ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण आणि संक्षिप्त कथा.

रोजन युद्ध भाग पहिला

ट्रॉयच्या मोहिमेला निघाल्यावर ८ वर्षे भरकटण्यात आणि त्यानंतरची ९ वर्षे इतर चकमकींत गेल्यावर मग लोक जागे झाले. तद्वतच पहिल्या आणि दुसर्‍या लेखात लै अंतर आहे, पण इथून पुढचे लेख जरा लौकर येतील हे नक्की. :)

इलियडच्या आधीची अतिसंक्षिप्त पूर्वपीठिका:

अखेरीस ८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ग्रीक आरमारी ताफा ट्रॉयला जाण्यासाठी सज्ज झाला. ट्रॉयला येऊन ९ वर्षेही उलटून गेली. मागील भागात सांगितल्याप्रमाणे तोपर्यंत हट्टी अ‍ॅगॅमेम्नॉनला शिव्या घालत आणि अकीलिस-ओडीसियस आदि वीरांच्या पराक्रमाने थक्क होत ग्रीक योद्धे निवांत मजा करत होते. कुठे एखादे बेट लुटावे, कधी बाया पळवून आणाव्या, रात्री बैल-मेंढे मारून निवांत खावे आणि झ्यूसदेवाला अर्पण करण्याच्या नावाखाली अँफोरेच्या अँफोरे भरून दारू ढोसावी, असा त्यांचा निवांत दिनक्रम चालला होता. तसे म्हटले तर निवांत पण बोअरिंगच होते सगळे जरा. अजून ट्रोजन लोकांबरोबर "फायनल काऊंटडाऊन" झाला नव्हता. नाही म्हटले तरी ट्रॉयच्या भुईकोटाची अन हेक्टर, सार्पेडन आदि योद्ध्यांची थोडी धास्ती होतीच ग्रीकांना. त्यातच परत ग्रीक छावणीत प्लेगची साथ पसरली. साहजिकच आहे म्हणा ते. इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र राहिल्यावर ते कधी ना कधी होणे हे ठरलेलेच होते.

[इकडे ट्रोजनांची स्थितीपण काय लै भारी नव्हती. अख्ख्या ग्रीसमधले अतिरथी-महारथी आपापली शस्त्रे परजत गोळा झालेले, त्यात परत ग्रीकांकडून ट्रोजनांच्या सप्लाय लाईन्स कट करायचे प्रयत्न नेहमीच सुरू असत. ११ बेटे अन १२ शहरे ग्रीकांच्या ताब्यात गेल्यामुळे त्यांची पोझिशन तशी नाजूकच होती. त्यांचे सहकारीदेखील कमी होते.एकुणात, उभयपक्षी वातावरण टेन्स होते.]

इलियडचे थोडक्यात बहिरंगपरीक्षणः

अंधकवी होमरकृत इलियड अन ओडिसी ही ग्रीकांची रामायण-महाभारतेच जणू. फरक इतकाच, की रामायण आणि महाभारतातील वर्ण्य विषय, व्यक्ती, इ. खूप वेगळ्या आहेत तर एकाच ट्रोजन युद्धाशी संबंधित ही दोन काव्ये आहेत- इलियडचा हीरो आहे अकीलिस तर ओडिसीचा हीरो आहे ओडीसियस. काव्याचे नाव इलियड असायचे कारण म्हंजे होमर ट्रॉयला इलिऑस/इलियम म्हणतो, इलियमसंबंधीचे काव्य ते इलियड. [ जसे रोमन कवी व्हर्जिलने रोम शहराच्या एनिअस नामक संस्थापकावर लिहिलेल्या काव्याचे नाव एनिअड आहे.] महाभारतात जसा पर्व-अध्याय-श्लोक असा फॉर्मॅट आहे, तसा इथे "बुक्स" चा फॉर्मॅट आहे. पूर्ण काव्य हे २४ "पुस्तकांत" विभागलेले आहे. आणि टोटल ओळी या १५,६९३ इतक्या आहेत. लै काही मोठे नाही इतके नक्कीच खरे. बाकी इलियड आणि ओडिसी या काव्यांच्या एकत्रित विस्ताराच्या ८ पट आपले महाभारत आहे असेही एके ठिकाणी वाचलेय. साधारणपणे इ.स.पू.८०० च्या सुमारास हे काव्य रचले गेले असे मानले जाते. या प्रश्नाची चर्चा नंतर विस्ताराने करूच.

जुन्या कुठल्याही काव्याप्रमाणे, पूर्ण इलियड हे छंदोबद्ध आहे. वृत्ताचे नाव आहे "डॅक्टिलीक हेक्सामीटर". म्हंजे काय ब्वॉ? आपल्या अक्षरगणवृत्तांत जसे गण असतात, उदा. य, म त, र, ज, न, स, आणि ल, ग(अनुक्रमे र्‍हस्व आणि दीर्घ साऊंड), तसे पाश्चिमात्य छंदःशास्त्रातदेखील गण आहेतच-ती कल्पना सगळीकडे असतेच. एक फरक असा, की आपल्याकडे अक्षरगणांची रचना फारच टाईट असते, जरा जरी क्रम बदलला तरी लग्गेच वृत्त वेगळे म्हटले जाते. तिकडे तसे नाही. एक स्ट्रक्चर दिले तरी विदिन सम लिमिट्स थोडे फेरफार चालतात. असो. हां तर "डॅक्टिलीक हेक्सामीटर" म्हणजे "डॅक्टिल" नामक गण सहा वेळा वापरलेले वृत्त (हेक्सामीटर). तर आता डॅक्टिल म्हणजे कोणता गण? मुळात डॅक्टिल किंवा दाक्तिलॉस या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे "बोट". खाली दिलेल्या चित्रावरून कल्पना स्पष्ट होईल.

हाताच्या बोटांत एक मोठे पेर आणि दोन लहान पेरे जशी असतात, तद्वतच या डॅक्टिल गणात सुरुवातीला एक गुरु अक्षर आणि नंतर दोन लघु अक्षरे येतात. म्हणजे हा तर झाला आपला भ गण!! -UU अशी त्याची रचना आहे. होमरच्या काव्याची साधारण रचना इलियडच्या पहिल्या ओळीचा वापर करून अशी दाखवता येईलः

μῆνιν ἄειδε, θεά, Πηληϊάδεω Ἀχιλῆος

या ओळीचे वृत्ताच्या सोयीसाठी भाग केले.

μῆνιν ἄ | ειδε, θε | ά, Πη | ληϊά | δεω Ἀχι | λῆος
मेऽनिन् आ | इऽदे थे | आ,ऽ पे | लेइआ | दे आखि | लीऽऑस्.
| -UU | -UU | -U | -UU | -UU | -U |
| भ | भ | लग | भ | भ | ल ग |

इथे लघुगुरू म्हंजे र्‍हस्वदीर्घाच्या आधारे नसून बोलताना कसे आघात होतात त्यावर आहे. पहिला, दुसरा, चौथा, अन पाचवा हेच गण डॅक्टिल ऊर्फ भगण आहेत. पण डॅक्टिलिक हेक्सामीटरची रचना ही साधारण अशीच असते खरी. प्रत्येक गण हाही ३ अक्षरांचाच असतो असे नाही. पण त्याबद्दल नंतर कधीतरी. हे वृत्त पाश्चिमात्य कवितेत लैच प्रतिष्ठेचे वगैरे मानले जाते. या वृत्ताला एक छान लय आहे, त्यामुळे मोठमोठी काव्ये, वर्णने वगैरे या वृत्तात झोकात करायला अन वाचायला मजा येते.

इलियडच्या बहिरंगपरीक्षणानंतर आता त्याच्या कथाभागाकडे वळू. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचे २४ भाग आहेत. त्याच्या सुरुवातीच्या काही ओळी खूप बोलक्या आहेत.

संदर्भः टफ्ट्स युनिव्हर्सिटीमधला पर्स्यूस प्रोजेक्ट.

μῆνιν ἄειδε θεὰ Πηληϊάδεω Ἀχιλῆος, मेऽनिन् आइदे थेआ पेलेइआदेऑ आखिलीऑस,
οὐλομένην, ἣ μυρί᾽ Ἀχαιοῖς ἄλγε᾽ ἔθηκε, ऊलॉमेनिन, ई मिरिऽ आखेईस आल्गे एऽथिके,
πολλὰς δ᾽ ἰφθίμους ψυχὰς Ἄϊδι προΐαψεν, पॉल्लास द इफ्थिमूस प्सिखास आइदि प्रिआफेन,
ἡρώων, αὐτοὺς δὲ ἑλώρια τεῦχε κύνεσσιν, ईरॉऑन, आव्तूस दे एलेऑरिआ तेव्खे कीनेस्सिन,
οἰωνοῖσί τε πᾶσι, Διὸς δ᾽ ἐτελείετο βουλή, ईऑनीसी ते पाऽसि, दिऑस द एऽतेलिएतॉ वुली.

ἐξ οὗ δὴ τὰ πρῶτα διαστήτην ἐρίσαντε, एक्स ऊ दी ता प्रॉऽता दिआस्तीतिन एऽरिसान्दे,
Ἀτρεΐδης τε ἄναξ ἀνδρῶν καὶ δῖος Ἀχιλλεύς. आत्रिदीस ते आनास आन्द्रॉन के दिऽऑस आखिलेउस,
τίς τ᾽ ἄρ σφωε θεῶν ἔριδι ξυνέηκε μάχεσθαι; तिस त आऽर स्फॉए थेऑन एऽरिदि क्सिनेऽइके माहेस्थे,
Λητοῦς καὶ Διὸς υἱός: ὃ γὰρ βασιλῆϊ χολωθεὶς लितूस के दिऑस निऑस, ऑ गार वासिऽलि हॉलॉथीस,
νοῦσον ἀνὰ στρατὸν ὄρσε κακήν, ὀλέκοντο δὲ λαοί, नूसॉन आना स्त्रातॉन ऑर्से काकीन, ऑलेकॉन्दॉ दे लाइ,

काही ओळखीचे वाटणारे शब्द खालीलप्रमाणे:

थेआ: देवी.
पेलेइअदेऑ आखिलीऑसः पेलिअसचा मुलगा अकिलीस.
आखेईसः ग्रीक लोकांना एखिअन्स, आर्गाईव्ह्ज, दनान्स, इ. संबोधने होमर वापरतो तसे.
आत्रिदीस= आत्रेव्स चा मुलगा, म्हणजेच अ‍ॅगॅमेम्नॉन.
मेऽनिन्=राग.
वासिऽलि= वासिलेउस म्हंजे राजा, इथे कुठलातरी विभक्तिप्रत्यय जोडला त्याला.
थेऑन्=देव.
दिऑस्=स्वर्गीय. द्यु=आकाश/स्वर्ग हा संस्कृतात अर्थ आहे त्याचप्रमाणे.

बास इतकेच, द रेस्ट इज ग्रीक टु मी =))

याचे साधारण इंग्लिश ट्रान्स्लेशन खालीलप्रमाणे

"Sing, O goddess, the anger of Achilles son of Peleus, that brought countless ills upon the Achaeans. Many a brave soul did it send hurrying down to Hades, and many a hero did it yield a prey to dogs and vultures, for so were the counsels of Jove fulfilled from the day on which the son of Atreus, king of men, and great Achilles, first fell out with one another."

संदर्भः एमआयटीचे क्लासिक्स आर्काईव्ह.

होमर हा देवीला आवाहन करतोय अकीलिसच्या रागाची कवने गाण्याचे. अ‍ॅगॅमेम्नॉनवर रागावून बसल्यामुळे अकीलिसने युद्धात भाग घेतला नाही. आणि अकीलिस नाही म्हणजे त्याची ती मुंग्यांसारखी खूंखार मॉर्मिदॉन सेनादेखील नाही. त्यामुळे हेक्टरादि ट्रोजन योद्ध्यांनी ग्रीक सेनेची चटणी-सांबार उडवणे यथास्थित सुरू केले. त्यातच कर्मधर्मसंयोगाने अकीलिसचा प्रिय मित्र पॅट्रोक्लीस हा हेक्टरकडून मेला. त्यामुळे चिडून अकीलिसने महायुद्ध सुरू केले आणि शेवटी हेक्टरला मारले. हेक्टर मरतो तिथे इलियडदेखील संपते. एकूणच , इलियड वाचताना जाणवत राहतो तो म्हणजे अकीलिसचा "नखरा". तुलनेने शौर्य इतके कुठे दिसून येत नाही.

ही झाली एकपरिच्छेदी इलियडकथा. आता या कथेतले विस्तृत पदर बघू.

यवनव्यास होमर आपल्या इलियडची सुरुवात करतो ती अकीलिस आणि अ‍ॅगॅमेम्नॉन यांमधील भांडणाने. ग्रीक सैन्यात प्लेग आलेला होता आणि टिपिकल मायसीनियन ग्रीक समजुतीप्रमाणे देवाला बळी अर्पण केल्याशिवाय त्याचे निवारण होणे अशक्य होते, कारण प्लेगचा प्रादुर्भावसुद्धा देवाच्या क्रोधामुळेच झाला होता. इथे देव आहे अपॉलो द फार डार्टर ऊर्फ भटक्या. ९०% ग्रीक देव हे झ्यूसची संततीच असतात तसाच हाही. हा तेव्हाचा धन्वंतरी म्हटला तरी चालेल. पण मग या धन्वंतरीसाहेबांना रागवायला काय झाले होते बरे असे?

तर ग्रीकांच्या लुटीत ट्रॉयजवळचे ईतिऑन नामक एक शहर लुटले गेले, बायाही पळवून आणल्या गेल्या. त्यात अपोलोचा भटजी "क्रिसेस" याची देखणी कन्याही यवनांनी पळवली.क्रिसेसभट्ट मग यवनराज अ‍ॅगॅमेम्नॉनकडे गेले, आपल्या पोरीच्या सुटकेसाठी खूप याचना केली. पण तो कुठला ऐकतोय? दिले हाकलून. मग त्याने अपॉलोची प्रार्थना केली. आपल्या भक्तावरचा हा प्रसंग ऐकून अपॉलो आपले धनुष्यबाण घेऊन ऑलिंपस पर्वत दरदर उतरून आला आणि सपासप ग्रीकांना मारू लागला-म्हणजेच प्लेग आला. दिवसभर लोकांच्या चिता जळत होत्या.

आता ग्रीकांचा धीर खचला. ताबडतोब सभा भरली. ग्रीकांचा मुख्य राजपुरोहित काल्खस याला कारण माहिती होते, पण सत्तेपुढे शहाणपण चालते थोडीच? त्यामुळे त्याने अकीलिसकडून अभय मागून घेतले. अकीलिसने "अगदी अ‍ॅगॅमेम्नॉन जरी तुझ्या जिवावर उठला तरी मी तुझ्या पाठीशी आहे" अशी ग्वाही दिल्यावर मग काल्खस सरळ मुद्द्यावर आला, आणि अ‍ॅगॅमेम्नॉनने क्रिसेसची मुलगी क्रिसीस हिला समारंभपूर्वक सोडून देऊन अपॉलोला बळी म्हणून बैल-बोकड अर्पण करावेत, असे तो बोलता झाला.

यावर सर्व ग्रीकांनी आपली संमती दर्शवली, पण अ‍ॅगॅमेम्नॉन मात्र खवळला. बाकीच्या राजांनी आपले जनानखाने बाळगावेत आणि सर्वांच्या बॉसने मात्र तस्सेच बसून राहावे हे त्याला बिल्कूल पसंत नव्हते. जर अपॉलो देव चिडला असेल तर क्रिसीसला परत देऊ, पण मला रिप्लेसमेंट पाहिजे, असा त्याने धोशा लावला. त्यावर अकीलिसने त्याला लै शिव्या घातल्या. सर्व ग्रीसमध्ये पॉवरफुल असलेल्या अ‍ॅगॅमेम्नॉनला अशा तोंडावर शिव्या घालणे लैच डेअरिंगचे काम. ते ऐकून अ‍ॅगॅमेम्नॉनही चिडला, आणि क्रिसीस नाही तर अकीलिसची "ब्रिसीस" नामक रखेलच सही, असे म्हणून तिला अकीलिसपासून हिरावून घेण्याची धमकी दिली, वर "चड्डीत रहा, तुझी पायरी ओळख," असा दमही दिला.

आता मात्र अकीलिसची सटकली. हावरट, भित्रा, ठरकी, इ. शिव्यांनी अ‍ॅगॅमेम्नॉनला सर्वांसमोर लाखोली वाहून त्याने शेवटी "युद्धातून आम्ही ढिस" ही निर्णायक धमकी दिली."ढीस तर ढीस", असे अ‍ॅगॅमेम्नॉन म्हणाला. यवनभीष्मच जणू असा वयोवृद्ध पायलॉसचा राजा नेस्टॉर शिष्टाई करू लागला होता, पण तीही फुकट गेली. अ‍ॅगॅमेम्नॉनचे दोघे रक्षक येऊन ब्रिसीसला घेऊन गेले आणि अकीलिस आपल्या २,५०० सेनेसह स्वस्थ बसला, पण रणवाद्यांची गर्जना ऐकून स्फुरण चढणे तर सुरूच होते. शेवटी आपली अप्सरा आई थेटिसला त्याने अ‍ॅगॅमेम्नॉनबद्दल सांगितले. आईनेही आपल्या पोरासाठी ऑलिंपसमध्ये झ्यूसकडे वशिला लावेन असे सांगितल्यावर तो जरा स्वस्थ झाला. झ्यूसनेही थेटिसचे ऐकून हेक्टरकडून ग्रीकांना चांगली अद्दल घडेल पण बायको हेरा न रागावेल, अशी तजवीज करायला सुरुवात केली.

अखेरीस ग्रीकांचा बेत ठरला. एक निर्णायक हल्ला होऊनच जाऊदे म्हणून. त्यातच अ‍ॅगॅमेम्नॉनला स्वप्न पडले आणि त्याचा विजय निश्चित होईल अशी आकाशवाणी त्यात झाली. मग त्याने एक मोठी सभा बोलावली, पण वेगळेच कैतरी बोलू लागला, "आपल्याला ट्रॉय घ्यायला जमणार नाही", वगैरे. बहुतेक लोकांचा रिस्पॉन्स पहायचा असावा. मग ग्रीक लोक परतीच्या मार्गावर जाऊ लागले तसे यवनकृष्ण ओडीसिअसने त्यांना गोष्टी युक्तीच्या चार सांगून परत फिरविले. थर्सितेससारखा एक किरकिरा शिपाईही त्याने गप्प बसविला आणि सर्वजण उत्साहाने युद्धावर निघाले. मागे सांगितल्याप्रमाणे कॅटॅलॉग ऑफ शिप्समध्ये कोणत्या योद्ध्याचे किती सैनिक, किती जहाजे ही सर्व आकडेवारी त्यात आलेली आहे. ट्रोजन वीरांमध्ये एनिअस, टेक्टॉन, ग्लॉकस, मेम्नॉन, सार्पेडन आणि हेक्तर हे मुख्य लोक होते. ग्रीकांच्या तयारीचा वास येताच ट्रोजनांनीही तयारी सुरू केली.

दुसर्‍या दिवशी, दोन्ही सैन्ये एकमेकांसमोर उभी ठाकली. होमरच्या म्हणण्यानुसार, जवळपास सगळे मिळून लाख-दीड लाखाचे तरी ग्रीक सैन्य असेल. ट्रोजन सेनेचा आकार तितका अचूक दिलेला नाही, पण यापेक्षा लै काही लहान असेल असेही वाटत नाही. सगळे एकत्र जमल्यावर हेक्टरने घोषणा केली, की उगा बाकीच्यांनी लढण्याऐवजी हेलेनच्या दोन दादल्यांनी आपसात काय ते भांडून भुस्काट पाडावे, त्यांच्या वैयक्तिक लढाईत जो विजेता होईल, त्यालाच हेलन मिळेल.

हेलेनचा नवरा मेनेलॉसला तेच तर पाहिजे होते. इकडे पॅरिसची मात्र वाईट तंतरली होती. मग हेक्टरने त्याला चार शिव्या घातल्या, मर्दानगीची आठवण करून दिली, आणि लढायला पाठवले. पण हा पॅरिस जरा लढाईत कच्चाच असावा, मेनेलॉसच्या तलवार-भाल्याचे वार चुकवता चुकवता त्याच्या नाकी नऊ आले आणि अखेरीस कुठूनतरी खोपचीतून तो सटकला. होमरबाबांनी इथेही व्हीनस देवीला मध्ये आणले आहे. व्हीनसची कृपा असल्यामुळेच पॅरिस सुटला, नैतर त्याचे काही खरे नव्हते.

इकडे हेक्टर-पॅरिसचा बाप, ट्रॉयचा राजा प्रिआम हा ट्रॉयच्या भुईकोटाच्या तटावरून युद्ध बघत होता. हेलेनसाठी चाललेले युद्ध बघण्यासाठी मुद्दाम त्याने तिला पाचारण केले. तिलापण कळूदे काय ते, अशी भावनाही असेल त्यामागे, कुणी सांगावे? इकडे हेलनची मनःस्थिती द्विधा झाली होती. कधी पॅरिस हवाहवासा वाटे, तर कधी मेनेलॉस.पॅरिस तिथून पळून आल्यावर हेलनने त्याला पळपुट्या वगैरे शिव्या घातल्या, पण ती इतकी भारी दिसत होती की पॅरिसला अनंगशराने विद्ध करायचे ते केलेच ;)

हा झाला इलियडमधील सुरुवातीचा काही भाग. पुढील कथाभाग येईल लवकरच :)

(क्रमशः)

लेखनविषय: दुवे:

Comments

आवडते आहे.

लेखमाला आवडते आहे. विशेषतः शैली मनोवेधक असल्याने तपशिलांचे भरताड (महाकाव्यात हे साहजिकच. अनेक पात्रे, अनेक नाती, अनेक घटना, भावभावना इ.) सुसह्यच नव्हे तर वाचनीयही झाले आहे. पुभाप्र.

बहुत

बहुत धन्यवाद :)

लेख आवडला

तुमच्या शैलीत मांडलेले महाकाव्य आवडले. खुपच पात्रं आहेत त्यामुळे मध्ये मध्ये कुणाचे कोण असा प्रश्न पडतो. पण तुमचे लिखाण एकदम मस्त.
पुढचे भागपण लवकर येऊ देत.

अवांतर – एकाच परिच्छेदात इलियड ची तुम्ही दिलेली संक्षिप्त कथा वाचून पु. ल. नी एका लेखात एका मास्तरांनी दोन वाक्यात शिवचरित्र सांगितलेल्याची आठवण झाली.

पुलेशु

लेख आवडला. पुढला भाग टाकायला एक वर्ष लावू नका.

धन्यवाद

बहुत धन्यवाद. पुढचा भाग लवकरच टाकेन :)

 
^ वर