रामसेतु अन् रामायण

कालच सध्या वादाचा मुद्दा बनलेल्या रामसेतू बद्दल वाचनात आले की नासाने सदर सेतू मानव निर्मित नसून भूगर्भीय हालचालींचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. आता माझा प्रश्न हा आहे की जर असे असेल तर रामायणामध्ये आलेले अनेक भौगोलिक संदर्भ (जे अजूनही अस्तित्वात आहेत) मूळ कथेमध्ये इतके तंतोतंत कसे बसतात. मला वाटतं किंबहूना महाभारतात तर असे भौगोलिक संदर्भ भरपूर आहेत, जे अजूनही पहावयास मिळतात. यामागचे कारण काय असावे?

आम्ही (म्हणजे अनेकजण) आमच्या कार्यालयात कधी कधी एक खेळ खेळतो. कुणीतरी एक एखादी कथा (गोष्ट म्हणा ना) लिहायला सुरुवात करतो, परंतु त्याने ती कथा अर्धवटच लिहायची. मग दुसरा कुणी तरी त्या कथेला पुढे नेतो. असे करत करत अनेक व्यक्ति ती कथा पुढे नेऊन पूर्ण करतात. अट अशी असते की कथा एकसंध वाटली पाहिजे. अनेकदा काही व्यक्ति त्यात उपकथानक जोडतात.

तर सांगायचा मुद्दा हा की रामायण महाभारत असाच काहीसा प्रकार नसेल ना? आपल्याला काय वाटतं?

लेखनविषय: दुवे:

Comments

हा वादाचा मुद्दा

कोठे बनला त्याबद्दल कोणी दुवा देऊ शकेल का? मूळ बातमी वाचल्याखेरीज फार टिप्पणी करणे योग्य दिसत नाही तरी तुमच्या पुढच्या प्रश्नाबद्दल उत्तर असेच असावे की

रामायण आणि महाभारत दोन्ही याच भूमीत घडले आणि ते सत्यकथन म्हणून सांगितले गेले तेव्हा त्यातील भौगोलिक संदर्भही योग्यच हवेत. हे केवळ रामायण महाभारतासाठी नसून इतर अनेक देशांतील महाकाव्यांच्या बाबतीतही असेच घडल्याचे दिसते.

महाभारत वाचले तर या महाकाव्याची रचना गोष्टीत गोष्ट अशी असून ते कथन करतानाही व्यासांनी गणेशाला, वैशंपायनांनी जनमेजयाला आणि पुढे सौतीने शौनकाला कथन केले असल्याचे दिसते. रामायणातही सोळाव्या शतकात तुलसीदासाने भर घातल्याचे दिसते. हजारो वर्षे चालत आलेल्या महाकाव्यांत आपल्या पदरची भर प्रत्येक कथाकाराकडून नसली तरी महत्त्वाच्या व्यक्तींकडून टाकली गेली असावीच.

सेतू बांधताना मला तरी वाल्मिकी रामायणात रामाचे नाव लिहून टाकलेले दगड तरले किंवा खारीने रामाला मदत केली यासारख्या कथा वाचल्याचे आठवत नाही. या आख्यायिका नंतर जोडल्या गेल्या असाव्यात.

चू. भू. दे. घे.

दुवा

कृपया हे दोन दुवे वाचावेत

दुवा १

दुवा २

जयेश

मला विचाराल तर

जयेश, या दोन्ही दुव्यांसाठी धन्यवाद. थोडे अधिक शोधले असता दुवा ३ आणि दुवा ४ मिळाले ते ही वाचण्याजोगे आहेत.

आता, मला कोणी विचारले तर (मी काही विश्वासार्ह स्रोत नाही, फक्त माझे मत)

रामायणाची कथा खरी आहे असे मानून चालू. (ती खरी आहे असे मला वाटते, परंतु रामायण इतिहास नाही असेही वाटते.) सागराने घाबरून प्रकट होऊन रामाला सेतू बांधण्याची परवानगी दिली आणि हे करताना आपण वानरांना त्रास देणार नाही असे सांगितले आणि नंतर वानरांनी विक्रमी वेळात सेतू बांधला यावर मला विश्वास ठेवता येत नाही. पाल्कच्या सामुद्रधुनीत अशी भूरचना अस्तित्वात असावी आणि वानरांनी ते खडक एकमेकांना जोडण्याचे किंवा त्यात भर टाकून बर्‍यापैकी मार्ग बनवण्याचे काम केले असावे असे मला वाटते. त्यामुळे नासाचा निष्कर्ष खोटा नसावा असे वाटते.

नासाच्या माहितीप्रमाणे हा सेतू (किंवा रचना) काही लाख वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले जाते. त्यावर काही हिंदू संस्थळांवर त्रेतायुगातील कालगणनेनुसार तोच रामाचा काळ असल्याचे सांगितलेले वाचले. प्रत्यक्षात मला नासाची कालगणना आणि त्रेतायुगानुसार हिंदू कालगणना यांतील साम्य कळले नाही.

बातमीची बातमी.

रामायणाचे काही वाद फार जुने आहेत. अगदी रामायण हे होमरचे इलियड पासून उचलले आहे इथपर्यंत.ते काही आम्ही वाचले नाही.पण नासाची एक बातमीत राम सेतू मानव निर्मिती नाही म्हणतात. आणि या बातमीत भारत श्रीलंकेत येण्या-जाण्यासाठी जो रस्ता तयार करायचा आहे, त्यामुळे पौराणिक राम सेतू चे अस्तित्व धोक्यात येईल असेही म्हटले आहे.आणि या बातमीत आणि व्हिडियोत राम-सेतूचे छायाचित्र स्पष्टपणे दिसत आहे .त्यावरुन भारत आणि लंकेला जोडणारे एक साधन त्या काळात होते,किंवा निर्माण केले असावे असे आमचे मत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सेतुसमुद्रम म्हणजे रस्ता नाही.

तो श्रीलंका-भारत यांना जोडणारा पूल अथवा रस्ता नाही. पाल्कची समुद्रधुनी आणि मन्नारचे आखात उथळ असल्याने भारताच्या पूर्व किनारपट्टीकडून - पश्चिम किनारपट्टीकडे आणि उलट दिशेने जाणार्‍या अवजड जहाजांना पूर्ण श्रीलंका द्वीपाला वळसा घालून जावे लागते. त्यामुळे शेकडो नॉटिकल मैलांचा प्रवास वाया जातो. हे टाळण्यासाठी सेतुसमुद्रम प्रकल्प हा समुद्रतळाचे खोदकाम करून म्हणजे समुद्राची खोली वाढवण्याचा प्रकल्प आहे. त्यामुळे हा पौराणिक रामसेतु मधे कुठेतरी तोडावा लागणार हे स्पष्ट आहे.
त्यात हिंदूंच्या श्रद्धा आहेतच पण हा सागरी जीवांचे अभयारण्य असलेला भाग - समुद्र महामार्ग कृत्रिमपणे निर्माण केल्याने - कायमचा नष्ट होईल अशी रास्त भीती पर्यावरणवाद्यांना वाटते.
चु.भू. दे. घे.

अहो चेनी साहेब

ह्यातील समतोल पर्यावरणवाद्यांना साधता येईल का ? नव्हे, पर्यावरणवादी असा ट्रेडऑफ करू शकतात का ?

पर्यावरणात काम करत असूनही मी अतिरेकी नाही आणि पर्यावरणवाद्यांना एकत्र घेऊन काम करता येते हा पण अनुभव मला आहे. "घण क पोच" सारखे दोनच पर्याय कसे काय ठरवता. जरा एकत्र बसा, चर्चा करा आणि मध्यम मार्ग नक्कीच निघेल की जो तुमच्या जहाजालापण समतोल राहील आणि आपल्या जीवनाला - पर्यावरणाला. पण कुठलीच चर्चा न करता सगळी अक्कल फक्त स्वतःलाच असे वाटून निर्णय घेणे हे पर्यावरणाला योग्य की अयोग्य हे नंतर चर्चूया, पण लोकशाहीच्या तत्वात बसत नाही इतके तरी मान्य आहे ना?

पटले

गूड वन!

अनुदान

तिथले सगळे सागरी जीव फाईव्ह स्टार ऍक्वेरियम मध्ये ठेवूयात, मस्त ए सी लावून :-)
चालेल ?

याहूकडून अनुदान मिळतयं का ते पहा...:-)

आर्थर सी क्लर्क

आर्थर सी क्लर्क या प्रसिद्ध विज्ञानकथाकाराने (२००१ ए स्पेस ओडिसी, स्पेसशटलचवाणि सुपर कॉम्प्यूटरचे अस्तित्त्वात प्रथम वर्णन/कल्पना करणारा) या "रामसेतू" (मी हे नाव तुर्तास वापरत आहे, खरे-खोटे माहीत नाही) चा उल्लेख केला होता. एकदा वाचल्याचे आठवत आहे (किस्त्रीम मधे वाचले होते) की त्याच्या म्हणण्याप्रमाणे या रामसेतूच्या रेषेत गुरूत्वाकर्षणाची रेषा अचानक बदलते (की असेच काही तरी, आत्ता मला जालावर संदर्भ पटकन मिळाला नाही). म्हणून तिथे जास्त संशोधन होणे गरजेचे आहे आणि वाल्मिकींनी त्याच जागेचा संदर्भ का दिला हे ही त्याच्या दृष्टीने उत्सुकतेचे होते.

बाकी भौगोलीक संदर्भाबाबत म्हणाल तर ते बर्‍यचदा (नेहेमीच नाही ) खरे असतात असे वाटते. मधे इस्त्रोने पण बुडालेल्या द्वारकेची माहीती उपग्रहाद्वारे मिळवल्याचे वाचले होते. ह्या चर्चेच्या संदर्भात मी म्हणत नाही पण आपण रामायण-महाभारतातील संदर्भ माहीतीम्हणून बघताना त्यातील चमत्कारासहीत बघतो आणि मूळ मुद्दा लांब राहतो आणि चमत्काराबद्दलच ते खरे की खोटे वगैरे वाद घालत बसतो.

सध्याच्या वादाच्या मुद्यात, जसे रामायण आणले जात आहे तसेच पर्यावरण समतोल बिघडू शकेल असे कारण पण आणले जात आहे.

प्रियाली व अन्य उपक्रमी

याच चर्चेतील पुढचा प्रश्न विचारण्याआधी नम्रपणे नमुद करू इच्छितो की माझे रामायण व महाभारताचे ज्ञान आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी, किशोर वयात वाचलेली पुस्तके आणि टिव्ही मालिका यापूरतेच मर्यादित आहे. (एखादा प्रश्न बालिश वाटू शकतो म्हणून स्पष्टीकरण)

तात्पूरते आपण ग्रहीत धरूया की अयोध्येत श्रीराम नावाचा राजा होऊन गेला आणि कथे प्रमाणे त्याने दक्षिणेत श्रीलंकेपर्यंत व पुन्हा उत्तरेत अयोध्येअर्यंत प्रवास केला. आता प्रश्न असा उद्भवतो की सध्या आपल्याला ज्या ऐतिहासिक वास्तू किंवा अन्य भौगोलिक संदर्भ पहावयास मिळतात, ज्यांचा या कथेमध्ये उल्लेख सापडतो, त्या वास्तू किंवा त्यापैकी काही वास्तू कुणी बांधून त्यांना दैवत्व प्राप्त करुन देण्यासाठी मूळ कथेमध्ये उपकथानक जोडून सम्मिलित केल्या असण्याची शक्यता आहे का?

मग याचा खरेपणा ताडण्यासाठी रामायणाचा काल व या वास्तूंचा बांधकाम काल एकमेकांशी ताडून पहाव्या लागतील असेच ना?
कुण्या इतिहासकाराने असा प्रयत्न नक्कीच केला असेल असे वाटते. माहिती असल्यास पुस्तक सूचवावे.

बाकी विकास यांनी मांडलेला पूढील मुद्दा पटला "आपण रामायण-महाभारतातील संदर्भ माहीती म्हणून बघताना त्यातील चमत्कारासहीत बघतो आणि मूळ मुद्दा लांब राहतो आणि चमत्काराबद्दलच ते खरे की खोटे वगैरे वाद घालत बसतो. "

-जयेश

कथानक - उपकथानक

याच चर्चेतील पुढचा प्रश्न विचारण्याआधी नम्रपणे नमुद करू इच्छितो की माझे रामायण व महाभारताचे ज्ञान आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी, किशोर वयात वाचलेली पुस्तके आणि टिव्ही मालिका यापूरतेच मर्यादित आहे. (एखादा प्रश्न बालिश वाटू शकतो म्हणून स्पष्टीकरण)

त्यात काय झालं? येथे काही कोणा विद्वानांची चढाओढ नाही. अशा मुबलक शंका मलाही असतात, येथे उहापोह नाही करायचा तर कोठे? तेव्हा बिनधास्त बोलू. कोणी 'अर्धवट ज्ञानाने लोक वाद घालतात' असे म्हणत असेल तर दुर्लक्ष करू.

आता प्रश्न असा उद्भवतो की सध्या आपल्याला ज्या ऐतिहासिक वास्तू किंवा अन्य भौगोलिक संदर्भ पहावयास मिळतात, ज्यांचा या कथेमध्ये उल्लेख सापडतो, त्या वास्तू किंवा त्यापैकी काही वास्तू कुणी बांधून त्यांना दैवत्व प्राप्त करुन देण्यासाठी मूळ कथेमध्ये उपकथानक जोडून सम्मिलित केल्या असण्याची शक्यता आहे का?

असे असणे अशक्य नाही म्हणजे कालांतराने 'हीच ती जागा' इ. इ. आख्यायिकांचा जन्म होतोच पण तुम्ही जसे म्हणता की महाकाव्यात आलेल्या सर्वच जागा या त्या कथांना पुष्टी देण्यासाठी नंतर बांधल्या नसाव्यात पण काही ठिकाणी 'आफ्टरमॅथ' करण्यात आले असावे का? हे पाहिले पाहिजे. आपल्या प्रश्नाचा रोख आत्ता लक्षात आला. चांगला प्रश्न आहे. थोडा विचार करावा लागेल.

खरेपणा ताडण्यासाठी रामायणाचा काल व या वास्तूंचा बांधकाम काल एकमेकांशी ताडून पहाव्या लागतील असेच ना?

एक पुस्तक म्हणजे प. वि. वर्तकांचे वास्तव रामायण वाचावे. यांत मूळ रामायणाबाबत जो उहापोह आहे तो नेमका आहे. वर्तकांची स्वतःची मते पटणे न पटणे हे वाचकावर अवलंबून. व्यक्तिशः मला त्यांची काही मते पटत नाहीत तर काही मते पटतात.

तसेही या विषयांत पुरातत्त्व खाते आणि त्यांतील संशोधकांबरोबर विचार विनिमय करून केलेले लेखन मला अधिक विश्वासार्ह वाटते. खरेपणा ताडून पाहण्यासाठी ज्या अनेक मुद्द्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे त्यात, उपग्रहावरून काढलेली चित्रे, कार्बन चाचणी आणि त्याप्रमाणे केलेल्या इतर शास्त्रीय चाचण्या, तत्कालिन भूगोल आणि भौगोलिक परिस्थिती, खगोलशास्त्र, उत्खनन यासर्वांचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. केवळ कालगणना आणि महाकाव्ये हा पुरावा ग्राह्य धरता येत नाही. आपल्या देशांत अद्याप हे सर्व मोठ्याप्रमाणात होत नाही.

पुरातत्त्व खात्याला ज्या जागा संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटतात त्यात भीमबेटका सोडून इतर कोणत्याही पौराणिक जागांचे वर्णन नाही. हौशी संशोधक भारतात जोपर्यंत तयार होत नाहीत आणि या प्रकरणांचा पाठपुरवठा करत नाहीत तो पर्यंत अशा गोष्टींचे अनुमान काढणे कठिण वाटते.

आख्यायिका.

वर्तकांचे पुस्तक आम्ही वाचले नाही ,मिळाले तर नक्की वाचू .पण रामायणाच्या बाबतीत सर्वच आपण उल्लेखलेल्या शास्त्रीय चाचण्या,आणि त्याच बरोबर काही आख्यायिका तितक्याच महत्वाच्या आहेत असे वाटते.उदा.नगर पूणे रोडवर एक प्रवरा संगम नावाचे गाव आहे,त्या गावाचे नावही कायगाव टोका आहे,या गावात मारीचाचे एकीकडे धड,आणि एकीकडे डोके(टोक) पडले म्हणून कायगाव टोका(काया+टोक )हे नाव पडले.अशा अनेक आख्यायिका या परिसरात आहेत.तसेच मंदिरेही तिथे आहेत.राम नासिकहून गोदावरी मार्गे प्रवास करत असावा,अशी ही एक आख्यायिका सांगितल्या जाते,म्हणून त्या वास्तूंबरोबर आख्यायिका तपासल्या पाहिजेत.मात्र कालगणनेचे काम कठीणच वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राम राम !

मलाही काही लिहायचे आहे.
१) त्या ठिकाणी मानवनिर्मीत काही रचना आहे का याचा छडा आपल्या पुरातत्त्व विभागाने लावला आहे का? तो लावला असेलच असे वाटते. मग त्यांचे याविषयीचे म्हणणे काय? जर उथळ समुद्र (सामुद्रधूनी) लक्षात घेवून तेथे मानवनिर्मित रचना असेल तर तो आपला ठेवा आहे असे मी मानतो. तसेच तो प्राचिन ठेवा असल्याने त्याला फार महत्त्व प्राप्त होते. (या संबंधी काही प्रकाशचित्रे स्वतः पाण्यात जावून डॉ. भावे यांनी काढली आहेत असे मी ऐकले आहे.)

२) ती रचना रामाने तयार केली की अजून कोणी हा विषयाचा एक् पैलू झाला. पण ती रचना जर अस्तित्त्वात असेल तर त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन तीचे जतन कसे करावे असा असावा असे मला वाटते. या संबंधी मोहिम उघडणे हे काम सामान्य माणसाचे आणि पुरातत्त्व विभागाचे आहे असे वाटते.

३) जर तो एक प्राचीन वारसा असेल तर जहाजांचे इंधन या विषयाकडे पाहू. जर डिजेल वाचवण्यासाठी तो वारसा नष्ट केला आणि येणार्‍या काळात अणू-इंधनासारखे पर्याय प्रचलित झाले (जे लवकरच होणार असे वाटते) तर पुढील पिढी आपल्याला असे तर म्हणणार नाही ना की डिजेल चा बाऊ करुन त्या जून्या पिढीने एक प्राचिन रचना नष्ट केली !

४) पर्यावरण रक्षण (स्थानीक परिसंस्था रक्षण) हे २०० वर्षांत नक्कीच संपणार्या डिजेल पेक्षा महत्त्वाचे आहे असे मला वाटते.

--लिखाळ.

त्यांनी दारुचा अर्धा पेला रिचवून भैरवी गायली आणि श्रोत्यांनी उरलेल्या अर्ध्या पेल्यावर चर्चा केली.

पुरावा इ.

१) त्या ठिकाणी मानवनिर्मीत काही रचना आहे का याचा छडा आपल्या पुरातत्त्व विभागाने लावला आहे का? तो लावला असेलच असे वाटते. मग त्यांचे याविषयीचे म्हणणे काय?

काही वाचनीय पुरावे येथे मिळतील.

उथळ समुद्र (सामुद्रधूनी) लक्षात घेवून तेथे मानवनिर्मित रचना असेल तर तो आपला ठेवा आहे असे मी मानतो.

आणि जरी तो मानवनिर्मित नसला, तरी तो अतिशय प्राचीन आहे असे समजले जाते. (कधीतरी वाचल्याप्रमाणे साडे १७ लाख वर्षांपूर्वीचा वगैरे. भारतभूमीवर तेव्हा मनुष्यवस्ती नव्हती.) अशा प्राचीन भूरचना माणसाने उठून नष्ट का कराव्यात?

पर्यावरणाचा मुद्दा तर वेगळा आणि महत्त्वाचा आहेच.

रामसेतु मानवनिर्मित आहे (?)

त्या ठिकाणी मानवनिर्मीत काही रचना आहे का ? -
आणि जरी तो मानवनिर्मित नसला, तरी ..

हे इथे काहीतरी दिसते त्याबद्दल.
मोठे शास्त्रज्ञ असे म्हणतात म्हणजे तथ्य असावे. नाही का ?

वाद नाही

त्या ठिकाणी मानवनिर्मीत काही रचना आहे का ? -
आणि जरी तो मानवनिर्मित नसला, तरी ..

ही वाक्ये त्या प्रतिसाद - उपप्रतिसादाला अनुषंगून आहेत. रामसेतू मानवनिर्मित नाहीअसा ग्रह नाही परंतु समजा तो मानवनिर्मित नसला म्हणून तो नष्ट करावा हे म्हणणे योग्य नाही असे वाटते.

माझ्या वरच्या एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ही संपूर्ण रचना मला मानवनिर्मित वाटत नाही. मात्र मानवाने त्यात भर घालून सेतू निर्माण करणे अशक्य नाही - हे झाले माझे मत. सुदैवाने (?) आपण दिलेल्या लेखातच त्याला पुष्टी देणारे वाक्य मिळाले.

It is not a natural formation; the top portion of it appears to be a man-made structure.

वाद नाहीच!

आपल्या मताशी पूर्ण सहमत. म्हणून शीर्षकात (?) आहे.

पण तिथे मानवनिर्मित काहीतरी आहे एवढे मान्य करायला आपले दळणवळण मंत्री टी.आर. बाळूसाहेब ऐकत नाहीत ना!
असो.
हिंदूत्वनिष्ठ + पर्यावरणवादी आणि निधर्मवादी + भांडवलशहा यांच्यातला संघर्ष आहे. कोण जिंकणार, कोण जाणे?
आणखी पहा.

रामायणाचे सत्य आणि रामसेतू

मित्रहो,

आपण जगातली अशी एकमेव जमात असू -- परकीयांनी आपल्याला नीच दाखवण्यासाठी आपल्या इतिहासाबद्दलच्या काढलेल्या शंका आपण इतक्या डोक्यावर घेतो की लगेच आपण सगळेच हे खरं होतं की नाही असा विचार करून ज्यांना ते नि:शंक खरं वाटतं त्यांना मागासलेले आणि शास्त्रविरोधी मानू लागतो. त्याच मापानी जगाच्या अगदी यूरोपच्या इतिहासातल्या (विषेशतः धार्मिक) अनेक गोष्टींवर शंकेचं बोट उगारता येईल, पण ही आपली सभ्यता किंवा संघर्ष टाळण्याची नीती म्हणून अशा शंका आपण घेत नाही.

अधुनिक ऐतिहासिक संशोधन वस्तुनिष्ठ पुराव्यातून खरेपणाचा कौल देतं, पण ज्या इतिहासाच्या काळी मृगाजिनांची वस्त्रं असत त्या काळच्या कुठल्या गोष्टी आपण शोधणार? शिवाय आपल्या देशाच्या प्रत्येक गावावर अनेक आक्रमकांनी विध्वंसाचे नांगर फिरवले आहेत, त्यामुळे जी मध्यंतरिच्या काळची स्मारकं असतील ती देखील धूळीस मिळालेली. आणि हो, स्वतंत्र भारताच्या अजब कायद्यांमुळे कुणाच्याही जमीनीत सापडलेलं धन सरकारच्या मालकीचं असल्यामुळे गरीब शेतकरी आपल्या जमीनीत सापडलेल्या पुरातन वस्तू वितळवून त्याचं मोल स्वतःकडे ठेऊ पाहतो.

ह्यातून उरतात त्या केवळ दोन गोष्टी - आपली मौखिक ज्ञानप्रसाराची परंपरा आणि ह्या सगळ्यांतून केवळ आश्चर्यजनक प्रकारे वाचलेल्या ऐतिहासिक प्रती आणि काही चीजवस्तू. ह्या दोन्ही गोष्टी अगदी पांगळ्या होऊन आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे त्यात चमत्कार, काव्यात्मक घडामोडी, अतिरंजित वर्णनं भरमसाठ, पण म्हणून मूळ रामायण ही गोष्टंच खरी नाही हे म्हणणं मला पटत नाही.

भांडारकर प्राच्यविद्या संस्थेनी अनेक ऐतिहासिक प्रतींची छानबीन करून महाभारताची एक संशोधित आवृत्ती काढली आहे. तशी रामायणाची संशोधित अवृत्ती माझ्या माहितीत नाही. अशा माहितीच्या अभावी त्या जागेचा भारतीय संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षांवर आपण विचार करायला हवा. नासा मध्ये कितीही प्राज्ञ पंडीत असले, तरी त्यांची भारताबद्दलची तूच्छतेची भावना प्रामाणिक सत्याच्या आड येईल असं मला वाटतं. अशा गोष्टींच्या अभावी ती रचना मोडायचा घेतलेला कुठलाही निर्णय हा इतर कुठल्यातरी हेतूंमुळे असेल असं मला वाटतं.

खिरे

सहमत

याच प्रकारे पु ना ओक यांची वक्यते अतिरंजित आणि चेष्टेचा विषय झाली आहेत. असे असले तरी त्यांच्या हा मुद्दा नेहमी पटतो कि आमचा इतिहास आम्ही लिहिलाच कुठे आहे? गेल्या जवळपास ८००-१००० वर्षात कोणी ना कोणी आमच्यावर राज्य करत आले आहे. आमचा इतिहास आम्ही लिहिलाच कुठे? जग लिखित गोष्टींवर विश्वास ठेवते. आम्ही पडलो गुलाम. आम्हाला आमची मते आहेतच कुठे? फितुरी हा आमचा गुणधर्म. आमच्यात जगाला काही सांगायची धमक असली तरी ती आम्ही सांगायच्या आधी जगात कोणाकडे तरी आधीच पोहोचलेली असते. मग आमच्यातच भांडणे. इथे आमच्या आमच्यातच सेतु नाहीत. मग रामाने बांधलेला असुदेत वा निसर्ग निर्मित. आज अचानक लोकांना आपण मागास आहोत आणि नवा प्रकल्प झालाच पाहिजे या वेडाने झपाटले आहे. आज पर्यंता या विषयावरच्या विरोधाच्या ज्या ज्या बातम्या वाचल्या, त्यात हेच वाचले आहे कि जर भारतींना वा जगाला या प्रकल्पाचा फायदा होणार असेल तर जरूर करावा. पण त्यात थोडा बदल करावा. सेतु रामाने बांधलेला असुदेत वा निसर्ग निर्मीत. तो अस्तित्वात रहायला हवा.
असो, आम्ही ठरलो भारतीय. युरोपात जाउन प्रत्येक गावातले जतन केलेले एखादे ५० - २०० वर्षापुर्वीचे स्मारक कौतुकाने पाहू. भारताबाहेर काही भारतीयांचे मेणाचे पुतळे पाहू, त्या शेजारी उभे राहून आमचे फोटो काढू. पण सेतु? छे, अहो तो मात्र आमच्याकडे काहि वेड्या हिंदुत्ववाद्यांचा आपला एक मुद्दा आहे आणि राजकारण्यांचा. माझ कुठ काय नडतं त्या सेतु शिवाय? असला काय अन् नसला काय? मला पहिला ग्रीन कार्ड फाइल करायच आहे. मला वर्ल्ड टूर करायची आहे. असल्या वादात पडून मी काय करू? असतं एवढ कौतुक तर आम्ही कशाला असतो एवढा भारत सोडुन? आमची तिथे कुठे काय किंमत आहे का? मग आम्ही त्याचा का विचार का करावा? मला माहित नाही काय ते सेतु बितु. बाय दे वे सेतुचा प्रकल्प स्टेट्स स्पॉन्सर्ड आहे का? नसेल तर सोडुन द्या. चला पुढचा विषय काढा...

मराठीत लिहा. वापरा.

हांग आसं !

खीरे आणि चानक्य यांच्या इचाराशी सहमती हाये.
भारताचा इतिहास ह्यो आडानी माणसाचा इतिहास त्यो खरा कसा आसन,
आरं या मातीत राम,लछमन,सितामाय,अन मारुतीबी जनमेल हाये,
पण सांगीन कोन्,?सापडीन कोन ? त्याह्यच्या खानाखुना.

पटलं हो!

पहिला ग्रीन कार्ड फाइल करायच आहे. मला वर्ल्ड टूर करायची आहे. असल्या वादात पडून मी काय करू? असतं एवढ कौतुक तर आम्ही कशाला असतो एवढा भारत सोडुन?

मीही असंच म्हणतो, ऍसिडिटी वाढली की. एकदा अमेरिकेत पोहोचलो कीच संपेल ही ऍसिडिटी. अरे हो! ऑस्ट्रेलिया, दुबई, मस्कत, सिंगापूरलाही ग्रीनकार्ड लागतं का?

विषय कुठे जातोय त्याची काळजीच नाही राव तुम्हाला. :)))))

नेहमीच मजेशीर असतात तुमचे प्रतिसाद. वाचायला आवडतात.

-राजीव.

सहमत

खिरे महोदय,
आपल्याशी सहमत आहे.
उदार दृष्टिकोन म्हणजे स्वत्व विसरणे नव्हे हे आपल्या लोकांना सांगावेसे वाटते. 'मॉडर्न' होताना आपला न्यूनगंड कमी व्हायच्या ऐवजी वाढतोच की काय अशी शंका येते.
-- (वानर) लिखाळ.

त्यांनी दारुचा अर्धा पेला रिचवून भैरवी गायली आणि श्रोत्यांनी उरलेल्या अर्ध्या पेल्यावर चर्चा केली.

रामायण एक् थोतांड

मुळात् रामायण् एक् थोतांड् आहे. राम नावाचा राजा झालाच् नाही. मिस्त्र मधे रामेसु नावाचा एक् राज् होता. त्याच्या बायकोला शेजारच्या शत्रु राजाने पळवुन् नेले. रामेसुने नंतर् त्याच्याशी युद्ध करुन् बायकोला सोडवुन् आणले असं एक् पुस्तक् मी वाचलेलं आहे.

त्याच् पुस्तकात् असाही संदर्भ् दिला आहे कि मुळ् रामायण् "वाल्मिकी रामायण्" हे वाल्मिकिनी कुथल्यातरी मिस्त्र व्यापा-याकडुन् जे रामेसु बद्दल् ऐकले त्या आधारावर् काल्पनिक् रामायण् लिहले.
पण् कालांतराने (काही शतकानंतर्) म्हणजे १६ व्या शतकात् तुलसीरामाण् लिहण्यात् आले ज्यात् आजुन् १२ हजार् ओवी घुसडविण्यात् आले व स्थलपुराणाच्या मदतीने विविध स्थाळांचा संदर्भ् दिल्या गेला ज्या मुळे आह् आपल्याला ते खरे वाटते.

पुरातत्व खात्यालाही अयोद्धेमधे काहीच् पुरावा मिळाला नाही कि ज्याच्या आधारे कोणे एक् काळी तिथे राम् होता असे म्हणता येईल्.

एकंदरित् आज् पर्यंतच्या संशोधन् व ईतिहासकारांच्या पुराव्याच्या आधारे बोलायचे झाल्यास् रामायण् एक् थोतांड् आहे.

पण् संशोधनाने उदया राम् असण्याच्या पुरावा दिलाच तर् हि थेरी बदलावी लागेल्.

 
^ वर