तीन प्रश्न

१ "अनुक्षेत्रपाळा" म्हणजे काय?

२ "राही" कोण?

३ "असुरपणे प्राशन केले" ह्यात असुरपणा म्हणजे काय?

वै० इ० : लिखाणात क मी त क मी पं च वी स शब्द हवेत.

Comments

दोन उत्तरे

१.राही ही विठ्ठलाची दुसरी बायको असे वाटते.

२. आपल्याला
त्यामाजी अवचित हळहळ (हलाहल) जे उठले
ते त्वां असुरपणे प्राशन केले
ह्यातील 'असुरपणे' म्हणायचे आहे असे समजून उत्तर देत आहे.
असुरपणे म्हणजे अघोरीपणे असे म्हणायचे असेल. विष पिणे हा अघोरीपणाच नव्हे काय?

तीन उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
१/ 'शब्दरत्नाकर' (वा. गो. आपटे ) या कोशात 'अनुक्षेत्र' श्ब्दाचा अर्थ :काशी पंढरपूर सारखे मोठे तीर्थस्थान. असा दिला आहे.संतांनी विठ्ठलाला पंढरपूरचा पाटील, चौधरी असे म्हटले आहे. यावरून आरतीच्या संदर्भात 'अनुक्षेत्रपाळ' म्हणजे पांडुरंग.
२/राही: रखुमाई आणि राही या विठ्ठलाच्या दोन स्त्रिया मानल्या आहेत. विठ्ठल हा कृष्णाचा अवतार. रखुमाई म्हणजे रुक्मिणी. 'राही' म्हणजे राधा असावी. राधा--> राधी--> राही असे असावे.
३/ असुरी,आसुरी याचा अर्थ धाडसी असा वरील कोशात आहे. त्यावरून 'असुरपणे' म्हणजे धाडसाने असा अर्थ होऊ शकेल.

असुरपणे....

मीरा फाटक आणि यनावाला यांच्या उत्तरांशी मी पूर्ण सहमत आहे. असुरपणे म्हणजे अघोरीपणे हा अर्थ अगदी योग्य आहे. इतर अर्थ: बेतालपणे, अटीतटीने, वेड्यासारखे साहस करून, धक्कादायकरीत्या, शेवटचा उपाय म्हणून.
अनुक्षेत्र म्हणजे तीर्थक्षेत्र हा अर्थ मला नवीन आहे, तो दिल्याबद्दल यनावाला यांचे आभार.
क्षेत्रपाल हे शंकराचे एक नाव आहे. अनुक्षेत्रपाळ म्हणजे शंकराचे अनुचर?

पूर्व , आग्नेय, दक्षिण, नैर्ऋत्य(हा शब्द नीट टंकता आला नाही, कुणाला येईल?), पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य या आठ दिशा. त्यांचे रक्षक (दिक्पाल) अनुक्रमे: इंद्र, अग्नी, यम, नै‍‌‍र्ऋत, वरुण, वायु, कुबेर, रुद्र. आणि राखणदार हत्ती(दिग्गज) अनुक्रमे ऐरावत, पुंडरीक, वामन, कुमुद, अंजन , पुष्पदंत, सार्वभौम आणि सुप्रतीक. असेच क्षेत्रांचे रक्षक क्षेत्रपाल असतात. ते एकूण एकोणपन्‍नास आहेत. त्यांची नावे मात्र माहीत नाहीत. इतके असले तरी अनुक्षेत्रपाळ म्हणजे काय ते सांगता येणार नाही.

राही ही विठ्ठलाची दुसरी पत्‍नी हे वर आलेच आहे. पहिली रुक्मिणी ऊर्फ रखुमाई. या दोघींचा उल्लेख संतवाङ्‌मयात अनेकदा होतो. --सकलसंतगाथा (खंड २), संपादक आवटे(१९६७), पृष्ठ ७०३ संत जनाबाईंचा अभंग २०: "जन्म खाता उष्टावळी ..."मधील दुसरे कडवे--राही रुक्मिणीचा कांत । भक्तीसाठी कण्या खात । ।.

डॉ. सरोजिनी बाबर संपादित पुस्तकातील एक लोकगीत:
राही रुकमिणीपरीस, सत्यभामा किती हट्टी । नारदाच्या घरी देव, टाकिले घाणवटी ।
राही रुकमीण म्हणती, अवो सत्यभामाबाई । पती दिलेला दानाला, कुणी ऐकीयला नाही । राही रुकमीण बोलती, अवो सत्यभामाबाई । कसा दानाला दिला पती, तुझा एकलीचा नाही.
........ र्‍हाई रुकमिणी परास, सत्यभामाचं रूप चढ । देवाच्या अंगनात, कानोपातराचं झाड । ....--वाचक्‍नवी

नै‍‌‍र्ऋत

ही देवता कोणती? आणि तिच्याबद्दल काही विशेष असे सांगता येईल का?

वामन हे हत्तीचेही नाव असल्याचे माहित नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद.

आणि मला वाटत होतं की नैऋत्य असे लिहितात की काय? यात रफारही येतो का?

नैर्‌ऋत‌‌

नैर्‌ऋत्यमध्ये रफार येतो आणि तो मनोगतावर टंकता येतो.
नैर्‌ऋत या देवतेबद्दल जशी हवी तशी माहिती मिळू शकली नाही. पण या शब्दाबद्दल जे वाचले ते असे:-निर्‌ऋता-- कश्यपपत्‍नी खशाची कन्या. निर्‌ऋति--कश्यपपत्‍नी सुरभि चा पुत्र. (२) अकरा रुद्रांपैकी एक(पद्मपुराण सृष्टिखंड-श्लोक ४०). नैर्‌ऋत, भूत, राक्षस आणि दिक्पालांचा हा अधिपती होता. हा अर्जुनाच्या जन्मोत्सवाला उपस्थित होता.(महाभारत आदिपर्व -भांडारकर आवृत्ती ११४.५७)...निर्‌ऋति घर्घरस्वन-- केसरी वानराची पत्‍नी मार्जारास्याचा पुत्र(आनंदरामायणसार). नैर्‌ऋत किंवा कपोत नैर्‌ऋत --एक सूक्तद्रष्टा(ऋग्वेद १०.१६५)--वाचक्‍नवी

धन्यवाद

नैर्‌ऋत या देवतेबद्दल जशी हवी तशी माहिती मिळू शकली नाही.

तरीही इतकी माहिती जमवून दिलीत त्याचे कौतुक वाटले. धन्यवाद!

आणखी थोडी माहिती

शुक्राचार्याची मुलगी देवी ऊर्फ ज्येष्ठा ही वरुणाची बायको. त्यांचा मुलगा बल ऊर्फ पुष्कर ऊर्फ अधर्म. त्याची पत्‍नी खशाकन्या निर्‌ऋता. त्यांची महाभयंकर भूत-राक्षस योनीतील मुले-भय, महाभय आणि मृत्यु. ही सर्व मुले नैर्‌ऋत नावाच्या जनपदात रहात होती. केरळातल्या वाड्यावस्त्यांची नावे जशी नंबुद्री ब्राह्मणांच्या नायर सहचारिणींवरून पडली आहेत तशी पद्धत त्याकाळी पण होती असे दिसते.
--महाभारत आदिपर्व ६०.५२-५३.--वाचक्‍नवी

अनुक्षेत्र, क्षेत्रपाल

ओरिसामधील देवळांच्या संदर्भात अनुक्षेत्र हा शब्द वाचल्याचे आठवले . संबंधित पुस्तक काढून पाहिले. त्यात दिल्याप्रमाणे ओरिसातील "देवळाला मिळालेल्या उत्पन्‍नातून पुजार्‍यांना दिलेल्या मानधनाला 'अनुक्षेत्र' म्हणतात" ही माहिती मिळाली.

पंचतंत्रातल्या तिसर्‍या अध्यायातील सहावी कथा 'भिन्‍नश्लिष्टस्‍नेहे ब्राह्मण-सुत-सर्पोपकथानकम्‌' ही आहे. एकशेतिसाव्या श्लोकानंतर आलेल्या या कथेत हरिदत्त नावाच्या ब्राह्मण शेतकर्‍याच्या शेतात पुरेसे उत्पन्न येत नसल्याने तो शेतकरी शेताच्या देवतेची म्हणजे क्षेत्रपालाची पूजा करतो असा उल्लेख आहे. इथे क्षेत्रपाल म्हणजे क्षेत्रदेवता.

इतके माहीत असूनसुद्धा अनुक्षेत्रपाळा म्हणजे काय याचा बोध होत नाही. --वाचक्‍नवी

वा ! / दिग्गज

सर्वांच्या प्रतिसादातून चांगली माहिती समजली.

वाचक्नवी,
दिग्गज म्हणजे दिशांचे (रक्षण करणारे) गज (हत्ती) हे नव्याने समजले. आपण साधारणतः थोरामोठ्यांना दिग्गज म्हणतो. ते योग्य कसे मग?

-- लिखाळ.

आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे; त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)

ळ आणि ढ

दिग्गज हे आठ बाजूंनी पृथ्वीला उचलून धरतात. तसेच विद्यासामर्थ्य असलेले ज्ञानवंत विद्वान पंडित म्हणजे पण दिग्गज. उंचापुरा देखणा धिप्पाड पुरुष दिसला की त्यालाही दिग्गज म्हणायचे... ..आणि गलेलठ्ठ रेड्यासारख्या दिसणार्‍या माणसाला पण कुचेष्टेने तोच शब्द वापरतात.
आपला वैदिक ळ सांभाळून ठेवा. नाहीतर वैदिक ळ-ळ्ह चे पुढे झाले तसे ड-ढ होतील.--वाचक्‍नवी

क्षेत्रपाळ

"श्रीविठ्ठल: एक महासमन्वय" मिळवून वाचलं पाहिजे, असं मला हे सर्व वाचून वाटलं. प्राचीन समाजातले क्षेत्रपाल आणि गोरक्षक हे पुढे देवतारूप पावले. स्थूलपणे म्हटलं तर सर्व देव हे "क्षेत्रपाल" आणि देवी ह्या "क्षेत्र" अशी प्राथमिक स्वरूपे आहेत. (ह्यात वाईट काहीही नाही. समाजाची रचनाच अशी की ही रूपके त्यांना आपोआप सुचली.) इतर जातींच्या मानाने ब-याच प्राचीन अशा धनगर समाजाचा जो देव विठोबा, त्याची बायको तिसरीच कोणीतरी आहे. ह्या सर्व गोष्टींची ह्या पुस्तकात संगती लावली आहे. किंवा असावी. कुठे मिळत नाही . . .

ता०क० : "वेणुनाद" आणि "वनमाला" हेही धनगरांचेच आहे.

 
^ वर