एका साम्राज्याच्या शोधात: अजंठा गुंफा भाग 2

अजंठा घळीतील गुंफांमध्ये, "पूर्वकालीन गुंफा" या नावाने ओळखला जाणारा गुंफांचा गट आहे. या गटात 6 गुंफा असून त्या इ.स.पूर्व 200ते100 या किंवा सातवाहन राजे, सिमुक, कृष्ण व श्री सातकर्णी हे राज्यावर असण्याच्या कालखंडात खोदल्या गेलेल्या आहेत. या गुंफांना 8, 9, 10, 12, 13, आणि 15अ असे क्रमांक दिले गेले आहेत. या गटापैकी क्रमांक 13, व 15अ या गुंफा म्हणजे अगदी छोटे असे भिख्खू विहार किंवा भिख्खूंची निवासस्थाने आहेत. या दोन्ही गुंफांच्या प्रवेशद्वाराजवळील भिंतीचा भाग कोसळल्याने नष्ट झालेला आहे. 13 क्रमांकाच्या गुंफेत असलेल्या 7 निवास कोठड्या, अतिशय चिंचोळ्या व लहान असल्याने, प्रशिक्षार्थी भिख्खूंसाठी एक डॉरमेटरी म्हणून ही गुंफा खोदलेली असावी असे समजले जाते. या गुंफेतील काही कोठड्यांमध्ये पाषाणातच कोरलेले मंचक व डोके ठेवण्यासाठी पाषाणातूनच उशी खोदलेली आहे. 15 अ क्रमांकाच्या गुंफेत फक्त 3 कोठड्या आहेत. मात्र या गुंफेत कोठड्यांच्या द्वाराजवळ कोरीवकाम केलेले आढळते. या द्वारांच्या वरच्या बाजूस घोड्याच्या नालाच्या आकाराच्या चैत्य कमानी कोरलेल्या आहेत. या कमानींच्या वरच्या बाजूस,म्हणजेच छताच्या जवळ सलग अशी एक मोल्डिंग पट्टी खोदलेली आहे. या मोल्डिंग पट्टीत उलट्या ठेवलेल्या व पायर्‍या पायर्‍या असलेल्या पिरॅमिड्सचे डिझाइन कोरलेले आहे. या गुंफेच्या पुढच्या भिंतीवर बौद्ध रेलिंग पॅटर्न कोरलेला होता. या गटातील 8 क्रमांकाच्या तिसर्‍या गुंफेत, आता काहीच उरलेले नाही; पुरातत्त्व विभाग कोठी म्हणून ही गुंफा सध्या वापरत आहे. थोडक्यात म्हणजे वरील 3 गुंफांत फारसे बघण्यासारखे असे आता काहीच उरलेले नाही. त्यामुळे मी माझे लक्ष उरलेल्या 3 गुंफांकडे वळवतो.

12 क्रमांकाची गुंफा हा एक मोठा भिख्खू विहार आहे. बर्जेसच्या मोजणी प्रमाणे हा विहार, 36-1/4 फूट प्रत्येक बाजूची लांबी असलेली एक चौरसाकृती आहे. आतल्या तिन्ही बाजूंना प्रत्येकी 4 कोठड्या आहेत. प्रत्येक कोठडीत खोदलेले 2 दगडी मंचक असून त्यावर पाषाणांच्या कोरलेल्याच उशा आहेत. गुंफेच्या मुखाजवळील भिंत पूर्णपणे ढासळून गेलेली आहे. परंतु या भिंतीच्या बाजूच्या भिंतीवर उरलेल्या खाणाखुणांमुळे, या मुखाजवळील भिंतीच्या बाहेरील बाजूस एक व्हरांडा असल्याचे मात्र दिसते. या विहारातील आतील भिंतींच्यावर कोठड्यांच्या द्वारांच्या वरच्या बाजूस, चैत्य कमानी कोरलेल्या आहेत. व्हरांड्यालगत असलेल्या बाजूच्या भिंतीवर सुद्धा, आतील भिंतीवर असलेल्या सारख्या चैत्य कमानी व रेलिंग पॅटर्न कोरलेले दिसत आहेत. फक्त उजव्या बाजूच्या आतील भिंतीवर लाकडी जाळी पॅटर्न, फुलांचे डिझाइन, बेर्म रेल कमानी यांचे विशेष नक्षीकाम केलेले दिसते आहे. या नक्षीकामाच्या वरच्या बाजूस छताजवळ एक सलग कठडा खोदलेला आहे. या कठड्यावर पायर्‍यापायर्‍या असलेल्या त्रिकोणांची नक्षी कोरलेली आहे. या नक्षीला असिरियन पॅटर्न या नावाने ओळखले जाते कारण इराण मधील अनेक ठिकाणी ही नक्षी आढ्ळून आलेली आहे. दारांच्या सिल्स आणि लिंटेल्स यावर खुंट्या मारण्यासाठी म्हणून छिद्रे पाडलेली आहेत. या छिद्रांवरून या कोठड्यांना दारे बसवण्याची सुविधा होती असे समजले जाते. या बाजूस असलेल्या विशेष नक्षीकामामुळे या बाजूच्या कोठड्या वरिष्ठ, महत्त्वाच्या पदावर असलेले भिख्खू वा आचार्य यांच्या रहाण्यासाठी असाव्यात. विहाराच्या मागील भिंतीवर असलेल्या सर्वात उजव्या कोठडीच्या द्वाराच्या डाव्या बाजूस एक शिलालेख कोरलेला आहे.

ठानको देयधर्म
धनामदडस वणिज(स)
सउवयरको सउपा(सयो)

या शिलालेखाचे बर्जेस याचे भाषांतर असे आहे.

“ The meritorious gift of a dwelling with cells and hall by the merchant Ghanamadada”

या शिलालेखातील मजकुरावरून मिळणार्‍या माहितीपेक्षा ज्या ब्राम्ही लिपीत ही मूळाक्षरे खोदलेली आहेत ती जास्त महत्त्वाची आहेत व आपल्याला जास्त माहिती सांगतात. ही मूळाक्षरे पूर्णत: मौर्य किंवा सम्राट अशोककालीन असल्याने या गुंफेचा खोदण्याचा काल इ.स.पूर्व दुसरे शतक असा निश्चित करता येतो. या विहाराच्या भिंती त्या कालात संपूर्णपणे चित्रांनी रंगवलेल्या होत्या परंतु आता काहीही दिसू शकत नाही.
मी आता 9 आणि 10 क्रमांकांच्या उरलेल्या दोन गुंफांकडे वळतो आहे. या दोन्ही गुंफा चैत्यगृहे किंवा उपासना स्थळे होती. या दोनपैकी कोणती गुंफा जास्त जुनी असावी यावरून पुरातत्त्व शास्त्रज्ञांमध्ये आधी मतभेद होते.परंतु आता 10 क्रमांकाची गुंफा ही जास्त जुनी व अजंठ्याच्या गुंफांमधील सर्वात प्रथम खोदलेली असल्याचे मानले जाते.
बर्जेसने केलेले या गुंफेचे वर्णन असे आहे.

"ही गुंफा 41 फूट 1 इंच रूंद, अंदाजे 95-1/2 फूट खोल व 36 फूट ऊंच आहे. गुंफेच्या आतील टोकाचा भाग व मधल्या कक्षाच्या आणि स्तूपाच्या सभोवती असलेल्या स्तंभांची ओळ हे दोन्ही स्तूपाच्या मागील बाजूस अर्धवर्तुळाकार आकारात खोदलेले असून, अष्टकोनी आकाराच्या या स्तंभांची संख्या, कार्ले येथील विशाल चैत्यगृहापेक्षा 2ने अधिक किंवा 39 आहे. यातील बरेच स्तंभ मोडकळीस आलेले आहेत. या स्तंभांच्या वरच्या बाजूस मोल्डिन्ग्ज व पट्टे असलेली एक 9-1/2फूट ऊंचीची सपाट तुळई (entablature) आहे. या तुळईतून 12-1/2 फूट ऊंचीचे व 23-1/2 फूट विस्तार असलेले कमानी आकाराचे छत वर गेलेले आहे. कार्ले येथील चैत्यगृहाप्रमाणेच या छताला आतल्या बाजूने लाकडाच्या कमानी बसवलेल्या आहेत. खांबांच्या बाजूंना असलेले पॅसेजेस 6 फूट रूंदीचे आहेत व त्यांना अर्धकमानी आकाराचे छत आहे. या छताला दगडात कोरलेले वासे (rib) काढलेले आहेत. स्तूपावर कोणतेही नक्षीकाम नाही. तळाचा पिंपवजा आकार 12 ते 15 फूट व्यासाचा आहे. यावर अर्धगोलापेक्षा मोठा असलेला घुमट आहे. या घुमटावर एक कॅपिटल बसवलेला आहे. हा कॅपिटल म्हणजे चौरस आकाराची एक ठोकळेवजा दिखाऊ पेटी व त्याच्या डोक्यावर आकाराने वाढ्त जाणार्‍या पातळ स्लॅब्ज्चा एक उलटा पिरॅमिड आहे. स्तूपाच्या मागील बाजूला असलेल्या स्तंभांच्या डोक्यावरील तुळईचा (entablature)आकार एका विशाल कमानीसारखा आहे. या कमानीच्या पुढच्या बाजूस उजव्या हाताला एक शिलालेख कोरलेला आहे. “

वासिठीपुतस कट
हादिनो घरमुख
दानं

या शिलालेखाचे बर्जेस याने केलेले भाषांतर असे आहे.

“The gift of a cave-facade by Vasithiputa Katahadi”

12 क्रमांकाच्या गुंफेप्रमाणेच या शिलालेखातील मूळाक्षरे ही मौर्य किंवा सम्राट अशोककालीन असल्याने ही गुंफा इ.स.पूर्व दुसर्‍या शतकातील असल्याचा पुरावा मिळतो. अष्टकोनी स्तंभांसह, ही सर्व गुंफा चित्रांनी सजवलेली, रंगवलेली होती.

मुंबईच्या Bombay School of Arts किंवा आताचे जे.जे स्कूलचे तत्कालीन प्राध्यापक मिस्टर जॉन ग्रिफिथ व त्यांचे काही विद्यार्थी यांनी 1875 ते 1885 या कालखंडात अजंठ्याच्या गुंफांमधील चित्रांच्या प्रती बनवण्याचे काम पूर्ण केले होते. हे काम करत असताना जॉन ग्रिफिथ यांना असे आढळून आले की 10 क्रमांकाच्या गुंफेमधील चित्रांचे काही भाग हे अधिक जाडीचे आहेत. जास्त जवळून निरीक्षण केल्यावर त्यांना आधी काढलेल्या जुन्या चित्रांवरच परत दुसरी नवीन चित्रे रंगवली असल्याचे आढळून आले. वरच्या थरातील चित्रांमध्ये वापरलेले रंग व शैली यावरून ती चित्रे 5व्या किंवा 6 व्या शतकात काढलेली आहेत हे स्पष्ट दिसत होते. हे रंग व शैली खालील थरातील चित्रांपेक्षा भिन्न असल्याचेही स्पष्ट होत होते. या शोधामुळे ग्रिफिथ या निष्कर्षाप्रत आले की खालच्या थरातील चित्रे आधीच्या म्हणजे इ.स.पूर्व कालातील आहेत व वरच्या थरातील चित्रे या जुन्या चित्रांवरच 500 किंवा 600 वर्षांनी रंगवलेली आहेत. ग्रिफिथ यांच्या शोधामुळे सातवाहन कालातील लोकांचे आयुष्य कसे होते याची थोडीफार कल्पना प्राप्त करून घेण्याची एक सुसंधीच आपल्याला प्राप्त झाली असे मला वाटते.

मात्र 1875 नंतरची अनेक दशके, अजंठ्याच्या गुंफा बघण्यास येणार्‍या दर्शकांवर कोणतेही निर्बंध पुरातत्त्व विभागाने न घालता, त्यांना अजंठ्याच्या गुंफात मुक्त संचार करू दिला. या कालात अजंठा गुंफांमधील रंगवलेली चित्रे हा भारताच्या इतिहासाचा केवढा अनमोल ठेवा आहे त्याची अजिबात जाणीव नसलेल्या पर्यटकांनी आपली नावे, आपण कोणावर प्रेम करतो त्याच्या जाहीर घोषणा व नुसत्याच रेघोट्या काढून या अनमोल ठेव्याला अशक्य प्रमाणात विद्रूप केले व त्याची जी नासधूस केली ती बघता दैवाने दिले पण कर्माने नेले या म्हणीची मला आठवण येथे होते आहे. मी या चित्रांच्या काढलेल्या छायाचित्रांत, मुख्यत्त्वे या रेघोट्याच दिसून येत असल्याने छायाचित्रांतून फारशी काहीच माहिती मिळण्याची शक्यता नाही हे मला येथे स्पष्ट दिसते आहे. या वास्तवामुळे जॉन ग्रिफिथ याने काढलेल्या या चित्रांच्या प्रती हाच फक्त या गुंफेतील चित्रांचे अध्ययन करण्याचा एकच मार्ग उरलेला आहे हे माझ्या लक्षात येते आहे. जॉन ग्रिफिथ यांनी काढलेली सर्व चित्रे, भारतातील ब्रिटिश सरकारने नीट रहावी म्हणून लंडनला 'इंडिया ऑफिस' कडे नंतर पाठवून दिली. या कचेरीला दुर्दैवाने नंतरच्या कालात आग लागली व यातली काही अनमोल चित्रे जळून खाक झाली. ग्रिफिथ याने काढलेल्या चित्रांची यादी व त्यातील कोणती जळून गेली हे त्याने नंतर प्रसिद्ध केले.परंतु जी चित्रे बचावली ती कोठे आहेत? ही माहिती कदाचित पुरातत्त्व विभागाला असेल परंतु ती त्यांनी प्रसिद्ध केलेली मला तरी कोठे सापडली नाही. या सर्व दुर्दैवी घटनाक्रमामुळे या चित्रांची जुनी छायाचित्रे व त्यावरून काढलेली रेखाचित्रे हा एवढाच ठेवा आता आपल्या हातात उरलेला आहे.

10 क्रमांकाच्या गुंफेमध्ये, विद्रूप झालेल्या स्थितीतील, मोठ्या आकाराची 5 रंगचित्रे व बुद्धाच्या अनेक प्रतिमा आपल्याला आज बघायला मिळतात. या पैकी बुद्धाच्या सर्व प्रतिमा या महायान कालातील म्हणजेच 4थ्या किंवा 5व्या शतकातील आहेत. मोठ्या रंगचित्रांपैकी, दोन अतिशय सुंदर दिसणार्‍या रंगचित्रांत, साम आणि छद्दान्त जातक या मधील कथांचे चित्रण केलेले असल्याने ती महायान कालातील (4थे किंवा 5वे शतक) समजली जातात. यामुळे उरलेली 3 मोठी रंगचित्रे इ.स.पूर्व किंवा सातवाहन कालातील आहेत असे नक्की म्हणता येते व याच चित्रांचा जास्त खोलात जाऊन मी विचार करणार आहे.

सर्वप्रथम बर्जेस् या चित्रांबद्दल काय म्हणतो ते आपण पाहूया. बर्जेसची ही टीकाटिप्पणी मला अतिशय रोचक वाटते आहे.

"(या चित्रांत) दाखवलेले राजवाडे किंवा इमारती यातील अंर्तभाग सर्व साधारणपणे एक मध्यवर्ती हॉल व बाजूला दोन पॅसेजेस किंवा व्हरांडे या स्वरूपाचा दाखवलेला आहे. या इमारतींची छते सपाट किंवा धाब्याची दाखवलेली आहेत व त्यांना आधार देणारे स्तंभ हे बारीक व्यासाचे व छताजवळ एक कॅपिटल असलेले असे दाखवलेले आहेत. व्यक्तींच्या अंगावरील वस्त्रे असंख्य प्रकारची असली तरी ती त्यांच्या जाती वर्णाचे प्रतिनिधित्व करतील अशीच दाखवलेली आहेत. वरिष्ठ वर्णातील देव, राजे, दिवाण आणि सरदार यांच्या सारख्या व्यक्ती कंबरेच्या वर कोणतेच वस्त्र न घेतलेल्या दाखवलेल्या आहेत मात्र त्यांच्या अंगावर पोची, गळ्यातील हार, बाजूबंद आणि डोक्यावरचा मुगुट या सारखे अनेक अलंकार दाखवलेले आहेत. कनिष्ठ वर्णातील लोक मुख्यत्त्वे अंगभर कपडे घेतलेले परंतु काहीच अलंकार न घातलेले असेच दाखवलेले आहेत. भिक्षू व मठवासी हे उजवा खांदा उघडा राहील या पद्धतीचा पायघोळ अंगरखा घातलेले आहेत. राण्या, राजप्रासादातील स्त्रिया आणि त्यांच्या दासी यांच्या अंगावर त्यांच्या स्थानाला अनुसरून वैशिष्ट्यपूर्ण व रत्नजडित अलंकार घातलेले अशा दाखवलेल्या आहेत. काही वेळा, दर्शकाला चित्रातील राण्या विवस्त्र दाखवल्या आहेत की काय? असे प्रथमदर्शी भासते. परंतु नीट बघितल्यास, राण्यांनी अंगावर सर्वात उत्कृष्ट प्रतीची व तलम अशी मलमल परिधान केलेली आहे हे दर्शवण्याचा चित्रकाराचा हा प्रयत्न आहे हे लक्षात येते. अंगावरील हे मलमलीचे वस्त्र दर्शवण्यासाठी चित्रकार या व्यक्तीच्या मांड्यांजवळ वस्त्राला पडलेल्या चुण्या व फुलांचे डिझाइन असलेले वस्त्राचे काठ हे ब्रशने पांढर्‍या धूसर रंगाचे काही फटकारे मारून व कटिवर हे वस्त्र जागेवर रहावे म्हणून बांधलेल्या शृंखलेच्या चित्रणातून दर्शवतो. नर्तकी सध्याच्या कालातीलच आहेत की काय? असे भासावे असे रंगीबेरंगी व नाचताना हवेत उडणारे कपडे परिधान केलेल्या दर्शवलेल्या आहेत. दास दासी आणि कंचुकिणी यासारखे घरगुती नोकर व गुलाम हे उत्तरीय परिधान केलेले दिसतात व कंबरेखाली साडी किंवा धोतर नेसलेले दर्शवलेले आहेत. त्यांच्या अंगावरील वस्त्रावर पट्यापट्यांचे डिझाइन बर्‍याच वेळा आढळते.”

बर्जेसची ही टीकाटिप्पणी मनात ठेवून, 10 क्रमांकाच्या गुंफेतील सातवाहन कालात चित्रण केलेल्या 3 रंगचित्रांचा विचार आता मी पुढे करणार आहे.

क्रमश:

24ऑगस्ट 2012

या लेखासोबत असलेली छायाचित्रे बघण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.

लेखनविषय: दुवे:

Comments

वाचत आहे...

अजिंठा व वेरुळ (किंवा अजिंठा आणि इतर कुठल्याही प्रमुख लेण्यांतील)इथल्या लेण्यांतला मुख्य फरक मला वाटतो तो म्हणजे अजिंठ्यात खोदकाम तुलनेने फारच कमी आहे, रंगकाम फारच जास्त. इतर कुठल्या ठिकाणी इतकं प्रचंड रंगकाम, चित्रकारी त्याकाळातली दिसत नाही(की शिल्लक नाही?) इतर ठिकाणी त्यांना रंगकाम का करावेसे वाटले नसेल( रंगवायची विद्या अवगत असूनही) ?
.
एक अवांतर पण पूरक :- वेरूळ मध्ये आपण मुख्यत्वे शिल्पे पाहण्यास जातो. पण तिथेही काही कोपर्याकापर्‍यातल्या कागी अजूअन्ही थोडेफार रंग काम दिसते. म्हणजे खोडरबरने संपूर्ण पानभर असलेले चित्र व्यावस्थित खोडून काढल्यावरही कुठेतरी मागे दोन चार पेन्सिलीची चिन्हं राहून जावीत तसेच.(नेमके कुठे दिसले?/ वेरूळ मधील सुप्रसिद्ध कैलास लेण्यात एक खोली/गर्भ्ग्रुह्/मंदिर सदृश काही आहे. त्याच्या बाहेरील भिंतीएवर रावण आख्खा कैलास पर्वत उचलु पाहतो असे काहीसे कोरलेले आहे. बरोब्बर त्याच्या समोर जो जो त्यास प्रदक्षिणा घालायला पॅसेज आहे, त्या पॅसेजच्या अगदि टोकाला, छतावर साधारण एक्-दोन चौरस फूट आकाराचे लाल,हिरवे बॅकग्राउंड दिसले . कुठले तरी मोठे चित्र पुसले गेले असावे, आणि त्याचा हा टवका राहून गेला असावा असे वाटले..)
तर असे रंगकाम इतरत्र आपल्या मंदिरात कुठ्बेही का दिसत नाही?(के एआह्जेबर्‍ह्याच ठिकाणी, पण म्,अला ठाउक नाही?)
हजारेक वर्षापूर्वीच्या काही प्राचीन चर्च मध्ये मेरी-येशू ह्यांची उत्तमोत्तम रंगीत चित्रे आहेत. त्याच काळात इथल्याही सुस्थित नागरी समाजाला असे चित्र काढायची हौस नसावी का?)

पुरातन रंगकाम

साधारणपणे असे म्हणता येते की भारतातील बौद्ध मंदिरांवर (स्तूप, चैत्यगृहे) चित्रे व शिल्पकला ही दोन्ही वापरून सजावट करण्याची पद्धती इ.स.पूर्व तिसर्‍या शतकापासून पुढे रूढ झालेली होती. 5व्या किंवा 6व्या शतकापर्यंत बनवलेल्या बौद्ध मंदिरात या दोन्ही पद्धतींचा वापर सजावटीसाठी केलेला आढळतो. यानंतर आलेल्या हिंदू मंदिरातही या दोन्ही पद्धती आहेतच. रंगचित्रे कालौघात नष्ट होतात व शिल्पे त्या मानाने टिकून राहतात. त्यामुळे आपल्याला जुन्या मंदिरातील रंगकाम आता दिसू शकत नाही. पूर्वीच्या काळची ही बौद्ध मंदिरे कशी दिसत असतील याची उत्तम कल्पना मागच्या 25 वर्षात बांधलेल्या लेहमधील शांतीस्तूपाला भेट दिल्यास येऊ शकते. दक्षिण भारतातील विशेषत: तंजोर मधील मंदिरात उत्तम रंगकाम केलेले आहे.

सुंदर

अतिशय सुंदर वर्णन करत आहात. सोबत येणारी माहिती अजून छान आहे.
या कालात अजंठा गुंफांमधील रंगवलेली चित्रे हा भारताच्या इतिहासाचा केवढा अनमोल ठेवा आहे त्याची अजिबात जाणीव नसलेल्या पर्यटकांनी आपली नावे, आपण कोणावर प्रेम करतो त्याच्या जाहीर घोषणा व नुसत्याच रेघोट्या काढून या अनमोल ठेव्याला अशक्य प्रमाणात विद्रूप केले व त्याची जी नासधूस केली ती बघता दैवाने दिले पण कर्माने नेले या म्हणीची मला आठवण येथे होते आहे. हे तर अनेक ठिकाणी अजूनही होते आहे. :( कोरिव कामाचे नमुने फोडलेले मी स्वतः पाहिले आहेत...

ते १८१९ साली जॉन स्मिथ हा इंग्रज धिकारी वाघाची शिकार करायला येथे फिरत होता. तेव्हा त्याला दहाव्या गुहेचे मुख दिसले. आत काय आहे ते पाहिल्यावर त्याला ही अनमोल चित्रे दिसली. जॉन स्मिथ आत आला आणि त्याने या चिरखाडीची सुरुवात आपले नाव आणि दिनांक दहाव्या गुहेत खरडून केली....

तोवर ठेवा उत्तम रित्या जपला गेला होता. कारण चौथ्या शतकापासून येथ फक्त जंगलच होते!

पुढचे तुम्ही लिहिलेच आहे...

आवांतरः
चोरटी निर्यात हे अजून एक मोठे संकट सदैवच आहे. इतक्यात (सुमारे ६ महिन्यांपुर्वी?) एक मोठा भारतीय तस्कर पकडला गेला आहे. परंतु त्याची पाळेमुळे अजूनही उध्वस्त झालेली नाहीत.

वाचते आहे

चांगला भाग. वाचते आहे. प्रश्न पडले तर विचारेनच. तूर्तास ही पोच.

 
^ वर