विदेशात भारताचा पहिला लष्करी तळ
विदेशात भारताचा पहिला लष्करी तळ
[ Tuesday, July 17, 2007 10:47:17 am]
नवी दिल्ली
म. टा. ऑनलाइन प्रतिनिधी
शांततेत आणि कोणताही गाजावाजा न करता भारताने ताजिकिस्तान येथील हवाईतळावर एमआय-१७ हेलिकॉप्टरचा किमान एक ताफा तैनात करण्याची तयारी केली आहे. विदेशी भूमीवर अशाप्रकारचा भारताचा हा पहिला लष्करी तळ असणार आहे. या तळामुळे उर्जा संपन्न मध्य आशियात सामरिक जाळे प्रस्थापित होणार आहे.
ताजिकिस्तानच्या पायलट एका तुकडीला प्रशिक्षण देण्यासाठी तात्काळ एमआय-१७ हेलिकॉप्टर तसेच काही 'किरण' शिकाऊ विमान तैनात करण्यात येणार आहे. या हवाईतळावर ही सुविधा देण्यासाठी या वर्षाचा डिसेंबर महिना उजाडेल. मध्य आशियात मोठ्या प्रमाणात सामरिक छाप सोडण्याच्या दृष्टीने ही केवळ सुरुवात असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
वाढती उर्जा मागणी पाहता भारताची या हवाईतळावर मिग-२९ लढाऊ विमानेही तैनात करण्याचे उद्दिष्ट आहे.
Comments
म्हणजे नक्की काय साध्य झाले किंवा होणार आहे?
म्हणजे नक्की काय साध्य झाले किंवा होणार आहे? जरा कोणी समजावुन सांगेल काय, आम्हाला ह्यातले काही कळत नाही.
अवांतर
ताजिकिस्तानला सगळ्यांबरोबर चांगले संबंध हवे आहेत. अमेरिकेला तळ दिला तर रशिया, चीन नाराज. रशिया अथवा चीन ला दिला तर अमेरिका युरोप नाराज. प्रादेशिक समतोल न बिघडता स्वस्तात, मुख्य म्हणजे पुढ जास्त डोईजड न होता, कोण बरे हे काम करेल. :-) ए पांडू जरा ईकडे ये
आता ही हेलिकॉप्टर तिकडे गेली की ईकडे नविन घेतली पाहिजे. बहुतेक "अमेरिका युरोप "च्या संबधित कंपनीला हे कंत्राट देण्यात येईल.
मग नंतर
>>वाढती उर्जा मागणी पाहता भारताची या हवाईतळावर मिग-२९ लढाऊ विमानेही तैनात करण्याचे उद्दिष्ट आहे. रशियाला पण कंत्राट .......
पण काही म्हणा शॉपिंगला (खरेदीला) मजा येते किनई! कंत्राटदार , दुकानदार खुप छान सौदे देतात. Superb Deals, Solid discount and freebies हो.
ग्लोबलायजेशन सगळ्यांच्या हिताचे आहे किनई!
असो अमेरिकेच्या मनात आले अन आपली वर्णी लागली ( चान्स मिळाला) . आता मात्र भारताने मिळालेल्या संधीचा योग्य वापर केला पाहीजे.
पाकिस्तान
पाकिस्तानवर दबाव टाकायला बरं पडेल..
अभिजित
चला , हे उत्तम होते आहे.
भारताबाहेर भारताला कुठलाच लष्करी तळ आजतागायत उभारता आलेला नव्हता. या दिशेने भारत काही पावलं उचलतोय हे पाहून बरे वाटले.
खरं तर भारताच्या हितासाठी किंवा जागतीक पातळीवर भारताच्या बाजूने हमखास मत देतील अश्ये किती मित्र भारताने मिळवले आहेत हा संशोधनाचा विषय आहे. कुठल्याही बाबतीत आपल्याला जागतीक पाठींबा हवा असल्यास आपल्याला सगळ्या जगात शोध घेत फिरावा लागतो. कुणी समर्थन देता का समर्थन ?
आपल्या जमिनीवर लष्करी तळ उभारू देने ही तर फार मोठी बाब पण संयुक्त राष्ट्रात एखाद्या मुद्द्यावर समर्थन मिळवायला सुध्दा भारताला खुप कष्ट पडतात.
याला कारण .. भारताची परराष्ट्र धोरण . काही लोक तर इतपत बोलतात की भारताला परराष्ट्र धोरणच नाही. जी काही असते ती तात्कालीक प्रतिक्रिया असते.
याचे प्रत्यंतर आपल्याला काही दिवसांपुर्वी आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेल्या घोषणेत दिसेल. मध्य आफ्रिकेच्या देशांत चीनचा प्रभाव वाढतोय म्हणून आता भारताने मध्य आफ्रिकेला प्राधान्यक्रम देण्याचे ठरवले आहे. या आधी आम्ही झोपा काढल्या असाव्या किंवा चीन चे प्राध्यान्यक्रम हेच आमचे प्राधान्यक्रम असावेत अशी तरी भारताची नीती असावी.
नुकत्याच झालेल्या विश्व हिंदी संमेलनाला बान की मुन (सं रा म चे महासचीव ) आलेले होते. त्यांनी आपल्या हिंदी अनुभवाबद्दल सांगीतले. आणि आमच्या हिंदी प्रेमाला भरते आले. आमच्या एका अधिकर्याचे मत नव्याने असे आले की हिंदी ही संयुक्त राष्ट्राची कामकाजाची भाषा बनायला हवी. त्यासाठी जागतीक पाठबळ मिळवण्यासाठी काही काळ जाईल. गेल्या पन्नास वर्षांत आपण या काही काळातच आहोत.
आज आपली आर्थीक परिस्थीती चांगली आहे. आता तरी भारताने एका निश्चित धोरणाने जगात पावले टाकायला हवीत. आपला मित्र गट आणि दबावगट बनवायला हवा. जगात अमेरिका आणि चीन हे दोन्ही देश भारताला शक्तीकेंद्र बनवण्यापासून रोखतील आणि भारत सदैव आपल्यासोबत रहावा म्हणून प्रयत्न करतील.
या परिस्थीतीचा फायदा घेता यायला हवा .
नीलकांत
परराष्ट्र धोरण
भारतीय परराष्ट्र धोरण विस्कळीत आहे हे खरेच. विशेषतः या सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाची दुरवस्था झाली आहे. नव्या फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी विरोधी पक्षातील कर्तबगार लोकांना महत्त्वाच्या पदावर नेमण्याची प्रथा सुरू केली आहे. (यामागे राजकीय खेळी असल्याची टीका होत आहे खरी) अश्याप्रकारे महत्त्वाची खाती/जबाबदार्यांवर माणसे नेमताना पक्षीय राजकारण बाजूला ठेवले तर किती चांगले होईल ('पदा'साठी असलेली रस्सीखेच पाहता हे प्रत्यक्षात येणे अशक्यप्राय आहे असे वाटते.)
बाकी ताजिकिस्तानमधील तळ भारताच्या जगात वाढत्या महत्त्वाचे निदर्शक आहे.
परराष्ट्र धोरण
काहिसे इथल्या लेखन धोरणा सारखेच ;-) ह. घ्या.
ह. का?
ही गोष्ट गांभीर्याने घेण्यासारखी आहे.
परराष्ट्र धोरण
भारतीय परराष्ट्र धोरणात काही बदल करणे आपल्याला शक्य नसले तरी इथे असलेले धोरण आणखी चांगले बनवण्यासाठी आपल्या सूचना, सल्ले तुम्ही उपक्रम व्यवस्थापनाकडे अवश्य पाठवू शकता. गं. घ्या. :)
असो. भारताचे परराष्ट्र धोरण आणि ताजिकिस्तानमध्ये नव्याने उभारलेला तळ याविषयी काय म्हणता येईल?
सकाळच्या बातमीवरून..
विशेषतः या सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाची दुरवस्था झाली आहे.
२००२ मध्ये ताजिकीस्तानबरोबर केलेल्या संरक्षण सहकार्य करारानुसार हा तळ निर्माण करण्यात आला आहे. (सकाळ)
याचा सरळ अर्थ असा की हा निर्णय आणि ही दृष्टी रालोआ ची होती.
विकास
लष्करी तळ
म्हणजे नेमके काय होइल? कृपया थोडे अधिक स्पष्ट कराल का?
'सामरिक जाळे' ह्या शब्दाचा अर्थ काय?
उर्जा संपन्न मध्य आशिया
सामरिक जाळे याचा अर्थ मला पण समजला नाही.
पण एकंदरीत जगभरच्या तेलाच्या साठ्यांकडे महासत्तांचे लक्ष आहे. कारण सरळ आहे आजच्या घडीला (निदान नविन तंत्रज्ञाने पूर्ण विकसीत होई पर्यंत) तेलाची गरज स्वतःचे अर्थकारण प्रबळ ठेवण्यासाठी आहे. भारताला याची समज आलेली असल्याने आणि भारत जागतीक नाही तरी प्रादेशीक महासत्ता नक्कीच झाला आहे, आणि पुढची स्वप्ने पडत आहेत. त्यामुळे योग्य दिशेने पाऊल पडत आहे. जगात कुठेही संयुक्त राष्ट्रसंघ शांतीसेना पाठवत असताना भारत पुढे असतो. भारतीय सैनीकांच्या कामगिरीबद्दल प्रगत देशाला पण विश्वास आहे म्हणूनच अमेरिकेस आपण इराक मधे जायला हवे होते.
अजून एक गोष्ट नक्की की आपल्याहून लहान देशांना आपल्याबद्दल साम्राज्यीकरणावरून संशय येत नाही आणि त्यांची जनतापण आपले स्वागत करते.
त्याला कारण आपला तसा इतिहास.
याचे एक उदाहरण आठवतयं तसे सांगतो: अफगाणीस्तानच्या युद्धात अमेरिकेस भारताने सैनीकी मदत करायची तयारी दर्शवली होती . पण पाकीस्तानच्या विरोधामुळे अमेरिकेने ती स्विकारली नाही. पण तिथले तालीबान जाऊन जेंव्हा कर्झाईचे राज्य आले, तेंव्हा पासून राजनैतीक पातळीवर आपण तिथे इस्पितळे, दवाखाने, शाळा आणि विश्वविद्यालय चालू करायला मदत करत आहोत. त्यानिमित्ताने तिथे लषक्री अधिकारीच जास्त जात आहेत् कारण तसे शिक्षन असल्याखेरीज युद्धसदृश्य परीस्थितीत नागरी लोकांना पाठवणे जास्त उचीत नसते...सामान्य अफगाण आपण तिथे गेलो म्हणून खूश आहे आणि आपल्या लोकांचे स्वागत करतो. तालीबानी विकृती तिथून गेल्यावर लोकं परत मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहू शकू लागले पण ते हॉलीवूडचे नसून बॉलीवूडचे आहेत...
थोडे अवांतरः
भारतीय सैन्य आणि शस्त्रबळाबद्दल माहीती हवी असल्यास भारतरक्षक चे संकेतस्थळ पहा.
शब्दाचा अर्थ
समर = युद्ध त्यावरून सामरिक हे विशेषण आले असावे. जसे, navy वरून naval. एकंदरीत लष्करी तळ असा शब्द न वापरता सरळ युद्धासंबंधी शब्द का वापरावा हे मलाही उमगले नाही. जाळे हा शब्द नेटवर्क दर्शवतो आणि हे नेटवर्क कशापद्धतीचे असावे याचीही कल्पना मलाही आली नाही.
बाकी, मध्य आशियातील समृद्ध खनिजसाठा लक्षात घेता भारताने हे उचललेले पाऊल फायद्याचे ठरो.
अवांतरः सहजच आठवले म्हणून. मध्य आशियातील दुसरा एक देश अज़रबैजा़नला हिंदूंचे एक प्राचीन देऊळ असून त्यात सतत आग जळत राहते. (भूगर्भातून येणार्या वायूंमुळे) असावे. जेम्स बाँडच्या एका चित्रपटात (द वर्ल्ड इज नॉट इनफ) मध्येही त्याचा संदर्भ होता.
आज सकाळमध्ये बातमी आली आहे
लष्करी तळ
अभिजित
उनके देखे से जो आ जाती है मुंहपर रौनक़ |
वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है |
योग्य!
असे अनेकानेक तळ व्हावेत!
यातले काही युरोपा पर्यंत भारताला पोहोचवणारे असावेत.
मात्र या साठी लागणारे प्रशासन व पुरवठाही तितकेच घट्ट असावे असे मला वाटते.
आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र)
मंत्रपुष्प
थोडेसे अवांतर होईल, पण
"जगाला आदर्श करण्याच्या" (कृण्वंतु विश्व आर्यम्) हेतूने का होईना पण प्राचीनकाळापासून आपल्या संस्कृतीत असे स्वतःच्या सीमेबाहेर जाण्याची महत्वाकांक्षा होती. मंत्रपुष्पातील शेवटच्या ओळीच बघा, (जशा आठवताहेत तशा, लेखनातील चुकांबद्दल क्षमस्व) "... अंतार्धात्, पर्राधात्, पृथीव्यही, समुद्र परीयंताया, एकराळीती, तद्धपे सश्लोको, भिगीतो मरूतस् परीवेष्टारो, मरुतस्या वसंगृहे.." याचा अर्थ आहे, (परत जसा आठवतो तसा भावार्थ ) "की आमचे साम्राज्य हे जमिनीवर, आकाशात (अंतराळात), समुद्रात आणि जेथे जेथे वारा (मरूत) जाऊ शकतो तिथपर्यंत असावे" असे आपण आरती म्हणल्यावर देवासमोर म्हणत असतो. ते देव आपल्याला देईल म्हणून नव्हे तर आपली महत्वाकांक्षा देवासाक्षी जागृत ठेवण्याच्या प्रथेमुळे असे मला वाटते. अशोकापर्यंत तसे वागलेले सम्राट होतेही. पण मग मधल्या हजार-दोन हजार वर्षात त्या वृत्तीचा लय होत गेला. आपल्यावेळे पर्यंत तर फक्त वेगेवेगळ्या ठिकाणी सूर चढवत शेवटी पायरी घसरल्यासारखे "सभासदैवती" म्हणत नंतर प्रसाद खायला लागलो.
अर्थात गेल्या दहा वर्षात काही गोष्टी बर्याच चांगल्या अर्थाने बदललेल्या आहेत. भाजप-रालोआ सरकारने जरी वरील हा आणि अणुशक्तीसंदर्भातील निर्णय घेतला असला तरी दुसर्या टोकाच्या सरकारने पण ते निर्णय बदलले नाहीत आणि सातत्य राहीले हे वरील बातमीचा मतितार्थ लक्षात घेतल्यास कळते आणि ती चांगली गोष्ट आहे.
महत्वाकांक्षा
हे योग्य की अयोग्य? आमच्या मते हे अतिशय तोग्य असून ते माणसाच्या प्रगतीचे हे लक्षण आहे..
मंत्रपुष्पातल्या ह्या ओळींप्रमाणे आजही भारताने आपले साम्राज्य विस्तारावे का? का आहे तो पसारा आधी आवरावा?
अशोकाने शेवटी सर्व गोष्टींचा त्याग करुन आपले साम्राज्य देखिल सोडून दिले हे ही विसरू नये!
हे तुमचे मत झाले
हे योग्य की अयोग्य? आमच्या मते हे अतिशय तोग्य असून ते माणसाच्या प्रगतीचे हे लक्षण आहे..
हे तुमचे मत झाले. आपली वृत्ती पाश्चिमात्य अथवा मध्यपुर्वेतील लोकांसारखी साम्राज्यवादी नव्हती. पण सामर्थ्यशाली राहाण्याची आणि तत्कालीन जगात चांगल्या गोष्टींचा प्रसार (कुठल्याही धर्माच्या नावाने नाही) करण्याची विजिगिषू वृत्ती नक्कीच होती. ज्यावेळेस या वृत्तीचा लय झाला त्याच वेळेपासून आपण परकीयांचा मार खाऊ लागलो आणि परीणामी संपूर्ण (भारतीय) समाजात अनेक अनिष्ठ प्रथा तयार करू लागलो, तामसीकता वाढीस लागली. शक, कुशाण, हुण, ग्रीक, अरब - मुसलमान, मोघल-मुसलमान, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि सरते शेवटी इंग्रज सर्व येऊन आपल्यावर राज्य करू लागले. स्वातंत्र्यानंतरही चीन कडून मार खाण्याचे तेच कारण होते. असा मार खाणे हे आपल्याला प्रगतीचे लक्षण वाटत असेल तर आपली मते भिन्न आहेत हे मान्य आहे(agree to disagree). त्या संदर्भाने जर भारत अप्रगत होत असला तर तो आमच्या सारख्या सामान्य माणसाला हवा आहे.
अशोकाने शेवटी सर्व गोष्टींचा त्याग करुन आपले साम्राज्य देखिल सोडून दिले हे ही विसरू नये!
अशोकाने साम्राज्य त्याग केला नाही पण युद्ध त्याग करून बौद्ध धर्म स्विकारला आणि नंतर साम्राज्यासाठी नाही पण बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी म्हणून इतरदेशांमधे माणसे पाठवतच राहीला - वर म्हणल्याप्रमाणे 'चांगल्या गोष्टींचा प्रसार करण्यासाठी', पण या वेळेस भारताच्या इतिहासात अपवादात्मक पणे 'धर्माच्या नावाने'. केवळ त्याच्याच काळात भारताला राष्ट्राचा म्हणून रिलीजन होता. त्याच्या आधी आणि नंतर मुस्लीम साम्राज्याचा भाग सोडल्यास रिलीजनच्या नावाने भारतात राज्य झाले नाही. त्याच्या काळात आणि नंतर बुद्ध धर्माचा अणि त्यामुळे अहींसेचा चुकीच्या अर्थाने अतिरेक झाला आणि परीणामी हळूहळु अराजकता वाढली. पुश्यमित्राचा कालावधी सोडल्यास मौर्य साम्राज्य दुर्बळ होवू लागले आणि परकीयांना ते जाणवू लागले. परीणामी ग्रीक परत आले (मिनँडर) आणि नंतर एकामागोमाग एक आक्रमणे होत राहीली. अर्थात वर म्हणल्याप्रमाणे आपल्या दृष्टीने ही प्रगतीच असावी! पण आमच्या सारख्या सामान्याच्या दृष्टीने मार खाणे ही व्यक्तिगत अथवा सामाजीक प्रगती समजली जात नाही.
गल्लत
आपल्या ह्या आधिच्या प्रतिसादात आपणा महत्वकांक्षा आणि त्यावरील मंत्र पुष्पातली टिप्पणी दिली आहेत. आपले साम्राज्य पृथ्विवर सर्वत्र पसरावे इतकेच नव्हे तर अंतराळात देखिल जावे अशी महत्वाकांक्षी वॄत्ती सध्या दिसत नाही असा खेदाचा सूर तुम्ही लावला होतात..त्यालाच आम्ही प्रगती (सिव्हिलाइज्ड) असे म्हणालो. उठसुठ साम्राज्य विस्तार करण्याचे दिवस गेले आता.. (साधं कुवेत हडप करण्याचे मनसुबे रचणारा सद्दाम पण गेला आता)
आपण ह्या सगळ्याला सोयिस्कर बगल देउन पूर्ण मुद्दा स्वसंरक्षण आणि सामर्थ्य ह्याकडे वळवला आहेत आणि त्यावर आम्ही 'मार खाणे ही प्रगती समजतो' असे अनुमान देखिल काढले आहेत.
जगाला आदर्श करण्याच्या
माझे पहीले वाक्य परत वाचा:
"जगाला आदर्श करण्याच्या" (कृण्वंतु विश्व आर्यम्) हेतूने का होईना पण प्राचीनकाळापासून आपल्या संस्कृतीत असे स्वतःच्या सीमेबाहेर जाण्याची महत्वाकांक्षा होती.
या संदर्भात माझ्या नंतरच्या ओळी होत्या. त्या अर्थाने (कृण्वंतु विश्व आर्यम्) आपल्याकडे साम्राज्य विस्तार करण्याची वृत्ती होती असे मी म्हणत होतो. पण माझ्या काही ओळी आपण विनासंदर्भ (out of context) घेतल्या आणि वर टिपण्णी केलीत. इथेच नव्हे तर आपल सूर तसा दिसतोय. कारण वर देखील आधी उपक्रम संपादकांवर केलेली चर्चेशी संदर्भ नसलेली अशीच टिका केलीत.
म्हणूनच म्हणले की माझ्याकडून मी "agree to disagree" समजून टाकले आणि या पुढे या विषयावर आपल्याला प्रतिक्रीया देण्याचे थांबवत आहे कारण उपक्रम आणि हा प्रस्ताव चर्चेसाठी आहे व्यक्तिगत वादासाठी नाही .
धन्यवाद
धन्यवाद
त्या अर्थाने (कृण्वंतु विश्व आर्यम्) आपल्याकडे साम्राज्य विस्तार करण्याची वृत्ती होती असे मी म्हणत होतो.
असे तुमचे मत झाले आणि त्यासाठी दिलेल्या मंत्र पुष्पाच्या दाखल्यात ह्याचा उल्लेख कुठेही नाही. आणि त्याउप्परही जगाला आदर्श करण्यासाठी का असेना साम्राज्य विस्तार हाच मुळात समर्थनीय आहे का?(उद्या कट्टर इस्लामीक राष्ट्रे ह्याच मुद्यावर साम्राज्य वाढवू लागली तर त्यांच्या महत्वकांक्षेचे कौतुक करायचे का? की जगाला आदर्श फक्त आपणच करू शकतो ह्या भ्रमात राहायचे?) ह्यावर उत्तर देण्याचे सोडून चर्चा सोयीस्करपणे स्वसंरक्षण आणि सामर्थ्य ह्याकडे वळवलीत ह्याचा अर्थ काय? दुसर्याच्या तोंडी आपलेच शब्द भरून वर "agree to disagree" म्हणत हात झटकणे सोपे असते हो!
आधी उपक्रम संपादकांवर केलेली चर्चेशी संदर्भ नसलेली अशीच टिका केलीत.
ही आमची तक्रार संपादकांशी सरळ आणि खाजगी संवाद (आणि अर्थातच इतर चर्चेत न करता) साधून करा! संपादक जी शिक्षा देतिल ती आम्हाला मान्य आहे!
उपक्रम आणि हा प्रस्ताव चर्चेसाठी आहे व्यक्तिगत वादासाठी नाही .
अगदी बरोबर म्हणूनच ज्यांना वाद घालणे टाळायचे आहेत त्यांनी व्यक्तिगत टिप्पण्या कमी आणि विषयाला धरून जास्त लिहावे असे आम्हाला वाटते.
धन्यवाद!!
परदेशात भारताचे तळ
(१) ज्या देशाची सत्तर टक्के जनता गरीब आहे, ते आता महाशक्ति बनायला निघाले आहे.
(२) आधी क्षेत्रीय महाशक्ति व्हा, मग पुढे पहा... (रोजच्या रोज बांग्लादेश, पाकिस्तान, नेपाळ सुद्धा तुम्हाला डोळे दाखवतो)...
(३) काळीज सश्या चे आणि तोरे सिंहाचे... म्हणे महाशक्ति (?) फ़िजी, अफ़गाणिस्तानात जोडे़ खात रहातात :)
(४) परमाणु बाम्ब हातात ठेवून सन्त होणे / दाखवणे फ़क्त अमेरिकेलाच जमते ...
उगाचच खर्च वाढवू नका (आधीच ५४५ गाढवांवर खूप होतोय)...
http://sureshchiplunkar.blogspot.com