ट्रोजन युद्ध भाग २.२- इलियडमधले द्रोणपर्व: विविध वीरांचा पराक्रम आणि अकीलिसचा धुमसता राग.

भाग १

भाग २.१

मागील लेखात इलियडमधील २४ बुक्सपैकी पहिल्या ३ बुकांचा सारांश आला होता. आता बुक्स ४ ते १० यांमधील कथाभाग पाहू. पहावे तिकडे नुस्ती मारामारी-महाभारतात "धनुर्भिरसिभिर्भल्लैर्गदाभिस्तोमरर्ष्टिभि:" असे त्या तुंबळ युद्धाचे वर्णन दिलेय अगदी तश्शीच. शृंगार झाल्यानंतर होमरबाबांच्या अंगात वीररस उसळी मारू लागलाय असेच वाटते ती बुक्स वाचून.

आधीचे संक्षिप्त ब्याकग्रौंडः

मेनेलॉसबरोबरच्या मारामारीत जखमी होऊन पॅरिस पळाला. तो कुठेही दिसेनासा झाल्यावर मग अ‍ॅगॅमेम्नॉनने मेनेलॉसचा विजय जाहीर केला. दोघांच्या फाईटमध्ये एक करार होता. मारामारीत जो मरेल तो मरूदे, बाकीचे लढणार नाहीत म्हणून. (अनवधानाने याचा उल्लेख मागच्या भागात राहिला, त्याबद्दल क्षमस्व)

ट्रोजन तह मोडतात आणि युद्धाला तोंड लागते.

होमरला मुळात मगाशी सांगितलेला तह ट्रोजनांनी मोडला असे सांगायचे आहे, पण देवांना मध्ये आणल्याशिवाय भागणार कसे? त्यामुळे आता आपण ऑलिंपस पर्वतावर जाऊ. झ्यूसदेवाची बायको हेरा अन मुलगी मिनर्व्हा दोघीही ट्रॉय नष्ट करायचे म्हणून हट्ट धरून बसल्या. सुरुवातीला झ्यूस त्यांना कन्व्हिन्स करू पाहत होता की तिथे कायम चांगलेचुंगले मटन-बीफ अनलिमिटेड खायला मिळते, उगीच कशाला भक्तांना मारायचे म्हणून. मिनर्व्हाला तंबीही दिली की जास्त बोलू नकोस म्हणून. पण नंतर पोरीच्या बाजूने बायको बोलू लागली तेव्हा बिचार्‍याची बोलती बंद झाली. हेराने त्याला ट्रॉयच्या बदल्यात आर्गोस, स्पार्टा आणि मायसीनी यांपैकी कुठल्याही शहराची काय वाट लावायची ती लाव अशी खुल्ली ऑफर दिल्यावर झ्यूस गप्प झाला. त्याची संमती मिळाल्यावर मिनर्व्हा दरदर ऑलिंपस पर्वत उतरून खाली आली आणि तिने काड्या करणे सुरू केले.

या काड्यांचा परिणाम काय झाला? ट्रोजन सैन्यात कुणी लाओदोकस नामक एक काडीसारू होता. त्याने पांदारस नामक एका धनुर्धार्‍याला सोनेनाण्याचे आमिष दाखवून चक्क मेनेलॉसला बाण मारायला सांगितले. पांदारसने एक ठेवणीतला बाण काढला. तो सूं सूं करीत मेनेलॉसला लागला. छाती-पोटाजवळच्या जखमेमुळे मेनेलॉस कण्हू लागला. अ‍ॅगॅमेम्नॉनला कळायचं बंद झालं. पण मेनेलॉसने त्याला दिलासा दिला, की आल इझ वेल. मग यवनांच्या धन्वंतरी एस्कुलापियसचा मुलगा मॅखॉन याला उपचारासाठी बोलावले गेले.

आता अ‍ॅगॅमेम्नॉनची सटकली. सर्व सैन्यभर फिरून लोकांना उत्तेजित करून, प्रसंगी शिव्या घालून त्याने युद्धाला तयार केले. ओडीसिअसला आळशीपणाबद्दल एक लेक्चर दिले तेव्हा ओडीसिअसने त्याला अजून शिव्या घातल्यावर मग मात्र मायसीनीनरेश अंमळ मऊ झाला. नेस्टॉर, इडोमेनिअस, डायोमीड, इ. सर्वांशी बोलून आर्मी गोळा केली आणि अखेरीस युद्धाला तोंड लागले.

सर्वप्रथम अँटिलोकस या ग्रीक योद्ध्याने एखेपोलस या ट्रोजन योद्ध्याच्या डोळ्यात भाला खुपसून त्याला प्राणांतिक जखमी केले. तो कोसळला तसे त्याचे चिलखत उचकटून पळवण्यासाठी गर्दी जमली. त्या गर्दीतून काही ट्रोजनांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. यातून फायटिंग अजून तीव्र, रक्तरंजित झाली. त्यातच अकीलिसचा चुलतभौ आणि यवनभीमच जणू वाटणारा थोरला ऊर्फ सांड अजॅक्स याने सिमोइसियस नामक ट्रोजन तरुण योद्ध्याला छातीत भाला खुपसून ठार मारले. अजॅक्सचा भाला लागताक्षणीच सिमोइसियस कोसळला. तेव्हा प्रिआमचा एक मुलगा अँटिफस याने अजॅक्सवर एक भाला फेकला. पण तो अजॅक्सला लागला नाही तर ओडीसिअसचा जवळचा साथीदार ल्यूकस याला (सिमोइसियसचे शव ग्रीकांकडे ओढत असताना) लागून तो मरण पावला. आपला जवळचा साथीदार गेल्याने फुल्ल खुन्नसमध्ये ओडीसिअस राउंडात उतरला. त्याचा बाण डेमोकून नामक प्रिआमच्या अजून एका पोराला लागला. तो मेला. ओडीसिअसच्या आवेशाने ट्रोजन्स जरा मागे हटले, तेव्हा ट्रोजनांना एकाने ओरडून धीर दिला, अकीलिस लढाईत नाहीये याची आठवण करून दिली, आणि दोन्ही बाजू पुन्हा एकदा खूंखारपणे युद्ध करू लागल्या. अजून काही योद्धे पडले. तेव्हा एक ग्रीक योद्धा पुढे आला- सर्व ग्रीक सेनानायकांत सर्वांत तरणा, पण पराक्रमात अकीलिसनंतर त्याचा हात धरणारा कुणीही नव्हता. त्या वीराचे नाव होते डायोमीड. तोच तो ८० जहाजे घेऊन आलेला, नेस्टॉरच्या सर्वांत लहान मुलापेक्षाही तरुण असलेला-विशीतला एक दबंग योद्धा.

डायोमीड आणि अन्य ग्रीकांचा पराक्रम

होमरबाबांनी सांगितल्याप्रमाणे मिनर्व्हा देवीने डायोमीडला धैर्य प्रदान केले. मग तो कुणाला ऐकतोय? सुटलाच डैरेक्ट. पहिल्यांदा फेगेउस आणि इदाएउस या जुळ्या भावांवर हल्ला चढवला. दोघे भाऊ रथातून, तर डायोमीड पायीच लढत होता. फेगेउसचा भाला चुकवून त्याने त्याच्या छातीत भाला फेकून ठार मारले. इदाएउस पळून गेला. नंतर खुद्द अ‍ॅगॅमेम्नॉनने ओडियस नामक ट्रोजन योद्ध्याला भाला फेकून ठार मारले. सर्व योद्धे भाला एक्स्पर्ट होते- स्वतः अ‍ॅगॅमेम्नॉन हा जॅव्हेलिन स्पेशलिस्ट होता असे खुद्द अकीलिस म्हटल्याचे होमरने इलियडच्या २४ व्या बुकात नमूद केले आहे. नंतर क्रीटचा राजा इडोमेनिअस याने ट्रोजन योद्धा फाएसस याला, तो रथात चढत असताना उजव्या खांद्याजवळ भाला फेकून मारले. तो पडल्यावर इडोमेनिअसच्या सेवकांनी फाएससचे चिलखत काढून घेतले. मारले की काढ चिलखत हा एक लै हिट प्रकार होता त्यांच्यात. यावरून ग्रीकांमध्ये आपापसात पुढे लै वाईट भांडणे झालेली आहेत.

त्यानंतर मेनेलॉसने स्कॅमँडरियस या ट्रोजन वीराला, तर मेरिओनेस या हेलेनच्या स्वयंवरप्रसंगी उपस्थित असणार्‍या ग्रीक योद्ध्याने टेक्टॉन या ट्रोजन योद्ध्याला भाला फेकून मारले-तो भाला नितंबातून डैरेक्ट मूत्रनलिकेपर्यंत गेला आणि टेक्टॉन क्षणार्धात कोसळला. तसेच मेगेस आणि युरिप्लस या ग्रीकांनी पेदेउस आणि हिप्सेनॉर या ट्रोजनांना अनुक्रमे मानेत भाला खुपसून आणि तलवारीने हातच कापून काढून ठार मारले. अशी लढाई ऐन रंगात आलेली असताना इकडे डायोमीडपण फुल्ल फॉर्मात आलेला होता. लिआकॉनचा मुलगा पांदारस (तोच तो तह मोडून मेनेलॉसला बाण मारणारा) त्याच्यासमोर आला, आणि त्याने अचूक नेम साधून डायोमीडवर बाण सोडला. तो त्याचे चिलखत भेदून खांद्याजवळ लागला आणि थोडे रक्त आले. ट्रोजन्स आपल्या जवळ येणार इतक्यात स्थेनेलस नामक ग्रीकाला डायोमीडने आपल्या खांद्यात रुतलेला बाण काढण्याविषयी विनवले. त्याने बाण काढल्यावर जणू काही झालेच नाही अशा आवेशात डायोमीड ट्रोजन सैन्यात घुसला. पायीच युद्ध करूनही त्याने ट्रोजन सैन्यात असा हाहा:कार उडविला की ज्याचे नाव ते. सर्वप्रथम अ‍ॅस्टिनूस नामक एका ट्रोजन वीराला छातीत भाला खुपसून आणि खांद्याच्या हाडावर तलवारीने हाणून मारले. नंतर आबास आणि पॉल्यिदस या जुळ्या भावांनाही यमसदनी धाडले. त्यानंतर प्रिआमचे दोन मुलगे क्रोमिअस आणि एखेम्मॉन यांना मारून रथातून त्यांची कलेवरे खाली ओढून काढली, प्रत्येकाचे चिलखतही काढून घेतले.

डायोमीडच्या भीमपराक्रमाचा प्रसाद एनिअसला तसेच चक्क व्हीनस अन मार्स या देवांनाही मिळतो!

डायोमीडचा हा नंगानाच एनिअस या ट्रोजन योद्ध्याला बघवला नाही. पांदारसला बरोबर घेऊन डायोमीडवर त्याने चढाई केली. समोरासमोर आल्यावर "हे डायोमीडा, सांभाळ माझा भाला" म्हणून भाला फेकला, पण डायोमीडची ढाल मध्ये आली. ढालीला भेदून भाला पलीकडे गेला पण डायोमीडला काही झाले नाही. पांदारसला ढाल भेदली गेली इतक्यानेच लै भारी वाटून त्याने कर्णागत "हतोऽसि वै फाल्गुन" अशी गर्जना केली, पणं डायोमीडने त्याच्यावर अचूक नेम धरून भाला फेकला. तो त्याच्या नाकातून आत घुसून जबड्याच्या खालच्या भागाजवळून बाहेर आला. पांदारस खलास. त्याचे शव ताब्यात घेऊन ग्रीक लोक त्याचे चिलखत आणि इतर शस्त्रे ताब्यात घेतील अशी भीती वाटून एनिअस रथातून खाली उतरला. पण डायोमीडने एक भलाथोरला धोंडा हातात घेतला आणि एनिअसच्या जांघेवर जोराने प्रहार केला. दगडाच्या आघाताने एनिअसच्या जांघेजवळचे काही मांस बाजूला होऊन मोठा भेसूर देखावा दिसू लागला. एनिअस जागीच कोसळला, पण अजून जिवंत होता. डायोमीड आता एनिअसला ठार मारणार इतक्यात त्याला कुणीतरी बाजूला नेले.

आधी सांगितल्याप्रमाणे डायोमीडच्या या धैर्यामागे मिनर्व्हा देवीची प्रेरणा होती. तिने त्याला असेही सांगितले होते, की व्हीनस देवी तुझ्यासमोर आली तर तिला इजा करायला मागेपुढे पाहू नकोस,मात्र अन्य देवांसमोर असले काही करू नकोस. तेव्हा व्हीनस देवी समोर दिसताच त्याने तिच्या मनगटाजवळ भाल्याने वार केला आणि रक्त काढले. ती विव्हळू लागली, आणि मार्स देवाच्या रथात बसून तडक ऑलिंपसला गेली. तिथे सीनियर मंडळींनी तिचे सांत्वन केले. "काय काय बै सहन करायचं या माणसांचं!" असे उद्गार काढून काही जुन्या कहाण्या पुनश्च चर्चिल्या गेल्या. मग अपॉलो ने मार्सला डायोमीडकडे बघायला सांगितले. कोण मर्त्य इतकी टिवटिव् करतोय पाहूच, असे म्हणत मार्स युद्धक्षेत्रात गेला. आता ट्रोजनांची एक सभा भरली. ट्रोजनसाथी आणि थ्रेशिअन लोकांचा राजा अकॅमस आणि प्रख्यात ट्रोजन योद्धा सार्पेडन या दोघांनी वीरश्रीयुक्त भाषणे करून ट्रोजनांना धीर दिला. विशेषतः सार्पेडनने हेक्टरला लै शिव्या घातल्या-तुझ्यासाठी मी माझी पोरेबाळे-बायको-राज्य सर्व सोडून लांबून आलो पण तुला अक्कल नाही वगैरे वगैरे लैच कायबाय बोलला. हेक्टरला त्याचे शब्द झोंबले. त्याने सेना तयार केली आणि लढाईला पुन्हा मोठ्या प्रमाणावर तोंड लागले. आणि आश्चर्यकारकरीत्या एनिअससुद्धा ठणठणीत बरा होऊन पुन्हा लढायला आला.

विविध ट्रोजन व ग्रीकांचा पराक्रम-ग्रीकांच्या रेट्याने ट्रोजन घाबरतात

थोरला आणि धाकटा अजॅक्स, ओडीसिअस आणि डायोमीड हे युद्धाचे नेतृत्व करीत होते. ट्रोजन हल्ल्यापुढे त्यांनी आपली फळी भक्कमपणे टिकवून धरली. इकडे अ‍ॅगॅमेम्नॉन "भले शाब्बास!" करत फिरत होता. त्याने एनिअसचा मित्र देइकून याची ढाल भेदून, त्याला मारून आपल्या भालाफेकीची चुणूक पुन्हा एकदा दाखवली. एनिअसनेही क्रेथॉन आणि ऑर्सिलोखस या दोघा ग्रीकांना ठार मारून आपल्या बळाचे दर्शन घडवले. त्यांची शरीरे लुटीसाठी ट्रोजन सैनिक ओढून नेतील म्हणून त्यांपासून संरक्षणासाठी खुद्द मेनेलॉस ग्राउंडात उतरला. एकट्या राजाला अपाय होऊ नये म्हणून नेस्टॉरचा मुलगा अँटिलोखसदेखील त्याच्याबरोबर आला. दोघांना एकत्र पाहून एनिअस मागे हटला. त्या दोघांनी नंतर पिलामेनेउस नामक ट्रोजन योद्ध्याला आणि त्याच्या सारथ्याला मारून त्याचे घोडे ग्रीक कँपकडे वळवले. पण असे करत असताना हेक्टरचे लक्ष तिकडे गेले. एक मोठी गर्जना करून तो त्यांच्या पाठलागावर आला. ते पाहून डायोमीडच्या अ‍ॅड्रिनॅलिनचा पारा अजूनच वर चढला. हेक्टरने मेनेस्थेस आणि अँखिआलस या दोघा ग्रीकांना मारले, तर थोरल्या अजॅक्सने अँफिअस या ट्रोजनाला मारले. त्याचे चिलखत ताब्यात घेऊ पाहताना ट्रोजनांनी भाल्यांचा असा मारा केला, की अजॅक्सला तिथून हटणे भाग पडले.

प्रख्यात ट्रोजन वीर सार्पेडन याने त्लेपोलेमस या ग्रीकाला भाला फेकून मारले खरे, पण त्याच्या भाल्याने तोही जखमी झाला तेव्हा त्याला युद्धभूमीवरून हटणे भाग पडले. इकडे ओडीसिअसनेही कोएरॅनस, अलास्टर, क्रोमियस, अल्कॅन्द्रस, हॅलियस, नोएमॉन आणि प्रिटॅनिस या ट्रोजनांना मारून हात लाल करून घेतले. तो अजून कुणाला मारणार एवढ्यात हेक्टरचे लक्ष तिथे गेले. पाठोपाठ हेक्टरनेही ट्यूथ्रस, प्रसिद्ध सारथी ओरेस्टेस (अ‍ॅगॅमेम्नॉनच्या मुलाचेही नाव हेच होते पण हा वेगळा) त्रेखस, ओएनोमॉस,हेलेनस आणि ओरेस्बियस या ग्रीकांना ठार मारले.

आता हेक्टर इतका भारी का? तर होमरभाईंच्या म्हण्ण्याप्रमाणे मार्सदेव बरोबर होता म्हणून. पण मिनर्व्हाच्या चिथावणीने डायोमीडने चक्क मार्सलाही भाल्याने जखमी केले!

नंतर थोरल्या अजॅक्सने एकट्याने ट्रोजनांची एक फॅलँक्स तोडून टाकली आणि ट्रोजनसाथी थ्रेशियन लोकांचा राजा अकॅमस यावर जोराने भाला फेकला, तो हेल्मेट फोडून कपाळातून मेंदूपर्यंत आरपार जाऊन अकॅमस गतप्राण झाला. पाठोपाठ डायोमीडने अ‍ॅक्सिलस आणि त्याचा सारथी कॅलेसियस या दोघांना यमसदनी धाडले. नंतर युरिआलस या डायोमीडच्या साथीदाराने ड्रेसस आणि ऑफेल्टियस या दोघा ट्रोजन वीरांना मारले.पुढे पॉलिपोएतेस या ग्रीकाने अ‍ॅस्टिआलस या ट्रोजनाला मारले. इकडे ओडीसिअसने पिदितेस तर (थोरल्या अजॅक्सचा सावत्र भाऊ आणि मजा म्हंजे आईकडून हेक्टर अन पॅरिस यांचाही नातलग असणारा) ट्यूसरने आरेताऑन या ट्रोजनांना मारले. नेस्टॉरपुत्र अँटिलोखसच्या भाल्याने आब्लेरुस तर अ‍ॅगॅमेम्नॉनद्वारे एलातुस हे ट्रोजन योद्धे मृत्युमुखी पडले. अशीच चहूबाजूंना लढाई चालली होती. कधी ग्रीक तर कधी ट्रोजन पुढे सरकत होते. बह्वंशी ग्रीकांची सरशी होत होती, पण ट्रोजनही चिवट होते. मेनेलॉसनेही अ‍ॅड्रेस्टस नामक ट्रोजन योद्ध्याला तो सुटकेच्या बदल्यात पैशाचे आमिष दाखवत असतानाही अ‍ॅगॅमेम्नॉनच्या सांगण्यावरून ठार मारले. "नो प्रिझनर्स" हा मंत्र बुढ्ढोजी नेस्टॉरनेही सांगितल्यावर मग ग्रीक अजूनच चेकाळले. लढता लढता डायोमीड आणि ग्लॉकस नामक ट्रोजन हे समोरासमोर आले. कोण-कुठला असे विचारल्यावर दुरून ओळख लागली, मग हाय-हॅलो करून दोघांनी न लढता एकमेकांना भेटी देऊन निरोप घेतला.

इकडे ट्रोजनांची अवस्था बिकट झाली होती. हेक्टरचा भाऊ हेलेनस याने हेक्टर व एनिअसला ट्रॉय शहरात जाऊन सर्व बायकांना देवाची प्रार्थना करायला सांगण्याची विनंती केली. त्याबरहुकूम हेक्टर आत गेला. आपली आई हेक्युबा हिला त्याने प्रार्थनेविषयी सांगितले-ती आणि इतर बाया कामाला लागल्या. तसेच बायको-पोराला भेटून तो पॅरिसकडे गेला. दोघे भाऊ तयार होऊन युद्धासाठी निघाले.

हेक्टर आणि थोरल्या अजॅक्सचे द्वंद्वयुद्ध

हेक्टर-पॅरिस हे बंधुद्वय ट्रॉयच्या गेटातून बाहेर आले आणि त्यांनी कापाकापी सुरू केली. हेक्टरने इओनेउस तर पॅरिसने मेनेस्थियस या ग्रीकांना भाले फेकून मारले. आता हेक्टरबंधू हेलेनसच्या मनात काय आले कुणास ठाऊक? तो शकुन वैग्रे जाणणारा होता. त्याने शकुनबिकुन पाहून हेक्टरला सांगितले की आजचा दिवस भाग्याचा आहे. ग्रीकांपैकी कुणालाही वन-ऑन-वन लढाईसाठी चॅलेंज कर, तू नक्की जिंकशील. मग हेक्टरने वरडून च्यालेंज दिले, "आहे का कोणी माईचा लाल"? म्हणून. पण ग्रीक गप्पच बसले. ते पाहून रागाने लाल झालेल्या मेनेलॉसने थू: तुमच्या जिनगानीवर असे म्हणून स्वतः उठून उभा राहिला. पण चतुर अ‍ॅगॅमेम्नॉनने "भावा, लैच तापायलाइस, पण हेक्टरचा नाद नको करू उगी, मरशील फुकट" असे म्हणून त्याला दाबले. थोडावेळ मग ग्रीकांत चलबिचल झाली. ते पाहून यवनभीष्म नेस्टॉरचे पित्त खवळले आणि त्याने त्यांच्या भ्याडपणाबद्दल त्यांना आपण तरुण असतो तर कसे लढलो असतो वगैरे चार शब्द सुनावले. ते ऐकून ९ लोक तडकाफडकी उठून उभे राहिले: खुद्द अ‍ॅगॅमेम्नॉन, तरणाबांड डायोमीड, थोरला आणि धाकटा अजॅक्स, क्रीटाधिपती इडोमेनिअस, त्याचा साथीदार मेरिऑनेस,युरिपिलस, थोआस आणि शेवटी ओडीसिअस हे नऊ जण एकदम उभे राहिले. तेव्हा मग फासे टाकून निर्णय घ्यावा असे ठरले. प्रत्येकाने आपापले चिन्ह अ‍ॅगॅमेम्नॉनच्या हेल्मेटमध्ये टाकले. नेस्टॉरने त्यातून रँडमली एक चिन्ह बाहेर काढले - ते होते थोरल्या अजॅक्सचे. आता हेक्टर विरुद्ध थोरला अजॅक्स अशी घमासान फाईट होणार होती. समस्त ग्रीक आणि ट्रोजन योद्धे जवळ येऊन पाहू लागले काय होते ते.

बैलांच्या कातड्याची सात आवरणे एकावर एक चढवून शेवटचा आठवा थर ब्राँझचा लावलेली अशी मोठ्ठी जाड आयताकृती ढाल आणि भाला घेऊन थोरला भीमकाय अजॅक्स हेक्टरजवळ आला आणि त्याला पाहून क्षणभर हेक्टरलाही धस्स झाले. टिपिकल वीरश्रीयुक्त बोलाचाली झाल्यावर लढाईला तोंड फुटले. सर्वप्रथम हेक्टरने अजॅक्सवर भाला फेकला. त्याच्या ढालीचे ६ थर भेदून ७ व्या थरात तो अडकला. प्रत्त्युत्तर म्हणून अजॅक्सनेही एक भाला हेक्टरवर फेकला. तोही हेक्टरची ढाल भेदून त्याच्या चिलखताला स्पर्श करून हेक्टरला इजा करू शकला असता, पण हेक्टरने वेळीच बाजूला होऊन आपले प्राण वाचवले. नंतर दोघांनीही आपापल्या ढालीत अडकलेले भाले काढून फेकून दिले आणि एकमेकांवर तुटून पडले. हेक्टरने अजॅक्सच्या ढालीवर एकदम मध्यभागी नेम धरून एक छोटासा भाला फेकला, पण ढालीच्या ब्राँझला काही तो भेदू शकला नाही. भाल्याचे टोक मात्र वाकडे झाले. मग अजॅक्सने हेक्टरच्या ढालीच्या आरपार भाला मारला. हेक्टरच्या मानेला लागून तिथून रक्त वाहू लागले, पण हेक्टर मोठा बहाद्दर. लढणे सोडले नाही. जरा मागे होऊन त्याने हातात एक मोठा दगड घेतला आणि अजॅक्सच्या ढालीवर पुन्हा एकदा जोराने आपटला, पण ढाल काही तुटली नाही, ब्राँझचा मोठा आवाज मात्र झाला. आता दगड का जवाब बडे धोंडे से या न्यायाने सांड अजॅक्सने एक अजूनच मोठा दगड हातात घेऊन सरळ हेक्टरवर फेकला. हेक्टरने तो ढालीवर थोपवला खरा, पण त्यात त्याची ढालच मोडून पडली आणि दगडाच्या वजनाने तो खाली पडला. यानंतरही त्यांनी तलवारींनी एकमेकांचे शिरकाण नक्कीच केले असते, पण दोन्ही बाजूंच्या लोकांनी त्यांना थोपवले.हेक्टरने अजॅक्सच्या युद्धकौशल्याची स्तुती केली आणि त्याला एक चांदीच्या मुठीची तलवार दिली. बदल्यात अजॅक्सने त्याला जांभळ्या रंगाचे एक गर्डल दिले.

ग्रीकांना हेलेन ऐवजी फक्त खजिना परत देण्याची ऑफर

यानंतर ग्रीकांची एक सभा भरली. नेस्टॉरने एक सूचना मांडली की ग्रीकांनी आपल्या जहाजांभोवती एक संरक्षक भिंत उभारावी. ती मान्य होऊन कार्यवाहीला लगेच सुरुवात झाली. इकडे ट्रोजनांचीही एक खडाजंगी सभा भरली. अँटेनॉर नामक ट्रोजन वीर म्हणाला, की आता लै झालं. लै लोक मेलेत. त्या हेलेनला आणि तिच्याबरोबर जो खजिना आला त्याला गप गुमानं त्या मेनेलॉसला देऊन टाका. कशापायी अजून ट्रोजनांना मारायचं? हे ऐकून पॅरिस खवळला-जे साहजिक होते. त्याने खजिना परत द्यायची तयारी दर्शवली, पण हेलेन काही परत देणार नाही यावर तो ठाम होता. शेवटी खजिना परत देण्याची ऑफर घेऊन ग्रीक कँपपाशी इदाएउस नामक ट्रोजन दूत आला. ती ऑफर ऐकून डायोमीडने कठोर शब्दांत त्याचे वाभाडे काढले. अ‍ॅगॅमेम्नॉनने ट्रोजनांनी आपले मृत लोक परत घेऊन त्यांचे दहन करेस्तोवर युद्ध न करण्याला तेवढी संमती दिली आणि ट्रोजन लोक दहनविधीच्या कामाला लागले. ग्रीकही आपले मृत लोक एकामागोमाग एक दहन करू लागले. हळूहळू ग्रीकांनी संरक्षक भिंतही उभी केली.भिंत उभी करणे अन मृतांचे दहन करणे यात रात्र निघून गेली.

हेक्टरची सरशी

जहाजांभोवती भिंत उभी करून ,दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी घाईघाईने नाष्टा वगैरे करून ग्रीक अन पाठोपाठ ट्रोजन दोघेही लढायला बाहेर पडले. ट्रोजनांची संख्या ग्रीकांपेक्षा कमी होती असे होमर म्हणतो.

आकाशात विजांचा लखलखाट होत होता. अजॅक्स, अ‍ॅगॅमेम्नॉनसारखे अतिरथीही घाबरले आणि मागे हटले. पण नेस्टॉर मात्र हटू शकला नाही. कारण पॅरिसने त्याच्या एका घोड्याला डोक्यात बाण मारून प्राणांतिक जखमी केले असल्याने तो जागेवरून हलू शकत नव्हता. डायोमीडने ओडीसिअसला ओरडून नेस्टॉरच्या मदतीस जाण्यास सांगितले, पण ओडीसिअस काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता-तो तसाच आपल्या जहाजाकडे पळाला. ते पाहून डायोमीड स्वतः नेस्टॉरजवळ गेला आणि आपल्या रथात त्याला घेतले. डायोमीडच्या सेवकांनी नेस्टॉरच्या घोड्यांना ग्रीक छावणीकडे नेले. इतक्यात हेक्टर त्यांच्या जवळ आला. डायोमीडने हेक्टरवर नेम धरून एक भाला फेकला, तो त्याचा सारथी एनिओपेउस याला लागून तो मरण पावला. तो मेल्यावर हेक्टरने आर्किटॉलेमस या ट्रोजनाला आपला नवा सारथी म्हणून घेतले.

आता डायोमीड परत जात असतानाच त्याच्या रथाजवळच वीज पडली. दोघेही घाबरले, त्याच्या रथाचे घोडे घाबरून खिंकाळू लागले. नेस्टॉरच्या मते हा झ्यूस देवाकडून झालेला अपशकुन होता. देव हेक्टरच्या बाजूने असल्याचे ते चिन्ह होते. इकडे हेक्टर डायोमीडला "भित्रा, बुळगा" वगैरे शिव्या घालतच होता. इतक्यात आकाशात एक गरुड आपल्या पंज्यात हरणाचे नवजात पिल्लू घेऊन जाताना दिसला. (मूळ उल्लेख " ईगल विथ अ फॉन इन इट्स टॅलॉन्स" असा उल्लेख आहे. नेटवर पाहिले असता फॉन म्हंजे नवजात हरिणशावक, साईझ एखाद्या छोट्या मांजराएवढा असे दिसले. त्यामुळे गरुडाने त्याला उचलणे तत्वतः शक्य आहे) तो शुभशकुन मानण्याची ग्रीक प्रथा असल्याने ग्रीकांना स्फुरण चढले. इथेही सर्वप्रथम डायोमीडने आगेलाउस नामक ट्रोजनाला भाला खुपसून मारले. पाठोपाठ खुद्द अ‍ॅगॅमेम्नॉन, मेनेलॉस, थोरला अन धाकटा अजॅक्स, इडोमेनिअस, युरिप्लस आणि थोरल्या अजॅक्सचा सावत्र भाऊ धनुर्धारी ट्यूसर हे वीर पुढे आले. ट्यूसरची युक्ती भारी होती. आपल्यावर बाण कोसळू लागले, की थोरल्या अजॅक्सच्या भल्यामोठ्या ढालीआड तो लपायचा. त्याने एका दमात ऑर्सिलोखस, ऑर्मेनस, ऑफेलेस्तेस, दाएतॉर, क्रोमियस, लायकोफाँटेस, आमोपाओन, मेलॅनिप्पस या ट्रोजन वीरांना वीरगती मिळवून दिली. त्याचा फॉर्म बघून अ‍ॅगॅमेम्नॉनने त्याची पाठ थोपटली. त्याने नंतर एक बाण सरळ हेक्टरवर
सोडला, पण तो त्याला न लागता प्रिआमचा अजून एक पुत्र गॉर्गिथिऑन याला लागून तो जागीच मरण पावला. यावर ट्यूसरने अजून एक बाण हेक्टरवर सोडला. तोही त्याला न लागता त्याचा सारथी आर्किटॉलेमस याला लागून तो मरण पावला.

आता मात्र हेक्टरचे पित्त खवळले. तो रथातून उतरला, आणि हातात एक भलाथोरला धोंडा घेऊन ट्यूसरच्या दिशेने धावला. ट्यूसर नवीन बाण प्रत्यंचेवर चढवणार इतक्यात हेक्टरने त्याच्या खांद्याच्या हाडावर तो धोंडा जोरात आदळून ते हाडच मोडले. ट्यूसर कोसळला. आपला भाऊ वेदनेने तळमळत असलेला पाहून थोरला अजॅक्स तिथे धावून आला. मेखिस्तेउस आणि अलास्तॉर या त्याच्या सेवकांनी ट्यूसरला तशाच अवस्थेत जहाजांपाशी नेले. हेक्टरने यावेळी बर्‍याच ग्रीकांना यमसदनी धाडले. पार जहाजांपर्यंत मागे हाकलले. नंतर हेक्टरने एक सभा बोलावली आणि ग्रीकांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. ग्रीक कुत्र्यांना आपण माघारी हाकललेच पाहिजे, ते पळून जायचा प्रयत्न करतील तरी तेव्हा त्यांना भाले-बाणांच्या जखमा उरीशिरी वागवतच परत जायला लागले पाहिजे, वगैरे वीरश्रीयुक्त भाषण करून सभा बरखास्त झाली आणि रात्र पडली. ग्रीकांवर लक्ष ठेवणारे कितीक ट्रोजन्स अंधारात आपल्या घोड्यांसह आगींच्या उजेडात बसले होते. दुसर्‍या दिवशी काय होते याची वाट पहात.

अ‍ॅगॅमेम्नॉनची हतबलता आणि अकीलिसची समजूत काढण्याचा अयशस्वी प्रयत्न

हेक्टरच्या शौर्याने स्तिमित झालेल्या अ‍ॅगॅमेम्नॉनने एक सभा बोलावली. त्याला सभेत बोलताना रडू कोसळले होते. "झ्यूसदेवाने आपल्यावर मोठी अवकृपा केली, आपण उद्या गप निघून आपापल्या घरी परत जाऊ, ट्रॉय घेणे आपल्याच्याने काही होईल असे वाटत नाही" वगैरे ऐकून सगळ्यांना कळायचं बंद झालं. सगळे तसेच दु:खी होऊन बसले, पण तरणाबांड यवनवीर डायोमीड मात्र रागाने ताडकन उठून उभा राहिला. "तुला काय वाटलं आम्ही सगळ्यांनी बांगड्या भरल्यात का? पहिल्यांदा मला भित्रा म्हणाला होतास तू, आणि आज तू असा भित्र्यागत पळून चाललास? लाज वाटते का? तू गेलास तरी बेहत्तर, बाकीचे गेले तरी बेहत्तर, पण स्थेनेलस आणि मी ट्रॉय घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण आर्गोसहून आम्ही आलो तेव्हा देवांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते."

हे ऐकून यवनभीष्म नेस्टॉरने तरुण असूनही दाखवलेल्या मॅच्युरिटीबद्दल डायोमीडची प्रशंसा केली आणि अकीलिसची माफी मागून, त्याला भेटवस्तू वगैरे देऊन परत लढण्यास राजी करण्याबद्दल सांगितले. तेव्हा अ‍ॅगॅमेम्नॉनने अकीलिसला भरपाई देण्याचे कबूल केले- इतक्या भरघोस भेटवस्तू नुसत्या ऐकूनच पागल व्हायची पाळी. काय होत्या त्या भेटवस्तू आणि ओव्हरऑल ऑफर?

-अजून एकदाही आगीची धग न लागलेल्या ७ तिवया.
-दहा टॅलेंट भरून-जवळपास २५०-३०० किलो-सोने.
-वीस लोखंडी कढया/काहिली.
-रेस जिंकून बक्षिसे मिळवलेले बारा घोडे.
-लेस्बॉस बेटावरचे अतिकुशल कामगार.
-अकीलिसपासून हिरावून घेतलेली ब्रिसीस ही मुलगी त्याला परत देण्यात येईल. (बादवे अ‍ॅगॅमेम्नॉनने तिला हातही लावला नव्हता)
-ट्रॉयहून परतताना जी लूट मिळेल तिचा मोठा हिस्सा अकीलिसला दिला जाईल.
-हेलेनखालोखाल हॉट अशा वीस ट्रोजन बायका त्याला दिल्या जातील.
-अ‍ॅगॅमेम्नॉनला क्रिसोथेमिस्,लाओदिस,इफिआनास्सा या तीन मुली होत्या (इफिजेनिया नामक मुलीला आधी ठार मारले गेले ती सोडून) आणि ओरेस्टेस हा मुलगा होता. तीन मुलींपैकी आवडेल तिच्याशी अकीलिसचे लग्न लावले जाईल.
-कार्डामिल, एनोपे, हिरे,फेराए, आंथिआ,आएपेआ आणि पेडॅसस ही सात शहरे आणि त्यांची सर्व संपत्ती अकीलिसच्या नावे केली जाईल.

म्हंजेच इफिजेनिया. ट्रॉयला जाण्याअगोदर तिचा बळी दिला गेला असा उल्लेख उत्तरकालीन साधनांत लै आढळतो, पण स्वतः होमर त्याचा उल्लेख करतच नै. अंमळ विचित्रच प्रकर्ण आहे हे.

ही ऑफर ऐकून नेस्टॉर खूष झाला. त्याला खात्री होती की आता अकीलिस पाघळेल आणि नक्की युद्धाला जॉइन होईल. त्याने थोरला अजॅक्स, ओडीसिअस यांना अकीलिसचा एक सबॉर्डिनेट फीनिक्स याबरोबर अकीलिसकडे पाठवले. ते त्याच्या तंबूत पोहिचले. तिथे अकीलिस आणि पॅट्रोक्लस दोघे आरामात वाईन पीत बसले होते. अकीलिस लायर वाजवत होता. त्यांना पाहताच अकीलिसने त्यांचे स्वागत केले, "वाईन टाक पावन्यास्नी" अशी आज्ञा केली. ओडीसिअसने अ‍ॅगॅमेम्नॉनची ऑफर अकीलिसला सांगितली. पण अकीलिसचा राग काही जायला तयार नव्हता.

"सतत नऊ वर्षे एकसारखे लढून ग्रीकांच्या ताब्यात मी १२ शहरे अन ११ बेटे आणली त्याची कुणाला पर्वा नाही. मी लढाईत असेपर्यंत हेक्टरची जहाजांपर्यंत यायची छाती झाली नाही. हाती आलेल्या लुटीचा थोडासा हिस्सा इतरांना देऊन मुख्य वाटा स्वतःसाठीच ठेवणारा तो हावरट अ‍ॅगॅमेम्नॉन-इतर कुणालाही सोडून फक्त माझ्याकडूनच त्याने ब्रिसीसला काढून घेतले-मला ती आवडायची, तरीसुद्धा! स्वत:च्या बायकोसाठीच तर हे युद्ध चाललंय ना? अख्ख्या जगात मेनेलॉस सोडून कुणाच्या बायका कधी हरवल्या नाहीत काय? तरीही हे बायकांसाठी युद्ध करतात, आणि वर तोंड करून मलाच म्हणतात की कशाला ब्रिसीससारख्या क्षुल्लक पोरीवरून कशाला उगीच भांडतोस म्हणून. मरा लेको. उद्याच्या उद्या मी तरी निघालो माझ्या घरी. पेलिअस (अकीलिसचा बाप) माझ्यासाठी चांगली ग्रीक बायको बघून ठेवेल, मला चिंता नाही त्याची. तो कुत्रा अ‍ॅगॅमेम्नॉन मला आत्ता जितके देऊ पाहतोय त्याच्या वीसपट जरी दिले तरी मला नकोय. इजिप्तमधील थीब्स सारखे अख्ख्या दुनियेत श्रीमंत असलेले शहर देऊ केले तरी नकोच. त्यामुळे माझा राग निवळेस्तोवर मी काही लढणार नाही. आपली जान प्यारी असेल तर दुसरा काही प्लॅन करा जावा."

हे निर्वाणीचे उत्तर ऐकून अजॅक्सने नापसंती दर्शवली आणि अकीलिसला पुनर्विचार करण्याची विनंती केली. अकीलिस म्हणाला, की अजॅक्सचे म्हण्णे तसे खरे आहे, पण भर सभेत सर्वांदेखत अ‍ॅगॅमेम्नॉनने जो अपमान केला तो आठवल्यावर आजही पित्त खवळते-इलाज नाही. मग गप वाईन पिऊन थोरला अजॅक्स आणि ओडीसिअस गेले अ‍ॅगॅमेम्नॉनकडे. अकीलिसचा जबाब ऐकून डायोमीड म्हणाला, की अकीलिस फार गर्विष्ठ आहे. त्याला वाटेल तेव्हा तो लढूदे. तोपर्यंत आपण आपले काम करू. तूर्त रात्रीची विश्रांती घेऊ आणि उद्या नीट लढण्याच्या बेताची आखणी करू. याला सर्वांनी संमती दिली आणि सर्वजण झोपून गेले.

डायोमीड आणि ओडीसिअसने अंधारात उडविलेली कत्तल.

अकीलिसने लढायला नकार दिल्यावर अ‍ॅगॅमेम्नॉनची झोप हराम झाली होती. तो अंथरुणातून उठला, फ्रस्ट्रेशनमुळे त्याने आपल्या डोक्यावरचे काही केसच उपटून काढले आणि जोरात ओरडू लागला. त्याला कळायचे बंद झाले होते. शेवटी तो तयार झाला, मेनेलॉस, नेस्टॉर, डायोमीड, ओडीसिअस, इ. चीफ लोकांना घेऊन मसलत सुरू केली.

मगाशी सांगितल्याप्रमाणे हेक्टरने ग्रीकांवर नजर ठेवण्यासाठी ट्रोजन सैनिकांना नियुक्त केले होते. त्यांनी पेटवलेल्या शेकडो शेकोट्या अंधारात दिसत होत्या. ट्रोजनांचा नक्की बेत काय आहे-ते इथेच थांबणार की शहरात परत जाणार की लगेच हल्ला करणार हे कळावे यासाठी एकदोघा दबंग ग्रीकांनी त्यांच्यापर्यंत जावे असा प्रस्ताव नेस्टॉरने मांडला. पण हे पडलं जोखमीचं काम. कोण करणार? अपेक्षेप्रमाणे डायोमीड पुढे आलाच. पण त्याने अजून एकाची मागणी केली. कित्येकांनी त्याबरोबर जायची तयारी दर्शवली. शेवटी अ‍ॅगॅमेम्नॉनचे मत पडले की डायोमीडनेच बेस्ट साथीदार निवडावा. शेवटी त्याने ओडीसिअसची निवड केली. दोघांनी मिनर्व्हा देवीची प्रार्थना केली, इतरांनी दिलेली शस्त्रे घेतली आणि ते ट्रोजनांच्या दिशेने निघाले.

इकडे हेक्टरचीही खलबते सुरू होती. ग्रीकांच्या जहाजांवरची देखरेख अजूनही पूर्वीसारखीच टाईट आहे की आता ढिली पडलीय हे जाणण्यासाठी ग्रीक छावणीपर्यंत जो कोणी जाईल त्याला मोठे बक्षीस हेक्टरने जाहीर केले- ग्रीक छावणीतला सर्वोत्तम रथ आणि सर्वांत चपळ घोडे. हे ऐकून डोलोन नामक एक ट्रोजन पुढे आला. तो चांगला चपळ रनर होता. त्याने हेक्टरकडे चक्क अकीलिसच्या रथ-घोड्यांची मागणी केली. हेक्टरही राजी झाला. पोकळ आश्वासने द्यायची पद्धत लैच पुरानी असल्याचे अजून एक उदाहरण मग धनुष्य-बाण-चिलखतादि घेऊन डोलोन निघाला. तो काही अंतर गेल्यावर त्याची चाहूल डायोमीड आणि ओडीसिअसला लागली. ते इतस्ततः पडलेल्या प्रेतांत लपून बसले. डोलोन जरा पुढे गेल्यावर ते दोघेही त्याच्या मागे धावू लागले. पहिल्यांदा डोलोनला वाटले की ट्रोजनांपैकीच कुणी असतील म्हणून. त्यामुळे त्याने आपला वेग कमी केला. पण जवळ आल्यावर कळाले की दोघे शत्रू आहेत ते. मग तो खच्चून पळू लागला, पण उपयोग झाला नाही. त्यांनी त्याला पकडले आणि ट्रोजन तळाची माहिती द्यायची आज्ञा केली.

डोलोनने सांगितल्यानुसार शेकोट्या पेटवलेले सगळे शुद्ध ट्रोजन्स होते. साथीदार नव्हते कारण साथीदारांनी ती जबाबदारी ट्रोजनांवर टाकली होती. साथीदार दूरवर झोपा काढत होते. कॅरियन्स, पेऑनियन धनुर्धारी, लेलेग्स,कॉकोनियन्स आणि पेलास्गी यांच्या छावण्या समुद्राजवळ दूरवर होत्या. नंतर थ्रेशियन लोकांची छावणीही जवळच होती. पण हेक्टरबद्दल त्याने काही सांगितले नाही. हे सगळे कळाल्यावर तरी त्याला सोडतील अशी बिचार्‍या डोलोनची आशा होती, पण डायोमीडने त्याला सरळच सांगितले की आत्ता जिवंत सोडल्यास नंतर परत कधीतरी तो गुप्तहेर म्हणून येईल, त्यापेक्षा आत्ताच मारल्यास नंतर डोक्याला ताप होणार नाही. मग त्याने डोलोनच्या मानेत तलवार खुपसून त्याला ठार मारले. त्याचे सामान झाडावर टांगून ठेवले- देवी मिनर्व्हाला अर्पण केले. आणि थ्रेशियन सैनिकांच्या तळाकडे निघाले. थकून विश्रांती घेणार्‍या बारा सैनिकांना डायोमीडने ठार मारले. त्यांची शरीरे ओडीसिअस ओढून रस्त्याकडेला टाकत होता-घोड्यांनी त्यावर पाय टाकून बिथरू नये म्हणून. इकडे डायोमीडच्या मनात अजून काही सैनिकांना मारावे किंवा थ्रेशियन राजाचे चिलखत चोरावे याबद्दल संभ्रम होता ;) थ्रेशियन राजाच्या रथाचे घोडे रथापासून अलग करून त्यावर बसून अखेरीस दोघे परत निघाले. परत आल्यावर सर्वांनी त्यांचे स्वागत केले.

इथे १० वे बुक संपते. हे विस्तृतपणे देण्याचे कारण म्हंजे अकीलिस सोडून बाकीच्या वीरांबद्दल होमरने काय लिहिले आहे, ते कळावे.

आत्तापर्यंतचे हायलाईट्सः

१. विविध ग्रीक अन ट्रोजन योद्ध्यांचा महापराक्रम

२. अकीलिसचा राग अजूनही गेलेला नाही.

३. हेक्टर-अजॅक्स फाईटमध्ये थोरला अजॅक्स मेला नव्हता.

मुख्य म्हंजे इतक्या लढाया होऊनही पारडे निर्णायकपणे कुणा एका बाजूस सरकत नव्हते. पण लवकरच काही मोठ्या घडामोडी घडणार होत्या....

(क्रमशः)

लेखनविषय: दुवे:

Comments

मजा येते आहे

समकालीन भाषेमुळे वाचताना मजा येते आहे. महाभारत जर अशा भाषेत लिहिले गेले तर किती धमाल होईल ह्या विचाराने अंमळ मौज वाटते आहे. महाभारतातही अनेक काड्यासारू, किडेकरू लोक आहेत. अनेकांचे पोपट झालेले आहेत किंवा केले गेले आहेत.'तवा कुटं व्हतास रं तू?' किंवा 'आता का तुजी बोलती बंद झाली?' किंवा 'आरं नामर्दा, तू बांगड्या भरल्यास म्हून आमीबी भराव्यात आसं समजतूस की काय्?' 'आमी लडू तर मर्दाशीच लडू' 'आरारारा, असा ढेपाळू नगस गड्या' अशी वाक्ये पेरता येण्याजोग्या सिच्वेसन महाभारतात कितीतरी सापडतील. "क्लैब्यं मा स्म गमः पार्थ" चे समकालीन भाषांतर किती तर्‍हांनी करता येईल आणि त्यात किती फुल्या योजता येतील ते मोजण्याचा चाळाच लागला आहे.
एकंदरीत खूपच इंटरेस्टिंग. लगे रहो, बने रहो, जमे रहो वगैरे काय म्हणतात ते.

धन्यवाद

बहुत धन्यवाद राहीजी :)

बाकी महाभारताबद्दल पूर्ण सहमत-तसे करायला खूप वाव आहे.. नाही म्हणायला गीतेबद्दल एक असा प्रयत्न केलेला इथे दिसेल- चालचलाऊ गीता या नावाने ;)

http://www.misalpav.com/node/6610

पुढचा भाग टाकेनच लौकर, धन्यवाद :)

होय

होय, खूप मजेशीर आहे ते प्रकरण. आधी वाचले होते आणि आता पुन्हा वाचताना देखील मजा आली. धन्यवाद दुव्याबद्दल, साठवला नव्हता, आता साठवून ठेवता येईल.

मस्तच...

हाही भाग मस्तच.
राहीतैंशी सहमत. त्यांचा प्रतिसदही भन्नाट.

 
^ वर