पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट

पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट
( Tikona Point)

शनिवार, रविवार ची चाहूल शुक्रवारी लागली की लगेच फोनाफोनी करून ट्रेक चे प्लान होतात. त्यातले किती प्रत्यक्षात येतात हा वादाचा मुद्दा, पण तरी काहीतरी सबळ कारण निर्माण करून, असे झाले म्हणून जमले नाही असे म्हणता येते.
गुरुवारीच गूगल नकाशे वरून शोधून काढत खांडस मार्गे भीमाशंकर चा ट्रेक ठरवला. शुक्रवार संध्याकाळ उजाडली तरी ट्रेक चे काही नक्की होईना. मग थोडी हापिसातल्या फोन चे बिल वाढवल्यानंतर प्लान ठरला. लगेच आई ला फोन करून गुळाच्या पोळ्या बनवायला सांगितले.
कुठेतरी माळरानात सहा सहा तास भटकत राहायचे, जळता सूर्य डोक्यावर घेऊन फिरून ग्लुकॉन डी चे पुडे च्या पुडे संपवायचे आणि तरी तरतरी येत नाही मग रस्त्यात मिळेल तिथे मांडी घालून बसून एकदाची ती गुळाची पोळी हाणली की मग मात्र गड सर झाल्याचेच सूतोवाच. अहाहा.
असेच एकदा सरसगडाला चढताना डी-हायड्रेशन झाले म्हणून एकटाच बसलो होतो पायथ्याशी पोळ्या खात!!

पण यावेळची गोष्ट जरा वेगळी होती. आठवडाभर उर फुटेस्तोवर काम करून पाठीची हाडे आणि मणके खिळखिळे व्हायला आले होते. अमाप वेदना झाल्यावर शुक्रवारी कौटुंबिक वैद्य बुवाकडे गेल्यावर त्यांनी चक्क मला ताकीद दिली. मणक्याचा आजार झाला असून, खांद्यामधले वंगण ( Body Oil ) कमी झाले आहे. २ आठवडे सक्त विश्रांती घ्यावी लागेल. बरीच औषधे आणि मलम यांचा भडिमार करूनही खांदादुखी काही थांबेना. शेवटी क्ष- किरण चाचणी करायचा सल्ला दिला गेला. X -Ray काढल्यावरच नक्की निदान होणार होते. मग गप्पपणे क्ष- किरण चाचणी करायला दुसऱ्या डॉक्टर कडे…. तिथे जवळ पास ३ तास पुरतील एवढी लोक आणि समोर एक सूचना वजा फलक. "मराठी भाषेत एका वाक्यात जास्तीत जास्त किती चुका आपण करू शकतो?" अश्या स्पर्धे मधूनच त्या फलकाची निर्मिती झाली असावी. सुमारे तब्बल तीन तास तोच फलक वाचून वाचून मी इतका पकलो की जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मी का आलो आहे हेच आठवेना. मग एका "खली" सदृश माणसाने मला त्या दिव्याच्या प्रकाशात जवळ जवळ ढकलूनच दिले. खिसा शे पाचशे रुपड्यांनी नी रिकामा झाल्यावर हातात एक फोटो निगेटिव घेऊन मी घरी आलो आणि झोपून गेलो.

कालच्या औषधांच्या भडिमाराने सकाळी उठल्यावर जरा बरे वाटायला लागले. सकाळी सकाळी जाऊन मी तो 'क्ष- किरण' अहवाल डॉक्टर बुवांना दाखवला. ट्रेक तर रद्द झालाच होता, पण तो माझ्यामुळे रद्द झाल्याने सकाळी सकाळी शिव्या सदृश फोन येतच होते. यातच २ आठवडे विश्रांतीच्या विचाराने मी तर वेडाच झालो होतो. आता यात अजून काही निघाले तर वाटच लागेल म्हणून मी कुतूहलाने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो.

काय बरं वाटतंय का ?
हो आता बरे आहे जरा ….
अरे, काही नाही झालेय, फक्त 'Muscular Spasm' आहे. दोन दिवसात होईल बरा.
मी मात्र सुटकेचा निःश्वास सोडला. तडक घरी गेलो, म्हणालो काही झाले नाहीये आता मी बरा आहे.

हे ऐकून भाची ने तिची शाळेचा "घ. अ." म्हणून थर्माकोल चे कमळ बनवायचे आहे असे फर्मान सोडले. मग आमची स्वारी कमळाच्या मागे… ४ थर्माकोल चे ग्लास, आणि असंख्य रंगांच्या पेट्या तिने उपलब्ध करून दिल्यावर माझी कारागिरी चालू झाली. २-३ तासांच्या (अथक) प्रयत्नांनंतर ते कमळ तयार झाले.

तेवढ्या वेळात भाची चे अजून एक चित्र काढून पूर्ण झाले.

खूप चेष्टा उडवल्यानंतर, चित्र नीट पाहिले. लहान मुलांमध्ये ग्रास्पिंग पॉवर जास्त असते. बालमनाने साकारलेले ते पक्षी आणि कुत्रा( का मांजर) पाहून विचार आला की, तिच्या मनात "पक्षी दिसतो कसा" याचा फक्त साचा होता त्याला पंख वैगरे काढावे असे तिला वाटले नसावे. पण, त्यातही त्याला खाण्यासाठी दाणे द्यायला हि ती विसरली नव्हती.

असो,हि कामगिरी झाल्यावर जरा वामकुक्षी साठी टेकलो.

आता मात्र बरे होऊन मी दुसऱ्या संकटात सापडलो ते म्हणजे "दाखवायचा"फोटो काढून यायच्या. बऱ्याचं दिवस मातोश्री मागे लागल्या होत्या की लग्नाचे बघायला चालू करू. जरा (तरी) बरा फोटो काढून आण तुझा, पण मी मात्र दरवेळी टाळाटाळ करत होतो. यासाठीच का, पण शनिवार- रविवार दोन दिवस मी झोपूनच घालवतो. हा दाखवायचा फोटो म्हणजे एक करामतच असते. शक्य तेवढे बरे कपडे अंगावर चढवून, चेहऱ्यावर २-३ किलो पावडर थापून, ( काहींच्या बाबतीत हि लिस्ट अजुन वाढते, एक दीड किलो लिपस्टिक, अर्धा लीटर नेलपॉलिश, वाटी भरून काजळ … असो. ),चेहऱ्यावर उसने सोज्वळ भाव आणून फोटो काढून घ्यायचा आणि त्यानंतरही विश्वाची आणि पर्यायाने आपली उत्पत्ती करणाऱ्याच्या आपल्यासाठीच्या "ब्लु प्रिंट" ची आणि त्या फोटोची तडजोड झाली नाही तर फोटोशॉप ची करामत सुरू … त्यात खाली परत ती करामत करणाऱ्या कारागिराचे नाव वळणदार अक्षरात …

जमेल तेवढी टाळाटाळ करून जरा निवांत बसलो तेवढ्यात आमच्या बहिणीचे आगमन झाले. एरवी माझ्याबरोबर कुठेही न येणाऱ्या आमच्या भगिनी, फोटो चा विषय निघाल्यावर " चल मी पण येते तुझ्याबरोबर, तो निळ्या चेक्स शर्ट घाल हा… आणि "अशी" पोझ दे" असे म्हणत त्या पोझ चे हि मार्गदर्शन झाले. आता मात्र गप्प जावे लागणार या विचारातच फोन वाजला.

"ए काय करतोयेस, बरेच दिवस गेलो नाही कुठे चल आपल्या तिकोना पॉइंट ला जाऊ" असे म्हणत मित्राचा फोन आला, मग म्हटले ट्रेक नाही तर नाही आपला आवडता "पॉइंट" तरी का सोडा?" पाठदुखी थांबून, आणि आपल्याला अजून काही झालेले नाही या आनंदाने निघालो आम्ही आमच्या पेटंट पॉइंट ला.
"हो" म्हणून फोन ठेवला. पुढच्या १० मिनटात तो हजर. लगेच जर्किन,हेल्मेट वैगरे आभूषणे चढवून आमची यात्रा निघाली.

तिकोना पॉइंट म्हणजे एक अद्भुत जागा आहे. छोटा ब्रेक पाहिजे असेल तर यासारखी उत्तम जागा नाही. कोथरूड पासून ४५ - ४८ किमी अंतर असून एकदा पौड गाव सोडले की जास्त रहदारीही लागत नाही. खर्च तर जवळ जवळ नाहीच काही. फक्त पेट्रोल काय असेल ते.

कोथरूड पासून पौड गावाकडे जाताना, गावातूनच उजव्या हाताला "हाडशी" कडे जाणारा रस्ता पकडायचा. हाडशी येथे "श्री सत्य साईबाबा" यांचे अतिशय सुरेख असे मंदिर आहे. त्यामुळे हि जागा बऱ्याचं लोकांना माहीत असते. ४ वाजायच्या सुमारास कोथरूड, पुणे वरून निघालो, की पुढचं दीड तासात हाडशी मंदिरा ला आपण पोहोचतो. तिथून वरती मंदिरात न जाता पुढे 'पवना नगर" च्या दिशेने जावे. हाडशी पासून पुढे ७ किमी जाताना छोटा घाट लागतो. आणि मग एकदा 'तिकोना' किल्ल्याचे दर्शन झाले की की पुढे जात राहायचे. दहा मिनटे गेल्यावर एक निसर्गरम्य असे ठिकाण येते. तोच हा तिकोना पॉइंट.

तिकोना पॉइंट वरून दिसणारे तुंग किल्ल्याचे मनोहारी दृश्य.

पश्चिमे कडे तोड करून आपण उभे असतो. समोर उत्तुंग असा 'तुंग" किल्ल्याचे शिखर दिसते. त्याच्या भोवताली पवना धरणाचे निळेशार पाणी… मागे पहिले तर अजस्त्र असा तिकोना उभा. कोणताही गजबजाट नाही. शांत अश्या जागेत पक्ष्यांचे किलबिलाट…. बघता बघता पश्चिमे कडील आभाळाला केशरी किनार येते आणि सूर्य त्या मनोहारी डोंगर रांगांमध्ये लुप्त होऊन जातो. फक्त आपण, तुंग, तिकोना, आणि सूर्यास्त. खरंच निसर्गाच्या महानतेची अनुभूती ज्याचे त्यानेच घ्यायला हवी.

हा अनुभव मी असंख्य वेळेस घेतला असेल, पण प्रत्येक वेळी या निसर्ग कवितेचा निराळाच अर्थ मला लागतो. मी इथे प्रत्येक ऋतूत आलो असेन. पण प्रत्येक वेळेसच इथले मनोहारी दृश्य मनाला आनंद देऊन जाते.

बघता बघता पश्चिमेकडील आभाळाला केशरी किनार येते आणि सूर्य त्या मनोहारी डोंगर रांगांमध्ये लुप्त होऊन जातो.

मग जरासे फोटोग्राफी किडे चालू झाले.

तुंग आणि पवना धरणाचे सूर्यास्ताचे चित्र.

फोटो काढता काढता काहीतरी आवाज झाला म्हणून बघितले तर हे सरडे बुवा हि आमच्या जोडीला होते सूर्यास्त बघायला .

तिकोना किल्ला आणि साक्षीला चंद्र.

मित्राच्या याच गाडीवर आम्ही आलो होतो. नवीन गाडी घेतल्यापासून कुठेही लांब गेलो नसल्याने तो तुफान गाडी पिदडत होता . घरातून निघताना तो बहुतेक " भीमरूपी महारुद्रा" वाचूनच आला असावा. आणि त्यातले " गतीशी तुलना नसे" हेच वाक्य लक्षात ठेवून तो वायू वेगाने गाडी हाकत होता. मागे बसण्याची सवय नसल्याने माझी मात्र पुरती पळापळ झाली होती. रस्त्यातले ट्राफिक, मिरवणुका, गावठी पब्लिक कोणालाच त्याने दाद लागू दिली नाही. रस्त्यात सैरावैरा धावणाऱ्या कोंबड्या हि आमच्या धास्तीने खुराड्यात जाऊन विसावल्या. ८० - ९० किमी वेगाने गाडी हाकताना, मध्ये एक ताबूत मिरवणूक चालली होती. पूर्ण ट्राफिक जाम असताना हे साह्येब वाट काढत जोरातच चालले होते. ताबुताला "कट" मारून आम्ही पसार झालो.रस्त्यात एके ठिकाणी चाललेली भांडणे हि त्याने मन वळवू शकले नाही.

आता सूर्यास्त झाल्यावर वेध लागले ते हाडशी मंदिरात जायचे. मग ७ वाजेपर्यंत आम्ही मंदिरात पोहोचलो. अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था असलेले हे मंदिर कुटुंबाला घेऊन येण्यासाठी एकदम योग्य आहे. तिथे कोणत्याही प्रकारची लूटमार, धार्मिक उदो उदो, बाजार नाही. देवाचा बाजार मांडलेल्या ( की ज्याच्यातून तो स्वतः, साक्षात देव हि सुटू शकत नाही अश्या ) "सो कॉल्ड" धार्मिक स्थळा सारखे हे नाही. इथे अत्यंत स्वच्छता, पार्किंग पासून सगळ्या सोयी ह्या विनामूल्य आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी ऊद वाहकाची ( लिफ्ट) ची सोय आहे. रात्री अंधार पडल्यावर रंगेबेरंगी कारंजे चालू होतात. मंद आवाजात देवाचे श्लोक चालू असतात. सर्वत्र नेमलेली माणसे मदत करण्यास तत्पर. मंदिराच्या मागे असलेल्या तळ्यात पांढरी शुभ्र अशी बदके. पवनचक्क्या, ग्रंथालय, हिरवळ, शुद्ध पाणपोई. एकदम झकास असे दृश्य.

हेच ते हाडशी चे साई मंदिर. ( हा फोटो मागच्या खेपेस पावसाळ्यातील आहे. )

गणपती मंदिर आणि कारंजे

उंदीर मामांच्या हातातील भलामोठा लाडू बघून आम्हालाही भूक लागली.


तडक मोर्चा खानावळीकडे वळवला. चहा जर बरा होता पण भेळ पुरती 'नापास' झाली होती.

आता मात्र निघायची तयारी चालू झाली. परत सगळी आभूषणे चढवून आम्ही परत निघालो. आता जाताना मित्राचा वारू ( गाडी) मी हिशोबानेच हाकत होतो.

घरी आल्यावर उद्याच्या हापिसाची तयारी चालू केल्यावर लक्षात आले की विकेंडला करू म्हणून थकवलेली सगळी कामे तशीच "आ" वासून उभी आहेत. आता खांदा अजून जोरात ठणकायला लागलाय. 'दाखवायचा फोटो " कधी बघायला मिळेल याची अपेक्षा विरून गेलीय.

पण मन मात्र रिफ्रेश झालेय.

आता हीच स्फूर्ती मला बळ देईल, पुढचा आठवडाभर काम करण्यासाठी.

सागर
http://sagarshivade07.blogspot.in/

 
^ वर