आत्मा आणि मानवी मेंदू

आत्मा आणि मानवी मेंदू
"इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य: परं मन:।मनसस्तु परा बुद्धि: यो बुद्धे: परतस्तु स:।" [गीता ४२/३]
गीतेतील या श्लोकात इंद्रिये (ज्ञानेंद्रिये+कर्मेंद्रिये), मन आणि बुद्धी यांचा उल्लेख आहे.मात्र बुद्धीचे तसेच मनाचेही अधिष्ठान असलेल्या मेंदूचा उल्लेख नाही.संपूर्ण गीतेत मेंदू अथवा त्या अर्थाचा अन्य कोणताही शब्द नाही."गीर्वाणलघुकोशा"त मेंदू हा शब्द नाही.पुढे शोध घेता समजले की आपण आज ज्या अर्थाने मेंदू हा शब्द वापरतो त्या अर्थाचा एकही शब्द वेद आणि उपनिषदे यांतही नाही.(मेंदू" या शब्दाची व्युत्पत्ती काय तीही मला ठावूक नाही.शोधून कुठे सापडली नाही.मेंदूसाठी मस्तिष्क,मस्तुलुंग असे समानार्थी शब्द आहेत.)
याचा अर्थ असा नव्हे की डोक्याच्या कवटीत सुरक्षितपणे असलेला मेंदू हा अवयव त्याकाळी ठावूक नव्हता. यज्ञात अनेक पशू बळी देत.अश्वाच्या प्रत्येक अवयवाचे नाव घेऊन,"स्वाSहा स्वाSहा" म्हणत त्या त्या अवयवाची आहुती हवनात टाकीत.तसेच मांसाहारासाठी बोकड,बैल,गाय असे पशू कापीत.तेव्हा पशूंचे सर्व अवयव वेदकालीन माणसाला ज्ञात होते.हाडात जसा पांढरा-पिवळा मगज असतो तसा प्राण्यांच्या डोक्याच्या कवटीत फिकट गुलाबी-राखी रंगाचा मगज असतो.माणसाच्या डोक्यातही तसा असणार एवढे त्याकाळी कळत होते.पण त्याच्या कार्याविषयी काहीच कल्पना माणसाला नव्हती.शरीरातील सर्व क्रिया नियंत्रित करण्याची यंत्रणा त्या गुलबट रंगाच्या मगजात आहे याची कल्पना त्याकाळी जगात कुणालाच नव्हती.ते ज्ञान अगदी अलिकडचे आहे.माणसाच्या स्मृती,ज्ञान,मन, बुद्धी यांचे स्थान हृदयात आहे अशी पूर्वी सर्वांची समज होती.कारण हृदयाची धडधड कळत होती.ती थांबली की मृत्यू येतो हे दिसत होते.
माणसाची कर्मेंद्रिये कोणती,ज्ञानेंद्रिये कोणती ,प्रत्येक इंद्रियाचे काम काय हे सहज समजत होते.पण इंद्रियांनी आपापली कामे करावी म्हणून त्यांना कोण प्रवृत्त करतो? ज्ञानेंद्रियांद्वारे झालेले ज्ञान नेमके कोणाला होते? ज्ञाता कोण? हे समजत नव्हते.केनोपनिषदात शिष्य गुरूंना विचारतो:--

"केनेषितां वाचमिमां वदन्ति? चक्षु: श्रोत्रं क उ देवो युनक्ति?"

[लोक ज्या वाणीने बोलतात त्या वाणीला बोलण्यास कोण प्रवृत्त करतो? डोळ्यांना आणि कानांना त्या त्या कामासाठी कोण नियुक्त करतो?]
ऐतरेय उपनिषदात आहे:--

"येन वा पश्यति ,ये न वा शृणोति,येन वा गंधानाजिघ्रति,येन वा वाचं व्याकरोति,येन वा स्वादु चास्वादु च विजानाति स आत्मा कतर:?"

[ज्याच्यामुळे माणूस (नेत्रांद्वारे) पाहातो,(कर्णाद्वारे) ऐकतो,(नाकाद्वारे) वास घेतो,वाचेद्वारे स्पष्ट बोलतो,(रसनेद्वारे) चविष्ट-बेचव जाणतो तो आत्मा कोण आहे?]
.....या प्रश्नाचे उत्तर ,"तो हृदयस्थ आत्मा परमात्म्याचा अंश आहे." असे दिले आहे.
त्याच उपनिषदात पुढे,

"संज्ञानं (सम्यक ज्ञान),आज्ञानं (आदेश देण्याची शक्ती),विज्ञानं (विभिन्न रूपांवरून वस्तू ओळखण्याची क्षमता),प्रज्ञानं (तात्काळ जाणण्याची शक्ती), मेधा,दृष्टि,धृति:,मति:,मनीषा(मनन करण्याची शक्ती),स्मृति:,संकल्प:,क्रतु:(मनोरथ शक्ती),असु:(प्राणशक्ती) ,काम: एतानि सर्वाणि प्रज्ञानस्य एव(जीवात्म्याचीच) नामधेयानि।

अशी प्रश्नोत्तरे उद्भवण्याचे कारण म्हणजे मेंदूच्या कार्याविषयीं असलेली त्या काळच्या माणसाची अनभिज्ञता.अन्य सर्व इंद्रियांची कामे कोणती ते स्पष्टपणे कळत होते.पण डोक्याच्या कवटीत आहे ते काय? त्याचे कार्य कोणते? याची काहीच कल्पना नव्हती.ज्यात शंभर अब्ज मज्जा पेशी आहेत असा माणसाचा मेंदू म्हणजे जगातले सर्वांत विस्मयकारक ,गहनतम असे विद्युत् -रासायनिक यंत्र आहे. माणसाच्या शारीरिक,वैचारिक,मानसिक,भावनिक अशा सर्व कृतींचे नियंत्रण मेंदू करतो हे गेल्या शंभर- दिडशे वर्षांत समजले आहे.उपनिषद् काळात मेंदू विषयीचे हे ज्ञान नसणे स्वाभाविक आहे.
पण माणसाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे त्याला हवी असतातच.शिष्यांनी विचारलेल्या अशा प्रश्नांवर गुरू चिंतन करतात.इंद्रिये आपापली कामे करतात त्यासाठी त्यांना कोण प्रवृत्त करतो?कोण आज्ञा देतो?इंद्रिये,मन,बुद्धी यांच्यावर नियंत्रण ठेवणारा कोणीतरी शरीरात असला पाहिजे असे त्यांना वाटते होते.यावर विचार करतां त्या ऋषींना विश्वनिर्मितीच्या ब्रह्मसिद्धान्ताचे स्मरण झाले.सर्वव्यापी ब्रह्मापासून विश्वाची निर्मिती झाली हे सर्व उपनिषदकार मानत होते.त्या ब्रह्माचा अंश माणसाच्या शरीरात असणार हे तर्कसंगत वाटले.म्हणून त्यांनी तशी कल्पना केली.शरीरांतील त्या मानीव ब्रह्मांशाला आत्मा असे नाव दिले.सर्वव्यापी ब्रह्म आणि शरीरस्थ ब्रह्म यांतील भेद स्पष्ट होण्याकरिता सर्वव्यापीसाठी परब्रह्म,परमात्मा,परमपुरुष,शिवात्मा तर शरीरस्थासाठी ब्रह्म,आत्मा,जीवात्मा,अंतरात्मा,देही असे शब्द रूढ झाले.हा आत्मा हृदयात असतो हेही सर्वमान्य झाले."अंगुष्ठमात्रो पुरुषोSन्तरात्मा सदा जनानं हृदये संनिविष्ट:।,सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनंच।[मी सर्वांच्या हृदयात सामावलो आहे.स्मृती,ज्ञान,चिकित्सक वृत्ती यांचा उद्भव माझ्यातून आहे.] असे उल्लेख उपनिषदांत तसेच गीतेत आहेत.इथे हृदय हे स्थान सोडून अन्य सर्व गोष्टी मेंदूला लागू पडतात हे आपण आज जाणतो.
पुढे या काल्पनिक आत्म्याच्या पायावर पुनर्जन्म,संचित,प्रारब्ध,स्वर्ग,मोक्ष,मोक्षप्राप्तीचे विविध मार्ग ,जन्ममृत्यूचे फेरे,चौर्‍याऐशी लक्ष योनी अशा अनेकानेक संकल्पनांचे बहुमजली डोलारे उभे राहिले.वस्तुत: हे सगळे माणसाच्या मेंदूनेच निर्माण केले."तुम्ही ज्याला शोधत आहात तो कर्ता-करविता मी आहे." याचा थांगपत्ता त्याने दीर्घकाळ लागू दिला नाही. त्याच्या आज्ञेनेच तर सगळे घडत होते पण ते त्याचे त्यालाच ठाऊक नव्हते मग थांगपत्ता कोण, कोणाला कसा सांगणार?
अशी आहे ही जाणिवेची जाणीव असलेल्या(पण बरेचदा कुठल्या कुठे भरकटणार्‍या ) होमो सेपियन सेपियनची गंम्मत! म्हणजे अब्जावधी मज्जापेशींनी बनलेल्या त्याच्या मेंदूची मज्जा!
*************************************************************************************

लेखनविषय: दुवे:

Comments

मेंदूचे कार्य

विच्छेदनाने मेंदूचे कार्य समजणे तसे कठिणच आहे. त्यात स्पष्टपणे दिसतील असे हालचाल करणारे उप-अवयव नाहीत. (हे अगदी-अगदी खरे नाही. डोळ्यांना जोडलेल्या चेता [ऑप्टिक नर्व्ह] मेंदूत शिरतात ते विच्छेदकाला ढोबळमानाने स्पष्ट दिसते. परंतु तरीसुद्धा कयास कठिणच आहे - या चेता म्हणजे डोळे कवटीच्या खोबण्यांमध्ये बांधून ठेवणारे रज्जू आहेत, असेही वाटू शकते.)

अपघाती दुखापतींमुळे मेंदूला थोडीशी इजा झाली, पण जीव गेला नाही, अशा रुग्णांचे मोठ्या संख्येने निरीक्षण केले, तर कदाचित मेंदूच्या कार्याबाबत काही कयास करता आले असते.

फोटो इमेजिंग

फोटो इमेजिंग तंत्राने मेंदूच्या कार्याविषयी कांही निश्चित निष्कर्ष काढता येतात असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते.नेमका संदर्भ आठवत नाही.

मेंदुच्या मनात

सुबोध जावडेकरांचे मेंदुच्या मनात हे पुस्तक वाचनीय आहे. पुस्तकात जावडेकर म्हणतात," जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्‍याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!"
दाभोलकरांनी जीवनाच्या खडबडीत रस्त्यावर अंधश्रद्धा शॉक अबसॉर्बर सारखे काम करतात असेच म्हटले आहे. आता काहींच्या दृष्टीने असलेल्या श्रद्धा या दुसर्‍याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असतात हा भाग वेगळा.

मेंदूचे आद्य कर्तव्य

"जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. "

.....श्री.प्रकाश घाटपांडे यांच्या प्रतिसादातून.
हे नि:संशय खरे आहे.मानवी मेंदू अनेक महत्त्वाची कामे करीत असला ,नवनवीन शोध लावत असला तरी शरीराला जिवंत ठेवणे " या कामाला तो प्रधान्य देतो.
तर्कशुद्ध विचार करायचा की जिवंत राहायचे? असे दोन पर्याय असतील तर मेंदू जगण्याला प्रधान्य देतो.---खरे तर त्या परिस्थितीत तोच तर्कशुद्ध विचार असतो....पण आता तशी परिस्थिती नसताना अनेक लोक श्रद्धा सोडायला तयार नसतात त्याचे कारण ते, म्हणजे त्यांचे मेंदू स्वतः विचार करण्याचे टाळतात.तसेच हितसंबंधी धूर्त माणसांच्या सततच्या प्रचाराला ते बळी पडतात.अर्थात अंततः त्याचे कारण स्वबुद्धीने विचार न करणे हेच आहे.

अमान्य

दाभोलकरांनी जीवनाच्या खडबडीत रस्त्यावर अंधश्रद्धा शॉक अबसॉर्बर सारखे काम करतात असेच म्हटले आहे.
तर्कशुद्ध विचार करायचा की जिवंत राहायचे? असे दोन पर्याय असतील तर मेंदू जगण्याला प्रधान्य देतो.

दोन्ही अमान्य. हे दोन्ही arguments कर्करोग terminal स्टेजला पोचलेला रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक अंद्धश्रद्धांना बळी पडले तर त्याला लागू होतात. पण धंद्यात वाढीव यशा करता घरांच्या भिंतींवर प्लस्टिकची पिरॅमिडस लावणे; वास्तु "तज्ञा" चा सल्ला घेऊन घराची तोडफोड करणे; बाबांच्या नादी लागणे, . . . . हे सर्व "जगण्याला प्रधान्य" या कॅटेगोरीत येत नाही. हे करणार्या बहुतेक लोकांना काहीही फार दु:ख / त्रास नसतो. जसे दारू पिणे, धूम्रपान करणे, जुगार खेळणे, ही व्यसने आहेत, तसेच न्यूमरॉलॉजिस्ट, टॅरॉट कार्ड रीडर, ज्योतिषी व भ्रुगु संहिता यांच्या मागे धावणे हे पण एक व्यसनच आहे. दारू/धूम्रपान याला एक वेळ de-addict करता येईल, पण अंधश्रद्धेचे व्यसन सहजा-सहजी काढता येत नाही. (चला, आपण एक "अंधश्रद्धाळू अ‍ॅनॉनिमस" सुरू करूया )

अंशतः: मान्य

पण धंद्यात वाढीव यशा करता घरांच्या भिंतींवर प्लस्टिकची पिरॅमिडस लावणे; वास्तु "तज्ञा" चा सल्ला घेऊन घराची तोडफोड करणे; बाबांच्या नादी लागणे, . . . . हे सर्व "जगण्याला प्रधान्य" या कॅटेगोरीत येत नाही.

प्राधान्य कशाला द्यायचे हे त्या व्यक्तीचा मेंदु ठरवत असतो. आपण जावडेकरांचे मेंदुच्या मनात पुस्तक जरुर वाचावे.अंधश्रद्धांची अज्ञान व अगतिकता एवढीच कारणे नाहीत.

दारू/धूम्रपान याला एक वेळ de-addict करता येईल, पण अंधश्रद्धेचे व्यसन सहजा-सहजी काढता येत नाही.

हे पटण्यासारखे आहे. माझ्या मते लोक अंधश्रद्धा सुध्दा एंजॉय करत असतात. जसे लोक भयपट पण एंजॉय करतात तसे.

समजुतीचा घोटाळा

"तर्कशुद्ध विचार करायचा की जिवंत राहायचे? असे दोन पर्याय असतील तर मेंदू जगण्याला प्रधान्य देतो."

हे श्री.चेतन पंडित यांना मान्य नाही.
हा समजुतीचा घोटाळा असावा.कदाचित माझ्या लेखनातील काही संदिग्धतेमुळे तो झाला असेल.
समजा ,"हवेतून घड्याळ काढण्याची दैवी शक्ती ससाबांना होती हे खरे मान. नाहीतर तुझी मान चिरतो."अशी धमकी देत बाबांच्या कोण्या भक्ताने माझ्या मानेवर सुरी ठेवली. तर त्यांच्याकडे तसे दैवी सामर्थ्य होते हे मी त्या माथेफिरूसमोर एकदा नव्हे तीनदा मान्य करीन. कारण इथे जीवन-मरणाचा प्रश्न आहे.जीव वाचवणे हे मेंदूचे --म्हणजे माझेच --आद्यकर्तव्य आहे.इथे तोच तर्कशुद्ध विचार आहे.श्री.पंडित यांनी दिलेल्या उदाहरणात धंद्यातील बरकतीसाठी भिंतीवर पिरॅमिड लावावे की न लावावे असे दोन पर्याय आहेत.तिथे जीवन-मरणाचा प्रश्न नाही.(किंबहुना चेतन यांनीच तसे म्हटले आहे.)त्यामुळे असे पिरॅमिड लावणे ही उघड उघड अंधश्रद्धा आहे.

 
^ वर