बोंबिल! एक पूर्वजन्मीची पुण्याई...

राम राम मंडळी,

'बोंबिल' या मत्स्यप्रकाराविषयी थोडी माहिती हवी आहे म्हणून हा चर्चाप्रस्ताव मांडत आहे.

व्यक्तिशः बोलायचे झाले तर 'बोंबिल' हा माझा अत्यंत म्हणजे अत्यंत म्हणजे अत्यंत आवडता मासा आहे. ८४ लक्ष योनींच्या फेर्‍यानंतर मनुष्यजन्म मिळतो असे म्हणतात! या मनुष्यजन्मात बोंबिल खायला मिळणे हे त्या ८४ लक्ष योनींच्या फेर्‍यातील केलेल्या पुण्याईचे फळ आहे असे मी मानतो! :)

पूर्वजन्मीची जब्बर पुण्याईच म्हणा ना!

असो..

ओल्या बोंबलाची कोकणी आमटी, बोंबिल फ्राय किंवा तळलेले बोंबिल हे चवीला खासच लागतात! आमच्या कोकणात सुक्या बोंबलाला राख फासून त्याला चुलीवर भाजतात आणि 'बोंबलाचे भुजणे' करतात. (अवांतर - तसेच भुजणे सुक्या बांगड्याचेही करतात तेदेखील चवीला अतिशय सुरेख लागते!)

पाट्याखालचे बोंबिल - ओल्या बोंबलाच्या पाककृतीतली ही एक विशेष पद्धती आहे. बाजारातून बोंबिल आणले की ते पाट्याखाली दाबून ठेवले जातात. पाट्याच्या वजनाने बोंबलात असलेले अतिरिक्त पाणी निघून जाते व असे पाट्याखालून काढलेले बोंबिल अगदी छान कुरकुरीत फ्राय होतात आणि चवीला फारच सुरेख लागतात!

तर मंडळी, एकंदरीतच बोंबिल हा मत्स्यप्रकार अतिशय लोकप्रिय असून चवीला फारच सुरेख लागतो. मद्यासोबतही तळलेले बोंबिल खायची प्रथा बर्‍याच ठिकाणी आढळते! :)

काही प्रश्न - (माहीतगार, चोखंदळ, रसिक, व खाण्यापिण्याचा षौक असलेल्या वाचकांनी कृपया उत्तरे द्यावीत)

१) याला 'बॉम्बे डक' असे का म्हणतात?
२) हा फक्त मुंबईच्याच समुद्रकिनार्‍यावर मिळतो म्हणून याला बॉम्बे डक असे म्हणत असावेत का? परंतु हा मासा तर कोकणात देखील मिळतो.
३) याला 'डक' असे का म्हणत असावेत? याचा आणि 'डक'चा संबंध काय?
४) जगात इतरत्र कुठे हा मासा मिळतो का? (तेथील लोकल समुद्रात?)

बोंबलाबद्दल अजून कुणाला काही विशेष माहिती द्यावयाची झाल्यास येथे अवश्य द्यावी.

तसे पाहता पापलेट, सुरमई, हलवा (याला आमच्या कोकणात आणि गोव्यात काही ठिकाणी काळापापलेट असेही म्हणतात), रावस, कोलंबी हे अतिशय लोकप्रिय मासे. परंतु आम्ही कोकणवासी या माश्यांऐवजी पेडवे, मुडदुशा, कर्ली, मांदेली, गाबोळी, इत्यादी मच्छी अधिक प्रेमाने खातो. या प्रकारच्या मासळीबदल जर कुणाला काही अधिक माहिती द्यावयाची असल्यास येथे अवश्य द्यावी.

अवांतर - मला जर मरताना यमाने विचारलंन की तात्या तुझी शेवटची इच्छा काय आहे तर मी त्याला एवढंच सांगेन की बाबारे जरा थांब. मार्केटात जातो आणि आमच्या साधनेकडून उत्तम बोंबिल आणतो. आपण दोघेही घोट घोट उंची मद्यासोबत ते तळलेले बोंबिल खाऊ आणि मग मला या इहलोकातून कुठे न्यायचा तिथे खुश्शाल ने बाबा! :)

असो,

आपला,
(साधना कोळणीचा शिष्य) बोंबिलप्रेमी तात्या.

लेखनविषय: दुवे:

Comments

सुशी

मोरी(लहान शार्क) मासा पण खाल्ला आहे.आवडला नाही. त्याला उग्र हिमूस वास येतो.

विषयांतर होईल, पण कधी सुशी खाल्ली आहे का? कच्चे मासे खाण्याची जपानी पद्धत ; यात एकदा ऑक्टोपस (छोटासा) मिळाला होता. ते खाल्ल्यावर "इन्सान छोड के कुछ भी खा सकोगे" असे ऐकायला मिळाले होते...

 
^ वर