उषःकाल होता होता.....

एक हाडाचे पत्रकार, ज्येष्ठ लेखक, आणि ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष - श्री. अरुण साधू यांच्या 'सिंहासन' ह्या राजकीय कादंबरीवर अधारीत जब्बार पटेल यांच्या 'सिंहासन' मधील हे चित्रपट गीत...

शाळेच्या समूहगीत स्पर्धेत ९वी (ब) तर्फे आम्ही हे कळकळीने गायलो होतो. साहित्य, संगीत, कला, आपले सामाजिक अन राजकिय प्रश्न, यांची जस-जशी जास्त ओळख होत गेली तस-तसे या गाण्याचा खोल अर्थ उलगडत गेला. त्यामुळेच की काय सरांनी हेच गाणे आमच्यासाठी निवडले असावे. मिळालेले बक्षिसाचे तब्बल २५ रू. दर-गुरूवारी दत्तांचा वार साजरा करण्यासाठी लागणारया खर्चासाठी वापरण्याचा मास्तरी आदेश लगेच मिळाला ही गोष्ट वेगळी.

"आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली

अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली.......उषःकाल होता होता, काळरात्र झाली"

गझल सम्राट सुरेश भट यांचे वास्तवाची जाणीव करून देणारे जळजळीत प्रखर शब्द, १९८० च्या सुमाराची ही ज्वलंत चाल अगदी अलीकडील वाटावी ही पं. हृदयनाथ मंगेशकर यांची संगीती-जादू आणि आशाताईंचा थेट काळजाला साद घालणारा आवाज, यामुळे हे गीत फक्त गाणे किंवा कलाकृती नाही तर एक 'सामाजिक सत्य' व 'विचार' म्हणून त्याच्या कर्त्यांनी पेटविलेल्या मशालीच्या रूपाणे मराठी मना-मनांत कायम तेवत राहिल.

बाबूजी (सुधीर फडके), गदिमा, राजा परांजपे आणि असे अनेक थोर प्रतिभावंत...यांच्या वैभवी परंपरेला जपणारया ह्या दिग्गजांच्या कारकीर्दिचे कधी-कधी आपणही जिते-जागती साक्षीदार झालो, ही देखील आपली पूर्व-पुण्याईच नाही का?

.....सुनील....

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत, छान लिहिलंय.

सुनिलराव,

या सुंदर गाण्याला आपण उजाळा दिलात या बद्दल आपले धन्यवाद...

एक हाडाचे पत्रकार, ज्येष्ठ लेखक, आणि ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष - श्री. अरुण साधू यांच्या 'सिंहासन' ह्या राजकीय कादंबरीवर अधारीत जब्बार पटेल यांच्या 'सिंहासन' मधील हे चित्रपट गीत...

सिंहासन हा चित्रपट 'सिंहासन' आणि 'मुंबई दिनांक' या दोन कादंबर्‍यांवर आधारित आहे.

मिळालेले बक्षिसाचे तब्बल २५ रू. दर-गुरूवारी दत्तांचा वार साजरा करण्यासाठी लागणारया खर्चासाठी वापरण्याचा मास्तरी आदेश लगेच मिळाला ही गोष्ट वेगळी.

हा हा हा!

गझल सम्राट सुरेश भट यांचे वास्तवाची जाणीव करून देणारे जळजळीत प्रखर शब्द, १९८० च्या सुमाराची ही ज्वलंत चाल अगदी अलीकडील वाटावी ही पं. हृदयनाथ मंगेशकर यांची संगीती-जादू आणि आशाताईंचा थेट काळजाला साद घालणारा आवाज, यामुळे हे गीत फक्त गाणे किंवा कलाकृती नाही तर एक 'सामाजिक सत्य' व 'विचार' म्हणून त्याच्या कर्त्यांनी पेटविलेल्या मशालीच्या रूपाणे मराठी मना-मनांत कायम तेवत राहिल.

सहमत आहे...

बाबूजी (सुधीर फडके), गदिमा, राजा परांजपे आणि असे अनेक थोर प्रतिभावंत...यांच्या वैभवी परंपरेला जपणारया ह्या दिग्गजांच्या कारकीर्दिचे कधी-कधी आपणही जिते-जागती साक्षीदार झालो, ही देखील आपली पूर्व-पुण्याईच नाही का?

अगदी खरं!

धन्यवाद...

धन्यवाद...

आशा भोंसले(?)

चित्रपटात मला वाटते पुरुषी आवाज आहे. रवीन्द्र भटांनी म्हटले असावे.--वाचक्‍नवी

वाचक्‍नवी - खालील लिंक वर संदर्भ मिळेल....

वाचक्‍नवी - खालील लिंक वर संदर्भ मिळेल....

लिंक कुठाय?

सुनिलराव, आपण लिंक द्यायला विसरलेले दिसता!

काय आज रविवारचं मटणवड्यांचं जेवण अंमळ जास्त झालं वाटतं! :)

आपला,
(दुव्याच्या शोधात) तात्या.

लिंक

बरोबर आहे तात्या.....
मटणवडी खायला आणि दुव्याचे बटण बंद पडायला एकच वेळ आली....
ते चालू झाले की लगेच पाठवतो,
तुमचा उपवास सुटायच्या आत.....:)...:)

लिंक

रविंद्र भट?

चित्रपटात मला वाटते पुरुषी आवाज आहे. रवीन्द्र भटांनी म्हटले असावे

रविंद्र भट नव्हे, रविंद्र साठे. या गाण्यात आशाताईंसोबतच थोडासा सहभाग रविंद्र साठ्यांचाही आहे..

तात्या.

पटले!

उभा देश झाला आता एक बंदिशाळा, हे वक्तव्य आजच्या काळात लागू पडत नाही. ते १९७५ मध्ये सत्य होते.

अगदी बरोबर आहे. मला हे गाणे पुर्वी आवडले असले तरी आता ते नकारात्मक वाटत असल्याने नकोसे होते. कदाचीत चर्चील साम्यवादी/समाजवाद्यांबद्दल बोलला ते या गाण्यालाही लागू असेलः ज्याल हे गाणे वीशीत आवडणार नाही त्याला ह्रदय नाही आणि ज्याला हे तिशीत आवडेल त्याला डोके नाही! ह.घ्या. :-)

पण त्या सर्वांत निळू भाऊंचे काम सर्वोत्कृष्ट.

अगदी मान्य. एखाद्या चांगल्या पत्रकाराचे अशा वातावरणात काय होवू शकते ते दिसते. त्याच बरोबर ज्या करूण पद्धतीने वास्तवात अंत झाला, कदाचीत ते कारण असेल पण जयराम हर्डिकरांचे त्यात्तील काम, असहाय्यता आणि मरताना डोळ्यासमोर लहान मुलीचे "ट्वींकल ट्वींकल लीटील स्टार.." हे आठवून अस्व्स्थता येते.

एकंदरीत लागू (दोन), फुले, दुभाषी, सरनाईक, हर्डीकर इत्यादींनी भरलेला ह त्या काळातील "मल्टीस्टार" चित्रपट होता. आणि पुस्तकाप्रमाणेच अपवादात्मकरीत्या त्या चांगला होता...

हे काय होते?

त्याच बरोबर ज्या करूण पद्धतीने वास्तवात अंत झाला, कदाचीत ते कारण असेल ह्यावर अजून काही प्रकाश टाकू शकाल काय?

हे विषयांतर होत असेल तर माफ करा (आणि खरडवहीत उत्तर दिलंत तरी चालेल) पण उत्सुकता गप्प बसून देत नाहिये.

हे काय होते? - उत्तर

त्याच बरोबर ज्या करूण पद्धतीने वास्तवात अंत झाला, कदाचीत ते कारण असेल ह्यावर अजून काही प्रकाश टाकू शकाल काय?

सर्वप्रथम चित्रपटातील दृश्य आणि त्याचे वास्तवीक जीवन याचा संबंध नव्हता, पण त्या लागून् घटना घडल्यामुळे... दि गोवा हिंदू असोसीएशन या संस्थेकडून एक प्रसिद्ध नाटक (नाव विसरलो) चालले होते. त्या बसला कशाने तरी आग लागली. त्या आगीतून जयराम हर्डीकर बाहेर येत होते पण त्यांच्या लक्षात आले की शांता जोग अडकल्यात. म्हणून त्यांना वाचवायला म्हणून ते आत गेले, पण त्यात दोघांचाही अंत झाला. ती दुर्घटना ही मराठी नाट्य सृष्टित आणि नाट्यप्रेमींमधे लक्षात राहीली . ते तरूण होते मला आणि आठवते त्याप्रमाणे बायको मुले मागे राहीली...

नाटकाचे नाव -

"मंतरलेली चैत्रवेल" असे होते. फारच दुर्दैवी अपघात.

बरोबर

धन्यवाद

करूण

ज्या पद्धतीने ह्या कलाकारांचा अंत झाला ते तर करूण आहेच. माहिती नवीन होती, धन्यवाद

ह्या घटनेविषयी कोणी फारसं कधी बोललेलं ऐकिवात नाही हे ही दुर्दैवच. आत्ताच्या पिढीला ही माहिती कशी होणार?

माहोल

या गीताने खरेच एक माहोल निर्माण केला होता. अजूनही मन उभारुन उठत.
सुनिल लिंक चेन्नईला इसरला कि झापात?

प्रकाश घाटपांडे

विकास, तळिराम....

गाण्यातून आणि लिखाणातून हे अगदी स्पष्ट आहे.... त्याकाळचे हे धग-धगीत वास्तव होते.......
आजची आणि त्यावेळेसची परीस्थिती हा फरक नक्कीच आहे.

गैरसमज नको

सुनिल आणि इतर,

मी या गाण्यावर अथवा ते आवडणार्‍यांवर टिका अथवा त्यांची थट्टा करत नव्हतो. ते गाणे मला आवडत नाही म्हणण्या ऐवजी नकोसे होते (उदास भावनेमुळे) असे फक्त म्हणालो...

धन्यवाद

पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली.

सुनिल सेठ,

आम्ही या गीतावर महाविद्यालयीन युवकांच्या युवक महोत्सवात हे समुह गीत बसवतो,रंगीत तालीम होईपर्यंत आमचा परफॉर्मस एकदम सही असतो,वेळेवर मात्र विद्यार्थी घोळ करतात.आणि चांगले गीत बसवले होते,प्रयत्न करा, पुढच्या वेळेस बक्षीस नक्की मिळेल असे म्हणतात.बाय द वे चांगल्या गीताची आठवण करुन दिलीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गैरसमज नाही....

आजपेक्षा उद्या आपली स्थिती अजूनही चांगली होईल...
पण म्हणून इतिहासाची, घडलेल्या घटनांची नाळ आपण सहज तोडू शकत नाही.
लेखक, रचनाकार, शाहीर, गायक, संगीतकार, पत्रकार यांच्या माध्यमातून त्या-त्या परिस्थितीचे सत्य सामान्यांपुढे येते.
प्रस्थापितांना ते उघड-उघड आव्हान असते. ते कटू असले तरी त्यातूनच आजच्या आपल्या हया सुस्थितीची (त्यातल्या-त्यात) बीजे रोवली गेली आहेत.

 
^ वर