नैतिकतेचा ब्रह्मघोटाळा

1आवडले! नैतिक पेचप्रसंग उभे करणारे काही प्रसंग जालावर डॉ खरे ह्यांच्या मिसळपावावरील लिखाणात वाचले. पदवीदरम्यान असलेल्या principles of ethics and cyber laws ह्या विषयाची मग आठवण झाली. त्यात चित्रविचित्र किस्से, निर्णयक्षमतेची कसोटी पाहणारे प्रश्न असत. त्यातली आमची उत्तरे व्यक्तिसापेक्ष बदलत. आम्ही उत्तरे काहीही दिली तरी चालत; पण योग्य ते जस्टिफिकेशन आम्हाला देता येते आहे की नाही; हे पाहिले जात.(वाद विवाद स्पर्धेप्रमाणे; कुठलीही बाजू मांडा; बक्षीस मिळू शकेल; पण तुमचा त्यातला अभ्यास दिसायला हवा.)
.
त्यासंदर्भात टेक्स्टबुक बाह्य वाचन करताना पडलेला प्रश्न. "ग्रामर्थं कुटुंबम् त्यजेत् | राष्ट्रार्थम् ग्रामम् त्यजेत ||" असे म्हणे चाणक्य म्हणून गेलाय. हे इतकं सोपं आहे का? कुटुंब आणि गाव हे दुसर्‍याचं असेल तर निर्णय घेणं तेवढं त्रासदायक नाही वाटणार हो. पण तुमच्याच गावातील एक कुटुंब गावाच्या भल्यासाठी बळी दिलं जातय तेव्हा तुम्ही समर्थन देणार का? "हो" म्हणत असाल तर लागलिच दुसरा प्रश्न :- ठीक. देउया त्यांचा बळी. पुढचा बळी तुमच्या कुटुंबाचा. आता चालेल? (झक मारुन ह्यालाही " हो " म्हणायची वेळ येते.) समजा "नाही" म्हणालात तर "सर्वांनीच असे केले तर आख्खे गाव बुडेल. सारेच नष्ट होइल" असा धाक घातला जातो.
मग? मग काय करावे?
आपल्या पूर्वजांनी ह्यामुळेच स्वखुशीने बळी जाणार्‍यांचा हुतात्मा/शहीद म्हणून गौरवीकरण केलय ते ह्यामुळेच का काय? कुणी स्वतःहून इतरांच्या भल्यासाठी बळी जात असेल तर कोण कशाला नाही म्हणेल.
पण मूळ प्रश्न राहतोच "बळी कुणी जायचं?" ???
.
सामान्य किंवा संसारी म्हणवल्या जाणर्‍यांनी ह्याच्यावर सोप्पं उत्तर शोधलय "शिवाजी/भगतसिंग शेजार्‍याच्या घरात व्हावा" आम्ही त्याचे स्तवन करु.स्तुतीगायन करु. चिंताच नाही.
.
डॉक्टर असताना येणारी नैतिक -कायदेशीर विचारांच्या झगड्याचं त्रांगडं खर्‍यांनी मांडलय. तसच हे त्रांगडं अधिक ठळक रूप घेउन येतं ते सैनिकी व्यवसायात. "ऑर्डर" हा तिथे अंतिम शब्द मानला जातो. त्यावेळी तुमच्या विवेकानं उलट कौल दिला तर काय करायचं? समजा एका झोपडीच्या आश्रयाने काही अतिरेकी लपले आहेत.त्यांना वेळिच आवरले नाही तर मोठी गोची अगदि राष्ट्रिय पातळीवर होणार आहे; त्यांना मारणे अत्यंत अगत्याचे आहे. तुम्ही सामान्य सैनिक आहात. आणि तुम्हाला तुमचा वरिष्ठ सरळ "फायर" अशी आज्ञा देतो. आता सरळ गोळ्यांच्या फैरी झडणं अपेक्षित आहे; पण इतक्यात तुम्हाला लक्षात येतं की झोपडित अतिरेक्यांशिवाय काही निरपराध बंधकही आहेत. झोपडिजवळून जाणारे काही जनसामान्यही आहेत; ज्यांना अजून ह्या प्रकरणाचा पत्ताच नाही. चालवाल बेछूट गोळी? आज्ञा पाळाल? की छोट्या कच्च्याबच्च्यांना पाहून पाघळून जाल? पाघळलात तर गैरवर्तनाचा ठपक येउ शकतो. आणि देशद्रोहाचाही ठपका येण्याची शक्यता आहे. "देशद्रोहाचा आरोप स्वीकाराल की निरपराधावर गोळ्या चालवण्याची हिंमत दाखवाल?"
पुन्हा वास्तवातल्या अडचणी वेगळयच.(पुरावे, स्वतःच्याच सहकार्‍यांचा रोष स्वीकारून त्याच दुनियेत राहणे हे कर्मकठीण. साइडलाइन होण्याची भीती.)
.
टिपिकल बंधक /होस्टेज ठेवल्या जाणार्‍या सीनमध्येही ही अशीच समस्या आडवी येते. पाच पन्नास जणांना बंधक केले गेलेले असते. त्याबदल्यात काही गुन्हेगारांच्या मुक्ततेची मागणी होते. हे गुन्हेगार शेकडो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले असू शकतात; किंवा सुटल्यावर तर नक्कीच ठरणार अशी खात्री असते.
आता? आता म्हणाल सोडा गुन्हेगारांना म्हणून? त्यांना सोडलं तर ते नंतर जे मुडदे पाडणार आहेत त्याचे जिम्मेदार कोण? एक उदाहरण :- १९९९ला भारतीय विमानचे अपहरण केल्यामुळे मौलाना मसूद अझहर ह्याला सोडावे लागले. त्याने नंतर जैश ए मोहम्मद आणि लश्कर ए तोयबा ह्या संघटनांना सुसूत्र करून भारतात आख्खे दशकभर बॉम्बस्फोटांचे, हिंसेचे सत्र सुरु केले. त्याला सोडले हे बरोबर केले का? त्याने नंतर ज्यांचा जीव घेतला; त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? त्याला जिवंत सोडणारी व्यवस्था नाही का जबाबदार? समजा हे लोक मरतील म्हणून त्या मसूद अझरला सोडायचे नाही म्हणता मग? ठीक. पण त्याला सोडलं नाही तर विमानातले शंभरेक प्रवासी मरणार हे निश्चित. घ्याल त्यांच्या मृत्यूचं ओझं आपल्या भाळी?
.
होतं काय , की तात्विक चर्चा करायला सोपं पडतही असेल "तमक्यांनी त्याग करावा " वगैरे म्हणायला जमतही असेल . पण जेव्हा एखाद्याचा त्या त्याग कराव्या लागणार्‍या मंडळित समावेश केला की लागलिच त्याची मतंही बदलताना दिसतात्.सार्‍यांचीच नाहीत बदलत; पण मग मतं बदलणारी मंडळीही असतात. "त्याग आवश्यक आहे. तो इतरांनी माझ्यासाठी करणं त्याहून आवश्यक आहे. मला करावा न लागणं हे तर अत्यावश्यक आहे." अशी ती भूमिका.
.
असो. हा असा एक तिढा झाला. बंधक्-समस्या हा निव्वळ एक भाग आहे. अशा नैतिक - अनैतिकच्या निर्णयांना आव्हान देणारे कित्येक प्रसंग असू शकतात.
लष्करात असलात तरच हे धर्मसंकट येइल असं नाही. अगदि सामान्य माणसालाही अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागू शकतं. "किती महिन्यांचा गर्भ झाला म्हणजे त्याच्या हत्येस सदोष मनुष्यवध(खून, हत्या) म्हणता येइल; किती महिन्यापर्यंत तो निव्वळ साधासाच गर्भपात ठरेल?" हा जगभर देशोदेशी वेगवेगळे नियम असलेला प्रश्नांचा प्रांत. "नक्की कोणत्या कारणासाठी गर्भाला मारणं क्षम्य आहे?" हा त्याच्याच जवळ जाणारा अजून एक प्रश्न. "मातेच्या जीवाल धोका असेल तर गर्भाला मारले तर चालेल" असे सर्वसाधारण उत्तर ऐकू येते. पण "मातेच्या जीवास धोका नाही, पण मातेला मूल नकोसे आहे, आणि चांगले वाढलेले आहे पोटात" अशा केसमध्ये काय करणार?
.
किंवा कुणी केलेल्या कृत्याबद्दल माफी मागत असेल तर? माफ करावे का? कुणी करावे? कुणाच्या वतीने करावे? नुसतेच माफ करावे की इस्लामिक देशांमध्ये करतात तसे काही "मोबदला"(ब्लड मनी) वा तत्सम प्रकार घेउन करावे? त्यास माफी म्हणावे की देवाणघेवाण? पण मग ती सरळसरळ "अमुक पैसे मोजा अन वाटेल त्याचा खून करा" किंवा "पुरेसे पैसे मोजा आणी वाटेल तो गुन्हा करा" असा प्रकार बनल्याचा कुणी आरोप केला तर? तो आरोप चुकीचा म्हणता येइल का?
मुळात "माफी" ही तुम्ही "चुकी"साठी करणार की "गुन्ह्या"साठी?
कोणत्या गुन्ह्याला कोणती/किती शिक्षा योग्य?
शिक्षेचे उद्दिष्ट गुन्हेगारास सुधरवणे, गुन्हेगारास समजापासून दूर ठेवणे, गुन्हेगारावर सूड घेणे ह्यापैकी नक्की काय असावे? की ह्यापेक्षाही काही वेगळे असावे?(ह्यावर जालावर गविंनी एक धागाही काढला होता.)
.
फाशी असावी की नसावी? असलीच तर ती rarest of rare केसमध्येच का असावी? गुनेह घडण्याच्या वारंवारितेचा संबंध शिक्षेशी लावावा की गुन्ह्याच्या तीव्रतेचा लावावा.(दिल्लीमध्ये ज्याप्रकारे हिडिस गुन्हा डिसेम्बर २०१२ मध्ये घडला तसे गुन्हा पुन्हा पुन्हा होउ लागले तर ते rarest of rare राहतील का? राहिले नाहित तर त्यास फाशी देउ नये का काय??) सज्ञान व्हायला एखाद दोन दिवसच बाकी असताना कुणी अतिभयानक(दिल्लीस्टाइल) गुन्हा केला तर निव्वळ "अठरा वर्षाला दोन दिवस कमी आहेत" असे म्हणून चक्क सोडून द्यावे का काय? तुमच्या आप्तांबाबतही असे गुन्हे घडले तर तुमची हीच भूमिका राहणार का?
.
ह्यासर्वांवर उपाय म्हणून एक मस्त ओळ ऐकली होती. golden rule for ethics ह्या नावाची. "जे तुम्ही स्वत्ळ्साठी निवडू इच्छित नाही, ते तुम्ही इतरांवर लादू नका." ह्या अर्थाची. "इतरांनी तुम्हाला जसे वगवावे असे अपेक्षित असेल, तसे तुम्ही इतरांना वागवा" असे तेव्हा म्हटले गेले. अब्राहम लिंकनचे ह्यात संदर्भात प्रसिद्ध वाक्य ऐकले आहे "मला स्वतःला कुणाचाही गुलाम होणे आवडणार नाही. म्हणून मीसुद्धा इतर कुणाला गुलाम करणार नाही."
.
वॉव. म्हणजे माझ्या गोंधळाचे शेवटी निराकरण झाले तर. मी सुटकेचा निश्वास टाकला. पन एवढ्यात कानावर प्रश्न आदळला " समजा हिंबोपा नावाच्या देवाला मी स्वत: बळी जाउन माझे भले होइल असे मानतो. तो मार्ग मी स्वतःसाठी निवडतो. माग मी इतरांनाही त्याची जबरदस्ती करु का? मरणोत्तर त्यांना स्वर्ग मिळावा म्हणून त्यांच्या भल्यासाठी त्यांना मी मारुन टाकू का " असे एखादा "झबोका" ह्या काल्पनिक धर्मातील धर्मवेडा म्हणाला तर? इथे तर तो स्वतःला जे चालेल तेच इतरांना लागू करतोय आता?
आता बसली का पुन्हा वाचा मनोबा? बोला ना. गप्प का?
.
हरकत नाही. ह्यावरही उत्तर मिळाले. "कुणीच कुणाला कसलीच जबरदस्ती करु नये. व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्वोच्च मूल्य." हुर्रे. मनोबा आनंदले. शेवटी त्यांना उत्तर मिळाले. पण छट्.पुन्हा गोची झालिच. कारण हे मूल्य मनले तर "राजीखुशीने जे काही होते ते सर्व मान्य करावे" असा अर्थ होतो. वरवर हा फार सोपा वाटतो.
पण समजा वर उल्लेख केलेल्या "झबोका " धर्माच्या धर्मगुरुनी समजा एखाद्या धर्मानुयायाला "स्वतःचा हात कापून हिंबोपा नावाच्या देवाला अर्पण केल्यास देव कसा खुश होणार आहे" हे पटवून दिले आणि तो शहाणा "राजीखुशीने" आत्मघात करुन घ्यायला निघाला तर ? तर मानणार का "व्यक्तीस्वातंत्र्य " हे मूल्य सर्वोच्च?
गप्प का मनोबा? बोला. बोला काहीतरी.
गोंधळून चालणार नाही.
.
सर्वच कायदेशीर गोष्टी नैतिक असतीलच असे नाही. सर्वच नैतिक गोष्टी कायदेशीर असतील असेही नाही.
कधी काय करावे हा जो तो कधी कळत, कधी स्वतःच्याही नकळत ठरवून टाकत असतो.
कित्येकदा कायदेशीर वागण्याच्या नादात नैतिकता सोडल्याबद्दल टोचणी लागते.
तर कधी नैतिकता पाळण्याच्या नादात व्यवहारात तुफान नुकसान होते; कायदेशीर अडचणीही येउ शकतात. तेव्हा अडचणींनी माणूस फार वैतागतो. कित्येकदा नैतिकता पाळल्याबद्दल स्वतःवर चरफडतोसुद्धा.
.
ह्यातल्या बहुतांश प्रश्नांवर बहुतांश पब्लिक सोप्पा अल्गोरिदम वापरते "दृष्टीआड सृष्टी". फार विचार करायचा नाही. आपल्या पुढ्यात पडेल तेवढच पहायचं नि चालू लागायचं. व्यवहारात तेच आचरायला सोपं आहे; हे ही खरच.
उर्वरित प्रतिसादातून लिहीत जाइन. सध्या घाइत आहे.

--मनोबा

लेखनविषय: दुवे:

Comments

कन्फ्यूजन योगोनाम...

जेव्हा जेव्हा द्विधा मनःस्थिती होते तेव्हा तेव्हा सदसद्विवेकबुद्धी आणि तारतम्य वापरावे असे संतलोक सांगतात. ही बुद्धी कशी मिळवावी तर वृत्ती स्थिर करून. ते कसे साधावे तर राग, विषाद, मोह, मत्सर इ. रिपूंवर ताबा ठेवून. त्या सं.स्थ..वरच्या एका प्रतिसादात म्हटले आहे की कर्म करावे, परिणामांची चिंता करू नये. पण कर्म कोणते ह्याचाही कधी कधी बोध होत नसतो. त्याचीही मार्गदर्शक तत्त्वे गीतेत सांगितली आहेत.
हे सर्व म्हणजे काही अवडंबर नव्हे, तर रोजचे जगणे सोपे आणि विना गुंतागुंतीचे करणारे शॉर्ट्कट्स आहेत. .कॉझ आणि ईफेक्ट ही एक जोडी तर अ‍ॅक्शन्/डीड आणि री़झल्ट अशी दुसरी जोडी असते. स्थिरचित्त, स्थितधी झाल्यावर जी कर्मे घडतात त्याचे फळ योग्य तेच असते आणि ते काय असावे हे ठरवणे हे आपल्या अधिकारक्षेत्रात येत नाही. पण म्हणून विहितकर्म, नित्यकर्म,योग्यकर्म थांबवायचे का? भगवंतांनी 'मा ते सङ्गोsस्तु अकर्मणि' असे स्पष्ट सांगून ठेवले आहे. अमुक केले तर अमुक होईल हे आपल्या बुद्धीनुसार बांधलेले आडाखे असतात. आपली बुद्धी जितकी सूक्ष्म आणि धारदार (दोन्ही एकाच वेळी) तितकी आडाखे अचूक निघण्याची शक्यता अधिक. असे शक्य तितके 'पर्फेक्ट' कर्म घडल्यावर मग ते कर्म आणि ते फळ दोन्ही आपल्याला लिंपत नाहीत, आपण अलिप्त रहातो, कन्फ्युजन टळते, लख्ख प्रकाश उजळतो, 'मनाचिये अंधाराचा विनाशु' होतो.
इति लेक्चरं, इति पुरांणम |

 
^ वर