खैरलांजी हत्याकांडात न्याय मिळाला का ?
खैरलांजी हत्याकांडात न्याय मिळाला का ?
उद्या २९ सप्टेंबर २०१२ रोजी खैरलांजी हत्याकांडाला ६ वर्षे पूर्ण होतील, आणि कधीही बऱ्या न होणाऱ्या आमच्या काळजाच्या जखमा पुन्हा रक्ताळ्तील, उद्या या घटनेविरुद्ध कुठे शोक सभा होतील, कुठे श्रद्धांजली वाहिली जाईल, कुठे निदर्शने केली जातील, एकाद्या न्यूज च्यानेल वर विषय घेतला जाईल आणि काही निकाल लागण्यापूर्वीच आमची वेळ संपली म्हणून विषय बंद हि केला जाईल, पण या सर्व गोष्टीतून आम्हाला मात्र तीव्र वेदना जरूर होतील, या बेगडी पुरोगामी महाराष्ट्रात आमच्या आया, बहिणी, बांधव, सुरक्षित आहेत का ? आज हि कित्येक गावात सर्रासपणे रोज खैरलांजी घडत आहे, कित्येत भोतमांगे आज वेगवेगळ्या नावाने या जातीयतेचे बळी पडत आहेत. पुन्हा पुन्हा एकदा सरकारच्या जातीयता निर्मूलनाच्या हेतूवर प्रश्न चिन्ह उभे राहत आहे, या निमित्ताने जाणून घेऊ खैरलांजी प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम.... तत्पूर्वी अमानुष जातीय हत्याकांडात बळी पडलेल्या भोतमांगे कुटुंबातील सुरेखा, प्रियंका, सुधीर आणि रोशन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.....!
महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात महाराष्ट्रातील समाजजीवन ढवळून टाकणारे खैरलांजी हत्याकांड २९ सप्टेंबर २००६ ला घडले. या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळापासून संसदेपर्यंत उमटले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली.घटनेनंतर राज्यभर आंदोलनांचे लोण उसळले. घटनेनंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल १५ सप्टेंबर २००८ रोजी लागला. न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवले.
हत्याकांडाची पार्श्वभूमी आपण थोड्यात अश्या प्रकारे होती, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावात भोतमांगे कुटुंब स्वाभिमानाने जगात होते, छोट्याश्या शेतीच्या तुकड्यामध्ये शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते, रोशन हा डोळ्याने अंध होता, प्रियांका शाळा शिकत होती, टापटीप आणि सुशिक्षित महाराची पोर जाता येता गावातल्या जात्यंध डोळ्यांना सलत होती, भोतमांगेच्या शेतामधून गावकऱ्यांसाठी रस्ता देण्यावरून अधून मधून खुसपूस होतच होती.
धुसाळा गावचा पोलीस पाटील सिद्धार्थ गजभिये भोतमांगे कुटुंबियांच्या ओळखीचा होता, त्याचे भोतमांगे कुटुंबियांकडे अधून मधून येणे जाणे होते, दुसऱ्या गावातील पोलीस पाटील या महारांच्या घरी येतोय, गावगुंड कसे आणि किती सहन करणार, त्यामुळे भोतमांगे कुटुंबीय गावगुंडाच्या नजरेत जास्तच सलत होते, गावातील अशिक्षित आणि बुरसटलेल्या विचारणा त्यागून भोतमांगे कुटुंबीय बाबासाहेबांच्या विचारावर चालत होते, सावित्रीची लेक बनून शिक्षणाचा ध्यास घेत होते, हेच गावगुंडांच्या विखारी नजरेस खुपत होते.... भोतमांगे कुटुंबाविरुद्ध आपला राग व्यक्त करण्यास फक्त एक कारण हवे होते आणि ते कारण एके दिवशी घडलेच....!
खैरलांजी गावचा सकरू बिंजेवार हा धुसाळा गावचा पोलीस पाटील सिद्धार्थ गजभिये याच्या शेतामध्ये काम करीत असे. त्याच्या मजुरीचे २५० रुपये सिद्धार्थने न दिल्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले आणि त्यात सकरूला मारहाण करण्यात आली. त्याचा बदला घेण्यासाठी ३ सप्टेंबरला सकरूचा मुलगा गोपाल, शिवचरण मंडलेकर, कन्हैया मंडलेकर आणि जगदीश मंडलेकर यांनी सिद्धार्थ गजभियेचा पाठलाग करून त्याला मारहाण केली. सिद्धार्थच्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी १६ सप्टेंबरला गुन्हा दाखल करून १२ जणांना अटक केली. हा गुन्हा अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार न होता नागरी हक्क संरक्षण कायद्यानुसार दाखल झाला होता.
"तुम्ही जामिनावर सुटले असला तरी सिद्धार्थ गजभियेची माणसे शस्त्रे घेऊन तुमच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, तेव्हा सावध राहा", असे दिलीप ढेंगे याने भास्कर कढव याला मोबाईलवर सांगितले. हे ऐकून चिडलेल्या आरोपींनी सिद्धार्थ आणि त्याचा भाऊ राजन यांचा शोध घेतला परंतु, ते दोघे सापडले नाहीत. त्यामुळे बदला घेण्यासाठी हे आरोपी भोतमांगे यांच्या घरी गेले.
सिद्धार्थ गजभियेच्या बाजूने साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी भोतमांगे कुटुंबातील सुरेखा (३८), प्रियंका (१८), सुधीर (२२) आणि अंध रोशन (१८) या चौघांची जातीवाचक शिवीगाळ करून काठय़ा आणि सायकलच्या चेनने मारहाण करून हत्या केली. महिलांचा विनयभंग करून त्यांचे निर्वस्त्र मृतदेह बैलगाडीत टाकून साडेतीन किलोमीटर अंतरावरील कालव्यात फेकून देण्यात आले. ही घटना घडताना या अमानुष हल्ल्यात एकमेव व्यक्ती वाचली भैयालाल भोतमांगे. भैय्यालाल वाचल्यामुळे सदर हत्याकांड उघडकीस आले, अन्यथा दररोज अश्या प्रकरच्या घडणाऱ्या घटनांचा सुगावा देखील लागत नाही, कारण प्रत्येक वेळी भैयालाल वाचत नाही.
या घटनेबाबत कळूनही सिद्धार्थने या कुटुंबाला काही मदत केली नाही. घटनेपूर्वी सुरेखाने तिचा भाचा राष्ट्रपाल नारनवरे याला फोन करून, आपण साक्ष दिलेली असल्याने काही घडू शकते, अशी भीती व्यक्त केली होती. आपला आंधळगाव पोलिसांवर विश्वास नसल्याचेही तिने सांगितले. त्यावर, तू वरठीला येऊन जा, असे राष्ट्रपालने तिला सांगितले होते. मात्र, सुरेखा तिकडे गेली नाही आणि हल्ल्याला बळी पडली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी प्रियंकाचे प्रेत वडगाव शिवारात सापडले.’ तिसऱ्या दिवशी, म्हणजे १ ऑक्टोबरला सुरेखा, रोशन व सुधीर यांचे मृतदेह कालव्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. पोलिसांनी याप्रकरणी आधी २८ जणांना अटक केली. नंतर इतरांच्या अटकेमुळे ही संख्या ४४ वर गेली. आरोपींकडून १२ काठय़ा आणि सायकलच्या ८ चेन जप्त करण्यात आल्या.
पोलिसांनी या प्रकरणी १ ऑक्टोबर २००६ ला गुन्हा दाखल करून २७ डिसेंबरला भंडारा येथील सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सी.बी.आय. ने या प्रकरणी ४७ जणांना आरोपी केले होते परंतु, त्यापैकी ३६ जणांची न्यायालयाने सुटका केली. शेवटी ११ आरोपींवर खटला चालला. ४ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह एकूण ३६ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यापैकी महादेव झंझाळ हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाला. त्यासाठी याला ३ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
भंडाऱ्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. दास यांनी या प्रकरणाची सुनावणी करून १५ सप्टेंबर २००८ ला निकाल जाहीर केला. खून, पुरावा नष्ट करणे, बेकायदेशीररीत्या मंडळी जमवणे व दंगा करणे, या आरोपांखाली त्यांनी आठ आरोपींना दोषी ठरवले. दोघांची पुराव्याअभावी तर, एकाला संशयाचा फायदा देऊन अशा तीन आरोपींची न्यायालयाने सुटका केली होती. या हत्याकांड प्रकरणी सुरवातीला ४७ जणांना अटक करण्यात आले होते. मात्र, त्यांतील ३६ जणांची "सीबीआय'ने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर उरलेल्या अकरा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. या हत्याकांड खटल्याचा निकाल भंडारा येथील सत्र न्यायालयाचे न्या. एस. एस. दास यांनी २४ सप्टेंबर २००९ रोजी दिलेला आहे.
त्यातील आरोपींच्या शिक्षेला आव्हान देण्यात आले होते. सरकारच्यावतीने आरोपींच्या शिक्षेत वाढ करण्यात यावी आणि आरोपींविरोधात अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये खटला मान्य करण्यात यावा म्हणून केंदीय गुप्तचर खात्याच्यावतीने दोन अर्ज करण्यात आले होते. त्यावर न्या. ए. पी. लवांदे आणि न्या. आर. सी. चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. तेव्हा ऍड. खान यांनी आज प्रत्यक्ष साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी न्यायालयासमोर सादर केली.
भोतमांगे कुटुंबीयांच्या हत्याकांडातील प्रमुख साक्षीदार म्हणून भोतमांगे यांचा शेजारी मुकेश पुसाम याला सरकारी पक्षाने सादर केले होते. घटनेच्या वेळी पुसाम हा घरात होता. तेव्हा त्याला जगदीश मंडलेकर याचा जोराने शिवीगाळीचा आवाज आला. त्यामुळे पुसाम घराबाहेर येऊन उभा राहिला. तेव्हा जगदीश मंडलेकर याने शिवीगाळ करून भोतमांगे कुटुंबीयांना जीवे मारण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करताना पाहिले. जमावाचा आवाज ऐकून सुरेखा भोतमांगे घराबाहेर आली होती. तिने गोठ्याला आग लावली तसेच नंतर जमावाने तिला पकडून लाठ्या आणि सायकलचेनने मारताना पुसामने बघितले होते. पुसामने त्या सातही आरोपींची नावे न्यायालयात साक्षीतून दिलेली होती. तसेच त्याने दिलेली नावे ही न्यायदंडाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बयाणातही आहेत. त्यामुळे त्याची साक्ष ही प्रमुख मानली गेली. पुसामच्या साक्षीनुसार, आरोपींनी प्रथम सुरेखाला नालीत टाकून लाथा, काठी आणि सायकलचेनने मारले. नंतर तिचा मृतदेह रस्त्यावर आणून टाकला. नंतर त्यांनी सुधीरला घेरून मारले आणि त्याचा मृतदेहही तिच्या शेजारी आणून ठेवला. त्यानंतर रामदास खंडातेच्या गोठ्यात लपून बसलेल्या रोशनला मारून तिथे आणले. तर प्रियांकालाही अशाप्रकारे मारून तिथे आणल्याचे पुसामने साक्षीत नमूद केले आहे. दरम्यान, रोशन हा त्यावेळी जिवंत होता. त्याने आपला जीव वाचविण्यासाठी आरोपींना याचना केली होती; मात्र भोतमांगे यांना मारल्याची बाब कुणाला सांगितली तर अशीच दशा केली जाईल; म्हणून जगदीश मंडलेकरने धमकावले होते. त्यामुळे घाबरून पुसाम आपल्या घरात गेला. तेथून त्याने आरोपींना भोतमांगे कुटुंबातील चौघांना बैलगाडीतून नेताना बघितले होते. त्यावेळी कोण बैलगाडी हाकत होता; तसेच त्यामागे कोण जात होते, त्यांची नावेदेखील पुसामने साक्षीतून दिलेली आहेत.
या प्रकरणात पोलिसांनंतर सीबीआयकडे तपास देण्यात आला होता. मुख्य घटनेचा पंचनामा करण्यात आलेला नाही, सुरेखा भोतमांगे हिचे शव कोठे सापडले याचा पंचनामा केलेला नसणे, घटनास्थळाचे वर्णन दोषपूर्ण आहे, असेही बचाव पक्षाने न्यायालयात सांगितले. मुकेश पुसाम घटनेच्या दिवशी गावात नव्हता, असा युक्तिवादही करण्यात आला. ज्या बैलगाडीतून प्रेत नेण्यात आले त्याच्या मालकाचा जाब नोंदवण्यात आलेला नाही. शिवाय, हत्याकांडात वापरण्यात आलेली हत्यारे न्यायालयात दाखवण्यात आलेली नाही, असेही बचाव पक्षाने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते.
फाशीची शिक्षा सुनावण्यात झालेल्या ६ जणांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेप ऐकवली. अन्य दोघांच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. हायकोर्टाच्या सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिगने हा निकाल जाहीर करताना न्या. ए. पी. लवांदे आणि न्या. रवींद चव्हाण यांनी सकरू बिंजेवार, शत्रुघन् धांडे, जगदीश मंडलेकर, प्रभाकर मंडलेकर, विश्वनाथ धांडे, रामू धांडे यांची शिक्षा कमी केली. तर गोपाल बिंजेवार आणि शिशूपाल धांडे यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्का बसवला.
खैरलांजी हत्याकांड जातीयवादातून घडले आहे. त्यामुळे सर्व आरोपींना ऍट्रॉसिटीअंतर्गत शिक्षा करण्यात यावी, असा अर्ज सीबीआयने दाखल केला होता. 29 सप्टेंबर 2006 रोजी संध्याकाळी गावकऱ्यांनी अचानक भैय्यालाल भोतमांगे यांच्या घरावर हल्ला केला होता. तेव्हा आरोपींनी जातीयवाचक शिविगाळ करुन घरातील एकेका सदस्याला पकडून ठार मारले होते. भैय्यालाल भोतमांगे यांनी केलेल्या तक्रारीत आरोपींच्या जातीचा उल्लेख केला असला तरीही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांमध्ये आरोपींच्या जातीचा उल्लेख तक्रारीत असणे अनिवार्य नसल्याचे नमूद केले आहे. खटल्यादरम्यान एका साक्षदाराच्या साक्षीत पाच आरोपी हे कलार जातीचे असल्याचा उल्लेख आलेला आहे. सदर बाब सत्र न्यायालयाने ग÷ाह्य धरली होती.तरीही सर्व आरोपींची ऍटॉसिटीअंतर्गत निर्दोष मुक्तता करुन सत्र न्यायालयाने ज्युडिशिअल एरर (न्यायीक चूक) केंली असल्याचा युक्तीवाद सीबीआयचे वकील एजाज खान यांनी उच्च न्यायालयात केला होता. तसेच सर्व आरोपींना ऍट्रॉसिटी अंतर्गत शिक्षा करावी, अशी विनंती सीबीआयने केली होती. तर बचाव पक्षाने गावात जातीयवाद नसल्याचा दावा केला होता. तर सत्र न्यायालयाने ऍट्रॉसिटीतून मुक्त करण्याच्या निर्णयाचा आदर बचाव पक्षाने व्यक्त केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्याबाबत सत्र न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. आरोपींना प्रियंका व सुरेखा यांच्या विनयभंगाच्या आरोपातून मुक्त करुन सत्र न्यायालयाने गुन्ह्याची तीव÷ता कमी केली, असा युक्तीवाद करीत सीबीआयने या गुन्ह्याखालीही सर्व आरोपींना शिक्षा करावी, असा अर्ज केला होता. मात्र, सीबीआयचा हा अर्ज देखील न्यायालयाने निकालात काढला आहे.
हत्याकांडातील सहा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना २५ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनावली, १४ जुलै रोजी देण्यात आलेल्या या निकालाला सीबीआय लवकरच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार होती . हत्याकांडातील आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला भैय्यालाल भोतमांगे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून प्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती करणारी विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.
नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेला जगदीश मंडलेकर 13 फेब्रुवारी 2012 ला पॅरोलवर एका महिन्यासाठी गावी खैरलांजी येथे आला. दरम्यान, दम्याचा त्रास वाढल्याने त्याच्या पॅरोलचा कालावधी एका महिन्याने वाढविण्यात आला. तो 13 एप्रिलला कारागृहात परत जाणार होता. मात्र प्रकृती बिघडल्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
जर असेच एक एक आरोपी स्वत होऊन मरण पावू लागले तर न्यायचे काय ? आम्हाला न्याय कसा मिळणार जेव्हा या हरामखोर लोकांना फाशीवर लटकावले जाणार नाही तो पर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, सदर प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा दिली तरच कुठे यांचे जात्यंध हात पुन्हा असे कृतं करायला धजवणार नाहीत, या प्रकरणात ना सुरेखा आणि प्रियांका या भोतमांगे मायलेकींच्या विटंबनेचा गुन्हा दाखल झाला, ना दलित अत्याचारविरोधी कायद्याखाली गुन्हा नोंदवला गेला. कोणत्याही सर्वसामान्य खुनांप्रमाणेच इथल्या संवेदनाहीन चौकटीनं हा दावा चालवला आणि निकाल दिला. हत्याकांडातील प्रमुख आरोपींपर्यंत कायद्याचे हातच काय, बोटंसुद्धा पोहोचू शकली नाहीत. ज्यांना सजा सुनावली गेली तीही गुन्ह््याच्या स्वरूपाच्या तुलनेनं नगण्य म्हणावी अशी होती. कायद्यातील तरतुदी, त्याला आवश्यक असणारे पुरावे, किचकट कार्यपद्धती आणि कलमांचे ज्याच्यात्याच्या सोयीनं निघणारे अर्थ यांच्या जोडीला सत्ताधाऱ्यांच्या मनातले छुपे अजेंडेही नंतर स्पष्ट झाले. जणू काहीच झालं नसल्याप्रमाणं निर्ढावलेपणानं खैरलांजीला "तंटामुक्त गावाचा" पुरस्कार घोषित केला गेला. चहूबाजूंनी टीका झाल्यानं तो मागं घेतला गेला तरी सरकारची मानसिकता उघड झालीच. राज्य शासन उच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरल्यानेच आरोपींची फाशीची शिक्षा रद्द होऊन त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली गेलेली आहे. पुन्हा एकदा अनुसूचित जाती जमाती कायदा सक्षम करण्याची आणि जातीयता गाडण्यासाठी कार्यक्षम कार्यप्रणालीची उणीव भासते...!
माननीय न्यायालयाने इतर हत्याकांडाच्या प्रकरणा सारखेच न्यायदानाच्या गोंडस नावाने निकाल तर दिला, परंतु जातीवादाच्या बळी पडलेल्या खैरलांजी हत्याकांडातील निरपराधाना खरोखर न्याय मिळाला का ?
- अँड. राज जाधव...!!!
(सदर लेख इथेही वाचू शकता - http://advrajjadhav.blogspot.in/2012/09/blog-post_27.html)
Comments
आक्षेप
ही विधाने खोडसाळ आणि निराधार आहेत.
फुले म्हणजे इमाव (ओबीसी) आणि या हत्याकांडातील हल्लेखोरही ओबीसीच होते.
विकिपीडियावर असे नोंदले आहे की, "Caste consideration as a motive is not necessary to make such an offense in case of atrocity" अशी तरतूद प्रचलित कायद्यात आहे. ती तरतूद मला अन्यायकारक वाटते. केवळ, जातीय कारणाने (उदा., पाणवठा वापरण्यास विरोध, आरक्षणास विरोध, इ.) प्रेरित अत्याचारांसाठीच (उदा., दलित पँथरच्या एका मोर्चावर हल्ला करून शिवसेनेने महिलांची विटंबनाही केली होती असे वाचल्याचे स्मरते) असा कायदा वापरला जावा, वैयक्तिक तंट्यातून करण्यात आलेल्या हल्ल्यांसाठी हा कायदा वापरला जातो ते मला पटत नाही. साधारणतः, अशा चुकीच्या वापराला न्यायालये विरोध करतात (provisions can be invoked only when and if the prosecution establishes that the accused attacked, or in any way violated the victim, “on the ground” that the latter was SC/ST) ते मला योग्य वाटते.
गुन्हेगार तो गुन्हेगारच...
अहो फुले ओ.बीसी. होते असे म्हणून तुम्ही त्यांचे कार्य लहान करत आहात...फुलेंनी फक्त ओ.बी.सी. मुलींसाठी पुण्यामध्ये पहिले शाळा सुरु न्हवती केली.... गुन्हेगार हा गुन्हेगारच आहे...तो ब्राह्मण होता कि मराठा कि ओ.बी.सी समाजाचा होता कि मागासवर्गीय गणला गेलेला... गुन्हेगार तो गुन्हेगारच.... गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे.....!
'आम्ही'
"आमच्या काळजाच्या जखमा", "आम्हाला मात्र तीव्र वेदना", "आमच्या आया, बहिणी, बांधव", "आम्हाला न्याय कसा मिळणार", "आम्हाला न्याय मिळणार नाही", असे शब्द प्रयोग करून तुम्ही (=लेखकाने) 'सर्व एससी समाज' हा एक गट बनविला आहे आणि 'बाकी सारे समाज' हा दुसरा एकसंध गट तुमच्यावर (=एससी समाजावर) अन्याय करतो आहे असे चित्र आखले आहे. त्यावर माझा आक्षेप असा की ज्या ओबीसी समाजाच्या सदस्यांनी भोतमांगेंवर अन्याय केला त्याच ओबीसी समाजात महात्मा फुलेसुद्धा होते. त्यामुळे, संपूर्ण ओबीसी समाजाला किंवा इतर जातींना लेखकाने शत्रू समजू नये आणि 'आम्ही' विरुद्ध 'इतर' अशी विभागणी करू नये. 'बहुजन समाज' विरुद्ध 'उच्चवर्णीय' असे द्वंद्व रेखाटण्याऐवजी, बहुजनसमाजातच असलेले अंतर्विरोधसुद्धा ध्यानात घ्या ही विनंती.
जाती साठी वापरलेला नसून "पीडिता" साठी वापरलेला आहे
इथे आम्ही, आमचे, आम्हाला हा शब्द प्रयोग जाती साठी वापरलेला नसून "पीडिता" साठी वापरलेला आहे...हे लक्षात घ्यावे....!
मुळीच नाही
या गुन्ह्यात लोकस स्टँडी भैयालाल भोतमांगे यांना आहे. बाकी कोणीही 'पीडित' नाही, बाकी कोणीही जन्मठेपेविरुद्ध न्यायालयात वैयक्तिक याचिका दाखल केलेली नाही. "आमच्या आया, बहिणी, बांधव" हा वाक्यप्रयोग जातीसाठीच करता येतो.
जात विचारात न घेता
म्हणजे पिडीत भोतमांगेला आपलं समजणे गुन्हा ठरतोय तर......
मी त्याची जात विचारात न घेता फक्त पिडीत म्हणून आपलं संबोधले आहे.....
'आपले आया, बहिणी, बांधव'
गुन्हा आहे असे प्रतिपादन मी केलेलेच नाही. किंबहुना 'आपले' हा शब्दप्रयोग तुम्ही भोतमांगेंविषयी केलेलाच नाही, जातीसाठीच केलात. 'भोतमांगे आपले' असा तुमचा अर्थ असता तर, भोतमांगेंच्या किती आया, बहिणी, बांधव आहेत ते सांगा. त्यांचे बांधव म्हणजे कोणकोण व्यक्ती आहेत? शाळेच्या प्रतिज्ञेनुसार सारेच भारतीय बांधव असतात परंतु तुमची व्याख्या तशी नक्कीच नाही. तुमच्या लेखी बांधव म्हणजे जातीबांधव असाच अर्थ आहे.
आत्ताच पीडित झालेल्या व्यक्तींविषयी "या बेगडी पुरोगामी महाराष्ट्रात आमच्या आया, बहिणी, बांधव, सुरक्षित आहेत का ?" हा प्रश्न असूच शकत नाही. भविष्यात पीडित बनण्याचा धोका असलेल्या व्यक्तींविषयीच तो प्रश्न असू शकतो. अॅट्रॉसिटी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीने त्या व्यक्तींची सुरक्षितता वाढणार आहे असा तुमचा आशावाद आहे त्याअर्थी, तुम्ही तो शब्दप्रयोग समस्त एससी/एसटी व्यक्तींकरिता केलेला आहे.
दुसर्या
दुसर्या भागाशी सहमत आहे.
सत्य परिस्थिती बयान
जोशी साहेब...सदर प्रकरणातील फिर्यादी गुन्हा घडल्या नंतर पोलीस स्टेशनला गेला असता तेथील पोलिसांनी त्याला पिटाळून लावले होते, तीन दिवसानंतर काही सामाजिक संघटनांनी पाठपुरावा केला म्हणून गुन्हा दाखल करून मृतदेहांचा शोध घेतला असता तीन दिवसांनी मृतदेह भेटले, अख्या खैरलांजी गावामध्ये एक भोतमांगे कुटुंब होते, जेव्हा अख्खा गाव त्यांच्यावर तुटून पडला आणि जर तो फिर्यादी वाचला नसता तर कोण त्याची फिर्याद देणार होते ? आज हि खेड्या पाड्यात काय अवस्था आहे हे तुम्हाला नक्कीच माहीत असेल..त्यामुळे हे विधान खोडसाळपणाचे नसून सत्य परिस्थिती बयान करते....!
सत्य
"अशा अनेक घटना रोज घडतात" हे विधान भीती पसरविणारे आणि निराधार आहे.
नक्कीच नाही.... आणि भीतीदायक तर मुळीच नाही
नक्कीच नाही.... आणि भीतीदायक तर मुळीच नाही, माझ्या ब्लोग वर "अंततः हिंदू" या नावाच्या व्यक्तीने, हि घटना आम्हा मराठी ब्राह्मणांसाठी अभिमानाची गोष्ठ आहे अशी प्रतिक्रिया दिली होती... अर्थात ती मूर्खपणाची होती, पण अजूनही काय परिस्थिती आहे हे सांगून जातेच........!
संबंध कळला नाही
माझ्या ब्लोग वर "अंततः हिंदू" या नावाच्या व्यक्तीने, हि घटना आम्हा मराठी ब्राह्मणांसाठी अभिमानाची गोष्ठ आहे अशी प्रतिक्रिया दिली होती... अर्थात ती मूर्खपणाची होती,
ह्या घटनेशी मराठी ब्राह्मणांचा संबंध काय ते कळत नाही. मूर्खपणावर किंवा शहाणपणावर कुठल्याही एका जातीची मक्तेदारी नाही. पण ही कुणीतरी विष पेरण्याच्या दृष्टीने टाकलेली प्रतिक्रिया असू शकते.
दलित समाजावर अद्यापही आपल्या समाजात अन्याय होताना दिसतो हे खरे आहे. शंभर-दोनशे वर्षांपूर्वी काय भयानक परिस्थिती असेल? असो. मात्र प्रत्येक प्रकरणात जातीय ऍन्गल असतोच असे नाही. तो कधीकधी नंतरही जोडला जातो हेही लक्षात घ्यायला हवे.
ब्राह्मणाचा काही संबंध आढळला नाही,...
अंतःत हिंदू याने जी प्रतिक्रिया दिली होती ती मूर्खपणाची होती, हे मी आधीच नमूद केले या प्रकरणात प्रत्यक्षपणे ब्राह्मणाचा काही संबंध आढळला नाही, त्यामुळे त्याला कोणत्या माहितीच्या आधारे गर्व झाला हे कळले नाही....!
असहमत
"दररोज अश्या प्रकरच्या घडणाऱ्या घटनांचा सुगावा देखील लागत नाही" असे तुम्हीच नमूद केलेले आहे. त्यामुळे, त्या घटना घडतात हा तुमचा दावा आपोआपच निराधार ठरतो.
हा दावा कदाचित सर्वांमध्ये भीती (किंवा राग) पसरविणार नाही (आणि कलार/कुणबी समाजातील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना अभिमान वाटविण्यासही या दाव्याची मदत होऊ शकते). परंतु, एससी समाजात मात्र, भीती (आणि राग) पसरविण्यास तुमचा दावा नक्कीच कारणीभूत होऊ शकेल.
अंततः हिंदू या नावाने देण्यात आलेली प्रतिक्रिया नक्कीच मूर्खपणाची होती, या घटनेत पीडित, आरोपी, साक्षीदार, बळी, वकील, पोलिस, शवविच्छेदन करणारे डॉक्टर यांपैकी कोणीही ब्राह्मण नसावेत. आरोपी कुणबी/कलार होते. त्यामुळे, ओबीसी विरुद्ध एससी असा वाद टाळून ब्राह्मणांना लक्ष्य करण्यासाठी ती प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्यात आलेली असू शकते.
प्रतिक्रिया मूर्खपणाची .......
अंतःत हिंदू याने जी प्रतिक्रिया दिली होती ती मूर्खपणाची होती, हे मी आधीच नमूद केले या प्रकरणात प्रत्यक्षपणे ब्राह्मणाचा काही संबंध आढळला नाही, त्यामुळे त्याला कोणत्या माहितीच्या आधारे गर्व झाला हे कळले नाही....!
प्रश्न?
जर असेच एक एक आरोपी स्वत होऊन मरण पावू लागले तर न्यायचे काय ? आम्हाला न्याय कसा मिळणार जेव्हा या हरामखोर लोकांना फाशीवर लटकावले जाणार नाही तो पर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही
प्रत्येक व्यक्ती कि॑वा पिडिताच्या मतानुसार न्याय शक्य असेल असे कसे होणार?
कायदे कडक केले म्हणजे समाज व्यवस्था सुधारते असे जगात घडते ?
फिर्यादी ची अपेक्षा
आरुष गोराणे ..... तुम्ही रस्त्यावर जाणाऱ्या एकाद्या मुलीला शिटी वाजवली अथवा हात पकडला तर तुमच्यावर विनयभंगाची केस लागू पडते...पण इथे दोन स्त्रियांना मारहाण करून त्यांचे विवस्त्र अख्या गावातून धिंड काढली जाते...तरी विनयभंगाचा गुन्हा दाखल होत नाही... इथे न्यायालयाची चुकी नाही, ती कधीच नसते, केस कशी सदर केली जाते यावर पूर्ण केस चे भवितव्य असते.... या मध्ये पोलिसांनी केलेला हलगर्जीपणा, गावामध्ये राष्ट्रवादी आमदाराचा पगडा... मुख्त कारणीभूत ठरला...! जसे पुरावे कोर्टात सदर करणार तसाच कोर्ट निर्णय देणार...! आणि फिर्यादी ची अपेक्षा हीच असते कि आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी...आणि ती गैर देखील नसावी...!
कोर्ट निर्णय
या मध्ये पोलिसांनी केलेला हलगर्जीपणा, गावामध्ये राष्ट्रवादी आमदाराचा पगडा... मुख्त कारणीभूत ठरला...! जसे पुरावे कोर्टात सदर करणार तसाच कोर्ट निर्णय देणार...!
फिर्यादी ची अपेक्षा
फिर्यादी ची अपेक्षा हीच असते कि आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी...आणि ती गैर देखील नसावी...!
न्याय
अधिक शिक्षा व्हावी अशी अपेक्षा चुक नाही पण नैसर्गिक मरण आल्यास त्याला काय करणार? समजा न्याय लवकर मिळाला तरी त्याने काय फरक पडणार?
निसर्गाच्या पुढे कोण जाणार ?
निसर्गाच्या पुढे कोण जाणार ? शेवटी फिर्यादी चे म्हणणे असते कि, आरोपीला गुन्ह्याची शिक्षा जेवढ्या लवकर देता येईल तेवढे बरेच....इथे सांगण्याचा उद्देश हाच आहे कि, सर्व आरोपी नैसर्गिकरित्या मृत्यू पावण्यापूर्वी आरोपींना कडक शिक्षा व्हावी....!
हम्म...
लेखातली भाषा थोडीशी कर्कश्य असली तरी सगळा घटणाक्रम वाचून वाईट वाटलं. (बातम्यातून वगैरे तुकड्यांमध्ये वाचलं होतं).
मागच्या वर्षी कर्नाटकात हॉस्पेटजवळच्या एका गावात गेल्यावर अजुनही गावाच्या बाहेर असलेली वडारवस्ती बघून सखेद आश्चर्य वाटलं होतं.
"फक्त तुम्हास"
दादा कोंडके साहेब उपक्रम वर जवळपास ३६७ वाचणे झाले आणि कित्येकांनी प्रतिक्रिया दिल्या परंतु लेख वाचून "फक्त तुम्हास" वाचून वाईट वाटले, इतरांनी मात्र लेख कसा दोषपूर्ण आहे यावरच भर दिला, हि घटना किती गंभीर आणि दुर्दैवी होती हे कोणास वाटले नाही... ...असो धन्यवाद.....!
ब्लॉगच्या वाचकांकडून काय अपेक्षा होती ?
जाधव साहेब,
जे घडले ते अत्यंत वाईट, क्रूर, दुर्दैवी, इत्यादी होते या बद्दल हा ब्लोग वाचणारे सर्वच सहमत असतील. ते त्यांनी त्या शब्दात व्यक्त नाही केले तरी सुद्धा. अशी एखादी घटना घडली, कि महत्वाच्या व्यक्तीनी त्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्याची पद्धत आहे, व त्यांनी तो तसा केला का नाही, याला काही अर्थ असतो. मला नाही वाटत कि या ब्लॉगच्या वाचकांपैकी कोणी अशी महत्वाची व्यक्ती असेल. त्यातून, असा निषेध घटनेच्या नंतर ताबडतोब व्यक्त करायचा असतो, सहा वर्षा नंतर नव्हे.
पण एका जात/धर्म गटाने दुसर्या जात/धर्म गटाच्या लोकांवर हल्ला, खून केल्याच्या घटनांच्या खटल्यांची तुलनाच करायची म्हंटले, तर गोधरा ट्रेन हत्याकांडाचे दोषी, त्या नंतर गुजरात मध्ये उसळलेला दंग्यामधले दोषी, मुंबईत दिल्लीत व इतरत्र झालेल्या अनेक बॉम्ब स्फोटातले दोषी, आणखीन मागे जायचे असल्यास इंदिरा गांधी यांच्या वधा नंतर शिखांच्या हत्याकांडाचे दोषी, त्याही पेक्षा आणखीन मागे जायचे असल्यास महात्मा गांधी यांच्या वधा नंतरच्या हत्याकांडाचे दोषी, या सर्वांशी तुलना करू गेल्यास या खटल्याचे काम त्या मनाने चांगल्या गतीने झाले. फाशी द्यायची का जन्मठेप हे कोर्ट कसे ठरवते हे तुम्हालाच अधिक चांगले माहीत असणार, कारण तुम्ही अड्वोकेट आहात. पण फाशीची शिक्षा झाली तरी ती अमलात यायला अनेक वर्षे लागतात. अफजल गुरु, कसब, व इतर अनेक, ज्यांना फाशीची शिक्षा confirm झालेली आहे, ती अमलात आलेली नाही, व ती प्रक्रिया न्यायालयाच्या पलीकडे आहे. राष्ट्रपती दयेच्या अर्जावर विचार करावयाला किती वेळ घेतात व का, हे कुणालाच न उलगडलेले कोडे आहे.
घटनेच्या सहा वर्षा नंतर तुम्ही हा लेख लिहिलात. जात व धर्म यावरून आपल्या देशात गुन्हे/ अत्याचार घडतात हे फार वाईट आहे. राजकीय हस्तक्षेपा मुळे आरोप पत्र dilute झाले असेल तर त्यात नवीन काहीच नाही, ज्यात त्यात राजकीय हस्तक्षेपा मुळे आपल्या सामाजिक जीवनाचा बट्ट्याबोळ झालेला आहे व आपण सर्वच victims आहोत. समाजातून जातीयवाद किंवा धर्मांधपणा याचे कसे उच्चाटन करता येईल, किंवा राजकीय हस्तक्षेपाला कसा आवर घालता येईल, यावर काही चर्चा होऊ शकली असती. पण चर्चेला तसे वळण देण्याचा तुमच्या लेखात तुम्ही प्रयत्नच केलेला नाही.
तुमच्या लेखाचा मथळा व शेवट दोन्ही एक प्रश्न स्वरूपात आहे - "खैरलांजी हत्याकांडातील निरपराधाना खरोखर न्याय मिळाला का ?" त्याचे उत्तर पण तुम्हीच दिलेले आहे, कि न्याय मिळाला असे तेव्हांच म्हणता येईल जेव्हा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली जाईल एवढेच नव्हे तर कोणत्याही गुन्हेगाराचा नैसर्गिक मृत्यू होण्याच्या आधी ती अमलात पण येईल. ते झाले नाही, ही तर वस्तुस्थिती आहे. तेव्हा तुमच्या परिभाषे प्रमाणे तरी न्याय मिळाला नाही. तुम्ही प्रश्न विचारलात, तुम्ही उत्तर पण दिले. आता तुम्हाला या ब्लॉगच्या वाचकांकडून आणखीन काय अपेक्षा होती ?
६ वर्षाचा आढावा घेण्यासाठी लेख लिहला आहे..
डोळस साहेब आत्ता थोडा घाईत आहे कोर्टातून आल्यावर सविस्तर लिहीन, २९ सप्टेंबर ला घटनेला ६ वर्षे झाली म्हणून हा लेख लिहिला आहे, घटना झाली म्हणून नाही, आणि ६ वर्षात काय काय उलाढाली घडल्या याचा आढावा घेण्यासाठी लेख लिहला आहे, तुमचे बरोबर आहे घटना घडली तेव्हा निषेध करावा लागतो आणि तो कोण्या महत्वाच्या व्यक्तीनेच कराव लागतो याला माझा विरोध आहे... असो परत आल्यावर लिहीन....!
न्यायालयात मिळातो तो निकाल, न्याय नव्हे!
या प्रकरणाबद्दल वृत्तपत्रांतून तुकड्या तुकड्यांमधुन वाचायला मिळाले होते.
हा एकत्रित आढावा वाचुन अतिशय वाईट वाटले.
फिर्यादीने न्यायालयात मिळातो तो (समोर ठेवलेल्या साक्षी-पुराव्यांवरुन दिलेला) निकाल! .. न्याय नव्हे!! हे लक्षात घेऊनच कोर्टाची पायरी चढावी हे पुन्हा अधोरेखीत झाले म्हणायचे!
खैरलांजी
खैरलांजीवर एकत्रित वाचायला मिळाले. धन्यवाद. लेखात आवेश असला तरी तो घटनांना धरून लिहिलेला वाटला.
या निमित्ताने हायकोर्टाचे निकालपत्र पाहिले. कोर्टासमोर आलेल्या घटनांनुसार कोर्टाने अन्याय केलेला वाटला नाही. कोर्टासमोर न आलेल्या घटनांबद्दल लेखकाने काही लिहिलेले दिसत नाही.
या घटनेतील दंगलकर्ते यांच्या बद्दल जेवढे लिहिले जाते तेवढे ते तपास यंत्रणेबद्दल लिहिले जात नाही. घटनेनंतर जवळपास २४ तासांनी गुन्हा नोंदवला गेला. मुख्य पात्रातील एक सिद्धार्थ गजभिये हे पोलिस पाटील असून हे घडले हे अनाकलनीय आहे. ह्यावर जबाबदार व्यक्तिंवर काय कारवाई केली गेली? चौकशी झाली का? जेवढी आरोपींना कडक शिक्षा व्हायला हवी तशीच यांनाही हवी असे वाटले.
निरनिराळ्या सामाजिक संघटनांनी सुरुवातीस हा मुद्दा धरून लावला होता पण त्याचा पाठपुरावा झाला का हे वाचायला आवडेल (लेखकाला माहित असल्यास). बचावपक्षाच्या बचावात या दिरंगाईबद्दल, जाबजाबजवाब नोंदवण्यातील दिरंगाईबाबत विशेष उल्लेख आहे.
या घटनेची पार्श्वभूमी म्हणून सिद्धार्थ गजभिये यांच्या शेतातील कामाच्या मजुरीचे भांडण, त्यानंतर झालेले गुन्हे नोंदणीकरण याबद्दल लिहिले आहे. या गुन्ह्याचे पुढे काय झाले? यावर खटला चालला का? हे जाणून घ्यायला आवडले असते. पहिली मारहाण ही एका शेतमजुराने केलेली (मजूर्री बद्दल वाद झाल्याने) होती त्यावर अॅट्रोसिटीज अॅक्ट लावण्यात आला. पण नंतरच्या गुन्ह्यातील हे कलम न्यायालयाने नामंजूर केले यातील विरोधाभास विशेष करून वाटला. पहिल्या गुन्ह्यात हा कायदा लावायला नको होता असे घटना वाचल्यावर वाटते. हा गुन्हा लावताना पोलिसांनी दिरंगाई केली नाही, लोकांना अटकही केली पण नंतरच्या गुन्ह्यात मात्र दिरंगाई केली हे कळत नाही.
प्रमोद
न्याय मिळाला असे वाटत नाही....
जोपर्यंत आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होत नाही तोपर्यंत फिर्यादीला न्याय मिळाला असे वाटत नाही....
सिद्धार्थ गजभिये हा धुसाळा गावचा पोलीस पाटील होता, त्याच्या शेतामध्ये भांडण झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला तो, गजभियेच्या वतीने आणि आरोपींना अटक होऊन जमीन मंजूर झाला, परंतु हत्याकांड हे खैरलांजी गावामध्ये झाले, फिर्यादी हा सामान्य शेतकरी होता, पोलीस पाटील न्हवता त्यामुळे तक्रार घेण्यास उशीर का लागला हे कळू शकते,
पोलीस पाटील सिद्धार्थ गजभियेला झालेली मारहाण आणि खैरलांजी येथे घडलेले हत्याकांड या दोन वेगवेगळ्या घटना आणि वेगवेगळ्या केस आहेत...
बाकी सविस्तरपणे लिहीन आत्ता कोर्टात ज्यायचे आहे...
दिरंगाई
निकालपत्र परत पाहिले. सविस्तर उत्तराच्या अपेक्षेत.
तुम्ही जे म्हणता आहात: "सिद्धार्थ गजभियेंनी काही केले नाही, ... या दोन घटना वेगवेगळ्या आहेत. " हे निकालपत्राप्रमाणे बरोबर नाही.
निकालपत्रात खालील पणे घटनाक्रम नमूद केले आहे. यातील काही भाग तुमच्या मूळ लेखात आला आहे.
भैयालाल भोतमांगे घरातून पळून गेल्यावर पहिल्यांदा सिद्धार्थ गजभियें कडे गेले (२९ सप्टेंबर संध्याकाळी). पळून जाताना त्यांना आपल्या घराची एवढी भीषण अवस्था झाली असेल असा अंदाज आला नसावा. ताबडतोब सिद्धार्थ गजभियेंनी फोन लाऊन पोलिसांना कळविले. आपल्या मुला सोबत भैयालाल भोतमांगेंना पोलिस ठाण्यात पाठवले.
निकालपत्रात असेही म्हटले आहे की भैयालाल भोतमांगेंनी घाबरून तक्रार नोंदवली नाही. आणि ते आपल्या घरी ३० (?) तारखेला परतले. घरी कोणीच न सापडल्याने त्यांनी ३० तारखेला तक्रार नोंदवली. संध्याकाळपर्यंत प्रियांकाचा मृतदेह हाती आल्यावर रात्री ८ वाजता खून आणि इतर गुन्ह्यांची तक्रार नोंदवली गेली. १ तारखेला सकाळी १७ जणांना अटक केली. त्याच दिवशी इतर तीन मृतदेह मिळाले.
पहिल्या (गजभियेंची मारहाण) आणि दुसर्या (हत्याकांड) घटनेचा जवळचा संबंध आहे. हे एकंदर घटनाक्रमावरून दिसते आहे. निकालपत्रातही तसे म्हटले आहे.
प्रमोद
वेगवेगळ्या कोर्टात चालू आहेत...
मी दोन्ही घटनांचा संबंध नाकारला नसून फक्त या केसेस वेगळ्या आहेत... आणि वेगवेगळ्या कोर्टात चालू आहेत...
कारण नसताना जोडलेली जातियता
हे हत्याकांड झाले नेंव्हा पासुन मी बातम्या वाचतो आहे. हा गुन्हा झाला त्याचे कारण जमिनी आणि आर्थिक बाबींवरुन झालेला वाद हे आहे. ह्या प्रकरणात victim दलित होते म्हणुन त्याला जातिय रंग देण्यात आला आहे.
ह्या अश्या घटनांचा उपयोग ब्राम्हणां विरुद्ध मत तयार करण्या साठी करण्यात येतो आहे.
@ राजा जाधव - ज्या कोणी मराठी ब्राम्हणांबद्दल लिहिले त्याला ह्या blog वर फक्त मुर्ख म्हणुन सोडणे बरोबर नाही. त्याचा जाणुन बुजुन ब्राम्हण द्वेष पसरावयाचा हेतु होता हे तुम्ही मान्य केले पाहिजे.
महाशय............!
प्रसाद १९७१, महाशय, पहिली गोष्ट माझे नाव राजा जाधव नाही...आणि दुसरी गोष्ट वर्तमानपत्र वाचता त्याबद्दल अभिनंदन... आरोपी आणि मयत यांच्यात कोणताही आर्थिक व्यवहार न्हवता...मग हे कारण कसे असू शकते ? याचा तुम्हीच खुलासा करावा....! जो शेतामधून रस्ता पाहिजे होता तो आरोपींना न्हवे तर संपूर्ण गावाला पाहिजे होता...त्यामुळे वाद हा संपूर्ण गावासोबत आला....!
जातीवाचक शिवीगाळ करणे हे जातीयतेचे नाहीतर कशाचे उदाहरण आहे ? साक्षीदाराने साक्ष देताना जातीवाचक शिवीगाळ झाल्याचे नमूद केले आहे...! मग याला नन्तर जातीयतेचा रंग येण्याचा प्रश्नच नाही....!
आणि शेवटी प्रतिक्रिया बाबत, तो नक्कीच मूर्ख आहे कारण वर नमूद केल्या प्रमाणे प्रत्यक्ष ब्राह्मणांचा इथे संबंध नाही, त्यामुळे त्यावर चर्चा देखील निरर्थकच.........!
अशी कित्येक हत्याकांडे
पुण्यात गेल्या २-३ वर्षात कित्येक खून झाले. अलुलकर मुझिक चे अलुलकर, घैसास कुटुंब वगैरे...
त्यांचे खूनी सापडले पण नाहीत. पण ही मारलेली लोक ब्राम्हण असल्यामुळे ह्या गुन्ह्यांचा शोध लावायला राष्ट्रवादी च्या ग्रहमत्र्याला काय पडले आहे?
आणि राजा जाधव तरी कशाला लिहितिल ह्या बद्दल. अलुलकर, घैसास थोडीच राजा जाधवांची "आपली माणसे" आहेत.
:-(
निराश करणार नाही....!
तुमच्या बाबतीत कधी असे होऊ नये अशी प्रार्थना नक्की करेन, परंतु घडलेच तर तुम्हाला निराश करणार नाही....नक्की लिहीन.......आपलं समजून...!
मुळ चर्चा
मला वाटते की आता खरी चर्चा सुरु होणार....
दुर्दैवी
प्रतिक्रियांचा रोख पाहता इतके घडूनही समाजातील घटकांची मानसिकता बदलत नाही हे स्पष्ट होते आहे
त्यामुळे समाजात अजुनही खुप काही सकारात्मक बदल घडणे अपेक्षित आहे.