जैन साहित्यातील विश्वाकार - भाग १

जैन वाङ्मयात जी विश्वाची संरचना सांगितली आहे ती थक्क करणारी आहे. ते समुद्र, ती द्वीपे, आकाश, पाताळ, ह्यांबद्दल वाचताना माणूस अक्षरशः हरवून जातो. पण ह्या सर्वांवर कळस म्हणजे विश्वाच्या एकूण आकाराबद्दलची कल्पना. हे विश्व पुरुषाच्या आकाराचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. अशी कल्पना मला तरी कुठेच आढळली नाही. ह्या अतिप्रचंड मानवी आकाराचे रहस्य काय?

योगशास्त्रात विश्व आणि मानवदेह हे एकात्म आहेत अशी थोडीफार कल्पना आहे. निदान तसे ऐकले आहे. ती माहीत नाही, त्यामुळे खोलात जाता येत नाही. पण आदिम मानवाला सत्य प्रतीत झाले, त्यावरून त्याने जे शास्त्र निर्माण केले, त्यावरच अनेकानेक संस्कार करून योगशास्त्र निर्माण झाले आहे, हे उघड. मग ते जैन असो, हिंदु असो, बौद्ध असो, अाणखी काही असो. ह्याचा अर्थ असा की ही विश्वाच्या आकाराबद्दलची ही कल्पना फार प्राचीन असावी. नाहीतर तिचे निरनिराळे अवतार निरनिराळ्या परंपरांत दिसले नसते.

ज्या आदिम गुरूंना आपण विसरून गेलेलो असतो त्याना एकत्रितपणे "शिव" म्हणण्याची पद्धत आहे. सुटसुटीतपणे म्हणायचे तर शंकराने विश्व मानवाकार आहे असे शिकवले. त्याचा अर्थ आपल्याला समजायला हवा. मला तो माहीत आहे असे ("अर्थातच") माझे म्हणणे नाही. पण थोडेफार सुचले ते असे.

आपण आद्यगुरू हा शंकर आहे असे म्हणतो, ते का? तर त्याच्यात पूर्वजांविषयी पूज्यभाव आहे. त्यांना जे "समजले" होते ते आपल्याला समजलेले नाही. आपण समजण्याचा प्रयत्न करत असतो. खरे तर करत होतो हे म्हणणे सयुक्तिक. कारण पाश्चात्यांनी ते सोडले, आणि त्या नादाने आपणही सोडले. ते अजूनही आदिमानव हा रानटी आणि अंधश्रद्ध असतो असेच समजतात. कारण आदिमानवाला "सायन्स" येत नव्हते. ज्याला सायन्स येत नाही त्याचे विश्वाबद्दलचे विचार टाकाऊ. त्यांत घेण्यासारखे काही नाही. हे असंच तिथे चालत आलेलं आहे. त्यांच्या ह्या सायन्समध्ये anthropomorphism ही एक शिवी आहे. रानटी माणसाला जे भलभलते भास होतात, त्यात प्रमुख म्हणजे कुठल्याही गोष्टीचा मानवी आकार दिसणे हा. हेच ते anthropomorphism. तर त्यांच्यापुरते रहस्य इतकेच. ज्याला वृक्ष मानवासारखा वाटतो आणि पर्वतही मानवासारखा वाटतो, त्याला संपूर्ण विश्वाचा आकारही तसाच वाटला तर आश्चर्य काय? झालं ना? सुटला झटक्यात गुंता!

ह्याच्यात पूज्यभाव नाही. "मला माझ्या आईबापापेक्षा जास्त समजतं", हा भाव आहे. म्हणून हे चूक आहे. असा साधा सरळ मामला आहे. हे चूक, तर खरे उत्तर काय? त्याचाही anthropomorphism शी संबंध आहे. पण त्याआधी विषयांतर करावे लागणार आहे. ते पुढील भागात . . .

लेखनविषय: दुवे:

Comments

संथारा व्रत.

जगन्नाथ सेठ,

जैन साहित्यातल्या विश्वाकार थोडा समजला.पुढच्या लेखात तुम्ही संथारा व्रताकडे या बरं लवकर. आम्हाला खूप प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. नसेल येणार तो विषय तरी चिंता करु नका आम्ही पुढचा लेखही इतक्याच शांतपणे वाचून जाऊ : )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संथारा व्रत

आहे? मला संथारा व्रत म्हणजे काय हेच माहीत नाही!

पुढील भाग

नमस्कार,

आदी मानव आणि त्यानंतर् प्रगत झालेले ज्ञानी मानव आणि मग आजचे विज्ञान शिकणारे मानव यातील काळ निश्चित झाला की कोडी सुटतील असे वाटते. कारण हे मधले ज्ञानी मानव होते म्हटले तर त्याना काळाच्या पट्टीवर कोठे बसवणार असा काहिसा विज्ञाना समोर पेच असेल् असे वाटते.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

--(अज्ञानी) लिखाळ.

जय स्वावलंबन ! कष्ट करा ... कष्ट करा !!

 
^ वर