महामार्ग पोलिसाचा आगळा अनुभव

दिनांक १०.०१.२०१३ रोजी मी पुण्याहून अहमदनगर, औरंगाबाद, वेरूळ मार्गे धुळे येथे येत होतो. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कन्नड घाट ओलांडून पुढे आल्यावर पोलिसांच्या तपासणी पथकाने माझे वाहन (मारूती ओम्नी एम एच १४ बीएक्स ६२८७) थांबविले. माझा वाहन चालविण्याचा परवाना मूळ स्वरुपात आणि वाहनाच्या दस्तऐवजांच्या प्रती छायांकित स्वरुपात तपासल्यावर तपासणी पोलिसाने मला वाहनाची नोंदणी कागदपत्रे मूळ स्वरूपात नसल्याबद्दल दंड भरावा लागेल असे सूचित केले. त्यावर मी खासगी वाहनाची नोंदणी कागदपत्रे मूळ स्वरूपात बाळगण्याची गरज नसून छायांकित प्रती चालतात हे त्यास सांगितले. तसेच यापूर्वी मला याच कारणाकरिता दंड आकारण्याची चूक करणार्‍या पुण्याच्या सी. एन. पवार या पोलिस उपनिरीक्षकाची मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून वाहतूक पोलिसांच्या उपायुक्तांनी चौकशी केल्याचे निदर्शनास आणून दिले. लोकसत्ता वृत्तपत्रातील संबंधित बातमीचे कात्रणही मी त्यास वाचावयास दिले. ते वाचल्यावर या कारणाने दंड आकारणे शक्य नसल्याचे त्याच्या ध्यानात आले. मग त्याने दंड आकारण्याकरिता नवाच मुद्दा शोधला; तो म्हणजे मी वाहन चालवित असताना आसन सुरक्षा पट्टा न लावल्याचा. त्यावर मी त्यास काही समजावू लागलो असता त्याने मला त्याचे वरिष्ठांना भेटण्याचा सल्ला दिला.

महामार्गाच्या बाजूस थांबलेले पोलिस अधिकारी श्री. अंबादास सरोदे यांना मी भेटलो. आसन सुरक्षा पट्टा मी का लावू शकलो नाही याबद्दल मी त्यांना माझ्या परीने स्पष्टीकरण दिले. ते ऐकून त्यांनी मला दंड न आकारताच सोडण्याची तयारी दर्शविली. परंतू त्यांचा गैरसमज झाल्याचे माझ्या ध्यानी आल्याने मी पुन्हा त्यांच्याशी चर्चा करून माझा मुद्दा स्पष्ट केला. श्री. सरोदे यांस असे वाटले की मला मानेच्या मणक्यांचा काही आजार आहे व त्यामुळे मी आसनपट्टा लावण्यास असमर्थ आहे. तर मला असे सांगावयाचे होते की, सपाट रस्ता सोडून माझे वाहन इतरत्र धावू लागले की आसन पट्टा आपोआपच घट्ट होतो व त्यामुळे माझे खांदे, मान इत्यादी आसन पट्ट्याच्या संपर्कात येणार्‍या अवयवांना अस्वस्थता वाटू लागते. घाटात रस्त्याच्या विशिष्ट रचनेमुळे डावीकडील व उजवीकडील चाके वेगवेगळ्या क्षैतिजीय पातळीवर येतात. असे झाले म्हणजे माझ्या वाहनाचा आसनपट्टा अधिकच घट्ट होतो. घाटात वाहन चालविताना डावी उजवीकडे तसेच (डोंगरावरून दरड कोसळत नाहीये याची खात्री करून घेण्याकरिता) वर देखील पाहावे लागते. आसन पट्टा घट्ट झाल्यामुळे या कामी अडथळा येतो. मान अवघडल्यामुळे काही काळाकरिता आसनपट्टा सोडला तर पुन्हा वाहनाची दोन्ही चाके समपातळीत येईस्तोवर तो लावता येत नाही. त्यामुळेच मी घाटात एकदा सोडलेला आसन पट्टा पुन्हा वाहन सपाट रस्त्यावर येईपर्यंत लावू शकत नसल्याचे श्री. सरोदे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर श्री. सरोदे यांनी मला हा वाहनाचा दोष असल्याचे व त्यास शक्य तितक्या त्वरेने दुरूस्त करून घेण्याचे सूचविले.

वास्तविक मलादेखील ही अडचण जाणविली होतीच. त्याविषयी मी वेळोवेळी माय कार या चिंचवड स्थित मारूती सुझुकीच्या अधिकृत विक्रेत्यास व विक्रीपश्चात सेवाकेंद्रास कळविले होते. परंतु त्यांनी मी सांगत असलेली बाब हा दोष नसून वाहनात दिलेले एक अधिकचे सुरक्षा वैशिष्ट्य (Safety Feature) असल्याचा निर्वाळा मला प्रत्युत्तरादाखल दिला असल्याने मी याबाबतीत काही करू शकलो नव्हतो. ही सर्व हकीगत मी श्री. सरोदे यांस कथन केली. त्यावर त्यांनी वाहनात असे कुठलेही सुरक्षा वैशिष्ट्य नसून हा माझ्या वाहनातील दोषच असल्याचे ठामपणे सांगितले. इतकेच नव्हे तर मारूती सुझूकी अथवा त्यांच्या विक्री पश्चात सेवा केंद्रांकडून हा दोष नसून सुरक्षा वैशिष्ट्य असल्याचे मी लेखी स्वरूपात प्राप्त करून घ्यावे असेही त्यांनी मला सूचविले. तसेच या बाबत मला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देत स्वत:चा खासगी भ्रमणध्वनी क्रमांक (८३९०१४७०००) देखील दिला.

श्री. सरोदे यांच्या सल्ल्यानुसार मी धुळे येथे पोचल्यावर सेवा ऑटोमोटिव्ज या अधिकृत विक्री पश्चात सेवा केंद्रात वाहनात असलेला सदर दोष दाखविला. याही ठिकाणी अधिकार्‍यांनी हा दोष नसून सुरक्षा वैशिष्ट्य असल्याचा राग आळविला. तेव्हा मी लगेचच श्री. सरोदे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व अधिकार्‍यांना त्यांच्या सोबत चर्चा करण्यास सांगितले. श्री. सरोदे यांनी हे सुरक्षा वैशिष्ट्य असेल तर ग्राहक पुस्तिकेत (owner’s manual) त्याचा उल्लेख का नाही? अशी विचारणा केली. तसेच याविषयी काही अधिकृत माहिती छापील स्वरूपात अथवा संकेतस्थळावर (internet website) उपलब्ध असल्यास त्याचा तपशील देण्यास फर्माविले.

त्यानंतर सेवा ऑटोमोटिव्जच्या अधिकार्‍यांनी सुरक्षा आसन पट्ट्यासंबंधातील सदर बाब ही सुरक्षा वैशिष्ट्य नसून दोष असल्याचे मान्य केले. तसेच कुठलाही अतिरिक्त मोबदला न आकारता अर्थात पूर्णपणे मोफत (Free Of Cost) आसन सुरक्षा पट्टा बदलून दिला. आता या नवीन सुरक्षा आसन पट्ट्यामुळे मला कुठलाही त्रास न होता अतिशय सोयीस्कर रीत्या विषम पातळीच्या रस्त्यावरही वाहन चालविता येते. जराही अवघडलेपण जाणवत नाही.

हे सर्व श्री. अंबादास सरोदे, महामार्ग पोलीस चाळीसगांव यांच्या सहकार्यामूळेच शक्य झाले. श्री. सरोदे यांचा मी अत्यंत आभारी आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

चिकाटी

आपण चिकाटीने केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे. बड्या कम्पन्या अशा एखाद्याच वाहनातील/उत्पादनातील दोषाकडे लक्ष द्यावयास तयार नसतात. घाऊक तक्रारी आल्या तरच त्या उत्पादन बदलून देणे वगैरे प्रकार करतात. श्री सरोदे यांचेही जाहीर कौतुक. एक नागरिक सुजाण नागरिकत्वाचे पालन करीत असता त्यास मदत करणे हे पोलिसांची सद्यवर्तणूक बघता खरेच कौतुकाचे आहे. पोलिसांची ही दुसरी बाजू प्रकाशात आणल्याकारणासाठी आभार.

ह्म्म्म्म्म

अनुभव म्हणून चांगला आहे. पण सीट बेल्ट न लावणे हा आपल्याकडे एक अभिमानाचा मुद्दा आहे असे मला दिसुन आले आहे. ह्या मला बुवा फार अस्वास्थ वाटते असे म्हणणारे अनेकजण भेटले आहेत. मुळात गाडीची रचना करताना, सीट तयार करताना आणि अपघात परिक्षण करताना सीटबेल्ट हा अत्यंत कळीचा मुद्दा मानला जातो. सीटबेल्ट हा खासकरुन अचानक झटका बसला असतात तुम्हाला सीट सोबत बांधून ठेवण्याकरिता असतो. जर ड्रायव्हर सीटवर असाल तर स्टेअरिंगने जास्त इजा होऊ शकते आणि त्यासाठी तर सीटबेल्ट लावणे जास्त गरजेचे आहे.
आपला मुद्दा कदाचित त्यावेळी रास्त असेल देखील पण एकुणच भारतीयांचा सुरक्षेप्रतीचा विचार, माणसाच्या जीवाची किंमत आणि या बाबतचे सर्वसामान्य लोकांचे अज्ञान या बद्दल न लिहिलेलेच बरे. अनेक ड्रायव्हर फक्त पकडले जाऊ नये अशा ठिकाणीच सीटबेल्ट लावताना पाहिले आहे.
व्यक्तिशः मला सीटबेल्ट न लावल्यास अत्यंत असुरक्षीत असल्याची भावना येते त्यामुळे मी न चुकता वापरतोच. अगदी मागे बसला असताना सुद्धा.
जाता जाता एक मुद्दा: असाच चाईल्टसीटचा सुद्धा एक मुद्दा आहे. त्या बाबत कितीजणांना ज्ञान आहे आणि सुरक्षेची किती माहिती आहे हा एक अभ्यासाचा विचार ठरेल.

-१

असहमत.

ओक्युपंट सेफ्टी फिचर्स भारतातल्या वहानांना देणं म्हणजे मोठ्ठा विनोद आहे. नुसत्या वाहनांमध्ये त्या सुविधा असून चालत नाहीत संपुर्ण वाहतुक यंत्रणा त्यासाठी कंपॅटीबल हवी. एक तर आपले सगळे स्टँडर्स कॉपी केलेले असतात. रिक्षांना सीट बेल्ट का नसतात? हमरस्त्यावर गतिरोधक बांधणार्‍या कंत्राटदारांना गाडीच्या कमितकमी चॅसिज क्लिअरंन्सची माहिती असते काय? असे अनेक प्रश्न पडतात. पण गुगळेंइतका संयम नसल्यामुळे मी गप्प बसतो. :)

सहमत

संपुर्ण वाहतुक यंत्रणा त्यासाठी कंपॅटीबल हवी.

पुर्णपणे सहमत. पण याचा अर्थ असा नाही की जे आहे ते सुद्धा आम्ही मानणार नाही. रिक्षांनी प्रवास असुरक्षीत आहेच पण त्याच सोबत डोक्याला ताप सुद्धा.

बाय द वे, भारतात अशा कोणत्या गोष्टी कंपॅटिबल आहेत? एक राजकारण आणि भ्रष्टाचार सोडून? देशाची घटनाच कॉपी पेस्ट असताना बाकीच्या स्टँडर्डसची काय गोष्ट?

देशाची घटनाच कॉपी पेस्ट असताना

देशाची घटनाच कॉपी पेस्ट असताना

ह्याचा अर्थ कळला नाही, समजवून सांगता येइल का?

हा हा...

देशाची घटनाच कॉपी पेस्ट असताना बाकीच्या स्टँडर्डसची काय गोष्ट?

सहमत.

-(जै भीमवाला) दादा

उत्तम निरीक्षण

तो नवीन झालेला माहितीचा कायदा पण असाच कॉपी पेस्ट आहे. त्यातल्या तरतुदी पण अश्याच कॉपी पेस्ट. गम्मत म्हणजे क्याग पण असलाच प्रकार. क्याग फक्त दोष दाखवू शकते पण कारवाई करू शकत नाही हे जसेच्या तसे इंग्रजांच्या नैशनल ऑडीत ऑफीस वरून घेतले आहे.

अर्रर्रर्रर्र

देशाची घटनाच कॉपी पेस्ट असताना बाकीच्या स्टँडर्डसची काय गोष्ट?

अर्रर्रर्रर्र!!
अभ्यास वाढवा इतकेच सांगावेसे वाटते

बर गुरुजी

बरं गुरुजी,
तुम्ही केला आहे का अभ्यास? असल्यास येथे माहितीपुर्ण लेखमाला लिहावी म्हणजे आमच्या अल्पज्ञानात भर पडेल.

उत्तम!

त्यानंतर सेवा ऑटोमोटिव्जच्या अधिकार्‍यांनी सुरक्षा आसन पट्ट्यासंबंधातील सदर बाब ही सुरक्षा वैशिष्ट्य नसून दोष असल्याचे मान्य केले. तसेच कुठलाही अतिरिक्त मोबदला न आकारता अर्थात पूर्णपणे मोफत (Free Of Cost) आसन सुरक्षा पट्टा बदलून दिला.

उत्तम. सरोदे यांचे सहकार्य कौतुकास्पद आहे. सीट्बेल्ट आपोआप घट्ट होत असेल तर तो मानेला किंवा खांद्याला काचण्याची शक्यता असते परंतु तेथे काहीतरी लहान उशी वगैरे ठेवून तुम्हाला तात्पुरती सोय करता आली असती का? सीटबेल्ट न लावता प्रवास करणे हे अस्वस्थ वाटण्याएवढेच धोक्याचे वाटते.

तुम्ही पाठपुरावा करून हा प्रश्न धसास लावला ते मात्र बरे झाले.

 
^ वर