विज्ञान कथेंतील जग.

आपले जग, खरे तर अवकाश (स्पेस्) त्रिमिति आहे असे म्हंटले जाते. पण अवकाश खरोखरच त्रिमिति आहे की आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांच्या विशिष्ट रचनेमुळे व स्थानांमुळे ते तसे वाटते? जर आपली ज्ञानेंद्रिये आहेत त्यापेक्षा संख्येने, आकाराने वेगळी असती किंवा वेगळ्या स्थानी असती तर आपल्याला अवकाश त्रिमिति वाटले असते का?

मी फार पूर्वी वाचलेल्या काही अद्भुत् विज्ञानकथा चतुर्मिति जग या कल्पनेवर आधारित होत्या. या कल्पनेप्रमाणेच आणखी एका कल्पनेचा वापर करण्यांत आला. ती म्हणजे त्रिमिति जगांत अवाढव्य वाटणारी खगोलशास्त्रीय अंतरे चौथ्या मितींतून प्रवास केल्यास अगदी थोड्या वेळांत पार करता येतात.

आपली त्रिमिति अवकाशाची जाणीव ज्ञानेंद्रियसापेक्ष असल्यास जग (अवकाश) चतुर्मिति (किंवा बहुमिति) असण्याची शक्यता नाकारता येईल काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

पास! ;)

कोर्डेसाहेब,

आपला चर्चाविषय डोक्यावरून गेला. सबब, या वेळेस मी फक्त 'पास!' एवढेच म्हणू शकतो!

बदामसात खेळताना आपल्याकडे लावायला पानच नसलं की नाही का 'पास' असं म्हणतात? ;)

अगदी तस्सच! ;)

तात्या.

पास.

पास.

थोडे स्पष्ट करा

खरेच डोक्यावरून गेले. थोडे स्पष्ट केले तर बरे होईल.

समजुन घेतोय.

कोर्डे साहेब,

ज्ञानेंद्रियापलीकडचा विचार असल्यामुळे तुर्तास थांबतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

;)

ज्ञानेंद्रियापलीकडचा विचार असल्यामुळे तुर्तास थांबतो.

:))

आपला,
(बिरुटेसाहेबांच्या आधीच थांबलेला!) तात्या.

बुद्धिगम्य

ज्ञानेंद्रियापलीकडचा विचार असल्यामुळे तुर्तास थांबतो.

ज्ञानेंद्रियापलीकडच्या काही गोष्टी तरी बुद्धिगम्य असतात. त्यामुळे विचार थांबवण्याचे कारण नाही.

हम्मम्

कल्पना रंजक आहे. अधिक माहिती मिळाल्यास आवडेल.

वॉर्महोल

वॉर्महोल ची कल्पना अशाप्रकारची आहे. एका कागदावर दोन बिंदू काढले तर त्या दोन बिंदूंना जोडणार्‍या रेषेची लांबी हे त्या दोन बिंदूंमधील कमीतकमी अंतर. मात्र तो कागद दुमडून ते बिंदू एकमेकांच्या अगदी आणता येतील. अशा प्रकारे आपल्यापासून लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या ग्रहाच्या दरम्यान असलेले अवकाश जर दुमडता आले तर हे दोन ग्रह जवळ आणता येतील आणि अगदी कमी वेळामध्ये दुसर्‍या ग्रहावर पोहोचता येईल अशी ती संकल्पना. दोन ग्रहांदरम्यानचे अवकाश असे दुमडल्यावर कमी झालेल्या अंतराचा दोन ग्रहांना जोडणारा बोगदा म्हणजे वॉर्महोल.

कृमीविवर्

ह्याच कृमीविवरांमधून कालप्रवास करता येईल. पण कृमीविवरे बनविणे मात्र अ़जून अब्जावधी वर्षे जमणार नाही असे कृष्णविवरांबद्दलच्या एका पुस्तकात वाचले होते.

वॉर्महोल की वर्महोल?

वर्महोल ही कल्पना ऐकली होती. वॉर्महोल की वर्महोल?

--लिखाळ.

परदेशात भारतीयांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करावे असे मला वाटते.

वर्महोल

वर्महोल :)

यामागची कहाणी अशी.

जर एका आळीला एका सफरचंदाच्या एका टोकाकडून दुसरीकडे जायचे असेल, तर पूर्ण परिक्रमा करण्या ऐवजी ती सफरचंद पोखरत जाऊ शकेल. (या साठी तिला द्विमिती टाळून तिसर्‍या मितीत प्रवास करावा लागेल इतकेच.)

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

खरोखरच ज्ञानंद्रियांपलिकडील विश्व!

कोर्डेसाहेब, हा विषय इतका गहन आहे की मी, मी म्हणणार्‍या माणसांची बोबडी वळते.
एका मान्यवर संशोधकाने दिलेले स्पष्टीकरण येथे देत आहे. (हे त्याच्या दृष्टीने 'सोपे' असेल पण मला तरी अजून नीट कळलेले नाही.)
'अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम' या अत्यंत गाजलेल्या पुस्तकात पान १७३ वर (संदर्भ!) लेखक श्री. स्टीफन हॉकिंग म्हणतात -
"...परंतु, धागा सिद्धांतांसमोर (स्ट्रिंग थिअरीज) यापेक्षा मोठी समस्या उभी आहे. जर नेहमीच्या चार (लांबी, रुंदी,खोली आणि काळ) मितिंऐवजी 'काळ - अवकाश' (टाईम स्पेस) दहा अथवा सव्वीस मीतिंचे असेल तरच ते सिद्धांत लागू होतात.अर्थात, या जास्तीच्या 'काळ-अवकाश' मिती विज्ञान कथांमध्ये पैशाला पासरी आहेत,नव्हे, तिथे त्यांची गरजच आहे. कारण नाहीतर (आईनस्टाईनच्या चौमित जगात) सापक्षतेच्या (कठोर) वास्तवामुळे कोणीही प्रकाशापेक्षा जास्त वेगाने प्रवास करू शकणार नाही आणि (विज्ञानकथांतील) तारे आणि आकाशगंगामधून होणारा प्रवास फारच वेळकाढू होईल. विज्ञानकथांतील कल्पना अशी आहे की कदाचित एका त्याही वरच्या (वेगळ्याच) मितीतून कोणी जवळचा मार्ग (शॉर्ट कट - मधली गल्ली ) धरू शकेल....." (कंसातील माझे.)

असे आणखी पुढे सुंदर स्पष्टीकरण आहे. ज्यांना या विषयात गती /रस असेल त्यांनी हे पुस्तकच घेऊन वाचावे. कोठेही (रेल-वे व्हिलर) कडे मिळेल. म्हणजे घोड्याच्या तोंडूनच ऐकता येईल. मला रस असला तरी फारशी गती नाही हे स्पष्ट करतो. ;)

मिती किती?

अवकाशाच्या तीन व कालाची एक अशा चार मित्या (?) सध्या मान्य आहेत.

  • बिंदू ला मिती नसते.
  • बिंदू खेचल्यास जी रेषा बनते ती एक मिती.
  • रेषा खेचल्यास जे प्रतल बनते ती द्विमितीय आकृती.
  • प्रतल (वरच्या दिशेत) खेचल्यास बनते ती घनाकृती त्रिमितीय.
  • हीच घनाकृती जेंव्हा एका ठिकाणाहून दुसरी कडे सरकते (कालातून प्रवास करते.) तेंव्हा होणारी हालचाल जमेस धरल्यास चतुर्मिती.

सध्या मानवास या चौथ्यामितीत ठराविक वेगाने, ठराविक दिशेत चाललेला प्रवास बदलण्याची क्षमता अवगत नाही. (हा प्रवासाचे तीन निदर्शक आहेत, त्याबद्दल पुन्हा केंव्हा तरी..)

स्ट्रिंग थिअरी मध्ये अशा ११ मित्या आहेत ज्याची दृष्यकल्पना करणे खुद्द स्टीफन हॉकिंग देखील टाळतात :)

समजा एक भला मोठा पिळलेला दोरखंड आहे. (साधारण १० किमी व्यासाचा) ज्यावर तुम्ही मुंगी प्रमाणे (गुरुत्वाकर्षणाच्या परिणामावर मात करत) चालू शकता. या दोरखंडाच्या एका टोकावरून 'एकाच दोरावरून' चालत गेल्यास दोराचे पेढ (कित्येक किमी) दूर असल्याने तुम्हाला तुम्ही सरळ रेषेत व कमीत कमी अंतरात प्रवास करत आहात असे वाटेल. (लक्षात घ्या इथे दोरखंडाची आतली बाजू म्हणजे तुमच्या दृष्टीने खाली व उलट बाजू म्हणजे वरची दिशा.)

पण हे पूर्ण सत्य नाही एकूण दोरखंडाची रचना पाहता, वेगवेगळे दोर पार करत, याहूनही कमी अंतरात एका टोकाकडून दुसरीकडे जाणे शक्य आहे. (जे दोरखंडाच्या प्रचंड आकारामुळे तुम्हास सहसा कळणे कठीण आहे.) मुंगी आपले प्रवास असेच द्विमितीत करते असे वाटते.

अवकाशातल्या तीन मित्यांचीच दृष्यकल्पना करण्याची मानवी क्षमता आहे. पण अवकाशातल्या मित्या ११ पर्यंत आहेत हे गणितांनी मांडता येते. (त्याला येते असे नव्हे!)

पण या सार्‍याने काही अतिचाणाक्ष मानवांना त्रिमितीहून अधिक आकांच्या संकल्पना करण्यापासून, त्यांची आरेखने करण्यापासून (कथा कहाण्यात नव्हे! शास्त्रात) रोखले आहे असे नाही. ;)

~~ 'त्या'च्या मते तुम्ही 'हे' देखील वाचावे! ~~

द्विमित जगाचे त्रिमितीकरण

द्विमित जगाचे त्रिमितीकरण करता येते. सुप्रसिद्ध 'मोबियस स्ट्रिप' हे त्याचे उदाहरण आहे. असेच कालावकाश पिळले तर चार मितींच्या पाच होऊ शकतील ... पाचांच्या सहा... इत्यादी आणि वगैरे...

उजव्या सोंडेचा गणपती

नारळीकरांच्या यक्षाची देणगी मध्ये बहुधा उजव्या सोंडेचा गणपती म्हणून एक गोष्ट आहे. त्यात हीच मोबिअस स्ट्रिप आहे असे वाटते. कोणाला माहित आहे का?

मला गेल्या अनेक वर्षांत हे पुस्तक न वाचल्याने नेमके आठवत नाही.

बरोबर

"उजव्या सोंडेचा गणपती" गोष्ट बरोबर आहे आणि जयंत नारळीकरांचे "यक्षाची देणगी" हे पुस्तकपण. त्या पुस्तकाच्या मागे जे "ले मॅन" संदर्भ दिले आहेत, त्या प्रमाणे "मोबिअस स्ट्रीप" चे वर्णन हे "वन, टू, थ्री, इन्फिनीटी" या जॉर्ज गॅमॉच्या पुस्तकात आहे. ते पुस्तक "एक, दोन, तीन, अनंत" या नावाने मराठीत पण आहे फक्त ते कोणी भाषांतरीत केले आहे ते आठवत नाही. पुस्तक खूप माहीतीपूर्ण असून त्यात अनेक गोष्टी आहेत.

कालावकाशात मराठी माणूस-

डॉ. जयंत नारळीकर हे तर सुप्रसिद्ध आहेतच. त्यांनी 'बिग बँग' ला विरोध केला आहे हेही सर्वांना माहित असेल.
पण आईनस्टाईनची कालावकाशाची व्याख्या जिथे फाटते - त्या कृष्णविवरांच्या पलिकडचे गणित मांडणारे संशोधक प्रा. डॉ. अभय अष्टेकर यांचा 'काल आणि अवकाश' हा लेख या ठिकाणी उपयुक्त वाटेल असे वाटते.

(अष्टेकरांबद्दल इथे वाचा : http://www.rediff.com/news/1999/may/15us3.htm)

मूलभूत संशोधन

प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद. पहिले दोन 'पास' असे प्रतिसाद पाहून माझे लिखाण 'बायपास' होईल की काय अशी धास्ती मला वाटली होती. पण नंतरच्या विस्तृत प्रतिसादांतून व त्यांत दिलेल्या दुव्यांतून या विषयावर प्रचंड माहिती उपलब्ध आहे हे दिसून आले.

गेल्या कित्येक वर्षांत मूलभूत संशोधन फारसे झाले नसावे. १९७० च्या दशकांत सेलिया ग्रीन हिचे "डिक्लाइन् अँड् फॉल् ऑफ् सायन्स्" हे पुस्तक माझ्या वाचनांत आले होते. त्यांत लेखिकेने विज्ञानांत मूलभूत संशोधन कसे ठप्प झाले आहे याचे अनेक दाखले दिले होते. त्यांत चौथ्या मितीचाही अंतर्भाव होता. तिने त्या संदर्भात सपाट आरशांत मिळणार्‍या प्रतिमेचे लॅटरल इन्वर्शन् (उजवी बाजू डावी व डावी बाजू उजवी दिसणे) उदाहरणादाखल घेतले होते.

स्ट्रींग थिअरी

प्रतिसादांमध्ये बरीच उपयुक्त माहिती दिली आहे. स्ट्रींग थिअरीचा मुख्य तोटा म्हणजे ही प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही. कारण स्ट्रींग थिअरीचे परिणाम अत्यंत सूक्ष्म (१०^-३५ मीटर, यालाच प्लांक लेन्ग्थ असे म्हणतात) लांबीमध्ये दिसले पाहीजेत. आणि या लांबीमध्ये प्रयोग करणे आत्ताच नव्हे तर भविष्यकाळातही अशक्य वाटते. त्यामुळे एका बिंदूपलिकडे स्ट्रींग थिअरी तत्वज्ञान किंवा मेटाफिजिक्स यांच्याशी मिळतीजुळती होउन जाते.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

वा!

या चर्चेतून बर्‍याच नव्या गोष्टी कळाल्या.
आपला
(विज्ञानार्थी) वासुदेव

मिती आणि ज्ञानेंद्रिये

चर्चाप्रस्ताव आणि प्रतिसाद वाचले. चांगली चालना मिळाली. धन्यवाद!

बहुतेक रोख हा त्रिमिती आणि त्यापलिकडील जग यावर आहे. प्रस्तावामध्ये ज्ञानेंद्रियांचा उल्लेख आहे. त्याबद्दल मला एक छटा मांडावीशी वाटते.

पंचेद्रियांचा विचार करावयाचा झाल्यास कोणत्याही गोष्टीस पाच मिती (चव, स्पर्श, वास, दिसणे, ऐकणे) लावता येतात. आपल्याला "ज्ञान" झाले म्हणून मिती वाढविली. समजा आपल्याला घ्राणेंद्रिय नसते तर आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचे केवळ चारच गुणधर्म आपण ओळखू शकलो असतो. (चव, स्पर्श, वास = ०, दिसणे, ऐकणे).
गम्मत म्हणजे आपल्याला आजूबाजूच्या जगातील काय कळत नाही (येथे वास!) ह्याचाच कदाचित पत्ता लागला नसता. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या जगात ज्ञानेंदियांच्या पलिकडे काय काय आहे ह्याचाही थांग लागणे महाकठिण आहे.

तळटीप - कदाचित असे म्हणण्याचे कारण हे की जर डोळे नसतील तरीही डोळ्यानी होणारे ज्ञान इतर इंद्रियांनी होऊ शकले असते किंवा काय याविषयी फार पूर्वी काही वाचले होते. तपशील लक्षात नाही परंतु तर्क चांगले लढचिले होते. नेव्हर एव्हर अंडरएस्टिमेट ह्युमन माईंड!

(अज्ञानेंद्रियांकित) एकलव्य

१०० % डोक्यावरुन गेले

युयुत्सु,

तुमचे म्हणणे १०० % डोक्यावरुन गेले. मला स्वतःला विज्ञानात (त्यातल्या त्यात खगोलशास्त्रात) खूप रस आहे.
मी खूप पुस्तके वाचली आहेत. पण तुमचे म्हणणे कोठेच वाचलेले नाही. तेव्हा कृपया अधिक आणि सोप्या भाषेत स्पष्ट करावे ही विनंती.

"इतक्या मितींची सदिश राशी प्रत्येक क्षणाला मानव अनुभवतो. मानवी आयुष्य इतक्या मितींचे आहे."

- सदिश राशी म्हणजे काय?
- मानवी आयुष्य नक्की किती मितींचे आहे?
- खरे तर मितीची जाणीव ही व्यक्तीसापेक्ष असते. म्हणजे एखाद्याला ४-५ मितींचे ज्ञान असू शकते (योगी-महायोगी हे याच प्रकारात येतात). पण सर्वसामान्य माणूस ३ मितींपेक्षा अधिक पाहू शकत नाही.

माफ करा. माझी आकलन शक्ती कदाचित् कमी असेल. पण सर्वांना कळेल असे स्पष्ट केले तर विज्ञान कथेसाठी एक नवा विषय मिळेल असे वाटते.

धन्यवाद
(पुनःकार्यरत्) सागर

लाखो मिती असणं अशक्य आहे

युयुत्सु ,

मला तुमच्या लेखनातून जो बोध झाला होता तो हाच होता. म्हणूनच मी खूप गोंधळलो होतो.
तुम्ही म्हणता की लाखो मिती आहेत.
पण हे अशक्य आहे. (खरे तर अगम्य आहे)
तुम्ही लांबी - रुंदी - उंची (यातून निर्माण होणारी खोली वा उंचवटा) या त्रिमिती पेक्षा इतर किमान २-३ मितींची नावे उदाहरणादाखल दिलीत तरी पुरे.
केवळ कल्पना करा की एक वस्तू (उदा: एक लाकडी चौरस ठोकळा) आपण पाहात आहोत.
ती आपण केवळ त्रिमितीतच पाहू शकतो.
१-२-३ .....५-६ मिती पण एक वेळ ठीक आहे. पण तीच वस्तू लाखो मितींमधे कशी पाहता येईल?

मितीचा सेन्स् हा मुख्यत्वेकरुन डोळ्यांच्या साहाय्यानेच मानवाला होतो. इतर काही मी तरी पाहीलेले नाही.
फोर्थ डायमेन्शन ही केवळ एक संकल्पना आहे. ज्याचे आजही किमान प्रत्यक्ष एकही प्रमाण ज्ञात नाही.
आपण आजच्या आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने फोर्थ डायमेन्शनच्या पुढे जाऊ शकत नाही तर लाखो मितींची गोष्टच निराळी.
तुमच्याकडे याबाबत काही अधिकृत माहीती असेल तर कृपया द्यावी. अशा लेखनाने खूप दिशाभूल होते.
जी माझ्याकडूनही मागे झाली होती. पण यापुढे माहीतीची विश्वासार्हता पडताळून घ्यायचे असे मी ठरवले असल्याने हा लेखनप्रपंच.
शेवटी कल्पनाविलास केला नाही तर विज्ञानाची प्रगती ती काय होणार.
फक्त कल्पनाविलास हा वास्तवाला धरुन असावा.

धन्यवाद
सागर

स्पष्टीकरण पटले...

... युयुत्सुंचा मुद्दा सरळसोट आहे. सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल आभार... पण खरे सांगायचे तर मितींच्या विवादात हा मुद्दा अगदी बाळबोधपणे पातळीवरचा असायला हरकत नसावी.

अवांतर - मिती लक्ष की पंचेद्रियांइतक्याच हा तपशीलात शिरण्याचा विषय आहे. उदा. रंगांच्या अनेक छटा या वेगळ्या मिती मानायच्या की त्यांना रंगअक्षावरील वेगवेगळे बिदू समजायचे हे नक्की करायला हवे.

तेच...

... हो! एक काय आणि तीन काय ... स्वतंत्र मिती किती हा खरा प्रश्न!! धन्यवाद!!!

चकाकी हा खरेच एक संशोधनाचा विषय आहे.

युयुत्सु ,

तुमचा हा मुद्दा एकदम तार्किक, वेगळाच आणि विचार करायला लावणारा आहे.
चकाकी हा खरेच एक संशोधनाचा विषय आहे.

माझ्यामते चकाकी हा एक गुणधर्म आहे. म्हणजे असे की चकाकणे हा पार्‍याचा गुणधर्म आहे म्हणून तो आरशात वापरला जातो.
तसेच हा गुणधर्म अनेक मूलद्रव्यांत (पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक आहेच) काही प्रमाणात आहे. ज्याचा वापर रंग तयार करताना केला जातो. रंगाला स्वतःची जी छटा असते ती त्याची असते आणि चकाकी ही त्यातील एखाद्या मिश्रित मूलद्र्व्याची वा घटकाची असते.

मी पण या विचाराने अचंभित झालेलो आहे. मलाही अजून विचार करावा लागेल.
खरंच खूप आगळा-वेगळा असा विचार तुम्ही येथे मांडला आहे .

धन्यवाद
सागर

रंगांच्या अनेक छटा या मिती मानता येणार नाहीत.

एकलव्य ,

रंगांच्या अनेक छटा या मिती मानता येणार नाहीत. तसे असेल तर मितीची संकल्पनाच बदलून जाईल.
एका मोबाईल कंपनीची जाहिरात पाहिली होती. ते ६५००००० रंग छटांची जाहिरात करतात.
रंग हा आपला डोळ्यांना होणारा सेन्स आहे जो आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतो.
समोरील वस्तूची मिती ठरवणे हे रंगाचे कार्य नसते तर त्या वस्तूची लांबी रुंदी उंची (वा खोली ) ह्यांचे हे कार्य असते.

उदा:
आपण थिएटरमध्ये चित्रपट पाहतो, ते द्विमितीय चित्र असते. कारण त्यात आपण प्रत्यक्ष घटनेचा त्रिमितीय सेन्स् मिळवू शकत नाही.
म्हणजे आपल्याकडे कोणी बंदूक रोखून गोळी मारली तरी आपण घाबरत नाही.

तेच जर आपण छोटा चेतन सारखा थ्रीडी (त्रिमितीय) चित्रपट पाहिला तर आपल्याला समोरील दृश्याचा सेन्स् प्रत्यक्ष घटनेसारखा होऊ
शकतो. छोटा चेतनने आपल्याकडे आईसक्रीमचा कोन पुढे केला तर अभावितपणे हात पुढे होतो.

एकलव्य, मिती लक्ष की पंचेद्रियांइतक्याच हा तपशीलात शिरण्याचा विषय आहे.
हा तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. यावर अधिक उहापोह करण्याची गरज आहे.

धन्यवाद
सागर

तुमचे हे स्पष्टीकरण आवडले.

युयुत्सु,

तुमचे हे स्पष्टीकरण आवडले. आणि विचार पटलेही
पण दोन बिंदूंचे एकमेकातील आकर्षण ह्याचा मितीशी थेट संबंध आहे असे मला वाटत नाही.
आकर्षणाने त्या दोन बिंदूंमधील प्रक्रिया काय असेल याचा अंदाज करु शकतो. म्हणजे त्याचे वस्तुमान, त्यातील इलेक्ट्रॉन्स्, न्यूट्रॉन्स्, इ. घटकांचा या आकर्षणाशी संबंध नक्कीच आहे.

पण फक्त चार्ज हा एकमेव आकर्षणाचा संबंध नाही. मास (वस्तुमान) हे देखील आहे. मग ह्या दोन्ही आकर्षणांचा अभ्यास करण्यास ह्या बिंदूला (क्ष, य, ज्ञ, च, म) ह्या पंचकडीत टाकावे लागेल. खरे ना ?

हे विधान एकदम पटते मनाला. तरीही येथे इलेक्ट्रिकल चार्ज च्या बरोबर वस्तुमान हा एक्स्ट्रा घटक आकर्षणात भूमिका बजावतो. याचा संबंध मितीशी नक्की कसा हे स्पष्ट केलेत तर खूप छान होईल.
तसेच मास (वस्तुमान) सारखे त्यातील इलेक्ट्रॉन्स्, न्यूट्रॉन्स्, इ. अनेक घटक वाढवता येतील. तरीही यातून अनुमान जे निघते ते असे की या आकर्षणातून वा प्रति-आकर्षणातून एखादी प्रक्रिया जन्म घेणार आहे.

कारण आकर्षण आणि मिती या परस्पर भिन्न गोष्टी आहेत.
आकर्षणातून क्रिया-प्रक्रिया वा उत्सर्ग निर्माण होतो तर
मिती ही केवळ अवस्था असते जी कोणत्याही क्रिया-प्रक्रियेत सहभागी नसते.

माझ्या या विधानांशी तुम्ही सहमत असायला हरकत नाही.

मला असे वाटते आहे की आपली ही चर्चा एका निश्चित दिशेकडे वेग घेत आहे.
धन्यवाद,
सागर

सागर...

... प्रतिसादांतून आपली मते मांडून चर्चेची रंगत वाढविल्याबद्दल आभार. आपले मुद्देसूद लिहिणे आवडले.

विज्ञान कथेंतील जग.

त्रिमिति म्हणजे काय?

-सुभाष राऊत

त्रिमिती

म्हणजे तीन मिती=मोजमापे
स्थिर वास्तवाच्या कुठल्या ठिकाणाला तीन आकडे सांगितले तर तंतोतंत ठरवता येते. म्हणजे
१. इथपासून उत्तरेच्या दिशेने/उलट्या दिशेने "य" मीटर जा
२. तिथपासून पूर्वेच्या दिशेने/उलट्या दिशेने "र" मीटर जा
३. तिथपासून वरच्या दिशेने/उलट्या दिशेने "ल" मीटर जा

सृष्टी स्थिर असली तर जिथे पोचायचे तिथे या तीन मोजलेल्या (मिती) आकड्यांच्या नकाशाने आपण हमखास पोचतो. अशा प्रकारचे जग त्रिमिती (तीन आकड्यांत नेमके ठिकाण सांगणारे) असते.

कधीकधी तीन आकडे लागत नाहीत. एखाद्या खडकाळ बेटावरती लोकांना वरच्या दिशेने उडत जाता येत नाही, आणि खड्डे खणून खोल जाता येत नाही, असे म्हणा. तर त्यांना जिथेजिथे जाता येते, ती सगळी ठिकाणे नेमकी सांगण्या करिता दोनच आकडे पुरतात.
१. इथपासून उत्तरेच्या दिशेने/उलट्या दिशेने "य" मीटर जा
२. तिथपासून पूर्वेच्या दिशेने/उलट्या दिशेने "र" मीटर जा
अशी सृष्टी द्विमिती असते. बहुतेक नकाशे जग द्विमिती असल्याप्रमाणे चितारतात. म्हणजे पुण्याच्या उत्तर-दक्षिणेला, पूर्व-पश्चिमेला कोणती गावे आहेत ते दाखवतात. पण पुण्याच्या आकाशात किंवा खोलात कोणती गावे आहेत त्यांचा उल्लेख नसतो.

कधीकधी एकच आकडा पुरतो. उदाहरणार्थ नेरळ माथेरान रेल्वे घ्या. त्या रुळावर कुठलेही ठिकाण "नेरळपासून 'क्ष' किमि अंतरावर आहे", असे एका आकड्याने नेमके सांगता येते. तर ही रेल्वे एकमिती आहे.

चर्चेचा प्रस्ताव हा की अधिकही मिती आहेत का? त्या आपल्या कान-नाक-डोळे-जीभ-त्वचा या ज्ञानेंद्रियांनी समजण्यासारख्या आहेत का? वगैरे.

ता.क. "मिती"ला इंग्रजी प्रतिशब्द "डायमेन्शन" असा आहे.

चर्चा आवडली, अन खुप माहितीसुद्धा मिळाली. माझेही म्हणणे जरा ऐका..

अच्छा तर... महाशयांनी बहुतेक सकाळी अंघोळ केलेली नव्हती बहुतेक.. (असं मला वाटतं..!!)
हा घोळ तसा माझ्यापण मनात कित्येक दिवसांपासून घर करून होता. अवकाशात अशा कित्येक घटना घडत असतात, ज्या आपल्याला आपल्या ’मानवी ज्ञात इंद्रियां’द्वारे त्रिमितीत जाणवतात, जसे की एखाद्या ग्रहाचा विस्फोट जो की आपण आपल्या उघड डोळ्यांनी पाहू शकतो, तसेच याप्रमाणे इतर इंद्रियांचासुद्धा आपल्याला काही गोष्टींचे आकलन व विश्लेषण करण्यास मदत होते. माझ्या मते, आपण जे आधीचे आहे, त्यातच नविन गोष्टींची सांगड घालण्याचा (बिनकामी) खटाटोप करत असतो. जर आपली ज्ञानेंद्रिये (भौतिक) पाचच असतील, आणि चतुर्मितीचे आकलन करण्यासही असमर्थ असतील, तर आज आपण जे सिद्धांत त्यासाठी वापरतो आहोत, ते त्यापुरतेच मर्यादित असले पाहिजे. मग आपण ५मितिय,....अनंतमितिय गोष्टींबद्दल "त्या" घटनांचा सांगड "या" सिद्धांतांच्या आधारे कशी मिळवू/जूळवू शकतो...? ही "हातात तांब्या, अन मी आणायला चाललोय हंडाभर पाणी..." अशी गोष्ट आहे....!!! खरं तर, यासाठी (माझ्या मते), एक उपाय असू शकतो, तो म्हणजे आपण ज्या पूर्वापार चालत आलेल्या बंधनांमध्ये जखडलोय ना, त्यातून मुक्त होऊन वेगळ्या दृष्टीने विचार करण्याचा... हे काम तसे अवघड आहे, पण इंपॉसिबल तर मुळीच नाही..

बाय दि वे, स्टिंग थेअरी बद्दल दुवा मिळाला तर बरे होईल...

- बांड विश्ल्या

आइनस्टाइन्

आइनस्टाइन् च्या मरणाच्या वेळी त्याच्या शेजारी एक् नोट् सापडली त्यात् त्याने 4th dimension बद्दल् लिहल् होत् अस् म्हणतात् ,हे खर् आहे का?

मिती

शरदजी,
भौतिकशास्त्रामधे जेव्हा मिती हा शब्द वापरला जातो, तेव्हा त्याचा अर्थ नित्याच्या अर्थाहून वेगळा असतो. तो असा- सदिश राशींचा (Vectors) संच एक संच घ्या. या संचातील कोणत्याही दोन राशींची बेरीज केली असता जर उत्तरही याच संचातील सदिश राशी असेल, आणि कोणतीही सदिश कितीही लांबवली तरीही याच संचामधे येत असेल आणि काही किचकट नियम जर या संचातील सदिशांनी पाळले ते अशा संचास सदिश अवकाश (Vector Space) म्हटले जाते. या अवकाशाचा एक गणिती गुणधर्म असा असतो की काही ठरावीक "मुलभूत" सदिश (Basis vectors) सारा संच ठरवतात. ह्या "मुलभूत" सदिश जर "य" असतील, म्हणजे तीन, दहा वगैरे, तर सदिश अवकाशाची मिती "य" आहे असे आपण म्हणतो. सुरुवातीस, ज्या भौतिकशास्त्र कारणार्या लोकांनी संशोधन केले, जसे न्यूटन, गँलिलीओ यांनी भौतिक जगाचे नियम ठरवताना जे सदिश अवकाश वापरले, त्याची केवळ मिती तीन होती. म्हणजे केवळ तीनच सदीश वापरून ते आपले नियम (न्यूटनचे गतीचे नियम) सिद्ध करू शकले. मात्र आइनस्टाईनने, याशिवाय चौथी राशीही घेतली, ती म्हणजे "काळ", आणि त्याणे मिती चार केली. स्र्टींग थिअरी मधे हिच संख्या अकरा/ नउ आहे (नेमके आठवत नाही). त्यामुळे भौतिकशास्त्रातील "मिती" ही संकल्पना केवळ गणिती आहे. तिचा आपल्या जाणीवेशी काही संबंध नाही..!!! :-)
काही भौतिकी २७ मिती असणारे अवकाशही वापरतात... परंतू हे केवळ गणिताची गरज म्हणून..!!!
(ज्यांना गणित येते त्यांची माफी मागून, वरील लिखाणात खुपच कमी काटेकोरता आहे, पण आपण ती समजून घेउ शकाल अशी आपेक्षा..!!)

- आपला चिंटू

 
^ वर