मिठाईची तीर्थक्षेत्रे...

राम राम मंडळी,

इथे आपण आपल्या मायभूमीतील मिठाई मिळणार्‍या उत्तमोत्तम ठिकाणांचे संकलन करणार आहोत. आपली भारतीय संस्कृती ही गाण्यात आणि खाण्यात अत्यंत समृद्ध आहे. दर्जेदार, साजूक मिठाई हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक विशेषालंकार आहे. (अलिकडे कालिदासाला गाण्यात बांधल्यामुळे माझ्या संधी सुधारल्या आहेत! :)

माननीय उपक्रमशेठ, सदरचा चर्चाप्रस्ताव हा भारतात मिळणार्‍या उत्तमोत्तम मिठाई बद्दल माहिती संकलित करण्याचा आहे. सबब, तो उपक्रमाच्या 'माहिती'च्या धोरणामध्ये चपखल बसतो. तेव्हा हा चर्चाप्रस्ताव येथून उडवून न लावता आपण आणि आपले संपादक मंडळ या दोघांनीही या चर्चाप्रस्तावाचा आस्वाद घ्यावा ही विनंती! :)

सर्व उपक्रमींना अशी विनंती की त्यांनी त्यांना माहीत असलेल्या भारतातील उत्तमोतम मिठाई मिळणार्‍या ठिकाणांची माहिती येथे आवर्जून द्यावी जेणेकरून त्या भागात कधी गेल्यास इतर उपक्रमींनाही त्या त्या मिठाईचा आस्वाद घेता येईल!

तर मंडळी, माझ्यापासून सुरवात करतो, आपणही अवश्य हातभार लावावा ही गोड विनंती! :)

१९९५ ते २००२ च्या काळात मला नोकरीधंद्यानिमित्त बराच हिंदुस्थान पाहता आला. त्या दरम्यान मी ठिकठिकणच्या मिठाईच्या दुकानात भेट दिली आहे त्या साजूक आठवणी आजही माझ्या मनात तेवढ्याच ताज्या आहेत!

१) घंटेवाला मिठाईवाला, चांदनी चौक, जुनी दिल्ली.

हे मिठाईचे दिल्लीमधील अत्यंत पुरातन दुकान असून येथे सर्वच मिठाई फार उत्तम मिळते. विशेषतः इथली रबडी आणि सोहनहलवा फारच सुरेख!

२) सराफा कट्टा, इंदौर.

हे इंदौर मधील एक प्रसिद्ध ठिकाण. मंडळी, हे इंदौर कुणाचं? तर आमच्या बापुभैय्या देवासकरांचं बरं का! आमचे गुरुवर्य 'काकाजी' हे बापुभैय्या देवासकरांचे चिरंजीव :) बापुभैया देवासकरांची इंदुरातली कोठी, जिथे कधी काळी जमला होता भन्नाट पुरिया!! जिथे केशराचे हिशेब लिहिणारे कारकून होते, असं इंदौर! (भाईकाकाकी जय!)

तर काय सांगत होतो? हां, सराफा कट्टा इंदौर. इथे सराफांची दुकाने आहेत. रात्री ती दुकाने बंद झाली की इथे मिठाईच्या गाड्या लागतात! रबडी, गुलाबजाम, कालाजाम, उत्तम देसी घी मधली बालुशाही वगैरे वगैरे. ओहोहो, काय सांगू तुम्हाला मंडळी, इंदुरातल्या मुक्कामात रात्री सराफ्या कट्ट्यावर खादाडी करून निवांतपणे राजवाड्यापाशी १२० पान चघ़ळत घुटमळावं! हाय कंबख्त! :) अरे यार तुमचं स्वीस का काय ते टिंब टिंब मारतं हो आमच्या इंदुरापुढे! :)

३) घमंडी लस्सी, इंदौर.

आहाहा, हे इंदौर बसस्थानकाजवळचं उत्कृष्ट लस्सी मिळण्याचं ठिकण. अगदी कोपराएवढ्या उंच पेल्यातील उत्तम लस्सी इथे मी अनेकदा रिचवली आहे. शेजारच्याच एका लहानश्या ढाबेवजा दुकानात उत्तम गरमागरम पुरिभाजी खावी आणि नंतर घमंडी लस्सी प्यावी व पान चघळत बसस्थानकाच्या आसपास रेंगाळावं! थोडीफार लाईन मारावी! :) आहाहा, क्या केहेने! घमंडी लस्सीचा मालकही नावाप्रमाणेच घमंडी आहे. त्याच्या चेहर्‍यावर सदानकदा घमेंड आणि माज पाहायला मिळतो! कोई बात नही. इंदुरातल्या मातीतच ती मस्ती आणि रग आहे त्याला कुणाचा इलाज? :)

४) जेल रोड, इंदौर.

इथे अनंताश्रम नावाचं हॉटेल आहे. याच्या अलिकडेच एका सरदारजीचं दुकान आहे. सध्याचा सरदारजी ही त्या दुकानाची माझ्या माहितीप्रमाणे चौथी पिढी आहे. इथे अतिशय सुरेख अशी साजूक तुपातील जिलेबी मी हौशीहौशीने खाल्ली आहे. आंगठ्याएवढी जाड नळी, बाहेरून कोरडी, परंतु आतून साजूक तूप आणि पाक ठासून भरलेला! :) अहोहो, काय सांगू तुम्हाला मंडळी, अहो दीडदोनशे ग्रॅमची एक जिलेबी हो! क्या केहेने..

५) त्याचप्रमाणे 'छप्पन दुकान' ही इंदुरातील अशीच एक खाऊगल्ली. इथे निरनिराळ्या प्रकारची मिठाई अगदी मनसोक्त खावी!

६) भोपाळातील बृजवासी हे न्यु मार्केट जवळील दुकान! आहाहा, इथे गरमागरम गुलाबजामुन आणि रबडी खावी!

आता जाऊया कालिदासाच्या उज्जैनमध्ये! :)

इथे भगतजी मिष्टान्न भांडार आहे. इथली रबडीही अगदी अवश्य खावी! आहाहा, काय सांगू तुम्हाला मंडळी, धन्य तो कालिदास आणि धन्य ती त्याची उज्जैनी नगरी! भगतजी मिष्टान्न भांडारात मी अगदी यथेच्छ रबडी खाल्ली आहे. इथे द्रोणामध्ये लालबुंद अशी आटीव रबडी मिळते, जी जिभेवर ठेवल्याठेवल्या अक्षरश: विरघळते!

उज्जैन्यां महकालं या उक्तीप्रमाणे लोकं उज्जैनला जाऊन महाकालाचं दर्शन घेतात. घेवोत बापडे, त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. मीदेखील तांब्याच्या पैशावर चढवलेल्या भांगेचा महाकालाइतकाच भक्त आहे, परंतु मला मात्र महाकालाचं दर्शन झालं ते भगतजी मिष्टान्नाच्या रबडीत! अहो उजैनीतील ती रबडी खाल्ल्यानेच बारा ज्योतिर्लिंमंचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळतं असं माझं व्यक्तिगत मत आहे! :)

विरही यक्षाने मेघाला उज्जैनीबदल सांगितले आहे, तिचे कौतुक केले आहे. मंडळी, मी जर यक्षाच्या जागी असतो तर मेघाला म्हटलं असतं, बाबारे, उज्जैनीत गेलास की भगतजीकडची रबडी अवश्य खा आणि मगच पुढची मार्गक्रमणा कर! :)

असो, तर मंडळी, अजूनही भारतात अशी बरीच ठिकाणं आहेत, जिथे अतिशय उत्तम मिठाई मिळते. मी एकटाच किती सांगत बसू? आपलाही हातभार मोलाचा आहे, आपणही आपल्याला माहीत असलेल्या मिठाईच्या ठिकाणांबद्दल भरभरून लिहा आणि हे चर्चासत्र गोड करा! :)

अजूनही अनेक गावं आहेत. आख्खं राजस्थान आहे, हरिद्वार आहे, लखनऊ आहे.......
यादी लांबतच जाईल मंडळी, पण भारतातील मिठाई संपणार नाही! :)

आपला,
(कालिदासाचा मिठाई-दूत) तात्याभैया देवासकर, इंदौर!

लेखनविषय: दुवे:

Comments

भारतीय पण भारतात नसलेले

अमेरिकेतील न्यू जर्सी भागतील सुखाडीया हे मिठाईचे दुकान अमेरिकेतील बर्‍याच भारतीयांसाठी सोयीचे होते/आहे. (होते अशा साठी कारण काही वर्षांपूर्वी इतर काही मिळायचे नाही). विशेष करून गणपतीच्या वेळेस पेढे, पेढा मोदक वगैरे "गणेशोत्सवासाठी" म्हणून आणलेले असले की भक्तगण खूष!

बाकी तात्या, हा विरंगुळा अगदी मस्त आहे!

शिकागोचे सुखाडिया

शिकागोचे सुखाडिया ही असेच. शिकागोला जाणे झाले की चाट पदार्थांपासून, गोडापर्यंत काहीतरी खावेसे वाटून सुखाडिया दर्शन होतेच.

असो. भारतातली मिठाई नेहमीच खाल्ली जाते असे नाही परंतु जी मिळेल ती चालते. ;-)

आताच जेवणानंतर चॉकलेट ट्रायफल पेस्ट्री खाल्ली. मस्त होती.

जियो प्रियाली..

आताच जेवणानंतर चॉकलेट ट्रायफल पेस्ट्री खाल्ली. मस्त होती.

क्या बात है! फोटो मस्तच आहे! जियो...

तुला सांगतो प्रियाली, मला जर यमाने मरताना विचारलंन की तात्या तुझी शेवटची इच्छा काय आहे? तर मी त्याला सांगीन की, 'बाबारे तुझा रेडा तेवढा काही काळ दिल्ली दरबारच्या दिशेने वळव. आपण तुझ्या रेड्यावर डब्बलशीट बसून दिल्लीदरबारला जाऊ. तिथे आपण यथेच्छ कॅरॅमल कस्टर्ड खाऊ, वाटल्यास पैशीही मीच देईन! आणि मग खुशाल मला पुन्हा अवश्य ढकलून दे तुझ्या त्या ८४ लक्ष योनींच्या फेर्‍यात! मी पुन्हा एकपेशीय अमिबा बनायला तयार आहे! :)

पण बरं का प्रियाली, दिल्ली दरबारचं कॅरॅमल कस्टर्ड खाऊन खुश होऊन यमदेखील मला नेण्याची आइडिया रद्द करेल! :)

आपला,
कॅरॅमल कस्टर्डवर जिवापाड प्रेम असलेला एकपेशीय अमिबा अभ्यंकर! :)

अरे कुणीतरी कॅरॅमल कस्टर्डचा फोटोही इथे अवश्य द्या रे! :)

कुंथलगिरीचा पेढा.

तात्या,
मिठाईची तीर्थक्षेत्रे...सुंदर विषय.
एकापेक्षा एक सरस गोड तिर्थक्षेत्रांची ओळख येथे झाली आहे.चला आता मराठवाड्याकडे,..
मराठवाड्यातील औरंगाबादहुन उस्मानाबाद ला जातांना वाशीच्या अलीकडे कुंथलगीरी फाट्यावर वीकल्या जाणारा खव्याचा "कुंथलगीरीचा पेढा" प्रसिद्ध आहे.या गावच्या लोकसंखेच्या पन्नास टक्के लोक हाच व्यवसाय करतात. कधी तुळजाभवानीच्या दर्शनाला जात असाल तर इथे ब्रेक घ्या,अन मगच निघा.मग बघा ती गोडी ,क्या कहने !

मला जर यमाने मरताना विचारलंन की तात्या तुझी शेवटची इच्छा काय आहे? तर मी त्याला सांगीन की, 'बाबारे तुझा रेडा तेवढा काही काळ दिल्ली दरबारच्या दिशेने वळव. आपण तुझ्या रेड्यावर डब्बलशीट बसून दिल्लीदरबारला जाऊ. तिथे आपण यथेच्छ कॅरॅमल कस्टर्ड खाऊ, वाटल्यास पैशीही मीच देईन! आणि मग खुशाल मला पुन्हा अवश्य ढकलून दे तुझ्या त्या ८४ लक्ष योनींच्या फेर्‍यात! मी पुन्हा एकपेशीय अमिबा बनायला तयार आहे! :)

हाहाहा ;)))))वा तात्या ! सही ! 'मरना तुझा काय तेगार' ची आठवण झाली.

सातारी कंदी पेढा

कुंथलगीरीच्या पेढ्या प्रमाणेच सातारी कंदी पेढा पण प्रसिद्ध आहे.

काढा चुका.

काढा चुका माझ्या वाईट्ट् विंग्रजीच्या, पन म्या ट्रायफलच बोलते.

ह. घ्या.

टर्फाल

थोडक्यात टरफल याचा ग्रामीण ढंगचा उच्चार
उपयोगाचा असतं तो गर वाया जाणार वा कमी उपयोगाचे असते ते टरपल
अवांतर- विंग्रजीची लिंक दिल्याबद्द्ल् आभार. हे वेंडींग मशीन फुकाट आहे ना!

प्रकाश घाटपांडे

सुखाडिया

हे मिठाईचे नाव आहे कि हलवायाचे आडनाव. कधी ऐकल नाही . पन आमच्या क् साळ् मंदी दुष्काळाच्या टायमाला सुकडि ( सरकारने गरीब मुलांसाठी दिलेला एक सुका गोड पदार्थ) वाटायचे . त्या टायमाला आपल्याला पुन्याला यईला लै आवडायचं. मामाकड बनपाव चहात् बुडवून खायला भेटायचा, केक, आईसक्रीम,डामरी रस्ते , सिमीटाच्या बिल्डींगी. नळ सोडल्यावर फवार्‍यावानी येनार पानी.

प्रकाश घाटपांडे

सुकडी

मिळायचा स्पेशल दिवस असायचा. आणि त्या दिवशी हौसफुल्ल अटेन्डन्स. मास्तरांना इतकी खात्री असायची की ते हजेरी पण घ्यायचे नाहीत. त्या दिवशी जेवणाच्या डब्याबरोबर सुकडी आणायला दुसरा (आणि मोठ्ठा) डब्बा पिशवीत असायचा.

सुखाडिया

उदयपूर मध्ये सुखाडिया सर्कल नावाचे पर्यटन स्थळ (?, खरं तर चौक) आहे.
सुखडी (गुडपापडी) हा गुजराती खाद्यपदार्थ आहे. सुखाडियांच्या इतरही शाखा आहेत असे वाटते. सुखाडिया नाव वाटते. शोधाशोधा करावी लागेल.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

सुखाडिया हे राजस्थानी आडनाव आहे.

अशाच आडनावाचे एक शिक्षक आम्हाला आयटीआयला शिकवायला होते.
तसेच राजस्थानचे एक माजी मुख्यमंत्री श्री.मोहनलाल सुखाडिया म्हणून होते.

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

शिकागोचे सुखाडिया

सुखाडिया चांगला आहे. पण त्याला म्हैसूरपाक वगैरे मुळीच करता येत नाही. उत्तरेचं सगळं मस्त करतो मात्र, आणि आपले नेहमीचे यशस्वी म्हणजे "आइस हलवा", बदामी हलवा वगैरे छान असतात. आणि एक त्याचा अंजीर रोल हातखंडा आहे (म्हणजे अंजीराचा पाक वगैरे करून बाहेरून काजूबर्फीचा रोल).

साखरेचे खाणार त्याला...

तात्या, धमाल चर्चाप्रस्ताव आहे. माझी 'टॉप टेन' यादी अशी (क्रमाने नाही)

१. कलकत्त्याची के. सी. दास यांची मिठाई -- रसगुल्ले, मिश्टी दोही, रसमलाई, आणि तत्सम बंगाली मिठाया
२. जी. पुल्ला रेड्डी, हैदराबाद -- अरिसेलु म्हणून एक खास तेलगू मिठाई आहे, ती येथे चांगली मिळते असे ऐकून आहे. बरीचशी अनारशासारखी.
३. चितळ्यांचे मोतीचूर लाडू.
४. मधुरम, बोरिवली -- खासकरून काजूच्या मिठायांचे वेगवेगळे प्रकार
५. ब्रिटानिया -- धनसाक, बेरीनो पुलाव किंवा सल्ली बोटी असे पारसी खाद्यविशेष हादडल्यावर त्यांना कॅरॅमल कस्टर्डने (पारसी लग्नांत लगन नु कस्टर्ड म्हणून वाढले जाते) सद्गती मिळते. मुंबईत बॅलार्ड पिअरला, जुन्या कस्टम हाऊसजवळ हे रेस्टॉरंट आहे.
६. वॉर्डर्न बेकरी, नाना चौक, ग्रँट रोड -- केक्स, पेस्ट्रीज
७. आदर्श मिठाई मंदिर, ग्रँट रोड -- पेढे, वेगवेगळ्या बर्फ्या, सुतरफेणी

८. तिरामिसु -- न्यूयॉर्कच्या लिटल इटलीमध्ये भटकताना एका छोट्या (मॉम-न-पॉप) घरगुती बेकरी मध्ये खाल्ले, तसे इतर कुठे मिळाले नाही. 'कॅलिफोर्निया पिझ्झा किचन'मध्ये मिळणारेही चांगले असते.
९. 'चिलीज' मध्ये मिळणारा 'मोल्टन चॉकलेट केक' -- मध्यभागी उबदार चॉकलेट सॉस, वर थंड चॉकलेट कोटेड व्हॅनिला आईस्क्रीम. जर तुम्हांला चॉकलेट आवडत असेल, तर हा केक आवडला नाही असे होणारच नाही.
१०. घिराडेली , गोडिवा -वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स, शेक्स.

बाकी एकंदरीतच गोड पदार्थ, चॉकलेट्स हे अँटि-डिप्रेसंट्स असतात हे खरं. नुसत्याच आठवणीने सोमवारची दुपार सुसह्य झाली. :)

लावा केक

मोल्टन चॉकलेट केक म्हणजेच लावा केक ना?

मला भयंकर आवडतो आणि त्याच्या शेजारी वॅनिला आईसक्रिमचा डॉलॉप असेल तर आहाहाहाहाहाहाहाहा!!!!

स्टेक अँड शेक मधले जवळ जवळ सगळे शेक्स.... आणि अमेरिकेतील जत्रांतून मिळणारा 'हत्तीचे कान' हा पदार्थ, सर्व प्रकारचे चॉकलेट फज आणि ब्राउनीज.

आणि जेथे चांगले मिळेल तेथे मिळणारे फलूदा आईसक्रिम.

जवळजवळ

जवळपास लावा केक सारखाच. फक्त बाहेरचे आवरण एवढे 'चॉकलेटी' नसते. गरम सिरप, थंड आईस्क्रीम आणि मऊ स्पंज केक चे एकत्र कॉम्बिनेशन (याला मिश्रण म्हणवत नाही.) सुरेख लागते.

वा नंदनशेठ!

तुझ्या गोड सहभागाबद्दल धन्यवाद..

२. जी. पुल्ला रेड्डी, हैदराबाद -- अरिसेलु म्हणून एक खास तेलगू मिठाई आहे, ती येथे चांगली मिळते असे ऐकून आहे. बरीचशी अनारशासारखी.

क्या बात है! हे जी पुल्ला रेड्डीचं दुकान नामपल्लीजवळ आहे बरं का! इथे मी भरपूर साजूक मिठाई झोडली आहे. हैदराबाद रेल्वे स्थानकाच्या आसपासच्या भागाला नामपल्ली म्हणतात. पुल्ला रेड्डीकडचे पेढेही खासच! :)

३. चितळ्यांचे मोतीचूर लाडू.

शाब्बास रे पुणेकरा! :)

६. वॉर्डर्न बेकरी, नाना चौक, ग्रँट रोड -- केक्स, पेस्ट्रीज

ग्रँटरोड स्टेशनच्या बाहेरच बी मेरवान आणि कंपनी आहे. इथला मावा केक खासच! मेरवानमध्ये शिरावं, डबल आमलेट खावं, ब्रुममस्का खावा, आणि सरतेशेवटी दोनचार मावा केक खावेत आणि झकासशी चाय प्यावी. बिल चुकतं करावं आणि १२० पानाचा तोबरा भरून आपल्याच मस्तीत तिकडनं चालू पडावं! :)

वा! आपनेभी क्या याद दिलाई! थांब, आता उद्याच जातो मेरवानमध्ये! :)

आपला,
(मुंबईतल्या इराणी हाटेलांचा प्रेमी) तात्या.

वा क्या बात है. !

विरही यक्षाने मेघाला उज्जैनीबदल सांगितले आहे, तिचे कौतुक केले आहे. मंडळी, मी जर यक्षाच्या जागी असतो तर मेघाला म्हटलं असतं, बाबारे, उज्जैनीत गेलास की भगतजीकडची रबडी अवश्य खा आणि मगच पुढची मार्गक्रमणा कर! :)

वा क्या बात है. !

आहाहा!

तात्याबा,
आपण उगाच 'चला गुंड्याभाऊ जरा इंदौरला जाऊन येवू' असं म्हणून घेवून गेला आहात. रात्री सराफ्या कट्ट्यावर मस्त खादाडी करून निवांतपणे राजवाड्यापाशी तुम्ही मला पुरिया कल्याण मधल्या जागा दाखवून देता आहात. रात्र शांत होते आहे. एक छान शी तान दुरून कुठून तरी ऐकु येते आहे... सोबता जाता जाता कसा 'जमला' होता तेव्हा शुद्धकल्याण याचे किस्से सांगत आहात.
असं जागेपणीच एक स्वप्न पडून गेले!!
वा! काय छान वाटतंय तात्यांबांचं उत्स्फुर्त लेखन वाचायला! सकाळी सकाळी उठण्याचं सार्थक झालं!

बाकी खाण्याचं म्हणाल तर, मालवणातल्या कोणत्याही साध्या 'हाटेलात' जे मासे मिळतात ते जगात कुठेही मिळत नाहीत!
चुकलो!!!! मासे ही काही मिठाई नाही... ;)

मला आपली साधी दिवाळीचीच मिठाई आवडते बॉ! त्यातही आईच्या हातचे शंकरपाळे!

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र?!!!! मग असे करण्या आधी गुंड्याला सांगायला नको?)

आता जाऊया ग्वाल्हेरला! :)

रात्री सराफ्या कट्ट्यावर मस्त खादाडी करून निवांतपणे राजवाड्यापाशी तुम्ही मला पुरिया कल्याण मधल्या जागा दाखवून देता आहात. रात्र शांत होते आहे. एक छान शी तान दुरून कुठून तरी ऐकु येते आहे... सोबता जाता जाता कसा 'जमला' होता तेव्हा शुद्धकल्याण याचे किस्से सांगत आहात.
असं जागेपणीच एक स्वप्न पडून गेले!!

क्या बात है! क्या बात है!! गुंड्याभाऊ, दृष्य डोळ्यासमोर आलं रे...

रात्र शांत होते आहे. एक छान शी तान दुरून कुठून तरी ऐकु येते आहे... सोबता जाता जाता कसा 'जमला' होता तेव्हा शुद्धकल्याण याचे किस्से सांगत आहात.

हे तर खासच! अरे गाणं आणि खाणं इथल्या मातीतच आहे रे! अरे देवासात रात्रीच्या नीरव शांततेत अशीच दुरून माळव्यातील लोकंगीतं कुमारांना ऐकू आली होती आणि त्यातूनच सजलं कुमारांचं 'अनुपरागविलास!' अब क्या बताऊ तेरेको गुंड्याभाऊ! साल जीव भरून आला बघ!

आता आपण जाऊया ग्वाल्हेरला! आमच्या गाणेवाल्यांच्या भाषेत ग्वालियर! एखादा गवई खास ग्वाल्हेर अंगाची तान घेऊन मला सुनावतो, "तात्या, ये हमारे ग्वालियर की बात है!" :)

असो, तर या ग्वाल्हेरात दरवर्षी म प्र सरकारतर्फे तानसेन महोत्सव साजरा केला जातो. भारतातले बडे बडे कलाकार इथे हजेरी लावतात. मला २ -३ वेळेला तानसेन समारोहात गाणं ऐकण्याचा योग आला आहे.

अरे गुंड्याभाऊ, काय सांगू तुला तानसेन समारोहातली शान! डिसेंबरातली ग्वाल्हेरातली सुरेख थंडी, मस्तपैकी गाद्यागिर्द्या घातलेल्या असतात, त्यावर बसून अगदी तब्येतीत गाणं ऐकायचं. आजुबाजूला मिठाईच्या गाड्या लागलेल्या असतात. मनात आलं की उठावं, एखाद्या गाडीवर गरमागरम गुलाबजाम खावेत, गरम दूध प्यावं, आणि मस्तपैकी पान जमवून पुन्हा गादीवर येऊन तब्येतीत बैठक मारून गाणं ऐकावं! सगळ्या वातावरणात एक विलक्षण मस्ती भरून राहिलेली असते! एकदा तरी अनुभव घेऊन बघ रे गुंड्याभाऊ! नांव काढशील माझं! :)

मला आपली साधी दिवाळीचीच मिठाई आवडते बॉ! त्यातही आईच्या हातचे शंकरपाळे!

जाने दो भाई! अब हमे और मत रुलाओ!

(ग्वाल्हेरप्रेमी) तात्या.

माझेही मिठाईप्रेम

कृष्णेला जिथे पंचगंगा मिळते त्या नृसिंहवाडीच्या संगमाच्या आसपास मिळणारे आटीव दुधाचे पदार्थ, वाडीच्या गोपालकृष्ण डेअरीमधली बासुंदी - एक ग्लास तिथेच रिचवावा आणि किलोभर बांधून घ्यावी. मंदिराच्या आसपासच्या (आमची मजल इथपर्यंतच!) कोणत्याही दुकानातले फिके पेढे आणि कवठाची बर्फी, गोकाकचे करदंट, बेळगावी कुंदा आणि मांडे, मिरजेच्या मार्केट यार्डमधल्या बस्साप्पा चौगुलेच्या दुकानातला खाजा आणि बालुशाही, सांगलीच्या डी. पी परांजपे कोल्ड्रिंक हाऊसमधील गुलकंद आईसक्रीम,बरेलीच्या चौकातली हातभर उंचीच्या स्टीलच्या ग्लासमधली स्पेशल मलई मारलेली'दीनानाथ की मशहूर लस्सी' ..... (तशी लस्सी कोणे एके काळी सांगलीच्या भगवानलाल कंदीकडेही मिळत असे. ग्लासातल्या मलईवर काजूचे तुकडे सढळ हाताने पेरलेले असत. आधी एक प्लेट कलाकंद खावा, मग एक पूर्ण ग्लास लस्सी लावावी. काऊंटरवर पाच रुपये देऊन चिल्लर परत घ्यावी. कुरकुरीत धनाडाळीचा बकाणा भरावा आणि थिएटर रोडवर विलिंग्डन कॉलेजमधल्या पोरी बघत पाय तुटेपर्यंत हिंडावे!..... हाय!)
सन्जोप राव

क्या बात है!

संजोपराव! क्या बात है
आता तुम्च्या बरोबर सांगलीलाही यावे लागते आम्हाला बहुतेक ;))) !!!

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र?!!!! मग असे करण्या आधी गुंड्याला सांगायला नको?)

बेळगावी कुंदा

बेळगावी कुंदा चेन्नागिदे...
हा खाण्याचा योग मागल्याच महिन्यात आला. नंतर तो बांधून आणलेली प्ल्याष्टीकची पिशवी पण चाटून पुसून घेतली तेव्हा कुठे बरं वाटलं...

आणि आत्ता आठवले... हा कुंदा पुरोहित स्वीट्स बेळगाव येथून आणला होता. या तीर्थक्षेत्राला जाऊन येक नारळ फोडून येण्याची इच्छा आहे.

- आजानुकुंदा

रावसाहेब ! अब सही जा रहे हो !

"मस्त" किती दिवसापासून आम्ही आपल्या लेखाची वाट पहातोय.
कुछ जबरा आने दो, इथे दिर्घकाळ स्मरणात राहील असे काहीतरी येऊ द्या !

अवांतर;) नसता आम्ही साठोत्तरी साहित्याचा एकादा कंटाळवाना विषय टाकू.
मग आम्हाला पुन्हा म्हणू नका ! ये क्या किया म्हणून ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा!

कृष्णेला जिथे पंचगंगा मिळते त्या नृसिंहवाडीच्या संगमाच्या आसपास मिळणारे आटीव दुधाचे पदार्थ, वाडीच्या गोपालकृष्ण डेअरीमधली बासुंदी - एक ग्लास तिथेच रिचवावा आणि किलोभर बांधून घ्यावी.

वा वा! वाडीची बासुंदी बाकी खासच असते..!

तात्या.

कंदींची लस्सी

अनिरुद्ध दातार
सन्जोपराव, भगवानलाल कंदींकडे अजूनही तश्शीच लस्सी मिळते. काजू सढळ हातानेच पेरतात. कंदी कधी कंजूषपणा करत नाहीत हा माझा अगदी पर्सनल अनुभव आहे.

धारवाडी पेढा

मंचर गावातल्या शिवाजी चौकाच्या वेशीतून जुम्मा मशीदीच्या पुढं थोडं आत आलं की तिथल्या विश्वनाथप्पा महाजनाकडे (पेढेवाले महाजन) धारवाडी पेढा मिळतो. त्या पेढ्याची चव आमच्या धारवाडकर म्यानेजरने "तिकडून" आणलेल्या पेढ्यापेक्षाही चांगली लागते. ह्या पेढ्याचा अद्याप उल्लेख कसा केला नाही कुणी. अप्पाचा पेढा तर तर हातातच विरघळेल की काय अशी भीती वाटते. :-'. एकदम मऊ. स्पेशल गिर्‍हाईकांना तो पेढा गरम असतानाही मिळतो.

पेढा
धारवाडी पेढा

असला पेढा १०० ग्र्याम घ्यावा आणि सोबत अप्पाकडेच मिळणारं गरम दूध ग्लासभर. एक घोट दुधाचा आणि एक घास पेढ्याचा.... अहाहा....धारवाडस्य पेढा दुग्धश्च स्वर्गादपि गरीयसी...

- स्पेशलकर्ण

वा !

वा काय पेढा आहे!!!
चटकन उचलून एक तोंडात टाकावासा वाटतोय! वा!!!
च्यामारी हे बंद करा राव! इतके सुरेख जिन्नस... कय सुचतच नाहीये ना राव आता काम मला!
तात्याबा हे काय सुरु केलं बा तुमी?
अत्त्याचार आहे हा... अरे कुणी तरी थांबवा हो हे लेखन!!
माझी स्थीती 'सोडवा तरी किंवा हलवा तरी' अशी झाली आहे हो! ;)
ह.घ्या.
आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र?!!!! मग असे करण्या आधी गुंड्याला सांगायला नको?)

सोडवा तरी किंवा हलवा तरी वरुन

सोडवा तरी किंवा हलवा तरी

वरुन आठवले
माहिमचा हलवा खाल्ला पण आवडला नाही... कदाचित योग्य जागी खाल्ला नसेल...
मुंबईवाले तात्या... चांगला हलवा कुठे मिळतो हो?

दोन रुपयात दुधी हलवा!

दोन रुपयात 'दुधी' हलवा!
एक रुपयात 'गाजर' हलवा! कुठेही मिळेल. त्यासाठी इथेतिथे जायची काय जरूर आहे?

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

आहाहा सुरेख फोटू! :)/शहापुरी कुंदा

वा कर्णराव!

फोटो जीवघेणा आहे! आपण तर साला खल्लास..

अरे शहापुर नावाचं गाव कुठाय रे? धारवाड जिल्ह्यातच आहे का?

मी एकदा अण्णांच्या घरी गेलो असताना त्यांनी मला शहापुरी कुंदा खायला दिला होता. मला म्हणाले, "ह शहापुरी कुंदा खाऊन बघ किती छान लागतो ते!"

कुंदा अतिशय सुरेखच होता. पण आम्ही अण्णांना त्याबाबत तपशीलात अधिक काही विचारले नाही.

आपला,
(गुरुगृही शहापुरी कुंद्याचा प्रसाद मिळालेला!) तात्या.

काँग्रेस भवन

नवरात्रात मनपा भवन - काँग्रेस भवनाजवळ बंगाली मिठाई फेष्टीवल असतो. तिथे रोशोगुल्ले, छोमछोम, शोंदेश खायला लै मज्जा येते. परत वर रावसाहेबांनी सांगितलेल्या कारणाने डोळे दुखतात व पायही तुटतात...

चव काही नुसतीच पदार्थाला नसते हो!

चव काही नुसतीच पदार्थाला नसते हो!
अशा अनेक खाद्य चवी मनात रेंगाळतात पण अगदी खरं सांगायचं तर चव मनात राहून गेलेली असते हो...
नुसते खाणे नसते,
त्याबरोबरचे वातावरण पण असते...
आठवणी असतात, एखाद झकास किस्सा असतो, पाऊस असतो,
गाणं असतं, माणसं असतात... ती माणसं , आठवणी,
'ते असंणं नि ती चव' काही परत मिळत नाही,
अगदी तेच पदार्थ असले तरी!
काय म्हणता?
आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र?!!!! मग असे करण्या आधी गुंड्याला सांगायला नको?)

खावेसे वाटणारे

खाण्याची चित्रे अगदी लगेच खावीशी वाटणारी आहेत्

छान आहे हा विषय. आवडता
शिवानी

सुगर हाये बाबा !

लयी खावा वाटु राह्यलं मातर सुगर हाये,म्हुन् नुस्ता पाहुन राह्यलो.

उज्जैन ची रबडी़

मित्रांनो,
उज्जैन (मप्र) मधे खायला मिळणारी रबडी़ म्हणजे दुधाला आटवून-आटवून त्याचे साईचे लच्छे करायचे व त्यात थोडी शी साखर मिसळायची अर्थातच बासुन्दी ची "पुढची जेनेरेशन" म्हणता येईल...
येथे अजून ही एक रुपया ला कचोरी / समोसा पण मिळतो, आणि शेव तथा चिवडा तर आहेच प्रसिद्ध, तर या उज्जैन ला कधी...
http://sureshchiplunkar.blogspot.com

वा.

एखादा फोटो मिळाला तर चढवा की.

अभिनंदन.

चिपळूनकर साहेब,
उज्जैनला जाऊ तेव्हा रबडी नक्कीच खाऊ.पण तुम्ही उपक्रमींच्या भावना समजून मराठीत लिहायला लागलात ना ! त्याचा फार आनंद होतोय. आमच्या मराठीची गोडी तुमच्या रबडीसारखीच आहे,बरं का ! आपल्याला भेटून आनंद झाला.
असो,माहितीची देवाण घेवाण आता जोरात होऊन जाऊ दे ! चिअर्स.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोल्ड स्टोन

आपल्या आवडीच्या स्वादाचे आइस्क्रिम त्यामध्ये हवा तो सुका मेवा/ ताजी फळे... आवडत असल्यास चॉकलेट/केक/बिस्किटे ह्यांचे तुकडे हे सगळे एका बर्फाच्या लादीवर भेळेसारखे मिसळून 'वॉफल'च्या द्रोणातुन आपल्या समोर येते.. आहाहाहा...

आइस्क्रिम

आइस्क्रिमचा काही जणांनी उल्लेख केला आहे. ज्यांना आइस्क्रिम आवडते त्यांनी "जिलेटो / ज्यलाटो / ज्य् लाह् तोह्" (GELATO) हा प्रकार खावुन पहावा. मला तरी नेहमीच्या आइस्क्रिमपेक्क्षा "ज्यलाटो " जास्त आवडते.
आणी अर्थातच "मस्तानी"

एकेकाळी मी खूप गोडखाऊ होतो पण आता तितके गोड खावेसे वाटत नाही. (कोणाचा असा अनुभव आहे का?) अपवाद "रबडी - रसमलई"

मस्त!

उज्जैन स्पेशल वर्णन ऐकून मीसुद्धा तिथल्या मिठाईच्या ठेल्यांना रात्री दिलेल्या भेटी आठवल्या.
मुंबईस परत येताना आम्ही तीन किलो खवा घेऊन आलो होतो तेही आठवलं.
मस्त वाटलं एकेकाची वर्णनं ऐकून आणि फोटो तर काय बोलायलाच नको!
लगे रहो..

मालपुवा

मी मालपुवा या उत्तरभारतीय मिठाईबद्दल बरेच् ऐकले आहे. ती कुठे अत्युत्तम मिळेल?

अनिरुद्ध दातार

 
^ वर