चिखलदरा

bhim
bhimkund

महाराष्ट्रात थंड हवेची ठिकाणे तशी मोजकीच आहेत. त्यातलेच चिखलदरा हे एक ठिकाण. सातपुडा पर्वतराजीतील हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. चिखलदऱ्याचा मनोरंजक इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदऱ्यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झऱ्यात भीमाने अंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते.

चिखलदऱ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 3564 फूट आहे. त्यामुळे तिथली हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदऱ्याच्या घाटात किंवा चिखलदऱ्याहून सेमाडोहला जाणाऱ्या रस्त्यावर वाघ दिसू शकतात. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र सह्याद्रीतल्या सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी इथे दिसत नाही. इथले जंगल शुष्क पानझडीच्या अरण्याच्या प्रकारात मोडते. इथले मुख्य उत्पादन आहे कॉफी. कारण कॉफीला लागणारे 70 ते 80 फॅरनहीट तापमान येथे मिळते.

भीमकुंड ही ऐतिहासिक जागा गावापासून साधारणत: एक ते दीड किलोमीटरवर आहे. समोर साधारण 3500 फूट खोल दरी आहे. डाव्या हाताला दरीच्या सुरवातीला भीमकुंड हा झरा आहे. देवी पॉइंट गावापासून एक किलोमीटरवर आहे. शेवटी काही पायऱ्या उतरून इथे जाता येते. डोंगरातील एका भुयारात ही देवी वसलेली आहे. तिच्या डाव्या बाजूस चंद्रभागा नदीचा उगम आहे. नदीचे पाणी देवासमोरील छोट्या कुंडात जमा होऊन सरळ दरीत कोसळते. देवी पॉइंटहून जवळच मोझरी पॉइंट आहे. इथून समोरच गाविलगड किल्ल्याचा पश्‍चिमेकडचा भाग दिसतो. इथल्या दरीतच मोझरी गावही दिसते. याच बाजूला हरिकेत पॉइंटही आहे.

इथले नर्सरी गार्डन बघण्यासारखे आहे. हे नर्सरी गार्डन वन खात्याने बांधले आहे. तऱ्हेतऱ्हेचे वृक्ष आणि फुलझाडांनी सजवलेले हे गार्डन संध्याकाळी जाऊन आराम करण्यासाठी उत्तम आहे. येथे लहान मुलांसाठी झुकझुक गाडीही आहे. या गार्डनमध्ये कॉफीच्या झाडांचीही लागवड केलेली आहे.

tigy
tiger

नर्सरी गार्डनहून सेमाडोहाच्या रस्त्याला लागले, की काही अंतरावर डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता लागतो. त्या रस्त्याच्या शेवटी पंचबोल पॉइंट लागतो. येथे उभे राहिल्यास समोर चारही डोंगरांनी वेढलेली खोल दरी दिसते. येथे मोठ्याने आवाज केल्यास पाच वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो. वैराट देवी हा इथला प्रसिद्ध पॉइंट. चिखलदऱ्यापासून 11 किलोमीटर दूर 3866 फूट उंच डोंगरावर वैराट देवीचे मंदिर बांधलेले आहे. खरी देवी पश्‍चिमेकडील खोल दरीच्या एका उभ्या फड्यातल्या भुयारात आहे. तिथे स्त्रिया, मुले आणि सामान्य माणसाला पोचणे अशक्‍य आहे, त्यामुळे हे नवे मंदिर बांधण्यात आले. चिखलदऱ्याच्या दक्षिणेला तीन किलोमीटरवर बहामनी किल्ला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी एक पूर्ण दिवस लागतो. आत जुन्या इमारतींचे अवशेष, तोफा वगैरे आहेत. इथली दुहेरी तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे. याशिवाय इथले शक्कर तलाव, देवी तलाव, मछली तलाव, काला पानी तलाव आणि मंकी पॉइंट अशी काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

चिखलदऱ्याला जाण्यासाठी मुंबईहून रेल्वेने बडनेरा जंक्‍शन. बडनेऱ्याहून एस.टी.ने अर्ध्या तासात अमरावतीला जाता येते. अमरावतीहून चिखलदरा 94 किमी आहे. इथून थेट एस.टी.ही उपलब्ध आहे. नागपूरहूनही चिखलदऱ्याला जाता येते.

लेखनविषय: दुवे:

Comments

नागपूरहून कसे जायचे?

उत्तम माहिती आणि डोळ्यांना गारवा देणारे छायाचित्र यामुळे मेळघाट / चिखलदर्‍याला जाण्याची इच्छा होते आहे.

नागपूरहून चिखलदर्‍याला कसे जायचे? किती वेळ लागतो? चिखलदरा येथे रहाण्याची / जेवणाची काय सोय आहे? आपण उल्लेखलेल्या स्थळांना भेट देण्यासाठी खासगी वाहनांची सोय आहे काय?

हेच म्हणतो

सुंदर लेख आहे.

चिखलदऱ्याला जाण्यासाठी

आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

चिखलदऱ्याला जाण्यासाठी नागपूर हे जवळचे विमानतळ आहे. तर अमरावती जिल्ह्यातील बडनेरा हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. नागपूर आणि अमरावती या ठिकाणाहून एस.टी. महामंडळाची थेट बससेवा उपलब्ध आहे.

नागपूर ते चिखलदरा हे अंदाजे अडीचशे किमी. अंतर आहे. तर अमरावतीहून अंदाजे 110 कि.मी. अंतर आहे. मुंबईहून विदर्भ एक्‍सप्रेस किंवा नागपूरकडे जाणाऱ्या एक्‍सप्रेसने बडनेरा स्टेशनला उतरता येते. तेथून एस.टी.ची बससेवा आणि खासगी वाहने उपलब्ध असतात. अर्थात मला नागपूरहून जाण्याचा अनुभव नाही.

मी मुंबईच्या बाजूने गेलो होतो आणि अमरावतीला उतरुन मग पुढे चिखलदऱ्याला गेलो. नागपूरहून ट्रॅव्हल्सच्या गाड्याही चिखलदऱ्यासाठी उपलब्ध आहेत. परंतु त्यापेक्षा रेल्वेने अमरावती किंवा बडनेरा येथे येऊन नंतर एस. टी. किंवा खासगी वाहनाने या ठिकाणी जाणे उत्तम ठरेल.

येथील पावसाळा चांगला असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने हिवाळा आणि उन्हाळ्याची सुरुवात म्हणजेच साधारणत: ऑक्‍टोबर ते एप्रिल हा कालावधी उत्तम असतो. या ठिकाणी राहण्यासाठी खासगी हॉटेल असले तरीही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकृत निवासस्थान आहे.

उत्तम माहिती

लेख आवडला. याहून मोठा लिहिला असता तरी वाचायला आवडला असता कारण मुद्देसूद आहे. असे लेख येऊ द्या.

लेख व चित्रे

दोन्ही सुंदर.

वा!

वा छान सफर झाली बरं का खेचर राव!
असेच अजून येवू देत!
आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र?!!!! मग असे करण्या आधी गुंड्याला सांगायलाहे नको?)

सुंदर..

विसोबाच्या खेचरा,

सुंदर माहिती दिलीस रे! लहानपणी एकदा आईवडिलांसोबत चिखलदर्‍याला गेलो होतो ते आठवले. फारच सुरेख ठिकाण आहे बॉस!

सुक्यामासळीच्या मार्केटबद्दलही तू दिलेली माहिती खूप चांगली आहे..

तात्या.

फारच छान

मस्त लेख, मोजक्या शब्दात भरपूर माहीती. तिथे नक्कीच लगेच जावेसे वाटले. इथे जायला उन्हाळा सोडल्यास इतर वेळ चांगला असतो असे समजता येईल का (जरी मला छायाचित्रे पाहून पावसाळ्यातच जायला आवडेल तरी)?

धन्यवाद

विकास

वा

खेचरशेठ (मी असं म्हणालो तर आपण रागवणार नाही ना !) नाहितर खेचर महोदय म्हणेन.
आपला लेख आणि प्रकाशचित्रे आवडली.
तेथे राहायच्या आणि जेवणाच्या सोयींबद्दल सुद्ध येथे माहिती नोंदवून ठेवावी अशी विनंती.

वाघाचे चित्र आपण काढले का? छान आहे.
--लिखाळ.

जय स्वावलंबन ! कष्ट करा ... कष्ट करा !

नागपूरहून चिखलदरा

नागपूरहून चिखलदरा साधारण अडीचशे किलोमीटर अंतरावर आहे.
नागपूर -अमरावती हे अंतर १५० किमी आणि अमरावती - चिखलदरा हे अंतर साधारण ९४ किमी .

चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यात येतं. धारणी आणि चिखलदरा मिळून मेळघाट व्याघ्रप्रकल्प आहे. १९७२ मधे जेव्हा भारतात मोजक्याच व्याघ्र प्रकल्पांची निर्मीती करण्यात आली होती त्यातील हा एक आहे.

येथे राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने सोय केलेली आहे. तसेच खाजगी होटेल्स सुध्दा आहेत. जवळच गावीलगडचा किल्ला आहे ( वर याचाच उल्लेख बहमणी म्हणुन केलाय) . तो सुध्दा पाहण्यासारखा आहे. सिमाडोह हे ठिकाण येथुन जवळ आहे.

अधीक माहितीसाठी दूवे देत आहे.
महाराष्ट्र पर्यटन विभाग
अमरावती जिल्हा
चिखलदर्‍याबद्द्ल १
चिखलदर्‍याबद्द्ल २

नीलकांत

 
^ वर