सैतानाचं देणं

'दुर्जनं प्रथमं वंदे' किंवा 'सैतानाचं देणं प्रथम देऊन टाकावं' असं म्हणतात.

बहुतेक माणसं एखाद्या महत्वाच्या कामाला किंवा प्रकल्पाला सुरवात करण्यापूर्वी पूजा-अर्चा, प्रार्थना, साधुपुरुषाचा आशीर्वाद घेणे, कधीकधी भविष्यवेत्त्याचा सल्ला घेणे अशा गोष्टी करतात. यांत स्वकर्तृत्वावर अत्त्युच्च यश संपादन केलेली हाडाची प्रयत्नवादी माणसेही असतात. शिवाजी महाराजांनीही अफजलखानाला भेटण्यापूर्वी देवी भवानीचे पूजन करून आशीर्वाद घेतला होता असे आपण वाचतो. ह्या माणसांना असं का करावंसं वाटत असावं?

साधारणपणे कुठलेही नवे धाडस करायचे म्हंटले की माणसाच्या मनांत अनेक उलटसुलट भावनांची गर्दी होते. भविष्यांतील अनिश्चिततेबद्दलची चिंता ही त्यांतलीच एक आहे. ही भीतीची भावना आपणा सर्वांमध्ये बाल्यावस्थेंतच कायमस्वरूपी मुद्रित झालेली असते. कर्तृत्ववान् प्रयत्नवादी माणसेही त्याला अपवाद नसतात. त्या भावनेची व्यवस्था न लावता ती दाबून टाकली तर प्रत्यक्ष प्रयत्न करतांना ती उसळी मारून वर येण्याची व प्रयत्नांत अडथळा निर्माण करण्याची शक्यता असते.

बाल्यावस्थेंत मनुष्य भीतीपासून संरक्षणासाठी वडीलधार्‍यांवर अवलंबून राहतो व त्यासाठी तो आपल्या परीने त्यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करतो. ही त्याची एक प्रकारची अंधश्रद्धाच असते. मोठेपणी त्याच्या मनांतील वडीलधार्‍यांची जागा देव, देवता व साधुपुरुष घेतात. भविष्यांत हाती घेतलेल्या कामांत अडथळा आल्यास त्यांनी (देव, देवता, इ. नी) आपल्या मदतीला धावून यावे यासाठी तो आपल्या मतीने त्याला प्राप्त झालेल्या कर्मकांडाच्या परंपरेप्रमाणे 'व्यवस्था' करतो. एकदा भीतीची अशी व्यवस्था लागली की प्रत्यक्ष काम (प्रयत्न) चालू असतांना ती पुन्हा डोके वर काढीत नाही . त्यामुळे प्रयत्नांवर विपरीत परिणाम होण्याचे टळते, ते योग्य प्रकारे होतात व यश मिळते.

अर्थातच सुरवातीला केले जाणारे पूजाअर्चादि प्रकार ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. पण एकदा अंधशद्धेचे समाधान झाले की होणारे प्रयत्न डोळस असतात. स्वप्रयत्नाने यशस्वी झालेली कर्तृत्ववान् माणसे प्रथम स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असलेल्या अंधश्रद्धाळू भागाचे कळत-नकळत समाधान करतात व मग पुढे जातात. त्यांत विचारांपेक्षा परंपरेचाच ज्यास्त भाग असतो. हे काहीसे सैतानाचे देणे प्रथम देऊन टाकण्यासारखे आहे.

या लिखाणाचा उद्देश अंधश्रद्धेचे समर्थन करण्याचा नाही. पण जर कुणी एखाद्या कामाच्या सुरवातीला काही अंधश्रद्धेत मोडणार्‍या गोष्टी करीत असेल तर त्याचा उपहास करू नका. तो, पुढे डोळस प्रयत्न व्हावेत म्हणून अंधश्रद्धारूपी सैतानाचे देणे प्रथम देऊन टाकीत असतो. यांत त्याचा दूरदर्शीपणाच दिसून येतो. मात्र त्यांत कुठल्याही प्रकारे जीवितहानि होत असेल तर तो प्रकार थांबवायलाच हवा.

आपणांस काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

टोटली असहमत/कागदी बोटी..:)

ॐ गंगणपतये नमः :)
बोला गणपती बाप्पा मोरया... :)

ह्या माणसांना असं का करावंसं वाटत असावं?

कारण तसं करून त्यांना बरं वाटत असावं!

बाल्यावस्थेंत मनुष्य भीतीपासून संरक्षणासाठी वडीलधार्‍यांवर अवलंबून राहतो व त्यासाठी तो आपल्या परीने त्यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करतो. ही त्याची एक प्रकारची अंधश्रद्धाच असते.

असहमत.. मला असं वाटत नाही. मी माझ्या वडिलधार्‍यांची मर्जी कुठल्याही अंधश्रद्धेपायी संपादन करत नाही/केली नाही. वडीलधार्‍यांनी अनेक गोष्टी माझ्या कळत-नकळत मला दिलेल्या असतात, ज्या मला माझ्या आयुष्यात अनेक ठिकाणी उपयोगी पडतात. त्यामुळे माझ्या मनात माझ्या वडीलधार्‍यांबदल अधिक प्रेम, आदर उत्पन्न होतो. त्याची कुठेतरी जाणीव ठेवून मी जर माझ्या वडीलधार्‍यांची मर्जी, त्यांच्या लहानसहान इच्छा, आवडीनिवडी सांभाळण्याचा प्रयत्न केला तर ती अंधश्रद्धा कशी काय ठरते?

एकदा भीतीची अशी व्यवस्था लागली की प्रत्यक्ष काम (प्रयत्न) चालू असतांना ती पुन्हा डोके वर काढीत नाही . त्यामुळे प्रयत्नांवर विपरीत परिणाम होण्याचे टळते, ते योग्य प्रकारे होतात व यश मिळते.

असहमत. पुजाअर्चा करून, वडीलधार्‍यांचे आशीर्वाद घेऊन एखाद्या कामाची सुरवात करणे, हे एखाद्या भितीची व्यवस्था करणे असे म्हणणे मला केवळ हास्यास्पद वाटते.

अनेक माणसे याप्रकारे कामाची सुरवात करतात आणि यशस्वी होतात ती सर्व कोणत्यातरी भितीची व्यवस्था करणारी घाबरट मंडळी असतात की काय? शिवरायांनी भवानीदेवीच्या पाया पडून अनेक साहसे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत ती त्यांच्या कर्तृत्वावर! परंतु ती करण्याआधी भवानीच्या पाया पडणे म्हणजे एखाद्या भितीची व्यवस्था करणे, म्हणजेच पर्यायाने घाबरटपणा करणे असे म्हणणे हे केवळ अज्ञानमूलक व मूर्खपणाचे आहे असे मला वाटते!

अर्थातच सुरवातीला केले जाणारे पूजाअर्चादि प्रकार ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे.

पुन्हा असहमत. आज अनेक मंडळी पुजाअर्चा करून कोणत्याही नवीन कार्याला हात घालतात ती सर्व मंडळी अंधश्रद्धाळू असतात असे आपल्याला म्हणावयाचे आहे किंवा कसे?

स्वप्रयत्नाने यशस्वी झालेली कर्तृत्ववान् माणसे प्रथम स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असलेल्या अंधश्रद्धाळू भागाचे कळत-नकळत समाधान करतात व मग पुढे जातात.

पुन्हा असहमत. माझ्या मते या चर्चेत वापरला गेलेला 'अंधश्रद्धा' हा शब्द बर्‍याच ठिकाणी चुकीच्या अर्थाने वापरला गेला आहे! चर्चाप्रतावकाला एकतर 'अंधश्रद्धा' या शब्दाचा अर्थ नीटसा माहीत नसावा किंवा 'श्रद्धा' आणि 'अंधश्रद्धा' यातील पुसटशी सीमारेषा चर्चाप्रस्तावकाच्या फारशी परिचयाची नसावी असे वाटते!

त्यांत विचारांपेक्षा परंपरेचाच ज्यास्त भाग असतो. हे काहीसे सैतानाचे देणे प्रथम देऊन टाकण्यासारखे आहे.

जर एखाद्या कार्यापूर्वी पुजाअर्चा करणे हे जर अंधश्रद्धाळूपणाचे लक्षण असेल तर 'सैतानाचे देणे' हा शब्दप्रयोगदेखील अंधश्रद्धाजनकच नाही काय?:) मुळात सैतान कुणी पाहिला आहे काय? :) शरदराव, आपण सैतान पाहिला आहे काय? मग खुद्द आपणच 'सैतानाचे देणे' असे शब्द वापरणे हे अंधश्रद्धेपणाचे लक्षण नाही काय? :)

या लिखाणाचा उद्देश अंधश्रद्धेचे समर्थन करण्याचा नाही.

छे! इथे तर उलट श्रद्धेचेच चुकीचे मूल्यमापन होऊन तिला वारंवार 'अंधश्रद्धा' म्हटले गेल्याचे आढळते! :)

पण जर कुणी एखाद्या कामाच्या सुरवातीला काही अंधश्रद्धेत मोडणार्‍या गोष्टी करीत असेल तर त्याचा उपहास करू नका.

असहमत! 'अंधश्रद्धेत मोडणार्‍या गोष्टी' या शब्दांशीच असहमत!

मात्र त्यांत कुठल्याही प्रकारे जीवितहानि होत असेल तर तो प्रकार थांबवायलाच हवा.

सहमत! :)

या चर्चाप्रस्तावाला मिळणार्‍या प्रतिसादांप्रती, चर्चेअंती चर्चाप्रस्तावाककडूनही एखादे उत्तर अपेक्षित आहे. सदर चर्चाप्रस्तावकाकडून अश्या बर्‍याचश्या चर्चा, कागदी बोटी जश्या पाण्यात सोडल्या जातात, तश्या इथे उपक्रमावर सोडल्या गेल्याचे पाहाण्यात आहे! आणि चर्चाप्रस्तावक या नात्याने चर्चाप्रस्तावाकडून यातील बहुतेक चर्चात्मक कागदी बोटी निरुत्तरीत राहून पाण्यात तश्याच भिजून वाहून गेल्याचेही आमच्या पाहण्यात आहे म्हणून उत्तराची अपेक्षा! :)

आपला,
(कागदी नांगरबोटीतला सैतान!) तात्या.

सदर प्रतिसादाची सुरवात ही 'ॐ गं गणपतेय नम:' असे लिहून केली आहे हे कुठल्याही अंधश्रद्धेपायी किंवा भिती वगैरे घालवण्याकरता नाही हे लक्षात यायला हरकत नाही! :)

आपला,
(वीणाधारी शारदेचा व लालबागच्या राजाचा भक्त!) तात्या.

:)

विसोबांच्या प्रतिक्रीयेशी टोटली सहमत

विसोबांच्या प्रतिक्रीयेशी टोटली सहमत...

त्यामुळे परत तेच लिहीत नाही. प्रस्ताव राखणार्‍याने चर्चेत भाग घ्यावा एव्ह्ढे नक्की परत म्हणतो.

सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे
परंतू तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहीजे

असा रामदासांचा एक श्लोक आहे. या चर्चेच्या प्रस्तावावरून रामदासांचा भगवंत हाच कोर्ड्यांचा सैतान दिसतो. दुर्दैवाने यातला भगवंत जो शिवाजीला आणि तशाच प्रकारच्या अनेकांनी कार्यारंभ करताना पुजला, ना धड तो (त्याचा अर्थ) कळला ना भयाने पछाडलेले म्हणून शिवाजी कळला, इतकेच काय ते जास्तीचे म्हणावेसे वाटले...

बाकी ही अंधश्रद्धा वाटत असेल तर घ्या वाटून - थट्टा, उपहास करून अथवा न करून. जाता जाता राहवत नाही म्हणून गीताईतील ज्ञान आणि श्रद्धा यावरील खालील श्लोक लिहीतो, त्यातला कुठला या (चर्चेच्या विषयातील) पद्धतीच्या विचरसरणिला लागू होतो ते तुमचे तुम्हीच पहा:

ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी | योग युक्त यथाकाळि ते पावे अंतरी स्वये ||
श्रद्धेने मेळवी ज्ञान संयमी नित्य सावध | ज्ञानाने शिघ्र तो पावे शांती शेवटची मग ||
नसे ज्ञान नसे श्रद्धा, संशयी नासला पुरा | न हा लोक न तो लोक न पावे सुख संशयी ||

भगवंतांचे अधिष्ठान

पण भगवंतांचे अधिष्ठान तर सर्वत्रच असते ना ?

अधिष्ठान म्हणलय, प्रतिष्ठान नाही.

याचा अर्थ कार्य करताना "इदं न मम" थोडक्यात अहंकार बाजूला ठेवून करावे असा आहे. पूजा अर्चा हा भाव नाही. जेव्हढी व्यक्ती श्रेष्ठ तेव्हढे ते अधीक महत्वाचे नाहीतर त्या व्यक्ती इतक्याच मोठ्या अहंकाराने सर्व वाया जाते. अर्थात हे शिवाजीला कळत होते म्हणूनच तो शिवाजी झाला, ज्यांना कळले नाही ते बसले झांजा वाजवत.

अर्थात माझा मूळ मुद्दा आहेच की हे लिहीताना कोर्डे साहेब आमच्या हिंदू देवतांना सैतान म्हणाले की जेंव्हा सैतान ही संकल्पना इतर रिलीजन्स मधील आहे. अशी मिसळ करून त्याला जर सेक्युलॅरिझम म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी, पण असे करणे आणि नंतर चर्चेत भाग न घेणे हा खोडसाळपणा वाटतो.

विसोबा टच! -:)

चर्चाप्रस्तावाकडून यातील बहुतेक चर्चात्मक कागदी बोटी निरुत्तरीत राहून पाण्यात तश्याच भिजून वाहून गेल्याचेही आमच्या पाहण्यात आहे म्हणून उत्तराची अपेक्षा! -:)

आपला,
(कागदी नांगरबोटीतला सैतान!) तात्या.

सदर प्रतिसादाची सुरवात ही 'ॐ गं गणपतेय नम:' असे लिहून केली आहे हे कुठल्याही अंधश्रद्धेपायी किंवा भिती वगैरे घालवण्याकरता नाही हे लक्षात यायला हरकत नाही! -:)

हा हा हा! खास "विसोबा टच" असलेला प्रतिसाद आवडला बरं का विसोबा! -:)

मी पण विसोबा आणि विकासशी टोटली सहमत आहे.

--ईश्वरी.

इथे प्रतिसाद देता येत आहे पण विसोबांच्या गीतमेघदूताला प्रतिसाद देता येत नाही असे का? काही प्रशासकीय किंवा तांत्रिक समस्या दिसते आहे. कृपया कुणी खुलासा करू शकेल का?

असे का?

मात्र त्यांत कुठल्याही प्रकारे जीवितहानि होत असेल तर तो प्रकार थांबवायलाच हवा.
ह्या बाबतीत मला नाही वाटत कोणी असहमत असेल. चटकन सगळे हो म्हणतील.
पण मला तुमचे इतर मुद्दे पटण्यासारखे वाटत नाहीत.

असे का? की एखादा माणुस सॉरी स्वकर्तृत्वावर अत्त्युच्च यश संपादन केलेली व्यक्तीने पूजा-अर्चा, प्रार्थना, साधुपुरुषाचा आशीर्वाद घेणे, कधीकधी भविष्यवेत्त्याचा सल्ला घेणे ह्यावर कोणाचा आक्षेप का असावा? ह्या पैकी कोणतीही गोष्ट कायद्याने गैर आहे का? जर आपले वैयक्तीक नुकसान होत नसेल तर लुडबुड कशाला? (आज ह्यावर आक्षेप घेताय उद्या अजून काही करायला....)

समजा एखाद्याचा विश्वास आहे ह्या गोष्टींवर किंवा नसेल पण त्या व्यक्तिच्या जवळच्या लोकांची मर्जी राखायला किंवा आपल्या यशाचे श्रेय विनयाने ("इदं न मम") ती व्यक्ती ह्या गोष्टींव्दारे (स्वःता नाकारत असेल) इतरांना देत असेल तर ते त्याला करायला (परवानगी) नाकारणारे आपण कोण?

बरेचदा जे दुसर्‍याबाजूकडे झुकले गेले आहेत (म्हणजे देव नाही, कर्मकांड कसली करता, तुम्हीसगळे अशी अंधश्रध्दा का करता, तुम्हाला सैतानाचं देणं द्यायचीच हौस आहे, म्हणणारे ) यांना असे का वाटते की "अत्त्युच्च यश संपादन केलेल्या लोकांनी" मला जी विचारसरणी पटते तसेच वागावे. कुठेतरी माझेच खरे आणी तसेच तुम्ही पण करा असा आग्रह का बरे धरला जातोय? तुमच्या विचारसरणी शिवाय, कुठलीही जीवितहानि होऊ न देता लोकांना यश मिळत आहे हे बघताय ना?

असो जाऊ देत, चला अश्या लोकांना समज यावी म्हणून देवाकडे एक प्रार्थना करुया :-) कारण तोच हे काम करु शकतो आम्ही कितीही सांगीतले, विनंती केली, तर्क केला तरी नाही पटत त्यांना.

बाय द वे, ही अंधश्रध्दा निर्मूलन मंडळी त्यांच्या संस्थेला देणगी देणार्‍यांकडुन मी नास्तीक, नो कर्मकांड, नो अंधश्रध्दा मानणारा व जर का मी तसा नसलो तर माझ्या डोक्याची शंभर शकले होऊन संस्थेच्या दारात लटकतील असे लिहून घेतात का हो? का गुपचूप पावती फाडतात? देणगी घेतात का नाही ? असेल "देणगी" पॉलीसी काय? कोणाला माहीती आहे?

पुन्हा तेच

श्रद्धा हवी अंधश्रद्धा नको हे एक गुळगुळीत झालेले वाक्य आहे.
प्रत्येक श्रध्दा ही अंधच आस्ते. अंधश्रद्धा म्हणणे म्हणजे पिवळा पितांबर म्हट्ल्यासरखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हनजे श्रद्धा. श्रद्धा ही व्यक्तिसापेक्ष समाजसापेक्ष, काळ सापेक्ष, स्थळसापेक्ष असते.विधायक की विघातक हा खरा प्रश्न आहे? मनुष्य हा काही विवेकवादाचे प्रोग्रामिन्ग केलेला जैवरासायनिक यन्त्रमानव नव्हे. श्रद्धा ही माणसाला अत्मिक बळ देते. याबद्द्ल आमच्या अंनिस मध्ये सुद्धा दुमत नाही.अंधश्रद्धा निर्मूलनावर आमची श्रद्धा आहे असे देखिल म्हणता येईल. सती जाणे हे त्या काळी धर्मश्रद्धाच होती. एका स्त्रीने पूजेत लॊर्ड बेंटीक्टचा शाळीग्राम ठेवला होता असे वाचल्याचे स्मरते. आपली ती श्रद्धा आणि इतरांची ती अंधश्रद्धा.
आता सैतानाचा प्रश्न - मी होस्टेलला असताना पहाटे अमृततुल्य मध्ये चहा प्यायला जाई.आम्हीच त्याचे पहिले गिर्‍हाईक असे. तो पहिला चहा हा रस्त्यावर ओतून देत असे. मी त्याला विचारल अस का करतो. तो म्हणाला पहिला चहा सैतानाला. त्याला खुष केलं पाहिजे. देव काय आपला नेहमीचाच् आहे. तो थोडच कुणाच वाईट करणार आहे.
थोडक्यात देवाच्या उपयुक्तता मूल्या पेक्षा सैतानाचे उपद्रव मूल्य अधिक असते.

प्रकाश घाटपांडे

स्थळसापेक्ष

तो पहिला चहा हा रस्त्यावर ओतून देत असे.

जर का त्याच्या संर्पूण मालकीचा रस्ता असेल तर हू केअर्स्

जर का त्याच्या संर्पूण मालकीचा रस्ता नसेल व चहा ओतला असेल तर अनिष्ट , गैरकानुनी गोष्ट त्या माणसाला कडक शिक्षा केली पाहीजे

सुज्ञ माणसे तिथे सामान्यतः चहा पिणार नाहीत.

ईथे श्रद्धा, अंधश्रद्धा हा भाग नाहीच फक्त चूक वा बरोबर घटना.

चहा

जर का त्याच्या संर्पूण मालकीचा रस्ता असेल तर हू केअर्स्

नसला तर काय फरक पडतो?

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

रस्ता

रस्ता जो इतर लोकांना वापरायचा आहे, तो का बरे घाण करायचा?

हेच मागे आजानुकर्णाच्या लेखात म्हणालो होतो. ह्या समाजात सार्वजनीक स्वच्छतेची खुपच अनास्था / नावड आहे.

अरे अभिजित चहा किंवा अजुन काही, दुसर्‍याच्या मालमत्तेमधे टाकुन घाण करणे हे योग्य का अयोग्य हा सवाल तु तुझ्या गुरुजन, घरातील वडीलधारे, लाईफ पार्टनर (सॉरी पाश्चात्य देशात हे पॉलीटिकली करेक्ट आहे, प्लिज काही राग मानुन घेऊ नकोस) , बॉस यांना विचार व मला सांग काय म्हणतात.

मजकूर संपादित. व्यक्तिगत रोखाचा मजकूर अप्रकाशित केला आहे.

वैयक्तिक

अरे अभिजित चहा किंवा अजुन काही, दुसर्‍याच्या मालमत्तेमधे टाकुन घाण करणे हे योग्य का अयोग्य हा सवाल तु तुझ्या गुरुजन, घरातील वडीलधारे, लाईफ पार्टनर (सॉरी पाश्चात्य देशात हे पॉलीटिकली करेक्ट आहे, प्लिज काही राग मानुन घेऊ नकोस) , बॉस यांना विचार व मला सांग काय म्हणतात.

आज मला अभिजित व त्याच्या सारख्या लोकांना सार्वजनीक स्वच्छतेबाबत योग्य आकलन व्हावे अशी प्रार्थना देवाकडे केली पाहीजे

हे सगळं मला तुम्ही व्यनीतून किंवा माझ्या खरडवहीतून पाठवलं असतंत तर तुम्हाला भौतिक स्वच्छतेइतकीच मानसिक स्वच्छतेची जाण आहे हे सहज समजलं असतं.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

रस्ता

रस्ता पब्लिकचा हय भौ. तुमी कोन सांगनार आमि चा वतायचा का नाय ते.

पब्लिककर्ण

अरे

योगेश तुझाच हा लेख होताना ? आता तुच....बापरे..

पब्लिकचा प्रतिसाद

आपण काही सांगितल्यावर पुण्यात काय काय ऐकायला लागते याची झलक होती...

:-)

सहज यांनी आपले प्रतिसाद सहज नाही घेतले. ह. घ्या. लिहायला विसरलो त्याचा परिणाम.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

या पुढील उपप्रतिसाद संपादित. व्यक्तिगत स्वरूपांच्या प्रतिसादासाठी कृपया व्य. नि. किंवा खरडवहीचा वापर करावा.

अजून काही मुद्दे

कोर्डेसाहेबांचे पहीले वाक्य आहे: 'दुर्जनं प्रथमं वंदे' किंवा 'सैतानाचं देणं प्रथम देऊन टाकावं' असं म्हणतात.

आणि नंतर ते आपण देवाची पूजा कशी करतो वगैरे म्हणतात, त्यात शिवाजी सारखा (कोर्ड्यांनी शब्द वेगळे वापरलेत पण याच अर्थी) "घाबरट" , "अंधश्रद्धाळू" राजा पण आला जो भवानीची पूजा करायचा. याचा अर्थ काय तर शरद रावंच्या म्हणण्याप्रमाणे हिंदू देव-देवता "दुर्जन" अथवा "सैतान" आहेत.

सर्वप्रथम मला असे म्हणायचे आहे की असे म्हणून आणि नसलेला संबंध तयार करून कोर्डे साहेब हे हिंदू धर्माला आणि तो मानणार्‍यांचा उपहासच करत आहेत(पाळणारे कोण कसे पाळतात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे).

दुसरा भाग म्हणजे - सैतान हा शब्द "सेटान" या शब्दावरून आलेला आहे. सेटन ही कल्पना प्रामुख्याने ख्रिश्चन आणि नंतर मुस्लीम धर्मातील आहे. या कल्पनेत सैतान हा इश्वराच्या विरुद्ध असतो आणि तो इश्वराजवळ जाऊ देत नाही. आपल्याकडे राक्षस ही जरी संकल्पना असली तरी देव-दानव (राक्षस) यातील संघर्ष हा सत्तेपुरताच असतो. शेवटि रावण झाला काय, कंस झाला काय किंवा हिरण्यकश्यपू झाला काय सर्वजण "इश्वराला/परब्रम्हाला" मानतातच जरी बाकी सत्तेसाठी देवांशी युद्ध केले तरी शेवटी ते परब्रम्हातच विलीन होतात.

थोडक्यात कोर्डेसाहेब एका धर्मातील कल्पना दुसर्‍या धर्मातील लोकांना लागू करतात आणि कितीही नाही म्हणत असले तरी त्यात हिंदूंचा उपहासच करतात. माफ करा हे व्यक्तिगत नाही पण चांगले (पॉझिटीव्ह) विचार करता येयला पण नशीब लागते की काय कोण जाणे! कदाचीत म्हणूनच ज्ञानेश्वरांना म्हणावेसे वाटले असेल की:

बहूत सुकृतांची जोडी म्हणूनी विठ्ठले आवडी
(आधीच्या चांगल्या कर्मा मुळेच आता चांगल्या गोष्टीत रममाण होयला आवडते)

हे मात्र आवडले

(आधीच्या चांगल्या कर्मा मुळेच आता चांगल्या गोष्टीत रममाण होयला आवडते)

हे मात्र आवडले
प्रकाश घाटपांडे

हो पण,

प्रसन्न वाटते, म्हणून सकाळी देवाला फुले वाहून उदबत्ती लावून कामाला जाणार्‍यावर कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण मला तरी दिसत नाही.

हो पण लमाणराव, शरदरावांच्या चर्चाप्रस्तावावरून त्यांनाही हेच म्हणावयाचे आहे असे वाटत नाही..

काय म्हणता?

आपला,
(संदिग्ध) तात्या.

स्वच्छता व ईश्वर सेवा

महाराष्ट्र राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, मुख्यालय संगमब्रिज पुणे येथील स्वच्छता गृहात मी ही पाटी लावली होती. स्वच्छतेसाठी ईश्वरालाही वेठीस धरुन पाहिल. पण फारसा उपयोग झाला नाही. शेवटी स्वतःच मुतारी साफ करु लागलॊ.
सिगारेटची थोटके, गुट्क्याचे पाउच, तंबाखूचे विडे, विटकरीचे तुकडे असे घटक मुतारी तुंबण्यास कारणी भूत ठरत.
इथे पण बघा. सर्व सरकारी कार्यालयात कमी अधिक फरकाने हीच परिस्थिती दिसेल.
प्रकाश घाटपांडे

स्वच्छता व ईश्वर सेवा - लोकशिक्षण

घाटपांडे साहेब,

प्रयत्न करणे आणि दुसरे म्हणजे जाणीवपूर्वक लोकांना स्वाचरण दाखवणे हे महत्वाचे. मला खात्री आहे आपण स्वतः करत असाल. पण एखादी (चांगली) गोष्ट जनसामान्यात रूजायला एक पिढी जावी लागते. ते एखाद्याचे काम नाही पण त्या साठी सतत लोकशिक्षण करणे याला पर्याय नाही.

सैतानाला का?

सैतानाचं देणं हा कोणता वाक्प्रचार? सैतान काही भारतीय नाही. हे म्हणजे पूजा करा गणेशाची आणि नैवेद्य दाखवा येशूख्रिस्ताला असं म्हटल्यासारखं वाटलं.

- राजीव.

शांत व्हा

एकूण आलेल्या प्रतिसादांत तात्यांनी, मी एकदा लिखाण केल्यावर चर्चेंत भाग घेत नाही अशी तक्रार केली आहे. ती खरी नाही. एखाद्या प्रतिसादावरून माझ्या लिखाणांतला महत्वाचा मुद्दा विचारांतच घेतला गेला नाही किंवा पूरक माहितीची किंवा संदर्भाची गरज आहे असे आढळून आले तर मी प्रतिसादाला उत्तर देतोच. शिवाय प्रतिसाद लिहिणार्‍याला व इतर संबंधितांना व्य. नि. पाठवून माझे उत्तर वाचायची विनंति करतो. पण मी ज्याप्रमाणे प्रत्येक वाचकाने प्रतिसाद दिलाच पाहिजे किंवा दिलेला प्रतिसाद अनुकूल असला पाहिजे असा आग्रह धरू शकत नाही त्याचप्रमाणे मी प्रत्येक प्रतिसादाला उत्तर दिलेच पाहिजे किंवा प्रतिसादानुसार माझे विचार बदलायलाच पाहिजेत अशी अपेक्षा असू नये.
"विकास" यांनी असा मुद्दा उपस्थित केला आहे की माझ्या म्हणण्याप्रमाणे हिंदू देव-देवता दुर्जन किंवा सैतान आहेत. खरे तर माझ्या लिखाणांतील शेवटच्या परिच्छेदांत मी अंधश्रद्धेला सैतान म्हंटले आहे. आधिक उलगडून सांगायचे तर माणसाच्या व्यक्तिमत्वांतील अंधश्रद्धाळू भाग हाच सैतान ('काम बिघडवणारा' या अर्थाने) आहे. मी स्वतः बुद्धिप्रामाण्यवादी आहे. जगांत माणसाचे बरे-वाईट करणारी कुठलीही बाह्यशक्ति अस्तित्वांत नाही असे माझे मत आहे. ज्याचे अस्तित्वच मला मान्य नाही त्याला मी सैतान किंवा दुर्जन म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

तथ्य आहे

शरदराव, तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे. देवाची संकल्पनाच मुळी भीतीतून निर्माण झाली आहे. विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या लोकांना भीती नसते असे म्हणणे चुकीचे आहे. भीतीची भावना नैसर्गिक आहे आणि कर्तृत्त्वाने मोठ्या असलेल्या लोकांनाही भीतीही वाटत असतेच. भीती असतानाही आपले कार्य पूर्णत्वात नेण्यात त्यांचे मोठेपण आहे. बाकी तुमच्या विश्लेषणाशी बर्‍याच अंशी सहमत आहे.
आपला
(सहमत) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

तथ्य आहे

शरदराव, तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे. देवाची संकल्पनाच मुळी भीतीतून निर्माण झाली आहे. विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या लोकांना भीती नसते असे म्हणणे चुकीचे आहे. भीतीची भावना नैसर्गिक आहे आणि कर्तृत्त्वाने मोठ्या असलेल्या लोकांनाही भीतीही वाटत असतेच. भीती असतानाही आपले कार्य पूर्णत्वात नेण्यात त्यांचे मोठेपण आहे. बाकी तुमच्या विश्लेषणाशी बर्‍याच अंशी सहमत आहे.
आपला
(सहमत) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

 
^ वर