थोडं वर आलं की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बालेकिल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो. थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे. गडावर यायला तुलनेने ही सोपी वाट आहे. संध्याकाळी परत पुणे गाठायचे असल्याने आम्ही फक्त बालेकिल्ला पाहायचा म्हणून सरळ गेलो. राजगडाचा बालेकिल्ला जणू किल्ल्यावर किल्ला असल्यासारखा आहे. माझा एक मित्र म्हणाला होता की राजगड जिथे संपला असे वाटते तिथून सुरु होतो. आता ते अक्षरशः पटते. रिमझिम पाऊस, बाजूचे घनदाट झाडी यामुळे ही वाट मला थोडी झपाटल्या वाटेसारखी(हाँटिंग) वाटली. आजानुरावांनी आपल्या कॅमेर्‍याने टिपलेले क्षण ते आपल्यासमोर आणतीलच. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. इथेही थोडा शारिरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो. आमच्या सोबतच्या एक काकू तिथून परत जात होत्या. पण सोबतच्या काही जणांनी विश्वास दिल्यावर त्याही बालेकिल्ल्यावर आरामात आल्या.

बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे , एक ब्रम्हर्षी मंदिर आहे. आमच्या गाईडनुसार भारतातील ब्रम्हदेवाच्या मोजक्या मंदिरांपैकी हे एक. राजवाडा, सदर, दारूकोठाराचे अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्याची भव्यता, राजधानीच्या जागेची निवड पाहून छाती भरून येते. इंग्रजांनी तोफा लावून किल्ल्यांवरची बांधकामे आणि पायर्‍या उध्वस्त केल्या आहेत. बालेकिल्ल्यावर काही वेळ थांबून आम्ही परत फिरलो. चढणे सोपे उतरणे अवघड हे ऐकलेले वाक्य अनुभवायला मिळाले. तकलादू कठड्यांना धरत पायर्‍यात कोरलेल्या खोबणींचा आधार घेत आधीची उभी चढण उतरलो. बालेकिल्ला उतरून मघाच्या तिठ्यावर येऊन थांबलो. अजून बाकीचे उतरायला आणि एकंदरीत बराच वेळ हाताशी होता. तेव्हा संजीवनी माचीवर जाऊन येण्यासाठी मुख्य व्यवस्थापकाला गळ घातली. मग बालेकिल्ल्याला उजव्या बाजूने वळसा घालून संजीवनी माचीच्या सुरुवातीला पोहोचलो. चिलखती बुरुज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत. चिलखती म्हणजे दुहेरी तटबंदी. शत्रूसैन्याने जीवाचं रान करून बाहेरील तटबंदी पाडली की त्याला आतली तितकीच भक्कम दुसरी तटबंदी दिसते. अवसान गळाल्यासारखी अवस्था होते त्याची. शत्रू पुन्हा तयारी करेपर्यंत मावळे बाहेरील तटबंदी पुन्हा बांधून घ्यायचे. सोबतच्या लहान मुलांचे पाय आता पुरे म्हणू लागल्याने संजीवनी माची अर्धी पाहीली आणि मागे वळालो.

पद्मावती माची शेजारी एक पुरातत्व खात्याची कचेरी आहे. तिथे गरमागरम चहा पिलो. खरोखर अमृततुल्य वाटला. जान मे जान आ गई. मग किल्ला उतरायला सुरुवात झाली आणि पावसालाही. कधी रपरप तर कधी भुरभुर पाऊस पडत होता. मजा येत होती. पण आधी जी सोपी वाट होती तीच पावसाने भयंकर निसरडी झाली होती. आणि आम्हा सहा जणांपैकी सर्व सहाजण एकेकदा तरी सपशेल धरणीप्रिय झाले. एकेक पाऊल टाकत कधी हातही बाजूला टेकवत एकदाचे मैदानात आलो. सर्वांचे कपडे लाल रंगात रंगले होते. तसेच गेलो आणि गावातल्या ओढ्यात बसलो. हातपाय धुऊन कपडे बदलून पुन्हा एकदा अमृततुल्य चहा घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो. सकाळी ६.३० ला निघून रात्री ८.३० ला परत पुण्यात आलो.

किल्ल्यावर पहायची राहिलेली ठिकाणे बरीच आहेत. तेव्हा पुन्हा एकदा राजगडाला मुक्कामी जाणे क्रमप्राप्त आहे.

आजानुकर्ण यांनी सचित्र प्रतिसाद द्यावा ही विनंती.

दुर्गवेडा अभिजित..

लेखनविषय: दुवे:

Comments

राजगड: गडांचा राजा

अभिजित, सुंदर वर्णन. :)

उपक्रमींच्या अधिक माहितीसाठी: राजगड अतिशय भव्य किल्ला आहे. एका दिवसात सर्व किल्ला पाहणे शक्य नाही.
किल्ल्यावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.
१. गुंजवणे गावातून चोरदरवाजा मार्गे
२. पाली गावातून पाली दरवाजा मार्गे
३. वाजेघर मार्गे.

पाली गावातून येणारा रस्ता हा तुलनेने सोपा मात्र अधिक चढणीचा आहे. गुंजवणे गावातून येणारा मार्ग अधिक कठिण आहे.

काही नयनरम्य छायाचित्रे.
१. गुंजवणे गावः

गुंजवणे

२. वाटेवर:

३. बालेकिल्ल्याकडे जाताना:

बालेकिल्ल्याकडे जाताना

४. बालेकिल्ल्याच्या वाटेवर:

बालेकिल्ला वाट

५. चोरदरवाजा:

चोर दरवाजा

६. पद्मावती तळे:

पद्मावती तळे

७. निवासस्थानः

निवासस्थान

८. महा दरवाजा:

९. नयनरम्य राजगड १:

१०. नयनरम्य राजगड २:

अवांतर: चित्र ५, ६, ८ माझ्या क्यामेर्‍याने काढलेली नाहीत. मित्राकडून पूर्वपरवानगीने घेतली आहेत.

लेख आणि चित्रे सुरेख

लेख आणि चित्रं (विशेषतः धुक्यातली) दोन्ही आवडले. लेख अधिक विस्ताराने आला असता तरी वाचायला मजा आली असती. असो... प्रतिसादातून विस्तार करता येईलच.

काही ऐतिहासिक माहिती टाकता येईल का?

१. किल्ला किता जुना असावा? महाराजांनी बांधला नसल्यास तो कोणी बांधला आणि त्यांनी त्यात कोणती भर टाकली?
२. ब्रह्मर्षी , पद्मावती आणि रामेश्वर मंदिरांबद्दल थोडे अधिक? त्यांचे फोटो नाही का काढले?
३. चोरवाटेला चोरवाट का म्हणतात? तिथून सैन्य (तुमचे नाही, म्हाराजांचे ;-)) जाण्यास जागा नाही का? पाली दरवाजा मुख्य दार आहे का?

सध्या इतकेच. असे प्रत्येक गडाचे लेख टाका.

उत्तरे.

१. किल्ला साधारण २००० वर्षापूर्वीचा आहे. डोंगराला किल्ल्याचे स्वरुप गौतमपुत्र सातकर्णी याने दिले. सन १६४५ मध्ये शिवरायांनी किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व राजगड असे नामकरण केले. मराठेशाहीची २६ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत.

२. ब्रह्मऋषींनी येथे राहून तपःसाधना केली. त्यावेळी त्यांच्या पत्नी पद्मावती या देखील तेथे होत्या. ऋषी गुहेत तपसाधनेला बसत तर त्यांच्या पत्नी उत्तरेकडील पठारावर पर्णकुटीत वास्तव्य करत. म्हणून या माचीचे नाव पद्मावती माची ठेवले आहे. येथेच पद्मावती देवीची मूर्ती आहे. प्रचंड धुके व पावसामुळे मंदिरांचे व्यवस्थित फोटो काढणे अशक्य झाले. मंदिरांचा आकार साधारण उतरत्या छपराच्या घराप्रमाणेच आहे. काही चित्रे खाली पहा.

३. पाली दरवाजा: हा मुख्य दरवाजा आहे. याव्यतिरिक्त गडावर गुंजण दरवाजा, चोर दरवाजा (चित्र पहा) व बालेकिल्ला दरवाजा (महा दरवाजा) हे महत्त्वाचे दरवाजे आहेत.

रामेश्वर मंदिर
पद्मावती मंदिर मागील बाजू
किल्ल्याविषयी माहिती देणारा फलक

सदर फलक येथे दिसण्याइतका मोठा होत नाही असे वाटते. फलकाचे मोठे चित्र येथून उतरवून घेता येईल.

लायन किंग

सुंदर छायाचित्रे!

तिसर्‍या छायाचित्राने "लायन किंग" मधल्या "सर्कल ऑफ लाईफ" गाण्यातल्या फांदीवरून जाणार्‍या मुंग्यांच्या शॉटची आठवण करून दिली.

- कोंबडी

प्रकाटाआ

प्रकाटाआ

मुरुंबदेवाचा डोंगर..

अभिजित आणि अजानुकर्णा,

जियो!

राजगडदर्शनाचं वर्णन व चित्रे दोन्हीही सुरेख..

पावसाने न्हाऊन छानसं सजलेलं गुंजवणे अतिशय देखणं दिसत आहे. चोर दरवाज्याचे आणि महादरवाज्याचे फोटोही सुंदर आहेत!

राजगडाला पूर्वी 'मुरुंबदेवाचा डोंगर' असं म्हणत असत. महाराजांनी हा डोंगर हेरून त्याच्यावर राजगड किल्ल्याची बांधणी केली.

राजगडाच्या बांधणी कामगारांना आणि महाराजांना मानाचा मुजरा..

तात्या.

सुंदरच

मन पावसाळी झाले.

मस्त

अभिजित आणि योगेश,
सुंदर लेख आणि मस्त चित्रे. इथे बसल्या बसल्या राजगडाची सफर झाली.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
सुंदर लेख आणि मस्त चित्रे. इथे बसल्या बसल्या राजगडाची सफर झाली. सुंदर लेख आणि मस्त चित्रे. इथे बसल्या बसल्या राजगडाची सफर झाली. सुंदर लेख आणि मस्त चित्रे. इथे बसल्या बसल्या राजगडाची सफर झाली.

झकास

लेख आणि फोटो आवडले, आम्ही येत आहोत राजगडास.

सुमीत, नावा प्रमाणेच असलेला "चांगला मित्र"

वा..

वा.. वा.. लेख व फोटो दोन्ही बेस्ट.फारच सुंदर.

लेख व चित्रे

दोन्ही आवडले.
पानावरच्या थेंबाचे चित्र एकदम खास आहे. ते काढणार्‍याला आमच्या कॉम्प्लीमेंटस सांगा.

थेंबाचे चित्र

अहो कर्णानेच काढले आहे.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

धन्यवाद

कौतुकाबद्दल आभार...आजानुंनी त्यांच्या चित्रांनी आणि माहितीने लेखाला पूर्णत्व आणले.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

हेच

म्हणतो.
प्रतिसाद व लेखात रस दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार.

-आजानुपूर्ण!

सुरेख!

सुंदर वर्णन आणि सुरेख छायाचित्रे! राजगडाची सफर घडवल्याबद्दल दोघांचेही आभार. पुढील मोहीम कुठे?

छान् लेख, छायाचित्रे

लेख आणि छायाचित्रे आवडली. (एकदा प्रतिक्रीया देण्याचा प्रयत्न करत होतो पण या लेखा खाली आधी खिडकी दिसत नव्हती आणि नंतर "फॉर्मॅटींगचे ऑप्शन्स" दिसत नव्हते)

एक प्रश्न: तिथे शिवा़जीच्या काही आठवणींचे जतन केले आहे का? जसे रायगडावर सिंहासनाचे प्रतिक ठेवले आहे तसे राजगडावर काही आहे का?

धन्य्वाद,

विकास

आहे

सदर वगैरे गोष्टी आहेत. सिंहासन किंवा महाराजांचा पुतळा असे काही नाही.
(स्वतः महाराजांनीही तरी सर्व किल्ल्यांवर स्वतःच्या खुणा किंवा स्मृती राहाव्यात असे कुठे केले होते.
पर्यटकच जाऊन खडूने आपापली नावे अजरामर करतात.)

सुंदर

हे सुंदर फोटो पाहून - दुसरं काय - एक् सुंदर शेर आठवला

अश्कोंसे तर है फूल की हर एक पंखडी
रोया है कौन थाम के दामन बहार का

अश्क - आसवे, तर - भिजलेली

वा वा!

आम्हालाही एक कविता आठवली

भुईवर आली सर
सर श्रावणाची
भुईतून आली वर
रुजव वाळ्याची

भुईवर आली खार
खार धिटाईची
भुईतून कणसात
चव मिठाईची

भुईवर आली उन्हे
उन्हे पावसाची
पायी माझ्या भुई
चिक्कणमातीची

वा वा

(अस्मादिकांची नाही... अशीच कुठेशी वाचलेली आहे)

 
^ वर