मराठी व मराठी समाजाच्या विकासासाठी आपण काय करु शकतो?

मुंबई, पुण्या सारख्या शहरांमधुन विविध क्षेत्रांमध्ये होत असलेले परप्रांतियांचे अतिक्रमण हा सध्या अनेकांच्या चिंतेचा आणि चर्चेचा विषय आहे. भारतात लोकशाही आहे, त्यामुळे कोणीही नागरिक कुठेही जाऊन कायमस्वरुपी वास्तव्य करू शकतो. त्याविषयी कुणाला आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु असे बाहेरुन आलेले लोक जेंव्हा स्थानिकांच्या हक्कांवर जाणून बुजून गदा आणू पाहतात, तेंव्हा मात्र त्यांना रोखणे आवश्यक ठरते. बर्‍याचदा असे लोक स्थानिक संस्कृती बिघडविण्याचा प्रयत्न करतात. अशा आक्रमणाला कसे रोखावे या गोंधळात अनेकदा हिंसक प्रतिक्रिया उमटते.

आता ह्या काही घटना पहा.

  • मागे काही वर्षांपूर्वी जेंव्हा महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांमध्ये (इंग्रजी व अन्य भाषिक) पहिली पासून मराठी सक्तिचे करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा अनेक प्रसिध्द अमराठी व्यक्तिंनी याचा केवळ विरोधच केला नाही, तर त्याला कोर्टातही आव्हान दिले होते. तीन वर्षांपूर्वी कोर्टाने शासनाच्या बाजूने निकाल दिला. परंतु अजुनही अमराठी मंडळींच्या दबावामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
  • तीन वर्षांपूर्वी कल्याणला रेल्वे भरतीसाठी उत्तर प्रदेश, बिहार मधुन आलेल्यांची भुमिपुत्रांनी पिटाई केली. संसदेपासून संपूर्ण देशभरात निषेधाचे कडक सूर ऊमटले. त्यानंतर काही महिन्यांनी आसाममध्ये परप्रांतिय कामगारांवर अतिशय हिंसक हल्ले झाले. एखाद दुसरी बोंब वगळता बाकी चिडीचुप.
  • दहावी / बारावीचे निकाल लागले. मुंबईमधली अनेक महाविद्यालये ही अल्पसंख्यांक प्रवर्गातील आहेत. अशा महाविद्यालयांमध्ये संबंधित अल्पसंख्यांक समाजाला ५० % आरक्षण असते. उदा. खालसा महाविद्यालयात पंजाबी भाषिकांना तर एसआईएस मध्ये दाक्षिणात्यांना प्रवेशासाठी प्राधान्य मिळते. परिणामी मराठी विद्यार्थ्यांसाठी फारच कमी महाविद्यालये उरतात. मुंबई मध्ये आता तर्कदृष्ट्या गुजराती, उत्तर भारतीय अल्पसंख्य राहिले नाहित. दाक्षिणात्यांची संख्याही मोठी आहे. मराठी भाषिकांचे प्रमाण जवळपास २८ ते ३० % वर आले आहे. परंतु असे असूनही नियमानुसार वझे केळकर सारख्या महाविद्यालयांना मात्र मराठी विद्यार्थ्यांना प्राधान्य देता येत नाही. म्हणजेच अमराठी विद्यार्थी ५०% कोट्यातून प्राधान्याने प्रवेश तर मिळवतातच परंतु उरलेल्य़ा ५० % मध्येही पैशांच्या बळावर प्रवेश मिळवतात.

अशा गोष्टींची यादी न संपणारी आहे. आपल्यापैकी अनेकांना याचा मनस्वी संताप येतो, परंतु याविरोधात काही करण्यासाठी योग्य मार्ग नसतो. मला वाटतं परप्रांतियांना शिव्या घालुन किंवा मारहाण करुन आपण आपला उत्कर्ष साधू शकत नाही. यात आपण आपला खारीचा वाटा उचलल्यास मराठी समाजाच्या विकासास हातभार लागू शकेल. सध्याचे युग हे ज्ञानयुग आहे. सुदैवाने आपल्या समाजास बौध्दिक संपदेचा संपन्न वारसा लाभला आहे. उपक्रम तसेच अन्य संकेतस्थळांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने विविध विषयांमध्ये पारंगत आणि ज्ञानी मराठी लोक एकत्र येत आहेत. इंटरनेट या माध्यमाचा सुयोग्य उपयोग करून आणि आपला किमान वेळ देऊन आपण काही गोष्टी करु शकतो. माझा या करिता खालील प्रमाणे प्रस्ताव आहे.

१. एक विना लाभ (नॉन प्रॉफिट) संस्था स्थापन करावी. मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणार्‍या विविध संस्था व व्यक्तिंना मदतीचे स्त्रोत उपलब्ध करून देणे असे संस्थेच्या कामाचे मुख्य स्वरूप असावे. या संस्थेच्या माध्यमातून खालील गोष्टी करता येतील.

२. अनेकजण व्यक्तिगतरित्या माहिती तंत्रज्ञान व संगणक क्षेत्रात मराठीच्या विकासासाठी संशोधन करीत आहेत. अशांना मदत करणे व अशा प्रयत्नांना सामुहिक स्वरुप देणे आणि ते तंत्रज्ञान समाजाला उपलब्ध करुन देणे.

३. मराठी विद्यार्थ्यांसाठी दहावी, बारावी तसेच पदवी परिक्षे नंतर उपलब्ध विविध व्यावसायिक अभासक्रमांची माहिती देणारे व मार्गदर्शन करणारे संकेतस्थळ उभारणे.

४. नवीन व्यवसाय सुरु करु इच्छिणार्‍यांसाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून मदत व मार्गदर्शन करणे.

सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास वरील गोष्ट अवघड नाही असे मला वाटते. आपण यावर चर्चा करुन आपल्या सूचना मांडाव्यात.

-जयेश

Comments

मान्य

आपले विचार आणि प्रस्ताव मान्य आहेत. या वर्षी प्रशासकीय सेवेच्या परिक्षांमधे आपल्या बर्‍याच मुलांनी चांगले क्रमांक पटकावले.

कारणे काहीही असोत स्वातंतत्र्यानंतरचा काही काळ हा "मराठी माणूस" म्हणून "तमसात" गेला. मी "तमस" हा शब्द जसा "अंधार" या अर्थानी वापरत आहे तसाच "तामसीक" या अर्थाने पण वापरत आहे. पण गोष्टी काही अंशी का होईना "चांगल्यासाठी" बदलत आहेत आपण सर्वांनी त्याला अजून बळ मिळवून देयचा प्रयत्न करणे महत्वाचे.

इंग्रजी शिक्षण आवश्यक

भारतात उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय यशस्वी होत असताना महाराष्ट्रीय समाज तुलनेने मागे पडत आहे हे वस्तुस्थिती आहे. त्याची कारणे अनेक आहेत.

उत्तर भारतीयांची मातृभाषा असलेल्या हिंदीचा स्वीकार केंद्र सरकार व १०-११ राज्यांमध्ये शासकीय व वैयक्तिक पातळीवरही सहजपणे होतो. या भाषेच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या परीक्षांमध्येही हे लोक यशस्वी ठरतात. दक्षिण भारतीय राज्यांचा हिंदीला असलेल्या विरोधामुळे त्यांनी इंग्रजीचा स्वीकार करुन ती आत्मसात केली व प्रगतीच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले.
मराठी माणसाचा गोंधळ हिंदी की इंग्रजी असा पूर्वापार चालू आहे. उगाचच देवनागरीत लिहितात म्हणून हिंदी "जवळची" आहे असे मानून इंग्रजीचा दुस्वास करण्याचे काम आपले आजी-माजी राजकारणी, लेखक व तथाकथित विचारवंतांनी केले.

येथे एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते. एका शास्त्रज्ञाकडे एक मोठा कुत्रा व त्याचे पिल्लू होते. प्रयोगशाळेमध्ये प्रयोगात व्यस्त असताना कुत्र्याला व पिल्लाला बाहेर जाण्यासाठी सारखे दार उघडावे लागत असल्यामुळे त्याने मोठ्या कुत्र्यासाठी एक मोठे व लहान कुत्र्यासाठी एक लहान अशी दोन छिद्रे भिंतीला पाडून ठेवली. मात्र मोठ्या छिद्रातून लहान कुत्रा जाऊ शकतो हे त्याच्या लक्षात आले नाही!

हीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या भाषाशिक्षणाची आहे. राज्यातील नागरिकांशी संवाद साधताना मराठी पुरेशी आहे.

इतर सर्वांशी संवाद साधताना फक्त इंग्रजी अशी साधी सोपी आखणी करण्याऐवजी हिंदीचे लोढणे गळ्यात घालून घेऊन ते मंगळसूत्र म्हणून मिरवण्याचा मराठी सतीसावित्री खटाटोप काही पटत नाही. जर भारताबाहेरील अमराठी लोकांशी संवाद साधताना इंग्रजी वापरता येते तर भारतातील अमराठी लोकांशी संवाद साधताना तीच वापरायला काय हरकत आहे.

इंग्रजीचा सर्व पातळयांवर प्रसार करुन मराठी माणसाचा न्यूनगंड संपवण्याचे काम करणे गरजेचे आहे. इतरांचा दुस्वास करण्याऐवजी मराठी माणसाच्या क्षमता कशा वाढतील याचा विचार करणे आवश्यक आहे.

या विषयावर काही सुंदर विचार एका शिवसैनिकाने मांडले आहेत ते अवश्य वाचा.

याचबरोबर मनोगतावरील ही चर्चाही उद्बोधक आहे.

वाघिनिचे दूध

एका शास्त्रज्ञाकडे एक मोठा कुत्रा व त्याचे पिल्लू होते. प्रयोगशाळेमध्ये प्रयोगात व्यस्त असताना कुत्र्याला व पिल्लाला बाहेर जाण्यासाठी सारखे दार उघडावे लागत असल्यामुळे त्याने मोठ्या कुत्र्यासाठी एक मोठे व लहान कुत्र्यासाठी एक लहान अशी दोन छिद्रे भिंतीला पाडून ठेवली. मात्र मोठ्या छिद्रातून लहान कुत्रा जाऊ शकतो हे त्याच्या लक्षात आले नाही!

अम्हि हि गोष्ट् मांजराबाबत् आणि कधि आइनस्टाईन तर् कधि न्युटन बाबत ऐकली होती.
अन् ते विंग्रजीला म्हने इष्नुशास्त्री चिपळून्करांनी वाघिनिचे दूध म्हन्ले व्हते.
प्रकाश घाटपांडे

महत्तवाचे

आपण काही करु शकतो ते म्हणजे आपण आपल्या क्षेत्रात "उत्तम" आणि "क्रिएटिव्ह" काम करावे. आणि जागतिक स्पर्धा कुठल्यादिशेने चालली आहे याचे भान असावे.

 
^ वर