जैन साहित्यातील विश्वाकार - भाग २

आता जैन दर्शनाऐवजी "झेन" दर्शनाचा विचार करणार आहोत. दोघांचा संबंध काय? खूप दाट संबंध नसेल. पण दोन्हींचा जन्म एकाच संस्कृतीतला आहे.

झेन ही गोष्ट भारतीय आहे, ह्यावर चटकन विश्वास बसत नाही. पण बुद्धधर्माच्या ह्या शाखेचा उगम भारतातच झाला. चीनमध्ये नाही आणि जपानातही नाही. विमलकीर्तिनिर्देश ह्या नावाचे प्रसिद्ध आणि प्राचीन बौद्ध सूत्र आहे. त्यात झेन तत्त्वज्ञान प्रथम प्रकाशित झाले असे मान्य झालेले आहे.

ह्या झेनच्या उपासनेत कोअन (koan) म्हणून प्रकार असतो. एक लघुतमकथा, असे तिचे रूप असते. प्रयोजन आध्यात्मिक असते. अनभिज्ञ माणसाला ती गोष्ट बहुतेकदा बुचकळ्यात पाडते. ब-याचदा ती विनोदीही असते. कथांचे प्रकार असंख्य आहेत. पण एक ठरलेले कथानक असे:

एक शिष्य आपल्या गुरूकडे जातो. त्याचे शिक्षण बरेचसे पूर्ण झालेले असते. पण अजून काही प्रश्न त्याच्या मनात उरलेले असतात. त्यांपैकी एक ब-यापैकी जड प्रश्न तो गुरूला विचारतो. म्हणजे जीवनाचा अर्थ काय, मनाला लगाम कसा घालावा, अस्तित्व म्हणजे तरी काय, इत्यादि.

ह्यावर गुरू विचित्र उत्तर देतो. त्याचा प्रश्नाशी काहीही संबंध नसतो. कधीकधी तो निरर्थक बोलतो, तर कधी बोलतच नाही. कधी कानठळ्या बसतील इतक्या जोरात ओरडतो, तर कधी अासनावरून उठून चक्क शिष्याच्या थोबाडीत देतो!

पण गंमत अशी की त्याच्या ह्या "उत्तराला" अर्थ असतो. त्याने वेळ बघूनच हे केलेले असते. तोवेळपर्यंत मेहनत करून त्याने आपल्या चेल्याला असा काही तयार केलेला असतो की त्याच्या विक्षिप्त उत्तराने चेल्याच्या डोक्यात प्रकाश पडतो. आणि तत्क्षणी तो "पोचतो". त्यानंतर त्याचा लागलेला दिवा कधीच विझत नाही.

विमलकीर्तिनिर्देशसूत्रात असे प्रसंग जवळपास प्रत्येक प्रकरणात आहेत. जग ज्यांना "झेन" म्हणते अशी कूट उत्तरे ऐकून त्या एकाच कथासूत्रात सहस्रशः लोकांना बोधी प्राप्त झाली आहे.

हे इथे सांगण्याचा हेतू काय, तर आपल्या आध्यात्मिक साहित्यातही असल्या उत्तरांना स्थान आहे. सरळ उत्तर शक्य नसते तेव्हा असे वाकड्यातले उत्तर दिले जाते. विश्व मानवाच्या आकाराचे आहे, हे असेच कूट विधान आहे का, ह्यावर पुढील भागात चर्चा . . .

लेखनविषय: दुवे:

Comments

परत परत

वा! झेन चे विवेचन आवडले!
मात्र 'पोचणे' हा विभाग सतत घडतच असतो... एकदा दिवा लागला आता परत काही बघायला नको, असे काही प्रत्यक्षात घडत असेल असे वाटत नाही.

मात्र परत परत 'पोचणे' हा सर्वांचा अनुभव असतो. वेगवेगळ्या स्वरूपात तो सर्वांनाच येत असतो.

मात्र काहीवेळा झेन गुरुंचे अतर्क्य (क्सिझोफ्रेनिक?) वागणेही असेल का? त्याचा अर्थ बिचारे शिष्य मात्र एन्लायटन्मेट असाच घेत असणार... असो!

एक गोष्टः
एक साधा माणूस. गुरु कडे जातो.ध्यान करतो नि 'पोचतो'. आता 'पोचलो', पुढे साधी राहणी असावी म्हणून आश्रम घर सोडून डोंगरावर रहायला जातो. एका छोट्या चौकोनात स्वतः पुरते शेत लावतो बाकी वेळ ध्यानात घालवतो.

असे बरेच दिवस जातात.

एक दिवस दुसराच झेन गुरु तेथे जाता जात डोकावतो. रात्र काढायचे ठरवतो. हा 'पोचलेला' माणूस सायंकाळी ध्यानाहून परत आल्यावर स्वागत करतो खायला भात करतो नि सांगतो की उद्या पुरता तांदुळ या रांजणात आहे तो घेऊन तुम्ही उद्याचा भात करून घ्या. मी पहाटेच ध्यानाला जाईन.
दुसर्‍या दिवशी ध्यान संपवून तो घरी येतो तेव्हा पाहतो की, गुरु तर् गेले पण जातांना रांजण फोडले आहेत, झोपडी मोडून टाकली आहे.
तो पाहून क्षणभर आवाक् होतो आणी मग आनंदाने नाचायला लागतो.
---------------------

आता माझे प्रश्न -
साधा माणूस '३ वेळा' कसा काय पोचतो.
आता कशावरून गुरु चे वागणे हे त्याला 'पोचवण्याचेच होते'?
कशावरून गुरु गांजा पिऊन गोंधळ घालत नव्हते?
अजूनही आहेत... :)

आपला
(पोचण्याच्या मार्गावरचा)
गुंडोपंत

सावध!

जगन्नाथराव,

आपले दोन्ही लेख वाचण्यासारखे आणि अजून उत्सुकता वाढवणारे आहेत. तरी खालील प्रतिक्रीया ही केवळ गंमत म्हणून केलेली घ्या:

या लेखातील शिष्याचे प्रश्न आणि गुरूची उत्तरे वाचताना, आपण "दारूचा तांब्या?" या चर्चाप्रस्तावात जे काही प्रश्न विचारत आहात त्यावर उपक्रमावरील "गुरू माणसांना" त्या प्रश्नांना उत्तरे कशी द्यावीत याची आगळी वेगळी कल्पना दिली आहेत तेंव्हा आता उपक्रमावर आपल्याला वर उल्लेखलेल्या गुरू ने दिलेल्या प्रकारातील उत्तरे मिळू शकतील, म्हणून म्हणतो, अमंळ सावध रहा!

आणि आधी म्हणल्याप्रमाणे वरील प्रतिक्रीया ह.घ्या. :-)

हममम्

असे नाही वाटते की जास्त शेखी मिरवायची म्हणजे म्हणजे शब्दांचे खेळ करायचे. पांढर्‍यावर काळे करायचे. पुर्वीच्या काळी जास्त वेळ असलेले आणी बाकी काही काम येत नसलेले लोक असे बळचकर लिहीत बसायाचे आणी ते असे साहीत्य प्रकाशीत करायचे. आजकाल कसे अभिनय येत असेल नसेल तरी काही अभिनेते आपल्या पोरांना घेऊन सिनेमे काढतात. तसे काही लेखक, प्रकाशक आपला पिढीजात धंदा असले साहीत्य घेऊन चालवायचे. नाही म्हणले तरी फिलोसॉफी कायम फॅशनमधे. मार्केटींगमधे तरबेज असतील कारण हे असले खपवायचे म्हणजे ...

पण काही म्हणा विक्षिप्त प्रकार करणार्‍या गुरूंचे चेले मात्र स्मार्ट , काहीतरी मस्त अर्थ लावुन जायचे. ईग्रंजीत पब्लीक रिलेशंन्स मधे ज्याला स्पिन डॉक्टर , डॅमेज कंट्रोल् म्हणतात. हा प्रकार तेव्हा पासुन सुरू झाला म्हणायचा.

अस तर नसेल ना कि गुरू बिचारा सांगुन सांगुन थकला अन मुस्काटात भडकवायला लागला मग घाबरुन इतर लोक बरोबर वागायला लागली. झाले,... किर्ती झाली.. मठाचा धंदा वाढला, कामाचा व्याप. मग तीच गोष्ट अजुन लोकांना सांगण्यापेक्षा डाव्या थोबाड फोडले कि हा अर्थ, उजवे कि..मडके फोडले की मडके बदला दुषित पाण्यापासुन् विकार होतील्, झोपडी मोडली की नॉट् अर्कॉडींग टू वास्तूशात्र, प्लीज रिबील्ट असे शॉर्ट ऍन्ड ईझी पॉकेट बुक्स सुरु झाले असतील.

माझ्यामते कॉन्सपीरसी थेअरी पण अशीच सुरु झाली अन टीकाकार पण तेव्हाच उदयास आले.

तुम्ही गुरुला नावे ठेवणे सोडा पाहू, एका थोबाडीत गुरुंनी केवढे कार्य केले, किती नवीन क्षेत्र निर्माण केली, केवढ्या लोकांचा पोटापाण्याचा प्रश्ण सोडवला.

"स्पष्टीकरण"

वरील सर्व मुद्दे कमीअधिक प्रमाणात बरोबर अाहेत. "गुरू" ह्या प्रकारात शतकानुशतके जितका भ्रष्टाचार झाला आहे तितका आणखी कुठेच नसेल. स्वतःला गुरू म्हणवून घेतलं आणि थोडंफार विचित्र वागलं की खंडीभर लोक गोळा करता येतात आणि पैसा करता येतो हा अनुभव आहे. कारण हा विषयच कठिण आहे. लोक फसतात. संसाराला जितके घाबरलेले आहेत तितक्या प्रमाणात जास्त फसतात. मलाही तो विषय कठिण पडतो. मी त्याच्यावर बोलणार नाही. मी जे लिहितो आहे ते त्याचा आवाका फार मर्यादित आहे. त्यात जैन धर्माबद्दल काही नाही. जैन धर्माचा मी अभ्यास केलेला नाही. झेनबद्दल काही नाही, कारण तेही माहीत नाही. ह्यात फक्त एका चमकदार कल्पनेचा विचार आहे. तो विचार करण्यास उपयोगी पडेल म्हणून गुरू-शिष्यांचे आणि सूत्रांतले प्रसंग मी "रिपोर्टिंग" म्हणून देत आहे. बाकी सर्व वैयक्तिक कल्पनाविलास आहे. ह्या सर्व साहित्यिक कृती आहेत असं समजा, म्हणजे हे एक रसग्रहण आहे हे लक्षात येईल. पण श्रेष्ठ साहित्यकृती आपली दृष्टी बदलू शकते. आणि दृष्टी बदलण्यात "भौतिक" काहीच नाही. म्हणून एक सोय म्हणून आत्मिक म्हणायचं. बाकी काही नाही.

व्यक्तिगत विचाराल तर मला गुरू म्हणून कोण माहीत नाही. इकडे भारताच्या तोंडात मारतील इतके गुरू झाले आहेत. शिवाय अमुक माई आणि तमुक श्रीश्री येऊन जात असतातच. माझा विश्वास नाही. तथाकथित शिष्यांवर तर मुळीच नाही. यमनियम न पाळणारे लोक ध्यान-प्राणायामाच्या बाता मारतात त्यावर विश्वास ठेवण्याइतका मी पेंद्या झालेलो नाही. विश्वास दोन गोष्टींवर आहे. एक म्हणजे आपण ज्याला सायन्स म्हणतो ते, की ज्याच्यात कष्ट-कष्ट करून लोक सत्य शोधत असतात. पण शास्त्रकाटा म्हणजे निव्वळ सायन्स नाही, ह्याही गोष्टीवर माझा विश्वास आहे. सायन्स हा एक भाग झाला. उत्तम कविता, किंवा बंदिश, किंवा नाटक, किंवा शिल्प, ह्यांच्यात फक्त रंजकता आहे हे कुणाला पटेल? त्याच्यातही सत्यशोधन आहे. इतकी साधी भूमिका आहे.

आता राहिली गोष्ट दारूच्या तांब्याची. मला मीच लिहिलेला प्रस्ताव दिसत नाही आहे. काटला की काय मधल्यामधे? काय यार. जरा सैल सोडा. मला खरोखर उत्सुकता होती, "तांब्या" म्हणजे काय ह्याची.

छान.

झेन ची ओळख आवडली.
झेन हा शब्द 'ध्यान' वरुन आला आहे असे वा´चले होते.
या झेन गुरुंच्या कथा मस्तच असतात. ओशोंच्या व्याख्यानांत अनेकदा त्यांचा समावेश असतो.

पुढील लेखच्या प्रतिक्षेत.
--लिखाळ.

जय स्वावलंबन ! कष्ट करा ... कष्ट करा !!

बरोबर

'ध्यान' वरूनच आला आहे. सुंदर ते zen, उभे wit वरी . . .

आंतर जालावरील

झेन नक्की वाचा. छान विरंगुळा.

 
^ वर