माळशेज घाट

नाणेघाटाला जाऊन आल्यानंतर पुढच्याच आठवड्यात लगेच एका गटासोबत माळशेजला निसर्गपर्यटनासाठी जाण्याची संधी मिळाली.

नाणेघाटाच्या वेळेस माळशेजचा प्रवास रात्री केला होता. त्यात खूप धुकंही होतं. त्यामुळं माळशेज फारसा दिसला नाही.

त्यामुळं गेलो.

कदाचित खंडाळा घाटाच्याही आधीचा, देशावरच्या लोकांना कोकणात उतरण्यासाठी असलेला हा खूप जुना घाट. पेपरात दरडी कोसळून रस्ता बंद या बातमीमुळे माहिती होणारा.

पुणे-नाशिक रस्त्यावर आळेफाट्यानंतर डावीकडे वळालो तेव्हाच माळशेजची चाहूल लागली होती. आजूबाजूला सगळं हिरवंगार होतं. डोंगरावर दिसणारं धुकं, रस्त्याच्या कडेला साचलेलं पाणी, डोक्यावर इरलं घेऊन लगबगीनं चालणारे लोक, हवेतला सुखद, ओलसर गारवा. मस्त वाटत होतं. खूप दिवसांनी माळशेज दिवसाढवळ्या बघण्याची संधी मिळत होती. लहान असताना कल्याण-ठाणे-मुंबईला ह्याच घाटाने जायचो. टोकावड्याचे बटाटवडे, खारे शेंगदाणे, करवंदं, जांभळं सगळं आठवून गेलं.

प्रत्यक्ष घाट सुरु झाला आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहाजवळ आलो तेव्हा मात्र भ्रमनिरास झाला. पुढे बर्‍याच गाड्या दिसत होत्या. घाटात पर्यटकांची बरीच गर्दी असावी. गटामधले नवीन सदस्य लांब दिसणारे धबधबे, रस्त्यावरचं धुकं बघून उत्तेजित झाले होते. आता इथूनच चालायला सुरुवात करावी या हेतूने सगळेजण खाली उतरले. चालायला सुरुवात केली तेव्हा आजूबाजूला लक्ष गेलं. रस्त्याच्या बाजूला, लहान ओहोळांमध्ये दारुच्या, बिसलेरीच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कुरकुरे, लेज यांचे रॅपर्स पर्यटकांनी मुक्तहस्ताने निसर्गाला भेट दिले होते. निसर्ग आणि दारुडे या पोस्टमध्ये हरेकृष्णाजींनी सांगितल्याप्रमाणे माळशेजमध्येही दारुड्यांचा प्रचंड उपद्रव आहे. कदाचित मुंबई-नाशिक पासून येणेजाणे सोपे असल्यामुळे ताम्हिणी, वरंधा घाटापेक्षा खूपच जास्त.

प्लॅस्टिक आणि काचेच्या या प्रदूषणामुळे सह्याद्रीची माती आणि दगडं धरुन ठेवणार्‍या वनस्पतींची प्रचंड हानी होत आहे. गेल्या काही वर्षात दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याचं कारण हे या वनस्पतींचा नाश हेच असावं. सह्याद्रीच्या अस्तित्त्वालाच धोका उत्पन्न झाला आहे. दोन घटका धबधब्यात भिजून मद्याचा आस्वाद घेणार्‍या पर्यटकांना याची कसली काळजी!

रस्त्याने अनेक नवनव्या, चकचकीत गाड्या मोठ्यामोठ्याने संगीत वाजवत आणि हातातल्या बाटल्या नाचवत येत होते. गटातल्या मुलींना पाहताच अधिक चेव येऊन शिट्ट्या मारणे, ओरडणे वगैरे प्रकार चालू होत. माळशेजच्या बोगद्याच्या पुढे आल्यावर एक मोठा धबधबा आहे. तिथं तर चक्क ढोल-ताश्याची पथकं आणून काही धुंद मंडळी शर्ट वगैरे काढून स्वैर नृत्य करत होते. एक दोन पोलीस हातात छत्री धरुन बाजूला उभे होते. कदाचित तिथे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याकडे लक्ष देत असावेत. एवढ्या मोठ्या जमावाला दोन पोलीस कसे काय पुरे पडणार?

बाटल्या घेऊन नाचत असलेल्या पर्यटकांना घेऊन जाणार्‍या बर्‍याच गाड्यांवर असलेले UP, BR, GJ, CG, JH चे आरटीओ रजिस्ट्रेशन बघितल्यावर नवाकाळ, सामना, पुण्यनगरी वर पोसलेल्या माझ्या काही पेशींनी परप्रांतीयांविरुद्ध क्षणभर बंड पुकारले. पण थोड्याच वेळाने महा-०१ असे मराठी रजिस्ट्रेशन असलेल्या आणि गाडीच्या मागच्या बाजूवर डरकाळी फोडणार्‍या वाघाच्या चेहर्‍यासोबत "राजे" असे भगव्या रंगात रंगवून "जे" च्या मात्रेला तलवारीचा आकार दिलेले चित्र असणार्‍या एका गाडीतून आलेल्या मराठी बांधवांनी त्यावर पाणी ओतले! त्यांनी रस्त्याच्या बरोबर मध्येच गाडी थांबवून तिथेच बाजूला प्रातर्वैधिक जलोत्सर्जन करुन नंतर जोरात गाणी लावून रस्त्यातच मधोमध नाचायला सुरुवात केली. त्यामुळे झालेल्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेल्या प्रवाशांना थोडा वेळ आपले नृत्यप्रकार दाखवल्यावर बाटल्या काढून जोरात चीअर्स केले आणि मग गाडी निघून गेली.

काही बरे फोटो मिळाले. सूर्यस्नानासाठी पहुडलेला एक सुंदर साप बघायला मिळाला. त्यातच समाधान मानायचं. पुढे हे प्रत्यक्ष पाहायला मिळणार नाही कदाचित.

माळशेज घाट व इतर ठिकाणी होणारे असे प्रकार थांबवण्यासाठी काय करता येईल असे उपक्रमींना वाटते.

हा लेख यापूर्वी आजानुकर्ण यांच्या माहितीपूर्ण अनुदिनीवर संपूर्ण प्रकाशित झाला होता.

लेखनविषय: दुवे:

Comments

अवघड/सुंदर

योगेश,
अवघड प्रश्न आहे. तसेही आपल्या देशात सार्वजनिक स्वच्छतेविषयी कमालीची अनास्था असते. या लोकांना आपण काय करतो आहोत, याचे परिणाम काय आहेत याची कल्पना नसावी. याच गटात मोडणारे दुसरे महाभाग म्हणजे अजिंठासारख्या ठिकाणी गेल्यावर आपले नाव कोरणारे.
छायाचित्रे सुंदर आहेत. आणि स्लाइडशोमुळे बघायलाही छान वाटतात.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

सतत लोकशिक्षण

आपला लेख आणि छायाचित्रे दाखवायची कल्पना आवडली. आपल्या प्रश्नाला एक उत्तर आहे की सततचे लोकशिक्षण. ते करायला सरकार कडून (या बाबतीत पर्यटन विभागाकडून) गरज आहे तसेच निसर्गप्रेमी, स्थानी़क स्वयम् सेवीसंस्थांकडून पण होण्याची गरज आहे. अशा सवयी एकदम मोडत नाहीत पण मोडू शकतात ते ही तितकेच सत्य आहे.

अर्थात सुरवातीस म्हणल्याप्रमाणे हे एक उत्तर झाले. अजून पण पर्याय निघू शकतात.

नावे कोरणे

हा अजून एक संतापजनक प्रकार आहे. माणूस जिथे जिथे पोचलाय तिथे त्याने पुरावा म्हणून आपले नाव असे लिहून अजरामर करुन ठेवले आहे.

असं लिहून काय समाधान मिळतं देव जाणे... सज्जनगडावर तर एका महाशयांनी
श्रि. अमुकतमुक. रा. ठोसेघर जी. सातारा (मो. क्र. १२३४५६७८) असा विस्तृत (आणि अशुद्ध!) पत्ता लिहिला होता.

निसर्गप्रेमी .

अजूनएककर्ण,

छायाचित्रे आवडली,निसर्गाची रपेट करायला येणारे असा इंजॉय करायच्याच उद्देशानेच निघतात.
त्यात बदल झाला पाहिजे.पण प्रत्येक पर्यटनस्थळाची हीच अवस्था आहे.

अवांतर ;) दौलताबाद किल्याला भेट दिल्यानंतर तिथे,प्रत्येक चढण चढतांना वासू+सपना,अशी अनेक नावे दिसतात.
नावासहीत पत्ते,ते तर विचारुच नका !
यादवांचे कोणतेच लिखित शिलालेख येथे नाही, पण पर्यटकांची डिरेक्टरी येथे पाय-या पाय-यांवर उपलब्ध आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जाणीव

अमेरिकेत येण्यापूर्वी सर्वात शेवटची सहल माळशेजला केली होती तेव्हा वर उल्लेखल्याप्रमाणे सर्व अनुभव आले होते. या निसर्गरम्य नितांत सुंदर जागेचा ही मंडळी साफ विस्कोट करतात असा अनुभव आहे.

अमेरिकेत अशा महत्त्वाच्या जागी बरेचदा सुरक्षारक्षक किंवा रोखठोक शब्दांत सूचना दिल्याने हे प्रकार कमी असतात. मध्यंतरी "रुबी फॉल्स" बघायला गेलो असता त्यातील गुहांवर काहीजणांनी आपली नावे कोरल्याचे लक्षात आले. अधिक माहिती काढता सांगितले गेले की पूर्वी (बहुधा १९२३-२५ पर्यंतवगैरे) हे ठिकाण सरकारी अखत्यारीत नसल्याने हे प्रकार होत पण नंतर थांबले.

यासाठी सतत लोकशिक्षण आवश्यक आहेच, याचबरोबर "निसर्ग ही आपली संपत्ती आहे आणि तिचे नुकसान हे आपले नुकसान आहे." याची जाणीव अगदी आतून माणसांना होणे गरजेचे आहे.

चित्रे सुरेखच.

यावरून आठवले..

"निसर्ग ही आपली संपत्ती आहे आणि तिचे नुकसान हे आपले नुकसान आहे." याची जाणीव अगदी आतून माणसांना होणे गरजेचे आहे.

विषयाला थोडे अवांतर, पण त्याच पद्धतीने बॉस्टनच्या सबवेज् मधे "ही गाडी तुमच्या म्हणजे करदात्याच्या पैशातून चालवत आहोत तेंव्हा त्यात स्वच्छता राखा" असे म्हणले होते. आपल्या कडे पण भारतात स्वच्छता राखा म्हणतात पण "तुमच्या पैशाने" हे आधी पालूपद असले की त्याचा बघणार्‍याच्या मनावर वेगळा परीणाम होण्याची शक्यता असते.

प्रकाशचित्रे

प्रकाशचित्रे सुंदर आहेत, स्लाइड शो ची कल्पना आवडली.
स्वाती
तुमच्या खरडवहीतील प्रकाशचित्रे सुध्दा अप्रतिम!

उद्वेगजनक

योगेश,
फारच सुंदर लेख आणि नयनरम्य छायाचित्रे.
लेखातल्या मूळ प्रश्नाविषयी जरा विस्ताराने लिहितो. निसर्ग, पर्यावरण, त्याचे संवर्धन, प्रदूषण हा मूळ प्रश्न नाहीच आहे. प्रश्न आहे मूल्यशिक्षण - व्हॅल्यू एज्यूकेशन- चा. सुसंस्कृत नागरिक म्हणून आपली काही कर्तव्ये आहेत, समाजात आपण रहाण्याची काही विवक्षित किंमत आहे - ही जाणीव असण्याचा. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य आहे. मला वाटले तर मी माझ्या घरी एक शेळी पाळू शकतो (जे अमेरिकेत इतक्या सहजासहजी शक्य नाही), मला वाटले तर मी वर्तमानपत्रात सरकारविरोधी लेख लिहू शकतो किंवा शनिवारवाड्यावर उभे राहून सरकारविरोधी भाषण करु शकतो ( जे चीनमध्ये शक्य नाही - चीनच्या तुरुंगात एक कोटीहून अधिक कैदी आहेत आणि त्यातले सगळेच काही गुन्हेगार नाहीत - सरकारी धोरणांना विरोध करणे हाही चीनमध्ये मोठाच गुन्हा आहे -असे कालच्याच 'सकाळ'मध्ये वाचले. शांघायला 'फेसलिफ्ट' देताना म्हणे लक्षावधी लोकांना जबरदस्तीने विस्थापित केले गेले! ) - पण या स्वातंत्र्याची मला एक नागरिक म्हणून काहीतरी किंमत देणे आवश्यक आहे - ही जाणीवच नसण्याचा. अगदीच नाईलाज म्हणून ( न बुडवता येणारा) इनकमटॅक्स भरला की मी सरकारवर एक उपकारांची मोळी टाकली आणि आता हवे तसे वागायला मोकळा झालो, असा सोयीस्कर अर्थ आपण काढला आहे. मग मी रस्त्यांवरुन बेदरकारपणे गाडी चालवीन, सार्वजनिक ठिकाणी केरकचरा टाकीन, सार्वजनिक मालमत्तेची शक्य तेवढी नासधूस करीन.... कारण काय तर मी या देशाचा नागरिक आहे. जणू काही दीडशे वर्षांच्या गुलामगिरीचा बॅकलॉग भरुन काढायचा तर मला दीडशे वर्षे स्वैराचार केला पाहिजे! आणि हे सगळे आत खोलवर रुजले आहे. परवा टेबल टेनीस खेळत असताना शेजारच्या काचेवर एक दगड येऊन आदळला आणि काचेचे तुकडे टेबलवर विखुरले. का तर जवळच्या झोपडपट्टीतल्या मुलांना म्हणे जांभळे पाडायची होती. रस्त्यावर पच्चकन थुंकणार्‍याला हटकले तर तो म्हणतो आपला कामधंदा बगा ना भाऊ, तुमी कोन इचारनार? एक्स्प्रेसवेवर उलट्या दिशेने येणार्‍या धुंद वरातीने रस्ता अडवलेला असतो आणि तिथे विरोध केला तर कुणीतरी तर्र बरळतो, ए चिकने, लगावूं क्या एक?
आणि हे सगळे आजचे नाही. मी कॉलेजमध्ये असताना मुलींचा कॉलेजला जाण्याचा रस्ता आमच्या होस्टेलसमोरुन जात असे. मुलांच्या अचकटविचकट कॉमेंटस ठरलेल्याच. त्याला विरोध करणार्‍यांकडे 'षंढ' या दृष्टीने बघीतले जात असे. परवा बर्‍याच वर्षांनंतर होस्टेलला गेलो होतो. तसेच मुलींचे घाईघाईने होस्टेलसमोरुन जाणे, तसेच 'ऐ प्रीती झिंटा, आती क्या?', आणि तसेच काही मुलांचे अवघडून चुळबुळत शांत बसणे....
हे सगळे उद्वेगजनक तर आहेच. रेल्वे प्लॅटफॉर्मच्या स्वच्छतेची पहाणी करायला गेलेला केंद्रीय रेल्वेमंत्री आणि मॅनेजमेंट गुरु प्लॅटफॉर्मवरच तंबाखूची पिंक टाकतो, 'एक कणभरदेखील गुलाल कमी करणार नाही, बघू कोण काय करतो' पुण्यातल्या एका मानाच्या गणपतीचा अध्यक्ष गरजतो, झोपडपट्ट्या अधिकाधिक बकाल होतात, पण तिथे हिंडणार्‍या डुकरांना दिल्लीतल्या मनेकाचे वातानुकूलित संरक्षण मिळते ... हे सगळे खरेच उद्वेगजनक आहे. पण सगळे संपलेले नाही. आजानुकर्णासारख्या तरुण पिढीतल्या काही लोकांना तरी हे खटकते आहे, त्याची नोंद घ्यावीशी वाटते हे 'ऑल इज नॉट लॉस्ट' चे लक्षण आहे, असे मला वाटते.
विस्कळित प्रतिसादाबद्दल क्षमस्व. ही खदखद बाहेर पडणे आवश्यक होते.
सन्जोप राव

खदखद

रावसाहेब, तुम्ही आमच्या मनातली खदखद बोलुन दाखवलीत.

मराठीत लिहा. वापरा.

सहमत

प्रत्येक शब्दाशी सहमत.

नागरिकांनाच - म्हणजे आपल्यालाच - या सर्व गोष्टींची जाणीव होणे आवश्यक आहे. त्यानंतर मग वाहतूक सिग्नल पाळण्यासाठी तिथे मामा असण्याची गरज नाही यापासून तर फिरायला गेलेली जागा हीदेखील आपल्या घराइतकीच स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे इथपर्यंत सर्व गोष्टी आपोआप होत जातील.

संजोपरावांशी पूर्ण सहमत

प्रत्येक शब्दाशी सहमत. म्हणूनच प्रबोधन करताना कायद्याचा भरभक्कम पांठींबा हवा. नाहीतर अनेकांनी कष्टाने प्रबोधन या उपयुक्त मूल्याचा फुगा फुगवायचा आणी एकाच्या टाचणी टोचण्याच्या उपद्रव मूल्याने तो फुगा फुटायचा. कि परत हे चक्र चालू. आपण आपले काम करत रहायचे हा भाबडा आशावाद जपत जगायचे.

प्रकाश घाटपांडे

खदखद

सन्जोप राव, तुम्ही माझ्यासारख्या बर्‍याच जणांच्या मनातल्या खदखदीला बाहेर आणले आहे.

प्रश्न आहे मूल्यशिक्षण - व्हॅल्यू एज्यूकेशन- चा.सुसंस्कृत नागरिक म्हणून आपली काही कर्तव्ये आहेत, समाजात आपण रहाण्याची काही विवक्षित किंमत आहे - ही जाणीव असण्याचा.

हे शंभर टक्के बरोबर आहे. पण असे वाटणारे आपण अल्पसंख्यांक आहोत हे दुर्दैव आहे!

सहमत

सर्व मुद्यांवर सहमत आहे. आपल्या लोकशाहीचे फायदे किती आणि तोटे किती असा कधीकधी प्रश्न पडतो.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

सुंदर चित्रे

काय करणार सार्वजनीक स्वच्छतेची नावड असलेला समाज आहे. एक ना एक दिवस लोकांना समजेल हे वागण चुकीचे आहे, तो वर कदाचित पार वाट लागली असेल पण सार्वजनीक सभ्यता ही तर घरी शिकवली पाहीजे. कदाचीत तशी शिकवली जात नसेल म्हणुन हा प्रॉब्लेम असावा.

अत्यंत जीर्ण व ऐतीहासीक वास्तु (ज्या दिवसागणिक गैरवापरामुळे क्षय) जोवर काहि ठोस उपाय योजना होत नाही तोवर आम जनतेला प्रवेश बंद.

तसेच निदान अधुन मधुन तरी (पर्यटन मौसमात) गस्त घालुन, असल्या लोकांकडुन भरपुर मोठा आर्थीक दंड वसुल केला पाहीजे. दोषी व्यक्तीला दिवसभर तो परिसर साफ करायची शिक्षा. पण त्याचबरोबर प्रातर्वैधिक सोयी करुन दिल्या पाहीजेत. जर समाजाला शिस्त नसेल, चांगल्या गोष्टींची कदर करून नीट वापरायची तर खाजगीकरण करून (पैसे भरा, नियम पाळा इ.) ही ठीकाणे चालवली पाहीजे. कुठला न्यूज चॅनल ह्या असल्या प्रकाराबद्द्ल स्टींग ऑपरेशन नाही का करणार?

नागरीकशात्राच्या पुस्तकात असल्या गोष्टींबाबत एखादा धडा (नसल्यास) टाकता येईल.

वैयक्तिक - साप विषारी दिसतो जपुन रे बाबा. :-)

सापावरुन

चित्रात पाहत असलेला साप हा अतिविषारी आहे. सापाच्या या जातीचे नाव आम्हाला सांगितले होते पण ते आता आठवत नाही. (नेहमीप्रमाणे नोट्स घ्यायच्या राहिल्या.) मात्र वाढते प्रदूषण व पर्यावरणहानीमुळे सापाची ही जातही अतिशय कमी संख्येने महाराष्ट्रातील सह्याद्री रांगांमध्ये आता कशीबशी तग धरुन आहे. तुलनेने दक्षिणेतील निलगिरी रांगांमध्ये या सापाची संख्या जास्त आहे.

सापाची संख्या कमी होण्याचे दुष्परिणाम जीवशास्त्रातील संतुलित अन्नसाखळीमध्ये वाचलेले सर्वांना आठवत असतीलच.

चांगला लेख, सुंदर चित्रे!

आजानुकर्णा,

लेख चांगला लिहिला आहेस, विचार करण्याजोगा आहे. नुकतीच आम्ही काही मित्रमंडळीं माळशेजला पिकनिकला गेलो होतो. तेथील निसर्गरम्य वातावरणात खूप धमाल आली.

स्लाईडशोही छान टाकला आहेस...

तात्या.

वा !

अजानुकर्ण,
आपला लेख आवडला.
माळशेज मध्ये असे प्रकार कमी फरकाने मी सुद्धा काही वर्षापूर्वी अनुभवले होते. दारु पिऊन नाचणे आणि बाटल्या तिथेच फोडणे हा प्रकार तर सर्व पर्यटनस्थळांवरच होत आहे. ते अतिशय निंदनिय आणि दंडनिय आहे.
(दरडींचा संबंध रस्ता बांधताना दरडिकोसळण्यास चालना मिळणे, आणि डोंगर-उतारावर वृक्षतोड आणि गवत जाळणे या प्रकाराशी अधिक आहे असे वाटते.)

आपण काढलेली सापाची प्रकाशचित्रे आणि ती सादर करण्याची पद्धत आवडली.
साप हा ट्रिमेरेसुरस प्रवर्गातिल असावा असे वाटले. त्याचे सामान्य इंग्रजी नाव बांबू पिट वायपर असे असावे. मी तज्ञ नाही. नुसता अंदाज आहे. परंतु आपले प्रकाशचित्र नेटके आहे आणि दुर्मिळ आहे असे नक्की वाटते.

--(घाटामध्ये गेल्यावर तेथिल भूरुपे आणि वनस्पति पाहण्यात दंग असणारा ) लिखाळ.

जय स्वावलंबन ! कष्ट करा ... कष्ट करा !!

रस्ता बांधणे

मुळात डोंगरातून रस्ता बांधणे हेच निसर्गाविरुद्ध आहे. भूगर्भातील पाण्याचे प्रवाह तोडले जातात. झाडे मुळासह उपटली जातात. मग कडेची भुसभुशीत माती दरडस्वरुपात खाली येते. आपण ती बाजूला करतो. पुढच्या पावसाळ्यात पुन्हा दरड कोसळते.

माणसाइतका अप्पलपोटा प्राणी दुसरा नसेल. बरीच उदाहरणे देता येतील. नदीनाले पाहीजे तसे वळवणे, पाणी-ध्वनी-प्रकाश-भूमी प्रदूषण वगैरे.

देवाने दिलेला सगळ्यात मोठ्या आकाराचा मेंदू फक्त स्वतःपुरता तो वापरतो.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

नयनसुखद निसर्गदृश्ये

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
श्री. आजानुकर्ण यांच्या सुंदर निसर्गदृश्यांचा स्लाईड शो पाहिला.त्यांनी शीर्षभागी लिहिलेल्या पद्यपंक्ती समर्पक आहेत.(शेवटचा शब्द सोडून.तो त्यांचा स्वाभाविक विनय आहे. खरे तर संगणक विषयक विविध तंत्रांचे किती प्रगत ज्ञान त्यांना आहे याचा या हालत्या चित्रक्रमाने (स्लाइड शो) प्रत्यय येतो.)
.....या द्विमिती चित्रांतूनसुद्धा "घन ओथंबुनी आले" याचा अनुभव आला. ही निसर्ग चित्रे पाहून मला कविताच स्फुरली. पण ती मनात अमूर्त राहिली. शब्दरूप घेईना.त्यामुळे "आहे मनीं परंतु, ओठीं फुटे न गाणे |" अशी स्थिती झाली. (त्या हिरव्या चिंब निसर्गात प्रत्यक्ष गेलो असतो तर कदाचित् शब्द सुचले असते.)
.....आम्हांला घ्रर बसल्या नयनसुखद निसर्गाचे दर्शन आजानुकर्ण यांनी घडविले. त्यांचे मनःपूर्वक आभार.

 
^ वर