जैन साहित्यातील विश्वाकार - भाग ३ (अंतिम)

पहिल्या दोन भागांतच जवळपास सगळे सांगितले आहे. आणखी खूप सांगण्यासारखे नाही. प्रश्न "विश्व" ह्या गोष्टीचा नसून भाषेचा आहे, हीच ह्यातली गोम.

भाषा ही गोष्ट अशी अजब आहे की एकदा उधळल्यावर आवरणे फार कठीण. ती वाटेल तिथे भडकत जाते. कारण भाषेला व्याकरण असते. ते एकदा जुळले की तिची गाडी चालू लागते. ती थांबवता येत नाही. शब्दाला शब्द जोडण्याची कला आपल्याला खूप लहानपणी अवगत होते. मूल थोडे हुशारातले निघाले तर त्याला नवीन खेळणे मिळाल्याचा आनंद होतो. उलटीसुलटी लांबलचक वाक्ये रचण्याच्या खेळात ते गुंगून जाते. त्याचा हा पोरपणा प्रौढ वयात टिकून राहतो. त्यातून निर्माण होतात ते गहनगूढ तात्त्विक प्रश्न. त्यांच्या जंजाळातून जो बाहेर काढेल तो गुरू.

म्हणून कल्पना करा की एका बुद्धिमान शिष्याला प्रश्न सुचला आहे. "विश्वाचा आकार काय?"

यावर गुरूचे उत्तर: "माणसाचा".

हा एका अर्थी श्रीमुखात देण्याचाच प्रकार आहे. गुरूचे म्हणणे असे की बाळ्या, तुला एक प्रश्नार्थक वाक्य व्याकरणशुद्ध रीतीने जुळवता आले हे खरे. म्हणून प्रश्न सुचला असे समजू नको. ह्या भांड्याचा आकार काय, आणि ह्या खोलीचा आकार काय, हे प्रश्न रास्त आहेत. ते विचारता येतात. पण म्हणून त्यांना तू अंतिम मर्यादेपर्यंत नेऊ पाहतोस. तिथे चुकतोस. अरे तू माणूस आहेस. तुझा आकार माणसाचा अाणि तुझी भाषा माणसाची. "माणसाचा" आकार सोडून दुसरा कुठलाही आकार तुला दिसणे शक्य आहे काय? माझे उत्तर विक्षिप्तपणाचे असेल, तर ते तुझा प्रश्न विक्षिप्त असल्यामुळे.

ह्यावर शिष्य "पोचला" की नाही हे आपल्याला माहीत नाही. पण थोडाबहुत बोध घेण्यासारखा आहे. "विश्व" हा एक शब्द झाला. व्याकरणानुसार ते नाम आहे. म्हणून ती एक वस्तू आहे असे मानणे चुकीचे. "सर्व काही" एवढाच त्या शब्दाचा अर्थ. व्यवहारात ह्या संकल्पनेचा उपयोग फार कमी. मुख्य म्हणजे ती संकल्पनाच अाहे हे ध्यानात घ्या. नाम किंवा सर्वनाम आहे म्हणून एक काहीतरी वस्तू आहे, तत्त्व आहे, ही चूक भलेभले करतात. व्यक्ती एक आहे म्हणून स्वभाव एकसंध अाहे, अशीही चूक करतात.

माणसाच्या हालचालींना माणसाच्या देहाचे बंधन आहे. कोपर उलट्या दिशेला दुमडता येत नाही. खांदे स्थिर ठेवून मान ३६० अंशातून फिरवता येत नाही. हे सर्वांना पटते. तर भाषेच्या "बाहेर" पडून विचार करता येईल, असे वाटते तरी कसे? हीसुद्धा चूक बरेच करतात.

ह्या गोंधळातून बाहेर पडणे साधेसोपे नाही. पण तिथे गोंधळ आहे, ही जाणीव ठेवणे आपल्याला शक्य आहे. आपली मानवी प्रवृत्ती काय आहे, ह्याची जाणीव ठेवायला हवी. कुठलीही गोष्ट करताना "हिचा आकार आपल्यासारखा आहे" असे आपण समजून चाललो आहोत काय, ह्याची सतत छाननी करायला हवी. त्यातून अनेक गुंते सुटण्याची शक्यता आहे.

विषय अातापुरता संपला.

पण अशा "चुकीच्या" विचारसरणीची आणखी उदाहरणे देण्याचा बेत आहे. "विश्वाचा आकार विचारणे" असे आपण ह्या विचारसरणीला म्हणू. हिच्यावर प्रथम टीका करणारा म्हणून विट्गेनश्टाइन हा युरोपीय तत्त्वचिंतक (philosopher) प्रसिद्ध अाहे. पण भारतात हे नवीन नाही. निदान भगवान बुद्धाच्या पहिल्या प्रवचनापासून तरी अनेक दार्शनिक "बाहू उभवून" हेच सांगत आलेले अाहेत. अापण ऐकत नाही.

अशा माणसाचे एक आधुनिक उदाहरण आहे. पुढेमागे त्याची माहिती देणार आहे. तोपर्यंत कोण हे अोळखता अाले तर जरूर सांगा! अापल्या सर्वांच्या परिचयाचे जबरदस्त व्यक्तिमत्त्व अाहे. पण तत्त्वज्ञ म्हणून अापण त्यांना अोळखत नाही. एवढेच पुरे!

लेखनविषय: दुवे:

Comments

विश्वाचा आकार.

जगन्नाथ सेठ,
विश्वाकाराचा हाही लेख उत्तमच. प्रश्न फक्त एक आहे "विश्वाचा आकार काय?"गुरुचे उत्तर "माणसाच्या बुद्धी एवढा" असा पाहिजे होता की काय ? अर्थात अनेक गुरु आणि आणि अनेक शिष्य, त्याबरोबरच वेगवेगळे तत्वज्ञान त्यामुळे तसे असावे,असे वाटते.तरिही विश्वाचा आकार किती या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर या विवेचनात दिसले नाही,किंवा असेल पण लेख समजून घेण्यात आमची चूक झाली असावी ! (चु.भु.दे.घे.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बापरे

परत वाचायला हवे. नीट बोध होत नाही आहे.

शेवटी कोडे पण घातले आहेत तुम्ही - ओशो का?

कोडे

शेवटी कोडे पण घातले आहेत तुम्ही - ओशो का?

अोशो नाही.

(खूप ताणून धरणार नाही.)

इतर प्रश्नांची चर्चा थोड्या वेळाने.

भाग ३ चे अधिक स्पष्टीकरण

ह्यावर दोन प्रतिक्रिया (थोड्या बदलून):

नीट बोध होत नाही आहे.

गुरुचे उत्तर ... काय ?

एक लक्षात घ्या की मलाही नीट बोध होत नाही. म्हणून लेखनात गडबड असण्याचा संभव अाहे. गडबड दिसली तर नक्की तिचा उल्लेख करावा. म्हणजे मला समजायला मदत होईल. मुद्दाम कोड्यात पाडण्यासाठी लिहिलेले नाही.

गुरूचे उत्तर काय, ह्यापेक्षा गुरूला सांगायचे काय, हे विचारणे जास्त सयुक्तिक. गुरूचे एकूण म्हणणे असे की हा प्रश्न बरोबर नाही. किंवा तो तसा विचारण्यामागची भूमिका बरोबर नाही. "भांड्याचा अाकार काय" अाणि "विश्वाचा अाकार काय" हे प्रश्न सारखे दिसतात फक्त. म्हणून ते सारखे नाहीत. त्याच्यातला पहिला प्रश्न आणि त्याचे उत्तर हे रूढ अशा साच्यात बसणारे आहे. तो साचा दुस-याला लागू होत नाही. म्हणून तशाच उत्तराची अपेक्षा ठेवून तो विचारू नये. मुद्देसूद मितभाषी "चिरेबंद" उत्तराची अपेक्षा ठेवू नये.

"माणसाच्या बुद्धीएवढा" हे उत्तर एका अर्थी अचूक अाहे. हॅम्लेटमधले हे सुप्रसिद्ध वाक्य: ""There are more things in heaven and earth, Horatio, than are dreamt of in your philosophy". ह्या वस्तू (things) कोणत्या? "भुते", इतके साधे त्याला म्हणायचे नव्हते हे झालेच. माणसाच्या संकल्पनांना पार नाही, त्याची तो वाटेल तितकी उतरंड रचू शकतो, ही त्यामागची भावना अाहे. तरी तिचा अाकार शेवटी माणसाचा राहतो.

अाता म्हणाल की संकल्पनांचा अाणि विश्वाचा संबंध काय? तुमचा विचार बदलला म्हणून ग्रहतारे बदलतात काय? तसे नाही. विश्व बदलत नाही. पण तुम्ही त्याचा अाकार विचारलात. अाकार ही तुमची संकल्पना अाहे.

कोड्यात पाडण्यासाठी बोलत नाही, हे पुन्हा सांगतो. विश्वाचा अाकार म्हणजे नक्की काय? विश्व म्हणजे त्याच्यात सर्व काही अाले. त्याच्या बाहेर पडून तुम्ही ते कसे काय बघणार? बाहेर असे काही नाहीच.

ह्यावर काही लोक म्हणतील की बाळ जरा सायन्स शीक. पृथ्वीचा अाकार गोल, हे लोकांनी पृथ्वी न सोडता, फूटपट्ट्या लावून शोधून काढले. ह्यावर उत्तर असे की त्यांनी अाकार काय हे शोधून काढले. अाकार म्हणजे काय हे नाही. ते विचारणा-याने अाधीच ठरवले होते. त्याला विचारा. तर तो म्हणेल की अवकाशातून पृथ्वी कशी दिसेल हे त्याला हवे होते. म्हणजे तो भांड्याचा अाकार काय ह्याच पद्धतीचा प्रश्न झाला!

ह्याच्यावर अाणखी कुणाचे म्हणणे असे पडेल, की नीट "फूटपट्ट्या" लावून, विश्वाचा अाकार चतुर्थमितीत (किंवा अाणखी पंचवीसतीस मितींत) काय अाहे हे गणित करून समजू शकते. पण ह्याच्यात अाकार ह्या शब्दाचा अर्थ बदलला. हेच तर गुरू सांगतो अाहे. तू अापली भाषा नकळत कशी बदलते ह्यावर बारीक लक्ष ठेव. "अंतिम" प्रश्नावर विचार करताना तर विशेष लक्ष ठेव. मग तुला ह्या जड-जड प्रश्नांचा एवढा त्रास होणार नाही.

अापल्या भाषेची सर्जकता, संकल्पनांची "उतरंड", अाणि विश्वाची प्रतीत होणारी रचना, ह्या तीन्ही एकमेकांत अशा घट्ट विणलेल्या अाहेत.

प्रतीत होणारी रचना (भाग ३ पुढे चालू)

अापल्या भाषेची सर्जकता, संकल्पनांची "उतरंड", अाणि विश्वाची प्रतीत होणारी रचना, ह्या तीन्ही एकमेकांत अशा घट्ट विणलेल्या अाहेत.

हे मान्य करणा-याचाही असा प्रश्न असू शकेल, की प्रतीत काही का होईना. खरी रचना काय? पूर्वी लोकांची पृथ्वीभोवती सूर्य फिरतो अशी कल्पना होती. ती चुकीची ठरल्यावर बदलली. म्हणजे संकल्पना चुकीच्या असू शकतात. पण म्हणून विश्वाचा अाकार काय हा प्रश्नच विचारायचा नाही? "ह्या क्षणी उत्तर माहीत नाही" असे म्हणा फारतर. किंवा "गोल फुग्यासारखा अाहे, पण उत्तर बदलू शकेल" असे काहीतरी म्हणा.

ह्याला उत्तर असे की संकल्पना बरोबर किंवा चूक अशा नसतात. उपयोगी अथवा निरुपयोगी असतात. अापल्या संकल्पना "बरोबर" (सत्याशी मिळत्याजुळत्या) अाहेत हे कसे ठरवणार? अापल्याच संकल्पनांच्या बाहेर जाऊन? "माणसाच्या अाकाराच्या" बाहेर जाऊन? ते शक्य नाही. मग ठरवणार कोण? मानवी संकल्पना अाणि सत्य, ह्या दोन्हींना पाहणारा, अाणि निरपेक्ष बुद्धीने तोलून निर्णय देणारा असा तिसराच कोण अाहे का?

ब्रह्मदेव.

तात्पर्य, "ब्रह्म" म्हणून काहीतरी असते, ही वरील गरजेतून निर्माण झालेली कल्पना अाहे. पण तीही संकल्पनाच अाहे. तिच्यामुळे निष्कारण किती समस्या उत्पन्न होतात हे जाणून बुद्धाने ब्रह्मकल्पनेवर प्रहार केला, अाणि "ब्रह्म जाणणा-या" ब्राह्मणांना अाव्हान दिले.

नमस्कार !

जगन्नाथ महोदय,
हा भाग सुद्धा चांगलाच आहे. आणि प्रतिसाद सुद्धा. प्रतिसादातून विषय समजण्यास अजून मदत झाली.
विषय पुढील लेखात अजून स्पष्टपणे आणि जास्त वाक्यांमध्ये समजावण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे माझ्यासारख्यांना अजून सोपे जाईल.

समजावून घेण्याचा विषय, समजावून घेणारा मनुष्य आणी समज या तिहींच्या (त्रिपुटी) पलिकडे असणारा विषय म्हणजे 'ब्रह्म म्हणजे काय?'. बुद्ध आत्मा मानित नाही. ब्रह्माबद्दल तो काय म्हणतो माहित नाही. तसेच जैनांचा याविषयीचा (आत्मा, ब्रह्म) विचार काय ते समजले नाही. कारण संकल्पना आणि त्यांना जन्मदेणारी बुद्धी याविषयी चर्चा झाली. विश्वाचा आकार आणि ब्रह्म संकल्पना या थोड्या वेगळ्या असाव्यात का? (विश्वाचा आकार हा ब्रह्म विचारातील एक् भाग. असे.)
--(निर्बुद्ध) लिखाळ.

त्यांनी दारुचा अर्धा पेला रिचवून भैरवी गायली आणि श्रोत्यांनी उरलेल्या अर्ध्या पेल्यावर चर्चा केली.

"थियरी ऑफ् रिलेटिव्हिटी" आणि "स्यादवाद"

तोपर्यंत कोण हे ओळखता आले तर जरूर सांगा!

जगन्नाथराव, आईनस्टाईन बद्दल बोलता आहात काय?
त्याची "थियरी ऑफ् रिलेटिव्हिटी" आणि जैनांचा "स्यादवाद" यांच्यात साम्य आहे असे म्हणतात म्हणे. खरे खोटे माहित नाही.

"जैन धर्म मला जगातील सर्वोत्कॄष्ट धर्म वाटतो" असेही काहीतरी तो बोलला असावा असे लक्षात येते.

 
^ वर