कर्ज काढून तूप प्या

यावज्जीवेत सुखज्जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः
नास्तिकशिरोमणी चार्वाक ही एक व्यक्ती होती कि एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या जीवनवाही तत्त्वज्ञानाचे ते नाव होते या बाबत वाद असला तरी लोकायत तत्वज्ञानाची बाजू जे घेतात त्यांना सर्वसाधारण चार्वाक म्हणून ओळखले जाते. चार्वाक मंडळींचा यज्ञ याग होम हवन इत्यादींना विरोध असल्याने त्यांना असुर म्हटले जात असे. चार्वाक मंडळी इहवादी तर अध्यात्मिक मंडळी परलोकवादी. एरवी अतिशय आक्रमक असणारी चार्वाक मंडळी मात्र “कर्ज काढून तूप प्या” या त्यांच्या सुप्रसिद्ध वचनाचे बाबतीत मात्र संरक्षणात्मक पावित्रा घेतात.
खरे पाहिले तर कर्ज घेण्यात काहीच गैर नाही. कर्ज घेणे हा एक वित्तीय साधनसामग्री जमविण्याचा मार्ग आहे. कर हे वित्तीय हत्यार आहे. घेतलेल्या कर्जाचा योग्य वापर केला व ठरल्याप्रमाणे ते परत केले तर त्यात काहीच गैर नाही. जगातील सर्व बँकांचा व्यवहार ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे यावर चालतो.
स्वतःला अध्यात्मवादी म्हणवणारे लोक सर्रास क्रेडीट कार्ड वापरत असतात, घरासाठी कर्ज घेतात, कर्ज घेवून मुलीच्या लग्नात मोठ्याप्रमाणावर खर्च करतात. चार्वाक मंडळीनी “कर्ज काढून तूप प्या” म्हटले तर कडाडून टीका करतात. या लोकांचा मुखवटा जरी आध्यात्माचा असला तरी चेहरा मात्र चार्वाकाचाच असतो.

लेखनविषय: दुवे:

Comments

रोचक

रोचक.

चार्वाक संप्रदायातले लोक "कर्ज काढून तूप प्या" म्हणतात, असा अन्य संप्रदायातल्या लोकांचा (संक्षिप्त) आरोप आहे. तो आरोप त्यांच्या स्वतःच्या वागण्यापेक्षा वेगळा कसा, आणि म्हणूनच चार्वाकही तो का अमान्य करायचे, हे समजून घ्यायला पाहिजे.

देह लवकरच भस्मीभूत होण्याच्या संदर्भात हे कर्ज घेतलेले आहे आणि हे तूप प्यालेले आहे. कर्ज घेऊन तूप पिऊन मग कर्ज न फेडता मरावे, आणि देह भस्मीभूत झाल्यानंतर तो परत येणे नाही, म्हणजे कर्ज फेडणेसुद्धा नाही... विस्ताराने सांगितल्यास हा असा आरोप आहे.

आरोप करणार्‍यांचे स्वतःच्या वागण्याबाबत मत असे असते, की "आम्ही परत येऊ यावर विश्वास ठेवतो, तेव्हा आम्हाला शिक्षा होईल, म्हणून आम्ही कर्जे फेडतो".

अर्थात, आरोपींचे वागणे (वरील स्पष्टीकरणाप्रमाणे) अंतर्गत सुसंगत असले, तरी आरोप काही सयुक्तिक होत नाही. त्याचे कारण असे : कर्ज काढल्यानंतर ते फेडायची वेळ येईस्तोवर लोक पुष्कळदा जिवंतच असतात, क्वचितच मेलेले असतात. त्यामुळे कर्ज घेतल्यावर "न-मरू" ही शक्यता अधिक वजनाची मानायला हवी, आणि कर्ज फेडायची पूर्वतयारी करायला हवी. आणि अशा प्रकारचा विचार लोक करतात. मृत्यूनंतर अमरत्व/पापाकरिता दंड असतो, या बाबतीत अविश्वास असलेले लोकही ऐहलौकिक कर्जे फेडण्याचीच तयारी ठेवतात. त्यामुळे आरोप फोल आहे.

आणि होय. पुनर्जन्मात दंड मिळेल अशी भीती असलेले लोक अकस्मात मेले, तर त्यांची कर्जे बुडतात. पुनर्जन्मावर विश्वास नसला तरी कर्जे बुडतात. त्यामुळे मरण आलेच, तरी सुद्धा कर्ज बुडण्याबाबत विश्वास-अविश्वासाचा मुद्दा नि:संदर्भ आहे. आणि मरण आले नाही, तरी कर्जफेडीबाबत विश्वास-अविश्वासाचा मुद्दा नि:संदर्भ आहे. म्हणूनच हा आरोप नि:संदर्भ आहे.

सर, हे तुमच्यकडून असे उत्तर अपेक्षित नव्हते.

मूळ श्लोक :

यावज्जीवेत् सुखम् जीवेत्
नास्ति मृत्यू अगोचर:
भस्मीभूतस्य देहस्य
पुनरागमनम् कुतः

असा आहे. यात मृत्यू कुणास टळला नाही, या अर्थाच्या ओळी ऐवजी, ऋणं कृत्वा घृतं पिबेत असे विडंबन आदिशंकराचार्यांच्या नावावर आहे, हे आपणास ठाऊक नसावे असे नाही..

विडंबन म्हणजे अन्य संप्रदायातील लोकांचा आरोप

मी वरील प्रतिसादाच्या सुरुवातीला म्हटले आहे :

> चार्वाक संप्रदायातले लोक "कर्ज काढून तूप प्या" म्हणतात, असा अन्य संप्रदायातल्या लोकांचा (संक्षिप्त) आरोप आहे.
आदिशंकराचार्य वगैरे चार्वाकावेगळ्या संप्रदायातले होत. "घृतं पिबेत्" विडंबन म्हणजे अन्य सांप्रदायिकांनी चार्वाकांवर केलेला आरोप होता. हे तर ठीकच आहे. (नेमके काय अपेक्षित नव्हते, ते कळले नाही.)

अं...

मूळ श्लोकाचे विडंबन हेच सत्य असे धरून पुढील विवेचन करणारा मूळ लेख आहे. त्यात तुमच्याकडून त्या विडंबनाच्याच अनुषंगाने च पुढील लिखाण आले, हे पटले नाही. बाकी तुमचे डिस्क्लेमर(च नव्हे, तर प्रतिसाद व त्यातील विवेचनही) योग्य आहेच. फक्त वेगळेच काहीतरी :अर्थात, जणू चार्वाक तत्वज्ञान कर्ज काढून उधळपट्टी करा हेच सांगते आहे,: याला तुमच्याकडून एंडॉर्समेंट मिळते आहे असे ध्वनित झालेसे वाटले, म्हणून लिहिले.

कर्जे आणि संततिनियमन


भस्मीभूत देहाला कुठलीच जबाबदारी नसली, तरी कर्जाच्या मुदतीच्या आधीच भस्मीभूत झालो नाही तर काय घ्या? त्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्याची सोय करावी, आणि संततिनियमन करावे, हेच बरे. :-)

चार्वाकविचार

"प्रगती तुपाच्या वंगणाची" या लेखात(म.टा.दि.३१ जुलै) राजेश घासकडवी लिहितात की कर्ज काढून तूप खा हे वचन चार्वाकाचे नाही.त्याचे मूळवचन टीकाकारांनी बदलले आहे.

"यावज्जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्।भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:॥"हा श्लोक चार्वाकाचा म्हणून सुपरिचित आहे.यांतील "ऋणं कृत्वा घृतं पिबेत्" च्या जागी, "नास्ति मृत्युरगोचर:।" (मृत्यु काही अज्ञात,अदृश्य नाही.तो इंद्रियगम्य आहे.) अशा पाठभेदाचा श्लोक सर्वदर्शन संग्रहातील चार्वाकदर्शनात आहे, हे खरे.पण या दोहोतील कुठलाही श्लोक घेतला तरी चार्वाक तत्त्वज्ञानाला बाधा येत नाही की चंगळवादाचे समर्थन होत नाही.व्यक्तीला अथवा समाजाला काहीही उपयोग नसलेल्या गोष्टीसाठी व्यर्थ खर्च करण्यावी मनोवृत्ती म्हणजे चंगळवाद असे म्हणता येईल.तूप खाणे ही चंगळ नव्हे.ते यज्ञात जाळणे ही चंगळ.काल्पनिक स्वर्गाच्या प्राप्तीसाठी अनेक लोक यज्ञात तुपाचे हवन करतात.म्हणून चार्वाक सांगतो,तूप आगीत जाळूं नये.ते खावे.त्यासाठी वाटल्यास कर्ज काढावे.आरोग्य चांगले ठेवावे.काम करून, धन मिळवून कर्ज फेडावे.सुखात राहावे.(त्याकाळी कर्ज बुडविणे शक्य नव्हते.सहकारी बॅंका खूप नंतरच्या.) चार्वाकाचे विचार व्यावहारिक आणि वास्तववादी आहेत.

 
^ वर