गुरुरेको जगति त्राता..

राम राम मंडळी,

अलिकडेच लिहिलेल्या माझ्या संस्कृतभाषा भाषाणां सुजननि या लेखात उल्लेख केलेल्या ठाण्याला राहणार्‍या संस्कृत विदुषी सौ अदिती जमखंडिकर या संस्कृत भाषेच्या प्रचाराकरता आणि प्रसाराकरता सतत कार्यरत असतात. याच लेखात उल्लेख केलेल्या अभिजात संगीत गायिका सौ वरदा गोडबोले यादेखील संस्कृत शिकलेल्या असून मुंबई विद्यापिठात बी ए च्या परिक्षेत सुवर्णपदक मिळवून सर्वप्रथम आलेल्या आहेत. त्यामुळे अदितीताईंनी संस्कृतविषयक राबवलेल्या विविध उपक्रमांमध्ये वरदाचादेखील सहभाग असतो.

'अमरनाट्यगीतानि' हा अदितीताईंनी केलेला एक संस्कृतविषयक कार्यक्रम. या कार्यक्रमाबद्दल विस्तृतपणे सवडीने केव्हातरी लिहिनच. अदितीताईंचं एक बरं आहे. त्यांना बहुतेक मी संगितज्ञ वगैरे वाटतो! ;) कारण त्याना संस्कृतविषयक काही कार्यक्रम करायचा असेल आणि त्यात जर काही सांगितिक भाग असेल तर त्या 'तूच बघ बाबा काय ते' असं म्हणून ती जिम्मेदारी माझ्यावर सोपवून मोकळ्या होतात! ;)

'अमरनाट्यगीतानि' या कार्यक्रमाची सुरवात गुरुवंदनेने करायची असं ठरलं. सगळी जबाबदारी अर्थातच माझ्यावर होती. 'काय करावं बरं, जेणेकरून कार्यक्रमाची सुरवात अतिशय सुरेख होईल?' हा विचार मी करू लागलो. 'गुरू' या संकल्पनेवर आधारित जी काही नेहमीची प्रसिद्ध गाणी आहेत ती मला शक्यतोवर टाळायची होती. अदितीताई स्वतःच काही ओळी लिहिणार होत्या आणि मी त्या संगीतबद्ध करायच्या आणि वरदाने त्या गायच्या हाही एक विचार होता.

परंतु अचानक मला एक कल्पना सुचली आणि मी ती अदितीताई आणि वरदाला बोलून दाखवली.

मी त्यांना बाबुजींच्या 'गुरू एक जगती त्राता' ह्या गाण्याबद्दल सांगितले. हे गाणे माझ्या महितीप्रमाणे काही कारणांमुळे प्रसिद्ध झाले नाही. परंतु बाबुजींनी या गाण्याचे ध्वनिमुद्रण मात्र बर्‍याच वर्षांपूर्वी करून ठेवले होते. पं जितेंद्र अभिषेकी आणि सुरेश वाडकर या दोघांच्याही आवाजात ह्या गाण्याचे ध्वनिमुद्रण केले गेले होते आणि ती खाजगी ध्वनिफित मला आमच्या ललितामावशींनी प्रेमाने भेट म्हणून दिली होती! कालांतराने ती ध्वनिफितही दुर्दैवाने खराब झाली, ते गाणेही कुठे प्रसिद्ध न होता विस्मरणात गेले. बाबुजीही गेले!

परंतु मंडळी, चांगल्या गोष्टींना कधी मरण नसतं हेच खरं! ते गाणं माझ्या चांगलं लक्षात होतं. त्याचे कवी कोण हे मला माहीत नाही. संगीतकार बाबुजी. ते गाणं अर्थातच मराठीत होतं. बाबुजींनी ते गाणं पुरियाकल्याण रागात बांधलं होतं. मला त्यातल्या शब्दांनी आणि त्यातल्या पुरियाकल्याणने कायमची भुरळ घातली होती. मी ते गाणं स्वतः गाऊन (!) अदितीताईंना ऐकवलं. कार्यक्रम संस्कृत असल्यामुळे अदितीताईंनी त्याचे संस्कृत भाषांतर करावे आणि वरदाकडून मी ते गाणे बसवून घ्यावे असे ठरले. कार्यक्रमात मूळ मराठी शब्दही अवश्य सांगायचे असेही ठरले जेणेकरून मूळ अज्ञात कवीलाही योग्य ते श्रेय मिळायला हवे हा त्यामागे हेतू!

तर मंडळी, मूळ गाण्याचे शब्द पहा किती सुरेख होते -

सुखाच्या क्षणात, व्यथांच्या घणात
उभा पाठिशी एक अदृष्य हात
गुरू एक जगती त्राता
गुरु दयासिंधु गुरुदीन बंधु
गुरु जननी जन्मदाता
गुरू एक जगती त्राता

घन तमात जणू दीप चेतवी,
तनमनात चैतन्य जागवी
कणकणात जणू प्राण डोलवी
जे अरूप त्या देई रूप
गुरु चरण लाभ होता
गुरू एक जगती त्राता

गुरुसमान कुणी नाही सोयरा
गुरुवीण नाही थारा
गुरु निधान गुरु मोक्ष, आसरा
देव दैव लाभे सदैव,
गुरुचरण लाभ होता
गुरू एक जगती त्राता

मंडळी, अदितीताईंनी याचे संस्कृत भाषांतर खालीलप्रमाणे केले. मूळ गाण्यात बरेचसे संस्कृत शब्द असल्यामुळे त्यांना फारसे बदल करावे लागले नाहीत.

सुखानां क्षणेषु व्यथानामाघातेषु
तिष्ठति पृष्ठे एकोऽदृष्यो हस्तः
गुरुरेको जगति त्राता
गुरुर्दयार्सिंधुर्गुरुर्दीनबंधुर्गुरुर्जननिर्जन्मदाता
गुरुरेको जगति त्राता

घनतमे इव दीपं प्रज्वलति
तनुषु मनस्सु चैतन्यं जीवयति
कणे कणे इव प्राणान् दोलायति
यदरूपमस्ति तल्लभते रूपम्
गुरुचरणलाभप्राप्त्या
गुरुरेको जगति त्राता

गुरुसमो न हि कश्चिद् आप्तः
गुरुं विना नास्ति शरणम्
गुरुर्निधानं गुरूर्मोक्षाश्रया:
देवदैवे लभ्येते सदैव
गुरुचरणलाभप्राप्त्या
गुरुरेको जगति त्राता

मंडळी अदितीताईंनी हे भाषांतरित गाणं माझ्या हातावर ठेवल्यावर मला जरा धडकीच भरली! ;) कारण माझ्या डोक्यात ते गाणं मराठी शब्दांचं होतं. त्याचं संस्कृत भाषांतर वाचून त्यातले संधी, विसर्ग वगैरेंचे उच्चार मूळ चालीबरहुकुम कसे काय बसवायचे हा प्रश्नच होता. पण बाबुजींचं नांव घेतलं आणि लागलो कामाला! बघुया म्हटलं, जमलं तर जमलं!

आणि जमलं मंडळी! बाबुजींची मूळ चालच इतकी सुटसुटीत होती की संधीविसर्गासहितचे संस्कृत शब्द त्यात बसवायला मला फारसं अवघड गेलं नाही. हे श्रेय अर्थातच बाबुजींचे. मंडळी, या जुन्या मंडळींनी इतकं प्रचंड काम करून ठेवलं आहे किती घेता किती घेशील दो करांनी अशी तुमच्यामाझ्यासारख्यांची अवस्था होते!

वरदाने मात्र हे गाणं खूप छान गायलं. मी फक्त तिला त्या गाण्याची संस्कृतरुपांतरीत चाल शिकवली. साधारण कुठे ठेहराव, कुठे आलापी अपेक्षित आहे, या गोष्टी तिला सांगितल्या आणि वरदाने या गाण्याचं अक्षरशः सोनं केलं! सुरेख आवाज, उतम स्वरलगाव, व सुरेल आलापी ही वरदाच्या गाण्यातली वौशिष्ठ्ये म्हणता येतील. पुरियाकल्याणसारखा भारदस्त राग असल्यामुळे थोडीशी आलापी आणि स्वरांवरचा ठेहेराव या गोष्टींचे स्वातंत्र्य मी घेतले त्याबद्दल बाबुजी मला क्षमा करतील अशी अपेक्षा आहे! ;)

वरदाला मुळात या रागाची उत्तम तालीम मिळाली असल्यामुळे तिला हे गाणं गायला फारसं अवघड गेलं नाही! वरदाही आमच्या किराणा घराण्याच्याच तालमीतली!

राग पुरियाकल्याण! हा राग म्हणजे किराणा घराण्याचीच खासियत! आमच्या कानावर लहानपणापासून भीमण्णांच्या पुरियाकल्याणचे जे संस्कार झाले आहेत ते या जन्मी तरी जाणार नाहीत! पुरियाकल्याण गावा तर भीमण्णांनीच! पुरियाकल्याण रागबद्दल माझ्याच एका लेखात दोन ओळी लिहिल्या होत्या त्या इथे उद्घृत करतो!

पुरियाकल्याण! आलापप्रधान गायकी गाता येण्याजोगा एक खानदानी राग. पुरियाकल्याण म्हणजे पुरिया आणि कल्याण या दोन रागांचं अद्वैत. पुरियाचा स्वभाव तसा गंभीर. मला तर पुरिया म्हणजे एखाद्या जबाबदार, बुजुर्ग अशा अनुभवसंपन्न व्यक्तिचं मनोगतच वाटतं. पण पुरियाची सगळी सत्ता फक्त पूर्वांगातच! आपला अवखळ, लोभसवाणा 'कल्याण' त्याला उत्तरांगात नेमकेपणाने गाठतो आणि त्याचा छानसा 'पुरियाकल्याण' होतो!

आपल्या घरात अशीच एखादी अनुभवसंपन्न, पण थोडी गंभीर अशी बुजूर्ग व्यक्ती असते. कुणी फारसं तिच्याजवळ गप्पाबिप्पा मारायला जात नाही. पण तिच्या नातवाला मात्र नेमकं कळतं की आजोबांना काय आवडतं आणि काय नाही ते! ;) नातू अवखळपणाने धावत त्यांना बिलगतो आणि या गंभीर आजोबांच्या चेहऱ्यावर पटकन स्मित हास्य उमटतं! ;)

तद्वत, उत्तरांगात कल्याणाने गाठल्यावर 'पुरिया' काही क्षणाकरता स्वत:चा स्वभाव विसरतो आणि त्याचा 'पुरियाकल्याण' बनतो! ;)

मंडळी, किती समृद्ध आहे आपलं संगीत! क्या केहेने..

असो! तर मंडळी, आपल्याला हे गाणं या दुव्यावरून उतरवून घेता येईल आणि ऐकता येईल. ऐकून कसं वाटलं ते अवश्य कळवा!

ह्या गाण्याचे ध्वनिमुद्रण घेऊन मी एके दिवशी बाबुजींच्या घरी ललितामावशींना भेटायला गेलो होतो. त्यांना ही सगळी संस्कृतची कथा सांगितली आणि हे ध्वनिमुद्रण ऐकवलं. हे गाणं ऐकताना ललितमावशींच्या डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या पाठीवरून हात फिरवून त्या म्हणाल्या, 'सोनं केलंस तू या गाण्याचं! बाबुजी असते तर त्यांनासुद्धा खूप आनंद झाला असता!"

मंडळी, ललितामावशींच्या या एका वाक्याने अदितीताईंच्या, वरदाच्या आणि माझ्या कामाचं सार्थक झालं होतं! बाबुजींच्या घरातल्या तंबोर्‍याच्या जोडीला मी नमस्कार केला आणि तेथून परतलो!

--तात्या अभ्यंकर.

Comments

चूभूद्याघ्या!

मला संस्कृत नीटसं लिहिता येत नाही. त्यामुळे हे गाणं संस्कृतमधून लिहिताना व्याकरणाच्या काही चुका होण्याची शक्यता आहे. तश्या काही चुका सापडल्यास त्या माझ्या समजाव्यात, अदितीताईच्या नव्हेत!

तात्या.

वा! क्या बात है!

चाल आवडली आणि गायनही अगदी रंगून केलंय!संवादिनी आणि तबल्याची साथही अतिशय पूरक अशी आहे.
एकूण सगळं मस्त जुळून आलंय! जियो तात्या!

मानलं तात्या

तात्या,
गाण्यातलं गमभन(एबीसीडी) ही कळत नाही. पण तुमचं गाणं खूप आवडलं.विसोबा खेचर यांच्या गायनाचे आम्ही फ्यॅन आहोत.

दुरुस्ती! ;)

योगेशराव,

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

तुमचं गाणं खूप आवडलं.

एक दुरुस्ती. हे गाणं माझं नसून बाबुजींचं आहे!

तात्या.

वा!

स्वर आले दुरुनी हे बाबूजींचं गाणं माझं अतिशय आवडतं आहे. :))

श व ष च्या उच्चारामधील फरक जाणून घेण्यासाठी बाबूजी किंवा श्रीधरपंतांची गाणी ऐका !येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

वा!

सुंदर गीत लिहिणारे मूळ गीतकार , त्याला तितकीच उत्कृष्ट चाल लावणारे बाबुजी ,ते गीत फक्त ऐकून-ऐकून लक्षात ठेवणारे तात्या, गीताचे सुयोग्य भाषांतर करणार्‍या सौ. अदिती जमखंडीकर, त्याचे सुरेल गायन करणार्‍या सौ. वरदा गोडबोले, त्यांना साथसंगत करणारे वादक आणि संस्कृत उपशास्त्रिय गायनाला टाळ्यांचा टाळयांचा कडकडाट करणारे जाणकार श्रोते - सर्वांचेच अभिनंदन!
आणि आम्हाला हे गाणे ऐकविल्याबद्दल तात्यांचे आभार.
(ता.क. : हे गाणे मराठी / संस्कृत भाषेत आपल्या पूर्वपरवानगीशिवाय कुणी इतरत्र सादर केले तर चालेल काय?)

सहमत

सुंदर गीत लिहिणारे मूळ गीतकार , त्याला तितकीच उत्कृष्ट चाल लावणारे बाबुजी ,ते गीत फक्त ऐकून-ऐकून लक्षात ठेवणारे तात्या, गीताचे सुयोग्य भाषांतर करणार्‍या सौ. अदिती जमखंडीकर, त्याचे सुरेल गायन करणार्‍या सौ. वरदा गोडबोले, त्यांना साथसंगत करणारे वादक आणि संस्कृत उपशास्त्रिय गायनाला टाळ्यांचा टाळयांचा कडकडाट करणारे जाणकार श्रोते - सर्वांचेच अभिनंदन!
आणि आम्हाला हे गाणे ऐकविल्याबद्दल तात्यांचे आभार.

-- अगदी असेच. सुरेख जमले आहे गाणे.

अवश्य!

(ता.क. : हे गाणे मराठी / संस्कृत भाषेत आपल्या पूर्वपरवानगीशिवाय कुणी इतरत्र सादर केले तर चालेल काय?)

अहो विसुनाना, अहो चालेल का म्हणून काय विचारता? अगदी अवश्य सादर करा. अहो संगीत ही प्रसादाप्रमाणे सर्वांना वाटण्याची गोष्ट आहे.

ती जेवढी वाटाल तेवढी कमी तर होणार नाहीच, उलट वाढेल! तेव्हा हे गाणं कुणीही अगदी अवश्य म्हणावं. जो कुणी/जी कुणी हे गाणं म्हणणार असेल त्याला/तिला माझ्याक्डून अनोकोत्तम शुभेच्छा! अगदी झकास गा म्हणावं. उत्तम सूर लागू देत!

तात्या.

सही गाणं आणि गायन.

गायनातलं काही कळत नाही.पण आपण ऐकवलेले गाणं सुखावणारं आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा

तात्या,
गाणे फार सुंदर आहे. तुम्हा तिघांचे अभिनंदन. आणि दुवा देवून आम्हास सहभागी केल्याबद्दल आभार.
--लिखाळ.

परदेशात भारतीयांनी एकमेकांकडे पाहून (निदान !) स्मितहास्य करावे असे मला वाटते.

वा! वा!

म्हणजे लिखाळांच्या वा शी सहमत.

हेच..

तात्या,
गाणे फार सुंदर आहे. तुम्हा तिघांचे अभिनंदन. आणि दुवा देवून आम्हास सहभागी केल्याबद्दल आभार.
हेच म्हणते.
स्वाती

धन्यवाद

छानच काव्य आहे (मूळ आणि संस्कृत). एम् पी ३ ऐकताना "दूर कुठे राऊळात दरवळतो पुरीया..." मधे म्हणल्यासारखे झाले.

थोडे विषयांतर पण याच संदर्भात मला स्व. वसंत पोतदार यांनी सांगीतली होती:

"ए मेरे वतन के लोगो.." या लताच्या ६२च्या चीनच्या लढाईच्यावेळच्या गाण्याचा खरा खोटा इतिहास माहीत नाही - तो इथे विषय नाही, पण त्या गाण्या इतकेच सुरेख गाणे १९६५ च्या चीनच्या युद्धाच्या नंतर, सैनीकांना आणि त्यांच्या कुटूंबियांना मदत करण्यासाठी म्हणून सी. रामचंद्रांनी एक गाणे संगीतबद्ध केले. कवी जोण ते लक्षात नाही, अर्थातच हिंदी.

" दागीन्याने मढलेल्या" आशा ने गाणे तितकेच सुरेल पंतप्रधान लाल बहाद्दूर् शास्त्रींसमोर गायले. गाणे संपल्यावर तीने ते सर्व दागीने काढूने सैनीक फंडाला दिले. ते गाणे नंतर शास्त्रीजींच्या हस्ते ध्वनी फीत् म्हणून प्रकाशीत होणार होते. पण दुर्दैवाने त्यांचे आधीच निधन झाले आणि ते गाणे तसेच राहीले. त्या कार्यक्रमाचे पोतदार (सी. रामचंद्रांचे सहाय्यक म्हणून) साक्षीदार होते आणि त्यांनी ते गाणे मला म्हणून दाखवले. पण परत त्या भेटीत लिहून घेयचे राहीले आता ते ही राहीले नाहीत... कदाचीत आशाच याबाबतीत मदत करू शकेल...

आभार..

गाणं आवडल्याचं कळवणार्‍या सर्व रसिक सभासदांचे मनःपूर्वक आभार..

तात्या.

मस्तच

क्या बात है तात्या!! तुमच्या दोन्ही पोस्टस ऐकल्या. खुप दिवसांनी नवीन छान गाणी ऐकायला मिळाली. रात्री जेवण करत शांतपणे ऐकलेल्या ह्या दोन्ही गाण्यांनी दिवसभराची थकावट दुर गेली.

पल्लवी

दोन्ही गाणी आवडली

तात्या,
दोन्ही गाणी छान होती.

आभार..

पल्लवी आणि अमितचे अनेक आभार. व्य नि पाठवलेल्या सर्व मंडळींचेही आभार. या गाण्याच्या निमित्ताने बाबुजींची ही सुंदर चाल लोकांसमोर आली हे महत्वाचे!

तात्या.

संत तात्याबा सध्या हे ऐकत आहेत!

खूप सुंदर

हे गाणं ऐकताना ललितमावशींच्या डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या पाठीवरून हात फिरवून त्या म्हणाल्या, 'सोनं केलंस तू या गाण्याचं! बाबुजी असते तर त्यांनासुद्धा खूप आनंद झाला असता!"

गुरुपौर्णिमा अशा ना तशा प्रकारे साजरी करता म्हणायची!

अतिशय श्रवणीय झाले आहे गाणे! मनापासून आभार. असेच काही काही ऐकवत रहा.

चित्रा

गुरुपौर्णिमा तर साजरी करतोच,

गुरुपौर्णिमा अशा ना तशा प्रकारे साजरी करता म्हणायची!

अहो गुरुपौर्णिमा तर आम्ही साजरी करतोच हो! ;) आणि तसं म्हणाल तर खुद्द व्यासगुरुजींचं आणि आमचं काही विशेष भांडणही नाही! ;)

असो, गाणं आवडल्याचं कळवल्याबद्दल धन्यवाद.

असेच काही काही ऐकवत रहा.

स्वरभास्कर पं भीमसेन जोशी यांच्या गायकीतली काही सौंदर्यस्थळे आम्ही त्यांच्या ख्यालसंगीतातले काही लहान लहान तुकडे ऐकता येतील असे एखाद्या संकेतस्थळावर चढवून त्याबाबत इथे किंवा आमच्या प्रस्तावित मिसळपाव डॉट कॉम वर काही भाष्य करणार आहोत. म्हणजे तसा आमचा मानस आहे, पाहू कसा वेळ मिळतो ते. आपण मिसळपाव डॉट कॉमचे सभासदत्व अवश्य घ्या आणि तिथे व्यासगुरुजींवर एक लेखमाला लिहा!

मिसळपाव डॉट कॉम सुरू झालं की कळवतोच! ;)

तात्या.

मिसळपाव डॉट कॉम सुरू करण्याच्या दृष्टीने संत तात्याबा येत्या सोमवारी पुण्याला जाणार आहेत आणि काही महत्वाच्या व्यक्तिंना भेटणार आहेत! ;)

जरूर

अहो गुरुपौर्णिमा तर आम्ही साजरी करतोच हो! ;) आणि तसं म्हणाल तर खुद्द व्यासगुरुजींचं आणि आमचं काही विशेष भांडणही नाही! ;)
हे कळले ते बरे झाले! :) भीमसेनांचे गाणे ऐकायला तर नक्कीच मिसळपाव डॉट कॉमचे सभासदत्व घेईन.

सुरेख गाणे.

तात्या,

गाणे अतिशय सुरेख आहे. म्हटलेही छानच आहे. तुम्हा तिघांचेही अभिनंदन! बाबुजींच्या स्मृतीस अभिवादन!

मंडळी, ललितामावशींच्या या एका वाक्याने अदितीताईंच्या, वरदाच्या आणि माझ्या कामाचं सार्थक झालं होतं! बाबुजींच्या घरातल्या तंबोर्‍याच्या जोडीला मी नमस्कार केला आणि तेथून परतलो!

सुरेख!

मिसळपावचे सभासदत्व घेण्यास मीही उत्सुक आहे!

अवांतर - तात्या, तुमच्या शैलीतला एक लेख इथे वाचला. या लेखात तुमची छान टिंगलटवाळी केली आहे. अजूनही एका अनुदिनीवर तुमच्याबद्दल 'आंतरजालीय तात्या' हा एक लेख वाचायला मिळाला. त्या अनुदिनीचे नांव आता आठवत नाही त्यामुळे दुवा देऊ शकत नाही. आता तुम्हाला तेवढा मुलाखतीकरता केव्हा वेळ आहे ते सांगा म्हणजे 'तात्यांची प्रकट मुलाखत' असा एखादा लेख लिहून मी माझ्याही अनुदिनीची सुरवात करीन म्हणते! :)

--ईश्वरी.

धन्यवाद,

गाणे अतिशय सुरेख आहे. म्हटलेही छानच आहे. तुम्हा तिघांचेही अभिनंदन!

अनेक आभार..

मिसळपावचे सभासदत्व घेण्यास मीही उत्सुक आहे

स्वागत आहे..

अवांतर - तात्या, तुमच्या शैलीतला एक लेख इथे वाचला. या लेखात तुमची छान टिंगलटवाळी केली आहे.

हो ते दोन्ही लेख आम्ही वाचलेले आहेत. ते आमच्या प्रिय मित्रांनी लिहिले आहेत!

अजूनही एका अनुदिनीवर तुमच्याबद्दल 'आंतरजालीय तात्या' हा एक लेख वाचायला मिळाला. त्या अनुदिनीचे नांव आता आठवत नाही त्यामुळे दुवा देऊ शकत नाही.

अरे वा! सदर अनुदिनीचा दुवा मिळवून अवश्य द्यावा. आम्ही तो लेख वाचण्यास उत्सुक आहोत!

आता तुम्हाला तेवढा मुलाखतीकरता केव्हा वेळ आहे ते सांगा म्हणजे 'तात्यांची प्रकट मुलाखत' असा एखादा लेख लिहून मी माझ्याही अनुदिनीची सुरवात करीन म्हणते! :)

धन्यवाद, आम्ही तुम्हाला अवश्य मुलाखत देऊ! ;)

आपला,
आंतरजालीय तात्या!

च्यामारी आमच्यावर स्तुतिसुमने उधळणारा (!) हा लेख आता कुठे आणि कसा शोधावा बरे?!

अपूर्व अनुभव

सुन्दर प्रयोग आहे हा सगळा. जवळ जवळ १६ वर्षांनी वरदाचा आवाज ऐकायला मिळाला. खूप खूप आभार!

 
^ वर