बोंबिल! एक पूर्वजन्मीची पुण्याई...

राम राम मंडळी,

'बोंबिल' या मत्स्यप्रकाराविषयी थोडी माहिती हवी आहे म्हणून हा चर्चाप्रस्ताव मांडत आहे.

व्यक्तिशः बोलायचे झाले तर 'बोंबिल' हा माझा अत्यंत म्हणजे अत्यंत म्हणजे अत्यंत आवडता मासा आहे. ८४ लक्ष योनींच्या फेर्‍यानंतर मनुष्यजन्म मिळतो असे म्हणतात! या मनुष्यजन्मात बोंबिल खायला मिळणे हे त्या ८४ लक्ष योनींच्या फेर्‍यातील केलेल्या पुण्याईचे फळ आहे असे मी मानतो! :)

पूर्वजन्मीची जब्बर पुण्याईच म्हणा ना!

असो..

ओल्या बोंबलाची कोकणी आमटी, बोंबिल फ्राय किंवा तळलेले बोंबिल हे चवीला खासच लागतात! आमच्या कोकणात सुक्या बोंबलाला राख फासून त्याला चुलीवर भाजतात आणि 'बोंबलाचे भुजणे' करतात. (अवांतर - तसेच भुजणे सुक्या बांगड्याचेही करतात तेदेखील चवीला अतिशय सुरेख लागते!)

पाट्याखालचे बोंबिल - ओल्या बोंबलाच्या पाककृतीतली ही एक विशेष पद्धती आहे. बाजारातून बोंबिल आणले की ते पाट्याखाली दाबून ठेवले जातात. पाट्याच्या वजनाने बोंबलात असलेले अतिरिक्त पाणी निघून जाते व असे पाट्याखालून काढलेले बोंबिल अगदी छान कुरकुरीत फ्राय होतात आणि चवीला फारच सुरेख लागतात!

तर मंडळी, एकंदरीतच बोंबिल हा मत्स्यप्रकार अतिशय लोकप्रिय असून चवीला फारच सुरेख लागतो. मद्यासोबतही तळलेले बोंबिल खायची प्रथा बर्‍याच ठिकाणी आढळते! :)

काही प्रश्न - (माहीतगार, चोखंदळ, रसिक, व खाण्यापिण्याचा षौक असलेल्या वाचकांनी कृपया उत्तरे द्यावीत)

१) याला 'बॉम्बे डक' असे का म्हणतात?
२) हा फक्त मुंबईच्याच समुद्रकिनार्‍यावर मिळतो म्हणून याला बॉम्बे डक असे म्हणत असावेत का? परंतु हा मासा तर कोकणात देखील मिळतो.
३) याला 'डक' असे का म्हणत असावेत? याचा आणि 'डक'चा संबंध काय?
४) जगात इतरत्र कुठे हा मासा मिळतो का? (तेथील लोकल समुद्रात?)

बोंबलाबद्दल अजून कुणाला काही विशेष माहिती द्यावयाची झाल्यास येथे अवश्य द्यावी.

तसे पाहता पापलेट, सुरमई, हलवा (याला आमच्या कोकणात आणि गोव्यात काही ठिकाणी काळापापलेट असेही म्हणतात), रावस, कोलंबी हे अतिशय लोकप्रिय मासे. परंतु आम्ही कोकणवासी या माश्यांऐवजी पेडवे, मुडदुशा, कर्ली, मांदेली, गाबोळी, इत्यादी मच्छी अधिक प्रेमाने खातो. या प्रकारच्या मासळीबदल जर कुणाला काही अधिक माहिती द्यावयाची असल्यास येथे अवश्य द्यावी.

अवांतर - मला जर मरताना यमाने विचारलंन की तात्या तुझी शेवटची इच्छा काय आहे तर मी त्याला एवढंच सांगेन की बाबारे जरा थांब. मार्केटात जातो आणि आमच्या साधनेकडून उत्तम बोंबिल आणतो. आपण दोघेही घोट घोट उंची मद्यासोबत ते तळलेले बोंबिल खाऊ आणि मग मला या इहलोकातून कुठे न्यायचा तिथे खुश्शाल ने बाबा! :)

असो,

आपला,
(साधना कोळणीचा शिष्य) बोंबिलप्रेमी तात्या.

लेखनविषय: दुवे:

Comments

दुष्टपणा

अमेरिकेत बसलेल्या माझ्यासारख्या बोंबिलखाऊ कुडाळदेशकरांना असे लेख वाचायला लावणे म्हणजे दुष्टपणाचा कहर आहे असे माझे स्पष्ट मत आहे. ;-)

असो.

मनुष्यजन्मात बोंबिल खायला मिळणे हे त्या ८४ लक्ष योनींच्या फेर्‍यातील केलेल्या पुण्याईचे फळ आहे असे मी मानतो! :)

संपूर्ण सहमत.

माहीतगार, चोखंदळ, रसिक, व खाण्यापिण्याचा षौक असलेल्या वाचकांनी कृपया उत्तरे द्यावीत

हे सगळं असूनही बोंबलाच्या प्रश्नांची उत्तरे सध्या मला नाही माहित याचे कारण बोंबील दिसले की ते फक्त गट्टम् करायचे इतकेच माहित आहे.

बोंबील हा माझा वीक पॉईंट. भारतात उतरल्यावर रात्री ३ वाजता एकदा बोंबलाचे उरलेले आंबटतिखट आणि ब्रेड (भूक लागली नसताना) खाल्ले होते, ते येथे आठवून गेले.

बोंबील ज्याला आवडतो तो खरा मासेखाऊ असे माझे मत आहे. ;-) आमच्या वसईला बोंबलाचे खास आंबट तिखट बनवतात. ते इतरत्र बनत नाही आणि सर्वांनाच आवडते असे नाही. पण त्याची चटक एकदा लागली की माणूस वेडावतो. लसणाच्या फोडणीवर चिंचेचे पाणी आणि त्यात तिखट-मीठ-हळद लावून शिजवलेले बोंबील, डोळ्या-नाकातून पाणी काढत खाण्यातली मजा वेगळीच. सर्दीवर जालिम उपाय. ;-) सारस्वत पद्धतीच्या या आमटी भाताबरोबर तळलेले बोंबील खाऊन पाहा, आवडतील हे निश्चित.

पापलेट, सुरमई, हलव्यासारखे माशांना बोंबिलांसमोर नखाचीही सर नाही. मांदेळी, करंदी, कर्ली यांची गोष्टच वेगळी.

याखेरीज राहिले सुके बोंबील. कोळीवाड्यात चक्कर मारली तर बोंबील सुकवण्याच्या तारांच्या १०० हात जवळून लोक जाणार नाहीत पण माझ्यासारखे दर्दी पोटात कावळे कोकलल्याने बेजार होतील. :) या सुक्या बोंबलांच्या काड्या वांग्याच्या भाजीत घातल्या तर अप्रतिम चव येते.

बोंबलाला बॉम्बे डक बहुधा त्याच्या सफेत पांढर्‍या रंगावरून म्हणतात. प्रश्नांच्या योग्य उत्तरांच्या मी ही प्रतिक्षेत आहे. तसेच, या माशाबद्दल अधिक माहिती वाचायलाही आवडेल.

तोपर्यंत बॉम्बे डक विषयी विकिवर मिळालेली बातमी वाचा... मजेशीर आहे.

अवांतरः मला चित्रगुप्ताने सांगितले की स्वर्गात सर्व प्रकारची पक्वान्ने आहेत पण बोंबील नाही आणि नरकात फक्त बोंबील आहेत तर मी खुशीने नरकात जाईन.

झणझणीत

या सुक्या बोंबलांच्या काड्या वांग्याच्या भाजीत घातल्या तर अप्रतिम चव येते.

लय मजी लय झकास..आमच्या मातोश्रींचा हातखंडा आहे.

टोमॅटो+सोडे, वांगी+सोडे, तळलेले बोंबिल, सुकट, वांब, खेकड्याचा रस्सा(काही लोक याला सूप असा पाचकळ शब्द वापरतात)...अहाहा नुसते नावे घेतली तरी पाणी सुटतं तोंडाला..वास भयानक येतो पण चवीला तुलना नाही.

अभिजित...
बोंबिल देखे से जो आ जाती है मुंहपर रौनक़ |
वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है | (माफ करा गालिबसाहेब)

हा हा...

बोंबील की पाटी लेकर ऐसे ना जाया करो
लोगो की नजरे भी भूखी होती है...

सातपाटीचा अव्या पाटील!

लसणाच्या फोडणीवर चिंचेचे पाणी आणि त्यात तिखट-मीठ-हळद लावून शिजवलेले बोंबील, डोळ्या-नाकातून पाणी काढत खाण्यातली मजा वेगळीच.

क्या बात है..

अवांतरः मला चित्रगुप्ताने सांगितले की स्वर्गात सर्व प्रकारची पक्वान्ने आहेत पण बोंबील नाही आणि नरकात फक्त बोंबील आहेत तर मी खुशीने नरकात जाईन.

हे बाकी झकास! :)

कोळीवाड्यात चक्कर मारली तर बोंबील सुकवण्याच्या तारांच्या १०० हात जवळून

हे वाचले आणि उगाचंच मल आमचा सातपाटीचा अव्या पाटील आठवला. अव्याच्या सातपाटीच्या घराबाहेर मी अश्या तारा पाहिल्या होत्या. अव्या पाटील हा माझा शाळूसोबती. अभ्यासात आम्ही दोघे सारखेच ढ! त्यामुळे सर्वात मागच्या बाकावर बसून सतत गप्पा मारणे, बाष्कळ टाईमपास करणे हेच आम्ही आमचे परमकर्तव्य समजत असू! :)

अव्या उंचीने बुटका, गोरेला आणि तसा सुदृढ होता. त्याच्या वडीलांचा सातपाटीला मोठा मत्स्यव्यवसाय आहे. अव्या मला नेहमी सातपाटीला घरी जेवायला ये असा आग्रह करायचा.

दहावीची परि़क्षा झाली आणि शाळा सुटली. त्याचबरोबर अव्याही भेटेनासा झाला. त्यानंतर अचानक ५-६ वर्षांनी एकदा रस्त्यात अव्या भेटला. आम्ही उराउरी एकमेकांना मिठ्या मारल्या. 'मी तुझं काहीही ऐकणार नाही, या रविवारी घरी जेवायला काहीही करून येच' असा त्याने आग्रह केला.

ठरल्याप्रमाणे मी सातपाटीला अव्याकडे जेवायला गेलो. बापरे! मासळीचे किती प्रकार अव्याच्या आईने केले होते!! अव्या, त्याची आई आणि त्याचे वडील यांनी इतक्या प्रेमळ आग्रहाने मला जेवायला वाढले की काही विचारू नका. अव्याचा माझ्यावर भारीच जीव होता, आणि माझाही अव्यावर. अव्या गधडा दहावी नापास झाला आणि सातपाटीलाच वडीलांचा मासळीचा धंदा सांभाळू लागला. दहावी पास झाला असता तरी अव्या पुढे काहीच शिकणार नव्हता हा भाग वेगळा!

त्यानंतर सातपाटीला गेलो होतो ते अव्याच्या लग्नाला . २-३ दिवस खूप धमाल आली. लग्नानंतर अव्या आणि अव्याची बायडी सुखाने नांदू लागले. त्यानंतर पुन्हा एकदा अव्याने आग्रह करून मासळी खाण्याकरता घरी जेवायला बोलावलंन. यावेळी अव्याच्या बायकोने स्वयंपाक केला होता. अतिशय सुरेख स्वयंपाक. अव्याची बायको रेश्मा ही वसईची पाचकळशी, दिसायला गोरीपान आणि देखण्यात जमा. मात्र स्वभावाने अतिशय शांत, आणि अबोल. फार बोलत नसे, पण तशी मिश्किल होती. गालातल्या गालात हासायची. आमचा अव्या मात्र अखंड बडबड्या. दोघांनीही मला आग्रह करकरून जेवायला वाढलं. अव्याच्या बायकोने केलेल्या कोलंबीभाताची चव आजही माझ्या जिभेवर आहे.

पण मंडळी, अव्याच्या घरून भरल्यापोटी निघताना मी दिलेल्या दुवा बहुतेक नियतीला मान्य नसाव्यात. नियतीच्या मनात नेहमी वेगळंच असतं आणि ती नेहमीच आपला डाव साधते. लग्नानंतर अवघ्या वर्षसहामहिन्यातच अव्या मोटरसायकल अपघातात वारला! माझी दोस्ती तोडून, रागावून निघून गेला पुन्हा कधीही न भेटण्यासाठी!

या घटनेलादेखील आता काही वर्ष होऊन गेली. मध्यंतरीच्या काळात अव्याच्या वडीलांनी स्वतः पुढाकार घेऊन सुनेचं दुसरं लग्न लावून दिलं. रेश्माचं सासर आता मुंबईतच आहे आणि रेश्मा सासरी सुखात आहे ही समाधानाची गोष्ट. दादरच्या एका लग्नात एकदा अचानक रेश्मा आणि तिचा नवरा भेटले. रेश्माला नवराही अगदी भला मिळाला आहे. स्टेट बँकेत नोकरीला आहे. त्यांची माझी गाठ पडल्यावर रेश्माने तिच्या नवर्‍याशी ओळख करून दिली आणि माझ्या आणि अव्याच्या मैत्रीबद्दल सविस्तर सांगितले. कधीही फारसं न बोलणार्‍या, अबोल असणार्‍या रेश्माने मला डोळ्यात पाणी आणून का होईना, पण पुन्हा एकदा तिच्या घरी जेवायला बोलावले.

मी मात्र आजतागायत तिच्या घरी कधी गेलो नाही आणि कधी जाणारही नाही. कारण तिथे अखंड बडबड, गंमत, टिपी, आणि पिजे करत आग्रह करकरून जेवायला वाढणारा आमचा अव्या नसेल!

असो, विषयांतराबद्दल क्षमस्व!

-- तात्या अभ्यंकर.

बांगलादेश?

हे सगळं असूनही बोंबलाच्या प्रश्नांची उत्तरे सध्या मला नाही माहित याचे कारण बोंबील दिसले की ते फक्त गट्टम् करायचे इतकेच माहित आहे.
असेच..

बोंबिल बांगलादेशात मिळतो का काय माहिती नाही पण तो अमेरिकेतील बांगलादेशी दुकानांत मिळतो असे ऐकले आहे. जेव्हा जेव्हा आमच्या जवळच्या बांगलादेशी दुकानात घ्यायला गेले तेव्हा तरी मिळाला नाही हे सोडा :( आणि मिळाला असता तरी अशा फ्रीजमधल्या बोंबिलाला काय चव आली असती कोण जाणे, असा शहाण्यासारखा विचार करून गप्प बसले.

चित्रा

मोठ्या शहरांत

गारठवलेले बोंबिल मिळतात असे ऐकून होते. आमच्याकडे तरी शोधून सापडले नाहीत आणि सापडले तरी

अशा फ्रीजमधल्या बोंबिलाला काय चव आली असती कोण जाणे, असा शहाण्यासारखा विचार करून गप्प बसले.

बहुधा हेच होईल. :)

वा!

बोंबील खावेत तर तळलेले नाहीतर आलं-लसूण-कोथिंबीर-खोबरं इत्यादी पाट्यावर वाटून बनणार्‍या मसाल्यात रंगून येणार्‍या हिरव्या सुक्या ग्रेव्हीत. 'बरा दबदबीतसा कर' अशी एकदा (बरीचशी अनावश्यक) सूचना आजीला केली, की मग केवळ परमेश्वराचा प्रथमावतार ताटात येण्याची प्रतीक्षा करावी, आणि मग जाणिजे यज्ञकर्म म्हणून सुरुवात करावी.

पापलेट, हलवा, सुरमई इ. मासे कितीही चविष्ट असले, तरी त्यांच्यात एक काहीसा मठ्ठपणा आहे. बोंबलांची नजाकत, लुसलुशीतपणा असे काही त्यांच्यात आढळत नाही. इतर कुठे हा मिळत असेलसे वाटत नाही. इकडे फार फार तर सी बास माशाची चव थोडीशी बोंबलांच्या जवळपास येते.

पापलेट, हलवा, सुरमई

पापलेट, हलवा, सुरमई इ. मासे कितीही चविष्ट असले, तरी त्यांच्यात एक काहीसा मठ्ठपणा आहे. बोंबलांची नजाकत, लुसलुशीतपणा असे काही त्यांच्यात आढळत नाही.

सहमत... पापलेट, हलवा पेक्षा सुरमई मात्र आवडते. मात्र मांदेळी आणि कर्ली सर्वात प्रिय.
करंदी हा प्रकार अद्याप खायला मिळाला नाही याचे वाईट वाटते.

नंदनशेठ,

बोंबील खावेत तर तळलेले नाहीतर आलं-लसूण-कोथिंबीर-खोबरं इत्यादी पाट्यावर वाटून बनणार्‍या मसाल्यात रंगून येणार्‍या हिरव्या सुक्या ग्रेव्हीत.

वा वा! फारच सुरेख..

'बरा दबदबीतसा कर' अशी एकदा (बरीचशी अनावश्यक) सूचना आजीला केली, की मग केवळ परमेश्वराचा प्रथमावतार ताटात येण्याची प्रतीक्षा करावी,

क्या बात है! नंदनशेठ, 'बरा दबदबीतसा कर' हे शब्द जयवंत दळवींच्या लेखनात वाचायला मिळतात बरं का! :) दळवीही अत्यंत मत्स्यप्रेमी होते.

आपला,
(दळवीप्रेमी) तात्या.

सुके बोबिंल .

तात्या,
चर्चा प्रस्ताव आवडला.

सुके बोंबिल तळून खातात पण बोंबिल बटाट्याची तर्रीबाज रस्याची भाजी करुन खाण्याचीही पद्धत आहे. ओला बोंबिल खाण्याचा योग काही अजून आलेला नाही.तो कसा लागतो हेही नाही सांगता येणार.सुका बोंबिल जेव्हा चखना म्हणून मिळतो त्याची मजा क्या कहने.बाकी प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत.आपले काम आहे.ओन्ली खाणे.आम्ही गोड्या पाण्यातले मासे खाणारे,
(वामट,राहू, म-हळ, गंगावरी,पतुला,मलघा,जलवा,करोटी,मु-ही,लहानी कोंळंबी उर्फ झींगे,मोठी कोळंबी,याचे चाहते आहोत)एकदा पापलेट अन खेकडे फ्राय म्हणून खाल्ली आहेत.बाकी समुद्री माश्यांचा योग तसा कमीच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा तात्या!!!

ताजे मासे न मिळणार्‍या आमच्या घाटी प्रदेशात बोंबील, सोडे, सुकट आणि गोड्या पाण्यातले खेकडे हेच मत्स्यावतारी पदार्थ मिळतात. सुके बोंबील घरी तळले की पार १०० फुटावर असलेल्या शंकराच्या देवळासमोर गोट्या खेळत असलेल्या आम्हाला त्याचा सुगंध आल्याने भुकेने कासावीस होऊन हेतुपुरस्सर बल्ल्या करुन चड्डी सावरत घरी येणे अपरिहार्य होत असे.

पुण्यामुंबईत कधी कधी ओले बोंबील वगैरे प्रकार खाल्ले आणि त्याची मौज तर क्या कहने!!!

विठ्ठलकॄपेने आखाड म्हैना चालू आहे. यंदाची गटारी बोंबलासोबत साजरी करावी म्हणतो.

- गटारकर्ण

मस्त! :)

हेतुपुरस्सर बल्ल्या करुन चड्डी सावरत घरी येणे अपरिहार्य होत असे.

हे वाक्य मस्त! :)

विठ्ठलकॄपेने आखाड म्हैना चालू आहे. यंदाची गटारी बोंबलासोबत साजरी करावी म्हणतो.

भेटुया का बोल?

तात्या.

बोंबला

सुके बोंबील घरी तळले की पार १०० फुटावर असलेल्या शंकराच्या देवळासमोर गोट्या खेळत असलेल्या आम्हाला त्याचा सुगंध आल्याने भुकेने कासावीस होऊन हेतुपुरस्सर बल्ल्या करुन चड्डी सावरत घरी येणे अपरिहार्य होत असे.

बोंबलाच्या वासाने एखाद्या मध्ये चक्क लाळ गळेपर्यंत भूक निर्माण होते तर एखाद्याला मळमळ उलट्या होउन अन्नावरची वासना उडते. घटना एकच पण दोन भिन्न व्यक्तींवर त्याचे १८० अंश आउट ऑफ् फेज परिणाम होतात. त्या व्यक्तिवरचे संस्कार हे एक महत्वाचे कारण असते, जेव्हा एखाद्याचे अन्न हे दुसर्‍याचे विष बनते त्यावेळी त्यांचे सहजीवन अशक्य बनते. पण दोन्ही गोष्टी नैसर्गिकच आहेत. उपक्रमावरील प्रतिसादातून या गोष्टी सहजपणे दिसतात. त्यामुळे विकृती हे देखिल प्रकृतीच आहे पण समाजाला मान्य नसलेली. कारण त्यामागची प्रेरणा नैसर्गीकच असते. यावर अजून काही पण नंतर....
प्रकाश घाटपांडे

विकॄती/प्रकृती

खरे आहे. बोंबलामुळे अन्नावरची वासना उडणे ही विकृती रुपी प्रकृती समाजाला मान्य नाही हे पाहून वाईट वाटले. ;)

चुकीचे?

बोंबलामुळे अन्नावरची वासना उडणे ही विकृती रुपी प्रकृती समाजाला मान्य नाही हे पाहून वाईट वाटले. ;)

असे मी म्हटलेले नाही . आपण त्याचा अन्व्यार्थ मला अभिप्रेत नसलेला काढलात्.मी फक्त वस्तुस्थीती सांगितली. विकृती / प्रकृती हा परिघावरचा मुद्दा आहे,मध्यवर्ती नव्हे.( थोडक्यात आनुषंगिक्)
प्रकाश घाटपांडे

आता बोंबला

एकच गोष्ट दोन व्यक्तींना चांगली किंवा वाईट वाटू शकते. ज्याला एक जण संस्कार म्हणतो त्यालाच दुसरा विकृती म्हणतो. शेवटी दृष्टिकोन मॅटर्स. जगात चांगलं वाईट काही नसतं सगळ सापेक्ष असतं. तेव्हा कृपया आवरतं घ्या आणि बोंबलाची चर्चा चालू राहूद्या. फारतर चांगलं बोंबिल कुठं मिळतं..वाईट कुठं हे सांगावं ;-)

अभिजित...
बोंबिल देखे से जो आ जाती है मुंहपर रौनक़ |
वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है |

तात्याचे प्रायश्चित्त

ज्यांना तात्याने छळले आहे. त्यांनी तात्याला खालील प्रायश्चित्त द्यावे.
८४ लक्ष योनीतून पुढील जन्मी तात्याने बोंबील व्हावे. व या लोकांनी ( मास मच्छी न खाणार्‍या देखिल् ) बोंबील रुपी तात्याला फ्राय करून, खारवून , ग्रेव्हि घालून अजून काय काय करुन यथेच्च चापावे.
( म्हणजे उरलेल्या योनीतील जन्मासाठी तात्याल १०० % सवलत मिळून तात्या परत मनुष्य योनीत जन्माला येईल)
प्रकाश घाटपांडे

सही है भिडू...:)

ज्यांना तात्याने छळले आहे. त्यांनी तात्याला खालील प्रायश्चित्त द्यावे.
८४ लक्ष योनीतून पुढील जन्मी तात्याने बोंबील व्हावे. व या लोकांनी ( मास मच्छी न खाणार्‍या देखिल् ) बोंबील रुपी तात्याला फ्राय करून, खारवून , ग्रेव्हि घालून अजून काय काय करुन यथेच्च चापावे.
( म्हणजे उरलेल्या योनीतील जन्मासाठी तात्याल १०० % सवलत मिळून तात्या परत मनुष्य योनीत जन्माला येईल)

सही है भिडू...:)

घाटपांडेसाहेब, तुमची कल्पना भन्नाट आहे...

तात्या.

करा फ्राय :-)

बोंबीलरुपी तात्या

उत्तम कलाकृती..

आपल्या उत्तम कलाकृती, कारागिरीचे कौतुक वाटते! :)

आपला,
(बोंबिलरुपी) तात्या.

त्यांचा

तात्यांना
बोबील १ महीना बंद करा ते तुमचे सगळे काही मान्य करतील!
तात्या इकडे लगेच निमुटपणे!

(आता कळलं? तात्या भांडाफोड करायचा ट्राय करतायेत! :) )

मजकूर संपादित. सदस्यांवर टिप्पणी करणारा मजकूर संपादित केला आहे.

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र)

दासगाव

आरं तात्या लय भारी विषय काढला बाबा तू !

कोकणामध्येच बोंबिल घ्यायचं असल्यास ( होलसेलमध्ये) आपली पसंती दासगावला असते. इथं लागलं तेवढ्या व्हरायटी मंदी बोंबिल आन सुकी मासळी मिळत्ये. महाड तालुक्‍यातील दासगाव येथे दर शनिवारी भरणारा आठवडा बाजारात दिवसाला 5 ते 10 लाख रुपयांची सुक्‍या मासळीची उलाढाल होते. दासगावचा हा बाजार सुक्‍या मासळीचा बाजार म्हणून ओळखला जातो. कोकणातील प्रमुख व्यापारी केंद्र व बंदर म्हणून दासगावची ओळख इतिहासात आहे. सागरी मार्गाने होणारी माल वाहतूक व देवाणघेवाण याच बंदरावर होत असे. परदेशी आयात-निर्यातीचा व्यापार तसेच घाट माथ्यावरील व्यापार येथून चालत असे. पूर्वी मालाला येण्या-जाण्यामुळे येथे व्यापाराची सुरुवात झाली. दासगाव हे तालुक्‍यातील लहान गाव आहे. बदलत्या काळानुसार रस्ते वाहतूक व माल वाहतुकीची अन्य साधने उपलब्ध झाल्याने येथील व्यापार ठप्प झाला; परंतु आठवडा बाजार आजही चालतो.

दासगावला मत्स्यव्यवसाय तितकासा नाही. परंतु येथील बाजारात येणारी सुकी मासळी श्रीवर्धन, भरडखोल, बाणकोट, अलिबाग, मुरूड, हर्णे, मुंबई परिसरातून येते. पूर्वी धान्य देऊन मासळी खरेदी केली जायची. जवळच्या धर्मशाळेत जहाजातून येणारे धान्य उतरवले जाई. महाराष्ट्राच्या बहुसंख्य ठिकाणी ही मासळी जायची. आज धान्याची जागा पैशाने घेतली आहे.

शनिवारी सकाळी बाजारात दुकाने मांडली जातात. सुक्‍या मासळीचे ट्रक येथे तयार पोहचतात. त्यातून पोती, पाट्या उतरविल्या जातात. घाऊक खरेदीसाठी मोठमोठे वजन काटे येथे तयार असतात, तर किरकोळ विक्रीसाठी सुक्‍या मासळीचा ढिग रचून दुकाने तयार होतात. सकाळपासूनच बाजारातील वर्दळ वाढते. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असतात. रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबईतून घाऊक खरेदीदारही येथे येतात. काही तासांतच घाऊक खरेदी उरकली जाते; तर दुपारी 1 वाजेपर्यंत किरकोळ बाजार सुरू होतो. या बाजारात सुकट, बोंबिल, लहान बोंबिल, वाकटी, आंबाडी, भेळ यांसारखे असंख्य प्रकार आणि सोडे उपलब्ध असतात. 40 रुपयांपासून 100 रुपये किलोपर्यंत येथे भाव असतो.

सर्वाधिक 450 रुपये किलो असा भाव सोड्यांना असतो. अलिबागहून येणारे सागर मुंडे गेले 20 वर्ष या ठिकाणी मासळी विकायला येतात. मासळीचा भाव सोन्याच्या भावाप्रमाणे बदलत असतो. मे महिन्यात सर्वाधिक मागणी व भाव असल्याचे त्यांनी सांगितले. शहरी भागात गहू, तांदूळ वर्षभरासाठी जसा भरून ठेवला जातो तसे ग्रामीण व शहरी भागातही सुकी मासळी वर्षभरासाठी भरून ठेवली जाते. घाऊक व किरकोळ विक्रीचा विचार केला तर दर शनिवारी या बाजारात 5 लाख रुपयांच्या पुढे उलाढाल होते.

मे महिन्यात ही उलाढाल तब्बल दहा लाख रुपयांपर्यंत जाते. महाड, माणगाव, गोरेगाव, म्हसळा व इतर जिल्ह्यांतून घाऊन व्यापारी येथे मोठी खरेदी करतात. दासगाव बंदर आता इतिहास जमा झाले आहे. येथून पूर्वीप्रमाणे कोणताही व्यापर चालत नाही. आजूबाजूचे तालुके विकसित झाले आहेत. स्थानिक मत्स्यव्यवसायही कमी झाला आहे. तरीही वर्षानुवर्ष परंपरा असणारा हा बाजार आजही लाखो रुपयांची उलाढाल करत टिकून आहे.

तात्याच्या रक्षणा, घेतसे अवतार । वाहण्या त्याचा भार "नेटा'वरी ।। जेव्हा केव्हा संकट,येतसे धाऊन। आवरी तात्याला विसोबाचं खेचर ।।

वा !

माहिती पूर्ण प्रतिसाद ! आवडला !

आज बर्याच दिवसांनी आलो. आपले नाव पाहून आधी गोंधळलोच. एक विभक्ती प्रत्यय काय काय मजा घडवतो पाहा. नाव बाकी मस्त आहे :)

आता तात्या तुम्हाला खेचरशेठ म्हणणार की काय ?! (ह.घ्या:) (हा व्यक्तिगत प्रतिसाद असल्याने नरकात जाणार खास !)

--लिखाळ.

जय स्वावलंबन ! कष्ट करा ... कष्ट करा !

म्म् !

तात्या,
ज्या काळी मी मासे (थोडे फार) खायचो त्यावेळी मला झिंगे (म्हणजे प्रॉन्स ना !) आवडायचे. एकदा मालवण ला गेलो असताना बांगडा खाल्ला होता. तो फारच आवडला होता. हरिहरेश्वरला गेलो असताना शिंपल्यातले प्राणी खाल्ले होते. त्यांचे नाव आठवत नाही पण चिंबोळ्या की कायसे से होते :).

माझ्या केरळी मित्राने माशाचे लोणचे खायला दिले होते. ते अफलातून सुंदर होते हे आठवते.

बाकी चर्चा प्रस्ताव मस्तच. बोंबील हा पदार्थ कोणाला आवडत असेल असे मला कधी वाटलेच नव्हते. तो इतक्या सर्वांना आवडतो हे वाचून नवल वाटले. त्यामुळे हे वाक्य हळूच लिहित आहे :)
--लिखाळ.

जय स्वावलंबन ! कष्ट करा ... कष्ट करा !

त्याला पाहिजे

बोंबील हा पदार्थ कोणाला आवडत असेल असे मला कधी वाटलेच नव्हते. तो इतक्या सर्वांना आवडतो हे वाचून नवल वाटले.

काय आहे की बोंबील सर्वांना आवडतोच असे नाही कारण त्याला पाहिजे xxx!!! (आठवा प्रसिद्ध म्हण!)

त्याला पाहिजे ...

जातीचे!!

अभिजित...
उनके देखे से जो आ जाती है मुंहपर रौनक़ |
वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है |

अजून एक

काय आहे की बोंबील सर्वांना आवडतोच असे नाही कारण त्याला पाहिजे xxx!!! (आठवा प्रसिद्ध म्हण!)

गाढवाला गुळाची चव काय?
प्रकाश घाटपांडे

तिसर्‍या..

हरिहरेश्वरला गेलो असताना शिंपल्यातले प्राणी खाल्ले होते. त्यांचे नाव आठवत नाही पण चिंबोळ्या की कायसे से होते :).

लिखाळराव, त्याला 'तिसर्‍या' असे म्हणतात. तिसर्‍यांचं बरं दबदबीत कालवण छानच लागतं. चिंबोर्‍या म्हणजे खेकडे. याला 'कुर्ल्या' असेही म्हणतात.

आपला,
(तिसर्‍याप्रेमी) तात्या.

सुकायला घातलेले बोंबील

हा फोटो गुंडोपंतांच्या खरडवहीतून (त्यांची परवानगी न घेता) चोरला.

हा हा हा!

फोटोच
काय सगळे बोंबील न सांगता नेलेस तरी चालतील!!! :)

गुंडोपंत

आयला! :)

कोळीण बाकी स्मार्ट आहे अन् झकास दिसत्ये! :)

आपण तर साला फोटो पाहूनच हिच्या प्रेमात पडलो आहे! :)

आपला,
तात्या वेसावकर.

सुकायला घातलेले बोंबील

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
वा! श्री.तात्या यांच्या चर्चा प्रस्तावाची शान वाढवणारा अगदी समर्पक फोटो . प्रियाली यांनी नेमका हेरला (कदाचित् चित्रातल्या बोंबिलांचा सुद्धा त्यांना वास येत असावा.) आणि इथे घातला.

बोंबीलस्तवन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.तात्या आणि प्रियाली यांनी केलेले बोंबिलस्तवन वस्तुनिष्ठ नाही. ते आत्मनिष्ठ आहे. त्यांची ती वैयक्तिक आवड आहे.त्यामुळे त्या माशाविषयी किती लिहू आणि किती नको असे त्यांना झाले आहे.शंभर मासेखाऊ माणसांना विचारले तर त्यांतील वीस जण सुद्धा " बोंबील मला फार आवडतो" असे म्हणणार नाहीत. त्याला ना चव ना ढव. काहीच नसले तर आपला तोंडी लावायला ठीक आहे!
......कोकणात आमच्या घरी अनेक प्रकारचे मासे असत.त्यांत अधिक करून बांगडे, पेडवे,सौंदाळे, दोडखारे,इणगां,तिसर्-या,खुबे, सुंगटे(कोळंबी) इत्यादि.. कारण ते मासे स्वस्त. पापलेट, सरंगा, इस्वण (सुरमय. मत्स्यनामे स्थलपरत्वे भिन्न भिन्न असतात.) इ. मोठे मासे क्वचित . कारण ते महाग.
.....पण बोंबील मासा आमच्या घरी कधी केलाच नाही. कारण मालवण, वेंगुर्ले, शिरोडे या किनारपट्टीवर तो मिळतच नाही.( किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळत नसावा.उत्तर कोकणात मिळतो.) ताजे बोंबील खाल्ले ते पुण्यात आल्यावर. पण मुळीच आवडले नाहीत.सुका बोंबील तर अजून उष्टावलेला नाही. श्री.तात्या आणि प्रियाली यांनी केलेले रसभरित वर्णन वाचले तरी बोंबील खायची इच्छा होत नाही.किंबहुना सुका बोंबील भाजल्यावर येणार्‍या वासाविषयींची माझी प्रतिक्रिया ही श्री. प्रकाश घाटपांडे यांव्या प्रतिक्रिये सारखीच आहे.

....आणि उपक्रमाच्या दरबारात तात्याखानने विडा उचलला! :)

त्यामुळे त्या माशाविषयी किती लिहू आणि किती नको असे त्यांना झाले आहे

हे खरं आहे..

शंभर मासेखाऊ माणसांना विचारले तर त्यांतील वीस जण सुद्धा " बोंबील मला फार आवडतो" असे म्हणणार नाहीत. त्याला ना चव ना ढव. काहीच नसले तर आपला तोंडी लावायला ठीक आहे!

वालावलकरशेठचा धिक्कार असो. वालावलकरशेठ, यापुढे तुमचं आमचं जमणार नाय! च्यामारी आमच्या बोंबलाला नावं ठेवता काय? अरे कुठे फेडाल ही पापं? :)

वालावलकरशेठ, यापुढे तुमची आमची कट्टी-फू...:)

ताजे बोंबील खाल्ले ते पुण्यात आल्यावर. पण मुळीच आवडले नाहीत.
श्री.तात्या आणि प्रियाली यांनी केलेले रसभरित वर्णन वाचले तरी बोंबील खायची इच्छा होत नाही.

बस! विजापूरच्या दरबारात अफजलखानाने जसा थोरल्या आबासाहेबांना पकडायचा विडा उचलला होता, तसाच विडा आज हा अफजलतात्या अभ्यंकरखान उपक्रमाच्या दरबारात उचलत आहे! :) नाही तुम्हाला उत्तम बोंबिल करून खाऊ घातले आणि आवडायला लावले तरच प्रियाली-उल-मुखद्दिरात ला तोंड दाखवू! :)

(विजापूरच्या दरबारात 'ताज-उल-मुखद्दिरात' नावाची स्त्री होती. इथे आम्ही आमची मैत्रिण प्रियाली हिला 'प्रियाली-उल-मुखदिरात' केले आहे! :)

वालावलकरशेठ, आपण एकदा मुद्दामून केव्हातरी ठरवून आमच्या घरी या. आम्ही स्वतः आमच्या हाताने बोंबलाची उत्तम पाककृती करून आपल्याला खायला देऊ. आम्हाला खात्री आहे की आमच्या हातचे बोंबिल आपल्याला नक्की आवडतील!

'आम्ही तात्याच्या हातचे बोंबिल खाल्ले आणि धन्य झालो! धन्य ते बोंबिल आणि धन्य तो तात्या!' असं तुम्हीच उद्या लोकांना सांगत फिराल!! :)

अफजलतात्या अभ्यंकर खान प्रचंड फौजेनिशी निघत आहे. लवकरच भेटीची वेळ ठरवा!! :)

अवांतर - वरील संपूर्ण प्रतिसाद कृपया 'ह घ्या' या सदरात गृहीत धरावा. वालावलकरशेठच्या बोंबलासंदर्भातील वैयक्तिक आवडीनिवडीचा आम्ही आदर करतो...

आपला,
अफजलतात्या अभ्यंकरखान!

अमंळ सावध

अफजलतात्या अभ्यंकर खान प्रचंड फौजेनिशी निघत आहे. लवकरच भेटीची वेळ ठरवा!! :)

तात्या त्या फौजेचे आणि "साक्षात खानाचे" काय झाले ते लक्षात ठेवा. नाहीतर वालावलकर साहेबांच्या अंगात शिवाजी आला तर या खानाचाच मेजवानीसाठी "खाना" होईल आणि मग आपल्याला प्रथमावतार लगेच घ्यावा लागेल...

मध्यस्ती केल्याबद्दल क्षमस्व!

मस्त! ;)

नाहीतर वालावलकर साहेबांच्या अंगात शिवाजी आला तर या खानाचाच मेजवानीसाठी "खाना" होईल आणि मग आपल्याला प्रथमावतार लगेच घ्यावा लागेल...

:))

काटा

आम्ही स्वतः आमच्या हाताने बोंबलाची उत्तम पाककृती करून आपल्याला खायला देऊ. आम्हाला खात्री आहे की आमच्या हातचे बोंबिल आपल्याला नक्की आवडतील!

वा तात्या, 'काटा' काढावा तर असा :)
[कृ. ह. घ्या.]

विकास आणि नंदन यांच्याशी सहमत

वा! वा! तात्याखान आपले छोटे"खानी" भाषण आवडले.

आणि विकास आणि नंदन या दोघांचे प्रतिसादही.

मुंबई आणि ठाणे जिल्हा सोडला तर बोंबिल विशेष आवडत नाहीत असा अनुभव खुद्द कुटुंबातच आहे. त्यामुळे यनांना ते आवडत नसतील तर वावगे नाही पण त्यांना खास मुंबई-ठाण्याचे फडफडीत बोंबिल खायला घालायला हवेतच हवेत. :)

बाकी, मला अमेरिकेत बसून बोंबलाची चव आणि वास आठवून 'गेले ते दिवस' असे हळहळून म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही.

अवांतरः अभ्यंकरखान असे वाचून जंजीरच्या 'विजयखान' असे म्हणाणार्‍या प्राणची आठवण झाली.
ताज-उल-मुखदिरातचा अर्थ काय असावा?

खाली यना म्हणतात तसे,

काटा न लागता कर्लीचा तुकडा खाणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.

हे मात्र खरे, कर्लीची चव वेगळीच. बोंबलाचे काटेही चावून खावेत. आमचे कोकणातले नातेवाईकही 'काय हा लिबलिबीत मासा' असे बोंबलाचे "कौतुक" करतात पण घरात मुंबई-वसईचे बहुमत पडते.

माहीत नाही..

ताज-उल-मुखदिरातचा अर्थ काय असावा?

अर्थ माहीत नाही. पण अफजलखानाने जेव्हा भर दरबारात विडा उचलला होता तेव्हा ह्याच बयेच्या हातात सारा कारभार होता. (संदर्भ - बाबासाहेब पुरंदर्‍यांचं 'राजा शिवछत्रपती')

आणि मुखदिरात नव्हे, मुखद्दिरात.

--तात्या.

हं!हं!

अफजलखानाने जेव्हा भर दरबारात विडा उचलला होता तेव्हा ह्याच बयेच्या हातात सारा कारभार होता.

आली लक्षात. :)

(बडी बी) प्रियाली.

कल्पना

बाकी, मला अमेरिकेत बसून बोंबलाची चव आणि वास आठवून 'गेले ते दिवस' असे हळहळून म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही.

प्रियालीच्या मुखातून "लौळ्यरस" पाझरतो आहे . अशी कल्पना मी मनातल्या मनात करुन बघितली.

प्रकाश घाटपांडे

विडा उचलला

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी

|
***********************************
बोंबील माशाची निंदा श्री. तात्यांना कदापि सहन होणार नाही, ते खपवूनच घेणार नाहीत, याची कल्पना होती. त्यामुळे त्यांचा हा हल्ला अनपेक्षित नव्हता.लेखनाच्या बाबतीत तर तात्या सिद्धहस्तच आहेत. त्यांना कधी काय कल्पना सुचतील सांगता यायचे नाही.
....आमच्या कुडाळ सावंतवाडी भागात हा मासा मिळतच नाही. लहानपणी खाल्ला असता तर तर कदाचित् चटक लागली असती. तसा कोणताच मासा मला वर्ज्य नाही. मोरी(लहान शार्क) मासा पण खाल्ला आहे.आवडला नाही. त्याला उग्र हिमूस वास येतो.
..... माझा असा एक समज झाला आहे की माशात जेवढे काटे अधिक तेवढा तो अधिक चवीचा.पेडवे, कर्ली, हे खूप काट्यांचे मासे अधिक चविष्ट असतात. त्या मानाने सुरमयी फिकी.( काटा न लागता कर्लीचा तुकडा खाणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.) बोंबिल माशात तर काटा दिसतच नाही. असतो तो अगदी मऊ. चावून खावा असा. म्हणून त्या माशाला फारशी चव नसावी असा माझा ग्रह झाला आहे. आता श्री.तात्यांच्या हातचा खायचा कधी योग येईल तेव्हाच तो ग्रह दूर होऊ शकेल

नक्की..

बोंबील माशाची निंदा श्री. तात्यांना कदापि सहन होणार नाही, ते खपवूनच घेणार नाहीत, याची कल्पना होती.

वालावलकरसाहेब, या जगात मिसळ, बोंबिल, यांसारख्या काही गोष्टी अश्या आहेत की त्याकरता हा तात्या जिवात जीव असेपर्यंत लढेल आणि वेळप्रसंगी धारातिर्थीही पडेल! :)

मोरी(लहान शार्क) मासा पण खाल्ला आहे.आवडला नाही. त्याला उग्र हिमूस वास येतो.

खरं आहे. मोरी मलाही इतकी आवडत नाही..

..... माझा असा एक समज झाला आहे की माशात जेवढे काटे अधिक तेवढा तो अधिक चवीचा.पेडवे, कर्ली, हे खूप काट्यांचे मासे अधिक चविष्ट असतात.

अगदी खरं. लहनग्या अन् काटेरी माश्यांनाच अधिक चव असते हे खरं आहे.. पण.. बोंबिल तो बोंबिल! :)

आता श्री.तात्यांच्या हातचा खायचा कधी योग येईल तेव्हाच तो ग्रह दूर होऊ शकेल

नक्की..

--तात्या.

सुशी

मोरी(लहान शार्क) मासा पण खाल्ला आहे.आवडला नाही. त्याला उग्र हिमूस वास येतो.

विषयांतर होईल, पण कधी सुशी खाल्ली आहे का? कच्चे मासे खाण्याची जपानी पद्धत ; यात एकदा ऑक्टोपस (छोटासा) मिळाला होता. ते खाल्ल्यावर "इन्सान छोड के कुछ भी खा सकोगे" असे ऐकायला मिळाले होते...

सहमत

आयुष्यात सुशी प्रथमच खायला सुरुवात करणार्‍यास तोंडओळख म्हणून ठीक आहे, पण नंतरनंतर कंटाळा येतो

सुशी दिसायला मला पानाच्या विड्याप्रमाणे वाटते. रंगीबेरंगी दिसते म्हणून मोठ्या अपेक्षेने खाऊन पाहिली होती. तोंडओळख म्हणून ठीक पण फार काही आवडत नाही. त्यापेक्षा मसल्स, ऑयस्टर्स, स्नोक्रॅब, क्रॉ-फिश इ. इ. ला पसंती

कल्टिव्हेटेड टेस्ट

सुशीमध्ये कायकाय खाऊन पाहिले?

तोंडओळख झाल्यावर गेल्या बर्‍याच वर्षांत काहीच खाल्ले नाही. ;-)

माझ्या मते ही कल्टिव्हेटेड टेस्ट असावी

शक्य आहे. पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहायला हरकत नाही.

चव

आमच्याकडे (बॉस्टन) एका दुकानात पाणिपुरी सारखी देतात (एका मागोमाग एक). पण मी काही फार "सुशीवादी "होवू शकलो नाही त्यामुळे हे काही वर्षांपुर्वींचे सांगतोय. अजून ते दुकान आहे का ते माहीत नाही. वर टग्या रावांनी म्हणल्याप्रमाणे रबराचा तुकडा खाल्ल्यासारखे वाटते...

जर मसालेदार चव हवीच असेल तर भारतीय सोडून मला वाटते थाय मासे करणे आवडू शकते..

सुशी

सुशी ची टेस्ट अक्वायर्डच असावी.. ..(आमच्या टेस्ट बड्स ना बापू काण्यांच्या सुशीचा झुणकाच ऑक्टोपस आणि ट्युना सुशी पेक्षा जास्त आवडणार!!) एक दोनदाच खाल्ला फारसा आवडला नाही.. पण इथले खवय्ये मात्र आगदी तात्या ज्या आवडिने बोंबील खातात त्या आवडीने सुशी खाताना पाहिले आहेत. जपान्यांच्या 'किबाची' ह्या स्टेक प्रकाराविषयी मात्र ऐकुनच आहे.. तो तसा मसालेदार (सुशी च्या तुलनेत) असतो म्हणे.. कुणी ट्राय केला आहे का?

वाव्वा!!! जपानी रेस्टॉरंट्स आणि खुलवणारे आचारी

अनेक गिर्‍हाइके (एकाच गटातली असली पाहिजेत असे बंधन नाही) आचार्‍यासमोर ग्रिलभोवती कोंडाळे करून बसतात. आचारी सर्वांच्या ऑर्डरी घेतो आणि ग्रिलवरच वेगवेगळ्या भागांत फ्राइड राइस आणि ऑर्डरीप्रमाणे कोळंबी, चिकनचे तुकडे, बीफचे तुकडे किंवा भाज्या यांपैकी गिर्‍हाइकांनी जे जे काही ऑर्डर केले आहे ते सोयसॉस-बेस्ड सॉसमध्ये शिजवतो.

वाव्वा!! अगदी माझ्या आवडीचा प्रकार. बेहद्द खूश आहे मी या आचार्‍यासमोर बसून खाण्याच्या प्रकारावर. जपानी रेस्टॉरंट्समध्ये हे आढळते. यात तुम्हाला ग्रीलसमोर बसवून आचार्‍याला पाचारण केले जाते आणि त्याच्याशी तुमची रीतसर ओळख करून दिली जाते. यानंतर आचारी ऑर्डर घेतो आणि सर्व साहित्य घेऊन हजर होतो आणि त्याचा खास "शो" सुरु होतो. ऐटीत सटासटा भाज्या कापणे, तेल-सॉसची धार तापत्या तव्यावर सोडणे, मांस - मासे, भाज्या, भात, न्यूडल्स त्यावर संगीताच्या लयीत परतणे आणि हे करताना गिर्‍हाईकांशी अखंड बडबड. चमचे हवेत उडवणे आणि झेलणे, आग काढणे इ. इ. बोनस.

विशेषतः गिर्‍हाइकांच्या गटात स्त्रिया असल्या तर तो अधिकच खुलतो आणि आगबीग काढून दाखवतो.

काय निरीक्षण आहे!! गेल्यावेळेस दोन तरूण मुली आमच्याबरोबर बसल्या होत्या. आचारी महाशय पाघळले होते आणि पोरी वैतागल्या होत्या.

हा हा

"इन्सान छोडके म्हणाला" - पण माणूस नाही पण "माणसांची डोकी खाऊ शकतो" ह्याची कल्पना होती! (कधी कधी नुसतीच पोकळी जाणवते तो भाग सोडा!)

 
^ वर