अजि म्यां ब्रह्म ऐकिले........

पृष्ठप्रांगण अर्थात ब्याकग्रौंड :

शुक्रवारी अर्थात २४ आगष्टास संध्याकाळी ६ वाजता केसरीवाड्यात प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांचा आवाज असलेली ध्वनिफीत ऐकायला मिळणार आहे अशी बातमी ईईई सकाळात बुधवारी वाचली. मग म्हटले प्रत्यक्ष लोकमान्यांचा आवाज ऐकायला गेलेचि पाहिजे. गेलो मग केसरीवाड्यात.

प्रसंग होता २१ सप्टेंबर १९१५ रोजी केसरीवाड्यातील गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या एका गायन समारंभाचा. बालगंधर्व, भास्करबुवा बखले आणि मास्तर कृष्णराव असे एकसे एक डॉन डॉन लोक बोलावले होते, लै गर्दी जमली होती. तशी आपल्या इथली लोकं अडगी ती अडगीच-मग काळ कुठलाही असो. उगीच दंगा करू लागली. मग लोकमान्यांनी सर्वांना कडक तंबी दिली आणि शांत बसवले ; शिवाय गायनकलेबद्दल छोटेसे भाष्यदेखील केले. त्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग झाले त्यात हे अवघ्या एका मिनिटाचे नाट्यदेखील कॅप्चर झाले.

तर मग डॉट्ट सहा वाजता पोहोचलो. केसरीवाड्यात फुल्टू गर्दी . आयबीएन सेव्हन वैग्रे च्यानेलांचे प्रतिनिधी हजर होते. काही पोलीसपण होते. नंतर कळाले की निखिल वागळ्यांची सुधीर गाडगीळ मुलाखत घेणारेत. आधीच तिथे बसायला जागा नव्हती, म्हटलं आयच्या गावात आता २ तास उभारून पायांचा भुगा झाला की मग शेवटी ऐकवतील, पण सुदैवाने त्या मुलाखतीच्या आधीच ऐकायला मिळाली. शेवटी मग लोकमान्यांचा आवाज ऐकला आणि अंगावर एक शहारा उठला. तोच हा आवाज ज्याने "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच" हा नारा देऊन इंग्रजांना कळायचं बंद करून सोडलं होतं. निव्वळ योगायोगाने आणि सेठ नारंग यांच्या गायनप्रियतेमुळे आज हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला.एकदम ती मधली ९७ वर्षे जणू गायब झाली आणि मी २१ सप्टेंबर १९१५ ला केसरीवाड्यात पोहोचलो.

" आजचा कार्यक्रम गणपतिउत्सवाचा आहे. ठरल्याप्रमाणं गायनाचार्य बखलेबुवा यांचं .... गायन सुद्धा लोकांनी शांतपणे ऐकावं, अशी माझी इच्छा आहे. कुणी गडबड केली, तर मी ऐकून घेणार नाही. लोकांनी बाहेर जावं.पण ठरलेला कार्यक्रम झालाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे. भास्करबुवांच्या गाण्याबद्दल, मला काही जे वाटतं, ते वाटतं म्हणजे असं, की माझ्या मते तथापी ही कला मोठी आहे, .........अन् ते काही खोटं नाही. तेव्हा त्याच्याबद्दल मला अभिमान आहे की मी जरी मी गाणं शिकलो नाही, तथापी त्या ......बद्दल विचार करावा असं मला वाटतं आणि म्हणून भास्करबुवांसारख्यांना मी इथे ... दिली आणि बुवा जर इथे आले , अन कार्यक्रम .......झालेला आहे .....उत्तम प्रकारे काम केलेलं आहे, तेव्हा सर्वांतर्फे मी त्यांचे आभार मानतो, आणि गणपतीनं प्रत्यक्ष..... चा अर्थ लावून गावं असं मला वाटतं, इतकं बोलून मी आपली सर्वांची रजा घेतो."

(एकदा ऐकल्यावर परत वन्स मोर च्या गजरात ध्वनिफीत पुन्हा एकदा चालवली गेली. पुन्हा एकदा ऐकल्यावर मग सटकलो तिथून. तसेही एकदा लोकमान्यांचा आवाज ऐकल्यावर वागळे आणि गाडगीळ काय दिवे लावणारेत हे ऐकायची बिल्कुल इच्छा नव्हती.)

ध्वनिफीत इथेच संपली, पण मन अजूनही भूतकाळातच वावरत होते. रत्नागिरी, पुणे, मग पितृनिधन, केसरीची स्थापना, मंडाले, जहाल-मवाळ दरी, होमरूल चळवळ, या सार्‍या घटना क्षणार्धात डोळ्यांपुढे तरळून गेल्या आणि दिसले ते अडिग, अविचल असे लोकमान्य.ध्वनिफितीसारख्या या छोट्याछोट्या गोष्टीदेखील, भूतकाळ आणि वर्तमानकाळ या संज्ञा भास आहेत हे जणू सिद्ध करतात. एक ऑडिओ लोकमान्यांपर्यंत नेतो; एखादे चिटोरे डायरेक्ट छत्रपतींपर्यंत नेते. मधला एवढा मोठा काळ जणू विरुनच जातो आणि ती काळाच्या पडद्याआडची माणसे जिवंत होऊन समोर दिसू लागतात - अगदी हरितात्यांना जसे छत्रपती दिसत तसेच. आणि मग हरितात्यांच्या वागण्यातले मर्म कळते.

कैकवेळेस इष्टमित्र विचारतात, काहीजण खिल्लीदेखील उडवितात. या जुनाट गोष्टींमध्ये काय गाठोडे ठेवले आहे ते त्यांना उमजत नाही आणि त्यांना का उमजत नाही ते मला समजत नाही. पण ती अर्धवट नष्ट झालेली पत्रे , ते देवळाबाहेरचे एकाकी वीरगळ, किल्ल्याचे बुलंद बुरुज, म्हणजे टाईम मशीनची पोर्टल्सच जणू. त्यांच्याशी बोलावे तितके कमीच हे त्या वर्तमानातदेखील पुरतेपणी न रमणार्‍यांना कसे कळणार? एका पत्राआडून छत्रपती आम्हां रयतांची काळजी घेताहेत, तर दुसर्‍या पत्रातून सखारामबापू २२ मोगली सुभ्यांचा हिशेब सांगून मराठ्यांचे सामर्थ्य अधोरेखित करताहेत, तर एखाद्या जीर्ण दासबोधाच्या पोथीआडून सस्मित वदनाने समर्थ "गोष्टी युक्तिच्या चार" सांगताहेत. आता इतके लोक संवादोत्सुक असताना इथे रमू नाहीतर कुठे? हेच आमचं फेसबुक आणि हेच आमचं ट्विटर.

असो. अजून विस्कळीत होण्याआधी थांबतो.

लेखनविषय: दुवे:

Comments

कार्यक्रम सप्टेंबर १४, १९१४ ला झाला, सप्टेंबर २१, १९१५ ला नाही.

आताच यूटयूबवर ह्या आवाजाची चित्रफीत पाहिली.

ह्या कार्यक्रमाविषयीची मास्टर कृष्णरावांची 'आठवण' 'लोकमान्य टिळक ह्यांच्या आठवणी आणि आख्यायिका' ह्या सदाशिव विनायक बापट-संग्रहित तीन खंडातील पुस्तकाच्या दुसर्‍या खंडात पान ४५७ वर दिली आहे. तिचा प्रास्ताविक भाग असा:

कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर ऊर्फ मास्तर कृष्णा [गवई, गंधर्व नाटकमंडळींतील एक प्रमुख नट, पुणें.]
"सन १९१४ च्या गणपत्युत्सवांत, गायकवाडवाडयांत श्रीगजाननासमोर, बुधवार ता. २ सप्टेंबर रोजी गुरुवर्य भास्करबोवा बखले, श्रीयुत नारायणराव राजहंस आणि मी अशा तिघांचें गायन झालें होतें." (शुद्धलेखन जुन्या नियमांचें, 'उंच माझा झोका'च्या चाहत्यांना आवडावें.)

सप्टेंबर २, १९१४ ह्या दिवशी बुधवारच होता हे जालावरून लगेचच शोधता आले. ह्याचा अर्थ ह्या 'आठवणी'तील तपशील बरोबर आहेत. ई-सकाळच्या ऑगस्ट २२, २०१२ च्या अंकात मात्र हीच तारीख सप्टेंबर २१, १९१५ अशी दिलेली आहे आणि ती अर्थातच चूक आहे. 'आठवणीं'मध्ये चूक असण्याची शक्यता नव्हतीच. 'आठवणी'कार सदाशिव विनायक बापट हे टिळकांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक होते आणि पुस्तकहि टिळकांचे अनेक निकटवर्तीय हयात होते अशा काळात निघाले आहे.

टिळक मंडालेहून सुटून पुण्यास जून १९१४ च्या अखेरीस पोहोचले, म्हणजेच गाण्याच्या वेळेस ते नुकतेच पुण्यात परतले होते.

मला स्वत;ला 'आठवणी' हे पुस्तक मधूनमधून चाळायला आवडते. १९२० पर्यंतच्या काळातील शेकडो व्यक्तींची नावे, तत्कालीन घटना आणि त्यांचे संदर्भ त्यामधून कळतात आणि भूतकाळात सैर करून आल्यासारखे वाटते.

"टिळकांच्या 'आठवणी' आणि आठवणीकार बापट" अशा शीर्षकाचा एक लेख मी येथे लिहिला आहे.

धन्यवाद

+१.
तुमच्या संदर्भसंपन्नतेची आणि तत्परतेची दाद द्यायला हवी. योग्य संदर्भाबद्दल बहुत धन्यवाद!!! सकाळला सांगायला पाहिजे त्यांच्या बातमीतील चूक. आठवणीकारांबद्दलचा तुम्ही लिहिलेला लेख आधी वाचला होता.

वा! वा! अलभ्य लाभ

लेखाबद्दल धन्यवाद.

कुणी गडबड केली, तर मी ऐकून घेणार नाही. लोकांनी बाहेर जावं.पण ठरलेला कार्यक्रम झालाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे.

एकदम रोखठोख!

"मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही."

वगैरे कथारुपे प्रसिद्ध असले तरी हे बोलले नसावे अशी शंका घेण्याचे कारण नाही. :-)

लोकमान्य टिळकांचा आवाज येथे ऐकावा.

तूनळी

सकाळी उठून पाहतो तर सर्वत्र तूनळीवर टाकलेय लोकांनी! मीपण रेकॉर्ड केलेय पण म्हटले उगिच कशाला लिहा, ज्यांना पाहिजे त्यांना सेपरेट मेल करू. :)

कारण की ....

या जुनाट गोष्टींमध्ये काय गाठोडे ठेवले आहे ते त्यांना उमजत नाही आणि त्यांना का उमजत नाही ते मला समजत नाही.
कारण
पण ती अर्धवट नष्ट झालेली पत्रे , ते देवळाबाहेरचे एकाकी वीरगळ, किल्ल्याचे बुलंद बुरुज, म्हणजे टाईम मशीनची पोर्टल्सच जणू.
हे 'त्यां'ना ठाऊकच नसते. मग
त्यांच्याशी बोलावे तितके कमीच हे त्या वर्तमानातदेखील पुरतेपणी न रमणार्‍यांना कसे कळणार?

एका पत्राआडून छत्रपती आम्हां रयतांची काळजी घेताहेत, तर दुसर्‍या पत्रातून सखारामबापू २२ मोगली सुभ्यांचा हिशेब सांगून मराठ्यांचे सामर्थ्य अधोरेखित करताहेत, तर एखाद्या जीर्ण दासबोधाच्या पोथीआडून सस्मित वदनाने समर्थ "गोष्टी युक्तिच्या चार" सांगताहेत. आता इतके लोक संवादोत्सुक असताना इथे रमू नाहीतर कुठे?

हे संवादोत्सुक लोक 'त्यां'च्या ओळखीचे नसतात किंवा दिसतच नाहीत. बिच्चारे!

आशेची किनार

क्रेझ, फॅड, लोकप्रियता, इ. गुण चिकटले की वस्तूचे स्वतोमूल्यच माझ्या लेखी कमी होते. ‘तो’ आवाज लोकमान्यांचा नाही ही शक्यता आवडली. अशा मायनॉरिटी रिपोर्ट ची आवश्यकता आता अधिक आहे असे मला वाटते. तत्त्वतः क्रीएशनिजमचीही वैज्ञानिक चर्चा आवश्यक असतेच.

श्रद्धा

तो आवाज लोकमान्यांचा असल्याची श्रद्धा जर काही लोकांची असेल तर त्याला कोणी काही करु शकत नाही. जस की नसेल ही कदाचित रामजन्म अर्योध्येतील रामजन्मभूमीत झालेला पण कोट्यावधी लोकांची तशी श्रद्धा आहे असे म्हटले की ते सिद्ध असिद्ध तेच्या पलिकडे जाते.

बरोबर

बातमीचा शेवटचा भाग "तो टिळकांचाच आवाज असल्याची आमची श्रद्धा आहे" असे सांगतो. सर्व वाद तेथेच संपतात. :-(

घशातील दात

ते स्पष्टीकरण आता देण्यात आलेले आहे. हेही नसे थोडके.

लोकमान्यांचा आवाज

निखिल जोशी यांनी दिलेला दुवा वाचला. त्याचा प्रतिवाद मायबोलीवर एके ठिकाणी केला गेलेला आहे. मी हा लेख साधा नॉस्टॅल्जिक होऊन लिहिला होता, तर मायबोलीवरचा लेख हा अगदी तपशीलवार आणि अभ्यासू असा होता. तर त्या लेखाच्या लेखकाने त्या आक्षेपाचा प्रतिवाद केला आहे. खरेखोटे मला नाही माहिती, मी जास्त खोलवर गेलो नाही. शिवाय हाच लेख माझ्या ब्लॉगवर मी लिहिला तेव्हा धनंजय यांनी काही व्हॅलिड शंका उपस्थित केल्या होत्या. त्यांची उत्तरे मला माहिती नाहीत.

एकुणात याबद्दलच्या चर्चेचा निकाल जर 'तो आवाज लोकमान्यांचा नाही/पुरेसा पुरावा नाही" असा असेल तर हा लेख उडवून टाकावा ही विनंती.

 
^ वर