एका साम्राज्याच्या शोधात: अजंठा गुंफा भाग 3

सातवाहन कालातील म्हणता येतील अशी 3 भित्तीचित्रे अजंठ्याच्या 10 क्रमांकाच्या गंफेत आहेत आणि ती अतिशय विद्रूप व खराब अवस्थेत असल्याने कॅमेर्‍याच्या सहाय्याने, झूम करून सुद्धा, त्यावरून तत्कालीन काहीही माहिती प्राप्त करण्याची सुतराम शक्यता नाही हे आपण आधी बघितले आहे. या मूळ 3 चित्रांवरून, ग्रिफिथ यांनी काढलेल्या चित्रांपैकी काही त्यांनी आपल्या पुस्तकात प्रसिद्ध केली होती. मात्र हे पुस्तक अत्यंत दुर्मिळ असल्याने मला वाचण्यास मिळणे अशक्यप्राय दिसल्याने दुसर्‍या कोणत्या पुस्तकात ही चित्रे पुनर्मुद्रित केली आहेत का याचा शोध मी घेऊ लागलो. हा शोध घेत असता श्री. जी. याझदानी यांनी लिहिलेल्या पुस्तकात मला काही चित्रे व रेखाचित्रे मिळाली. बर्जेस यांच्या पुस्तकातही काही स्केचेस सापडली. व या रेखाचित्रांवर मला समाधान मानावे लागणार हे स्पष्ट झाले.

माझ्या दृष्टीने या तिन्ही भित्तीचित्रांचे वैशिष्ट्य हे आहे की त्या सर्वात कोणी एक राजा बुद्धाच्या स्तूप, तोरण किंवा बोधिवृक्ष या सारख्या, कोणत्या न कोणत्या तरी सांकेतिक चिन्हापुढे विनम्र झालेला दाखवलेला आहे. काही ब्रिटिश लेखकांनी हा राजा म्हणजे बौद्ध ग्रंथांच्यात ज्याला नाग जमातीचा राजा म्हटले जाते असा एखादा आदिवासी लोकांचा राजा असावा असे अनुमान काढले होते. परंतु चित्रांचा सखोल अभ्यास केल्यावर हा राजा आदिवासी राजा नसून सुरूवातीच्या सातवाहन राजांपैकी एक असला पाहिजे हे मला स्पष्ट झाले. वर उल्लेख केलेले जी. याझदानी हे लेखक तर नाणेघाटात ज्याच्या कर्तुत्त्वाचा शिलालेख कोरलेला आहे व दगडात कोरलेला ज्याचा पुतळा किंवा शिल्प तेथे उभे होते तो राजा श्री सातकर्णी, अजंठ्यामधील या चित्रांत दाखवलेला असला पाहिजे असे आग्रही प्रतिपादन करतात व मला तरी ते योग्य वाटते आहे.

मी वर्णन करित असलेले पहिले रंगचित्र डाव्या बाजूच्या पॅसेजच्या भिंतीवर 3ते 9 क्रमांकाच्या स्तंभांच्या मागे रंगवलेले आहे. लांबलचक असलेले हे चित्र "बोधी वृक्षाला वंदन करण्यासाठी आलेला राजा व राजपरिवाराचे आगमन" (“Arrival of Raja (King) with his retinue to worship the Bodhi tree.”) या नावाने ओळखले जाते. जी याझदानी यांच्या मते सातवाहन राजा श्री सातकर्णी हा बुद्ध गया येथील बोधी वृक्षाची प्रार्थना करताना या चित्रात दाखवलेला आहे. या चित्राच्या साधारणपणे मध्यभागात राजा एका बोधी किंवा पिंपळ वृक्षासमोर प्रार्थना करताना दाखवलेला आहे. हा संपूर्ण बोधीवृक्ष, बौद्ध मठांमध्ये बहुतेक वेळा दिसतात तशा प्रकारच्या, बॅनर्सनी सजवलेला आहे. राजाबरोबर असलेल्या राजपरिवारात 10 स्त्रिया व बोधी वृक्षाजवळ उभे असलेले बालक हे आहेत. या बालकाच्या उभे रहाण्याच्या स्थानावरून, राजा करित असलेली प्रार्थना ही त्या बालकाच्या संबंधित असण्याची शक्यता आहे. राजाच्या डावीकडे असलेल्या 5 स्त्रिया, राजाच्या चेहर्‍याकडे टक लावून बघत आहेत तर बाकीच्या स्त्रिया हा समारंभ बघत आहेत. एक छोटी मुलगी समारंभ नीट दिसत नसल्याने एका घडवंचीवर उभी राहून हा समारंभ बघते आहे. राजपरिवारातील सर्व स्त्रिया, सध्या वापरात असलेल्या अलंकारांसारख्याच दिसणार्‍या, अलंकारांनी नटलेल्या सजलेल्या आहेत. या अलंकारांत कर्णफुले, गळ्यातील हार, बांगड्या, दंडावरील बाजूबंद यांचा समावेश आहे. हातात खूप संख्येने घातलेल्या बांगड्या बहुदा हस्तीदंती आहेत व या बांगड्यांनी या स्त्रियांच्या हाताचा कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग भरून गेला आहे. लमाणी स्त्रिया आजमितीला सुद्धा अशा बांगड्या भारतामध्ये वापरत असतात. स्त्रियांची उत्तरीय वस्त्रे अतिशय तलम अशा मलमलीची असल्याने त्या अर्धनग्न असल्याचेच चित्रकाराला भासत असल्याने या स्त्रिया तशाच स्वरूपात त्याने दाखवलेल्या आहेत. असे असूनही त्यांच्या अंगावरील वस्त्रप्रावरणे अतिशय कलाकौशल्याने बनवलेली असल्याचे चित्रकार सूचित करतो आहे. एका स्त्रीने मुगुट घातलेला आहे तर दुसरीने केसांभोवती एक पट्टा बांधून त्यात 3 मोरपिसे खोचलेली आहेत. बाकी सर्व स्त्रियांनी राजस्थान मधील स्त्रिया डोक्यावर घेतात तसे घुंगट डोक्यावर घेतलेले आहे. राजपरिवारातील सर्वांचे चेहरे गोलसर दाखवलेले असून नाक सरळ आणि टोकदार, भरदार ओठांची लहानखुरी जिवणी अशी त्यांच्या चेहर्‍यांची वैशिष्ट्ये आहेत. मात्र सर्वांचे डोळे अतिशय पाणीदार व तेजस्वी काढलेले आहेत. राजपरिवारातील व्यक्ती पश्चिम भारतातील किंवा महाराष्ट्रातील सर्वसामान्य व्यक्तींसारख्याच दिसत आहेत. उत्तर किंवा दक्षिण हिंदुस्थानी लोकांशी त्यांचे साधर्म्य अजिबातच दिसत नाहीये. राजाच्या डोक्यावर मुगुट नसला तरी माथ्यावर केसांचा एक बुचडा बांधून त्या भोवती एक रत्नजडित पट्टा त्याने बांधलेला आहे. अनेक स्त्रियांच्या डोक्यावरचा भांग डाव्या बाजूला काढलेला दिसतो आहे. काही स्त्रियांच्या कपाळावर कार्ल्याच्या गुंफेत असलेल्या शिल्पांसारखी बिंदी रंगवलेली आहे.
राजाच्या समोर एका आंब्याच्या वृक्षाखाली 3 किंवा 4 नर्तकी नृत्य करताना दिसत आहेत. त्यांच्या मागील बाजूस वेताचे विणकाम करून तयार केलेल्या (wicker work stools) मोड्यांवर, या नर्तकींना साथ करणार्‍या 6 स्त्रियांचा गट बसलेला दिसतो आहे. या पैकी 2 स्त्रियांच्या हातात पिपाणी सारखे फुंकून वाजवण्याचे वाद्य दिसते आहे तर बाकीच्या साथीदार स्त्रिया टाळ्या वाजवून ताल धरताना दाखवल्या आहेत. ताल वाद्य मात्र या चित्रात दिसत नाही. या शिवाय आणखी 5ते6स्त्रिया मागे बसून हा नाच बघत आहेत. त्यात 2 लहान मुली आहेत. या नृत्य व गायन वादन करणार्‍या गटातील स्त्रियांची वेषभूषा साधारण राजपरिवारातील स्त्रियांप्रमाणेच दिसते आहे.
राजाच्या मागील बाजूस परशू, भाले, वक्र तलवारी व धनुष्यबाण धारण केलेले अनेक सैनिक दिसत आहेत. डोकयावर कान संपूर्णपणे झाकले जातील असे मुंडासे बांधलेला एक गदाधर सैनिकही दिसतो आहे. बहुतेक सैनिकांची चित्रे नष्ट झालेली असून आता त्यांचे भाले फक्त दिसू शकत आहेत. बाकीच्या सैनिकांकडे धनुष्यबाण किंवा वक्र तलवारी असल्याचे दाखवलेले आहे.

चित्रकाराने त्या काळातील लोकांची रहाणी कशी होती ती विविध अंगांनी दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे असे मला वाटत राहते. सातवाहन कालातील लोकांची वेशभूषा, संस्कृती, सर्वधर्मसहभाव याची उत्तम कल्पना या चित्रावरून येते आहे. महाराष्ट्रातील लोकजीवन व संस्कृतीची परंपरा किती अखंड व अबाधितपणे गेली 2000 वर्षे चालू राहिलेली आहे याची कल्पना आपल्याला या चित्रावरून येऊ शकते असे मला वाटते. या चित्रातील बोधीवृक्षाऐवजी तेथे शिवलिंग किंवा गणपतीची मूर्ती दाखवली तर हे चित्र शिवकालीन किंवा अगदी पेशवेकालीन म्हणून सुद्धा खपवता येईल.

ग़ुंफा क्रमांक 10 मधील दुसरे चित्र सुद्धा डाव्या भिंतीवरच परंतु 9ते 11 क्रमांकाच्या स्तंभांच्या मागील बाजूस आहे. हे चित्र " राजपरिवाराचे स्तूपाला वंदन" (“ The Royal Party worshipping a Stupa.”) या नावाने ओळखले जाते. या चित्रात अर्थातच राजपरिवार एका स्तूपाला वंदन करताना दाखवलेला आहे. जी. याझदानी या लेखकाच्या मताने हे चित्र सातवाहन राजा श्री सातकर्णी याने सांची स्तूपाला भेट दिली असल्याचे दर्शवतो आहे. ( या स्तूपाच्या एका तोरणावर या राजाचे नाव कोरलेले आहे.) या चित्रातील स्तूपाच्या डोक्यावर एक ध्वज व छत्री आहे. हा स्तूप म्हणजे एक अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ असल्याचे दर्शवण्यासाठी, चित्रकाराने स्तूपाच्या दोन्ही बाजूंना उडणार्‍या 2 अप्सरा दाखवलेल्या आहेत. मात्र या अप्सरा व त्यांची वेशभूषा ही मानवी स्वरूपातील दाखवलेली आहे.
या चित्राच्या उजव्या भागात (दर्शकाच्या डाव्या बाजूस) 10 उपासक हात जोडून स्तूपासमोर प्रार्थना करताना दर्शवलेले आहेत. त्यांच्या डोक्यावरील शिरस्त्राणांवरून ते भिख्खू नाहीत हे स्पष्ट दिसते आहे. चित्राच्या उजवीकडच्या भागात हात जोडलेले आणखी 4 उपासक दिसत आहेत. त्यांच्या मागील बाजूस परत एक आंब्याचे झाड दाखवलेले आहे.
या गुंफेतीलच व सातवाहन कालातील असे ज्याला नक्की म्हणता येते असे चित्र क्रमांक 3 हे ही डाव्या भिंतीवरच रंगवलेले आहे. हे चित्र मागील चित्राला जोडूनच सलग रंगवलेले आहे. मागचे चित्र व हे चित्र यांच्यामध्ये एक उपासकाचा चेहरा फक्त आता उरलेला आहे. राजपरिवारातील बाकी व्यक्तींची चित्रे संपूर्ण नष्ट झालेली आहेत. हे चित्र " राजपरिवाराचे तोरणाखालून आगमन व प्रयाण " (“The Royal Party passing through a gateway.”) या नावाने ओळखले जाते. चित्राच्या ज्या भागांचे आकलन होऊ शकते त्यात प्रथम एक छत्री दिसते आहे व त्या शेजारी एक आंब्याचे झाड दिसते आहे. या झाडाखाली 4 व्यक्तींची फक्त डोकी दिसू शकत आहेत. यापैकी एक व्यक्ती वर वर्णन केलेले खास मुंडासे परिधान केलेली गदाधर व्यक्ती आहे. याच्या उजवीकडे एक बौद्ध तोरण दिसते आहे. अजंठा गुंफांना समकालीन असलेल्या सांची येथील स्तूपाभोवती चारी प्रमुख दिशांना अशीच तोरणे उभारलेली आजही दिसतात. राजपरिवारापैकी एक व्यक्ती तोरणाखालून जाताना दिसते आहे तर इतर अनेक व्यक्ती बाहेरच्या बाजूला दिसत आहेत. एक हत्तीस्वार आपल्या उजव्या हातात दुहेरी धारेची तलवार धरून बसलेला आहे आणि त्याच्या डाव्या हातात मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण आकाराची मुगूट किंवा ढालीसारखी एक वस्तू दिसते आहे. या तलवारधारक व्यक्तीच्या उजव्या बाजूला असलेला एक सेवक आपला हात वर उचलून अंगठा व तर्जनी हे एकमेकाला जुळवून काहीतरी मुद्रा दर्शवतो आहे. उजव्या बाजूला असलेला गजराज आपली सोंड उंचावून राजाला अभिवादन करतो आहे. हत्तीवर बसलेल्या व्यक्तीच्या हातात पराणी आहे. उजवीकडे आणखी निदान 3 तरी हत्ती असून त्यावर राजपरिवारातील व्यक्ती बसलेल्या आहेत हे त्यांच्या डोक्यावरील छत्रांवरून कळते आहे. यातील 2 हत्ती तोरणांकडे येत आहेत तर तिसरा तोरणापासून दूर जात आहे. जी. याझदानी यांच्या मताने, स्तूपाला भेट देणार्‍या राजाचे आगमन व प्रयाण या द्वारे चित्रकाराने सूचित केले आहे. चित्राच्या सर्वात उजवीकडे असलेल्या हत्तीवरील राजाचे चित्र बघितल्यास त्यावरील राजा आपल्या हाताने हत्तीच्या गंडस्थळावर ठेवलेल्या व झाडाची फांदी खोचलेल्या एक फुलदाणीला आधार देताना दाखवलेला आहे. बुद्धाला ज्या बोधी वृक्षाखाली दैवी साक्षात्कार झाला त्या बोधी वृक्षाची ही फांदी असली पाहिजे व या दृष्यामुळे 3 क्रमांकाचे हे चित्र सातवाहन राजा श्री सातकर्णी याने बोधीगयेला दिलेल्या भेटीचे असले पाहिजे असे जी याझदानी मानतात.

बर्जेसने ग्रिफिथ्सच्या मूळ चित्रांमधील काही व्यक्तींची चित्रे मोठी करून काढून घेतली होती. वर दिलेल्या वर्णनातील व्यक्तीवैशिष्ट्ये या चित्रांवरून अगदी स्पष्ट होतात असे मला वाटते. 10 क्रमांकाच्या गुंफेतील ही भित्तीचित्रे, सातवाहन कालातील लोकांची राहणी व जीवन कसे होते हे समजण्यासाठी पितळखोर्‍याच्या बास रिलिफ शिल्पांइतकीच उपयुक्त आहेत असे मला वाटते.

मी आता माझा मोर्चा 9 क्रमांकाच्या गुंफेकडे वळवतो आहे. या गुंफेमध्ये सुद्धा सातवाहन कालातील काही भित्तीचित्रे आहेत.

क्रमश:

31ऑगस्ट 2012

या लेखासोबत असलेली छायाचित्रे या दुव्यावर क्लिक केल्यास बघता येतील.

लेखनविषय: दुवे:

Comments

अतिशय छान

लेख फार आवडला.

चित्रे मात्र या लेखातच हवी होती असे वाटत राहते, पण हरकत नाही, चित्रे जवळून बघायला मिळाली हेही थोडे नाही.

मागील सर्व भागांप्रमाणेच

मागील सर्व भागांप्रमाणेच.

दुहेरी धारेची तलवार आणि हत्तीवर बसलेल्या व्यक्तीच्या हातात पराणी आहे.
हे हत्ती नियंत्रित करण्यासाठीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंकुश असावेत काय? (अंकुश हा सहसा भाल्याची लहान प्रतिकृती असावी तसा पाहिलेला आहे. शिवाय त्याला अर्ध वर्तुळाकार अशी एक चकतीही बसवलेली असते. कसा वापरतात देव/माहुत जाणे.)

या दृष्यामुळे 3 क्रमांकाचे हे चित्र सातवाहन राजा श्री सातकर्णी याने बोधीगयेला दिलेल्या भेटीचे असले पाहिजे असे जी याझदानी मानतात
सातकर्णीच्या काळात सातवाहन सत्तेचा विस्तार बोधगयेपर्यंत झाला होता काय? नसेल तर दुसर्‍याच्या राज्यातल्या तीर्थक्षेत्रात जाणे राजाला/सम्राटाला/राजघराण्यातील व्यक्तीला त्याकाळात शक्य होते का?(मला ते शक्य असेल असे वाटत नाही.)
विवाहसंबंधांनी जर राज्ये जोडली गेली असतील तर किम्वा एखाद्या मोठ्या संघाचा/confederateचा किंवा एकाच मोठ्या आघाडीचा जर ती दोन राज्ये भाग असतील तर तसे होण्याची शक्यता आहे. पण तरीही कठीणच दिसते.
कल्पना करा नर्मदातीरी घनघोर लढाई करणारे पुलकेशी आणि हर्षवर्धन हे एकमेकांच्या राज्यात ये-जा करु शकतील का?
हर्षवर्धन अजिंठ्यास कीम्वा प्रतिष्ठानास भेट देतो म्हणाला किंवा पुलकेशी कनौजमुक्कामी राहतो म्हणाला तर कसे चालेल?
अर्थात, जर सातवाहनांचे राज्य दूरवर पसरले असेल तर ही पूर्ण शंकाच गैरलागू आहे.
.
अवांतरः-
हर्षवर्धनाच्या काळात वर्धनांचे थेट राज्य आपल्याला वाटते तितके मोठे नाही हे माझ्या नंतर लक्षात आले. त्याने दोन्-तीन राज्ये विवाह्संबंधाने जोडून घेतली होती; ती थेट नियंत्रणात नव्हती. म्ह्णूनच त्याच्या मृत्युनंतर त्याचे साम्राज्य फार काळ टिकले नाही.

श्री सातकर्णी राजा वगैरे

हा महापराक्रमी राजा इ.स.पूर्व 189-179 या कालात राज्यावर होता असे मानले जाते. या कालात उत्तर हिंदुस्थानातील परिस्थिती अतिशय दोलायमान होती असे म्हणता येते. मौर्य घरण्याची राजसत्ता संपुष्टात आली होती व शुंग घराण्याने पूर्ण सत्ता प्रस्थापित केलेली नव्हती काही ग्रंथात श्री सातकर्णी राजाने शुंग राजाचा पराभव केल्याचा उल्लेख सापडतो.परंतु महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटप्रमाणे हा राजा नंतरचा असला पाहिजे. माळवा प्रांत नकीच श्री सातकर्णीच्या ताब्यात होता असे तेथे सापडलेल्या नाण्यांवरून म्हणता येते. इतक्या अनसेटलड परिस्थितीत श्री सातकर्णी राजाने एखाद्या मोहिनेच्या दरम्यान सांची व बोधी गया येथे भेट देणे मला तरी अशक्य वाटत नाही. अर्थात चित्रकाराने काढलेले चित्र कल्पनेतीलही असू शकते.

सांची येथील स्तूपाच्या तोरणावर श्री सातकर्णी राजाचे नाव कोरलेले आहे ही सत्य परिस्थिती आहे.

पुढे टोकदार खिळा बसवलेल्या वस्तूला पराणी म्हणतात या साठी हा शब्द मी वापरला आहे.तो अंकूशही असू शकतो.

ओहो...

असय होय.
मौर्यानंतरचं ते अस्थैर्य. कल्पना आहे. बल्ख/अफगाणिस्तान मधून ग्रीक राजा मिनँडर/मिलिंद (तोच तो प्रसिद्ध "मिलिंद पन्हो" वाला) थेट भारताच्या मुख्य भूमीत घुसला होता. त्याच्या नंतर डिमिट्रस्/दत्तमित्र ह्यानंही घुसायचा प्रयत्न केला.
खारवेलानं तिकडे कलिंगाचं राज्य वाढवलेलं. पूर्वीची प्रबळ मगध सत्ता/साम्राज्य खिळखिळे होउ लागलेले.
तिकडे शकांनी त्यापाठोपाठ उच्छाद पश्चिमेस सुरु केलेला. एकसंध असे उत्तर भारतात काहीच राज्य म्हणून उभे नव्हते.
थोडिफार कल्पना आहे.
पण सातकर्णी उत्तर भारतात मोहिम घेउन गेल्याची काही कल्पना नव्हती. नवीन माहिती. आभार.
अवांतर:- दूर उत्तरेत गांगा- यमुनेच्या दुआबात दक्षिणेकडून उत्तरेत घुसणारे पहिले राजे शाळकरी दिवसात मी पेशव्यांना/छत्रपतींना समजत होतो. आतापर्यंत म्हणून राष्ट्रकूटांना समजत होतो. (काही काळ आजच्या युपी मधील कनौज त्यांनी ताब्यात ठेवले होते.) तसे नसण्याची (सातकर्णी पहिला ) असण्याची शक्यता/माहिती लक्षात ठेवायला हवी.(आपली आधीची माहिती चूक होती हे समजणं कधी थांबेल? ;) )

अतिअवांतरः-
खरे तर उत्तर भारत मागच्या अडीच हजार वर्षात किती काळ स्थिर होता?
मौर्यांची ऐंशी ते शंभर वर्षे; कनिष्काची दोनेक दशके, गुप्त राजांची दोनेक शतके, हर्षवर्धानाची दोनेक दशके.
बस्स. पुन्हा थेट खिल्जी-- तुघलक ह्यांचे अर्धशतक; मुघल सत्तेची कळसाची सव्वाशे वर्षे.
टोटलात, एकूण अडीच हजार वर्षापैकी एक तृतीयांश काळाच्या आसपासच स्थिर सत्ता म्हणता यावी अशी उत्तर भारतात राज्ये/साम्राज्ये होती;ज्यांची बहुतांश उत्तर भारतावर सलग सत्ता होती. एरवी सदैव विभाजित रुपच दिसते.

हा लेख विशेष आवडला

लेखमालिका चांगली आहे. सर्व लेख वाचत आहे. भर घालण्याची कुवत नसल्याने दर लेखांकांना प्रतिसाद देत/देणार नाही हे आधीच सांगितलं होतं .. फक्त हा लेख विशेष आवडल्याने विशेष अभिनंदन करण्यासाठी प्रतिसाद देतो आहे :)

वाचते आहे

अद्याप वाचते आहे. नंतर सविस्तर प्रतिक्रिया देईन.

छान

लेखमालेने माहितीत भर पडते आहे, हे सांगण्याकरीता हा प्रतिसाद.

वाचत आहेच ...

 
^ वर