बाजारीकरण
गुरुवारच्या (दिनांक १८-०७-२०१३) महाराष्ट्र टाईमसमधे प्रा. जयंत नारळीकर यांनी शिक्षण क्षेत्रातील संशोधनाच्या बाजारीकरणा बाबतीत व्यक्त केलेली मते वाचली. या क्षेत्रातील दुरावस्थेचे खापर त्यांनी 'commercialization’ म्हणजे बाजारीकरणाच्या माथी मारले आहे. तसेच “बॅक टू फ्युचर” मधे पूर्व संकल्पनांच्या पगड्यामुळे खगोल भौतिकी विज्ञानवादी दृष्टीकोन समाजातून हद्दपार झाला आहे अशी खंत व्यक्त केली आहे. दुर्दैवाने प्रा. नारळीकर स्वतःच या पूर्व संकल्पनांना बळी पडले आहेत.
बाजारयंत्रणा फायद्याच्या प्रेरणेवर चालत असते. ‘Profit motive’ हा बाजारयंत्रणेचा प्राण आहे. बाजारयंत्रणेवर आधारित अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ म्हणजे स्वहित साधण्याचा प्रयत्न करतो व त्यातून समाजाचे हित साधले जाते. अडम स्मिथ याने आपल्या ‘अदृश्य हात’ (Invisible hand) या संकल्पनेत स्पष्टीकरण देताना असे म्हटले आहे की ““It is not from the benevolence of the butcher, the brewer and the baker that we expect our dinner but from their regard to their own interest.”
अॅडम स्मिथच्या आधी ७० वर्षे (१७०५) बर्नार्ड मॅन्डीविले यांनी आपल्या ‘Fable of bees’ या कवितेतून “स्वार्थ म्हणजे दुर्गुण” या पारंपारिक कल्पनेला प्रथम धक्का दिला. “समाजाची भौतिक प्रगती स्वार्थत्याग करणाऱ्या धुरिणांच्या त्यागातून होत नसते तर स्वतःचे हित साधणाऱ्यांच्या प्रयत्नांतून होत असते” असा पूर्व संकल्पनांना धक्का देणारा विचार बर्नार्ड यांनी प्रथम मांडला. त्याकाळात समाजाच्या मनावर चर्चच्या विचारांचा पगडा होता. “स्वार्थत्याग हा गुण आणि स्वार्थ हा दुर्गुण” असा समज दृढ झालेला होता. चर्चने सरकारवर दडपण आणून बर्नार्ड यांच्या कवितेवर बंदी घातली. बर्नार्ड यांच्यावर सर्वजण टीका करत असताना फक्त सॅम्युअल जॉन्सन (१७०९-१७८४) यांनी “बर्नार्ड यांच्या कवितेमुळे आपले डोळे उघडले व वस्तुस्थितीचे दर्शन झाले” असे म्हटले. आज ३०० वर्षानंतर आपण आपले डोळे उघडुया व पूर्वसंकल्पनांना बळी न पडता वस्तुस्थिती काय आहे ते समजून घेऊया. अलीकडल्या काळात अॅन रॅँड यांनी देखील आपल्या ‘The virtue of selfishness’ या पुस्तकात पारंपारिक कल्पनांवर हल्ला चढवला असून स्वहिताचा कोणताही त्याग वगैरे न करता जीवन जगणे शक्य असून ती काळाची गरज आहे असे सांगितले आहे.
“मुलभूत” संशोधनक्षेत्रातील आजचे चित्र आशादायी आहे असे प्रा. नारळीकर म्हणतात. भारताच्या बाबतीत ते खरे नसले तरी प्रगत देशांच्या बाबतीत नक्कीच खरे आहे. मुलभूत संशोधन करणारा कोणताही संशोधक आर्थिक फायद्यासाठी संशोधन करत नसतो. केवळ ज्ञान मिळवण्यासाठी त्याचे संशोधन चालू असते. आपण कोणता शोध लावणार आहोत हे मुलभूत संशोधन करणाऱ्या संशोधकाला माहित नसते. बाजारयंत्रणे मार्फत मिळणारया profit सारख्या प्रेरणांचा मुलभूत संशोधनाशी काही संबंध नसतो. याउलट Applied Research हा विशिष्ट ध्येय समोर ठेवून केला जातो. त्याला सर्वसाधारणपणे पैसा व साधनसामग्री उपलब्ध असते. उदा. इंटरनेटचा शोध अमेरिकेतील संरक्षण विभागातील संगणक एकमेकास जोडण्याच्या प्रयत्नातून लागला. हा शोध मुलभूत संशोधन करणाऱ्यांनी नव्हे तर Applied Research करणाऱ्यांच्या प्रयत्नांतून लागला. संशोधन क्षेत्रावर टीका करणारे Applied Research वर टीका करत असतात व या क्षेत्रातील दुरावस्थेचे खापर बाजारीकरणावर फोडले जाते.
बाजारीकरणाला बळीचा बकरा करण्यापूर्वी Commercialization म्हणजे नक्की काय? बाजारयंत्रणा कशी काम करते? Profit म्हजे नक्की काय? हे नीट समजून घेउन नंतरच टीका केली पाहिजे. विशेषतः profit आणि profiteering मधील फरक समजला पाहिजे. Profit motive म्हणजे स्वहित पाहत असताना इतरांचा देखील फायदा होईल हे पहिले जाते. Profiteering मध्ये दुसऱ्याचे शोषण करून स्वार्थ साधला जातो. टीका करायचीच असेल तर ती Profit motive चे रुपांतर Profiteering मधे करणाऱ्यांवर करावी.
‘Commercialization per se’ मधे काहीच गैर नाही. पूर्वीच्या काळी दुध विकणे पाप समजले जाई. नंतर दुध विक्री सुरु झाल्यानंतर दुधाचा ‘बाजार’ सुरु झाला. त्यानंतर दुधाचा महापूर येऊन धवल क्रांती झाली. दुधाचे बाजारीकरण झाले नसते तर शहरातील लोकांना दुध मिळाले नसते. प्रामाणिकपणे दुधाचा व्यवसाय करून त्यात फायदा मिळवणारे अनेक लोक दुध”बाजारात” आहेत. अर्थात काही लोक दुधात भेसळ करतात. हे बाजारयंत्रणेचे विकृतीकरण आहे. एखादे यंत्र बिघडले तर यंत्राला दोष न देता आपण ते दुरुस्त करतो. बाजारयंत्रणेचे काम नीट चालत नसेल तर सरकारी हस्तक्षेप जरुरी आहे. The invisible hand of market mechanism works best when there is very visible hand of government to regulate it. प्रत्येक समस्येचे खापर बाजारयंत्रणेवर फोडण्या पेक्षा बाजारयंत्रणा कशी काम करते ते समजून घेऊन त्यात काही दोष निर्माण झाले असले तर ते दूर करण्याचा प्रयत्न करणे एवढाच एक उपाय आहे, कारण आजच्या युगात Commercialization ला एकच पर्याय आहे तो म्हणजे भौतिक विकासाची आशा सोडून देणे.
Comments
दूधविक्री हे पाप? नवल-कुतूहल वाटले
> पूर्वीच्या काळी दुध विकणे पाप समजले जाई.
ही माहिती वाचून नवल आणि कुतूहल वाटले. हा समज भारताच्या कुठल्या विवक्षित प्रदेशात होता का?