नवश्रीमंतांचा मंत्रघोष: ग्रीड इज गुड

श्रीमंतांच्या सामाजिक मानसिकतेचाच विचार करत असल्यास दुसऱ्या महायुद्धानंतरच्या 50- 60 च्या दशकापासून आजपर्यंतच्या काळापर्यंत त्यांच्या मानसिकतेत हळू हळू बदल होत गेला आहे, हे लक्षात येईल. स्वत:च्या हिताची काळजी, दान - देणगी - सबसिडी सबझूट, संवेदना - सहानुभूती या अविवेकीपणाची व भिकेच्या डोहाळ्याची लक्षणं, दुर्बलांसाठी हे जग नाही, पैसा हेच सर्वस्व, स्पर्धेतील यशच खरे यश,... इत्यादी गोष्टी आजकाल शिकवाव्या लागत नाहीत; त्या उपजतच आहेत की काय असे जणू वाटत आहे. यांच्या समर्थनार्थ वेगळ्या पुराव्याची गरज नाही, इतक्या त्या स्वयंसिद्ध आहेत हे, काही अपवाद वगळता, प्रत्येकाच्या मनावर बिंबवलेल्या आहेत. कारण अवती भोवती याच मानसिकतेची फळ भोगणारा, समृद्धीकडे वाटचाल करत असलेला वर्ग सापडेल. या वर्गाला कुठल्याही प्रकारच्या अपराधीपणाची टोचणी टोचू नये म्हणून या गोष्टींना तात्विक मुलामा देणाऱ्या लेखांची, पुस्तकांची वा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे डांगोरा पिटणाऱ्यांची अजिबात कमतरता नाही. याच मानसिकतेला तरुण वर्गात अत्यंत लोकप्रिय करणाऱ्यात अयन रँड या लेखिकेचे नाव सर्वात वरच्या क्रमांकावर असेल.

रशियातील एका श्रीमंत घराण्यात वाढलेली अयन रँड तरुणपणी अमेरिकेत स्थिरस्थावर झाली. तिने तिच्या Atlas Shrugged या कादंबरीतून आणि The Virtue of Selfishness सारख्या पुस्तकातून स्वार्थी मनोवृत्तीची भलावण करणारा सिद्धांत मांडला. या सिद्धांताला तिने Objectivism हे नाव दिले. या सिद्धांतानुसार स्वयंस्वार्थ हाच खरा नीतीमार्ग आहे. आपले कुणाचेही - अगदी आपल्या जवळच्या कुटुंबियांचीसुद्धा - देणे घेणे नाही यावर तिचा भर होता. तिच्या मते गरीब, दुर्बल यांना जगण्याचा हक्क नाही. इतरांच्या जिवावर जगणाऱ्या बांडगुळांची या जगातून हकालपट्टी केली पाहिजे, एवढेच नव्हे तर अशांना सहानुभूती दाखवणाऱ्यांना, साहाय्य करणाऱ्यांना शिक्षा ठोठावली पाहिजे यावर तिचा भर होता. लोकशाही राजकीय व्यवस्थेतील प्रशासनाने पोलीस, न्याय व संरक्षण या व्यतिरिक्त इतर कुठलीही जबाबदारी स्वीकारू नये यावर तिचा कटाक्ष होता. कायदेसुद्धा याच मानसिकतेला पूरक अशाच असाव्यात. सार्वजनिक वा वैयक्तिक आरोग्य, सामाजिक सुरक्षा, सामाजिक न्याय, शिक्षण, रोजगार, वाहतूक, रस्तेबांधणी, इत्यादी मूलभूत सुविधा पुरविण्याची शासनाची जबाबदारी नाही. त्यामुळे जनतेवर कर आकारणी करणे योग्य ठरणार नाही. बाजारव्यवस्था हे सर्व बघून घेईल, शासनाची त्यात ढवळाढवळ नको. मागणी तसा पुरवठा या तत्वाप्रमाणे या गोष्टी ज्याना परवडतील ते घेतील व न परवडणारे वंचित राहतील. माफक नफा कमवण्याच्या (चुकीच्या) व्यावसायिक दृष्टीऐवजी नवनवीन गोष्टी माणसाच्या गळ्यात बांधणारी दृष्टी हवी आणि त्यातून प्रचंड प्रमाणात व कमीत कमी वेळेत नफा कमवण्यातच खरे यश आहे हाच संदेश तिने त्याकाळी घरोघरी पोचवला.

1957 साली Atlas Shrugged पुस्तक प्रसिद्ध झाले. जॉन गाल्ट हा त्या पुस्तकाचा हिरो होता. अमेरिकेतील त्या कालखंडात लक्षाधीशांची वाहवा होत होती. या नवश्रीमंत वर्गाच्या कार्यपद्धतीमुळेच संपत्तीत भर पडते यावर एकूण एक सर्वांचा विश्वास होता. यांच्या अथक परिश्रमामुळेच राष्ट्र भरभराटीस जावू शकतो, याबद्दल कुणाच्याही मनात संदेह नव्हता. गरीबांचे कल्याण करत असल्याचा देखावा करणारे शासन नवश्रीमंताच्या उद्योजकतेला अडथळे आणत आहे, हा तक्रारीचा सूर आळविला जात होता. सर्जनशील उद्योजकांच्यामुळेच कामगारांना रोजगार मिळतो व त्यामुळेच ते जिवंत आहेत आणि उद्योजकांनी उद्योग बंद करून कामगारांना घरी पाठविल्यास कामगार उपाशी मरतील व राष्ट्र अधोगतीला जाईल याची सर्वाना खात्री होती. जॉन गाल्टसारख्यांच्या स्वार्थीवृत्तीतूनच देशाचे कल्याण होऊ शकते, हेच अयन रँडला सांगायचे होते.

तिच्या मते शासनाच्या विकास कार्यक्रमामुळेच (व गरीबांच्यातील उपजत आळशीपणामुळेच!) दारिद्र्यात भर पडत आहे. त्यामुळे अशा गोष्टींना थारा देता कामा नये. तिच्याच एका कादंबरीत विषारी गॅसमुळे गाडीतील शेकडो मृत्युमुखी पडलेला प्रसंग आहे. जे झाले ते चांगलेच झाले अशा सुरात लेखिकेने या प्रसंगाची मांडणी केली आहे. मृत्युमुखी पडलेल्यात शाळेतील काही मुलं व त्यांची शिक्षिका, दोन मुलाची आई, व मला कळत नसले तरी मतदानाचा हक्क बजावणारच असे म्हणणारी एक गृहिणी त्या अपघातात सापडल्या होत्या.

खरे पाहता टोकाच्या हिंसाचाराला उत्तेजन देणारे, सूडसत्राला पाठिंबा देणारे, हव्यास, हाव, स्वार्थ यांचे उदात्तीकरण करणारे हे तत्वज्ञान आहे. परंतु ही लेखिका अजूनही प्रसिद्धीच्या झोतात आहे. तिच्या पुस्तकांचा लाखोनी खप होतो. प्रत्येक चार अमेरिकन तरुणांपैकी किमान एकाने तरी तिची पुस्तकं वाचलेले आहेत, असे एका सर्वेक्षणाचे निष्कर्ष आहेत.

अयन रँडच्या प्रचारकी इहवादाला आपण नाकारत असलो तरी मूठभर श्रीमंत व कार्पोरेट्स रँडच्या तत्वज्ञानाचे तंतोतंत पालन करत आहेत. ते जे काही करत आहेत ते सर्व नफेखोरी याच सदरात मोडणारे असते. त्यांना कुठलेही शासकीय निर्बंध नको असतात. संप, मोर्चा, घेराव नको असतात. मजूरांची पगारवाढ त्यांच्या मर्जीनुसार व्हायला हवे. थोडक्यात दुर्बलांचे ओझे त्यांना नको आहे. वास्तव व त्यांची महत्वाकांक्षा यातील दरी मिटवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी आहे. आधुनिक भांडवलशाही व्यवस्थेला पोखरून काढणाऱ्या सामाजिक सुरक्षासारख्या उपक्रमांची हकालपट्टी त्यांना करायची आहे. हे उद्दिष्ट साधण्यासाठी हळू हळू पावले उचलल्या जात आहेत. त्यासाठी लोकशाही व्यवस्थेचा पुरेपूर उपयोग केला जात आहे. आकड्यांची धूळफेक केली जात आहे.

लोभ, हव्यास, अधाशीपणा, टोकाचा स्वार्थ यातूनच माणसांची भौतिक प्रगती होऊ शकते, अन्यथा नाही, या तत्वावर आधारलेली ही विचारसरणी आहे. 'आज हे मिळाले, उद्या ते मिळवीन ही ईर्षा मनात बाळगल्याशिवाय प्रगती नाही, विकास नाही. म्हणूनच दुर्बलांना जितके शक्य होईल तितके त्रास देत त्यांना जगू द्यायचे नाही,' हेच स्वप्न उराशी बाळगत ही गेटेड कम्युनिटी व्यवहार करत असते. निकृष्ट दर्जाची कामं विज्ञान - तंत्रज्ञान सुविधातून शक्य होत असल्यामुळे या 'बिनडोकां'ची आता गरज वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे काही ना काही कारण पुढे करून गरीबांचे जिणे असह्य केले जात आहे. श्रीमंतीवरील टीका म्हणजे राष्ट्र - संस्कृतीवर टीका अशा समीकरणाची मांडणी होत आहे. एक मात्र खरे की (हरामाचा) बक्कळ पैसा येत राहिल्यास मनाची ठेवणच तशी बनते. ग्रीड इज गुड् , ग्रीड इज हेल्थी अशी वाक्ये सुचू लागतात. 'आहे रे' वर्गाकडे जात असताना कायदा मोडण्याची खुमखुमी वाढते; नैतिकतेची व्याख्या बदलाविशी वाटते; लुबाडणुकीचे समर्थन करावेसे वाटते; कुठल्याही मार्गाचा अवलंब करून - साम, दाम, भेद, खोटेपणा, हिंसा - स्वयंस्वार्थ साधावेसे वाटते. नव्या भांडवशाहीच्या या प्रवर्तकांच्या मते दुर्बलांची नैतिकतेची झूल स्वत: स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही म्हणून वापरली जात असते.

ग्रीड इज गुड हा मंत्रघोष त्यांना कसा काय लाभदायी ठरतो हे बघत बसण्याशिवाय आपल्या हातात काही नाही हेही तितकेच खरे.

लेखनविषय: दुवे:

Comments

असे खरोखर आहे का?

धाग्यात वर्णिलेले चित्र अतिरंजित असून ते वास्तवात अस्तित्वात नाही असे मला वाटते.

Laissez-faire समाजव्यवस्था मागणारे काही गट समाजात असतात आणि तसे ते कोणत्याहि काळात वा देशात राहणारच. मात्र अशा गटांचा सर्वत्र विजय होतांना दिसत आहे असे जे चित्र वर रंगविलेले आहे तसे वास्तवात दिसत नाही. उलट, खालच्यांनाहि हक्क आणि अधिकार आहेत, त्यांनाहि, आवश्यक असल्यास साहाय्य देऊन, वर उचलले पाहिजे हाच सर्वसमावेशक विचार जगभर, कधीकधी संथपणे तर कधीकधी वेगाने, पण निश्चितपणे पसरत आहे. Laissez-faire विचारांचा थोडा विजय झाल्यासारखे कधी दिसलेच तर तो अल्पजीवी ठरतो - जसे अमेरिकेत अलीकडेच रेगनिझम काही वर्षे प्रभाव टाकून होता पण आता तसे दिसत नाही. हा विजय बहुधा विरोध-विकास प्रक्रिय्रेचा भाग म्हणून निर्माण होतो आणि काही काळानंतर पुनः समतोल साधला जातो असेच दिसत आले आहे. परवाच्याच अमेरिकेती ल निवडणुकीमध्ये Laissez-faire विचारांना सहानुभूति असलेला उमेदवार निवडणूक हरला हेहि दिसत आहे

सध्या दमलोय.

पण मी अ‍ॅन रॅण्ड फ्यनक्लब मेंबर आहे.
सध्या रुमाल ठेवतो.

नित्य टवटवीत विषय

कित्येकदा असे होते कि लिहिण्याची खुमखुमी येते पण नवीन विषय सुचत नाही. असे झाले कि काही विषय "नेहमीच ताजे" असे असतात. सध्याची पिढी लोभी हावरट स्वार्थी इत्यादी आहे हा असा एक नित्य टवटवीत विषय. (नद्यांची गटारे झाली आहेत, निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे, निसर्गाला अनिर्बंध ओरबाडत आपण सम्पूर्ण विश्वाला घोर विंनाशाच्या दिशेने नेत आहोत, भ्रष्टाचार, नोकरशाही बिनडोक आहे, हे पण असेच "प्रातः स्मरणीय नित्य वंदनीय" विषय)

गरज कुठे संपते व ग्रीड कुठे सुरु होते याची कोणतीही परिभाषा नाही. ज्याच्या कडे सध्या सायकल आहे त्याला वाटते कि स्कूटर ही गरज आहे पण चारचाकी ग्रीड आहे. ज्याच्या कडे सध्या स्कूटर आहे त्याला वाटते कि मारुती ८०० ही गरज आहे पण होंडा सिटी ग्रीड आहे. ज्याच्या कडे सध्या होंडा सिटी आहे त्याला वाटते कि लहान गाडी चालेल पण आणखीन एक गाडी, ही गरज आहे. आणी अशी ही चढती भांजणी पुढे जातच राहते. तुम्हाला जी तुमच्या वरच्या पायरी वर उभे असलेल्यांची ग्रीड वाटते ती त्यांच्या दृष्टीने गरज असते, व तुम्ही ज्या पायरीवर उभे आहात व जी तुम्हाला गरज वाटते ती पायरी तुमच्या खालच्या पायरी वर उभे असलेल्यांना ग्रीड वाटते.

आर्थिक दुर्बलांना साहाय्य करण्या करता सध्या जेवढी यंत्रणा आहे व जेवढा खर्च शासन करते तेवढा भूतकाळात कधी ही नव्हता. (याचा अर्थ जे आहे ते पुरेसे आहे असा घेवू नये). आणी असे साहाय्य करण्या करता जो पैसा लागतो तो तथाकथित लोभी, हावरट इत्यादी लोकांच्या उपक्रमातूनच निर्माण होत असतो. भरपूर पैसा मिळवावा पण स्वत: मात्र १०X १० च्या खोपटात दोन पंचे लेवून राहावे व बाकी सगळा पैसा दान करून टाकावा (देवाळा वर सोन्याचा मुकुट चढविण्या करता?) हे निव्वळ स्वप्न रंजन आहे.

दबाव

यातील वर्णन कदाचित अतिरंजित असेलही पण हे विचार यश, सुबत्ता, अधिकार इ. यातून आलेल्या उन्मादाला रोखण्यासाठी दबाव निर्माण करतात. आत्मपरिक्षण करण्यास प्रवृत्त झाले तरी खूप झाले. जगा आणि जगू द्या या तत्वज्ञानाशी फारकत सर्वच श्रीमंत लोकांनी घेतली आहे असे अजिबात नाही हे मान्य आहे. धाग्यात असे काळे पांढरे चित्र जे दिसते आहे ते विश्लेषणाच्या सोयीसाठी असावे.

अ‍ॅटलास श्रग्ड.

अ‍ॅटलास नावाच्या पौराणिक हीरो ने पृथ्वी स्वतःच्या खांद्यावर तोलून धरलेली आहे. या पृथ्वीचा भार वाहण्याचे काम करण्यास अ‍ॅटलासने चिडून जर नाही म्हटले व खांदे उडवलेत, तर काय होईल, याचा कथारूपी थोडा फिलॉसॉफिकल लेखाजोखा म्हणजे अ‍ॅटलास श्रग्ड.

त्याच पुस्तकात जॉन गाल्ट नामक पात्राच्या तोंडी एक ३२ पानांचा मोनोलॉग आहे, अन त्यात 'फिलॉसॉफी ऑफ सेल्फिशनेस' हे नक्की काय ते समजावून सांगितलेले आहे. 'ग्रीड इज गुड' असा शब्दप्रयोग मलातरी आठवत नाहीये. Do unto others as u want others to do unto you, हे सोप्या भाषेतील 'सेल्फिशनेस'चे वर्णन होऊ शकते, असा अ‍ॅटलास श्रग्ड वाचून माझा तरी ग्रह झालेला आहे. 'ग्रीड इज गुड'हे असलेच, तर चार्वाकाने म्हटले त्याच न्यायाने गुड असे त्या पुस्तकांत आहे.

**

या पुस्तकाच्या वर्णनाखाली 'तिच्याच एका पुस्तकात ग्यासने मेलेल्या लोकांचा प्रसंग' घुसडून धागाकर्ते चुकीचे चित्र उभे करीत आहेत, असे म्हणावेसे वाटते.

एक मात्र खरे की (हरामाचा) बक्कळ पैसा येत राहिल्यास मनाची ठेवणच तशी बनते. ग्रीड इज गुड् , ग्रीड इज हेल्थी अशी वाक्ये सुचू लागतात. 'आहे रे' वर्गाकडे जात असताना कायदा मोडण्याची खुमखुमी वाढते; नैतिकतेची व्याख्या बदलाविशी वाटते; लुबाडणुकीचे समर्थन करावेसे वाटते; कुठल्याही मार्गाचा अवलंब करून - साम, दाम, भेद, खोटेपणा, हिंसा - स्वयंस्वार्थ साधावेसे वाटते. नव्या भांडवशाहीच्या या प्रवर्तकांच्या मते दुर्बलांची नैतिकतेची झूल स्वत: स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही म्हणून वापरली जात असते.

बक्कळ पैसा आल्यास तो हरामाचाच असतो हे गृहितक आले कुठून? आज असंख्य तरूण तरुणी आयटीत नोकर्‍या करून बक्कळ पैका कमवित आहेत. तो काय हरामाचा आहे का? परवाच एका मराठी मुलाने गूगलचे ७२ लाखाचे वार्षिक प्याकेज स्वीकारल्याची बातमी वाचली. हे पैसे गूगल हरामाचे म्हणून देऊ करेल असे वाटत नाही.

**

अ‍ॅन रॅण्ड यांच्या कोणत्याच पुस्तकातून वा लिखाणातून लुबाडणुकीतून वा खोट्यानाट्या मार्गांनी पैसे मिळवून धनदांडगे झालेल्यांची भलावण दिसत नाही. उलट, आपल्या कष्ट, ज्ञान व 'आत्रप्रिनरशिप'च्या बळावर (उद्यमशीलता हा शब्द चपखल नाही) जगाचा भार वाहणार्‍यांनी, त्यांच्यावर गोचिडाप्रमाणे जगून ऐश करणार्‍या सगळ्याच नाकर्त्यांकडून त्यांची केली जाणारी मुस्कटदाबी झुगारून दिली तर काय होईल याचे वर्णन म्हणजे अ‍ॅटलास श्रग्ड असेच ते पुस्तक वाचणार्‍या प्रत्येकाचे मत होते.

या गोचिडांत उदा. फ्याक्टरीत साम्यवादी तत्वाने प्रत्येकाला समान पगार असे तत्व लावल्याने मातलेले आळशी. तुमच्या उत्पादनक्षमतेपेक्षा तुमची 'गरज' जास्त श्रेष्ठ अशा प्रकारच्या तत्वज्ञानावर आधारित नफ्याचे वाटप करीत राहिल्याने खरे कष्ट करणार्‍यांची कशी परवड होते, हे सगळे अतिरंजितरित्या दाखवले आहे, व मला वाटते, कि हे असे बटबटीतपणे मांडणे ही त्या कथावस्तूची गरज आहे.

रेल्वे लाईन चालू ठेवण्यासाठी कष्ट करणार्‍या डायरेक्टरच्या जिवावर चैन करणार्‍या इतर बोर्डमेम्बरांपासून अगदी नात्यांची आण देत नवरा/मुलाकडून पैसे वसूली करणार्‍या आई/पत्नीचेही त्यात असेच काहीसे अतिरंजित वर्णन आहे. अन तसेच या गोचिडांकडून रक्त शोषून मरण्याआधीच जगाची मोटर बंद पाडणार्‍या, व गोचिडांचे खेळ संपविणार्‍या माणसाचे वर्णन त्यात आहे.

या सगळ्याच पात्रांतून स्वतः उत्तुंग अ‍ॅबिलिटीज / क्षमता मिळवा, पृथ्वीचा भार वाहण्यास सक्षम बना, व अशा गोचिडांना झटकून लावा, हा साधा सरळ संदेश लेखिकेच्या पुस्तकांतून दिसतो. अन याच कारणामुळे कॉलेजकुमारांत ही लेखिका लोकप्रिय आहे. मीही त्याच वयात वाचली, and frankly, i am impressed. And i must say, it made a positive difference to my being.

अपराधगंड!

बक्कळ पैसा आल्यास तो हरामाचाच असतो हे गृहितक आले कुठून? आज असंख्य तरूण तरुणी आयटीत नोकर्‍या करून बक्कळ पैका कमवित आहेत. तो काय हरामाचा आहे का? परवाच एका मराठी मुलाने गूगलचे ७२ लाखाचे वार्षिक प्याकेज स्वीकारल्याची बातमी वाचली. हे पैसे गूगल हरामाचे म्हणून देऊ करेल असे वाटत नाही.

माझ्या मते बौद्धिक परिश्रमातून इतरांपेक्षा चार पैसे जास्त कमविणारे dirty rich च्या सदरात मोडत नाहीत. त्यांच्या संवेदना, जाणिवा, सहानुभूती, दयाबुद्धी अजूनही बोथटल्या नाहीत. परंतु काही धनदांडगे सत्तेतून (वा सत्तेच्या दलालीतून) संपत्ती व संपत्तीतून सत्ता यासाठी कुठलाही विधिनिषेध न बाळगता अवैध वा गैरमार्गाने त्यांच्या पुढील सात पिढ्यांनी विनाश्रम श्रीमंतीचे आयुष्य काढले तरी पुरून उरतील एवढे (हरामाचे) पैसे कमवत १५ - २० लक्झरी कार्स, ५-६ लोकांना रहाण्यासाठी ४-५ मजली इमारत, हाताखाली ४०-५० नोकरांचा ताफा बाळगत श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन मांडत असतात. आणि त्यांच्या हव्यासाला कुठलेही धरबंद नाहीत.
त्यामुळे आयटी अभियंते, डॉक्टर्स, लॉयर्स, नव्या पिढीतील उद्योजक इत्यादी प्रामाणिक अभिजनांनी 10x10च्या खोलीत राहून सर्व कमाई गरीब जनतेवर उधळण्याऐवजी स्वत:च्या व कुटुंबियांच्या सोई सुविधावर खर्च करत असल्यास स्वत:ला अपराधी समजून घेण्याचे कारण नाही.
मुळात ते स्वत:ला नवश्रीमंत म्हणवून घेत असले तरी ते अजूनही उच्च मध्यमवर्गीय या सदरात मोडतात. व लेखाचा लक्ष्यही हा वर्ग नाही.
( लोभी, हावरट इत्यादी लोकांच्या उपक्रमातूनच संपत्ती निर्माण होत नाही, घोटाळे निर्माण होत असतात, हे वेगळे सांगायची गरज नाही. )

हेवा?

प्रतिसादाचे शीर्षक समजले नाही.

तुम्हास अभिप्रेत असलेल्या प्रकारचा हरामाचा बक्कळ पैसा कमावणारे जे कुणी असतात, त्यांची मानसिकता/विकृती त्या पैशामुळे झालेली नसून त्यांच्या विकृत मानसिकतेमुळे ते तसल्या हरामाच्या पैशाच्या पाठी लागतात, हे मी सुचवू इच्छीतो.

अन अशा प्रकारे कमावलेल्या पैशाच्या समर्थनार्थ जर कुणी ग्रीड इज गुड इ. तत्वज्ञान मांडत असेलच, तर ते भाडोत्री विद्वानच असतील, ज्यांना अशा प्रकारे हरामाने कमवलेल्या पैशातून काही भाग तशाच हरामाने मिळविण्याची आशाळभूत लालसा असेल.

तुम्ही वरील प्रतिसादात म्हटलात तशा प्रकारच्या मनोवृत्तीबद्दल लिखाण करावयाचे असेलच, तर अ‍ॅन रँडचे उदाहरण अस्थानी/चुकीचे/दिशाभूल करणारे आहे, असे सुचवितो.

तसे नसावे

या पुस्तकाच्या वर्णनाखाली 'तिच्याच एका पुस्तकात ग्यासने मेलेल्या लोकांचा प्रसंग' घुसडून धागाकर्ते चुकीचे चित्र उभे करीत आहेत, असे म्हणावेसे वाटते.

धागाकर्त्यानी आतापर्यंत उपक्रमावर केलेले लेखन पहाता असे घुसडण्याची शक्यता फारच कमी वाटते. अर्थात आम्ही अशी विंग्रजी पुस्तके वाचायला जात नाही.पण तसा प्रसंग पुस्तकात असल्यास त्याचा संदर्भ धागाकर्तेच देउ शकतात.

संदर्भ

या पुस्तकाच्या वर्णनाखाली 'तिच्याच एका पुस्तकात ग्यासने मेलेल्या लोकांचा प्रसंग' घुसडून धागाकर्ते चुकीचे चित्र उभे करीत आहेत, असे म्हणावेसे वाटते.

संदर्भ:"Atlas Shrugged", p566-568

पूरक वाचन

या धाग्याशी संबंधित लोकसत्तेतील
१. सत्ता आणि संपत्ती
२. प्रश्नसत्ताक
हे लेख व DNA तील
३. सीमा मुस्ताफा यांचा Why care about the poor when you can win votes हा लेख
आणि
४.zombie objectivism
हे लेख कृपया वाचावे ही विनंती.

लेख छानच!

पण मला एक नेहमी प्रश्न पडतो.

स्त्री विरुद्ध पुरुष किंवा एक जात/धर्म/वर्ण/भाषा विरुद्ध आणि इतर जात/धर्म/वर्ण/भाषा अशी जेंव्हा विभागणी करून एकजण शोषक आणि दुसरा शोषित आहे अशी थिअरी मांडली जाते ते ठिकय कारण थिरिऑटीकली तुम्ही दोघांमध्ये रेघ आखू शकता. हे गरीब-श्रीमंतांच्या बाबतीत शक्यच नाहिये. त्यामुळे अशा थिअरीची बैठकच ठिसूळ नाही का?. अशी आभासी विभागणी करून राजकारणी स्वतःची पोळी भाजून घेत असतात.)

धर्म संकट ?

काही धनदांडगे . . . . कुठलाही विधिनिषेध न बाळगता अवैध वा गैरमार्गाने . . . पैसे कमवत . . . श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन मांडत असतात. आणि त्यांच्या हव्यासाला कुठलेही धरबंद नाहीत.

प्रोब्लेम असा आहे कि तुम्ही अवैध मार्गाने पैसा मिळविणे व श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन, या दोन पूर्ण वेगळ्या विषयांची गल्लत करीत आहात. अवैध वा गैरमार्गाने पैसे मिळवणे हे केव्ह्नाही चूकच. स्वत: १०X १० च्या खोपटात राहून ते सर्व पैसे गरीबांच्या आरोग्य सेवे करता खर्च केले तरी अवैध वा गैरमार्गाने पैसे मिळवणे चूकच. तुमचा रोख कशा वर आहे - अवैध मार्गाने पैसा मिळविणे या वर, का श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन या वर, हे आधी नक्की ठरवा. दोन्ही वर असेल तरी हरकत नाही, पण त्या करता दोन वेगळे लेख लिहा, म्हणजे प्रत्येकावर चर्चा वेगळी होईल.

आयटी अभियंते, डॉक्टर्स, लॉयर्स, नव्या पिढीतील उद्योजक . . . स्वत:ला नवश्रीमंत म्हणवून घेत असले तरी ते अजूनही उच्च मध्यमवर्गीय या सदरात मोडतात. व लेखाचा लक्ष्यही हा वर्ग नाही.
सचिन तेंडूलकर चे काय? उच्च मध्यमवर्गीय का नवश्रीमंत ? त्याचे नांव अश्या करता घेतले कि नक्की आकडा माहीत नाही पण अनेक लक्झरी कार्स, ५-६ लोकांना रहाण्यासाठी अनेक मजली घर, हे तर त्याच्या कडे पण आहे. पण त्याने ते गैर मार्गाने मिळविलेले नाही. मग ते श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन वगैरे म्हणायचे का? सचिनच्या हव्यासाला कुठलेही धरबंद नाहीत, असे म्हणायचे का? पैसा कसा मिळवला, व तो कसा खर्च केला या दोन भिन्न गोष्टींची मिसळ केल्यावर असे धर्म संकट येणारच.

छान

या निमित्त धागाकर्ते हे प्रतिसादकर्ते झाले

 
^ वर