भारतीय लोकाशाहीचे भविष्य - अध्यक्षीय, संसदीय की आणखी काही?
भारतीय लोकशाही हि जगातली सर्वात मोठी आणि महान लोकशाही आहे असे आपण वारंवार ऐकतो अथवा ऐकवतो. प्रत्यक्षात आज त्या लोकशाहीची अवस्था काय आहे हे प्रत्येक सुजाण नागरिक जाणतो. आपली सध्याची लोकशाही हि संसदीय पद्धतीची आहे जिथे लोकं त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात आणि मग ते प्रतिनिधी त्यांचा नेता निवडून देतात. तो नेता मग पंतप्रधान बनतो आणि आपले मंत्रिमंडळ बनवतो. हे झाले पुस्तकी ज्ञान. प्रत्यक्षात काय होते ते आपण पहातो. प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारण बिघडवत आहेत. पंतप्रधान कितीही चांगला माणूस असला मग तो कोणत्याही पक्षाचा असो तरीही त्याला सर्व पक्षांचे, स्वतःच्या पक्षाचे नखरे सांभाळत प्रशासन चालवायला योग्य संधी मिळतेच असे नाही.
आपल्याला अमेरिका आणि ब्रिटनची उदाहरणे दिली जातात. पण भारताची विविधता पाहता या पैकी कोणत्याही प्रकारची लोकशाही आपल्याला पुर्णपणे योग्य वाटत नाही. अर्थात हे माझे मत. भारताला दोन्हीमधले चांगले साधून आपल्या सध्याच्या पद्धतीमध्ये बदल करायला हवा असे वाटते.
- आपल्याला काय वाटते?
- सध्याची पद्धत आपल्याला पटते का?
- नसल्यास काय पटत नाही?
- काय सुधारता येईल?
- कसे सुधारता येईल?
- जर जे चालले आहे ते योग्य वाटत असल्यास ते आणखी चांगले करण्यासाठी काय करावे लागेल?
हे आपले मला पडलेले प्रश्न आहेत. तुम्हाला सुद्धा असु शकतात. त्या बद्दल आपण येते चर्चा करु.
-चाणक्य...
Comments
राष्ट्रपती थेट निवडून देणे
आपली विचारसरणी अशी आहे कि आपल्या सर्व समस्यांकरता आपण आधी राजकारण्यांना, व मग नोकरशाहीला दोष देतो. जनतेचा दोष कधीच नसतो. जो पर्यंत या गृहितकावर पुनर्विचार होत नाही तो पर्यंत कोणताही उपाय सापडणार नाही.
बंदुकीच्या बळावर बूथ ताब्यात घेउन जबरदस्तीने मते पाडून घेण्याचे प्रकार जिथे होतात तेथील जनता असे म्हणू शकते कि आम्हाला हा माणूस अजिबात नको होता, पण बंदुकीच्या धाका पुढे आमचा उपाय नव्हता. पण असे बंदुकीच्या बळावर निवडणूक जिंकल्याचे प्रकार पूर्णपणे संपले नसले तरी खूपच कमी झाले आहेत. आता जर संसदेत कोणी नालायक पोहोचला तर तो जनतेच्या इच्छे विरुद्ध बंदुकीच्या जोरावरच तिथे पोहोचला, असे म्हणता येत नाही. म्हणजे आता जे संसदेत आहेत त्या पैकी बहुतेकांना जनतेने स्वखुशीने निवडून दिले आहे असे म्हणावे लागेल.
जर नोटा व दारू घेउन जनतेने नालायक उमेदवाराला मते दिली तर दोष जनतेचाच आहे. त्याच प्रमाणे फालतू प्रलोभने (जसे प्रत्येकाला रंगीत टीव्ही) स्वीकारून मते दिली; लाडक्या सिने नटला / नटीला मते दिली; उमेदवाराची लायकी न बघता घराणेशाही राबवत त्याचे वडील आजोबा यांच्या कर्तुत्व कडे पाहून मते दिली, तर सर्वच जरी नाही तरी बराच दोष जनतेचा आहेच. राजकारणात घराणेशाही राबविण्या करता आपण राजकारण्यांना दोष देतो. पण कोणतेही कर्तुत्व सिद्ध न केलेल्या व्यक्तीला जनता का मत देते?
जर जनता मूर्खपणे मतदान करू लागली तर कोणताही उपाय शोधणे कठीण आहे. पण त्यातल्या त्यात, राष्ट्रपती थेट निवडून देण्याच्या पद्धतीत काही फायदे आहेत असे वाटते. केंद्रीय पातळीवर प्रादेशिक समीकरणे आपोआपच बाजूला होतील. एक हिंदीचा अपवाद वगळता प्रादेशिक सिनेनट, प्रादेशिक घराण्यांचे वारसदार, हे त्या त्या प्रदेशातच लोकप्रिय असतात. त्यांना इतर प्रदेशातून मते मिळण्याची शक्यता नाहीच. प्रत्येक पक्षाला त्यांचा सर्वोच्च पदाचा उमेदवार कोण हे आधी जाहीर करावे लागेल. निवडणुकी नंतरचा घोडे बाजाराचा प्रभाव संपेल. इत्यादी अनेक फायदे आहेत.
अर्थात याच्या विरुद्ध पण arguments आहेतच. समाज शास्त्र म्हणजे काही गणित नव्हे कि एक बरोबर उत्तर सापडावे. याच नव्हे तर इतर पण अनेक बाबतीत आपली सगळ्यात मोठी चूक असते ती ही, कि आपण पूर्णपणे समाधान कारक उपाय शोधत असतो. पण असा पूर्णपणे पूर्णपणे समाधान कारक उपाय तर नसतोच. तर जे अस्तित्वातच नाही ते शोधण्याच्या नादात आपण फक्त चर्चाच करत बसतो, करत काहीच नाही.
मुळ मुद्दा
जनता बरोबर आहे असे काही गृहित धरलेले नाही. पण सध्याची व्यवस्था फार काही उपयोगाची नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. मुळात निवडणूक जिंकण्याची कला काही राजकिय पक्षांकडे आहे. जनता या प्रकारात साक्षर होणार नाही याची योग्य काळजी घेतली जाते. हेच कुठे तरी संपायला हवे. फक्त निराशावाद चघळत बसलो तर हाती काहीच लागणार नाही. काय नको ते सांगताना काय हवे ते माहित हवे अथवा उलटे. त्यासाठीच हि चर्चा आहे.
सामान्य जनता जर कारण आहे तर ते कसे बदलता येईल?
ठीक चालले आहे.
मला सध्याची पद्धत पटते. सुधारणेस वाव जरूर आहे. पण भारतासारख्या आदिम (ट्रायबल) मनोवृत्तीच्या आणि आचारांच्या लोकसमूहांमध्ये आदर्श लोकशाहीची संकल्पना रुजवून ती आदर्शवत राबवणे हे सोपे काम तर नाहीच नाही शिवाय नजिकच्या भविष्यकाळात म्हणजे पुढच्या एक-दोन पिढ्यांत साध्य होण्यासारखेही नाही. लोकसमूहांचे वेगाने नागरीकरण होणे हे मला महत्त्वाचे वाटते. सिविल सोसायटी मध्ये लोकांना सर्व नागरी कायदे जुजबी तरी माहीत असतात. कायदेच नव्हे तर ते पाळण्याच्या जबाबदारीची जाणीव आणि नागरिक म्हणून आपली कर्तव्ये याचेही भान असते. लोक सर्वसाधारणपणे नीतिमान असतात. सरकार अथवा शासन या अदृश्य पुतळ्यावर अवलंबून नसतात. इ. इ.
आपल्याकडे खेडोपाडी विखुरलेल्या जनसमूहांवर स्थानिक दादांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव असतो. टोळ्या आणि त्यांचे प्रमुख (मुखिया) ही व्यवस्था अजूनही कायम आहे. हे टाळण्यासाठी संपूर्ण ग्रामव्यवस्थेची नवी रचना होणे गरजेचे आहे. हे फार काँप्लेक्स आहे. शेती,जाती,बलुती या सर्वांचे पाय एकमेकांत गुंतलेले आहेत. कित्येक वर्षांपूर्वी किल्लारी भूकंपानंतर नवीन खेडी वसवताना शरद पवारांनी सुचवले होते की या वेळी मिश्र वस्त्या उभारण्याची नामी संधी आहे ती आपण वापरावी. म्हणजे लोहार आळी ,तांबट आळी असे नको. नाही तरी आता लोहार-तांबट-कासारांचे पूर्वापार उद्योग खाली बसलेले आहेत तेव्हा वेगवेगळे गट करून रहाण्यात आर्थिक हेतू उरलेला नाही. अर्थात हा प्रस्ताव गावपातळीवर मान्य झाला नाही हे सांगायला नकोच.
मुख्य म्हणजे शेतीवरचे अवलंबित्व कमी झाले पाहिजे. वाड्यांपाड्यांवर वस्ती विखुरलेली रहाण्यापेक्षा पन्नास हजार ते एक लाख लोकवस्तीची छोटी छोटी शहरे वसली पाहिजेत, जिथे शाळा, कॉलेजिस, दवाखाने, एक मोठे हॉस्पिटल, बाजार, पाण्याचे नळ, विजेच्या तारा ,टेलिफोन, सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते, मनोरंजनाची साधने, पुलीस इ. गरजा/सुविधा पुरवणे शासनाला सोपे जाईल आणि लोकांमध्येही ह्या गरजांविषयी जागृती वाढेल किंवा ती वाढवणे सोपे होईल. संकुचित परिघात वावरणार्यांचे परीघ विस्तृत होतील. अभिसरण वाढेल. निवडणुकीत एकगठ्ठा अथवा आंधळ्या मतदानाची शक्यता कमी होईल.
अर्थात अनेकांपैकी हा एक विचार आणि उपाय आहे, एक धूसर आणि दूरवरची शक्यता.
पटला
प्रतिसाद पटला. समाजरचना बदलणे गरजेचे तर आहेच. त्यासाठी लोकशिक्षण आणि आपल्यातलाच बदल आपल्याला पुढे घेऊन जाउ शकतो याचे प्रात्यक्षिक गरजेचे आहे. सध्या सुद्धा काही शहरेच जास्त विस्तारत आहेत. नवी शहरे वसवणे सोपे नसले तरी भारतातली चांगली शहरे म्हटले तर हा आकडा फार पुढे जात नाहीच. अगदी शहरे वसवणे राहू देत. पण गावांची रचना जास्त चांगली, सुटसुटीत करणे शक्य आहे. सरकारने या प्रश्नाला अनेक पदर आहेत. जो मुद्दा मी विचारला आहे तो असाच आहे की लोकशाहीची रचना बदलायची असेल तर काय करायला हवे? नक्की काय करणे गरजेचे आहे. भारताची गरज वेगळी आहे हे आपण कधी मान्य करणार. एखादी गोष्ट अमेरिकेत, युरोपात अथवा चीनमध्ये यशस्वी झाली तर ती तशीच्या तशी भारतात कधीच होणार नाही. कारण एकच आहे की इथल्या लोकांची मानसिकता फार वेगळी आहे. येथे बदल घडवायचा तर एक हाती सत्ता अथवा स्पष्ट बहुमत गरजेचे आहे . सध्याच्या पद्धतीमध्ये स्पष्ट बहुमत कोणाला नजीकच्या भविष्यकाळात मिळेल असे वाटत नाही. उत्तर प्रदेशातल्या राजकिय पक्षांचा केंद्रिय राजकारणात वापर आणि त्यांची आगतिकता बरेच काही सांगून जाते. दोन पक्ष राज्यात एकमेकांचे कट्टर वैरी पण केंद्रात मात्र मित्रपक्ष हा खुप मोठा विरोधाभास आणि जनतेची चेष्टा आहे.
विरोधाभास नाही.
केंद्रीय प्रश्न आणि समस्या प्रादेशिक समस्यांहून वेगळ्या असू शकतात आणि तेव्हढ्यापुरते एकमत किंवा सहमती होऊ शकते,होते.(संरक्षण परराष्ट्रनीती इ.)
देशामध्ये राजकीय पक्ष अगदी मर्यादित संख्येत असावेत आणि प्रादेशिक पक्ष नसावेत हे म्हणणे सद्यस्थितीत व्यवहार्य नाही. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भा.रा.काँग्रेस हा एकच प्रबळ राजकीय पक्ष होता.बाकीचे (हिंदुमहासभा,फॉर्वर्ड ब्लॉक इ.) ताकदीने अगदीच किरकोळ होते. त्यानंतर सबळ प्रादेशिक पक्ष निर्माण झाले ती त्या त्या काळाची गरज होती म्हणून. स्वातंत्र्यानंतर अभिव्यक्तिस्वातंत्र्य आले, आत्मभान आले, आपली मुळे शोधण्याची (आणि ती समृद्ध आहेत हे सिद्ध करण्याची) अहमहमिका वाढली. यातून प्रांतीय अस्मिता बळकट होऊ लागल्या. या अस्मितांनी एकमेकांना छेद देणे क्रमप्राप्त होते. एकच केंद्रीय पक्ष या सर्वांना एकाच वेळी गोंजारू शकणार नाही हे उघड झाले तेव्हा त्याची जागा घेण्यासाठी त्या अवकाशात प्रादेशिक पक्ष जोमाने पुढे सरसावले. द्रवीड मुन्नेत्र कळ्हम्,तेलुगु देशम्,शिवसेना,अकाली दल यांचा उगम यातूनच झाला.
यातली लक्षात घेण्याजोगी बाब ही की भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक वैविध्यामुळे प्रत्येक प्रदेशाचे सोशल डाय्नॅमिक्स वेगळे आहे, गतिमानता वेगळी आहे. त्या सर्वांना एकाच गतीने धावण्याचा नियम केला किंवा एकाच नियमानुसार धावायला लावले तरी तो नियम पाळला जाणार नाही हे उघड आहे. राज्याराज्यांमध्ये समस्या किंवा तिची तीव्रता सारखी नाही. या परिस्थितीत प्रादेशिक पक्ष निर्माण होणे अटळ होते.
शिवाय केंद्रात सत्ता असलेल्या किंवा सत्ता नसली तरी राष्ट्रव्यापी असलेल्या पक्षाचे त्याच्या राज्यशाखेवर जरा अधिकच नियंत्रण रहाते. विशेषतः नेता निवडताना 'वरून लादला' जाण्याची भावना तीव्र होऊन हाय कमांड विरुद्ध बंडाची प्रवृत्ती वाढीस लागते आणि पुन्हा प्रादेशिकतेस खतपाणी मिळते. त्यामुळे प्रादेशिक पक्ष हे भारतापुरते सध्यातरी अटळ वास्तव आहे. जोपर्यंत एकजिनसीपणा येत नाही तोपर्यंत.
आणि हा एकजिनसीपणाचा हट्ट तरी का धरावा? समृद्ध विविधता असताना एकसुरी स्टँडर्डाय्झेशन च्या मागे का लागावे? सध्याची आपली लोकशाही पद्धती कधी उजवीकडे, कधी डावीकडे नागमोडी वळणे घेताना दिसली तरी या वेव्ह पॅटर्न ची दिशा एकच राहिली आहे हे महत्त्वाचे.
सकारात्मक
मी स्वतः अशा चर्चाविषयांबद्दल अधिकाधिक निराशावादी होत आहे.
तरीही सदर सकारात्मक, संयत प्रतिसाद प्रचंड आवडला हे सांगावेसे वाटते.
.
काहीच नीटसे समजत नसतानाही व्यवस्था सुधारणे वगैरे, किंवा सुधारण्याबद्दल गप्पा मारणे असे बरेच जण करत असतात. मीही त्यापैकीच एक. मात्र व्यवस्थेचे जे काय व्हायचे ते होउ देत, आपण आणि आपली माणसे शक्य तितकी व्यवस्थित ठेवणे आपल्या हातात काही प्रमाणात आहे ही हळूहळू जाणीव होते आहे.
जो तो आपापल्या परिने implicitly हे करितच असतो; पण त्याचा ,explicit,उघड स्वीकार करावा नि त्याबाबतीत फोकस्ड रहावे हे आता उचित वाटते आहे.
थोडक्यात, विनोबांच्या कथेनुसार उन्हाचे चटके बसत असल्यास, आख्खी पृथ्वी चामड्याने झाकायचा प्रयत्न का करा? आपल्या पायात चप्पल असली तरी पुरे.
असो. पण हे अवांतर होते आहे. चर्चाप्रस्तावावर काहीही म्हणणे नाही. पण प्रतिसाद आवडला.
शरद पवार ह्या व्यक्तीबद्दल कित्येकदा त्याचे काही quotes पाहून अचानक कौतुक, आदर वगैरे तेवढ्यापुरता वाटायला लागतो.
धन्यवाद मनराव.
प्रतिसाद मेगॅबाय्टी होताहेत खरे, पण लिहिल्याशिवाय रहावत नाही. विनोबा महान द्रष्टे योगी होते. चपखलपणे सार सांगावे ते त्यांनीच. असो. नैराश्याविषयी थोडेसे :
१)ते सर्व (परिवर्तन) घडणारच आहे. ते माझ्याच हयातीत घडावे, हा आग्रह नाही. .---- एस्.एम्.जोशी.
२)निराशावादी बनवामाटे घणा कारणो छे, पण आशावादी बनवामाटे एकज कारण पुरतुं होय, ते ए कि अंधकारथी दीवो बुझाव्यो होय एवुं कदाय थयुं नथी, थतुं नथी.---- गुजराती लेखक गुणवंतराय महेता.
३)इनर्शिआ (जडत्व?) वर मात करायला सुरुवातीला पुष्कळ शक्ति लागते. पण एकदा का चक्र हलले आणि फिरू लागले की त्याची गतिमानता कायम राखायला तेवढी शक्ती लागत नाही.--प्रथम अर्थातच न्यूटन आणि माझ्यापुरते नंतर माझे स्वातंत्र्यसैनिक वडील.
माफ करा, थोडेसे उपदेशात्मक झाले आहे खरे, पण अधूनमधून येणारे नैराश्य पळवून लावण्यासाठी मला ही वाक्ये उपयोगी पडतात. आपण चर्चाविषयांबाबत निराशावादी होत चालला आहात, प्रत्यक्षस्थितीविषयी नाही, याची खात्री आहे.
थोडे
थोडे अवांतर होत आहे. शिवाय ह्या विषयावर अगणित पाने ह्यापूर्वी अगणित वेळेस जालावर खर्ची पडली आहेतच. तरीही माझी त्यात काही भर....
मीमराठी ह्या सायटीवर http://www.mimarathi.net/node/8701#comment-95936 हा एक प्रतिसाद पहा.({फुकाचे पॉझिटिव्ह थिंकिंग} ह्या शीर्षकाचा).
सदर ज्येष्ठ प्रतिसादक जालावर काहीएक मॅच्युअर्ड, विचार करुन दिलेले नि अनुभवानं सिद्ध असलेले प्रतिसाद देताना दिसतात. त्यांनाही वैतागून असं का म्हणावसं वाटलं असावं? विशेषतः शेवटची ओळ किती भेदक आहे ते पहा.
.
.
आता ह्या चर्चा प्रस्तावातील पहिल्या तीन प्रश्नांबद्दल माझी आक्रस्ताळी मतं मी http://www.aisiakshare.com/node/1037 इथे एका वेगळ्या चर्चाप्रस्तावात मांडलित(त्यातही नंतर प्रकाशित झालेलेच अधिक स्पष्ट आहेसे दिसते.). त्यातला उद्वेग नि डोकावणारा आवेश सोडून दिला, तर जी मते ( खरे तर तक्रारी) उरतात ती माझी आहेत.
.
आता अशा तक्रारी केल्या तर लागलिच कुणीही "व्यवस्थेबद्द्ल इतकी तक्रार असेल तर व्यवस्थेत उतरा की. सुधारा की." असे सरळ सरळ आव्हान्/आमंत्रण देतो. म्हणजे ज्यांचे काम आहे, त्यांनी ते करावयाचे नाही, नि वरुन ज्यांचे ते नाही, त्यांना मात्र ते काम पूर्ण करण्यास भाग पाडायचे; क? तर ते receiving end ला आहेत म्हणून. हा तो टोन आहे. हे चूक आहे. उदाहरणार्थ एखाद्या शरीफ व इज्जतदार नागरिकाने जर "हल्ली अनागोंदी माजली आहे. चोरांचा सुळसुळाट झालाय. बेसुमार प्रकरणे होताहेत." अशी तक्रार केली; तर पोलिसांनीच मग्रुरीनं "आम्ही असेच आहोत. व्यवस्था अशीच आहे. तुम्हीच चोरांना शोधा, ताब्यात आणून द्या. पुरावे गोळा करा. त्यांचा पाठपुरावा करा." असा उपदेश करण्यासारखं आहे. "व्यवस्था परफेक्ट नसते, तिला परफेक्ट बनवावे लागते. तुम्हीही खारीचा वाटा उचला. काहीतरी अधिकचे काम व्यवस्थेसाठी करा" असा फुकाचा सल्ला सरळमार्गाने कामे व्हावीत, "जे जसे असायला हवे, ते तसेच असावे " अशी अपेक्षा करणार्यास भारतात दिली जातात. मुळात असे "अधिकचे" काम कुणी करण्याची गरजच नाही. अधिकारपदावर जे आहेत ना, त्यांनी त्यांची कामे नियमितपणे, अल्पांशाने जरी धड केली तरी अचाट फरक पडेल. इतर कुणी कितीही काहीही केले तरी स्वतःला दमवून घेणे आहे. "एवढी काळजी आहे देशाची/समाजाची तर करा की तुम्ही कामं" असं म्हणूनच ही अधिकार पदावरची माणसं म्मिडियात म्हणताना दिसतात, नि चुकीवर, गुन्ह्यांवर बोट ठेवणार्यांस गप्प बसवतात, त्यांच्या सारे समजत असूनही असहाय असणार्या परिस्थितीची जणू चेष्टा करतात. हा निर्लज्जपणा आहे, बेजबाबदारपणा, बेदरकार वृत्ती, निगरगट्टपणा,हलकटापणाचा कळस नि नीचपणाचे उदाहरण आहे. सामान्यांच्या हतबलतेचा undue advantage,गैरफायदा घेतला जात आहे.
नेकीनं काम करणार्याचा हात इथं दगडाखाली अडकलेला असल्यानं , ज्याला त्याला आपल्या जीवाची भीती असल्यानं हे सारं केले जाते.
.
वरती एसेम ह्यांचा आशावाद आवडला. पण त्यांचा पूर्ण आदर ठेवून म्हणू इच्छितो की ती नेहरु काळातली स्वप्नं म्हणजे "आपण प्रयत्न करु, पुढे जाउ, सारे जाउ. छान छान जाउ. मिळून मिसळून राहू" छापाची, स्वप्नाळू विधानंसारखी वाटतात. "एक ना एक दिवस हे सारे ठीक होइल तुम्ही प्रयत्न तर करा." असे म्हणणे म्हणजे सरळसरळ " फार धूळ उडते ना तुमच्या एरियात, रोज येउन जमेल तितकी ह्या मैदानवरची धूळ तोंडाने फू फू करीत फुंकून टाकीत जा हो बाळ. एक ना एक दिवस तुला नक्कीच यश येइल." किंवा "पुण्यातील मुळा-मुठा नद्या ह्या मोठी गटारे झालीत असे तुमचे(सुजाण नागरिकांचे) मत आहे ना, मग सर्वांनी आपल्या घरातील पाणी काटकसरीने वापरावे. अत्यल्प वापरावे, नि उरलेले स्वच्छ, निर्मळ पाणी मुळा-मुठा नद्यांत ओतावे म्हणजे एखाद दिवस स्वच्छ पाणी वाढत जाउन एखादे दिवस त्याच्यापुढे घाणेरडे पाणी अत्यल्प ठरेल, सहज पचून जाइल पर्यावरणात " असला वैचारिक डोस एखाद्या बालबुद्धी व्यक्तीस देण्यासारखा आहे. आयुष्यभर जरी तो धूळ फुंकीत बसला नि वाटी वाटी पाणी नद्यांत सोडत बसला तरी होणार आहे काय मैदान साफ?
.
तर पहिल्या तीन प्रश्नांबद्द्ल आतापर्यंत मी वरती लिहिलं. बाकीच्या प्रशांबद्दल (प्रश्न चार ते सहा) ह्याबद्दल काही:-
काही सकारात्मकः-
इतकी आदळ आपट करत असलो तरी Legislative Assistants to Members of Parliament (LAMP) ह्या प्रोग्राममध्ये मला जायचे होते हे खरे. पण वयाचा निकष थोडकयत हुकला नि संधी गेली. ह्यात काय होते?
LAMP मध्ये युवकाने सहभागी व्हायचे.विविध विधीमंडळे, संसद सदस्य हयंच्या core team मध्ये सहभागी व्हायचे, अभ्यास करुन विविध प्रश्नांवर, समस्यांवर आनी प्रोजेक्ट्सवर सहाय्य करायचे अशी ही कल्पना होती/आहे.(थोडक्यात आपल्याला संसदेत जे प्रभावी , अभ्यासू भाषण वगैरे करताना काही सदस्य दिसतात, त्यातील सर्वच तयारी त्यांनी एकट्यानी केलेली असते असे नव्हे. त्यांना तयर आयता मसूदा , रिपोर्ट , मुद्दे मिळालेले असतात, त्यास ते फक्त वकृत्वाचे आभूषण चधवतात इतकेच.) पक्षविरहित असे हे आहे. तुम्ही ह्यात निवडला गेलात नि तुमचा अभ्यस वगैरे नेतेमंडळीस्/अधिकारपदावरील व्यक्तीस पसंत पडला तर हा प्रोग्राम पूर्ण झाल्यावरही तुम्हाला अपॉइंट करतात. एकदा तुम्ही तिथे पोचलात, तर अगदि आमूलाग्र वगैरे नाही, पण मर्यादित प्रमाणत का असेना, तुम्ही चांगला प्रभाव पाडू शकता. अशी काही मंडळी आहेत. त्यांच्या ब्लॉगचा पत्तही सापडताच मी इथे देउ शकतो. तुमच्या माहितीत जे कुणी eligible युवक असतील त्यांना तुम्ही ही माहिती पोचवू शकता.
.
LAMP बद्दल अधिक माहिती :- http://lamp.prsindia.org/thefellowship व http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-04-03/news/31280722_1_p... मिळेल. युवक म्हणून आता जमणार नाही, पण पुन्हा कधी वेळ आली, तर सामान्यांचा प्रतिनिधी म्हणून मी जाउ इच्छितो.
--मनोबा
थोडे इकडेतिकडे
सरकारी कामकाजामध्ये सामान्य जनतेला जे अनुभव येतात तसेच अनुभव सामाजिक संस्था/संघटनांच्या कार्यातही येतात हे अत्यल्प स्वानुभवावरून सांगू शकेन. समाजसेवा किंवा असलेच काही ध्येय अथवा लेबल जरी असले तरी प्रत्येकाचा अजेंडा वेगवेगळा असतो. याच्याशी आपल्याला जुळवून नाही घेता आले तर आपण बाहेर फेकले जातो. अहंमन्यता ऊर्फ मुजोरीशी जुळवून घेणे कठिण. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट इतकीच की मोठे (दिसणारे किंवा असलेले) लोकही प्रचंड तडजोड करताना, जुळवून घेताना दिसतात. याला आपण बोटचेपेपणा म्हणू शकू किंवा बिनकण्याचे वगैरे. तेव्हा वाट पहात रहाणे (धीर धरणे) आणि वैयक्तिकरीत्या आपला खारीचा वाटा उचलणे एव्हढ्याच गोष्टी आपल्या हातात रहातात.
लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघातल्या म्हटल्या तरी सर्व समस्यांचे भान आणि ज्ञान असणे कठिण. जागृत लोकप्रतिनिधींची आपली अशी एक टीम असते. त्यांच्या लोकदरबारात आलेल्या अर्ज, तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी त्या वेगवेगळ्या माणसांकडे सोपवल्या जातात. तज्ञांचे मार्गदर्शनही त्यांना उपलब्ध असते. त्याचा योग्य उपयोग करून घेणारे प्रतिनिधी विरळाच. असे प्रतिनिधी निवडून कसे आणायचे हीच तर मूळ समस्या आहे.
पहिल्या प्रतिसादात मांडलेले उत्तर अथवा स्थिती हा स्वप्नाळूपणा नव्हे,तर वास्तव आहे. मात्र ते भाबडे जरूर आहे. प्रत्येक वास्तव हे दाहक आणि प्रखर असलेच पाहिजे का? तसे ते असले तरी सौम्यपणाने वास्तवाला सामोरे जाता येणारच नाही का? की तो नेहमीच स्वप्नाळूपणा आणि (प्रखर शब्द वापरून पाहूया) षंढपणा ठरेल?
प्रकाटाआ
दोनवेळा पाठवला म्हणून प्रकाटाआ.
नेहरू इंदिरा कारकीर्दीत एक हाती सत्ता होती. काय परिवर्तन झाले?
येथे बदल घडवायचा तर एक हाती सत्ता अथवा स्पष्ट बहुमत गरजेचे आहे.
आधी नेहरूंच्या व त्यानंतर इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत ते सर्व होते. कोणत्याही प्रदेशातील मुख्य मंत्रीला त्या फोन करून राजीनामा द्यायला सांगू शकत होत्या व मुख्य मंत्र्याची नाही म्हणण्याची टाप नव्हती. कोणताही संविधान संशोधन तेव्हा होऊ शकत होते. काय परिवर्तन झाले? एका हाती सत्ता हे दुधारी शस्त्र आहे. ते परिवर्तन करण्या करता वापरता येते, किंवा परिवर्तनाचे सर्व मार्ग बंद करण्या करता पण वापरता येते. त्या मानाने गेल्या काही दशकात जास्त परिवर्तन होत आहे. टी एन शेषन यांनी सुरु केलेले सुधार; निवडणूक खर्चाला काही आळा; उम्मेदवारांने आपली संपत्ती जाहीर करणे; दूरदर्शन वर इतर पक्षांना भाषण देण्याची संधी; इत्यादी. बूथ capturing पण नेहरू / इंदिरांच्या कारकीर्दीत जास्त होते व आता कमी आहे. Civil Society चा दबाव खूप उपयोगी होउ शकतो. RTI कायदा Civil Society च्या दबाव मुळे आला. अण्णा- केजरीवाल प्रभूतींनी कमालीची आडमुठी भूमिका घेतली नसती तर लोकपाल बिल पण पास झाले असते.
समाजात काही बदल होणे गरजेचे आहे, पण ते फार कूर्म गतीने होणारे काम आहे. दोन प्रस्तावांवर विचार व्हावा. १: अध्यक्षीय पद्धत २: proportionate representation. म्हणजे जनतेने अमूक एका उमेदवाराला मत न देत अमुक एका पार्टीला मत द्यावे. ज्या पार्टीची जितकी मते त्या अनुपातात त्यांना लोकसभेत जागा. त्या जागांवर कोणतेही प्रतिनिधी पाठविण्याची त्यांना मुभा असावी. हे जे लिहिले ते फारच ढोबळ आहे. याला अजून fine tune करणे बाकी आहे.
नेहरु कुटुंब
आधी नेहरु आणि मग त्यांचे वंशज... पक्ष म्हणून नाही म्हणत पण जर त्यांच्या जुन्या पिढ्यांनी काही केले नाही तर नवी काही करेल अशी अपेक्षा कशाला? पण दुर्दैवाने आज सुद्धा तशीच अपेक्षा केली जात आहे आणि राजकारण आज सुद्धा व्यक्ति केंद्रित बनुनच चालते आहे. जसे तुम्ही म्हणता तसे सामान्य माणसाच्या समूहाची ताकद एकवटली तर बराच बदल घडू शकतो. तो दबाव असणेच गरजेचे आहे.
बूथ कॅप्चरींग आता होत नाही कारण आता गरज नाही. एलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनच पुरेशी आहेत. उगाच हिंसा करावी लागत नाही.
तुमचे विचार फाईन ट्युन करा आणि येथे लिहा.
नेहरू इंदिरा कारकीर्दीत एक हाती सत्ता होती. काय परिवर्तन झाले?
येथे बदल घडवायचा तर एक हाती सत्ता अथवा स्पष्ट बहुमत गरजेचे आहे.
आधी नेहरूंच्या व त्यानंतर इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत ते सर्व होते. कोणत्याही प्रदेशातील मुख्य मंत्रीला त्या फोन करून राजीनामा द्यायला सांगू शकत होत्या व मुख्य मंत्र्याची नाही म्हणण्याची टाप नव्हती. कोणताही संविधान संशोधन तेव्हा होऊ शकत होते. काय परिवर्तन झाले? एका हाती सत्ता हे दुधारी शस्त्र आहे. ते परिवर्तन करण्या करता वापरता येते, किंवा परिवर्तनाचे सर्व मार्ग बंद करण्या करता पण वापरता येते. त्या मानाने गेल्या काही दशकात जास्त परिवर्तन होत आहे. टी एन शेषन यांनी सुरु केलेले सुधार; निवडणूक खर्चाला काही आळा; उम्मेदवारांने आपली संपत्ती जाहीर करणे; दूरदर्शन वर इतर पक्षांना भाषण देण्याची संधी; इत्यादी. बूथ capturing पण नेहरू / इंदिरांच्या कारकीर्दीत जास्त होते व आता कमी आहे. Civil Society चा दबाव खूप उपयोगी होउ शकतो. RTI कायदा Civil Society च्या दबाव मुळे आला. अण्णा- केजरीवाल प्रभूतींनी कमालीची आडमुठी भूमिका घेतली नसती तर लोकपाल बिल पण पास झाले असते.
समाजात काही बदल होणे गरजेचे आहे, पण ते फार कूर्म गतीने होणारे काम आहे. दोन प्रस्तावांवर विचार व्हावा. १: अध्यक्षीय पद्धत २: proportionate representation. म्हणजे जनतेने अमूक एका उमेदवाराला मत न देत अमुक एका पार्टीला मत द्यावे. ज्या पार्टीची जितकी मते त्या अनुपातात त्यांना लोकसभेत जागा. त्या जागांवर कोणतेही प्रतिनिधी पाठविण्याची त्यांना मुभा असावी. हे जे लिहिले ते फारच ढोबळ आहे. याला अजून fine tune करणे बाकी आहे.
अध्यक्षीय पद्धत
दोन मुद्द्यांवर मते व्यक्त करतो.
१. प्रादेशिक पक्षांची वाढ:
प्रादेशिक पक्ष नेहमी कुठल्यातरी अस्मितेला हाक देत निर्माण होत असतात. शिवसेना, तेलगू देशम, दोन्ही द्रमुक, अकाली दल, नॅशनल कॉन्फरन्स, आसाम गण परिषद हे असे पक्ष आहेत. त्या पक्षांच्या निर्मितीस केंद्रसरकारकडून किंवा इतर समाजांकडून होणारा कथित अन्याय हे प्रथमदर्शनी कारण असते. ते त्या अस्मितेच्या जोरावर वाढतात.
आज अशा अस्मिताकेंद्री पक्षांखेरीज राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि बिजू जनता दल हे अस्मिताकेंद्री नसलेले प्रादेशिक पक्ष आहेत. त्यांचा प्रभाव एकाच प्रदेशात असला तरी हे पक्ष खरोखरचे प्रादेशिक पक्ष नाहीत. हे पक्ष अन्य पक्षांतून फुटून निर्माण झालेले आहेत. त्यापैकी राष्ट्रवादी आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांची मूळ पक्षापेक्षा वेगळी अशी विचारसरणी नाही. तरीही ते पक्ष वेगळे अस्तित्व राखत आहेत. त्या पक्षाच्या नेत्यांना पक्षात असताना जी बार्गेनिंग पॉवर होती त्यापेक्षा अधिक बार्गेनिंग पॉवर बाहेर राहून मिळते. म्हणून ते वेगळे आहेत. म्हणजे मोठ्या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा जाच नाही अशी मुक्तता आहे. सर्वच प्रादेशीक पक्ष आज बार्गेनिंग करून आपला फायदा करून घेत आहेत.
२. अध्यक्षीय पद्धत असावी अशी सूचना वसंत साठे यांनी इंदिरा गांधी यांच्या दुसर्या स्पेलमध्ये मांडली होती. त्यावेळी "सर्वंकष सत्ता हाती घेण्याची आणखी एक युक्ती" अशी त्या सूचनेची वासलात तत्कालीन राजकारणातील नेत्यांनी लावली होती. शक्यतोवर निरंकुश सत्ता कोणाला मिळू नये हे खरेच आहे.
अवांतर: अनेकदा आपल्याला काही एक प्रॉब्लेम वाटत असतो आणि त्यावर उपाय म्हणून आपण काहीतरी पावले उचलतो/उचलू पाहतो. ती उपाययोजना कधीकधी दुसर्याच रोगाला जन्म देते. पूर्वी आयाराम-गयाराम हा राजकारणातला मोठा प्रॉब्लेम समजला जाई आणि त्यावर उपाय म्हणून पक्षांतर बंदी असावी असा विचार होता. त्या विचारानुसार पक्षांतरबंदी कायदा अस्तित्वात आला. (गांधीजींच्या आत्म्याला शांती मिळाली असेल अशा शब्दात मधू दंडवते यांनी त्या कायद्याची स्तुती केली होती). परंतु या कायद्यामुळे लोकप्रतिनिधींचे स्वातंत्र्य पूर्णपणे संपुष्टात आले. आणि लोकप्रतिनिधी हा पक्षाच्या दावणीला पुरता जखडला गेला.
सुदैवाने लोकपालाच्या बाबतीत असे झाले नाही.
अध्यक्षीय पद्धतीने असेच काही न होवो.
बाडीस
:)
मुद्दे
आपण दोन्ही मुद्दे योग्य मांडले आहेत. पक्षीय राजकारण आता बाजूल पडते आहे आणि नेता केंद्रीत राजकारण होते आहे. आजच्या घडीला अनेक नेते पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहात आहेत. या मागे त्यांची बार्गेनिंग पॉवर हेच कारण आहे. सध्याच्या लोकशाही पद्धतीचा हा सर्वात मोठा तोटा आहे. असे नाहीए की राजकिय पक्षाचे सरकार कोणत्याच राज्यात नाही. काही राज्ये अशी आहेत जिथे फक्त प्रादेशिक पक्षच सत्ता उपभोगतात आणि काही ठिकाणी महत्वाचे केंद्रिय पक्ष. याचा अर्थ काय? काढायला गेले तर अनेक आहेत. पण सध्याच्या काळात हे प्रादेशिक पक्ष फक्त त्यांच्या एका नेत्याच्या करिश्म्यावर सत्तेत येतात. उद्या जयललिता, करुणानिधी, शरद पवार, लालू, माय, मुलायम आणि अनेक नेते जे स्वतःच्या करिश्म्याच्या जोरावर स्वतःच्या राज्याय सत्तेत येतात अथवा आले होते हे जर काही कारणाने नाहीसे झाले तर यांच्याकडे प्रभावी फळीचा अभाव आहे. मुळात सध्याचे राजकारण हे काही ठराविक नेत्यांच्या भोवती फिरते. त्या नेत्यांची धोरणे विचार कधी काळी काँग्रेस अथवा जनता पक्षात प्रभावी होते पण सध्या त्यांचे विचार फार प्रेरणादायी आहेत असे वाटत नाही.
दुसरा मुद्दा हा की सध्याची पिढी राजकारणात उतरते ती एकतर पैसे कमावयला अथवा घराणेशाही चालवायला. कोणताही सामान्य माणूस आज जर जनतेचे प्रश्न सोडवणारा कोण? असा विचार करु लागला तर सकारात्मक आणि ठोस उत्तर मिळत नाही. उलटे यात काहीच बदल होऊ शकत नाही हि भावना बाळगणारेच जास्त. किंबहुना मी काहीच बदल घडवू शकत नाही हि भावना जास्त जाणवते.
वर एका प्रतिसादात एक मुद्दा लोकशिक्षण/शिक्षण हा सुद्धा आहे. देशातल्या किती योजना/कायदे/नियम हे तळागाळा पर्यंत माहित आहेत? सर्वसामान्यांना त्यांचे रोजचेच प्रश्न एवढे क्लिष्ट वाटतात की देशाचे काही प्रश्न आपण सोडवू शकतो अथवा आपण त्याचा एक भाग आहोत हि भावनाच कुठे दिसत नाही. एकतर सरकारने माझे प्रश्न सोडवावेत अथवा जो माझे प्रश्न आत्ता सोडवेल त्याला मी माझे मत देईन हा विचार जास्त जाणवतो.
बार्गेनिंग
मुळात प्रादेशिक पक्षांचे उमेदवार निवडून येतात ते त्यांच्या नेत्याकडे बार्गेनिंग पॉवर असते म्हणून असे नव्हे तर उमेदवार निवडून आणल्यावर उमेदवारांच्या संख्येच्या प्रमाणात त्यांना बार्गेनिंग पोवर मिळते. हेही गणित खरे तर फसवे आहे कारण प्रमुख पक्षाला बहुमतासाठी अगदी कमी परक्या उमेदवारांची गरज असेल आणि एखाद्या कोन्याकोपर्यातल्या छोट्याश्या पक्षाचे तेव्हढे उमेदवार असतील तर संख्येने प्रथम क्रमांकाचा प्रमुख पक्ष हा संख्येने दुसर्या अथवा तिसर्या क्रमांकाच्या पक्षाबरोबर बार्गेन करायला जाणार नाही. ह्या बड्या माशांना जाळ्यात ओढण्याऐवजी एखाद्या छोट्याश्या माशाला अगदी कमी किंमतीत गटवता येईल. या मेखेमुळे भल्याभल्यांचे मनसुबे उधळलेले आहेत. मुळात प्रादेशिक पक्ष निवडूनच का यावेत, लोकांना त्यांचे आकर्षण का वाटावे, हा मुद्दा तपासला पाहिजे.
"त्राता" संकल्पना अमान्य
दुसरा मुद्दा हा की सध्याची पिढी राजकारणात उतरते ती एकतर पैसे कमावयला अथवा घराणेशाही चालवायला. कोणताही सामान्य माणूस आज जर जनतेचे प्रश्न सोडवणारा कोण? असा विचार करु लागला तर सकारात्मक आणि ठोस उत्तर मिळत नाही.
हे केवळ नकारात्मकच नव्हे तर अनेक प्रकारे चुकीचे पण आहे. पहिली चूक - पैसे कमावणे व जनतेचे प्रश्न सोडविणे हे mutually exclusive नाहीत. म्हणजे पैसे तरी कमावता येतात किंवा प्रश्न तरी सोडविता येतात, असे नाही. दोन्ही पण करता येते. दुसरी चूक - जनतेचे प्रश्न सोडविणारा असा कोणीतरी "त्राता" असतो व तो सत्तेत आला तर जनतेचे प्रश्न सोडवितो, ही संकल्पनाच अमान्य आहे. संसदीय लोकशाहीची बैठक अशी आहे कि राजकारणी हे जनतेने निवडून दिलेले, जनतेचे प्रतिनिधी असतात. जनतेला काय हवे हे ते सांगतात (धोरण ठरवितात) व त्या प्रमाणे कृती घडवून आणण्याचे काम नोकरशाहीचे असते. पण प्रत्यक्षात हे फक्त लहान सहान प्रश्नांनाच लागू आहे. जसे, अमुक ठिकाणी उड्डाणपूलाची गरज आहे, किंवा अमुक शाळेत बरेच महिने गणिताला शिक्षकच नाहीत, असल्या लहान सहान तक्रारी जनतेने सांगितल्या व राजकारण्यांनी कृती करण्याचे निर्देश देउन त्या दूर केल्या, हे शक्य आहे.
पण ग्रामीण महाराष्ट्रात जर दिवसातून १२ तास भार नियमन होत असेल, तर तो "प्रश्न सोडविण्या करता" राजकारणी फार काही करू शकत नाहीत. असले प्रश्न सोडविण्या करता काही दूरगामी strategic planning करावे लागते व ते काम; व त्या प्लानिंग प्रमाणे कृती घडवून आणण्याचे काम, दोन्ही कामे नोकरशाहीचीच आहेत. किती मेगावाट विजेची गरज आहे, ती कशी बनवयाची (कोळसा, जल विद्युत, अणु, सौर); विद्यूत प्रकल्प नेमका कुठे करायचा, कोळसा कुठून आणायचा, हे सर्व प्लानिंग नोकरशाही करते. राजकारणी त्यांना कृती करण्यास मदत करू शकतात, व प्लानिंग मध्ये काही मामुली बदल करू शकतात. आज केंद्रात जे सरकार आहे त्याने जैतापूर येथे अणु प्रकल्प बांधायला घेतला आहे. उर्जा मंत्री बदलले, किंवा पुढच्या निवडणुकीत सरकार बदलले तर जैतापूरचा अणु प्रकल्पा रद्द करून त्या ऐवजी कैतापूरला जलविद्युत प्रकल्प बांधायला घेतील असे अजिबात नाही. तेच प्रकल्प त्याच ठिकाणी, तसेच चालू राहील.
शिक्षण, आरोग्य, शेती, आंतरिक व बाह्य सुरक्षा, नागरी विमान सेवा, जल संसाधन, उर्जा, रेलवे, व इतर तमाम विषयात दूरगामी प्लानिंग नोकरशाही करत असते, व कृती पण करत असते. तेंव्हा, राजकारण्यां कडून योग्य तेवढ्याच अपेक्षा ठेवाव्यात. व "त्राता" model तर अजिबात मान्य नाही
त्राता मॉडेल
सर्वसामान्यांना त्राता अपेक्षीत आहे असे ही नाही. तुम्ही जे लिहिले आहे ते कागदावर/घटनेत योग्यच आहे. पण आज राजकारणी आणि नोकरशहा यांनी संगनमत करुन जनतेला वेठीस धरले आहे हे खोटे आहे का? मुळात अपल्या घटनेतच याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला होता पण आजचे चित्र वेगळे आहे. काम कोणाचे हा प्रश्न नाहीच.
ग्रामसभे पासून लोकसभे पर्यंत कागदावर सगळे काही आहे. पण प्रत्यक्षात दोघांची आघाडी आणि जनता वेठीस हे सत्य आहे. त्राता मॉडेलचा विचार हा शुद्ध मुर्खपणा आहे. पण भारतीय जनतेला आपणच बदलले पाहिजे हे मान्य करायला हवे. लोडशेडींग नको तर प्रकल्प हवेत हे समजवायला हवे. आज नवा प्रकल्प म्हटले की राजकिय कुरघोडी आहेच. ती कशासाठी हे कळण्याएवढे आपण तरी मुर्ख नाही.
कोणी कोणास वेठीस धरले आहे?
पण आज राजकारणी आणि नोकरशहा यांनी संगनमत करुन जनतेला वेठीस धरले आहे हे खोटे आहे का? मुळात अपल्या घटनेतच याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला होता पण आजचे चित्र वेगळे आहे. काम कोणाचे हा प्रश्न नाहीच. . . . प्रत्यक्षात दोघांची आघाडी आणि जनता वेठीस हे सत्य आहे
या बाबत सहमत नाही म्हंटल्यास बहुतेक वाचक मला वेड्यात काढतील, पण तो धोका पत्करून सुद्धा, मी सहमत नाही. का? ते शब्दात उतरविणे कदाचित मला जमणार नाही, पण प्रयत्न करतो.
१: स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी आपण ३३ कोटी जनते करता पण पुरेसे अन्न उत्पादन करू शकत नव्हतो. मी शाळेत असतानाचे दिवस मला आठवतात. अन्न तुटवडा, फक्त एक आठवड्य इतका अन्न साठा, तांदूळ गहू करता देशाने जग भर भीक मागत फिरण्याची नामुष्की; PL ४८० द्वारे मिळालेला मेक्सिकन लाल गहू, काळा बाजार; गहू/ तांदूळ/ साखर सर्व काही रेशन वर; पंधरा दिवसाच्या रेशन करता रेशनच्या दुकानात चार चार हेलपाटे मारणे व दोन तास रांगेत उभे राहणे; लाल बहादूर शास्त्री यांची पुरेसे अन्न नाही म्हणून आठवड्यातून एक दिवस उपास ठेवण्याची हांक; हे सर्व मला आठवते. मग १९७५ च्या दरम्यान हरित क्रांती - म्हणजे High Yielding Seeds, सिंचन प्रकल्प, व रासायनिक खते - याच्या साह्याने आपण अन्न उत्पादनात आत्मनिर्भर झालो. पुढचा टप्पा जेनेटिकली मोडीफाईड बियाणांचा आहे. अमेरिकेत तर हे बर्याच वर्षान पासून वापरात आहे. कृषी मंत्री श्री शरद पवार यांनी GM Seeds चे महत्व समजावण्याचा बराच प्रयत्न केला आहे. पण आज स्थिती काय आहे? HYS, मोठे सिंचन , व रासायनिक खते या सर्वांच्या विरुद्ध स्वतःला विचारवंत समजणारे जनतेतले काही घटक - राजकारणी व नोकरशहा नव्हे तर जनतेतलेच "विचारवंत", सेंद्रीय शेती नावाचे खूळ पुढे दामटत आहेत. ही तीच सेंद्रिय शेती ज्याच्या मुळे १९७५ पर्यंत आपल्याला जगभर अन्न अन्न भीक मागावी लागली. GM Seeds जवळ पास मेल्यातच जमा आहे. तर तुम्हीच सांगा, राजकारणी आणि नोकरशहा यांनी संगनमत करुन जनतेला वेठीस धरले आहे, का जनतेतील काही घटकांनी राजकारणी आणि नोकरशहा यांना वेठीस धरले आहे?
२: १९९१ पर्यंत आपण सोशलीझ्म नावाच्या ध्येयाच्या मागे लागलो होतो. प्रदेश वारी करणारी व्यक्ती परताना रंगीत TV, VCR, कॅमेरा, २-in-१, इत्यादी घेउन परतत असे. १९८६ मध्ये मी प्रथम परदेशी गेलो तेव्हा चार दिवस रिझर्व बँकेत हेलपाटे घातल्या नंतर मला २०० $ एवढे परकीय चलन मिळाले. नरसिम्हा राव यांनी मनमोहन सिंगना अर्थमंत्री केले व एक नवीन पर्व सुरु झाले. आज स्थिती काय आहे? "जागतीकीकरण" ही एक अर्थशास्त्रीय शिवी झाली आहे. परदेशी कंपन्यांना आपला विरोध आहे. FDI असे ऐकले की आपण "सीदन्ती मम गात्राणि" होतो. BJP या पार्टीने FDI ला विरोध केला आहे हे मान्य आहे. पण FDI मुद्द्यावर जनता खंबीरपणे कांग्रेसच्या पाठीशी उभी आहे का? अजिबात नाही. तर तुम्हीच सांगा, राजकारणी आणि नोकरशहा यांनी संगनमत करुन जनतेला वेठीस धरले आहे, का जनतेतील काही घटकांनी राजकारणी आणि नोकरशहा यांना वेठीस धरले आहे?
३: सरदार सरोवर, टिहरी धरण, जैतापूर, यांच्या सारखे मोठे प्रकल्पच नव्हे, तर पेडर रोड उड्डाण पुल, पुण्यात मेट्रो, किंवा पुण्यात नदी काठाचा रस्ता या सारखे मामुली प्रकल्प पण जनतेने टांगून ठेवले आहेत, राजकारणी आणि नोकरशहा यांनी नाही. "दिल्लीत मेट्रो फेल झाली असल्यावर आपल्याला मेट्रो पाहिजेच कशाला? असे पुण्यात भिंतींवर रंगविले आहे, ते जनतेने. राजकारणी व नोकरशहानी नाही. तर तुम्हीच सांगा, राजकारणी आणि नोकरशहा यांनी संगनमत करुन जनतेला वेठीस धरले आहे, का जनतेतील काही घटकांनी राजकारणी आणि नोकरशहा यांना वेठीस धरले आहे?
४: पश्चिम घाटाचे पर्यावरण संरक्षणा करता नेमलेल्या गाडगीळ समितीने अत्यंत अव्यवहार्य अहवाल दिला आहे. हा अहवाल अमलात आणल्यास गुजरातेत डहाणू पासून ते केरळ मध्ये कन्याकुमारी पर्यंत सर्व विकास बंद होईल. राजकारणी आणि नोकरशहा हा अहवाल अमान्य करण्याच्या प्रयत्नात आहेत, व विचारवंत "सरकार गाडगीळ अहवाल दडपून टाकू पहात आहे" असा ओरडा करीत आहे. तर तुम्हीच सांगा, राजकारणी आणि नोकरशहा यांनी संगनमत करुन जनतेला वेठीस धरले आहे, का जनतेतील काही घटकांनी राजकारणी आणि नोकरशहा यांना वेठीस धरले आहे?
हा निबंध अनेक पाने लांबविता येईल, पण सध्या एवढे पुरे.
"जनता" अशी एकसंध वस्तू नसते. त्याचे बरेच भाग असतात, पण मुख्यतः जे आर्थिक दृष्ट्या secure नाहीत ते, व जे secure आहेत ते, असे दोन भाग करता येतील. जे अजून आर्थिक दृष्ट्या secure नाहीत त्यांना कास पठारावर फुले उगतात का नाही, पश्चिम घाटात जांभळा बेडूक (Nasikabatrachus Sahyadrensis) जगतो का नाही, (किंवा सचिन निवृत्ती घेतो का नाही) इत्यादीशी काहीही देणे घेणे नसते. त्यांचे प्रश्न वेगळे असतात. आज रात्री जेवायला मिळेल का, या सारखे. ते प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न राजकारणी व नोकरशहा करीत असतात. यात भ्रष्टाचार असेल. पण तो वेगळा मुद्दा आहे. गरीबीत पिडलेल्या बापाला आपल्या आजारी मुलाला वैद्यकीय सेवा मिळेल का, हा प्रश्न भेडसावत असतो. त्याला मोफत मिळणारी औषधे सरकारी रुग्णालयाने विकत घेताना भ्रष्टाचार झाला का याच्याशी त्याला काहीही देणे घेणे नसते. तो प्रश्न तुमच्या-माझ्या सारख्या, ज्याच्या कडे औषधे विकत घेण्या करता पैसे आहेत, त्यालाच पडत असतो.
एक दुसरा विचार असा, कि ओढ्या वर पूल बांधताना पैसे खाणारे ग्राम पंचायतिचे सदस्य कोण, - राजकारणी, नोकरशहा, का जनताच? शाळेत मिड-डे-मील पुरवितांना नित्कृष्ट खिचडी पुराविण्याऱ्या संस्थां कोण, - राजकारणी, नोकरशहा, का जनताच? चालत्या गाडीत रिकामे असलेले ३-टियर बर्थ देण्याकरता पन्नास रुपये मागणारा TC हा अर्थातच नोकरशहा, पण तुमचा भाचा जर TC असेल तर तो कोण, राजकारणी, नोकरशहा, का जनताच? तुमची नळ जोडणी अधिकृत असते तेव्हा अनधिकृत नळ जोडणी करणारे अर्थातच भ्रष्ट नोकरशहा असतात, पण तुमच्या नवीन बंगल्याला वाळू उत्खननाचे नियम झुगारून देउन वाळू पुरविणारे कोण असतात - राजकारणी, नोकरशहा, जनता, वाळू-माफिया, का तुम्हीच?
तर, राजकारणी आणि नोकरशहा यांनी संगनमत करुन जनतेला वेठीस धरले आहे हे फार फार over simplification झाले.
नाही
मी पुन्हा तेच सांगतो आहे. जर तुम्ही सध्या जनतेला जबाबदार पकडत असल्यास जनता अशी का करते याची कारणे शोधली आहेत का? मुळात भारतातल्या विविधतेत सर्वांना एकच योजना करण्यामागे कारण काय? मग ती कोणतीही असो. सर्वांना एकाच पातळीवर आणा म्हणायचे नाहीये. पण इतकी वर्षे होऊन सुद्धा काही साध्या गोष्टींसाठी जेंव्हा सामान्य माणूस लाच द्यायचा विचार करतो त्याचे कारण काय?
जर काम सरळ सोपे आणि लाच न देता होत असेल तर कोणाला आवडेल?
सध्या जे घोटाळे बाहेर येतात त्यांचे आकडे मांडताना पण विचार करावा लागतो. जर जनतेत विषमता नसावी असे वाटते तर मग वेगवेगळी आरक्षणे, अल्पसंख्यांक इत्यादी संज्ञा कशाला वापरायच्या? त्यानेच तर दुही जास्त वाढते? याला सगळ्याला सामान्य माणूस जबाबदार आहे असे आपले मत आहे? जर तो आहे तर त्याला बदलणे हे त्याचे स्वतःचे आणि सरकारचे काम आहे. याचर्चेते तेच अपेक्षीत आहे की हि व्यवस्था बदलायची अथवा दुरुस्त करायची असेल तर काय करायला हवे?
वर तुम्ही काही प्रकल्प जनतेने टांगून ठेवले आहेत असे लिहिले आहे. पुर्ण विचार केल्यास त्यामागे काही लोकांचे आणि राजकिय पक्षांचे स्वार्थ स्पष्ट कळतात.
१९९१ ची गोष्ट करताना, तो वर कोणी थांबवले होते का? तो पर्यंत तर बहुमतातली सरकारे अस्तित्वात होती. खरा बदल तर त्याधीच अपेक्षीत होता. असो.
माहिती...
व्यवस्था परिवर्तन, सुधार वगैरेबद्दल चर्चा होत असल्याने खालील काही दुवे आठवणीने चाळावेत असे सुचवू इच्छितो.
http://lamp.prsindia.org/fellows-2011-12
https://www.facebook.com/meghnad.saha
http://www.sleepwalkertales.blogspot.in/
मेघनाद ह्या युवकाने प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींसोबत काम केलेले आहे.(अजूनही करत असावा.)
त्याचे अनुभव, सुधारणेच्या संधी आणि सुधार करण्यास समस्या/मर्यादा ह्यावर थोडीफार माहिती , जिवंत अनुभवातील त्याच्यावर दिलेल्या ब्लॉगच्या लिंक वर सापडेल. त्याच्या "पावभाजी, सरकार" अशा काहीतरी शीर्षकाच्या लेखाबद्दल बरेच काही ऐकून आहे. अवश्य पहा.
--मनोबा
फोकस चुकतो आहे
या धाग्यात आपण मूळ विषय पासून खूपच दूर गेलो आहोत. तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देउन माझे या धाग्यातील लेखन संपवितो.
पण इतकी वर्षे होऊन सुद्धा काही साध्या गोष्टींसाठी जेंव्हा सामान्य माणूस लाच द्यायचा विचार करतो त्याचे कारण काय? जर काम सरळ सोपे आणि लाच न देता होत असेल तर कोणाला आवडेल?
तुम्ही जनतेचे प्रश्न फक्त लाच देणे, भ्रष्टाचार, या पुरतेच सीमित करत आहात. आज जनतेपुढे अनेक गंभीर प्रश्न आहेत. भ्रष्टाचार केव्हांही समर्थनीय नाही. पण भ्रष्टाचार या एक प्रश्नाने आपल्याला इतके गुंग करून टाकले आहे, कि जनतेचे प्रश्न म्हंटले कि आपल्याला फक्त भ्रष्टाचारच आठवतो. उदाहरणार्थ - आज ७०% शेत जमिनी २ हेक्टर पेक्षा लहान आहेत व ५०% जमिनी तर १ हेक्टर पेक्षा ही लहान आहेत. इतक्या लहान जमिनीतून एक कुटुंबाचे पोषण धीरज भई सोन्नेजीच करू जाणे. बाकीच्यांना ते अशक्य आहे. म्हणून मोठ्या संख्येने ग्रामीण युवक नोकरी करता शहरा कडे येत आहेत. पण नोकर्यांच्या संधी नाहीत. कोट्यावधी लोक बेरोजगार आहेत. हा माझ्या मते सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे. इतके लोक बेरोजगार राहिले तर देशात अस्थैर्य माजून प्रचंड उलथापालथ होउ शकते. याचा भ्रष्टाचाराशी काय संबंध आहे? समजा उद्या भ्रष्टाचार समूळ नष्ट झाला तर दोन कोटी रोजगार निर्माण होउ शकतील? अर्थातच नाही. या दोघांचा आपासात काही संबंधच नाही.
देशाच्या एकूण क्षेत्रफ़लाच्या मानाने लोकसंख्या खूपच जास्त असल्याने साधनांचा प्रचंड तुटवडा आहे. जरी सर्व आंदोलने मागे घेतली व सर्व मोठे प्रकल्प होउ घातले तरी आपल्याला गरज आहे तेवढी उर्जा उत्पादन होणे नाही. उर्जेचा तुटवडा म्हणजे उद्योगांवर मर्यादा येते. उत्पादनात उर्जा हा महत्वाचा घटक असल्याने उर्जा महाग झाली कि आपली उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत स्पर्धा करू शकत नाहीत. समजा उद्या भ्रष्टाचार समूळ नष्ट झाला तर आपली गरज आहे तेवढी उर्जा निर्माण होउ शकेल? अर्थातच नाही. या दोघांचा आपासात काही संबंधच नाही. हेच logic पाणी, अन्न, आरोग्य सेवा, इत्यादीला पण लागू होते.
२०५० पर्यंत आपली जनसंख्या १६० कोटी असेल असा अंदाज आहे. एवढ्या प्रचंड जनसंख्येला पाणी, अन्न, शिक्षण, वीज, रोजगाराची साधने, आरोग्य सेवा, घरे इत्यादी कशी पुरवायची हे आपले प्रश्न आहेत. साधनांचा तुटवडा आहे तेव्हा संघर्ष अटळ आहे. सेझ करता जमिनी देणार नाही म्हणणारे शेतकरी पण बरोबर आहेत, व सेझ ही गरज आहे हे धोरण पण बरोबर आहे. अमेरिकेत यात संघर्ष होत नाही कारण लोक्संख्येच्या तुलनेत जमीन भरपूर आहे. पण आपल्या कडे जमीन, पाणी, वीज, या प्रत्येक साधनावरून शेतकरी विरुद्ध उद्योग, शेतकरी विरुद्ध शहरी नागरिक, सर्व नागरिक विरुद्ध पर्यावरणाची गरज, असे अनेक संघर्ष आहेत. यातून कसा मार्ग काढायचा, हा मोठा प्रश्न आहे.
पण आपल्या समाजात नैतिकतेला अवास्तव मान आहे. माझ्या माहिती प्रमाणे रामकृष्ण हेगडे, कर्नाटकाचे पूर्व मुख्य मंत्री, हे एकटे असे आहेत ज्यांनी एकदा उघडपणे मान्य केले होते कि त्यांना दोन अधिकारी मध्ये निवड करायची असेल, एक अत्यंत प्रामाणिक पण अकार्यक्षम व दुसरा अत्यंत कार्यक्षम पण काहीसा भ्रष्ट, तर ते दुसर्या अधिकार्याची निवड करतील. याचा अर्थ भ्रष्टाचाराचे समर्थन असा अजिबात नव्हे. पण आपले प्रश्न काय आणी आपला focus काय हे आपल्याला तपासून घ्यायची गरज आहे.
मुद्दे मान्य
भ्रष्टाचार हा एकच मुद्दा नाही हे मान्य आहे. तुम्ही इतर लिहिलेले मुद्दे सुद्धा मान्य आहेत. ते प्रश्न सोडविण्यासाठीच सक्षम सरकार आणि नेत्याची आणि तेवढ्याच राजकिय साक्षर जनतेची गरज आहे. हेच माझे म्हणणे आहे. आज सुद्धा सरकारची एक योजना आहे कि लोकांना वर्षातील काही दिवसांच्या रोजगाराच्या हमीची काळजे घेते. पण खरच त्याचा फायदा योग्य माणसांमध्ये जातो का? तुम्ही म्हणता तसे सध्याचे रिसोर्सेस पुरवायचे म्हटले तर त्याचे योग्य नियोजन नको का? बांगलादेशी लोकांना आधार कार्ड मिळते पण मला मतदान करायचे असताना माझे नाव मतदार यादी मध्ये सापडत नाही हे कसे होते?
तुमचे मुद्दे मी काही प्रमाणात मान्य करतो पण हे सगळे बदल करण्यासाठी सध्याची व्यवस्था कुचकामी ठरते आहे हे माझे मत आहे. फोकस चुकलेला नाही. मुद्दे वाढत आहेत.
वी डोण्ट केअर
>>बांगलादेशी लोकांना आधार कार्ड मिळते पण मला मतदान करायचे असताना माझे नाव मतदार यादी मध्ये सापडत नाही हे कसे होते?
बिकॉज वी डोन्ट केअर.......... (मतदानास जाईपर्यंत आपले नाव यादीत नाही हे आपल्याला ठाऊकच नसते).
स्वानुभव
सर्वात पहिल्यांदा मिळाले नाही म्हणून आठवणीने पाहिले की पुढच्या वेळी असेल. घरात सर्वांची कार्डे आली पण माझे नाही. मग थोडी शहानिशा केल्यावर लक्षात आले कि नाव दोनदा आहे. एकदा मधले नाव वडिलांचे आहे आणि एकदा आईचे. जिथे आईचे होते तिथे फोटो होता आणि जिथे वडीलांचे तिथे फोटो नव्हता. ओळख पटवणे अवघड होऊन बसले.
भ्रष्टाचारविरहित सुप्रशासन
सामान्य माणसाच्या पातळीवर शून्य भ्रष्टाचार आणि सुप्रशासन स्वतंत्र भारताच्या इतिहासात जर कधी अनुभवावयास मिळाले असेल तर ते केवळ १९७५-१९७७ या दरम्यान. विनोबांनी या काळाला अनुशासनपर्व म्हटले ते उगीच नाही. खरोखर या काळात आर्थिक. राजकीय, प्रशासकीय व्यवहार ज्या शिस्तीने होत होते, तसे नंतर कधीच पहायला मिळाले नाहीत. त्या काळातल्या शिस्तीच्या एकेक गोष्टी ऐकल्या तर त्या भारतात घडल्या असतील हे खरेच वाटत नाही. बेनेवॉलंट डिक्टेटरशिप कशी असावी ह्याचा तो एक आदर्श होता. पण निरंकुश सर्वंकष सत्ता सर्वंकषपणे भ्रष्ट करते हा दु:खद विरोधाभास आहे.
आहे हे असेच चालू राहील
दोन एक वर्षांपूर्वी ओक्षफर्ड युनिव्हर्सिटीच्या हिंदू स्टडीज विभागातील एका लिंक वर एक भाषण आईकले होते. विदेशी लोकांच्या चाश्म्यातुने भारत कसा दिसतो. असे काहीसे त्याचे टायटल असावे. तर त्याचा गोषवारा असा की.
भारतात इतके धर्म, पद्धती, विविधता आहे की एकसंध भारत निर्माण होणे कठीण आहे. ह्याच विविधतेमुळे भारतात लोकशाही सहज रुळली. म्हणजे फारसे प्रयास न करता लोकांनी लोकशाही फार लवकर आत्मसात केली. आता ह्या विविधतेचा दुर्गुण असा आहे की दोन लोकांचे कधी काही पटत नाही. बाकीच्या म्हणजे किरीस्ताव आणि मुसलमान धर्मात जरी विविधता असली तरी ज्या पद्धतीची विविधता आपल्याकडे आहे तसे त्यांचे नाहीये. त्यामुळे नियम पाळणे, एक व्यवस्था वगैरे शक्य होते. इथे एकाच देश इतके देश सामावले आहेत की सगळे काही सुरळीत चालणे अवघडच आहे. आणि हे आपण रोजच पाहतो.
मुळातच आपल्याला लक्ष्मणरेषा आखणे आणि कोणी काढून दिली तर त्याचा आदर करणे जमतच नाही हो. म्हणजे एकादी गोष्ट १०० लोकांना अतिरेक होतो असे वाटेल पण अजून १०० लोकांना त्यात काही गैर आहे असे वाटतच नाही त्यामुळे जे काही आहे ते असेच चालू राहील असे वाटते. त्यातल्या त्यात कसे काय बरे चालेल एवढीच माफक अपेक्षा ठेवावी.
विविधता
विविधतेमुळे अनेक प्रश्न आहेत हे आपण जाणतोच. पण मागे अनेक चर्चांमध्ये जो मुद्दा मांडला गेला की कदाचित या विविधतेला धर्मनिरपेक्षता कारण आहे. आता धर्मनिरपेक्षता योग्य कि अयोग्य हा एक न संपणारा चर्चा विषय आहे. पण सर्वधर्म एक समान हे योग्य असले तरी लोकसंख्येच्या प्रमाणात धर्मांना महत्व दिले गेले असते आणि कोणाला अल्पसंख्याक म्हटले असते तर ठिक होते. सध्याच्या भारतात तत्वानुसार सगळे एका पातळीवर. पण जेंव्हा खरी वेळ येते त्यावेळी धर्म तर सोडाच मग जात पण महत्वाची ठरते आणि त्या जोरावर बेरजेचे राजकारण चालते हे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतो.
जात नाही ती जात
माझ्या मते धर्मनिरपेक्षततेचे जरा जास्तच कोड कौतुक झाले आहे. मुळात कायदा सगळ्यांना सारखा लागू होत नाहीये त्यामूळे हे सगळे चालू आहे. जर का कायदा सगळ्यांनाच सारखा लागू झाला किंवा असलेले कायदे योग्य रीतीने राबविले तर रोजचे जगणे बरेच सुसह्य होएईल. पण जातीचे काय करायचे हा मोठा प्रश्नच आहे. म्हणजे निदान शहरांमध्ये तरी ब्राह्मण हल्ली फारसे जात पळताना दिसत नाहीत, लग्न सोडल्यास. पण बाकीचे घट्ट पकडून आहेत. उलट आता आरक्षण मिळवण्यासाठी कोण किती खाली जातो ह्याचीच मारामारी चालू दिसते.
:)
समानता कधी येईल जेंव्हा सगळ्यांना एकाच पातळीवर आणले जाईल. बरिच दशके झाली पण आपण वेगळ्याच दिशेला जातो आहे. पण परत मुद्दा तिथेच येतो. हे बदल करायला जबाबदार कोण? लोकं कि लोकांनी निवडून दिलेले नेते आणि सरकार? सध्याच्या पद्धतीने भारतात एका पक्षाचे आणि सर्वमान्य नेत्याचे सरकार यापुढे कधी येईल असे वाटत नाही. परिस्थिती जास्तच बिघडत आणि चिघळत जाईल. विचार निराशावादी आहेत पण प्रत्येकाला आपला हट्ट बाजूल ठेवणे गरजेचे आहे हे सजायला हवे.
महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण करताना जमिनीचा वापर कसा करावा यावर उहापोह होतो आहे. पण महाराष्ट्रात नवे उद्योग कुठे यावेत? तिथे गेल्यास काय सवलती द्याव्यात आणि महाराष्ट्रात औद्योगिकरणाच फायदा घेऊन नवी चांगली शहरे आणि व्यवस्था उभ्या कराव्यात असे सांगताना आणि त्यासाठी लढताना एक सुद्धा नेता दिसत नाही. दिसतात ते अशी धोरणे करणारे अथवा होणार्या प्रकल्पा विरोधात लोकभावना भडकवणारी आंदोलनए पेटवणारे...
सहज?
>>भारतात इतके धर्म, पद्धती, विविधता आहे की एकसंध भारत निर्माण होणे कठीण आहे. ह्याच विविधतेमुळे भारतात लोकशाही सहज रुळली.
हे विधान म्हणजे शेकडो राष्ट्रीय नेत्यांच्या शतकाच्या मेहनतीचे मोल नाकारणे आहे असे वाटते.
मान्य
तुमचे म्हणणे मान्य आहे. पण इतके लोक लोकशाही स्वीकारायला तयार झाले आणि नेत्यांना पण टी पातळी ह्याचे मुख्य कारण मला वाटते आपली सहिष्णुता. मुळातच जमीन पीक येण्या योग्य होती. उत्तम मशागत झाली आणि त्याचे फळ मिळाले.
आता ह्या सहिष्णुतेचा अतिरेक झाला आहे हा भाग वेगळा. म्हणून तर वर म्हटले मी आपल्याला लक्ष्मण रेषा आखण्याचे भान नाही आणि कोणी काढून दिली तर ती न ओलांडण्याचे पण भान राहत नाही.
पीक
जमीन पिक येण्यायोग्य नव्हती. इंग्रजांमुळे ती बनली. तोवर कुठे होती लोकशाही? जी लोकशाही आपण मानतो ती आपली थोडीच आहे? आजचे जे काही सर्वामोठे रेल्वेचे जाळे, पोस्टाचा विस्तार इत्यादी गोष्टी तर इंग्रजांनी सुरु केल्या. भारतात बुद्धीमान लोकं नक्की आहेत. पण त्याचा भारतासाठी अथवा भारतीयांसाठी काही एक उपयोग होत नाही. आणि जे लोकं त्या बुद्धीचा नको तसा वापर करतात ते आज सत्तेच्या दोर्या हातात घेऊन बसले आहेत.
राजकिय स्वार्थ आणि राजकारण हे सर्वत्र आहे. पण एकदा जमीन सुपिक आहे हे लक्षात आल्यावर सगळ्याच जमिनीत उसाची शेती करुन कसे चालेल? जनतेला फक्त एका पिकावर थोडेच जगता येते? मशागत उत्तम नाही झाली, ज्यांना चांगली मशागत माहित होती त्यांनी त्याचा गैरवापर करुन अफूची शेती केली आहे. दाखवायला मात्र ती विविधतेची आहे.
पीक
माझ्या मते मुळातच सहिष्णुता आपल्याकडे होती आणि आहेच. वेगवेगळे प्रवाह इथे आपोआप मिसळून गेले. नवीन आलेले आपलेसे करून घेणे आपल्याला कठीण जात नाही.
इंग्रजांमुळे ती बनली.>> नक्कीच. साचलेली जळमटे दूर करायला नक्कीच मदत झाली. माझा एका जवळच्या मित्राच्या आजोबांना मी काही वर्षांपूर्वी भेटलो होतो. ३ एक वर्षांपूर्वी साधारण ९६-९७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पुण्यापासून साधारणपणे ६०-६५ किलोमीटर वर गाव आहे. जवळच राम ताकावाल्यांचे पण गाव आहे. त्यांचे म्हणणे कोण इंग्रज आणि कोण गांधी. भारत स्वतंत्र झाला तेंव्हा ९०% गाववाल्यांना काहीच फरक पडला नव्हता. माझ्यामते हीच अवस्था बऱ्याच ठिकाणी असावी. पण आज त्याच्याच गावात सतत निवडणुका चालू असतात. आता हा बदल स्वीकारायला मानसिकता पण हवीच की? नाहीतर भारताच्या आजूबाजूला जे चालू आहे त्यामानाने आपल्याकडे निश्चितच बरी परिस्थिती आहे. अर्थातच आपल्या नेत्यांचे पण योगदान आहेच पण लोकांची ते स्वीकारायची तयारी त्याचे काय?
रेल्वेचे जाळे, पोस्टाचा विस्तार इत्यादी गोष्टी तर इंग्रजांनी सुरु केल्या. >> मला कधी कधी वाटते की सगळ्या प्रगत देशात ह्या गोष्टी त्यांच्या भाषेत झाल्याच ना? तिथे कुठे होती इंग्रजांची सत्ता? आपल्याकडे पण ह्या गोष्टी घडल्याच असत्या. वेळ नक्कीच लागला असता हा भाग आहेच.
राजकिय स्वार्थ आणि राजकारण हे सर्वत्र आहे.>> इंग्लंडच्या वासत्यव्यात असे दिसले की त्यांचे राजकारणी अजिबात वेगळे नाहीयेत. मी असताना तिथे त्यांच्या लोकप्रतिनिधींनी केलेली लूट एका वर्तमानपत्राने बाहेर काढली होती. आपल्याकडे असलेली घराणेशाही बऱ्याच प्रमाणात तिथेही पहिली. ब्रिटनने केलेला युद्धाचा प्रोपोगांडा प्रगत असलेल्या लोकांनी पण स्वीकारलाच की? सध्या सिरीया बद्दल तिकडच्या सर्व मीडियात फक्त आसाद विरुद्धच लिहून येते. तीच परिस्थिती लिबिया युद्धात पण अनुभवली. म्हणजे लोकांची मानसिकता सगळीकडे तीच असते. फक्त फरक दोन गोष्टींमुळे पडत असावा. एक म्हणजे चांगला दूरदृष्टी असलेला नेता आणि बऱ्यापैकी कायदा आणि त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा . जोपर्यंत नेहरू होते तोपर्यंत सगळ्या संस्था बऱ्याच प्रमाणात सुरळीत चालल्या होत्या. नेहरूंच्या चुका आहेतच पण त्यांच्यात काळत बऱ्याच प्रमाणत संस्था उभ्या राहिल्या. त्यांच्याच कन्येने स्वतःच्या सत्तेसाठी लाळघोत्यांची फौज तयार केली. नंतर आलेल्या सगळ्यांनी दुर्दैवाने नेहरूंचा आणि लालबहादूर शास्त्रींचा आदर्श न मानता त्यांच्या कन्येचा ठेवला आणि मग आजची ही दुरवस्था होऊ घातली.
अवांतर : कुतूहल
हे विधान म्हणजे शेकडो राष्ट्रीय नेत्यांच्या शतकाच्या मेहनतीचे मोल नाकारणे आहे असे वाटते.
ह्या मेहनती शेकडो राष्ट्रिय नेत्यांपैकी काहिंची नावे मिळतील का?
त्यात शामाप्रसाद मुखर्जी, मदन मोहन मालवीय अशा काही नावांचा समावेश होताना दिसेल काय ह्याचे कुतूहल आहे.
मुखर्जी मालवीय दिसतील की
पण हीच विशिष्ट नावे दिसण्याची गरज का वाटली ते कळत नाही.
टिळक, गोखले, सावरकर, लाला लजपतराय, गांधी, पटेल, भगतसिंग, नेहरू, आंबेडकर, जयप्रकाश नारायणम, राजाजी, सुभाष बोस या राष्ट्रीय नेत्यांबरोबरच शेकडो स्थानिक नेत्यांचे देखील योगदान आहे.
[अर्थात या यादीत चापेकर, गोडसे मात्र फिट होणार नाहीत]
:)
आपल्या येथे नेत्याचे खास करुन त्याच्या आडनावाचे एवढे महत्व का आहे? राष्ट्रप्रेमाची मक्तेदारी कदाचित काही ठराविक नेते आणि त्यांचे कुटुंबियांनी घेतल्याने राष्ट्रियत्वाची भावना सामान्य माणसात अभावानेच दिसतेच आणि मग लोकशाही आणि सत्ता हि सुद्धा याच लोकांची मक्तेदारी बनली आहे.
:)
बहुदा आपली मानसिक गरज!!
पण हीच विशिष्ट नावे दिसण्याची गरज का वाटली ते कळत नाही.
मुखर्जी मालवीय दिसतील की
आभार. बरं वाटलं ही नावं पाहून.
पण हीच विशिष्ट नावे दिसण्याची गरज का वाटली ते कळत नाही.
कै नै. खोड्या काढत होतो. (विरोधक विचारसरणीतील काही नावे काही घटानांत आदराने उच्चारायला लावण्यात मज्जा येते. )
;)