गर्भधारणेचे बाजारीकरण
जननक्षमतेचा व्यापार
बाजारीकरण म्हटल्यावर आर्थिक घडामोडी, खरेदी - विक्री, कंपन्या-कंपन्यामधील जीवघेणी स्पर्धा, उत्पादनांतील व नफ्यातील चढ - उतार, जाहिरातबाजी, शॉपिंग मॉल्स - शोरूम्स, इत्यादी गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. कामगार, शेतकरी, इत्यादींचे शोषण, भेसळ, साठेबाजी, करचुकवेगिरी, भ्रष्टाचार इत्यादी अपप्रवृत्तीसुद्धा बाजारीकरणात गृहित धरल्या जातात व त्याकडे दुर्लक्षही केले जात असते. परंतु बाजाराचा हा ब्रह्मराक्षस आता आपल्या शारीरिक अवयवांच्या व्यापारीकरणाच्या प्रयत्नात आहे. मूत्रपिंडांचा काळाबाजार तर भरभराटीला आहे. युरोप अमेरिकेतील औषधी कंपन्यांच्या नवीन उत्पादनांच्या चाचणीसाठी गिनी पिग्स म्हणून आपल्या येथील गरीब रुग्णांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. व या गैर व्यवहारात मोठमोठ्या नावाजलेल्या वैद्यकीय तज्ञांचा सहभाग आहे, असे ऐकीवात आहे. आता त्याची नजर शुक्राणू, बीजांड, हार्मोन्स, गर्भ इत्यादी पुनरुत्पादनाशी संबंधित असलेल्या जैविक गोष्टीवर पडत आहे. वंध्यत्वावर मात करण्याची लालूच दाखवत लाखो - करोडोंची आर्थिक उलाढाल या पुनरुत्पादन क्षेत्रात - व विशेषकरून गर्भधारणेच्या व्यवसायात - होत आहे.
प्रेम, वात्सल्य, ममता, अशा गोष्टींची खरेदी - विक्री होऊ शकत नाही असे अनेकांना वाटते. तसाच काहिसा प्रकार संतती प्राप्तीसंबंधीसुद्धा आहे. कारण पुनरुत्पादन उत्क्रांतीचे बलस्थान आहे व ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कृत्रिम गर्भधारणा निसर्गांच्या विरुद्ध असून त्यात भाग घेणार्यांना कमी लेखणारी आहे. खरे पाहता, कृत्रिम गर्भधारणेचा अवलंब असाधारण परिस्थितीत एखादा अपवाद म्हणून व्हावयास हवा होता; परंतु ती आता समाजमान्य नेहमीची पद्धत म्हणून रूढ होत आहे.
'मुलं कशी जन्माला येतात?' याचे उत्तर सर्वाना माहित असले तरी चारचौघात त्याची वाच्यता करण्याची रीत (आतापर्यंत तरी) नव्हती. हा व्यवहार अत्यंत खाजगी स्वरूपातला, एकांतातला असा होता. शुक्राणू, बीजांड, गर्भनिर्मिती, गर्भधारणा या गोष्टी पुनरुत्पादन प्रक्रियेचे महत्वाचे घटक असून त्यातील प्रत्येकाची वैशिष्ट्यपूर्ण अशी भूमिका असते. परंतु आता त्यांची चारचौघात, चव्हाट्यावर चर्चा केली जात आहे. बिनदिक्कतपणे त्यांचे आर्थिक व्यवहारात रूपांतर होत आहे. मागणी तसा पुरवठा या भांडवली तत्वांची 'री' ओढत पुरेपूर फायदा करून घेतला जात आहे. परंतु यात नेहमीप्रमाणे स्त्रियांचेच शोषण होत आहे हे अजून जनसामान्यांना उमजलेले नाही.
प्रजननाचा हा व्यापार इतर उत्पादनांच्या तुलनेत फार वेगळ्या स्वरूपाचा आहे. जमीन-जुमला, घर-दार इत्यादीसारख्या व्यवहारात मालकी कुणाची याबद्दल व्यवहार संपल्यानंतर संदिग्धता नसते. सात-बाराच्या उतार्यावरून त्याची शहानिशा करून घेण्याची सोय असते. परंतु अपत्य प्राप्तीच्या व्यवहारात अपत्यावरील मालकी हक्क कुणाचा याबद्दल अनेक हेवे दावे आहेत. शुक्राणू एकाकडून, बीजांड दुसर्याकडून, गर्भप्रक्रिया क्लिनिक्समध्ये, गर्भवाढ एका तिर्हाइताच्या पोटात असा व्यवहार असल्यामुळे मूल कुणाचे ही गोष्ट कायम गुलदस्त्यात राहते. या गोष्टी शेवटपर्यंत अंधारात, अस्पष्ट व संदिग्ध राहतात.
अपत्याचा हव्यास
नैसर्गिकरित्या अपत्य होऊ शकत नाही व आपला वंश पुढे नेण्यासाठी आपल्या स्वत:चे(च) मूल हवे या हव्यासापोटी ही बाजारव्यवस्था मूळ धरू लागली. आपल्याला मूल व्हावे म्हणून देवधर्म, नवस - उपवास, गंडे - दोरे व इतर अनेक प्रकारचे चित्र विचित्र अघोरी उपाय अपत्यहीन जोडपे करत असते. काही वर्षापूर्वी गुजरातच्या सीमेवरील एका गावात पार्वती माँ नावाची बाई केवळ पोटावर हात सावरून गर्भधारणेचे चमत्कार करत होती. व महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून मिळेल त्या वाहनांनी झुंडीच्या झुंडी तेथे जात होत्या. अजूनही काही अनेक जोडप्या अशा बाई - बाबांच्या नादी लागून हजारो रुपयांचा चुराडा करून घेत आहेत. हे सर्व उपाय संपल्यानंतर खात्रीचा उपाय म्हणून शेवटी आधुनिक तंत्रज्ञानाला शरण जातात. विज्ञान - तंत्रज्ञान अशांसाठी आपली दारे उघडी ठेवत मूल होणारच याची खात्री देते.
मुळातच मूल न होण्याची कारणे अनेक आहेत. त्यातील काही, सामाजिक, काही भावनिक तर काही शारीरिक असतात. उशीरा लग्न करणे - होणे, दीर्घ काळ कुटुंब नियोजन करणे, मादक पदार्थांचे सेवन, अती मद्यपान, इत्यादीमुळेसुद्धा मूल होत नाही. शुक्राणूंची कमतरता, त्यांचा मंद वेग, बीजांडातील दोष, कमकुवत वा सदोष गर्भाशय, मासिक पाळीतील अनियमितता, हार्मोन्सचे असंतुलन, फॅलोपियन ट्यूबमधील दोष इत्यादी अनेक कारणं यामागे असू शकतात.
लग्न झाल्या झाल्या आपल्याला मूल व्हावे ही सामान्यपणे सर्व दांपत्यांची रास्त अपेक्षा असते. मूल लवकर न झाल्यास जोडप्यांना कुत्सित बोलणी ऐकून घ्यावे लागतात. विशेष करून स्त्रीला याचा फार त्रास होऊ शकतो. स्वत:ची आई, सासू, नणंद, इतर नातेवाईक, मैत्रिणी कुत्सित नजरेने तिच्याकडे पाहू लागतात. या संबंधात तिला आपण फार मोठा गुन्हा केला आहे असे वाटू लागते. पुरुष प्रधान समाजात मूल न होण्यामध्ये पुरुषाचा दोष नाही असेच गृहित धरले जाते व स्त्रीला अपराध्याच्या पिंजर्यात उभे केले जाते. मग मात्र दांपत्याची ससेहोलपट चालू होते. बाबा, बुवा, ताई, महाराजांपासून सुरुवात होत अघोरी उपचारापर्यंत सर्व उपाय केले जातात. हे सर्व उपाय थकल्यानंतर गरीब कुटुंब असल्यास दैवाला दोष देतात किंवा देवाची अवकृपा म्हणून गप्प बसतात. श्रीमंत मात्र यांत्रिक पुनरुत्पादनाच्या बाजारपेठेला शरण जातात.
यांत्रिक पुनरुत्पादन
यामध्ये वंध्यत्व दूर करणारे फर्टिलिटी क्लिनिक्स व वंध्यत्वावर तंत्रज्ञान शोधणार्या व औषधं तयार करणार्या कंपन्या आपापली पोळी भाजून घेत आहेत. याच बरोबर भारतात आयुर्वेदाचे पुरस्कर्तेसुद्धा आपलेही हात धुवून घेत आहेत. मुळातच कृत्रिम गर्भधारणेच्या बाजाराशी सुमारे 90-95 टक्के जनसंख्येचा संबंध येत नाही. उरलेल्यामधील गरीबांची संख्या वगळल्यास एक टक्क्याहून कमी असलेल्या श्रीमंतांसाठीच ही बाजारपेठ आहे. जनसंख्येचा एवढा मोठा हिस्सा गर्भधारणेच्या बाजारापासून दूर असला तरी, पैशाची उलाढाल मात्र मोठ्या प्रमाणात होत आहे. इतर नित्योपयोगी उत्पादनाच्या बाजारात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असूनही या बाजाराची पातळी त्यांना अजून गाठता आली नाही.
यांत्रिक पुनरूत्पादनाची सुरवात 1978 मध्ये 'टेस्ट ट्यूब' बेबीच्या शोधानंतर झाली. यात प्रामुख्याने कृत्रिम गर्भधारणा (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन IVF) या संकल्पनेचा आधार घेतला. आता हे कृत्रिम पुनरूत्पादन वेगवेगळ्या स्वरूपात ग्राहक जोडप्यांना आकर्षित करत आहे. वंध्यत्वावर मात करणारी औषधं, परक्याचे शुक्राणू, परक्याचे बीजांड, शुक्राणू व बीजांडाचे फॅलोपियन ट्यूबमध्ये कृत्रिम संयोग, टेस्ट ट्यूबमध्ये गर्भनिर्मिती, परक्या बाईच्या (सरोगेट मातेच्या) गर्भाशयात गर्भवाढ, बीजांडाचे प्रशीतन (रेफ्रिजरेशन), गर्भाची अदलाबदल अशा अनेक पध्दतीत गर्भधारणेचा व्यवहार चालतो. गर्भधारण व्यवहारात आता अपत्यपूर्तीची केवळ अपेक्षा नसते, तर जन्माला येऊ घातलेले बाळ सुदृढ, जनुकरोगमुक्त व सर्वगुणसंपन्न असावे अशी पण अपेक्षा केली जाते व बाजारपेठ ही अपेक्षा पण पूर्ण करण्याचा तयारीत आहे.
त्रासदायक प्रकिया
मूल होण्याची भूक शमविण्यासाठी वंध्यत्व दूर करणारे क्लिनिक्स व त्यातील निष्णात डॉक्टर्स व नर्सेसची फौज शहरा-शहरात जय्यत तयारीत आहेत. नैसर्गिकरित्या मूल होत नाही याची खात्री करून घेतल्यानंतर जोडपे गर्भचाचणीसाठी तयार होते. पुरुषांची चाचणी तुलनेने फार सोपी असते. रक्त व वीर्य यांच्या चाचणीनंतर पुरुषाच्या लैगिंकतेचा संपूर्ण आराखडा डॉक्टरसमोर उभा राहतो. स्त्रीची चाचणी मात्र जास्त त्रासदायक व तिच्या आत्मसन्मानाची कदर न करणारी असते. समागमानंतर शुक्राणू तिच्या योनीत प्रवेश करतात की नाही हे सिम्स हुन्हेर चाचणीत कळते. रूबेन्स चाचणीत फॅलोपियन ट्यूबमधील दोष लक्षात येतात. हिस्टेरोस्कोपीत गर्भाशयातील उणीवा कळतात. दांपत्याला अती क्षुल्लक समजणाऱ्या या चाचण्या अतिशय क्लेशकारक व मनस्ताप देणार्या आहेत. एवढेच नव्हे तर चाचणीतून कळलेल्या दोषांचे निवारण करणार्या सर्व उपाय-उपचारांना स्त्रीलाच सामोरे जावे लागते. त्यामुळे तिला जीव नकोनकोसा वाटू लागतो. कशाला या फंदात पडलो? अशी पश्चात्तापाची वेळ येते; परंतु यासाठीची फी डॉक्टरने अगोदरच वसूल केलेली असल्यामुळे अर्धवट सोडताही येत नाही. काही दोष आढळ्यास जननेंद्रियाची शस्त्रक्रिया, त्यांनतर गर्भधारणेसाठी औषधं, इंजेक्शन्स अशा वैद्यकीय चक्रातून तिला जावे लागते. गर्भाशयाबाहेर बीजांडांची वाढ करण्याचे ठरवल्यास हार्मोन्स नियत्रिंत करण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. या औषधांचे दुष्परिणाम होऊ शकतात. रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. गर्भशयात गर्भ व्यवस्थितपणे स्थिर होईपर्यंत तिला या प्रकियेमधून अनेक वेळा जावे लागते. चाचणीचे सर्व ताण स्त्रीलाच सहन करावे लागतात. अपत्याच्या अदम्य इच्छेपायी ( व सासू सासर्यांना, आई-बापाला, नवर्याला खूश ठेवण्यासाठी!) स्वत:चा जीव धोक्यात घालत मुकाट्याने या सर्व गोष्टी ती सहन करते. (कित्येक वेळा स्त्रीचा दोष नसतानासुध्दा तिला सर्व चाचणी व गर्भोपचारांचा सामना करावा लागतो; कारण तिचा पुरूष या प्रसंगी योग्य साथ देत नसतो. एका अभ्यासात क्लिनिकमध्ये चाचणी करून घेणार्या दापंत्यापैकी वीस टक्के दांपत्य नैसर्गिकरित्या गर्भधारण करण्यास योग्य असतात असे आढळले आहे.)
फर्टिलीटी क्लिनिक्स व डॉक्टर्स यशाच्या खात्रीबद्दल नेहमीच (चुकीची!) विधानं करत असतात. मूल जन्माला येते की नाही यापेक्षा गर्भ वाढतो आहे की नाही हेच यशाचे निकष ठरत असते. हार्मोन्समधील बदलसुद्धा गर्भवाढीच्या यशाच्या आकडेवारीत टाकले जातात. त्यामुळे हे आकडे नेहमीच फुगवून सांगितलेले असतात. जाहिरातीचा मारा करून वंध्यत्व असलेल्या जोडप्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा हा एक आक्रमक पवित्रा असतो. 'चमत्कार' म्हणूनच सामान्य लोक या गोष्टीकडे पाहतात आणि डॉक्टर्सना देवत्व बहाल करतात. दत्तक घेऊन किंवा निपुत्रिक राहूनसुध्दा हे दांपत्य सुखाने जगू शकते; परंतु बाजारीकरणाचा सातत्याने होणारा मारा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. खरे पाहता या कृत्रिम पुनरूत्पादनाच्या यशाचा दर 18-20 टक्क्यांपेक्षा जास्त नाही. तरीसुध्दा निपुत्रिक जोडपी यांच्या आहारी जातात. 'आम्ही याव्यतिरिक्त काय करू शकतो?' असेच हतबल होऊन ते विचारतात. अपत्य प्राप्ती हवी की नको याचा निर्णय निपुत्रिक जोडप्यांनी घ्यायली हवा; परंतु आजकाल हा निर्णय बाजार लादत आहे.
आर्थिक उलाढाल
गर्भधारणेच्या व्यापार व्यवहारात पैशाची फार मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. अवयवांची खरेदी-विक्री करण्यास कायद्याने बंदी आहे. परंतु शुक्राणू, बीजांड, गर्भ हे शारीरिक अवयवांच्या सदरात मोडत नसून हे सर्व 'शरीराचे उत्पादन' आहेत अशी पळवाट शोधून त्यांची विक्री होत आहे. शुक्राणूंच्या तुलनेने बीजांडांची किंमतही जास्त व त्याला मागणीही जास्त. या संबंधातील आकडेवारी आपल्या देशात उपलब्ध नसली तरी, अमेरीकेसारख्या विकसित राष्ट्राच्या आकड्यावरून या धंद्याचे स्वरूप कळू शकेल. या दरावरून नजर टाकल्यास हे दर त्या देशातील श्रीमंतांनासुध्दा न परवडणारे आहेत हे लक्षात येईल.
शुक्राणू ..... 30,000 रूपये
बीजांड ..... 4,50,000 रूपये
कृत्रिम गर्भधारणा (प्रत्येक खेपेस) .... 12,40,000 रूपये
भाड्याचे गर्भाशय .... 6,00,000 रूपये
पूर्वजनुक चाचणी .... 3,50,000 रूपये
दत्तक:नात्यांतल्यांसाठी .... 2,50,000 रूपये
दत्तक:अमेरिकेतल्या अमेरिकेत ..... 14,50,000 रूपये
दत्तक:इतर देशातून ..... 24,50,000 रूपये
भारतासारख्या विकसनशील राष्ट्रातील राहणीमानाप्रमाणे हे दर दहा टक्के असे धरले तरी हा खर्च भारतीयांच्या आवाक्याबाहेरचा आहे. तरीसुध्दा फर्टिलिटी क्लिनिक्सची जाहिरात व डॉक्टर्सच्या आग्रहांना बळी पडून या मृगजळांच्या मागे निपुत्रिक दांपत्ये धावत आहेत. अमेरीकेतील या आकडेवारीमुळेच भारतातील गर्भधारणेच्या उद्योजक ठेकेदारांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. भाड्याने गर्भाशय देणार्या स्त्रीसाठी (सरोगेट मदर) अमेरिकेत साठ लाख रूपये खर्च होत असल्यास, भारतात केवळ दहा ते बारा लाख रूपये दर ठेऊनसुध्दा प्रचंड नफा कमवता याईल हा हिशोब त्यामागे आहे. परदेशातील जोडप्यांना भारतात बोलावून त्यांच्या राहण्याचा खर्च, पूर्वचाचणी, कृत्रिम गर्भधारणा, नंतरच्या गर्भारपणातील भाड्याने गर्भाशय देणार्या स्त्रीची (सरोगेट मातेची) काळजी, प्रसूती इत्यादी सर्व गोष्टी अती कमी पैशात उरकता येतात, हे त्यांच्या लक्षात आले आहे. बाकीच्या चाचणी-गर्भधारणा इत्यादीसाठी फार वेळ लागत नसला, तरी गर्भ वाढवण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागतोच. त्यासाठी स्त्रिया पुरवण्याची व्यवस्था केल्यास धंदा तेजीत चालेल हे लक्षात आल्यानंतर भारतात सरोगेट मातांची फौज ठिकठिकाणी उभी केली जात आहे.
सरोगेट मातांचे खेडे
गुजरातमधील आणंद हे खेडे 'अमुल' दुग्ध उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. दूध सहकारी संघाच्या वितरण व्यवस्थेमध्ये आणंद व आसपासच्या खेड्यातील शेतकऱ्यांनी क्रांती केली आहे; परंतु आज हे खेडे युरोप, अमेरिकेत भाड्याचे गर्भाशय पुरवणाऱ्या 'सरोगेट माता' चे खेडे म्हणून नावाजले जात आहे. या गावातील अनेक तरूण/प्रौढ स्त्रिया दोन-चार लाख रूपयांसाठी गर्भव्यापारात भागीदार होत आहेत. फर्टिलीटी क्लिनिक्सचे दलाल बायकांना भुरळ पाडून या धंद्यात खोऱ्याने पैसे ओढत आहेत. गंमत म्हणजे हा सर्व व्यवहार कायदेशीर आहे. नीतीचा प्रश्नसुध्दा ह्या बायकांनी आपल्यापुरता सोडवला आहे. त्यांच्या मते आर्थिक मदत मिळत असल्यास गर्भाशय भाड्याने देण्यात काही गैर नाही. या अतिरिक्त पैशातून मुलांना चांगले शिक्षण, मुलींचे चांगल्या घराण्यात लग्न, आजारी नवर्याचे औषधोपचार होत असल्यास त्यात काय चूक अशी मानसिकता मूळ धरू पाहत आहे. शिवाय नवर्याच्या संमतीनेच त्याची बायको ही गोष्ट करत आहे. अशा व्यवहारात आणंद हे एकमेव खेडे आहे असे म्हणण्याला अर्थ नाही. इतर राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात हे व्यवहार चालत असावेत. फक्त त्यांचा गवगवा झाला नसेल. परदेशासाठी संगणक सेवा पुरवणार्या कॉल सेंटर्सप्रमाणे सरोगेट मदर्स पुरवणारे किंवा गर्भधारणा सेवा पुरवणारे केंद्र नजीकच्या काळात देशभर सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही काळात भारत देश हा सरोगेट मदर्सचा देश म्हणूनही प्रसिद्धीला येईल.
वैद्यकीय पर्यटन
मुळातच इतर विकसित देशातील जननक्षमतेचे प्रमाण गेल्या वीस वर्षात कमी कमी होत चालले आहे. 1975 मध्ये सरासरी प्रमाण 2.24 होते, 2011 मध्ये ते प्रती जोडप्यामागे 1.6 झाले आहे. त्यामुळे ज्यांना मूल हवे अशी जोडपी भारतात येतात व या देशात काही काळ राहून चाचणी इत्यादी सोपस्कार संपवून मातेच्या गर्भाशयात गर्भ ठेवून ते परत जातात व नंतर येऊन अपत्य घेऊन जातात. सरोगेट मातांच्या पुरवठ्याला आता व्यावसायिक स्वरूप प्राप्त होत (झाले) आहे. पंधरा ते वीस लाख रुपयात अपत्य प्राप्ती होत असल्यामुळे या परदेशी जोडप्यांचे साठ - सत्तर हजार डॉलर्स (30 लाख रुपये) वाचू शकतात. वैद्यकीय पर्यटन हे गोंडस नाव देऊन याचा खुले आम बाजार मांडला जात आहे.
(खरे पाहता भारतात एक कोटीपेक्षा जास्त अनाथांची संख्या असूनसुद्धा अनाथ मुला - मुलींना दत्तक घेण्याऐवजी ही जोडपी कृत्रिम गर्भधारणेचा अवलंब करत आहेत. कदाचित परदेशातील लोकांसाठीच्या दत्तक विधान संबंधाचे कायदे अतिशय क्लिष्ट व गुंतागुंतीचे व वेळखाऊ असल्यामुळे कुणीही या भानगडीत पडत नसावेत. कायद्याने अशा गोष्टीस मुभा दिल्यास Human trafficking ला आळा घालणे कठिण होत असल्यामुळे कायदे क्लिष्ट असावेत.)
आपल्या देशातही छुपेपणाने सरोगसीचे लोण पोहोचले आहे. आपल्या येथील (श्रीमंत) निपुत्रिकसुद्धा बाजारीकरणामुळे कृत्रिम गर्भधारणेचा आधार घेत आहेत. सरोगेट माता हवी म्हणून जाहिरात देत आहेत. ही प्रक्रिया संपूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित असूनसुद्धा सरोगेट माता विशिष्ट जातीचीच हवी, गोरीपान हवी अशा अटी जाहिरातीत नमूद केलेल्या असतात. अशा कारणासाठीसुद्धा लोक जात विसरत नाहीत.
सरोगेट मातांचे शोषण
गर्भधारणा बाजाराचे पुरस्कर्ते कितीही या बाजाराची (व उपचाराची) भलावण करत असले तरी सरोगेट मातांचे नक्कीच शोषण होत आहे. गर्भ/बीजांडाचे तथाकथित 'दान' केल्यानंतर हार्मोन्ससाठी त्यांना रोज इंजेक्शन्स घ्यावे लागतात. त्यामुळे रक्तस्राव, जंतुसंसर्गाचा तत्कालिक धोका होऊ शकतोच. शिवाय पुढील आयुष्यात स्तनाचा वा बीजांडकोषाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. गर्भ वाढवताना गर्भाबरोबरच जैविक व भावनिक सबंधांना तडा जात असतो. कारण गर्भाबरोबर जनुकीय संबंधाचा यात अभाव आहे. गर्भाशय भाड्याने घ्यायच्या आधी सरोगेट माताची चाचणी घेतली जाते. जोडप्यांच्या अटींची (जात, धर्म, रंग, आरोग्य, वय इत्यादी) पूर्तता होते की नाही याकडे लक्ष दिले जाते. अपत्याची 'गुणवत्ता' जपण्यासाठी या सरोगेट मातेला अल्ट्रासाउंड वा गर्भजल परिक्षा (amniocentesis)सारख्या प्रसूतीपूर्व चाचण्या द्याव्या लागतात. प्रसूतीनंतर 'अपत्यावर आपला हक्क नाही' असे करारपत्र लिहून द्यावे लागते. गर्भकाळात काही कमी जास्त आढळल्यास गर्भपात करून घेण्याची तयारी ठेवावी लागते. शेवटच्या क्षणी काही अडचणी आल्यास अपत्यांचा ताबा घेण्यास जोडपे नकार देऊ शकते. मुळातच जन्माला आलेले बाळ कुणाचेच नसल्यामुळे 'अनाथां'च्या संख्येत भर पडते.
बीजांडाच्या कृत्रिम उत्पादन पद्धतीमुळे एकच बीजांडाऐवजी अनेक वेळा दोन - तीन बीजांडे तयार होऊ शकतात. त्यामुळे जुळे - तिळे असे जन्म घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्भावस्थेत कितीही काळजी घेतली तरीही जुळ्या-तिळ्याच्या प्रसूतीतही तिच्या जिवाला धोका असतो. आजकाल प्रसूतीचा धोका कायम असतो.
फर्टिलिटी क्लिनिक्स सरोगेट मातांना एखाद्या निर्जीव यंत्रासारखी वागणूक देत असतात. एखादी सामान्य स्त्री जेव्हा गर्भारशी राहते तेव्हा तिच्या मेंदूत काही बदल होतात व ती होऊ घातलेल्या बाळाची काळजी घेण्यास सज्ज होत असते. प्रसूतीनंतर मूल परक्याचे होणार आहे या कल्पनेनेच ती अस्वस्थ होऊ शकते. व मानसिक संतुलन बिघडवून घेवू शकते. पैशासाठी ती हे ओझे बाळगत असले तरी भावनाविवश अवस्था ती टाळू शकत नाही.
या स्त्रिया जैविक गुलामगिरीच्या शिकार झालेल्या असतात. जोडप्यांकडे भरपूर पैसा असतो व सरोगेट माता म्हणून पुढे येणारे गरीब कुटुंबातलेच असतात. 'बाळाचे उत्पादन' घेणाऱ्या जोडप्याचे समाधान झाल्यानंतरच तिचे पैसे चुकते गेले जातात. पैशाच्या हव्यासापायी ती 5 -6 वेळा सरोगेट माता झाल्यास तिच्या जिवाला धोका पोहोचू शकतो. जोडपे व क्लिनिक्सना याचे काही देणे घेणे नसते; सरोगेट मातेचे शरीर म्हणजे गर्भ वाढवणार भांड असेच वाटत असते.
गर्भधारणेबद्दल बाजारव्यवस्थेला खरोखरच आत्मीयता असल्यास अशा प्रकारच्या जुजबी तंत्रज्ञानापेक्षा वंध्यत्व दूर करण्यासाठी मूलभूत संशोधनाला उत्तेजन द्यायला हवे होते. त्यासाठी पैसा ओतायला हवा होता. वंध्यत्वाची कारणं शोधून तंत्रज्ञान विकसित करायला हवे होते. परंतु या औषधी कंपन्या व त्यांना साथ देणारी वैद्यकीय व्यवस्था संशोधनात पैसे गुंतवण्याऐवजी लगेच परतफेड करू शकणार्या तंत्रज्ञानाला पाठिंबा देत आहेत. वायू प्रदूषणावर कायमची उपाययोजना शोधण्यापेक्षा नाकाला रुमाल बांधून गाडी चालवण्यासारखाच हा प्रकार आहे. मूळ दुखणे शोधून त्यावर इलाज करणे गरजेचे आहे. (संदर्भ)
कायदे कानून
गर्भधारणाच्या संबंधात आताच्या कायद्यामध्ये अंदाधुंदी आहे. एका देशात बीजांड विकण्यास बंदी, एका देशात गर्भ वाढविण्यास बंदी, दुसर्या एखाद्या देशात सरोगेट मातेवर बंदी, अशा अनेक तर्हा आहेत. त्यामुळे डेन्मार्कहून शुक्राणू, स्पेनमधून बीजांड, कॅलिफोर्नियात गर्भवाढ व इंग्लंडमध्ये अपत्याची वाढ अशा प्रकारे जन्मलेले मूल जागतिकीकरणाच्या चक्रात अडकून पडत आहे. भारतातसुद्धा यासंबंधीच्या कायद्यात भरपूर संदिग्धता आहे. या पद्धतीने जन्माला आलेल्या मुलावर कायदेशीर हक्क कुणाचा - शुक्राणू देणार्याचा, की बीजांड देणार्याचा की सरोगेट मातेचा, की मुलाचे संगोपन करणार्याचा? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. केवळ करारपत्रावर सही केली याचा अर्थ इतरांना हात झटकून मोकळा होता येत नाही. मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्यामुळे कायद्यातील कलमांचा योग्य अर्थ ध्वनित होतो की नाही याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. थोडासा जरी शिथिलपणा त्यात असल्यास गैरफायदा घेणारे टपलेले असतात.सरसकट बंदी घालण्याचा प्रयत्न केल्यास मूत्राशय विक्री व्यवसाय जसा फोफावला तसा या जैविक उत्पादनाचासुद्धा काळा बाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कृत्रिम गर्भधारणा हा उपाय नव्हे
मुळात निपुत्रिक असणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही. निपुत्रिक जोडप्यांनी आपल्या मनातील अपराधीपणाची भावना दूर केल्यास समाधानी जीवन नक्कीच जगता येईल. अपत्य प्राप्तीसाठी एवढा आटापिटा करण्याची खरोखरच गरज आहे का याचाही विचार करावा लागेल. पूर्वीच्या काळी अविभक्त कुटुंबात निपुत्रिक जोडपी आपल्या भावा - बहिणींच्या मुलां-बाळांना आपलेच समजून समाधानी राहत होते. अलीकडील काळात विभक्त कुटुंबांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आपलेच मूल हवे हा हट्ट न धरता नात्यातील एखाद्याच्या संगोपनाची जबाबदारी उचलून समाधानी जीवन जगणे अशक्यातली गोष्ट नाही.
आताच्या बदलत्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीचा अभ्यास केल्यास स्वत:चा वंश पुढे चालवण्याचा अट्टाहास कशापायी असा प्रश्न पडू शकतो. एके काळी मुलं म्हणजे म्हातारपणाचे आधार अशी प्रतिमा होती. आजच्या परिस्थितीत ही संकल्पना कालबाह्य ठरत आहे. पालकांनासुद्धा आपली मुलं म्हातारपणी आपल्याजवळ असतील किंवा त्याच्याजवळ आपण असू याची खात्री देता येत नाही. मुलं दुसरीकडे, वृद्ध आई - वडील आणखी कुठेतरी अशी परिस्थिती असताना अपत्य प्राप्तीचे हे सबळ कारण होऊ शकत नाही. मुलाबाळाशिवाय घराला घरपण येत नाही या मर्यादेपर्यंत अपत्याची गरज भासू शकते. परंतु त्यासाठी एवढा आटापिटा करायचा का हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
आपल्या देशापुरते बोलावयाचे असल्यास या धोकादायक तंत्रज्ञानाची अजिबात गरज नाही. हवे असल्यास लाखो अनाथ बालकांपैकी एखाद्याला/एखादीला दत्तक घेऊन आपले जीवन आनंददायी करता येईल. फक्त आपल्याजवळ पैसा आहे म्हणून एखाद्या गरीब, नडलेल्या स्त्रीला सरोगेट माता होण्यास भाग पाडून तिला गुलामासारखी वागणूक देणे विवेकीपणाचे लक्षण नव्हे. घरात मूल वाढ असताना त्याच्या खोडकरपणातून, खेळकरपणातून बोबड्या बोलातून आनंद मिळविण्यासाठी घरात काही काळ तरी रांगते मूल हवे याबद्दल दुमत नाही; परंतु यासाठी कृत्रिम गर्भधारणा उपाय होऊ शकत नाही.
Comments
अनेक न पटाणारे मुद्दे
प्रभाकरजी, सामान्यत: मी तुमचे लेखन गंभीर पणे घेतो. या तुमच्या लेखात पण नेहमी प्रमाणे खूपच माहीती आहे. पण या वेळी तुमचे अनेक मुद्दे व तर्क मात्र पटायला कठीण आहेत.
"आपला वंश पुढे नेण्यासाठी आपल्या स्वत:चे(च) मूल हवे" व "शुक्राणू एकाकडून, बीजांड दुसर्याकडून, गर्भवाढ एका तिर्हाइताच्या पोटात" या दोहोत विरोध आहे. शुक्राणू व बीजांड या दोन्ही पैकी काहीही "आपले" नसेल तर तर त्या अपत्यात "आपले" काहीच नाही व मग त्या पेक्षा "ready made" मूल दत्तक घ्यावे इतकी साधी गोष्ट सरोगसी करता लाखो रुपये खर्च करणार्यांना कळत असेल, असे मला वाटते. माझा असा समज होता कि सरोगसी मधे शुक्राणू व बीजांड य पैकी किमान एक, कदाचित दोन्ही "आपले" असते. पण हा माझा intelligent guess च आहे.
दत्तक घेऊन किंवा निपुत्रिक राहूनसुध्दा हे दांपत्य सुखाने जगू शकते" - हे तुम्ही किंवा मी कसे ठरविणार ?
"यामध्ये वंध्यत्व दूर करणारे फर्टिलिटी क्लिनिक्स व वंध्यत्वावर तंत्रज्ञान शोधणार्या व औषधं तयार करणार्या कंपन्या आपापली पोळी भाजून घेत आहेत." पण मग ह्रुदयाच्या वहिन्यांमधील अडथळे दूर करण्या करता angioplasty चे बलून, स्टेन्ट इत्यादी करणार्या कंपन्या पण आपापली पोळी भाजून घेत आहेत असे ही म्हणता येईल. मला अस वाटते कि सरोगसीला तुमचा ideological विरोध आहे, व एकाद्या गोष्टीला विरोध ideological असला कि logical तो आहे असे भासविण्या करता आपण logical तर्क हुडकत बसतो - जसे मद्याला, मांसाहाराला, मोठ्या धरणांना . . . . ideological विरोध असणारे मद्य/ मांसाहार/मोठी धरणे. . . कशी वाईट आहेत हे पटवून द्यायचा प्रयत्न करीत असतात, तसे तुमच्या लेखाचे झाले आहे.
सहमत
याच्याशी सहमत आहे. कारण शेवटी तसे करणे ही आपली मानसिक गरज असते.मग पुढे यातूनच शाब्दिक कसरती चालू होतात.
सरोगसी तंत्रज्ञान
आपला intelligent guess बरोबर आहे. वाक्यरचनेतील गोंधळामुळे हा गैरसमज झाला आहे. ही वाक्य रचना अशी हवी होती
बीजांड आपले - शुक्राणू एकाकडून, शुक्राणू आपले - बीजांड दुसऱ्याकडून.....
हे आपण ठरवू शकत नसलो तरी सरोगसी तंत्रज्ञान नसताना निपुत्रिक दंपती काय विचार करत होते याची आपण नक्कीच कल्पना करू शकतो. गंमत म्हणजे सरोगसी तंत्रज्ञानाचा वापर आपल्या देशात, काही तुरळक आगर्भ श्रीमंत निपुत्रिकांचा अपवाद वगळता, होत नाही. बाहेरच्या देशातील धनिक निपुत्रिकच या देशातील स्त्रियांचे गर्भ भाड्याने घेत असतात. खरोखरच हे तंत्रज्ञान मानवी कल्याणासाठी उपयुक्त असल्यास परदेशात याचे क्लिनिक्स का नाहीत? या सरोगसीवर एवढे जाचक बंधनं का आहेत ? सरोगसी बेकायदेशीर का ठरवले जाते ?
माझ्या मते प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाची तुलना सरोगसी तंत्रज्ञानाशी होऊ शकत नाही. परंतु लेखातील मुद्दा हा नाही. मुद्दा हा आहे की सरोगसीच्या काळातील स्त्रियांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा, अर्धवटपणे राबवत असलेल्या तंत्रज्ञानाचा व त्यापासून होणार्या दूरगामी दुष्परिणामांचा. वंध्यत्वावर मूलभूत संशोधन न करता केवळ काही जैविक तंत्रज्ञानांची मदत घेऊन त्यालाच एकमेव उपचार पद्धती म्हणून डांगोरा पिटणार्यांचा.
शिवाय हे तंत्रज्ञान फार फार घाई घाईने आपल्या देशात कायद्यातील पळवाटा शोधून राबवले जात आहे. बाजारीकरणाचे कितीही गोडवे गात असलो तरीही वा मागणी तसा पुरवठा हा मंत्रजप करत असलो तरी यात गरीब स्त्रियांचे शोषण होत आहे हे मात्र नक्की. मग तुम्ही शोषण न म्हणता त्याला काहीही नाव देऊ शकता.
एक हायपेथेसिस केस म्हणून त्यासंबंधी चर्चा करता येईल. अमेरिकेतील वा इतर कुठल्याही विकसित देशातील जोडप्यांनाही न परवडण्याइतका खर्च यासाठी येत असल्यास निर्वेधपणे चाललेला हा धंदा एवढ्या ऊर्जितावस्थेपर्यंत पोहोचला नसता. यासाठी आपल्या शासनाने सरोगसीतून जन्मलेल्या बाळाला बाहेरच्या देशात नेण्यासाठी 1-2 कोटी रुपये एवढा जबरदस्त कर लादल्यास हा धंदा इतका तेजीत चालला नसता. किंवा शासनानेच पुढाकार घेऊन सरोगसीला उत्तेजन देण्याचे धोरण ठरवून त्यासाठी ठिकठिकाणी सरोगसी क्लिनिक्स उघडल्यास आपल्या देशातील हजारो लाखो गरीब स्त्रिया पुढे आले असते. आणि demandपेक्षा supply जास्त झाल्यावर भाव कोसळले असते व बाजारही कोसळला असता.
कुवेत वा काही इतर अरब देशातील अमीर वर्गासाठी उंटांच्या पायाला लहान मुलांना बांधून शर्यत लावतात. त्या मुलांच्या पालकांना भरपूर मोबदलाही दिला जातो. शर्यतीतील मुलगा जगला वाचला तर त्याची काळजी घेण्याची हमीही असते. काहीच्या मते यात कुठेही शोषण नसावे. मुळात मनोरंजनाच्या या विकृत प्रकाराला आळा घालण्याची राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे हे राजरोसपणे चालत असावे.
बेऴगाव - कोल्हापूर जिल्ह्यातून मुंबईत येणाऱ्या देवदासी महिला खुले आम देह विक्री करत असताना त्यांचे शोषण होत नाही असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठरेल. आपल्याला मिळत असलेल्या तुटपुंज्या उत्पन्नातून त्या खेड्यातल्या घरी पैसे पाठवतात. यामुळे येथेही कुणाची तक्रार नसते. परंतु हे सर्व असेच चालू ठेवत रहावे असे वाटणेसुद्धा चुकीचे ठरेल.
कुवेत येथील एक महिला राज्यकर्ती ने, त्या देशातील पुरुषांची लैंगिक भूक भागवण्यासाठी बाहेरच्या देशातून sex slaves आणावेत असा प्रस्ताव मांडला आहे. कारण त्या देशात त्याच देशातील स्त्रियांच्या बरोबरचा व्यभिचार धर्माने निषिद्ध आहे. परंतु बाहेरच्या देशातील स्त्रियांशी केलेला व्यभिचार त्यांना चालतो (!)
इंग्लंडमधील कायदेशीररित्या चाललेल्या गुलामांच्या व्यापाराच्या विरोधात विलियम विल्बरफोर्स याला चळवळ उभी करावी लागली, हे आपण सहजासहजी विसरू शकत नाही.
अशा प्रकारची अनेक उदाहरणं मागणी तसा पुरवठा या विधानाच्या संदर्भात देता येतील. त्यामुळे सरोगसीच्या विरोधात आवाज उठवणे म्हणजे येऊ घातलेले वैद्यकीय तंत्रज्ञान नाकारणे असे मला तरी वाटत नाही.
यासंबंधातील जॉन ग्रे या तत्वज्ञाचे खालील विधान बोलका आहे.
In market socieites... not only economic activity distinct from the rest of social life, but it conditions and sometimes dominates, the whole society.
रोचक
रोचक.
यू. एस मधील काही राज्यांमध्ये सरोगसीकरिता खर्च कितपत येऊ शकेल, त्याचे अंदाजपत्रक येथे बघितले : (दुवा)
साधारण ९५,००० ते १,००,००० डॉलर इतका खर्च येतो, असे दिसते.
गर्भधारक मातांचे शोषण होऊ नये असे कायदे असले पाहिजेत. हा मुद्दा सुयोग्य आहे.
मात्र बाजारीकरण होऊ नये या व्यापक मुद्द्याबाबत साशंक आहे. इथे अंगभूत "मार्केट फेल्युअर" असल्यास बाजार नसावा, किंवा नियंत्रित बाजार असावा, हे आहेच. म्हणजे गर्भधारणेची कंत्राटे त्यातल्या त्यात दुर्बळ घटकाचे शोषण करत नाहीत असे नियंत्रण असावे, वगैरे.
काही बाबतीत कंत्राट करणार्या पक्षांच्या ज्ञानाबाहेरील आणि इच्छेबाहेरील अनपेक्षित खर्च उचलण्यासाठी विमा हवा. वगैरे.
एक समजले नाही :
> नीतीचा प्रश्नसुध्दा ह्या बायकांनी आपल्यापुरता सोडवला आहे. त्यांच्या मते
> आर्थिक मदत मिळत असल्यास गर्भाशय भाड्याने देण्यात काही गैर नाही. या
> अतिरिक्त पैशातून मुलांना चांगले शिक्षण, मुलींचे चांगल्या घराण्यात लग्न,
> आजारी नवर्याचे औषधोपचार होत असल्यास त्यात काय चूक अशी मानसिकता
> मूळ धरू पाहत आहे. शिवाय नवर्याच्या संमतीनेच त्याची बायको ही गोष्ट करत आहे.
या स्त्रियांना नीतीचा प्रश्न सोडवण्याचा हक्क किंवा स्वातंत्र्य आहे की नाही, याबाबत लेखकाचे मत मला समजलेले नाही. वाक्यांच्या शैलीमुळे असे वाटते की लेखकाला हे नैतिक गणित मान्य नाही. परंतु स्त्रियांनी नैतिकतेचा प्रश्न असा सोडवणे मुळातच अमान्य असण्याचे कारण कळत नाही.
या स्त्रियांना भावनिक आणि शारिरिक दुखापतीची कल्पना नाही, त्यामुळे त्यांचे गणित चुकते, असे लेखकाचे मत आहे का? परंतु ज्या स्त्रिया १पेक्षा अधिक वेळा गर्भ वाढवण्याकरिता तयार होतात - अशा बर्याच स्त्रिया असतात असे लेखक सांगतो - त्यांना या भावनिक-शारिरिक श्रमाची कल्पना चांगलीच असेल.
---
निपुत्रिक जोडप्यांनी जैविक वंशसातत्यापेक्षा दत्तक घेण्याबाबत विचार करावा, त्याबाबत त्यांचे मन वळवावे, ही लेखकाची भावनासुद्धा स्तुत्य आहे.
इतके सोपे नाही
गर्भधारक मातांचे शोषण होऊ नये असे कायदे असले पाहिजेत. हा मुद्दा सुयोग्य आहे.
शोषण होऊ नये हे तत्वशः बरोबर असले तरी गोची ही असते कि शोषण म्हणजे काय हे ठरविणे वाटते तितके सोपे नाही.
१: आपल्या पैकी बहुतेक लोकांच्या घरी झाडू पोछा, भांडी इत्यादी कामाला एक बाई येते. आपण तिला causal/ earned/ medical leave, medical assistance, PF , पेन्शन वगैरे काही देत नाही. पण तिच्या कडे दुसरा पर्याय नसल्याने ती आपल्या कडे या टर्म्स वर काम करते.
२: सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच डान्स बार वरील बंदी उठविली. तेव्हां पासून बार-बाला शोषित आहेत का यावर चर्चा सुरु आहे. बार-बालांना कोणी पकडून जबरदस्ती ने तिथे आणीत नसते. तसेच डान्स बार मधे जे काही होते त्यात physical force नसतो. सर्व जरी नाही तरी अनेक बार-बाला हे काम पूर्ण पणे स्वेच्छेने व आनंदाने करतात.
३: बॅन्केतील एक कारकून रोज कामाला बॅन्केत जातो. अत्यंत अनिच्छेने. सकाळी धावत पळत स्टेशन वर जाऊन आठ-वीस ची चर्च गेट फास्ट पकडायची, प्रचंड गर्दीतून उभे राहून एक तास प्रवास करायचा, आठ तास बॅन्केत मान मोडून काम, परत परतीचा तसाच प्रवास, . . . हे सगळे तो अत्यंत अनिच्छेने करतो, एक मजबूरी म्हणून.
वरील तीन उदाहरणात कोण कोण शोषित आहेत ? कौल घेतला तर बहुतेक लोक म्हणतील कि बार-बाला नक्कीच शोषित आहेत (स्वेच्छेने व आनंदाने डान्स करीत असल्या तरी); बॅन्केतील कारकून नक्कीच शोषित नाही (अनिच्छेने मजबूरी म्हणून काम करीत असला तरी); व मोलकरीण च्या बाबतीत ओपीनीयन divided असेल.
शेवटी, स्वेच्छेने व आनंदाने डान्स करणार्या बार-बाला जो प्रश्न विचारतात - कि आम्ही शोषित आहोत अशी तक्रार आम्ही कधी केली का? मग आम्ही शोषित आहोत हे ठरविण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? सर्वोच्च न्यायालयाने डान्स बार वरील बंदी उठविली तेव्हां डान्स बार मालकांनीच नव्हे तर अनेक बार-बालांनी पण आनंद व्यक्त केला. सरोगसीत (किंवा कशातच) शोषण होऊ नये हे तत्वशः बरोबर आहे, वाचायला ऐकायला गोंडस आहे, पण या पलीकडे असल्या विधानांचा काही उपयोग नाही.