खगोलीय अंतरे मोजण्याची एकके
खगोलशास्त्रात दोन तार्यांमधील वा दोन ग्रहांमधील अंतर मोजण्यासाठी आपली पृथ्वीवरची परिमाणे फारच थिटी पडतात.
उदाहरणच द्यायचे झाले तर आपल्या पृथ्वीपासून सूर्याचे सरासरी अंतर आहे - १४९५९७८०० किलोमीटर.
आता बोला, किलोमीटर या एककात पृथ्वी ते सूर्य हे अंतर नक्की किती आहे हे आपल्याला समजून घेता येत नाही तर दोन तार्यांमधील अंतर कसे मोजता येईल. ही अडचण ओळखून खगोलीय अंतराच्या मापनासाठी खगोलशास्त्रज्ञांनी "ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट" आणि "प्रकाशवर्ष" या संकल्पना अस्तित्वात आणल्या
१ ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट = १४९५९७८००.६९१ कि.मी. (पृथ्वी ते सूर्य यांतील सरासरी अंतर )
हे एकक मुख्यतः सूर्यापासून ग्रहाचे अंतर मोजण्यासाठी वापरतात.
क्र. ग्रह अंतर ("ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट" मधे)
१ बुध 0.3871
२ शुक्र 0.7233
३ पृथ्वी 1.0000
४ मंगळ 1.5237
५ गुरु 5.2028
६ शनि 9.5880
७ युरेनस 19.1910
८ नेपच्यून 30.0610
९ प्लुटो 39.5290
१ प्रकाशवर्ष = ९४६०८०००००००० कि.मी. (म्हणजे प्रकाशाने १ वर्षात कापलेले अंतर)
हे एकक मुख्यतः तार्यांमधील अंतर मोजण्यासाठी वापरतात. (अर्थातच यासाठी बेस हा पृथ्वी आहे)
पृथ्वीपासूनच्या काही महत्त्वाच्या तार्यांची अंतरे:
क्र. तारा / नक्षत्र अंतर ("प्रकाशवर्ष" मधे)
१ मित्र ४.३
२ व्याध ८.६
३ अगस्ति ९.८
४ स्वाति ३६
५ अभिजित २६.५
६ काक्षी ५२०
७ रोहीणी ६८
८ चित्रा २२०
९ ज्येष्ठा ५२०
१० मघा ८७
तूर्तास एवढे पुरे. लवकरच नवीन माहीती दुसर्या लेखाद्वारे देईन
धन्यवाद
सागर
Comments
चांगला
चांगला लेख, पण बराच छोटा वाटला. :)
राधिका
यापुढील लेख सविस्तर असतील याची काळजी घेईन
राधिका,
तुमच्या तत्पर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पहिलाच लेख आहे हा त्यामुळे छोटा आहे. तुमची सूचना आणि येथील प्रतिसाद यांमुळे मला नक्कीच प्रोत्साहन मिळत आहे.
यापुढील लेख सविस्तर असतील याची काळजी घेईन
धन्यवाद
सागर
एकक
ऍस्ट्रॉनमिकल युनिटला मराठीमध्ये खगोलीय एकक असे म्हणतात.
काक्षी हा तारा कोणत्या तारकासमूहामध्ये आहे?
एक प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षामध्ये निर्वात पोकळीमध्ये कापलेले अंतर. प्रकाशाचा वेग तो प्रवास करत् असलेल्या माध्यमाच्या अपवर्तनांकावर (रिफ्रॅक्टिव इंडेक्स) अवलंबून (अपवर्तनांकाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो) असतो. काचेमध्ये प्रकाशाचा वेग हा हवेतील वा निर्वात पोकळीतील वेगापेक्षा कमी असतो. त्यामुळे निर्वात पोकळीचा प्रकाशवर्षाच्या व्याख्येमध्ये समावेश असणे गरजेचे आहे.
बाकी माहिती चांगली. आणखी लिहा.
थोडी अजून माहीती....थोडासा खुलासा.....
वरदा,
तुम्ही दिलेली माहिती आणि उपस्थित केलेले प्रश्न खरेच खूप छान आहेत.
पुढील लेखांमध्ये या प्रश्नांचा उहापोह सविस्तरपणे करेनच. पण सध्या तुम्हाला असलेल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करतो
ऍस्ट्रॉनमिकल युनिटला मराठीमध्ये खगोलीय एकक असे म्हणतात.
या माहीतीबद्दल धन्यवाद. यालाच ज्योतिषीय एकक असेही एक नाव आहे.
काक्षी हा तारा कोणत्या तारकासमूहामध्ये आहे?
काक्षी हा मृग नक्षत्रातील तांबूस दिसणारा तारा आहे. बहुतेक बेटेलग्युज म्हणून सांगितले तर तुम्ही लगेच ओळखाल. हा तारा राक्षसी तारा असून सूर्यापेक्षा ४०० पट मोठा आहे. या तार्याबद्दल मी राक्षसी तारे या लेखात लिहीनच. पण थोडी वाट पहावी लागेल.
एक प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षामध्ये निर्वात पोकळीमध्ये कापलेले अंतर. प्रकाशाचा वेग तो प्रवास करत् असलेल्या माध्यमाच्या अपवर्तनांकावर (रिफ्रॅक्टिव इंडेक्स) अवलंबून (अपवर्तनांकाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो) असतो. काचेमध्ये प्रकाशाचा वेग हा हवेतील वा निर्वात पोकळीतील वेगापेक्षा कमी असतो. त्यामुळे निर्वात पोकळीचा प्रकाशवर्षाच्या व्याख्येमध्ये समावेश असणे गरजेचे आहे.
तुमचे म्हणणे योग्य आहे वरदा. पण तारा ते आपण यामधील अवकाशात काच वगैरे काही नसणारच या गृहीतकावरच मी हा खुलासा केला नव्हता. बाकी प्रकाशाची अंतराळातील , काचेतील व पाण्यातील गती हा एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. माझी तुम्हाला विनंती आहे की या बाबत आपणाकडे जास्त माहीती असेल तर कृपया तुम्ही लेखन करा. तसे झाले तर खूप आनंद होईल.
धन्यवाद
सागर
आवडला!
लेख आवडला,
अजून येऊ देत...
आपला
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)
आणी हो नेहमी प्रमाणेच! माफक गप्पा टप्पा आणि विषयाला धरुन (!) थोडेसे विषयांतर या कोलबेरच्या समर्थनाचे मी समर्थन करतो!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
धन्यवाद गुंडोपंत,
लवकरच अजून लेख लिहिन.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
सागर
दिलेल्या माहितीवरून ....
दिलेल्या माहितीवरून खालील अनुमाने निघतात :
१) १ प्रकाशवर्ष = ६३०७२ ऍस्ट्रॉनॉमिकल् युनिट्स्
२) पृथ्वीपासून (किंवा सूर्यमालेपासून म्हणा) जसजसे अंतर वाढत जाते तसतसे अवकाशांतील वस्तुमान अधिकाधिक विरळ होत जाते.
डार्क मॅटर
पृथ्वीपासून (किंवा सूर्यमालेपासून म्हणा) जसजसे अंतर वाढत जाते तसतसे अवकाशांतील वस्तुमान अधिकाधिक विरळ होत जाते.
शरदराव
आपण खगोलभौतीकीमधला एक अत्यंत महत्वाचा आणि अजून न सुटलेला प्रश्न उपस्थित केला आहे. आकाशगंगांचे गणित करुन काढलेले वस्तुमान आणि प्रयोगावरून काढलेले वस्तुमान यात बरीच तफावत असल्याचे आढळून आले आहे. ह्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी डार्क मॅटरची संकल्पना मांडण्यात आली. डार्क मॅटरवरून कुठल्याही तरंगलांबीचा प्रकाश परावर्तित होत नाही. मात्र याचे अस्तित्व इतर दिसणार्या वस्तूंवरील गुरूत्वाकर्षणाच्या प्रभावांमुळे दिसू शकते. या संकल्पनेचा उपयोग इतर गोष्टी स्पष्ट करण्यासाठीही होतो उदा. विश्वाचे स्वरूप ( Structure of the Universe). अधिक माहिती इथे मिळू शकेल.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
माझी मर्यादा
राजेंद्र यांस,
आपण दिलेला दुवा उघडून पाहिला. "डार्क् मॅटर" वरील मजकूर समजण्याइतके संबंधित विषयांचे ज्ञान मला नाही. मात्र त्याबद्दल कुतूहल जरूर आहे.
शरद् कोर्डे
चांगला दुवा
शरदराव,
हा विषय गहन आहे आणि घाईत शोधल्यामुळे माझा दुवाही तितका योग्य नव्हता, त्याबद्दल क्षमस्व. हा दुवा पहावा. यातील स्पष्टीकरण चांगले आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
डार्क मॅटर म्हणजेच तेजोमेघ असे वाटते
राजेंद्र,
तुम्ही दिलेल्या दुव्यावरील माहीती वाचली. तेथे असे लिहिले आहे की या डार्क मॅटरचे तापमान अतिउच्च असते.
ही माहीती तर आपल्या मराठीतील "तेजोमेघ" या संकल्पनेशी जुळते. डार्क मॅटर म्हणजेच तेजोमेघ असे वाटते. कारण तेजोमेघ हे असे ठिकाण असते की जेथे अतिउच्च तापमान असते आणि जेथे तार्यांची निर्मिती होते.
"पं.महादेवशास्त्री जोशी " यांच्या "नक्षत्रलोक" या पुस्तकात यावर मला माहीती वाचावयास मिळाली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय किर्तीचे प्रख्यात मराठी शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांच्या "अवकाशाशी जडले नाते" या सुंदर पुस्तकात सविस्तर वाचावयास मिळाले.
जिज्ञासूंनी अधिक माहीतीसाठी ही २ पुस्तके अवश्य वाचावीत.
धन्यवाद
सागर
तेजोमेघ
सागर,
तेजोमेघ म्हणजे नक्की काय ते कळाले नाही. याबद्दल अधिक माहिती देऊ शकाल काय? तसेच उपलब्ध असल्यास कंसात इंग्लिश शब्द दिला तर कळायला सोपे व्हावे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
तेजोमेघ म्हणजे नेब्युला
राजेंद्र ,
इंग्रजीत तेजोमेघाला नेब्युला म्हणतात.
क्रॅब नेब्युला हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे.
पण डार्क मॅटरबाबत तुम्ही दिलेल्या दुव्यावर जी लक्षणे दिली आहेत ती बर्याच प्रमाणात तेजोमेघ शी जुळतात म्हणून मी हा मुद्दा उपस्थित केला होता.
धन्यवाद
सागर
वेगळे
आकाशाशी जडले नाते ची पारिभाषिक सूची काढून पाहिली असता तेजोमेघ साठी bright cloud तर dark matter साठी कृष्णपदार्थ असे शब्द दिलेले दिसले. ज्या अर्थी हे दोन वेगवेगळे शब्द आहेत, व त्यातून परस्परविरोधी गुणांचा बोध होतोय, त्याअर्थी या दोन वेगवेगळ्या गोष्टी असाव्यात असे प्रथमदर्शनी तरी वाटते. तेजोमेघ व कृष्णपदार्थ दोन्हींवरील लेख वाचून (ते कळल्यास) बघावे लागेल.
राधिका
लवकरच अधिकृत माहिती देतो
या माहीतीबद्दल धन्यवाद राधिका,
मला वाटते की तेजोमेघ आणि कृष्णपदार्थ (कृष्णमेघ हे देखील नाव मला सापडले आहे) या संकल्पनेत थोडासा घोळ होतो आहे
माझ्याकडे हे पुस्तक आहे तेव्हा मी लवकरच याबाबत खात्री करुन घेतो आणि मगच जास्तीची माहीती देतो.
सागर
पदार्थाचे अविनाशित्व संशयास्पद
राजेंद्र यांस
नवीन दुव्यांतील मजकूर समजण्यासारखा आहे. त्यावरून व सागर यांच्या प्रतिसादावरून असे दिसते की अवकाशांत जिथे कधीकाळी काहीच नसते तिथे काही काळानंतर matter अस्तित्वांत येते. जर दुव्यांत म्हंटल्याप्रमाणे "डार्क् मॅटर्" अगोचर (invisible) असेल तर त्या ठिकाणी अगोदर असलेला पदार्थ नष्ट झाला असला पाहिजे. या दोन्ही गोष्टी पदार्थविज्ञानांतील "पदार्थाचे अविनाशित्व" या तत्वाशी विसंगत वाटतात.
शरद् कोर्डे
अवघड
शरदराव,
आपला प्रश्न अवघड आहे. डार्क मॅटरचे नक्की स्वरूप काय असते याचा अजून पत्ता लागलेला नाही. त्यामुळे ते कसे तयार होते हे सुद्धा कोडे आहे. डार्क मॅटर तप्त आणि थंड अशा दोन प्रकारांमध्ये असते. थोडक्यात हा विषय सध्या तप्त (hot) आहे आणि आत्ताच याबद्दल निष्कर्ष काढणे अवघड आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
जेंव्हा नव्हते चराचर...
दुवा पाहिला. ' जेंव्हा नव्हते चराचर - तेंव्हा होते पंढरपुर ' च्या चालीवर 'जेंव्हा बनले चराचर - तेंव्हा बनले डार्क म्याटर' असे म्हणावेसे वाटले.
आता डार्क म्याटर - लाईट म्याटर - अँटी म्याटर बद्दल वाचायला हवे.
जेव्हा
जेव्हा नव्हते चराचर..
याचा बिग बँगच्या आधी.. असाही होऊ शकेल. आणि तेव्हा काय होते (ज्याला सिंगुलॅरिटी म्हणतात) ते अजून कोडेच आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
एवढ्या अंतरावरचे डार्क मॅटर खूप मोठे आकारमानाचे असणे आवश्यक आहे
कोर्डेसाहेब,
तुमचा मुद्दा एकदम बरोबर आहे.
दुव्यांत म्हंटल्याप्रमाणे "डार्क् मॅटर्" अगोचर (invisible) असेल तर त्या ठिकाणी अगोदर असलेला पदार्थ नष्ट झाला असला पाहिजे.
अगोदरचा पदार्थ नष्ट होणे ही प्रक्रीया तेजोमेघाशी काही प्रमाणात संबंधित आहे. सुपरनोव्हा (तार्याचा स्फोट) ही प्रक्रिया अगोदरचा पदार्थ नष्ट करण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता जास्त आहे.कारण आपल्याला जाणवण्याइतपत डार्क मॅटरचे अस्तित्त्व तेव्हाच असू शकते जेव्हा ते मोठ्या प्रमाणात असते. (थोडक्यात म्हणजे एवढ्या अंतरावरचे डार्क मॅटर खूप मोठे आकारमानाचे असणे आवश्यक आहे)
सागर
कोर्डेसाहेब, ....काही विचार ...
कोर्डेसाहेब,
१) १ प्रकाशवर्ष = ६३०७२ ऍस्ट्रॉनॉमिकल् युनिट्स्
तुमचा पहिला मुद्दा एकदम बरोबर आहे.पण तार्यांमधील अंतर मोजण्यास वापरला जात नाही.
२) पृथ्वीपासून (किंवा सूर्यमालेपासून म्हणा) जसजसे अंतर वाढत जाते तसतसे अवकाशांतील वस्तुमान अधिकाधिक विरळ होत जाते.
पण दुसर्या विधानाबाबत मी काही विचार मांडू इच्छीतो
हे विधान सत्य असले तरी अर्धसत्य आहे. मी त्यात थोडी भर घालू इच्छीतो.
आपल्यापासून जसजसे अंतर वाढत जाते तसे अवकाशातील वस्तुमान विरळ होत नाही तर अवकाश तरल होत जाते असे म्हणता येईल.
कारण वस्तुमान हे वस्तूला अस्तित्त्व देते (म्हणजेच जडत्व देते). जसे पृथ्वीला , इतर ग्रहांना वस्तुमान आहे. त्यामुळे त्यांना आकार आहे, आपण सर्व सजीव / निर्जीव आहोत. अंतर जसजसे वाढत जाते तसतसे अंतराळातील निर्वात पोकळी वाढत जाते. (मला वाटते की तुम्हाला हेच सूचित करावयाचे होते). पण वाटेत तारा वा ग्रह वा धूमकेतू आला की पुन्हा वस्तुमान हे येणारच. मग ते कमी वा अधिक प्रमाणात आहे हे ज्या त्या तार्या-ग्रहा-धूमकेतूवर अवलंबून असणार. होय की नाही?
धन्यवाद
सागर
चांगली
सागर
माहिती उपयुक्त आहे. लेख थोडा विस्तृत झाला तरी चालेल.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद राजेंद्र
प्रतिसादाबद्दल धन्यवाद राजेंद्र,
यापुढील लेख नक्कीच विस्तृतपणे देईन
धन्यवाद
सागर
अंतरे
आपल्याला लहानपणापासून जी अंतरे पटदिशी अनुभवता येतात ती आपण सुटसुटीतपणे वापरू शकतो. खगोलशास्त्रामधील अंतरांबाबत आपली मती खूपच थिटी पडते. एका बिंदूपलिकडे सर्व अंतरे खूप मोठ्ठी यापलिकडे आकलन होत नाही. हीच परिस्थिती कालमापनाबाबतही आहे. ही संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी हा दुवा पहावा.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
चांगली सुरुवात आणि चांगली चर्चा
... आणखी लेखांची वाट पाहतो आहे.
एकलव्य आणि सर्वच वाचकांची क्षमा मागतो
एकलव्य आणि सर्वच वाचकांची क्षमा मागतो
कार्यालयीन व्यस्ततेमुळे येथे लेखन करणे अजिबात शक्य झाले नाही.
सोमवारी किंवा मंगळवारी राक्षसी तारे ही लेखमाला सुरु करेन.
तोपर्यंत कृपया सर्वांनीच वाट पहावी ही विनंती
धन्यवाद
सागर
अजून थोडसं ..
प्रकाशाचा वेग सगळ्या माध्यमात सारखाच असतो. एखाद्या पदार्थातून प्रवास होत असताना त्या पदार्थाचे अणु कण (इलेक्ट्रोन) प्रकाश/उर्जा शोषून घेतात. वरच्या एनर्जी लेव्हलला उडी मारण्या इतकी उर्जा न मिळाल्याने ते घेतलेली उर्जा परत उत्सर्जित करतात. ह्या प्रक्रियेमध्ये वेळ जातो. म्हणून त्या माध्यमातून बाहेर पडायला प्रकाशाला वेळ लागतो.