धीरजभाई सोन्नेजी : एक वेगळ्या वाटेचा वाटसरू

धीरजभाई सोन्नेजी : एक वेगळ्या वाटेचा वाटसरू

अहमदाबादमध्ये इंजीनीयर ची सुखवस्तू नोकरी , राहतं घर , म्हणजे एकंदरीत अगदी सेटल्ड असं आयुष्य. तुमच्या माझ्यासारख्याला - जीने को और क्या चाहिये ! अहो, पण हे झालं , "शहाण्या" माणसांबद्दल. पण धीरजभाई एक "वेडा". पण एक "शहाणा" वेडा म्हणता येइल त्याला. शेवटी अशा मूठभर शहाण्या वेड्यांमुळेच तर जग चालतय ना !

तर ह्या धीरजभाइंनी साधारण २५ वर्षांपूर्वी अहमदाबाद सोडलं, एकाच वेडापोटी :- लागेल तेवढच खायचं,वापरायचं. ते सुद्धा , ही काळी आई [जमीन] देइल हा विश्वास. त्यांना आदिवासींचं जीवन भावलं, त्यांच्या कडून प्रेरणा घेत घेत, असंख्य वेळा चुकत-सावरत , त्यांनी पत्नी स्मितासमवेत एका वेगळ्याच आयुष्याचा पाया रचला.

साकवा या नर्मदेजवळच्या गावी त्यांनी जमीन घेतली. सगळं कुटुंब - ते,पत्नी , २ मुलं आणी सून असे मिळून जमीन स्वत: कसतात. साधारण २० प्रकारची धान्यं, विविध फळं, कडधान्यं, भाज्या हे सगळं फक्त १ एकरातून निघतं. पावसाच्या पाण्यावर. उरल्येल्या १ एकरात घर, छोटस्सं वर्क-शॉप इ. आहे.

शिवाय त्यांनी एक बियांपासून तेल काढण्याचं विजेवर "न" चालणारं यंत्रसुधा विकसित केलंय.घरगुती औषधे सुधा ते बनवतात.

प्राथमिक्त: ह्या सगळ्यातून मिळणारं उत्पन्न ते फ़ोन,वीज वगैरे खर्च भागवण्यासाठीच वापरतात. बाकी सगळं "काळी आई" च देते. पैशांचा प्रश्न येतोच कुठे ?

लिव्हिंग विथ द मिनिमम चं चालतं बोलतं उदाहरण !

कसे जाल ?

सग्ग्ळ्यात आधी सांगयचं म्हणजे - नुसतं टूरिस्ट म्हणून जावू नका, त्यांना याचा खूप त्रास होतो.म्हणजे गम्मत म्हणून, फिरत फिरत , "सरदार प्रकल्पाबरोबर हे पण" करू नका. खास आस्थेनी गेलात तर तितकंच प्रेम दाखवणारे धीरजभाई , त्यांचे कुटुंबीय हे तुम्हाला नक्कीच भावतील, ह्यात शंकाच नाही. जायला बेस्ट मार्ग म्हणजे : (मुंबई-पुणे-नाशिक कडून गेल्यास) : अंकलेश्वर पर्यंत ट्रेन. तिकडून जी.आय.डी.सी. बस स्टॉप वरून राजपिपला.राजपिपला वरून केवडिया कॉलनी ला जाणा~या बसेस किंवा शेअर रिक्शा. बडोद्या वरून किंवा भरूच वरून सुधा असेच जाता येते.

अगदी माझ्या सारखा ऑफ-बीट "किडा" असेल तर : धुळे-अक्कल्कुवा-देढिया पाडा-राजपिपला ह्या मार्गे पण जाता येइल. फक्त धुळ्याला ए.टी.एम. वरून पैसे काढून घ्या. राहायचे झाल्यास धुळेच बेस्ट. किंवा राजपिपला. अंतरांवर जाऊ नका. खूप वेळ लागतो. मी सगळा प्रवास एस.टी. नेच केलाय.

टीप : एस्टी महामंडळाच्या ४ दिवस प्रवास योजनेने गेलात , तर पैसे खूप वाचतात, हव्वा तो मार्ग निवडता येतो , आणी सुट्ट्या पैशांची कटकट रहात नाही.

खूप सुंदर - नर्मदेच्या जंगलातून हा प्रवास होतो.स्थानिक आदिवासी लोकांची बस मधे होणारी चढ-उतार , ह्या छोट्या-छोट्या गोष्टी सुधा आपल्याला स्वत: पलीकडे घेऊन जातात.

मग , आहात तयार एका मुलुखावेगळ्याला भेटायला ?

त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे. इथे जाहीर प्रदर्शित करीत नाहीये , त्यांच्या विनंतीवरून, इतकच ! मला व्यक्तिगत निरोप करा , नक्की देइन. किंवा मला फोन करा- ९८५०९९७११० [पुणे]

आपला ,
सौमित्र

Comments

आभार!

रोचक माहिती.. अनेक आभार!

कौतुक नेमके कशाचे?"

२५ वर्षांपूर्वी अहमदाबाद सोडलं, एकाच वेडापोटी :- लागेल तेवढच खायचं,वापरायचं.

कोणी कोठे व कसे राहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण त्या पलीकडे जावून विचार केल्यास काही प्रश्न / मुद्दे समोर येतात.

"लागेल तेवढच खायचं वापरायचं" हे अहमदाबादेत राहून नोकरी करत सुद्धा करता आल असत. त्या करता शहर व नोकरी सोडण्याची काहीच गरज नव्हती. एक एकर जमीन घेणे, ती कसणे व त्यावरच जगणे हा सर्व खटाटोप करून त्यांनी नेमक काय सिद्ध केलं ?

साधारण २० प्रकारची धान्यं, विविध फळं, कडधान्यं, भाज्या हे सगळं फक्त १ एकरातून निघतं. पावसाच्या पाण्यावर.

शेतीची व शेतीच्या अर्थ-व्यवहाराची प्राथमिक माहिती असलेल्यांना यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. तुम्ही खोटे सांगत आहात अस नव्हे. पण तुम्ही तिथे पूर्ण एक शेती-वर्ष राहून याची शहानिशा केली का? का तुम्ही तिथे चार-पाच दिवसां करता गेलात व धीरज भाईनी जे सांगितले त्यावर (डोळे झाकून) विश्वास ठेवलात? २० प्रकारची कोणती धान्ये, कोणती विविध फळे, कडधान्ये, व कोणत्या भाज्या; या पैकी प्रत्येक पीक कोणत्या महिन्यात पेरतात व किती एरियात, व त्यातून किती किलो उत्पादन येते याची आकडेवारी दिलीत तर आम्हा वाचकांना ते पचवायला जरा सोपे होईल.

शिवाय त्यांनी एक बियांपासून तेल काढण्याचं विजेवर "न" चालणारं यंत्रसुधा विकसित केलंय.

विजेवर चालणार्या तेल यंत्रांच्या तुलनेत धीरजभाईचे यंत्र अधिक कार्यक्षम आहे का? (एक किलो बियातून किती तेल?) जर नसेल, तर मग ते का वापरावे? त्या पुढे, विजेचा शोध लागायच्या अनके शतके आधी पासून तेलबीयांतून तेल काढले जात आहे. तेव्हां तेल काढण्याचं विजेवर "न" चालणारं यंत्र बनविणे हा काही नवीन शोध नव्हे. विजेवर "न" चालणार्या जुन्या यंत्रांच्या तुलनेत तरी धीरजभाईचे यंत्र अधिक कार्यक्षम आहे का? तेवढे पण नसेल, तर कौतुक नेमके कशाचे ?

प्राथमिक्त: ह्या सगळ्यातून मिळणारं उत्पन्न ते फ़ोन,वीज वगैरे खर्च भागवण्यासाठीच वापरतात.

ओहो, म्हणजे ते सुद्धा वीज व फोन वापरतात तर. मग तर "कौतुक नेमके कशाचे?" हा प्रश्न आणखीनच ठळक होतो.

घरगुती औषधे सुधा ते बनवतात.

म्हणजे नेमके काय ? तुम्ही आम्ही सुद्धा काढे, पाचक, चूर्ण, आलेपाक, इत्यादी घरी बनवतो. पण दुखणे वाढल्यास अलोपथीची औषधे घेतो, गरज पडल्यास शस्त्रक्रिया सुद्धा करवून घेतो. धीरजभाई पण गरजेनुसार अलोपथीची औषधे घेतात का? व जरी नसतील घेत, तर ते स्तुत्य आहे का? स्तुत्य नसेल, तर कौतुक कशाचे? व स्तुत्य असेल, म्हणजे अलोपथी unnecessary असेल, तर दुर्गम भागात अलोपथीची वैद्यकीय सेवा पुरविणारे अभय बंग किंवा प्रकाश आमटे यांना गरज नसलेली सेवा पुरविण्या बद्दल काय म्हणायचे ?

पण धीरजभाई एक "वेडा". . . . सगळं कुटुंब - ते,पत्नी , २ मुलं आणी सून असे मिळून जमीन स्वत: कसतात.

सून. म्हणजे मुलं लहान नसून एक मुलगा तरी वयाने सज्ञान आहे. तर त्यांची पत्नी, मुलं, व सून हे सर्व unanimously धीरजभाईच्या "वेडात" सामील आहेत, का त्यांच्या पैकी काहींना त्यांच्या इच्छे विरुद्ध यात सामील व्हावे लागले?

पैशांचा प्रश्न येतोच कुठे ?

येतो. अगदी नक्कीच येतो. दोन महत्वाचे मुद्दे.

१: शेतकरी स्वत:च्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन घेतात तेव्हां देश कृषी उत्पादनात स्वयंपूर्ण होतो. प्रत्येकाने आपल्या गरजे पुरते (व फ़ोन,वीज वगैरे खर्च पुरते) उत्पादन घ्यायचे हे निव्वळ अव्यवहार्य आहे.

२: धीरजभाईना दोन मुले आहेत. त्यांच्या नंतर प्रत्येक मुलाला अर्धा अर्धा एकर जमीन मिळेल. मग काय ? प्रत्येक मुलगा व त्याची दोन मुले, अर्धा एकर जमिनीवर जगण्याचा विक्रम करून दाखविणार? व त्याचा पुढच्या पिढीत एक चतकोर एकर जमिनीवर ? अर्थातच नाही. लवकरच या कुटुंबातील काहींना वेगळे व्हावे लागेल. आणखीन जमीन तरी घ्यावी लागेल, किंवा काही व्यवसाय करावा लागेल, किंवा नोकरी मिळेल असे शिक्षण घेउन नोकरी करावी लागेल. या पैकी कोणत्याही पर्यायाला पैसे लागतीलच. त्याच प्रमाणे, त्यांच्यावर अशी वेळ न येवो, पण जर कुटुंबातील कुणालाही अन्जिओप्लास्टी, केमोथेरपी, डायलेसिस, गेला बाजार सिझेरियन किंवा अगदी क्षुल्लक म्हणजे रूटकनाल याची गरज पडली तरी पैसे लागतीलच. तेंव्हा, पैशांचा प्रश्न येतोच, अगदी नक्कीच येतो.

शेवटी अशा मूठभर शहाण्या वेड्यांमुळेच तर जग चालतय ना !

अजिबात नाही. जग चालविण्यात अशा मूठभर शहाण्या वेड्यांचे कोणतेही योगदान नाही. आर्थिक दुर्बल जनते करता मनरेगा, अन्न सुरक्षा योजना, शिक्षण, आरोग्य योजना इत्यादी चालविण्या करता पैसा व तंत्रज्ञान, दोन्ही लागते. व ते पुरविण्यात तथाकथित मूठभर शहाण्या वेड्यांचे कोणतेही योगदान नाही.

शेवटी एक प्रश्न तुम्हाला. येथ पर्यंत मी जे लिहिले त्यात मी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तुम्ही लेख लिहिण्या आधी यातील किती प्रश्न स्वत:ला विचारले ?

चेतन पंडित

शेवटच्या त्या दोन मुद्द्याना अनुमोदन.

हे सगळे त्यानी छंद आणि आवड म्हणून केलं... शहरी सुविधा नसताना माणूस क्रिएटिव व आन्ण्दात राहू शकतो, हे त्यानी अनुभवलं. धाडस केलं. त्याबद्दल नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत.

त्यानी हे प्रयोग एक एकरावरच केले आहेत.. त्यामुळे इतर व्य्वाहारिक शेतीत त्यांचा समावेश करता येत नाही. पण शहरात पैसा कमवून असे एकेक एकरचे प्लॉट घेऊन लोक स्वतः पुरतंच पिकवत बसले तर एक दिवस ९०% जनतेला दगड आणि प्लॅस्टिकच खावे लागेल.

हा हा हा

अससुद्धा जगता येवू शकतं , असं म्हणायचंय.

बाकी त्यातील शेतीविषयक तपशील वगैरे हवा असल्यास धीरज भाईंनाच संपर्क करणे योग्य.

प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार

प्रिय चेतन,

मला भावलेलं लिहिलंय, सविस्तर माहिती धीरज्भाईच देवू शकतील. मला थोड्या वेगळ्या वाटेने चालणा~यांबद्दल सतत आदर वाटत आलाय.

तसंच कुणाला वाटत असेल तर प्रेरक ठरू शकेल, ज्यांना पटू शकत नसेल त्यांनी सोडून द्यावं, अधिक सखोल महिती हवी असेल , तर वर म्हटल्याप्रमाणेच त्या व्यक्तीसच संपर्क करणे उचित !

धन्यवाद

रीव्हर्स अ‍ॅडवोकेट

कौतुक नेमके कशाचे?

पैशामागे धावणार्‍या किंवा भपका/बोभाटा करणार्‍या जगात स्वेच्छेने हवे तसे (अत्यंत साधेपणाने) जगण्याची इच्छा बाळगून तसे जिद्दीने जगुन दाखवणे हे कौतुक करण्यासाठी पुरेसे वाटत नाही का?

का ज्या कार्यामुळे इतरांना फायदा होतो फक्त त्याचेच कौतुक झाले पाहिजे असे वाटते?

सॉरी बॉस

१००मित्रा,
सध्याच्या शेतीतंत्राच्या ज्ञाना प्रमाणे एक एकर जमिनीतून व केवळ पावसाच्या पाण्यावर, तुम्ही लिहिल्या प्रमाणे उत्पादन निव्वळ अशक्य आहे. ते तसे शक्य असते तर विदर्भात व आंध्रप्रदेशात अनेक एकर जमीन असलेल्या दश-सहस्त्रावाधी शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली नसती. तेंव्हा वाचकांना "हे सगळे खरेच, का निव्वळ सुरस-चमत्कारिक" अशी शंका येणे साहजिकच आहे. "अधिक सखोल महिती हवी असेल, तर वर म्हटल्याप्रमाणेच त्या व्यक्तीसच संपर्क करणे" हे त्यावर उत्तर होत नाही. कारण तसा संपर्क वाचक तेंव्हाच करतील जेंव्हा त्यांना लेखातील माहिती प्रथमदर्शनी worth further inquiry वाटेल. एकादी नवीन गोष्ट वाचकांच्या नजरेस आणून देताना लेखकाची जबाबदारी आहे कि तो जे काही लिहीत आहे त्याची त्याने प्राथमिक शहानिशा करावी, व ती त्याने केली आहे हे त्याच्या लेखातून प्रकट व्हावे.

ज्यांना पटू शकत नसेल त्यांनी सोडून द्यावं हा अधिकार वाचकांचा आहेच. पण कोणताही लेखक आपला लेख वाचकांनी "सोडून द्यावा" या अपेक्षेने लिहीत नसतो. म्हणून, वाचकांना आपल्या लेखावर पुढे चौकशी करावी असे वाटण्या इतपत data तुम्ही पुरवायला हवा होता. अन्यथा आपल्या ई मेल मध्ये - तुम्हाला इतक्या कोटी डॉलरचे बक्षीस मिळाले आहे; ताबडतोब माहिती न दिल्यास तुमचा अकौंट बंद होणार आहे; आमचे औषध घेउन वजन घटवा किंवा उंची/लांबी वाढवा; असे अनेक मेल रोजच असतात व आपण delete करून टाकतो, तीच गत तुमच्या लेखाची होईल.

थोड्या वेगळ्या वाटेने चालणा~यांबद्दल आदर मला पण वाटतो. पण थोड्या वेगळ्या वाटेने चालण्याचा केवळ claim करणे; तसे खरोखर चालणे, हाल-अपेष्टा स्वत: भोगत व इतरांच्या माथी मारत, पण खरोखर चालणे; व थोड्या वेगळ्या वाटेने चालत काही निकषांवर यशस्वी होणे (निकष कोणते या वर चर्चा होउ शकते); या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

चेतन पन्डित

हा शेती - तंत्रज्ञानाविषयक लेख नाहीच

चेतन,

अरे , ना मी काही संशोधन करतोय , की मला तुझ्या-इतकं मुद्देसूद-वगैरे मांडता येतंय. आणी मी पहिल्यापासून म्हणतोय, जे मला भावलंय ते लिहितोय, संदर्भ आहे ना त्या व्यक्तीकडे.

मी काही ते पहायला गेलो नव्हतो , की संशोधनाला सुधा गेलो नव्हतो. एक आस्था, कुतुहल म्हणून त्या व्यक्तीला भेटलो आणी जे वेगळेपण जाणवलं ते मांडलं-बस्स !

सदर व्यक्ती ३-४ महिन्यांपूर्वी पुण्याला आली असता एका संध्याकाळी आम्ही त्यांना भेटलो, प्रथमदर्शनी जाणवला तो त्यांचा कमालीचा साधे-सच्चेपणा, मग मनातून वाटलं - ह्यांना भेटायलाच हवं-त्यांच्याकडे जावून-प्रत्यक्ष. भेटलो. बस्स. इतकं सहज.

बाकी लेख ज्यांना आवडतोय ते वाचतील , डिलीट करतील , किंवा अजून काही होईल, ठीक तेही.

शहरी, औद्योगिक विचारसरणीच्या चष्म्यातून

चेतनजी,

आपण उपस्थित केलेले मुद्दे "औद्योगिक" विचारप्रणालीनुसार योग्यच आहेत.
>>सर्व खटाटोप करून त्यांनी नेमक काय सिद्ध केलं ?
- सध्या सगळ्यांची धाव शहराकडे आहे. चांगलं जीवन जगायचं तर शहरातच स्थलांतर केलं पाहिजे असा विचार बहुसंख्य करत असल्याने खेडी ओस पडत आहेत व शहरे बकाल होत आहेत. ज्या काही योजना, सुविधा, संधी, पैशाचा ओघ आहे, तो शहरातच. या पार्ष्वभूमीवर धीरजभाई यांनी खेड्यात राहून 'कसं' जगता येतं, त्यातही जीवनाचा दर्जा काय असू शकतो हे दाखवून दिलं आहे. मी एकदा त्यांना भेटलो तेव्हा ते गमतीनं म्हणाले होते की, मी अंबानींपेक्षा चांगलं अन्न खातो, चांगली हवा घेतो, साधारणपणे ताणतणाव कमीच आहेत. त्यामुळे तुम्हीच ठरवा. ज्याला जे हवं ते त्यानं घ्यावं. आपल्याला काही सिध्द करायचं आहे, असा भाव मला तरी दिसला नाही.

>>२० प्रकारची कोणती धान्ये, कोणती विविध फळे, कडधान्ये, व कोणत्या भाज्या; या पैकी प्रत्येक पीक कोणत्या महिन्यात पेरतात व किती एरियात, व त्यातून किती किलो उत्पादन येते याची आकडेवारी दिलीत तर आम्हा वाचकांना ते पचवायला जरा सोपे होईल.
- त्यांचा उद्देशच मुळी उत्पादकता वाढवून विक्रम करणे असा नाही! ते शोधत असाल तर माफ करा. कुटुंबाच्या गरजेपुरतं पिकवतात. मला जी माहिती दिली त्यानुसार एका एकरात तीन भाग केले असून प्रत्येक भागात धान्य, डाळी व भुईमूग अशी आलटून पालटून पिके घेतात. तेवढे त्यांच्या कुटुंबाला आरामात पुरते. ऊरलेल्या जागेतल्या फळझाडांमधूनही फळे मिळतात वर्षभर वेगवेगळी. अर्थातच उत्पादनवेड व मार्केट ओरिएंटेशन नसल्याने रासायनिक खते, किटकनाशके वापरत नाहीत. त्यामुळे अन्नाचा दर्जा शहरातील लोकांच्या कल्पनेपलिकडचा. प्रचंड "चंगळवादी" जगतात ते!

तुमच्या ईतरही मुद्द्यांकडे पाहिले की असं वाटतं की धीरजभाईंनी काय भव्य दिव्य केलं, हे तुंम्हाला शोधायचंय. ते सापडलं की, मग सगळ्यांनी तेच करावं व प्रचंड विकास व्हावा. तर मग आंम्ही मानू. हीच ती औद्योगिक विचारधारा. आपणच जास्तीत जास्त लोकांच्या गरजा (असल्या तर ठीक, नाहीतर नव्या निर्माण करून) भागवणे (मार्केट शेअर), आपल्याकडे जास्तीत जास्त महत्व घेणे (ब्रंड), आलेख चढ्ता ठेवणे (उत्पादन, खप, फायदा), हे असंलं काही त्यांना करायचंच नाही हो. बाकी आपले शेतकरी मार्केटकडं तोंड करून काय करतायत हे पाहण्याजोगं आहे. दलालांकडून पिळवणूक, भाव सतत खालीवर, खते बी बियाणे यासाठी शासनावर अवलंबून, नगदी पीक - ऊस पिकवून, वाढीव दर मिळालाच पाहिजे (कारण सगळं विकत आणावं लागतं ना! शेतात ऊस सोडून काहीच पिकवत नाहीत!) यासाठी आंदोलनात हुतात्मा! त्यांचा जमीनी केंव्हाच क्षारपड झाल्या आहेत, आणि शहरात राहणार्‍या त्यांच्या मुलांना त्या कसायच्याही नाहीत.
बाकी शहरी, औद्योगिक जगणं सोडून लोक आता निसर्गस्नेही जगण्याचा पर्याय तुरळक प्रमाणात का होईना, विचारात घेऊ लागले आहेत. नुकताच खालील व्हिडीओ हाती लागला. जरूर पहा.
http://www.youtube.com/watch?v=aeSe4ekHFD0

-स्वधर्म

पाच माणसांच्या कुटुंबाला खेड्यात जास्तीत जास्त २५०० -३००० खर्च येतो. म्हणजे एक एकर शेतात हे केवळ ३६००० चे उप्तादन काढत आहेत. यात विषेष ते काय? एक एकरात साधारणपणे एक लाखाचे उत्पन्न निघायला हवे... म्हणजे हे लोक स्वावलंबनाच्या नावाने जमिनीची नासाडीच करत आहेत.

पाच माणसांसाठी त्यानी १/२ किंवा १/३ एकर इतकीच जमीन वापरायला हवी. तरच ते अल्पसंतुष्ट आहेत, असे समजता येईल . अन्यथा एक एकरात चार लोकांच्या गरजे इतकेच पिकवणे हे काही फार मोठे दिव्य नव्हेच.. उलट, आणखी पाच जणांच्या उत्पादनाचे ते नुकसानच करत आहेत. त्यानी अर्धा एकर रानातच जगावे. उरलेले अर्धा एकर कुणाला तरी कसायला द्यावे. त्यातून आणखी चार पाच जणांच्या अन्नाचा प्रश्न सुटेल.

आधी बरीच वर्षे शहरात होते. त्या पगाराचा पैसा, त्याचे व्याज हेही उत्पन्न सुरु आहेच ना? का, ते पैसे त्यान्नी दान केलेत हो? शहरात घरही होते, ते खेड्यात येताना विकले की भाड्याने दिले आहे ? - हे नाही का विचारलेत?

माझ्या बचतीवर मला पुरेसे व्याज मिळणार असेल तर मी एक एकर शेतीच कशाला, एक शेळी आणि एक मांजर घेऊनही आनंदाने जगून दाखवीन.

शहरात पगार वगैरे न कमवता, सगळी जवानी एक एकर शेतीतच घालून त्यातल्याच उत्पन्नावर कुटुंब पोसणारे लोक भारतात कमी नाहीत. वेळ असेलच, तर त्यांच्याशी गप्पा मारा. शहरातला पगार एफ डी त ठेवायचा आणि कुठेतरी एक एकरात चार माणसासाठी चार भाज्या पिकवायच्या, याच्यात काही भव्य आहे किंवा नाही, हे तेंव्हा समजेल.

कथा सत्य घटणेवर आधरित ?

असं वाटतं की धीरजभाईंनी काय भव्य दिव्य केलं, हे तुंम्हाला शोधायचंय.
अजिबात नाही. मला काय शोधायचं आहे हे मी अगदी स्वच्छ लिहिलेलं आहे. पण ते तुमच्या नजरेतून सुटल असाव म्हणून पुन्ह: कॉपी करतो. सध्याच्या शेतीतंत्राच्या ज्ञाना प्रमाणे एक एकर जमिनीतून व केवळ पावसाच्या पाण्यावर, तुम्ही लिहिल्या प्रमाणे उत्पादन निव्वळ अशक्य आहे. ते तसे शक्य असते तर विदर्भात व आंध्रप्रदेशात अनेक एकर जमीन असलेल्या दश-सहस्त्रावाधी शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली नसती.

तेंव्हा पहिला प्रश्न असा आहे कि मूळ लेख हा fiction या वर्गात मोडतो का non-fiction. मूळ लेखक १००मित्र यांनी "अरे , ना मी काही संशोधन करतोय" वगैरे लिहून चर्चेला पूर्ण विराम दिला. तुम्ही ते परत उकरून काढलेत. तेंव्हा तुम्ही सांगा, धीरजभाईं तुम्हाला जे काही सांगतात, त्याची तुम्ही काय पडताळणी व कशी केलीत? आपण बघतो कि कोणी तरी बाबा हवेतून गुलाबजामून काढून देतात व असंख्य लोक त्यावर विश्वास ठेवतात. काही लोकांना येवढे कळते कि हवेतून गुलाबजामून काढता येत नाहीत. ती निव्वळ हातचलाखी असते. पण तरी तुमच्या-आमच्या सारख्यांना ती हातचलाखी नेमकी पकडता येत नाही. ते जादूची माहिती असलेला जादूगारच करू शकतो. एक एकर जमीन, पावसाच्या पाण्यावर शेती, रासायनिक खते न वापरता, पाच जणांचे कुटुंब चालविता येते हे fiction का non-fiction हा टप्पा आधी पार करवा मग इतर मुद्दे नंतर पाहू.

धीरजभाई यांच्या प्रयोगाचे मोल

सर्वांच्या प्रतीसादाबद्दल...
मी धीरजभाई यांना एकदा भेटलो आहे, पण १००मित्र हे तिथे जाऊन आले आहेत व त्यांचे लिखाण वाचून आधिक माहिती मिळाली. मी जेंव्हा त्यांना भेटलो, तेंव्हा त्यांच्या या प्र्योगातले तत्व समजून घ्यायचा प्रयत्न केल होता, पण ते नक्की निव्वळ शेतीत्तून किती कमावतात, त्यांच्या किती ठेवी आहेत व त्याचे व्याज किती, त्यांनी अहमदाबादेतले घर भाड्याने दिले का, हे पहिल्याच भेटीत विचारणे मला तरी गरजेचे वाटले नाही. असो. त्यांच्याकडे जाण्याचा विचार आहे व तेंव्हा कदाचित आधिक आर्थिक तपशील जाणून घेता येतील. पण मुख्य मुद्दा ऋषीकेश यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या गरजा मर्यादित ठेऊन, साधेपणाने, शेती करून जगता येते व शहरी जीवन सोडून ते तिथे आनंदाने जगत आहेत असे जाणवले तो होता.
बाकी आंध्रातील, विदर्भातील शेतकरी असे का करत नाहीत, हा मोठा जटील प्रश्न आहे व त्याची कारणेही अनेक असतील. तो फार मोठ्या चर्चेचा विषय आहे व त्यावर ईथेही काही धागे निघाले होते (गंगाधर मुठे यांनी काढलेला धागा आठवतो). धीरजभाई हे त्यातलेच एक नाहीत आणि त्यांनी स्वावलंबी शेती करून मर्यादित उपभोग घेत साधेपणाने राहण्याचा केलेल्या प्रयोगाचे मोल कमी होते असे वाटत नाही.
-स्वधर्म

मराठ्वाड्यातील सर्व च शेतकरी असे आहेत

ह्यात काय विषेश आहे? सर्व च गरीब शेतकरी असे जीवन जगतात. एका एकरावर ४ माणसांचे कुटुंब पोसले जाणार नाही, ते सुदधा mobile आणि वीज वापरुन.

असे असते तर सर्व च छोटे शेतकरी मजेत राहीले असते.

@चेतन पंडीत. - मुद्देसुत उत्तर.

हा हा..

पन्डितांशी सहमत.

लेखात धीरजभाईंबद्दल सोडून इतर माहिती आवडली. :)

मी पुनः ह्या चर्चेत न उतरल्यास माफी.

सर्वांच्या प्रतिक्रिया पाहून असंच वाटतंय की चर्चा बंद झाली होती हेच योग्य होते. [माझ्या दृष्टीने]

आखरी रास्ता सिनेमात एकिकडून ६ आकडा आणी एकीकडून ९ आकडा दाखवून बच्चननी दोन्ही बाजू कशा दोन्हीकडनं योग्यच असतात असं दाखवलं होतं.

तश्शीच गोष्ट आहे ही- बस्स !

बाकी कुणाबद्दल ना खेद , ना प्रेम.

पुनः एकदा सांगतो - फक्त वेगळ्या प्रकारे जगता येतं- असं जाणवलं म्हणून , सदर लेख लिहिला.

मी पुनः ह्या चर्चेत न उतरल्यास माफी.

आण्णा, वेबावर चर्चा म्हणजे नाना तर्‍हेचे विचार लोकांकडून येणारच.. निवांत रहायचं.

सहमत

वेबावर चर्चा म्हणजे नाना तर्‍हेचे विचार लोकांकडून येणारच.. निवांत रहायचं.

आणि आपलं तेच बरोबर हे पण थोडं बाजूला ठेवायचं :)

तुम्ही मुळातच चुकीचे लिहिले तर त्याला आम्ही बरोबर का म्हणायचे?

नपेक्षा, मग घरातच बसावे आणि तुमची हां जी हां जी करायला पगार देऊन भाट ठेवून घ्यावेत.

सापेक्ष

चर्चांमधले चुक बरोबर सापेक्ष असते वेबावर. आम्ही वेबावर अशी मराठी संकेतस्थळे सुद्धा पाहिली आहेत हां जी हां जी साठी तयार झालेली. तुम्ही पगार देऊन ठवले असतील कधी तर तो तुमचा अनुभव.

 
^ वर