प्रमाणभाषा वि. बोलीभाषा

वर्णमाला- (समज- गैरसमज) या लेखातून प्रमाणभाषा वि. बोलीभाषा ही चर्चा बाजूला काढली आहे. इच्छुकांनी येथे चर्चा करावी.

वर्णमाला ही पुढे प्रमाण भाषेची अस्मिता जन्माला घालते. बोली भाषा हा प्रकार अस्मिता बाळगण्याचा आहे हे विद्रोही चळवळीने दाखवून दिले. प्रमाणभाषेचा आग्रह हा उच्चवर्णीयांचा कावा असून चातुर्वण जपणार्‍या मनुवादी संस्कृतीचा अविष्कार आहे, अशा आशयाची मांडणी केली जाते. दया पवारांच 'बलुतं 'छापताना मुद्रितशोधकाने अनेक चुका काढल्या होत्या, इतक्या कि त्यामुळे पुस्तकाचा ढाचाच बदलत होता, असे ऐकीवात आहे. आता व्याकरणातील चुकांना केवळ माफी नसून प्रतिष्ठा आहे. शेवटी भाषा हे विचार व भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे. त्याला व्याकरणाच्या चौकटीत बंदिस्त केले तर काही तरी घुसमट होणारच, पण त्याचबरोबर व्याकरणाची शिस्त नसेल तर भाषा भरकटत जाण्याची भीती.
(प्रामाणिक भाषा मानणारा)
प्रकाश घाटपांडे

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रमाण भाषा

आपण मंडळीं प्रमाण भाषेसंबंधी काहीतरी गैरसमज करून घेतो आहोत. भाषेमध्ये बोलणे आणि लिहिणे ह्या दोन गोष्टींचा समावेश होतो. स्थानिक वेळ जशी दर रेखांशागणिक बदलते तशी बोलण्याची भाषा दर बारा कोसावर बदलते असे म्हणतात. म्हणून कोणी रोजच्या व्यवहारात स्थानिक वेळ वापरत नाही. एकमेकांच्या वेळा सांभाळता याव्यात म्हणून प्रंमाण वेळ असते. तसेच प्रमाण भाषेचे. त्यामुळे कुणी वर्‍हाडी , अहिराणी किवा कोकणीत बोलण्यार्‍याला हसला तर तो कुचेष्टेने हसतो आहे असा गैरसमज करून घेण्याचे काहीच कारण नाही. हेल काढून बोलल्या जाणार्‍या कन्नड, तमिळ भाषा ऐकताना गंमत वाटते आणे त्यांची नक्कल करावीशी वाटते यात काही नवे नाही.
प्रत्येक भाषेचे लिहिण्याकरिता निश्चित केलेले एक प्रमाण रूप असते. त्यात कालांतराने थोडाफार फरक होत असला तरी ते त्या विशिष्ट काळातील ती प्रमाण भाषा असते. मराठीकरिता प्रख्यात इंग्रज पंडित थॉमस कॅन्डीने केलेल्या व्याख्येनुसार पुण्यातल्या सदाशिव पेठेत बोलल्या जाणार्‍या ब्राह्मणांची भाषा प्रमाण समजली जाते. त्यांच्यापेक्षा अघिक चांगली बोलणारा प्रदेश आढळला तर त्या व्याखेत जरूर बदल करता येईल. तूर्त तशी आवश्यकता भासलेली नाही. अहमदाबादमधील एका कोटाच्या आतल्या भागात राहणार्‍या नागर ब्राह्मणांची भाषा प्रमाण गुजराथी समजली जाते, कलिकात्यातील विशिष्ट वस्तीत राहण्यार्‍या भद्र लोकांची प्रमाण बंगाली तर लंडनच्या दक्षिण भागात पब्लिक स्कूल्जच्या आसपास बोलली जाणारी प्रमाण इंग्रजी . बोलताना आपली मातृबोली जरूर वापरावी, पण लिहिताना असा आग्रह धरला तर अनर्थ होईल.--वाचक्‍नवी

मुळचे कोकणातले!

वाचनक्वीन साहेब,

पुण्यातल्या सदाशिव पेठेत बोलल्या जाणार्‍या ब्राह्मणांची भाषा प्रमाण समजली जाते.

पुण्यातील सदाशिव पेठेतील ब्राह्मण हे मुळातले आमच्या कोकणातले बरं का! ;) यांचे पूर्वज हे कोकणातलेच. पेशव्यांच्या काळापासून कोकणातले बरेचसे ब्राह्मण हे कोकण सोडून पुण्यात पेशव्यांच्या दरबारी कामधंद्याच्या निमित्ताने आले.

त्यामुळे प्रमाण भाषेचंच जर म्हणत असाल तर तिचे मूळ उगमस्थान कोकणात आहे!

बाकी प्रमाणभाषा नेमकी कुठली?, कोणती? या वादात मला पडायचं नाही. आपण पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या ब्राह्मणांचा विषय काढलात म्हणून मी पुस्ती जोडली इतकंच!

बाकी तुमचं चालू द्या!

आपला,
(जिथेतिथे कोकणची टिमकी वाजवणारा कोकणचा दुराभिमानी ;)
तात्या देवगडकर.

प्रकाटाआ

प्रकाटाआ
प्रकाश घाटपांडे

कसली प्रमाण भाषा?

पुण्यातल्या सदाशिव पेठेत बोलल्या जाणार्‍या ब्राह्मणांची भाषा प्रमाण समजली जाते. त्यांच्यापेक्षा अघिक चांगली बोलणारा प्रदेश आढळला तर त्या व्याखेत जरूर बदल करता येईल.

अहो पण 'चांगली भाषा' म्हणजे काय? नागपूरकरांना नागपूरची भाषा चांगली, कोल्हापूरकरांना कोल्हापूरची भाषा चांगली आणि कोकणातल्या माणसांना कोकणी मराठी चांगली!! मग अधिक चांगली मराठी बोलणारा प्रदेश कसा शोधून काढणार तुम्ही?

जी गोष्ट एक आणि एकाच व्याख्येत बसवता येत नाही ती अस्तित्वात नसते या मताचा मी आहे. पुण्याच्या सदाशिव पेठेतली भाषा प्रमाण कुणी ठरवली? इंग्रज पंडित थॉमस कॅंडीने ? हा कोण पंडित आमच्या मराठी भाषेची व्याख्या करणारा?

(प्रमाण भाषेचं अस्तित्व न मानणारा) रम्या.

थॉमस कँडी

मेजर थॉमस कँडी हे पुणे संस्कृत महाविद्यालयाचे मुख्याध्यापक होते. १८३१ साली त्यांनी जेम्स थॉमस मोल्जवर्थ बरोबर पहिला मराठी-इंग्रजी शब्दकोश प्रकाशित केला. जो आजही महाजालावर अनेकजण डोळे झाकून वापरतात. मराठी भाषेला विरामचिन्हांची ओळख करून देण्याचे श्रेय त्यांनाच जाते.

बोली ती बोलीच.

वाचक्‍नवी,
काय कठीन हे राव तुमचे नाव.असो, प्रमाण भाषेचे समर्थन करणारे प्रमाण भाषा कशी आवश्यक आहे,यासाठी आपण जी उदा.दिलीत,अगदी तसेच गोड-गोड बोलुन प्रमाण भाषेचे महत्व पटवुन देतात.आणि ते पटतेही.पण ज्या भाषेतुन उत्तम अभिव्यक्त होता येते ती प्रमाणभाषा मानली पाहिजे.त्यासाठी असेच बोलावे असा आग्रह काय कामाचा.विदर्भ,खानदेश,मराठवाडा(आमची तर एक अशी बोलीच नाही,अनेक बोलीं बोलल्या जातात) बोली भाषेतला गोडवा काय सांगु.

प्रमाणभाषेत व्यक्त करता येणार नाही अशी उदाहरणे पहा.
काया मातीत मातीत तीफन चालती ( विट्ठल वाघ विदर्भ)

अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर ( बहिणाबाईम,खानदेश)
आधी हाताला चटके मग मियते भाकर.

गुज बोले गुज बोले (मराठवाड्यातील एक कवी इंद्रजीत भालेराव)
गुज मिरोग बोलला
तेलपाणी लावा काय
आता तिफणी उचला

माझ्या कवितेने बोल
काळजातला बोलावा
उन्हाळ्यात खापराला
जसा असतो ओलावा.

असो,बोलीबद्दल फार बोलता येईल,बोलू सवडीने कधीतरी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटेसाहेब,

पण ज्या भाषेतुन उत्तम अभिव्यक्त होता येते ती प्रमाणभाषा मानली पाहिजे.त्यासाठी असेच बोलावे असा आग्रह काय कामाचा.

आपल्याशी सहमत आहे.

माझ्या कवितेने बोल
काळजातला बोलावा
उन्हाळ्यात खापराला
जसा असतो ओलावा.

वा! सुंदर ओळी!

असो,बोलीबद्दल फार बोलता येईल,बोलू सवडीने कधीतरी.

बिरुटेसाहेब, आपल्याकडून बोलीभाषेविषयी अधिक ऐकायला आवडेल. कारण बोलीभाषा हा माझ्याही अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. मी स्वतःही एकाच एक अश्या पद्धतीने मांडल्या गेलेल्या भाषेला प्रमाणभाषा मानत नाही. बोलीभाषेतदेखील एकाहून एक सरस लेखन झाले आहे!

असो!

गावरान कोल्हापुरी बोलीभाषेतल्या मला आवडणार्‍या चार ओळी लिहून माझं हे बोलीभाषेतलं भाषण संपवतो! ;)

या इंगळीचा कळला इंगा
खुळ्यावानी मी घातला पिंगा
मंतर घाला हलका हलका
नार चुकून फसली
ग बाई मला इष्काची इंगळी डसली!

आपला,
(इष्काची इंगळी आवडीने डसवून घेणारा!) तात्याभाऊ देवगडकर.

युयुत्सु, उपराकार लक्ष्मण माने - बलुतंकार दया पवार

उपराकार लक्ष्मण माने - बलुतंकार दया पवार - गोलपिठाकार नामदेव ढसाळ!

सहमत

दया पवारांचे आमच्या भाषेवर अत्यंत उपकार आहेत, असे त्यांच्या उपरा (बलुतं)वरून आम्हाला वाटले.

सहमत! बलुतं वाचल्यावर डेक्कन संस्कृतीतल्या काही सहृदय महिलांचे अंत:करण पिळवटून निघाले होते.

प्रकाश घाटपांडे

मराठी : जे बोलले , लिहीले -

आपण जे बोलू,लिहू ते मराठी! ते चूक, बरोबर - कोणी काय ठरवणार? काय म्हणता?

धन्यवाद.

उपक्रमराव, मी आपल्याला अशी चर्चा बाजूला काढण्याबद्दल विनंती करण्यासाठी खरड लिहायला घेतच होते, इतक्यात ही चर्चा वेगळी काढलेली दिसली. त्याबद्दल धन्यवाद.
राधिका

दोन व्यक्तिचित्रे

पु.लं ची 'सखाराम गटणे 'हे व्यक्तिचित्र प्रमाणभाषेचे उदाहरण आहे तर 'रावसाहेब' हे बोली भाषेचे उदाहरण आहे. "आपल्या साधनेत व्यत्यय तर आला नाही ना?" आणि "तब्ला वाजिवतो कि मांडी खाजिवतो" ही अनुक्रमे वाक्ये आठवून बघा.
प्रकाश घाटपांडे

बोली

राम राम !
पुण्यात सदाशिवात बोलली जाणारी भाषा ही तिथल्या लोकांची बोली आहे. काही पिढ्यांपासून ते लोक आणि ती बोली बोलणारे इतर अनेक लोक त्या बोलीचा वापर करताना आढळतात. ती बोली कुठेही काचेच्या पेटित बंद करुन वस्तूसंग्रहालयात ठेवली नसून ती इतर बोलीं प्रमाणे प्रवाही आहे. कोकणातले काही विशिष्ट शब्द त्या बोलीत पूर्वी वापरले जात, कोकणी हेल सुद्धा डोकावे पण कालांतराने ते शब्द व हेल आता वापरात कमी होत आहेत. हे तिच्या प्रवाही पणाचे प्रमाण आहे. त्यामुळे ती बोली सुद्धा बंदिस्त अथवा काटेकोर नियमात बद्ध नाही. तिला प्रमाण मानावे की नाही हा वेगळा प्रश्न आहे.
-- लिखाळ.

परदेशात भारतीयांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करावे असे मला वाटते.

चिरंतन वाद

अशा प्रकारचा वाद फक्त मराठीत नसून सगळीकडे आहे. प्रमाणभाषा कोणती मानायची हा सापेक्ष मुद्दा आहे. आणि एक बोली प्रमाणभाषा मानली तर ती इतरांपेक्षा उच्च असा समज चुकीचा आहे. इटलीमध्ये तस्कनी (मध्य-उत्तर इटली) भागातील बोली प्रमाण मानली जाते. दक्षिण इटलीमध्ये वापरतात ती बोलीभाषा (गॉडफादरमध्ये मायकेल-सोलाझ्झो भेटीदरम्यान सोलाझ्झो जी वापरतो ती) प्रमाणभाषेपेक्षा बरीच वेगळी आहे. या भागातील मंडळी जेवणाच्या टेबलावर (मेजावर?) एकत्र जमली की त्यांचेही याच विषयावर कडाडून वाद होतात. इंग्रजीमध्ये अमेरिकन आणि ब्रिटीश असे दोन प्रकार ठेऊन थोडा वाद मिटवला आहे. पण अमेरिकेतही वेगवेगळ्या भागातील बोलीमध्ये कमालीचे वैविध्य आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

बोली.

बोली अन प्रमाण,मला सारक्याच
नाराज चंद्र.
[उपक्रमवर लास्ट चार दिस]

प्रमाणभाषा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"प्रमाणभाषा कोणती?" हा वाद नंतर. आधी प्रमाणभाषा हवी का नको? ललित लेखनासाठी प्रमाणभूत भाषेचा आग्रह व्यर्थ आहे.तसे बंधन कोणीही प्रतिभावंत पाळणार नाही. आणि ते योग्यच आहे. पण वैचारिक लेखनासाठी तरी व्याकरणदृष्ट्या प्रमाणभूत अशी भाषा असावी की नसावी? आज वैचारिक लेखनात सुद्धा "त्यानं असं केलं ,त्यामुळं तसं झालं." अशी वाक्ये लिहिली जातात.टी.व्ही. वरील वार्तापत्रात "आजचं कमाल तापमान नांदगाव इथं ३७ अंश इतकं नोंदलं गेलं." असे सांगतात तेव्हा ते ऐकताना मला कसेसेच वाटते.

समजा एखाद्या परदेशी माणसाला मराठी भाषा शिकायची आहे. तर त्याने नेमकी कोणती भाषा शिकावी? प्रमाणभाषे अभावी त्याचा गोंधळ उडणार नाही काय? म्हणून ललित लेखन वगळता अन्य ग्रांथिक लेखनासाठी सर्वमान्य अशी प्रमाणभूत मराठी भाषा असणे आवश्यक आहे.

परदेशी सोडा हो!

परदेशी सोडा हो,
इथे किती मराठी लोकांना मराठी शिकायची आहे?
जे काही आहेत त्यांनाच कसाबसा प्रतिसाद ' भेटतो'
शेवटी वापरात जे सुलभ (वाटत) असेल तेच टिकेल.
असो,
आपला
(मराठीच्या धडपडीत सामील असणारा)
गुंडोपंत

;-)

"त्यानं असं केलं ,त्यामुळं तसं झालं." हे याऐवजी "त्याने असे केले, त्यामुळे तसे झाले." असं लिहीलं किंवा वाचलं तर मला कस्संसंच होतं..

अर्थात बातम्या सांगतानाचे वाक्य "तापमान नोंदले गेले." असंच लिहावं किंवा बोलावं. असं मला वाटतं.

अभिजित

आय हेट करण जोहर फॉर कुछ कुछ होता है|( कस्स्संसंच् होतं)

ग्रांथिक लेखनासाठी हवी

ललित लेखन वगळता अन्य ग्रांथिक लेखनासाठी सर्वमान्य अशी प्रमाणभूत मराठी भाषा असणे आवश्यक आहे.
माझीही हीच भूमिका आहे.

अबे

अबे तू बी काय आटवन करुन देल्ली मले भऊ!
ग्रांथिक शबुद जुनाचे भऊ बर्का...

महान !!

अबे तू बी काय आटवन करुन देल्ली मले भऊ!
ग्रांथिक शबुद जुनाचे भऊ बर्का...

हसून हसून पुरेवाट !!

प्रमाणभाषा वि. बोलीभाषा

इंग्रज पंडित थॉमस कॅंडीने ? हा कोण पंडित आमच्या मराठी भाषेची व्याख्या करणारा?--रम्या
मेजर थॉमस कँडी हे पुणे संस्कृत महाविद्यालयाचे मुख्याध्यापक होते. --प्रियाली
क्यांडीसाहेबांनी पुण्याला मराठी शिकवली."--युयुत्सु

थॉमस कॅन्डी इंग्‍लंडमधील हेलिबरी कॉलेजमध्ये प्रा.ईस्टविक यांच्याकडे मराठी शिकले. १८३७ मध्ये ते पुणे (संस्कृत) पाठशाळेचे प्रमुख व मराठी शाळांचे तपासनीस झाले. वीस वर्षे त्यांनी हे काम केले. कॅन्डीला मराठी व इंग्रजी या भाषा उत्तम कळतात म्हणून सरकारने त्यांच्याकडून इन्डियन पिनल कोड, सिव्हिल प्रोसीजर कोड व क्रिमिनल प्रोसीजर कोड यांची भाषांतरे करून घेतली. मराठीत चांगली भाषांतरे कशी करावीत याचे नियम त्यांनी तयार केले. भाषांतर करताना मुळातील सर्व विचार व्याकरणशुद्ध मराठीत कसे आणावेत, शब्दश: भाषांतर का टाळावे, परकीय शब्द मराठीत कसे लिहावेत वगैरे अनेक सूचना ते भाषांतरकर्त्यांना देत. कॅन्डीच्या पूर्वीची मराठी भाषा अत्यंत भोंगळ होती. एखादा विचार व्यक्त करण्यासाठी फार लांबण लावावी लागे. मराठी वाक्यरचनेतील शैथिल्य व अनिमियता काढून टाकून त्यांनी भाषेला बंदिस्तपणा आणला. त्यांनी लिहिलेल्या मराठी शब्दकोशाइतका चांगला कोश अजून निर्माण झालेला नाही. आजकालच्या मराठी शब्दकोड्यात येणारा जवळजवळ प्रत्येक शब्द त्यांच्या कोशात सापडतो. त्यांचा मृत्यू लोणावळ्यात विपन्नावस्थेत झाला. त्यांच्या निधनानंतर पुण्याच्या ब्राह्मणांनी सुतक पाळले.

पण ज्या भाषेतुन उत्तम अभिव्यक्त होता येते ती प्रमाणभाषा मानली पाहिजे.--डॉ. दिलीप बिरुटे
मूकबधिरांची भाषा, ट्रॅफिक सिग्नलची भाषा, हातवार्‍यांची भाषा, नृत्याची-संगीताची भाषा यांच्यातून उत्तम अभिव्यक्ती होते. पण म्हणून काही या प्रमाणभाषा होऊ शकत नाहीत.
बोली भाषेत लिहिले तर काय अनर्थ होईल, हे कळून घ्यायला आवडेल.- युयुत्सु
उघड आहे. विदर्भातल्या माडिया गोंडांच्या बोलीभाषेत येणारे गाटो(भात), मेंज(अंडे), उल्लिंग(कांदा), मंता(आहे) तिंदाना(खाणे ) इत्यादी शब्द वापरून पुस्तक लिहिले तर ते कुणाला समजेल?
पण अमेरिकेतही वेगवेगळ्या भागातील बोलीमध्ये कमालीचे वैविध्य आहे. --राजेन्द्र
अमेरिकेतच काय, पण इंग्‍लंडमध्ये पण बोलीमध्ये वैविध्य आहे. पण सर्वांची प्रमाण लिखित इंग्रजी एकच आहे .
टी.व्ही. वरील वार्तापत्रात "आजचं कमाल तापमान नांदगाव इथं ३७ अंश इतकं नोंदलं गेलं." असे सांगतात तेव्हा ते ऐकताना मला कसेसेच वाटते.--यनावाला
अर्थात बातम्या सांगतानाचे वाक्य "तापमान नोंदले गेले." असंच लिहावं किंवा बोलावं. असं मला वाटतं. --अभिजित

मलापण असेच वाटते.

लिखाण बोलण्यापेक्षा अधिक काळ टिकतं म्हणून लिखाणात अधिक काटेकोर राहावे का शुद्धलेखनाबद्दल, व्याकरणाबद्दल ?
संकेतस्थळावरील लेखन (विशेषतः प्रतिसाद) हे लेखन मानावे की संवाद ?
माझ्या मते, अशा संकेतस्थळांवर सदस्य संवाद साधायला लिहितात.
त्यात प्रमाणभाषेचा आग्रह धरावा का ? परदेशी माणसाने मराठी शिकावी, ती कुठली ?-युयुत्सु

लिहिण्यासाठी प्रमाण मराठी आणि बोलण्यासाठी बोलीभाषा! लिहिताना शुद्ध लिहावे, बोलताना समोरच्या माणसाला प्रेम, आदर, आपुलकी यापैकी जे वाटावे असे वाटते त्याला साजेसे बोलावे. नाटकातील पात्रांच्या तोंडी, ललित लेखनामध्ये प्रत्यक्ष बोललेले किंवा मनात आलेले शब्द लिहिताना बोलीभाषा जरूर लिहावी. रेडिओवर वाचण्याकरिता लिहिलेले भाषण जर बोलीभाषेत नसेल तर ते तसे लिहून आणायला सांगतात. त्याशिवाय त्याला अधिकार्‍यांची संमती मिळत नाही. याशिवाय अन्यत्र लिहिलेली बोलीभाषा मराठी साहित्य महामंडळाच्या लेखनविषयक (तेराव्या) नियमानुसार निषिद्ध आहे. असे लिखाण अशुद्ध गणले जाते.

पुलंना पुण्यात येण्यापूर्वी बजावले होते, "की बाबा, तू जातोयस खरा पण तुझा तिथे निभाव लागणार नाही! पुण्याची माणसे पुस्तकातले छापील मराठी बोलतात!!
यावरून पुण्यात पुस्तकातली छापील मराठी ही बोलीभाषा होती हे सिद्ध होते. हीच प्रमाण मराठी.
हा उपदेश नाही. हे माझे प्रामाणिक मत आहे. इतरांना ते पटेलच असे नाही. पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना ॥

वाचक्‍नवी

लांच्छनास्पद!

मराठीत चांगली भाषांतरे कशी करावीत याचे नियम त्यांनी तयार केले. भाषांतर करताना मुळातील सर्व विचार व्याकरणशुद्ध मराठीत कसे आणावेत, शब्दश: भाषांतर का टाळावे, परकीय शब्द मराठीत कसे लिहावेत वगैरे अनेक सूचना ते भाषांतरकर्त्यांना देत. कॅन्डीच्या पूर्वीची मराठी भाषा अत्यंत भोंगळ होती. एखादा विचार व्यक्त करण्यासाठी फार लांबण लावावी लागे. मराठी वाक्यरचनेतील शैथिल्य व अनिमियता काढून टाकून त्यांनी भाषेला बंदिस्तपणा आणला. त्यांनी लिहिलेल्या मराठी शब्दकोशाइतका चांगला कोश अजून निर्माण झालेला नाही.

हे आज सगळे नव्यानेच कळते आहे. ते जर सर्व खरे असेल (अर्थात सदर सदस्याने ते अभ्यासपूर्णच लिहिले असावे,) तर एका गोर्‍या परकीयाकडून आम्हाला आमचीच मातृभाषा शिकायला लागावी ही मला शरमेची गोष्ट वाटते!

आपला,
(शरमेने मान खाली गेलेला) तात्या.

मजकूर संपादित. कृपया, उपक्रमावरील सदस्यांच्या नावांचा उल्लेख योग्य प्रकारे करावा.

कँडीसाहेबाचे कौतुकच, पण..

यात कँडीसाहेबाचे कौतुकच आहे, पण जी गोष्ट हा गोरा परकीय करू शकला ती आम्हाला का नाही करता आली?

तात्या.

माडिया गोंडांची बोलीभाषा

उघड आहे. हे पुस्तक माडिया गोंडांना समजेल.

माडिया गाँडांची लोकसंख्या पाच- सहा हजार. पुस्तकाच्या प्रती फारतर दोनतीनशे छापता येतील. माडिया बोलीला लिपी नाही. त्यामुळे पुस्तक तेलुगू, देवनागरी किंवा रोमन लिपीत छापावे लागेल. मग ते होतेच आहे. माडिया गोंडाच्या मुलांकरिता प्राथमिक पुस्तके त्यांच्या भाषेत आणि देवनागरी लिपीत असतात. या पुस्तकांद्वारे ते प्रमाण मराठी शिकतात आणि पुढे मोठीमोठी मराठी, इंग्रजी पुस्तके वाचतात. ही मोठमोठी पुस्तकेसुद्धा त्यांच्या भाषेतच पाहिजे असा आग्रह धरणे वेडेपणाचे आहे. शेवटी काय, ग्रांथिक भाषा प्रमाण मराठी पाहिजे यावर शिक्कामोर्तब होते. --वाचक्नवी

अनावश्यक स्वरचिह्ने

देवनागरीतील अनावश्यक स्वरचिन्हे काढून टाकावीत ह्या स्वा. सावरकरांच्या भूमिकेचे मी समर्थन करतो.

सावरकरांच्या लिपीसुधारणेला त्यावेळच्या छपाईच्या अडचणींची पार्श्वभूमी होती. छपाईकरिता खिळे कमी लागावे, टंकमुद्रण यंत्राच्या कळफलकावर सर्व अक्षरे बसवता यावीत यासाठी त्या सुधारणा होत्या. याच कारणाकरिता मराठी साहित्य महामंडळाने अनुच्चारित अनुस्वार काढून टाकले. त्यामुळे खिळे जुळवणार्‍यांची, मुद्रितशोधकांची, छापखानेवाल्यांची, प्रकाशकांची, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची आणि राजकारण्यांची सोय झाली. भाषेचे किती नुकसान झाले हे जाणून घेण्यासाठी सत्वशीला सामंतबाईंचे लिखाण मिळाल्यास जरूर वाचावे. कुणी वाचले असेल तर त्याला याची थोडीफार कल्पना येईल.
आता संगणकाच्या काळात सावरकरांच्या लिपीसुधारणांची गरज राहिलेली नाही.--वाचक्नवी

गळे!

भाषेचे किती नुकसान झाले हे जाणून घेण्यासाठी सत्वशीला सामंतबाईंचे लिखाण मिळाल्यास जरूर वाचावे. कुणी वाचले असेल तर त्याला याची थोडीफार कल्पना येईल.

भाषेचे वगैरे काऽऽही नुकसान झालेले नाही. म्हणजे असं आम्हाला तरी वाटत नाही. भाषेचं म्हणाल तर उत्तमच सुरू आहे. तुम्हीआम्ही जोपर्यंत आहोत, तोपर्यंत भाषेला मरंण नाही! मुळात माणसामुळे भाषा आहे, भाषेमुळे माणूस नव्हे!

आणि 'प्रमाणित' भाषेचं वगैरे जर म्हणत असाल तर अहो भाषा बोलणारा, लिहिणारा खुद्द माणूसच जिथे प्रमाणित नाही तिथे भाषा प्रमाणितच हवी, हा आग्रह का?

'भाषा' ही कुणाची/ठराविक कुठल्या एका समुहाची खाजगी मालमत्ता नसून सार्वजनिक गोष्ट आहे. ज्याला लिहिता/बोलता येतंय अश्या प्रत्येकाचीच ती आहे. त्यामुळे तिचे विशिष्ठ असे शुद्धलेखनाचे/व्याकरणाचे नियम कुणीच ठरवू शकत नाही. तो अधिकार कुणालाच नाही! 'शुद्धलेखन', 'व्याकरण' वगैरे गोष्टी या तारतम्याने घ्यायच्या गोष्टी आहेत!

उद्या उठून एखाद्याने व्याकरणविषयक/शुद्धलेखन विषयक पुस्तक लिहिलंन तर ते त्याच्यापुरतं ठीक असेल. पण त्यातले नियम जर तो मला सांगू/शिकवू लागला तर 'बाबारे, तू कोण मला नियम सांगणारा लागून गेला आहेस?' एवढंच मी त्याला विचारेन!

कुठलिही भाषा ही एक अक्षय श्रीमंत गोष्ट आहे, तेव्हा 'उगीच भाषेचे नुकसान झाले', 'भाषेचे नुकसान झाले' असे म्हणून गळे काढण्यात काय अर्थ आहे?

बाय द वे, या सत्वशीला सामंतबाई कोण? यांचा जरा आम्हाला परिचय करून घ्यायला आवडेल. अर्थात, त्या भाषातज्ञ वगैरे नसतील तरच! :)

आपला,
नि:सत्वशील अभ्यंकर!

सत्वशीला सामंत!

बाय द वे, या सत्वशीला सामंतबाई कोण? यांचा जरा आम्हाला परिचय करून घ्यायला आवडेल. अर्थात, त्या भाषातज्ञ वगैरे नसतील तरच! :)

या सत्वशीलाबाई सामंत म.रा.भाषा संचलनालयातून निवृत्त झाल्या. सध्या पुण्यात.प्रमाण भाषेच्या आग्रही. लोकसत्ता.मटा यातून भाषाशुद्धीबाबत विवेचन करतात. त्यांचे त्यावर एक पुस्तकही आहे. त्यांच्या घरी मी एकदा गेलो होतो. तेव्हा टीव्हीवर एक कार्यक्रम लागला होता. त्यातील चर्चेत एक दलित व ग्रामीण भागातून आलेला( प्राध्यापक असावा) आनि, पानि लोनि असे शब्द थोड्या गावरान वाटणार्‍या टोन मध्ये बोलत होता. बाईंना ती बाब खटकली. मी त्यांना म्हणालो 'केवळ व्याकरणाच्या चौकटीत बसत नाही म्हणून ते अशुद्ध काय? ' त्यातील आशय, सुसंगत व अभ्यासपूर्ण होता. माझे लक्ष आशयाकडे होते त्यांच भाषाशुद्धिकडे. मी त्यांना प्रमाणभाषेतील काही वाक्य ग्रामीण ढंगात बोलून दाखवली. खेड्यातून शहरात आल्यानंतर माझी भाषा जरी तुलनात्मक शुद्ध् असली तरी टोनवर मात्र गावरान छटा असायची. हळूहळू ती छटा विरळ होत गेली.
अवांतर-या पार्श्वभूमीवर 'दलित ब्राह्मण' हा शरणकुमार लिंबाळे (बहुतेक)यांचा कथा संग्रह वाचनीय आहे.

प्रकाश घाटपांडे

महानायक

विश्वास पाटील लिखित महानायक पुस्तकाच्या प्रूफ रीडिंग संदर्भात सत्त्वशीला बाईंचा पुस्तकाच्या प्रकाशकांशी जोरदार आणि जाहीर वाद लोकसत्तेतून झाला होता असे आठवते.

सत्वशीला सामंत!

बाय द वे, या सत्वशीला सामंतबाई कोण? यांचा जरा आम्हाला परिचय करून घ्यायला आवडेल. अर्थात, त्या भाषातज्ञ वगैरे नसतील तरच! :)

या सत्वशीलाबाई सामंत म.रा.भाषा संचलनालयातून निवृत्त झाल्या. सध्या पुण्यात.प्रमाण भाषेच्या आग्रही. लोकसत्ता.मटा यातून भाषाशुद्धीबाबत विवेचन करतात. त्यांचे त्यावर एक पुस्तकही आहे. त्यांच्या घरी मी एकदा गेलो होतो. तेव्हा टीव्हीवर एक कार्यक्रम लागला होता. त्यातील चर्चेत एक दलित व ग्रामीण भागातून आलेला( प्राध्यापक असावा) आनि, पानि लोनि असे शब्द थोड्या गावरान वाटणार्‍या टोन मध्ये बोलत होता. बाईंना ती बाब खटकली. मी त्यांना म्हणालो 'केवळ व्याकरणाच्या चौकटीत बसत नाही म्हणून ते अशुद्ध काय? ' त्यातील आशय, सुसंगत व अभ्यासपूर्ण होता. माझे लक्ष आशयाकडे होते त्यांच भाषाशुद्धिकडे. मी त्यांना प्रमाणभाषेतील काही वाक्य ग्रामीण ढंगात बोलून दाखवली. खेड्यातून शहरात आल्यानंतर माझी भाषा जरी तुलनात्मक शुद्ध् असली तरी टोनवर मात्र गावरान छटा असायची. हळूहळू ती छटा विरळ होत गेली.
अवांतर-या पार्श्वभूमीवर 'दलित ब्राह्मण' हा शरणकुमार लिंबाळे (बहुतेक)यांचा कथा संग्रह वाचनीय आहे.

प्रकाश घाटपांडे

खाजगी मालमत्ता?

लोकसत्ता.मटा यातून भाषाशुद्धीबाबत विवेचन करतात.

भाषाशुद्धीविवेचन करणार्‍या त्या कोण लागून गेल्या? कुठली भाषा शुद्ध आणि कुठली अशुद्ध हे ठरवण्याचा अधिकार त्यांच्यासकट चार मूठभर लोकांना कुणी दिला?? भाषा ही कुणा एका वर्गाची खाजगी मालमत्ता नव्हे एवढंच ह्या मंडळींनी ध्यानात ठेवावं!

आनि, पानि लोनि असे शब्द थोड्या गावरान वाटणार्‍या टोन मध्ये बोलत होता. बाईंना ती बाब खटकली. मी त्यांना म्हणालो 'केवळ व्याकरणाच्या चौकटीत बसत नाही म्हणून ते अशुद्ध काय? ' त्यातील आशय, सुसंगत व अभ्यासपूर्ण होता. माझे लक्ष आशयाकडे होते त्यांच भाषाशुद्धिकडे.

आशय सोडून भाषेकडे लक्ष देणार्‍या त्या बाईंची कीव करावी तेवढी थोडीच!

तात्या.

शुद्धलेखनाचे नियम कमी होत आहेत.

अ.भा.म.सा.महामंडाळाचे अध्यक्ष यांनी शुद्धलेखनाचे नियम कमी करायचे असे ठरवले आहे,ते कोणते नियम कमी करतील,कोणत्या नियमांना कमी केले पाहिजे, या विचारांनीच आम्ही आनंदलो आहोत.प्रत्यक्षात जेव्हा नियम कमी होतील,तेव्हा प्रमाण भाषे इतकेच बोली भाषेला महत्व आलेले असेल असे वाटायला लागले आहे.खरे तर कोणते शुद्धलेखनाचे नियम कमी करावेत असा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बोलीभाषाच महत्वाची!

प्रत्यक्षात जेव्हा नियम कमी होतील,तेव्हा प्रमाण भाषे इतकेच बोली भाषेला महत्व आलेले असेल असे वाटायला लागले आहे.

चिंता नको बिरुटेसाहेब. अहो शेवटी बोलीभाषाच महत्वाची! प्रमाणभाषेच्या जोखडातून आणि शृंखलातून भाषेची पूर्ण सुटका होईपर्यंत आपला हा प्रमाणभाषेच्या मक्तेदारीविरुद्धचा स्वातंत्र्यलढा सुरूच राहील. एक ना एक दिवस स्वतःला शहाण्या समजणार्‍या काही मूठभर माणसांच्या हाती असलेल्या भाषेला, व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या मक्तेदारीय जोखडातून आपण मुक्त करून स्वतंत्र करुया आणि हसत्याखेळत्या अश्या जीवंत बोलीभाषेलाच भाषेचं खर्‍या अर्थाने संपूर्ण स्वामित्व मिळवून देऊ!

प्रमाणभाषा लवकरच तिच्या अंतिम घटका मोजायला लागेल याबद्दल आम्हाला खात्री आहे. चार मूठभर मंडळींना भाषा कशी असावी, तिचे व्याकरणाचे आणि शुद्धलेखनाचे नियम काय असावेत हे आम्हाला सांगण्याचा अधिकार नाही. आम्ही बोलीभाषेचे पाईक आहोत!

बोलीभाषेला प्रमाणभाषेच्या मक्तेदारीतून सोडवण्याकरता आम्ही खालील गीत गाऊ!

"आता उठवू सारे रान,
आता पेटवू सारे रान"

आपला,
(बोलीभाषेचा स्वातंत्रसेनानी!) तात्या.

तात्या

हिमेश रेशमिया प्रभॄती व रिमिक्सच्या नावाखाली कमी कपड्यात कवायती करणार्‍या तरुणी यामुळे भारतीय संगीताचे नुकसान होत आहे किंवा नाही याबाबत आपले काय मत आहे?

काहीही नुकसान होत नाही!

कर्णा,

मला वाटतं की जर एखाद्या गोष्टीमुळे भारतीय संगीताचा फायदा किंवा नुकसान होत असेल/होणार असेल तर ती गोष्ट देखील तेवढीच महत्वाची असावी लागते. आपण ज्या व्यक्तिंचा उल्लेख केला आहे त्या व्यक्ति माझ्यामते अत्यंत फालतू आहेत आणि त्यांच्यामुळे भारतीय संगीताला जराही धक्का वगैरे लागणार नाही याची खात्री असावी!

आपला,
तात्या अभ्यंकर,
प्रसारक व प्रचारक,
हिंदुस्थानी रागदारी संगीत.

बाय द वे, याचा प्रमाणभाषा आणि बोलीभाषेशी कुठे संबंध आला? बोलीभाषेमुळे प्रमाणभाषा आहे एवढेच लक्षात ठेवा. भाषा आधी बोलली गेली आणि मग तिचे नियम वगैरे लिहिले गेले. त्यामुळे भाषा बोलणार्‍या व्यक्तिंनी ज्या पद्धतीने भाषा बोलली जात होती त्या पद्धतीने भाषेचे नियम वगैरे लिहिले. त्यामुळे आम्ही ज्या पद्धतीने भाषा बोलू तेच आमच्याकरता प्रमाण! नाही का?

आपला,
('भाषेला' 'प्रमाण'भाषेच्या शृंखलांतून सोडवण्याच्या लढ्यातला एक स्वातंत्र्यसेनानी!) तात्या.

अभिव्यक्त कश्यातून !


मूकबधिरांची भाषा, ट्रॅफिक सिग्नलची भाषा, हातवार्‍यांची भाषा, नृत्याची-संगीताची भाषा यांच्यातून उत्तम अभिव्यक्ती होते. पण म्हणून काही या प्रमाणभाषा होऊ शकत नाहीत.

हो ना ! कुत्र्याचे भुंकने,चिमण्यांची चिव-चिव,कावळ्यांचे काव-काव,गाड्यांचे हॉर्न(आवाज),पावसाचे पाणी पत्र्यावर पडल्यानंतर त्याचा होणारा आवाज,याचा आम्ही विचारच केला नाही. आम्हाला वाटले मानवाच्या तोंडून बोलल्या जाणा-या सार्थ ध्वनिंच्या शब्दसमूहाचाच विचार करायचा आहे ;)

कॅन्डीच्या पूर्वीची मराठी भाषा अत्यंत भोंगळ होती.प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,चिंतन करीत आहेत.
 
^ वर