बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड
--------------------------
लेखात ८० पेक्षा जास्त फोटू असल्याने ते सगळे मी येथे टाकू शकलो नाही. ( सवडीने टाकेन )
छायाचित्रांसह येथे वाचता येईल.
-------------------

कुतूहल हि खरच अजब चीज आहे. त्याच कुतूहलापोटी कुठे जाऊन काय बघायला किंवा अनुभवयाला मिळेल याची शाश्वती नाही. कुठेतरी डोंगररांगात माणसाचा थांगपत्ता नसलेल्या ठिकाणी जाऊन काही अदभुत अश्या गोष्टी आपण पाहतो. तेव्हा त्या गोष्टी आपल्या डोळ्यांमध्ये आणि मनामध्ये साठवून ठेवण्यापलीकडे आपल्या हाती काहीच उरत नाही.

आता आम्ही निघालो होतो आमच्या स्वप्नवत ट्रेक च्या दुसऱ्या टप्प्यात. मुल्हेर किल्ला.

सकाळी ६ वाजता चहा घेऊन आम्ही पोहोचलो शुक्ल काकांकडे, दुपारचा डबा घ्यायला. रात्रीच सांगून ठेवला असल्याने डबा तयारच होता. तो घेऊन स्वारी निघाली मुल्हेरच्या किल्ल्याच्या दिशेने.

मुल्हेर गावापासून किल्ल्याच्या पायथा ३ किमी आहे. सकाळी सकाळी आल्हाददायक हवा आणि स्वच्छ वातावरण. सगळीकडे शांतता पसरलेली, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चिंचांनी डवरलेली झाडे, पक्ष्यांचा मुक्त वावर, गावातल्या बायकांची पाण्यासाठीची पळापळ तर काही "अड्ड्यांवर" गावातील प्रतिष्ठित मंडळींच्या गप्पा टप्पा, मुलांची शाळेत जायची लगबग, तर दुकानदारांचे दुकानासमोर पाण्याचा सडा टाकून दिवसाची जय्यत तयारी. सगळे अनुभवत आम्ही गावाच्या बाहेर येऊन किल्ल्याच्या दिशेने चालू लागलो.

किल्ल्याबद्दल पूर्ण माहिती काढलेलीच होती. किल्ल्यावर विविध प्रकारची झाडे सापडतात असे ऐकले होते. काटेरी , औषधी, खाज येणारी, विषारी, रक्त गोठवणारी झाडे.
किल्ल्याची तटबंदी आणि सुरक्षा व्यवस्था हि चोख होती. ७ दरवाजे एका बाजूने चढताना लागणार होते. तर मोरागडावर ३ दरवाजे. पायथ्यापासून निघणाऱ्या वाटा मुल्हेर माचीकडून तर दुसरी थेट मोरागडावर जाणारी होती. या सगळ्या माहितीने आमची उत्सुकता वाढली तसे आमच्या पावलांचा वेगही वाढला.

ऐतिहासिक संदर्भ :

मुल्हेर चा उल्लेख रत्नपूर म्हणून महाभारतात आढळतो.हि राजा मयुरध्वज याची राजधानी होती.त्यामुळे गावाला मयुरपूर आणि किल्ल्याला मयूरगड नाव पडले.फार काळापूर्वी येथे नाईक आणि भिल्ल सत्ता होती. इ. स. १०२९ काळात यादव घराण्याची सत्ता आली. पुढे १३०८ मध्ये कनोज येथील राठोड बागुल यांनी येथील सत्ता काबीज करून या प्रांताला बागलाण असे नाव दिले. पुढे ३५० वर्षे त्यांची सत्ता चालली. इ.स. १६३८ रोजी वैभवशाली हिंदूंचे राज्य संपुष्टात येऊन तेथे मोगलांची सत्ता प्रस्थापित झाली.औरंगजेबाने येथील सत्ता घेतल्यावर किल्ल्याचे नाव औरंगगड असे ठेवण्यात आले. किल्ल्यावर महंमद ताहिर याची नेमणूक प्रथम किल्लेदार म्हणून झाली. या ताहिरने मुल्हेर ही बागलणची परंपरागत राजधानी होती म्हणून मुल्हेरजवळ 'ताहीर' नावाचे गाव वसवले व त्याचे कालांतराने ताहिराबाद/ताहाराबाद असे नामकरण झाले. नंतर ४० वर्षांनी शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला. हा किल्ला घेताना मुघल साम्राज्याचा पाडाव करून शिवाजींनी अमाप दौलत मिळवली . पुढे ब्रिटिशांनी हा प्रांत विभाजन करून सटाणा हे बागलाण चे मध्यवर्ती जिल्हा ठिकाण केले.

प्राचीन काळातील सोमेश्वर मंदिर हे किल्ल्याच्या पायथ्याशी असून त्याचा गाभारा हा पाताळात आहे. त्या काळी होणाऱ्या युद्धांमध्ये हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करून मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत असे. अशी अनेक मंदिरे आणि स्थापत्य कलेचे आविष्कार देशोधडीला लागले आहेत.


भौगोलिक संदर्भ :

मुल्हेर हा किल्ला डोलबरी पर्वत रंगांमध्ये किल्ल्याची अंदाजे समुद्रसपाटीपासून उंची ४२९० फूट आहे. मुल्हेर ला जोडूनच मोरागड असून तो मुल्हेर किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखतात.
साल्हेर वाडी कडून जवळपास ४४ किमी अंतर असून ताहाराबाद पासून २५ किमी अंतर आहे.
भौगोलिक दृष्ट्या सुरक्षित, आणि सुपीक प्रदेश असल्याने गावातील नागरिक बऱ्यापैकी साधन आहेत.
शेती मोठ्या प्रमाणावर चालत असून भात, ऊस आणि इतर हंगामी पिके घेतली जातात.

आमचा ट्रेक अनुभव :
किल्ल्याच्या पायथ्याशी शेत असलेली मंडळी आमच्याबरोबर होतीच. सकाळी न्याहारी करून आणि दुपारचा डबा डोक्यावर घेऊन, हातात सायकल, तर बाई माणसांच्या कडेवर लहान मुले.
आता आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य झाला होता. सगळीकडे अतीव शांतता पसरलेली. सहज मागे वळून पहिले तर गाव खूपच लांब राहिले होते. आणि दिसत होत्या त्या फक्त दूरवरच्या डोंगर रांगा.

.

उजवीकडून पाहिल्यास ओळीने मांगी-तुंगी, ताम्बोळया, न्हावी रतनगड अशी डोंगर रंग दिसते.

.

जरा थोडे उंच आल्यावर आजूबाजूच्या टेकड्या हि छोट्या वाटत होत्या.

.

मजल दरमजल करत आम्ही अर्ध्या तासात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. रस्त्यात एक कूपनलिका दिसली. तिथे थोडे पाणी भरून घेतले आणि पुढे निघालो.
आता भूक हि लागली होती म्हणून तिथेच असलेल्या एका डेरेदार झाडाखाली बसून न्याहारी चालू झाली. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बाहेर येऊ लागले. मी मात्र माझा सगळ्यात प्राणप्रिय पदार्थ "शंकरपाळ्या" खाण्यात गुंतलो होतो. चहा बरोबर शंकरपाळ्या म्हणजे खरेच स्वर्ग सुख आहे. अहाहा !!
न्याहारी आटोपून आता गडाची चढाई चालू झाली. पायथ्याशी एक मस्त घर होते. कितीतरी वर्षांनी मी बैलगाडी पहिली त्यामुळे ती कॅमेरात कैद करून ठेवली.
या घरापासून पुढे २ वाटा फुटतात. एक वाट सरळ तर दुसरी उजवीकडे वळते.
सरळ वाट : सरळ जाणाऱ्या वाटेने २० मिनिटांत मुल्हेर माचीवरील गणेश मंदिरापाशी पोहचतो. या वाटेने गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ते सर्व ढासळलेल्या अवस्थेत आहेत. वाट साधी व सोपी आहे. या वाटेने गडावर पोहोचण्यास अडीच तास पुरतो.

.

थोडे चालून जाताच किल्ल्याचे प्रथम दर्शन झाले. पश्चिमेकडून चढण असल्याने उन्हाचा त्रास व्हायचा प्रश्नच नव्हता. हिरव्या गार अश्या गर्द वनराईत वसलेला अजस्त्र असा किल्ला. सकाळचे कोवळे ऊन अंगावर झेलत निश्चल असा उभा होता. किल्ल्याच्या खिंडी मधून सूर्याची कोवळी किरणे डोकावत होती. थंडगार अशी हवेची झुळूक. अशा वातावरणात आम्हाला हुरूप चढला. आणि मग चालू झाली स्वप्नवत अश्या किल्ल्याची चढाई.

मोबाईल मध्ये नकाशा ठेवलाच होता. तो बघत बघत पुढे निघालो. थोडे अंतर गेल्यावर पहिले प्रवेशद्वार लागले आणि रस्ता बरोबर असल्याची खात्री झाली. या किल्ल्यावर गुरांच्या वाट बऱ्याचं असून त्या जास्त ठळक वाटतात त्यामुळे चुकायची शक्यता जास्त आहे.

.

किल्ल्याची थोडी पडझड झाली असली तरी नुसत्या प्रवेशद्वारावरून आणि तटबंदी वरून किल्ल्याच्या अभेद्यतेची प्रचीती येते.
पहिल्या प्रवेशद्वारासमोरच एका दगडावर मारुती आणि गणपती कोरलेला ( रंगवलेला) दिसला. शेपूट डोक्यावरून गोल असा मारुती हा नाशिक मधल्याच किल्ल्यामध्ये दिसतो. असाच मारुती हातगड आणि तिकोना (पुणे) किल्ल्यावर हि आहे.
रस्ता बरोबर असल्याची खात्री झाली आणि आमची स्वारी जोषातच पुढे निघाली. अजून एक प्रवेशद्वार भेदून पुढे जर मोकळे पठार लागले.
काही क्षणातच डोळ्याचे पारणे फिटेल असे गणेश मंदिर दृष्टीस पडले. खरेतर हे मंदिराचे फोटो बघूनच मुल्हेर चा ट्रेक फिक्स केला होता.

.

गर्द अश्या झाडीतून पुढे आल्यावर पाण्यात पडलेले गणेश मंदिराचे प्रतिबिंब मनाला समाधान देऊन गेले. कुठे येऊन काय बघायला मिळेल आणि कशाने आपले मन आणि डोळे सुखावून जातील सांगणे अवघड आहे. मस्त असे वातावरण, छान हवा, योग्य प्रकाश … काय … अजून काय वर्णन करू शकणार होतो आम्ही.
पूर्ण किल्ल्यावर आम्ही दोघेच होतो. बराच वेळ हाताशी होता. आता निसर्ग आणि आम्ही यामध्ये दुसरा कोणताही अडथळा नव्हता.

.
गणेश मंदिराचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब

थोडा वेळ फोटो काढण्यात घालवून आम्ही रस्ता सोडून या मंदिराकडे निघालो. मंदिराच्या आत मध्ये अत्यंत सुरेख असे कोरीवकाम आणि रचना केली होती. मंदिराच्या दर्शनी भागात चक्र कोरलेले होते. ते अजूनही तेवढेच स्पष्ट आहे की त्याच्या प्रत्येक आर्र्या दिसू शकतात.
काही भाग ढासळून पाण्यात पडलेला आहे. समोरील तलावातील पाणीही प्रतिबिंब दिसेल एवढे स्वच्छ आहे.
मोठे मोठे दगड एकमेकांमध्ये गुंफून या मंदिराची रचना केलेली वाटली. पूर्ण मंदिराच्या बाहेरील बाजूने कोरीवकाम केले होते. १४०० साली जेव्हा गाव किल्ल्यामध्येच वसलेले होते तेव्हा हे गावातील मंदिर होते.

.

.
गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही परत मंदिराचे स्थापत्यकला बघायला लागलो. पूर्ण मंदिरात आवाज घुमत होता. जरासे ऊन आल्याने फोटो साठी उपयुक्त रंगसंगती जुळून आली.
.
हे मंदिराचे छत घुमटाकार आकाराचे होते. एकावर एक रचलेल्या दगडांनी ते जास्तच आकर्षक दिसत होते.

पूर्वीच्या काळी युद्धात मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मंदिरे नष्ट केली जात असत. हा घुमट हा अश्या पद्धतीने बांधला आहे की घुमटा मधील मधला दगड काढला की आपोआप घुमट पडून जाईल.
आता मन आणि डोळे भरून मंदिराचे सौंदर्य पाहून परत बाहेर आलो. मंदिराच्या मागे हरगडा ने दर्शन दिले.

येथून आता किल्ला दृष्टिपथात आला होता. तरीही किल्ला एवढा अजस्त्र आहे की एकाच फोटोत पूर्ण येणे अवघड आहे.

तेथून लगेच उजवीकडचा रस्ता पकडून निघालो ते १४०० सालचे पाताळातील सोमेश्वर मंदिर बघायला.
१४०० साली बांधलेले हे मंदिर म्हणजे मुघल-रजपूत स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे. मोठे मोठे दगड एकमेकात गुंफून हे मंदिर बांधले असल्याचा उल्लेख येथे आढळतो.

.

मंदिरामध्ये प्रवेश करताच मोठ्या कमानी च्या अगदी मधोमध असलेला पुरुषभर उंचीचा नंदी आपले लक्ष वेधून घेतो. पूर्णतः दगडात कोरलेला हा नंदी असून त्याच्या पुढेच दगडात कोरलेले कासव दिसते. आज पर्यंत कोणत्याही मंदिरात मी नंदी आणि कासव एकत्र पाहिलेले आठवत नाही.

.
हे कासव जरा वेगळे होते.

.
मंदिराच्या बाहेरच पादुकांचे दर्शन झाले. लाकडी पादुका होत्या. अश्या लाकडी पादुका घालून अश्या दुर्गम भागात कोण महाभाग आला असावा याने आमची उत्सुकता वाढली.
.
मंदिरातून सहज वर बघितले तर डेस्टिनेशन आम्हाला खुणावत होते. अजून एवढे चढायचे आहे या विचाराने आताचं जीव मेटाकुटीला आला.

सोमेश्वर मंदिर हे पूर्णतः भुयारात आहे. याला पाताळी मंदिर पण म्हणतात. नंदीपासून सरळ जाऊन आम्ही साहजिकच हात जोडले तर पुढे देवच नाही. नुसती भिंत उभी. डावीकडे पहिले तर छोट्या पायऱ्या खाली भुयारात जात होत्या.

आता मोबाईल चे दिवे पेटवले आणि अंधारात चाचपडत जात राहिलो. मंदिराचा गाभा पाताळात असल्याचे ऐकले होते पण प्रथमच पाहत होतो. त्या काळी होणाऱ्या युद्धांमध्ये हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करून मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत असे. म्हणून हि रचना होती असे कळले.

खालून वर बघितले तर वरच्या खिडकीतून नंदी दिसत होता. काय मस्त रचना केली होती बांधणाऱ्या कलाकाराने.

आत हे पुजारी काका पिंडेची पूजा करण्यात मग्न होते. त्यांचा जप मंदिरामध्ये घुमत होता. आम्ही इतके सुदैवी होतो की, रोज सकाळी सात ला होणारी पूजा आज पुजारीकाका बदलून आल्याने साडे नऊ ला होत होती. आम्ही गाभाऱ्यात पोहोचलो आणि पूजा चालू झाली.
म्हटले हि देवाचीच इच्छा असावी.
त्यानंतर पुजारी काकांनी शंख हातात घेतला आणि ३ वेळा तो असाकाही वाजवला की, रामानंद सागर च्या सीरियल मध्ये देव आला की जसे सप्त वाद्यांचे संगीत चालू होते तसे वाटले.
हात आपोआप जोडले गेले.

पहिल्यांदा वाजवलेला शंख गाभाऱ्यात घुमू लागला तोच दुसरा त्यापेक्षा तीव्र असा ध्वनी त्याला भेदून जात होता. जे काही पाहिलं आणि ऐकले ते केवळ अद्भुत होते.
पूजा झाल्यावर बाहेर येऊन फोटोग्राफी चालू केली. मंदिराबाहेरच मोठी पिंड आणि शेंदूर लावलेली गणपती मूर्ती दृष्टीस पडले.

सोमेश्वर मंदिराच्या आजूबाजूला साफ सफाई चे काम चालू होते. मालेगाव चा एक ग्रुप ते डागडुजीचे काम करत होता. ते मंदिरामध्येच मुक्कामी होते. ( त्यामुळेच मंदिर अफाट गचाळ झाले होते. सगळी कडे अंथरूण, कपडे, खाण्याचे पदार्थ).
बराच वेळ घालवल्यानंतर घड्याळाकडे लक्ष गेले. पाहतो तर काय दहा वाजत आले होते आणि अजून आम्ही पायथ्याशीच होतो. आता आमची पळापळ चालू झाली. किल्ला चढायला ४-५ तास लागतील या हिशोबाने चढाई चालू झाली.
सोमेश्वर सोडून उजवी वाट ठरली आणि मोती टाक्यांपाशी पोहोचलो. मोती टाक्यांवरून वरती उजवीकडे जायचे असे माहीत होते. पण येथून पुढे रस्ताच सापडेनासा झाला.
प्रत्येक ट्रेक ला जाताना आधी एकदा वाट चुकून अतिरिक्त पायपीट झालीच पाहिजे असे बहुतेक आमच्या कुंडलीत लिहूनच ठेवले असावे.

येथून पुढे रस्ताच सापडला नाही. येथून अनेक वाट फुटत होत्या. त्या गुरांच्या वाटा होत्या हे त्या वाटेने जाऊन ती वाट मध्येच संपली की आम्हाला उमगायचे. बराच वेळ तेथेच घुटमळत राहिलो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारा जवळ असलेला मारुती (खालच्या फोटोत )आम्हाला दिसत होता. पण तेथपर्यंत जायचा रस्ता काही केल्या सापडत नव्हता.
.

आता वाट फुटेल तिकडे आम्ही जात होतो. कॅमेरे ठेवून दिले आणि झाडे तोडत, घसरत आम्ही जागा मिळेल तेथे मुसंडी मारत होतो. आता किल्ल्यावरील झाडांची विविधता आमच्या लक्षात आलीच होती. त्या विविध प्रकारच्या झाडांना आपण भेटूनच आलोय असे शरीराचे हाल व्हायला लागले. काटेरी झाडांनी हात पायाचे चुंबन घेऊन रक्तवर्णीय नक्षी काढलीच होती. खाजरी झाडे त्या रक्तातूनच "खाज" करीत होती. काट्या कुट्यातून जाऊन दोन्ही हात, दंड ओरखडे उठून रक्ताने लाल झाले होते. चेहऱ्यावर टर्मिनेटर मधल्या अर्नोल्डसारख्या कापल्याच्या खरचटल्याच्या खुणा. :)
शेवटी पाण्याचा मार्ग पकडला आणि बरेच वर चढून गेलो. पण तेथूनही मार्ग सापडेना म्हणून परत फिरलो. उतरताना मात्र घसरतच उतरावे लागले. इतकी वाईट हालत झाली की चालताही येईना आणि सांगताही येईना :)
जाताना वाटेत आम्ही अजून दोन टाकी आणि एका गुहेचा शोध लावला असावा, कारण या टाक्यांबद्दल कुठेच वाचलेले नव्हते . तसेच उल्लेख हि नव्हता. बळेच २ तास हिंडून आम्ही माहीत नसलेल्या वास्तू हि पाहून घेतल्या. वाट चुकल्याचा निदान एवढा तरी उपयोग झाला :)
आता १२ वाजून गेले होते आणि आम्ही अजून पायथ्याशीच होतो. आता पेशन्स संपला होता. आता कधी किल्ला चढणार आणि उतरणार असे वाटू लागले होते. तरी बरे कि मुल्हेर ची चढण हि साल्हेर, सालोटा प्रमाणे पश्चिमेकडूनच असल्याने उन्हाचा त्रास जाणवत नव्हता.
सरळ परत उतरून सोमेश्वर मंदिर गाठले. तेथील पुजारीकाकाना विचारले पण त्यांना कमी ऐकू येत असल्याने आम्ही काय म्हणतोय हेच त्यांना कळत नव्हते. शेवटी ते पण आमच्याबरोबर निघाले. मोती टाक्यांपर्यंत येऊन त्यांनी पुढे आम्हाला रस्ता दाखवला. आम्ही वर जोपर्यंत ते तेथेच थांबले होते.

आता साडे बारा झाले होते. आता आम्ही पळतच सुटलो होतो. कॅमेरे ठेवूनच दिले होते. पोटात आग पडली होती, तरी वर पोहोचल्यावरच जेवायचे असा निर्धार करून पळू लागलो.

काही वेळातच मुख दरवाजा दिसला आणि जर हायसे वाटले. सात दरवाजे तेही ओळीने, एका-आड-एक पाहून सुरक्षेच्या दृष्टीने हा किल्ला किती महत्त्वाचा असावा हे लक्षात आले.

यापुढे आम्ही जे काही पहिले ते शब्दात सांगणेच शक्य नाही. भक्कम तटबंदी, पाच दरवाजे ओळीने, कोरलेल्या गुहा, स्थापत्याशिल्पे, गर्द सावली, शांत वातावरण.

दुसरे प्रवेशद्वार :

तिसरे प्रवेशद्वार :

कोरलेल्या गुहा :

चौथे प्रवेशद्वार :
.
खालून दिसणारा कातळात कोरलेला मारुती आता जवळ आला होता. त्याची उंची पुरुषभर म्हणजे ५ ते ६ फूट होती.

अभेद्य अशी प्रवेशद्वारे ओलांडून आल्यावर भक्कम अशी तटबंदी चालू झाली.
.
आजूबाजूचे उंच डोंगर आता बुटके वाटू लागले. जवळपास तीन हजार फूट एवढ्या उंचीवर आम्ही येऊन पोहोचलो होतो.

पाचवे प्रवेशद्वार :
.
पाचवे प्रवेशद्वार :( आतून )

सहावे प्रवेशद्वार :
.
सातवे प्रवेशद्वार :

दहाव्या शतकातल्या पूर्वजांचा इतिहास पाहायला गेलो होतो आणि येथे त्याहीपेक्षा पूर्वीचे असे पूर्वज आमच्या स्वागतास तयारच होते. प्रत्येकांनी निराळी पोझ दिली आणि कामगिरी फत्ते म्हणून धूम ठोकली.

हे शेवटचे प्रवेशद्वार ओलांडून एकदाचे आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. विस्तीर्ण असे पठार लागले. आव्हान दोन वाजत आले होते. आता बऱ्यापैकी वेळ हातात होता. संपूर्ण किल्ल्यावर आम्ही दोघेच होतो. मनसोक्त हिंडत होतो. थोडे चालत जाऊन सगळ्या दिशांचे नजारे डोळ्यात साठवून घेतले.
.
किल्ल्यावर ओळीने नऊ अशी पाण्याचे टाकी होती. भर उन्हाळ्यातही त्यातले आटले नव्हते.
येथे पाण्याची टंचाई कधीच जाणवत नसावी. हे नऊ टाकी सोडून अजून तीन मोठे तलाव दिसले. त्यातले पाणी आटून गेले होते.
.

आता काय पाहू आणि किती पाहू असे झाले होते. एवढ्या उंचावरून आजूबाजूचे दृश्य भान हरपून टाकणारे होते. बऱ्याचं वेळ फोटो काढून शेवटी सरळ कॅमेरा ठेवून दिला आणि शांतपणे निसर्ग अनुभवत बसलो.

दूरवर पसरलेल्या ह्या डोंगररांगा डोळ्याच्या कक्षेतही येत नव्हत्या. अश्या ठिकाणी कॅमेरा बापडा काय टिकाव धरणार ?

विस्तीर्ण अश्या पठारावर पुढे चालत सुटलो. येथे राजवाड्याचे भग्न अवशेष दिसले.
.
आता जोरदार वरही सुटला होता. आजूबाजूचे वाळलेले गावात वाऱ्यामुळे झु ssss झु ssss असा आवाज करत होते. गवताच्या मुळाशी घरटे असलेले पक्षी आमची चाहूल लागताच रॉकेट सारखे आकाशात झेप घेत होते.

येथून जाताना मात्र भीती वाटत होती, की गवतात साप वैगरे असला तर शेवटच ट्रेक ठरायला नको :)
आता कडाडून भूक लागली होती. सुदैवाने मोठे डेरेदार झाड दिसले. त्याच्या खाली भडंग नाथाचे मंदिर होते. दर्शन घेऊन आम्ही जरा झोप काढली आणि जेवायला बसलो.
ट्रेक स्पेशल व पेटंट अशी बटाटा भाजी पोळी. आज जेवणात गोड काही नसल्याने भूक असूनही जेवण जात नव्हते .कसेबसे चार घास पोटात ढकलले.

आता जेवण झाल्यामुळे एनर्जी आली होती. जवळपास अर्धा किल्ला पाहून झाला होता. छोटीशी झोप काढली त्याच झाडाखाली आणि मग परत मोरा गडाकडे कूच केले. लांबून तो अजून एक डोंगर दिसत होता. म्हटले की अजून एक डोंगर …. अरे काय… बस आता…

असे म्हणता म्हणता समोर पहिले तर लांबूनच दगडात खोदलेले प्रवेशद्वार दिसले. खरेच, किथे जाऊन काय बघायला मिळेल याची शाश्वती नाही. "अरे वाह sss" आपसूकच तोंडातून शब्द बाहेर पडले. पावलांचा वेग आपोआप वाढला. कॅमेरे सरसावून तयार झाले.
.
गर्द अश्या गवतातून शॉर्ट कट वाटला म्हणून घसरतच निघालो. ते एकदम मुल्हेर किल्ल्याच्या (नशिबाने) शेवटीच येऊन थांबलो. आता जवळून तो उभ्या कातळात खोदून केलेल्या पायऱ्या आणि प्रवेशद्वार भन्नाट दिसत होते. त्या काळाच्या लोकांची काय मानसिकता असावी नाही?? आपल्या राजासाठी हे काम करायचे आहे, ते उत्कृष्टच झाले पाहिजे असे ठरवून ते काम करीत असावेत.
.
मोरा गडाचा प्रवेशद्वार दिसले पण मुल्हेर वर तेथे जाण्यासाठी रस्ता शोधाशोध झाली. एक जिना सदृश कातळ घसरून गेल्यावर मुल्हेर किल्ल्याच्या शेवटच्या दरवाज्याशी आम्ही पोहोचलो. दरवाज्यातच दरड ( land slide) कोसळली असल्याने खाली फोटोत दिसतोय तेवढीच जागा बाकी होती. आता एकंदर माझा आकार बघून येथून मागे फिरावे लागते की काय अशी शंका भूषण ला आली, पण मी मात्र शिफातीने तेथून निसटलो.

हाच वरचा दरवाजा बाहेर आल्यानंतर आपोआप मोठा दिसत होता. ते गणित काय मला उलगडले नाही.

आता मोरा आणखीनच डेंजर दिसायला लागला. कातळात खोदलेल्या पायऱ्या सुरवातीला फारच अरुंद आणि छोट्या होत्या. पहिल्या दोन पायऱ्या चढणे अवघड होते. शेवटी कॅमेरे एकमेकांकडे देऊन आम्ही वरती गेलो.
.
आता मोरा गडाचा पहिला दरवाजा भक्कमपणे आमच्यासमोर उभा होता. पूर्णतः एकाच कातळात कोरलेला हा दरवाजा बुरुजांनी अधिक अभेद्य बनला होता.
.

प्रवेश्वदाराशीच कोरलेला गणपती हा खाली सोमेश्वर मंदिरामधल्या गणपतीसारखा हुबेहूब होता. फरक ओळखा सांगितले असते तर त्याचा शेंदरी रंग यापलीकडे काहीच फरक नव्हता.
.

पहिले प्रवेशद्वार ओलांडून पुढे चालू लागलो. जसे जसे वर जाऊ तसा रस्ता निमुळता होत चालला होता. खालच्या फोटोवरूनच कल्पना येईल. हा एक मस्त स्पॉट होता. भर उन्हातही थंड वारा वाहत होता. आजूबाजूला मोठमोठ्या डोंगररांगा पसरलेल्या आणि आम्ही दोघे फक्त. काय मजा !
येथे एक माणूस जाऊ शकेल एवढीच पायवाट होती.
.
येथेही एक गुहा दिसली. आतून ती जास्त प्रशस्त होती. आत जाऊन उजवीकडे अजून एक खोली होती.

मोरागडावरून मागे आकाशाची निळाई पांघरून बसलेला हरगड तुफान दिसत होता.

आता पोहोचलो मोरा गडाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या प्रवेशद्वाराशी. आव्हान साडे चार वाजले होते, किल्ला बघून साडे पाच पर्यंत आम्ही परत येथे पोहोचलो. मग येताना बराच वेळ येथे बसून होतो. कुठून, कसे, काय ठाऊक, पिक्चर चा विषय निघाला. मग "Vantage Point" ची स्टोरी सांगणे झाले. नंतर जेव्हा भूषण ने तो मूव्ही बघितला तेव्हा त्याला हि याच दरवाज्याची आठवण झाली.
.
या दरवाज्यातूनच खाली पायथ्याचे सोमेश्वर मंदिर दिसत होते (फोटोत चौकोन केलेला भाग)
.
याच दरवाज्याचा आधी पायथ्यापासून सोमेश्वर मंदिरामधून काढलेला फोटो. ओह ६ तासात आम्ही कुठल्या कुठे पोहोचलो होतो.
.
आता पुढे निघायची तयारी चालू झाली. मागे दिसणारा मुल्हेर आणि हरगड किल्ला.
.
मोरा गडावर या झेंड्या खेरीज पायाचे टाके आहे. बाकी काही खास बघण्यासारखे (म्हणजे आवर्जून बघण्यासारखे) वेगळे काही नाही.

पाण्याचे टाके :

किल्ल्यावर प्रचंड गवत/झाडी होती. आणि रुळलेल्या वाटाही दिसेनात. म्हणून मग अंदाजे कोठेही चालू लागलो. काही ठिकाणी छातीपर्यंत झाडी होती. त्यातही जाऊन फोटो काढून झाले.
.
आता पुढे जे काही दिसत होते, ते डोळ्याचे पारणे फेडणारे होते. फक्त डोळ्यात साठवून ठेवण्या पलीकडे आम्ही काहीही करू शकत नव्हतो.खरेच, निसर्ग सुखाची अनुभूती हे ज्याचे त्यानेच घ्यायला हवी.

आता तब्बल ९ तासांपेक्षा जास्त वेळ चढाई करून पाय अक्षरशः हातात आले होते. झाडी झुडपातून चालत असल्याने अंदाज घेण्यासाठी जी काठी हातात घेतली होती. ती काठीच आमचा आधार बनली.

आता परतीची वाट चालू झाली.मुल्हेर आणी मोरागड यांना जोडणाऱ्या "V" शेप खिंडी मधून दुसऱ्या वाटेने आम्ही उतरायला लागलो. एका बुरुजाच्या मागून जाण्यास एवढीच जागा होती.

मुल्हेर आणि मोरा यांना खिंडीत जोडणारी तटबंदी. खिंडीत तटबंदी यापूर्वी कधी पाहिल्याचे आठवत नाही. जवळ जवळ दहा फूट उंचीची तटबंदी अत्यंत भक्कम आणि अभेद्य वाटत होती. इतक्या वर्षात अजून याचा एकाही दगडही हाललेला नाही.

दुसरी वाट माहीत नसल्याने खाली सोमेश्वर मंदिर लोकेट केले आणि त्यानुसार खाली उतरत राहिलो. उतरणीचा हा मार्ग तसा छोटा होता.

आता येथून संपूर्ण मुल्हेर किल्ला दृष्टिपथात आला होता.
.
दहा तासात आपण कोठून कोठेपर्यंत कसे गेलो याचा अंदाज घेतला. येथून किल्ला जास्तच रौद्र आणि अजस्त्र वाटत होता.

सुरवातीची पांढरी रेघ जेथे काटकोनात वळली तेथे सोमेश्वर मंदिर होते.

येथून उतरून परत सोमेश्वर मंदिरात गेलो. तेथील पुजारीकाकाना योग्य मार्ग दाखवल्याबद्दल धन्यवाद देऊन पुढे देवीच्या मंदिराकडे निघालो. तेथून अजून एक अज्ञात रस्ता पकडून अंदाजे निघालो तर डायरेक्ट गणेश मंदिरात पोहोचलो.

मुल्हेर माचीवरून उतरून परत सर्व प्रवेशद्वारांना निरोप देऊन पायथ्याशी आलो.

आता बऱ्यापैकी संध्याकाळ झाली होती. सकाळी आमच्याबरोबर शेतापर्यंत आलेली मंडळी घरी जायच्या लगबगीत होती. तर काही येथे राहणारी मंडळी गावातून काम करून परत घरी निघाली होती. कामावरून घरी जाताना कडेवर मुले बाळे, हातात डबा, रोजंदारीची हत्यारे आणि चेहऱ्यावर सुखी हास्य. मला माझे हापिस सुटल्यानंतरचे माझे अविर्भाव आठवले. खरेच निसर्गाच्या कुशीत राहून ही माणसे किती सुखी होती.

काही गोळ्या, चॉकलेटे शिल्लक होती, ती रस्त्यात खेळणाऱ्या मुलांना दिली तर बराच डबा उरला होता, तो वाया जायला नको म्हणून तेथील गरिबांना दिला.

भव्य, दिव्य, अभेद्य, अशक्य, तुफान, फाडू अश्या सगळ्या विशेषणांचा अनुभव आम्हाला या एकाच ट्रेक मध्ये आला होता. तरीही मुल्हेर-मोरा बरोबर अजून एक दिवस असता तर हरगडही झाला असता असे राहून राहून वाटत होते. हरगडावर काही टन वजनाच्या ३ तोफा आहेत असे ऐकले होते. त्या बघायचा आज काही योग नव्हता. एका वेळी वाटले की मांगी-तुंगी रद्द करून उद्या हरगडालाच जाऊया, पण प्लान आधीच ठरला होता तसेच आता अंगातही त्राण उरले नव्हते.

आता आम्ही परत गावात शिरलो आणि थेट बाजारातच गेलो उद्याच्या मांगी-तुंगी ट्रेकची तयारी करण्यासाठी. उद्याची मांगी-तुंगीला जायची सोय बघून जर गावात टंगळ- मंगळ करीत निवांत वेळ काढला. आज संध्याकाळी परत समाधीला न जाता गावातील ओळखीच्या माणसाकडे त्याच्या आग्रहास्तव जेवायला गेलो. "गोड काजू शिरा" अजूनही जिभेवर रेंगाळतोय.

आयुष्यात एकदा तरी ह्या किल्ल्यावर जाऊन यावे असे माझे मत आहे.याआधी जर मला कोणी "तुझा सर्वोत्तम ट्रेक कुठला?" असे विचारले असते तर 'हरिश्चंद्रगड' हेच उत्तर दिले असते. आता मात्र माझे मत बदलले होते.

निसर्गापुढे आपण किती खुजे आहोत हे जाणवतानाच आपले पूर्वज माणसे कोणत्याही प्रकारचे तंत्र अस्तित्वात नसतानाहि कित्येक मैल आपल्या पुढे होती असे जाणवत राहते.

आताशा, तब्बल ३० पेक्षा जास्त तासांची चढाई झाली होती. फोटोंची संख्या दोघांच्या मिळून २ हजारांवर गेली होती. किल्ल्यावरील कोरलेल्या इतिहासाच्या त्या खुणा माझ्याही मनावर आठवणींचे शिल्प कोरून गेल्या असाव्यात. आजपर्यंतच्या प्रवासात काहीतरी वेगळे उमगले होते. गेल्या तीन दिवसात जे जे काही पहिले होते, अनुभवले होते त्याने मन तृप्त झाले होते. आता शरीरही थकल्यासारखे वाटत होते . पाय दुखून दुखून वेदनालेस झाले होते. आता कितीही चालले तरी पाय दुखणार नाहीत. त्यांच्यातला सेन्सच गेला होता बहुतेक. :) . घरचीही ओढ लागली होती.

पण, अजून मांगी-तुंगी बाकी होते, हत्ती गेला होता आता फक्त शेपूट राहिले होते.
( ते शेपूट नव्हतेच, तो अजून एक हत्तीच होता. त्याबद्दल पुढच्या भागात -
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी-तुंगी आणि परतीचा प्रवास )

सागर

 
^ वर