एका साम्राज्याच्या शोधात: अजंठा गुंफा भाग 4

अजंठा येथील गुंफा क्रमांक 9 ही आपण आधी बघितलेल्या 10 क्रमांकाच्या गुंफेप्रमाणेच एक चैत्य गृह आहे. आयताकृती आकाराची असलेली ही गुंफा मात्र बर्‍याच लहान आकाराची आहे. ही गुंफा 22 फूट 9 इंच रूंद, 45 फूट खोल आणि 23 फूट 2 इंच उंच आहे.

बर्जेस व फर्ग्युसन यांनी प्रथम असे मत मांडले होते की ही गुंफा 10 क्रमांकाच्या गुहेच्या पूर्वकालात खोदलेली असावी. परंतु नंतर प्राप्त झालेल्या पुराव्यानुसार आता असे मानले जाते की ही गुंफा 10 क्रमांकाच्या गुंफेच्या निदान 100 वर्षे तरी नंतर खोदली गेलेली असावी. समकालीन इतर चैत्यगृहांप्रमाणेच या चैत्यगृहात सुद्धा स्तंभांच्या 2 रांगा, या गुंफेचे, मध्यवर्ती व बाजूचे पॅसेजेस असे 3 भाग पाडतात. गुंफेच्या मागील किंवा अगदी आतील बाजूस स्तंभांची ही रांग अर्धवर्तुळाकार बनते व या अर्धवर्तुळाच्या बरोबर मध्यावर स्तूप उभारलेला आहे. या स्तूपाचा पाया म्हणजे 5 फूट उंचीचा एक सिलिंडर असून त्यावर 4 फूट ऊंच व 6 फूट 4 इंच व्यासाचा एक घुमट बसवलेला आहे. या घुमटावर सर्व बाजूंना बौद्ध कठडा डिझाईन कोरलेले असलेला एक चौकोनी कॅपिटल बसवलेला आहे. कार्ले येथील स्तूपावर जशी लाकडी छत्री बसवलेली आहे तशीच छत्री या कॅपिटलवर बसवलेली होती.

मध्यवर्ती कक्षाच्या दोन्ही बाजूस असणार्‍या 21 स्तंभांच्या डोकयावर एक दगडी तुळई (entablature) खोदलेली आहे व या अखंड तुळईपासूनच मधे मधे कप्पे असलेले कमानीदार छत खोदलेले आहे. या छतावर कार्ले येथील चैत्यगृहासारख्याच कमानीच्या आकाराच्या लाकडी तुळया बसवलेल्या होत्या. दोन्ही बाजूस असलेले आईल्स किंवा पॅसेजेस यांची छते मात्र सपाट आहेत. गुंफेच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस घोड्याच्या नालाच्या आकाराचे एक मोठे गवाक्ष दिसते आहे. या गवाक्षाची उंची 11 फूट 6 इंच आहे. या गवाक्षाच्या बाजूंना छोटी चैत्य गवाक्षे, लाकडी जाळ्यांचे डिझाईन, बेर्म रेल्स आणि बौद्ध रेलिंग डिझाईन या सारखी हिनायन कालातील बौद्ध सांकेतिक चिन्हे सगळीकडे कोरलेली आहेत.

या गुंफेचा अंतर्भाग 10 क्रमांकाच्या गुंफेप्रमाणेच प्रथम इ.स.पूर्व 100 या कालात संपूर्णपणे भित्तीचित्रांनी रंगवलेला होता. 4थ्या किंवा 5 व्या शतकात या भित्तीचित्रांवरच नवी चित्रे रंगवली गेली होती. गुंफेमधील सर्व स्तंभ बुद्धाच्या चित्रांनी सजवलेले आहेत. यातील अनेक चित्रे अजूनही सुस्थितीत आहेत.1875मध्ये जॉन ग्रिफिथ्स याने केलेल्या संशोधनानंतर इ.स.पूर्व 100 या कालात रंगवलेली 3 मूळ भित्तीचित्रे उघडकीस आली. जी याझदानी या लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे ही तिन्ही भित्तीचित्रे नक्कीच सातवाहन कालातील आहेत व त्या काळातील जनसामान्य व त्यांच्या चालीरीती यावर उत्तम प्रकाश टाकू शकतात. या तिन्ही भित्तीचित्रांचे जास्त खोलात जाऊन वर्णन मी करणार आहेच.

या 3 चित्रांपैकी पहिले चित्र "सेवकांसह असलेला नागा राजा" (A Naga king with his attendants) या नावाने ओळखले जाते. हे चित्र या गुंफेचे प्रवेशद्वार असलेल्या पुढच्या भिंतीच्या आतील बाजूस व डाव्या गवाक्षाच्या वरच्या भागात रंगवलेले आहे. या मूळ चित्रात रंगवलेल्या 2 भिख्खूंच्या चित्रांवरच 2 नवीन भिख्खू त्यांच्या नावासह रंगवलेले आहेत हे बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रिन्सिपल जॉन ग्रिफिथ्स यांना प्रथम आढळून आले होते. वरच्या स्तरावरील भिख्खूंचे चित्र ग्रिफिथ्स यांना निराळे करता आले होते. तसे केल्यावर खालील स्तरावर असलेले मूळ चित्र दिसू लागले होते.

या मूळ चित्रामध्ये डाव्या हाताला आंब्यांनी लगडलेल्या एका झाडाखाली 2 व्यक्ती बसलेल्या रंगवलेल्या आहेत. पागोटे किंवा फेटे बांधण्यासाठी जसा कापडाचा एक लांब पट्टा वापरला जातो तसा पट्टा व त्या व्यक्तींचे केस हे एकत्र बांधून डोक्याच्या वरच्या बाजूस त्याचा बुचडा येईल असे सातवाहन कालातील एक मोठे वैशिष्ट्य्पूर्ण पागोटे या व्यक्तींच्या डोक्यावर दिसते आहे. या दोन व्यक्तींपैकी एका व्यक्तीच्या डोकयावर 7 नागांच्या फण्या असलेला मुगुट आहे तर दुसर्‍या व्यक्तीच्या डोक्यावर 1 नागफणी असलेला मुगुट आहे. 7नागफणीचा मुगुट डोक्यावर असलेली व्यक्ती अर्थातच राजा व 1 नागफणीचा मुगुट असलेली व्यक्ती राजकुमार असली पाहिजे या बाबत शंका वाटत नाही. दोन्ही व्यक्तींच्या अंगाखांद्यावर भरपूर अलंकार दिसत आहेत. चक्राकृती डिझाईन असलेली कर्ण कुंडले, गळ्यात जाडजूड हार, धातूचे बाजूबंद व पोच्या या व्यक्तींनी परिधान केलेल्या दिसत आहेत. गळ्यातील हार अनेक पदरी मोत्याचे असून ते सोन्याच्या बंदांनी एकत्र बांधलेले असावेत. दोन्ही व्यक्तींची चेहेरेपट्टी पूर्णपणे या भागातील लोकांसारखी आहे. गोलसर किंवा लंबगोलाकृती चेहरा, अपरी नाके, भरदार ओठ व तेजस्वी डोळे ही या चेहर्‍यांची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. वरच्या बाजूस एक अप्सरा राजाकडे उडत येताना चित्रात रंगवलेली आहे.

या चित्राच्या उजव्या बाजूला असलेल्या दुसर्‍या पॅनेलमध्ये याच चित्रामधील दुसरा देखावा रंगवलेला आहे. येथे राजा त्याच्या दोन सेवकांबरोबर दाखवलेला आहे. यापैकी एका सेवकाने राजाच्या डोक्यावर छत्री धरलेली आहे तर दुसरा सेवक चवरी ढाळताना दिसतो आहे. राजाच्या समोरच्या भूमीवर राजाकडे काहीतरी तक्रार घेऊन आलेले 5अर्जदार विनम्रपणे रिंगण करून बसलेले दिसत आहेत.

या गुंफेतील व सातवाहन कालातील म्हणता येते असे दुसरे भित्तीचित्र डाव्या भिंतीवर रंगवलेले आहे. हे चित्र "स्तूपाकडे येणार्‍या उपासकांचा गट:(A group of Votaries approaching a Stupa) या नावाने ओळखले जाते. प्रत्यक्षात हे चित्र अनेक छोट्या देखाव्यांचे मिळून रंगवलेले होते. महायान कालात या चित्राच्या वरील भागावरच बुद्धाच्या 6 प्रतिमा रंगवण्यात आलेल्या होत्या. चित्राच्या पहिल्या भागात 16 उपासकांचा 1गट चैत्यगृहाच्या प्रवेशद्वाराकडे येताना दाखवलेला आहे. मात्र हे सर्व उपासक एकसारखे न दिसता या सर्व उपासकांच्या केशरचना, त्यांच्या धोतरावरून त्यांनी कंबरेवर बांधलेले शेले आणि त्या शेल्यांच्या बांधलेल्या गाठी यात सूक्ष्म असे फरक चित्रकाराने रंगवलेले आहेत.

या चित्राच्या दुसर्‍या भागात 4भिंतींच्या आत असलेला 1 स्तूप दाखवलेला आहे. यापैकी 2 भिंतींमध्ये प्रवेशद्वारे बनवलेली आहेत. एका प्रवेशद्वारावर एखाद्या पिंपाच्या आकाराचे छत आहे तर दुसर्‍या प्रवेशद्वाराला सांची मधील तोरणाचा आकार दिलेला आहे. स्तूपावर छत्र्या लावून स्तूप सुशोभित केलेला दिसतो आहे. तोरणाचा आकार दिलेल्या प्रवेशद्वारामधून एक व्यक्ती चालताना दिसते आहे. स्तूपाभोवती असलेल्या भिंतींच्या बाहेर एक झाड दिसते आहे. या झाडाच्या पलीकडच्या बाजूस 2मोठे कक्ष असलेला एक बौद्ध मठ दिसतो आहे. या मठाच्या बाहेर दोन व्यक्ती उभ्या आहेत.
या चित्रातील तिसर्‍या भागात स्तूपाला भेट देऊन आलेले उपासक एका वनराईमध्ये एकत्र जमलेले दिसत आहेत. उजव्या हाताला असलेल्या एका घरात 4 स्त्रिया दिसत आहेत. यांपैकी खुर्चीवर बसलेली स्त्री राणी असू शकते. 2स्त्रिया बाहेरच्या अंगणात पेटवलेल्या अग्नीजवळ बसलेल्या आहेत.

9 क्रमांकाच्या गुंफेमधील व सातवाहन कालातील नक्की म्हणता येईल असे तिसरे चित्र हे छताजवळ असलेल्या तुळईच्या भागावर काढलेले असून ते नक्षीकाम या स्वरूपामधील आहे. खूप ठिकाणी या चित्राचे टवके उडालेले असले तरी अनेक रानटी जनावरांच्या शेपट्या पिरगळणारा एक गुराखी या चित्रात अजूनही स्पष्ट दिसतो आहे.

अजंठ्यातील इतर गुंफा 4थ्या किंवा 5व्या शतकात खोदलेल्या असल्याने माझ्या या अभ्यासाच्या दृष्टीने त्या गुंफातील शिल्पे किंवा चित्रे यांची फारशी मदत होणे शक्य नसल्याने मी फक्त एक धावती चक्कर मारून अजिंठ्याची माझी सफर पूर्ण करतो. परत येताना खाली अजंठा मॉलमध्ये थांबून पाषाणात कोरलेल्या एक दोन वस्तू, या सफरीची एक आठवण म्हणून खरेदी करण्यास मी विसरत नाही.

सातवाहन राजांच्या इतिहासाबद्दल फारशी माहिती आपल्याला अजंठा गुंफांच्यात मिळू शकत नाही. मात्र ही अशी एकच जागा आहे जेथे सातवाहन राजांच्या समकालीन असलेल्या चित्रकारांनी सातवाहन राजा, त्याचे दरबारी व राणी यांची चित्रे रंगवलेली आढळतात. त्यामुळे हे राजे किंवा राण्या कोणती वस्त्रे परिधान करत असत? कोणते अलंकार घालत असत? स्वत: हिंदू असूनही बौद्ध धर्मस्थानांबद्दल ते कसे आदर बाळगत? या सारख्या अनेक गोष्टींबद्दल येथे माहिती मिळाली व बरेच काही शिकता आले.

माझा या पुढील मोर्चा सातवाहन इतिहास संशोधनातील सर्वात महत्त्वाचे स्थान मानल्या जाणार्‍या जागेकडे मी वळवणार आहे. कारण फक्त याच ठिकाणी या राजांचे कर्तुत्व, शौर्य याचे त्यांच्या कालात लिहिलेले वर्णन सापडते. ही जागा म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर मानल्या जाणार्‍या नाशिक जवळ असलेली पांडव किंवा पांडु लेणी.

समाप्त
10सप्टेंबर 2012

या लेखासोबत असलेली छायाचित्रे बघण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्सुक

ही लेखमालिका सुरेख झाली. बरीच नवी माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद.

माझा या पुढील मोर्चा सातवाहन इतिहास संशोधनातील सर्वात महत्त्वाचे स्थान मानल्या जाणार्‍या जागेकडे मी वळवणार आहे. कारण फक्त याच ठिकाणी या राजांचे कर्तुत्व, शौर्य याचे त्यांच्या कालात लिहिलेले वर्णन सापडते. ही जागा म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर मानल्या जाणार्‍या नाशिक जवळ असलेली पांडव किंवा पांडु लेणी.

नवी मालिका वाचण्यास उत्सुक आहे.

हिनायन कालातील बौद्ध सांकेतिक चिन्हे सगळीकडे कोरलेली आहेत.

बौद्ध "सांकेतिक चिन्हे" म्हणजे काय?

बौद्ध सांकेतिक चिन्हे

हिनायन कालात बुद्ध मूर्ती दाखवत नसत त्यामुळे बुद्धाचे अस्तित्व स्तूपासारख्या चित्रांनी दर्शविण्याची प्रथा होती. त्याचप्रमाणे काही सांकेतिक चिन्हे त्या स्थळाचे धार्मिक महत्व दर्शविण्यासाठी सर्व ठिकाणी कोरलेली दिसतात. या लेखासोबत असलेल्या छायाचित्रात 9 क्रमांकाच्या गुंफेचा बाह्य भागाचे छायाचित्र आहे ते बघावे. यात घोड्याच्या नालाच्या आकाराची छोटी छोटी कोरलेली गवाक्षे आहेत.या गवाक्षांच्या आत एका खाली एक अशा कमानी कोरलेल्या आहेत त्यांना बेर्म रेल्स असे म्हणतात. गुंफेच्या उजव्या वरच्या कोपर्‍यात लाकडी जाळीचा पॅटर्न दिसू शकतो. ही सर्व कोरीव कामे बौद्ध सांकेतिक चिन्हे आहेत. बौद्ध रेलिंग़ डिझाईन (स्तूपावर असलेल्या कॅपिटल वर कोरलेले) हे सुद्धा ते स्थळ एक पवित्र स्थान असल्याचे दर्शवते व त्यालाही सांकेतिक चिन्ह म्हणता येईल.

छान...

फुरसतीत परततो.

अतिशय उत्तम

नासिक लेणीबद्दल वाचण्यास उत्सुक आहे.

हिनायन

हिनायन हा शब्द हीनयान असा असावा का? की हिनायन आणि हीनयान हे दोन्ही वेगवेगळ्या अर्थांचे शब्द अस्तित्वात आहेत?

हिनायन की हीनायान

खरे सांगायचे तर देवनागरीमध्ये हा शब्द इतक्या प्रकारे लिहिलेला असतो की बरोबर काय व चूक काय हे सांगणे अवघड वाटते. अर्थाच्या दृष्टीने बघितले तर हीनयान असे लिहिले गेले पाहिजे ( Inferior vehicle या अर्थाने) परंतु इंग्रजीमध्ये हा शब्द Hinayan असा लिहिला जातो. त्यामुळे देवनागरीत तो कसा लिहायचा हा एक प्रश्नच आहे.

हीनयान

महायान आणि हीनयान ह्या बौद्ध तत्त्वविचाराच्या दोन प्रमुख शाखा आहेत. 'महा' ह्याच्या विरुद्ध 'हीन' म्हणून हीनयान हाच योग्य शब्द आहे. इंग्रजीत तो Hinayan असा लिहिला जातो कारण रोमन लिपीमध्ये देवनागरी दीर्घ 'ई 'आणि अखेरचा 'अ' हे स्वर दाखविण्यासाठी सोपा मार्ग नाही. Heenaayana HInayAna हे कृत्रिम वाटते. ह्यामुळेच अमेरिका-ब्रिटनमधील लोक योग yoga ह्याचा उच्चार सार्वत्रिक वापरात 'योगा' असा कानावर पडतो आणि हिमालय Himalaya हिमलया होतो! रशियनमध्ये 'राम' हा शब्द इंग्लिशवरून 'Рама' असा लिहिला जातो आणि रशियन व्याकरणानुसार 'आ' ने शेवट होणारी बहुतांश नामे स्त्रीलिंगी असल्याने राम Рама शब्दाचे व्याकरण आणि विभक्तिप्रत्यय स्त्रीलिंगानुसार चालतात.

हीनयान

कोल्ह्टकर म्हणतात तसे अर्थाच्या दृष्टीने हीनयान हा शब्द जरी योग्य असला तरी हा बौद्ध धर्म ज्या देशांच्यात प्रचलित आहे, उदा. श्री लंका, कंबोडिया वगैरे, तेथे हा शब्द कसा उच्चारला जातो हे आता जास्त महत्त्वाचे वाटते. त्यामुळे मी योग्य असूनही हीनयान असा हा शब्द न लिहिता हिनयान किंवा हिनायन असा लिहावा या मताचा आहे.

 
^ वर