स्टीव्हियाचा यशस्वी प्रयोग
मधुमेहाच्या रुग्णांना साखर चालत नाही. त्यांच्यासाठी स्टीव्हियाचा पर्याय उपलब्ध आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातील वडूथ गावातील प्रभाकर साबळे या सुशिक्षित शेतकऱ्याने स्टीव्हियाच्या माध्यमातून घरोघरी साखर कारखाने निर्माण करण्याचे ठरवले आहे.
मधुमेही रुग्णांची ही वाढती गरज लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातील प्रगत शेतकरी प्रभाकर साबळे यांनी त्यांच्या शेतात स्टीव्हियाची यशस्वी लागवड केली. स्टीव्हियाच्या पानांवर प्रक्रिया करून त्याची पावडर तयार केली आणि त्यासाठी बाजारपेठही शोधली. बाजारपेठेची गरज ओळखून एक शेतकरी त्याप्रमाणे पीक घेण्याचे धाडस करतो आणि त्यावर स्वतः प्रक्रिया करून लोकांपर्यंत पोचवतो, ही निश्चितच प्रशंसनीय बाब आहे.
प्रभाकर साबळे हे कृषी क्षेत्रातील पदवीधर आहेत. काळाची, वाढत्या स्पर्धेची गरज ओळखून त्यांना व्यावसायिक दृष्टीने शेतामध्ये काही बदल करायचे होते. आपल्या शेतात निरनिराळे प्रयोग करण्याबरोबरच एक रोपवाटिकाही विकसित केली. त्यांनी शेतीच्या विकासात घेतलेली मोठी झेप म्हणजे स्टीव्हियाची लागवड. सध्या डॉक्टर मधुमेहाच्या रुग्णांना साखरेला पर्याय म्हणून स्टीव्हियाचा पर्याय सुचवतात.
शहरातील स्टीव्हियाची वाढती मागणी लक्षात घेता प्रभाकर साबळे यांनी स्टीव्हियाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. स्टीव्हियाची रोपे महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी उपलब्ध आहेत. साबळे यांनी बंगळूरच्या स्पा फ्लोरा कंपनीकडून स्टीव्हियाची रोपे विकत आणली. सुरवातीला चाचणी म्हणून कमी क्षेत्रात त्या रोपांची लागवड केली. पाऊण एकर क्षेत्रात टिश्यू कल्चरच्या माध्यमातून ती वाढवली. त्यांना स्टीव्हियाचे एकरी अंदाजे दीड टन म्हणजे एका झाडापासून सुमारे 100 ते 150 ग्रॅम उत्पन्न मिळाले. स्टीव्हियाच्या पानावर प्रक्रिया करून त्याची घरीच पूड तयार केली. लागवड आणि प्रक्रियेनंतर आता मुख्य प्रश्न होता स्टीव्हियाची पावडर विकण्याचा.
त्यासाठी सुरवातीला लांबची बाजारपेठ शोधण्याऐवजी स्थानिक पातळीवरच्या प्रयत्नांना साबळे यांनी भर दिला. त्यासाठी सातारा जिल्हा निवडला व तेथे स्वतःच्या यंत्रणेद्वारे 30 किलो स्टीव्हियाची विक्री 500 रुपये प्रतिकिलो या भावाने केली. सातारा जिल्ह्यात अशा प्रकारचा प्रयत्न करणारे साबळे हे पहिलेच शेतकरी होत. स्टीव्हियाच्या लागवडीच्या पहिल्या यशस्वी प्रयत्नानंतर त्यांनी आता या वनस्पतीची लागवड एक एकर क्षेत्रात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांनी त्यांच्या रोपवाटिकेमध्ये स्टीव्हियाच्या रोपांचाही समावेश केला आहे. कटिंग पद्धतीने स्टीव्हियाच्या कांड्या तयार करून दीड महिन्यांत स्टीव्हियाची रोपे साबळे तयार करत आहेत.
स्टीव्हियाची लागवड, रोपे या सर्वच गोष्टींच्या बाबत खूप काळजी घ्यावी लागते. लागवडीनंतर स्टीव्हियाची रोपे कमी जगतात, असा बऱ्याच जणांचा अनुभव असताना साबळे यांच्या शेतातील 80 ते 90 टक्के रोपे जगली आहेत. सध्या सातारा परिसरातील अनेक प्रगत शेतकरी साबळे यांच्याकडून स्टीव्हियाच्या लागवडीचे धडे आणि त्याबरोबर रोपेही घेऊन जातात.
साबळे यांच्या श्रीकृष्ण नर्सरीत स्टीव्हियाचे 1 रोप 5 रुपये दराने विकत मिळते. या नर्सरीमुळे स्टीव्हियाची लागवड करू इच्छिणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांची सोय झाली आहे. साताऱ्याबरोबरच पुणे, मुंबई, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी स्टीव्हिया विक्रीसाठी पाठवण्याचा साबळे यांचा विचार आहे.
Comments
मधुमेह
भारतातील जनमानसातील समृद्धीच्या चुकीच्या कल्पना, खाण्याच्या अयोग्य सवयी, नियमित व्यायामाबाबत जात्याच आळशी वृत्ती व भारतीयांचा जनुकीय दोष यामुळे मधुमेहाची सर्वात मोठी बाजारपेठ भारत होत आहे.
स्टीव्हिया हा नक्की काय प्रकार आहे? कॅलरी फ्री शुगर पेक्षा हा प्रकार वेगळा कसा?
स्टीव्हिया
शोधल्यावर सापडले. लट्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेहावर गुणकारी आहे, प्रसंगी वादाच्या भोवर्यातही अडकलेली आहे असे कळते. आपल्या अन्न/औषध मंत्रालयाने यासंबंधीचे सरकारी धोरण जाहीर केल्यास जनतेच्या मनात शंका राहणार नाही. पण असे नवे प्रयत्न नक्कीच चांगले आहेत असे वाटते.
भात व क्यालरी
हातसडीचा व पॉलिश न केलेला तांदूळ खाणे हितावह आहे. आमचा भाताच्या जातींचा फारसा अभ्यास नसला तरी जो तांदूळ अधिक पांढराशुभ्र तो अधिक हानीकारक असे सोपे समीकरण आहे.
कॉफीच्या प्रश्नामध्ये जरी क्यालरीज दुधातून जास्त येत असल्या तरी दुधातून प्रथिने व इतर उपयुक्त घटकही मिळतात. मात्र साखरेतून येणार्या क्यालरीज या पोकळ क्यालरीज आहेत. ज्यांना काहीही न्यूट्रिशनल व्हॅल्यू नाही.
एक ऐकलेले वचनः
पांढरा तांदूळ, पांढरा मैदा, पांढरी साखर व पांढरे मीठ यांचे आहारात प्रमाण वाढले तर डोळे लवकर पांढरे होतात.
सावध
कोरफड, शतावरी, ब्राम्ही, सफेद मुसळी यांच्या लागवडीतून लक्षाधीश व्हा अशा जाहिराती अद्यापही मराठी वर्तमानपत्रांत दिसतात. यांतून एकरी दोन लाख-तीन लाख रुपये उत्पन्न मिळवलेल्या शेतकर्यांच्या मुलाखती, हसरे फोटो वगैरे सगळे असते. फक्त अशा एका यशस्वी शेतकर्यामागे किती अयशस्वी प्रयोग झाले ही आकडेवारी नसते.
स्टिव्हियाची नक्की बाजारपेठ कुठे आहे याविषयी एकमत नाही. स्टिव्हियाच्या अर्काला जपानमध्ये मागणी आहे ही ऐकीव बातमी. भारतातील मधुमेह्यांची सध्याची आणि भविष्यातील संख्या लक्षात घेता भारतात पुरेल इतकेही स्टीव्हियाचे उत्पादन घेणे शक्य होणार नाही.पण ही सर्व बाजारपेठ अनऑर्गनाईज्ड् सेक्टरमध्ये आहे. आज बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांशी (सॅकरीन, अस्पार्मेट, शुगर अल्कोहोल) स्पर्धा करण्यासाठी स्टीव्हियाचा विचार करायचा झाला तर त्यासाठी कुठलेही ठोस धोरण नजरेसमोर नाही.
मला कुणावरही टीका करायची नाही. अशा बातम्या वाचून भारावून जाऊन लोकांना रातोरात लक्षाधीश होण्याची स्वप्ने पडू लागतात. ते तितके सोपे नसते हे कळावे म्हणून हा प्रतिसाद. आयुष्यात स्टीव्हियाचे पीक घ्यायचे, स्टीव्हिया पावडर, अर्क एक्स्पोर्ट करायचा आणि लखपती व्हायचे असे माझ्या एका विद्यार्थ्याचे ( बी.एस्.सी.,एम.बी.ए.) स्वप्न होते. त्याने त्यात तीन वर्षे घालवली. आता तो एका सरकारी खात्यात नोकरी करतो.
सन्जोप राव
कॉफी आणि उच्च रक्तदाब!
एक कप कॉफी प्यायल्याने साधारण ५-१०अंकांनी(नेमका शब्द आठवत नाही) उच्च रक्तदाब(सिस्टॉलिक) वाढतो असे वाचनात आले होते. तेव्हा कॉफी देखिल जरा जपूनच प्या. थोडक्यात म्हणजे 'अती सर्वत्र वर्जयेत'! हे एक जरी नियमितपणे पाळलेत तर काहीही खायला हरकत नसावी. उठसुठ कॅलरी कॉन्शस राहाणेही चांगले नाही.त्याच बरोबरीने व्यायामाच्या बाबतीत नियमितपणा असू द्या.
बाकी प्रभाकर साबळे ह्यांचे अभिनंदन! त्यांचे हे उत्पादन जागतिक पातळीवर पोचवण्यासाठी त्यांनी गुंडोपंतांचा सल्ला जरूर घ्यावा.
ही माहिती इथे दिल्याबद्दल शिल्पाजींचे अभिनंदन!
आम्हाला जे काही माहिती आहे/असेल ते नक्की देवू!
त्यांचे हे उत्पादन जागतिक पातळीवर पोचवण्यासाठी त्यांनी गुंडोपंतांचा सल्ला जरूर घ्यावा.
नक्कीच आवडेल! आम्हाला जे काही माहिती आहे/असेल ते नक्की देवू.
आपला
गुंडोपंत
माहितीपूर्ण चर्चा..
चर्चा माहितीपूर्ण वाटते आहे. आणि मुख्य म्हणजे प्रथमच शिल्पाताईंच्या लेखात कुठेही दारुचे गुत्ते बंद पाडल्याचा उल्लेख नाही हे पाहून जरा चुकल्याचुकल्यासारखे वाटले! :)
साबळेशेठचे अभिनंदन, परंतु रावशेठचा प्रतिसादही मला महत्वाचा वाटतो!
असो, सुदैवाने अजूनपर्यंत तरी आम्हाला मधुमिया नाही. गेला दिवस आपला असं म्हणून भरपूर एन्जॉय करायचा,काय चाहेल ते खायचंप्यायचं, उद्याचं माहीत नाही!
असो. शिल्पाताईंचे आभार..
तात्या.
संत तात्याबा सध्या हा माहितीपूर्ण लेख वाचत आहेत!
माहितीपूर्ण
स्टिव्हियाबद्दल माहिती करुन दिल्याबद्दल आभार. याबद्दल अधिक संशोधन होणे आवश्यक.

आमच्या मालकीची शेती नाही, आणि बहुधा कधी विकत घेताही येणार नाही, पण 'जरबेरा लावून फायदा कमावणे', 'स्ट्रॉबेरी ला. फा. क. , 'करंज्या(बायोडिझेल इ.) ला. फा. क.','ऑर्किड/कार्नेशिया ला. फा. क.' अशी स्वप्ने आम्ही कधीकधी पाहात असतो. त्यात आता 'स्टिव्हिया ला. फा. क.' ची भर पडली आहे.
नीट ज्ञान मिळवून पावले उचलली आणि थोडी लागवड करत करत जास्त असे केले तर स्वप्ने तुटणारही नाहीत आणि मोजून मापून जोखीम(कॅलक्युलेटेड रिस्क) घेता येईल असे वाटते.
सही!
पण 'जरबेरा लावून फायदा कमावणे', 'स्ट्रॉबेरी ला. फा. क. , 'करंज्या(बायोडिझेल इ.) ला. फा. क.','ऑर्किड/कार्नेशिया ला. फा. क.' अशी स्वप्ने आम्ही कधीकधी पाहात असतो. त्यात आता 'स्टिव्हिया ला. फा. क.' ची भर पडली आहे.
हा हा हा! सही.... मी पण यात असतो बरं का! ;)
आपला
गुंडोपंत