एका साम्राज्याच्या शोधात: अजंठा गुंफा भाग 1

शुएन त्झांग या अत्यंत विद्वान बौद्ध भिख्खूने, इ. स, 629, या वर्षी, मूळ स्वरूपातल्या बौद्ध धर्मग्रंथाचे अध्ययन व प्राप्ती हे दोन्ही हेतू मनात ठेवून, भारतात येण्याच्या आपल्या पायी प्रवासाला चीनमधून प्रारंभ केला हा इतिहासाचा भाग आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहेच. आपल्या सुदैवाने शुएन त्झांग याने आपल्या प्रवासाचे अतिशय सूक्ष्म दृष्टीने केलेले वर्णन लिहून ठेवले आहे व त्याच्या अनुयायांनी हे वर्णन जपून ठेवल्याने आपल्याला आज उपलब्ध आहे. या कालातील भारतवर्षाचे सर्वात अधिकृत वर्णन म्हणून हे प्रवास वर्णन आज गणले जाते. शुएन त्झांगने आपला परतीचा प्रवास तमिळनाडू मधील कांचीपुरम येथून सुरू केला होता. व या नंतर चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याच्या अधिपत्याखाली असलेल्या महाराष्ट्रातून प्रवास करून तो गुजराथ मधील भडोच या गावी पोहोचला होता. या प्रवासात शुएन त्झांग महाराष्ट्राच्या राजधानीत काही दिवस राहिला होता. आपल्या प्रवास वर्णनात शुएन त्झांगने महाराष्ट्राच्या राजधानीचा नामोल्लेख केलेला नाही. त्यामुळे ही राजधानी कोणती असावी या बाबत इतिहासकारांच्यात बरेच मतभेद आढळतात. परंतु सर्व परिस्थितीजन्य पुराव्याचा अभ्यास केला तर ही राजधानी म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर नाशिक हीच असली पाहिजे असे मला तरी वाटते. शुएन त्झांगने आपल्या प्रवास वर्णनात महाराष्ट्राच्या राजधानीच्या पूर्वेला असलेल्या व अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या अशा बौद्ध मठाचा उल्लेख केलेला आहे. मात्र सर्व इतिहासकारांचे या बाबतीत मात्र एकमत दिसते की शुएन त्झांगने या बौद्ध मठाला भेट कधीच दिलेली नव्हती व जमा केलेल्या माहितीवरून त्याने बहुदा हे वर्णन केलेले असावे.

या बौद्ध मठाचे वर्णन करताना शुएन त्झांग म्हणतो.(बील भाषांतर)
“ या देशाच्या (महाराष्ट्र) पूर्व सीमेवर, ऊंच सुळके, ओबड-धोबड दगडांच्या राशी व उभे कापलेले कडे विपुल प्रमाणात असलेला एक अतिशय उत्तुंग पर्वत आहे. या पर्वतात असणार्‍या एका अंधार्‍या गुंफेमध्ये एक बौद्ध विहार खोदलेला आहे. या बौद्ध विहारामधील प्रशस्त हॉल व बाजूस असणारे मोठे पॅसेजेस यांची प्रवेशद्वारे उभ्या कड्याच्या बाजूला आहेत. या विहारात असलेल्या एकावरील एक मजल्यांच्या मागे, पर्वताचे उभे सुळके तर पुढे जलप्रवाह असलेली दरी आहे. हा मठ अरहत (प्राचार्य) अचल (ओ-चे-लो) यांनी बनवून घेतला असून या मठातील विहार ऊंचीला 100फूट तरी आहे. या विहाराच्या मध्यभागी बुद्धांची 70 फूट ऊंचीची एक पाषाण मूर्ती आहे. या मूर्तीच्या माथ्यावर, कोणत्याही आधारशिवाय उभे असलेले, सात पायर्‍यांचे एक पाषाण छत्र (Canopy) आहे. या छत्रातील प्रत्येक पायरी 3 फूट उंच आहे. एका जुन्या वर्णनाप्रमाणे हे छत्र आपल्या जागेवर आचार्यांच्या शब्दाच्या ताकदीवर फक्त उभे आहे. असेही म्हणले जाते की हे छत्र आचार्यांच्या दैवी शक्तीमुळे जागेवर राहिलेले आहे तर इतरांच्या मते तेथे फासलेल्या व चमत्कार दर्शविणार्‍या एका मिश्रणामुळे हे जागेवर राहिलेले आहे. परंतु या आश्चर्याचे सयुक्तिक कारण अजून कोणीही देऊ शकले नाही. विहाराच्या कडेस असलेल्या चारी दगडी भिंतींच्यावर, 49 निरनिराळ्या देखाव्यांचे चित्रीकरण केलेले आहे. या देखाव्यांत तथागतांनी, बोधिसत्व म्हणून पुढच्या कालाच्या पूर्वतयारीसाठी केलेली कालक्रमणा, बुद्धत्त्वाच्या फलप्राप्तीची सुदैवी चिन्हे आणि निर्वाणकालातील दैवी संकेत या सर्व गोष्टींचे अत्यंत अचूक व सूक्ष्म चित्रण केलेले आहे. या विहाराच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या व डाव्या हातांना, म्हणजेच उत्तर आणि दक्षिण दिशांना, पाषाणात कोरलेले हत्ती आहेत. अशी समजूत आहे की जेंव्हा हे हत्ती मोठ्याने चित्कारतात तेंव्हा संपूर्ण पृथ्वी हादरते. अशीही समजूत आहे की प्राचीन काली चन्न बोधिसत्त्व या विहारात बर्‍याच वेळा येत असत."

सर्व इतिहास तज्ञांचे या बाबतीतही एकमत आहे की शुएन त्झांगने वर्णन केलेला बौद्ध मठ हा अजंठा मठाशिवाय दुसरा कोणताही असू शकत नाही. या शिवाय आजमितीला आपल्या समोर अजंठा गुंफाचे जे दृष्य दिसते ते या वर्णनाशी बर्‍यापैकी जुळते आहे. (अर्थात त्या काळातील अंधश्रद्धेनुसार केली गेलेली व बरीच अतिरंजित अतिशयोक्ती असलेली वर्णने वगळण्याची गरज आहे.) अजंठ्याच्या 26 क्रमांकाच्या गुंफेमध्ये, इ.स.450ते 525 या कालात कोरलेल्या एका शिलालेखात कोरलेला " स्थविर अचल याने बुद्धांसाठी हे शैलगृह बनवले" हा मजकूर शुएन त्झांगच्या वर्णनातील बौद्ध मठ अजंठ्याचाच असला पाहिजे याचा थेट पुरावा मानला जातो.
शुएन त्झांगच्या वर्णनातील या भागाचा मी येथे उल्लेख अशासाठी करतो आहे की जेणेकरून त्या काळातील बौद्ध जगतात, अजंठा गुंफांना असलेले अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट व्हावे. अजंठा येथील काही गुंफात आढळणार्‍या शिलालेखांतील हस्ताक्षरांचे वळण स्पष्टपणे मोर्य किंवा सम्राट अशोककालीन असल्याने, हा पुरावा ग्राह्य धरून असे मानले जाते की अजंठा गुंफांचे खोदकाम इ.स.पूर्व तिसर्‍या शतकात किंवा सातवाहनांचे महाराष्ट्रावर राज्य असताना सुरू झाले होते व त्याच काळात हा मठ कार्यान्वित झालेला होता. गुंफांचे खोदकाम सहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत चालू होते. क्रमांक 26 मधील गुंफेत मिळालेल्या एका अर्धवट खोदलेल्या शिलालेखावरून या गुंफांत 8 व्या किंवा 9 व्या शतकापर्यंत म्हणजेच राष्ट्रकूट राजांची सत्ता असतानाच्या कालापर्यंत राबत चालू होता असे म्हणता येते. अजंठा गुंफांचे किंवा त्यांचा विस्तार करण्याचे कार्य 700 ते 800 वर्षे चालू होते व तेथे 1000 किंवा 1100 वर्षे राबता चालू होता या गोष्टी लक्षात घेतल्यावर बौद्ध जगात या मठाला असलेले आत्यंतिक महत्त्व आणि त्याचा उमटलेला ठसा याची आता आपण फक्त कल्पनाच करू शकतो.

सातमाला(ळा) किंवा इंध्याद्री पर्वतराजीच्या दक्षिणेला असलेल्या एका खोल दरीमध्ये खोदल्या गेलेल्या अजंठा गुंफांना भेट द्यायची असल्यास औरंगाबाद पासून प्रयाण करणे अतिशय सोईचे पडते. औरंगाबाद- जळगाव रस्त्यावर, औरंगाबाद पासून 100 किमी अंतरावर या गुंफा आहेत. मी आता या रस्त्यानेच अजंठा गुंफांना भेट देण्यासाठी निघालो आहे. महाराष्ट्र महामार्ग क्रमांक 8 असे नाव असलेला व जळगाव कडे जाणारा हा महामार्ग बराच गजबजलेला दिसतो आहे. शहरातून बाहेर पडताना दिल्ली दरवाजा या नावाचे एक भव्य प्रवेशद्वार उजवीकडे दिसते. अशी 52 प्रवेशद्वारे औरंगाबाद शहरात असल्याची माहिती आमचा वाहन चालक मला पुरवतो. या नंतर उजव्या बाजूसच डॉ.सलीम अली जलाशय व सावंगी जलाशय अशी नावे दिलेले दोन जलाशय दिसत आहेत. शहरातून बाहेर पडल्यावर मात्र हा रस्ता दुतर्फा, ऊस, मका व कापूस यांची लागवड केलेल्या शेतांच्या मधूनच जाताना दिसतो आहे. या शेतांच्यावरून इथली जमीन बर्‍यापैकी सुपीक वाटते आहे. चौक घाट या नावाने ओळखला जाणारा डोंगराळ भाग लागेपर्यंत रस्ता या अशा शेत जमिनींच्या मधूनच जातो आहे. चौक घाटाला काही मोठा दुर्गम घाट वगैरे म्हणता येणार नाही. तरी सुद्धा या टेकडीवजा भागातील गर्द हिरवाईमुळे, प्रवास, नयनांना सुखद वाटतो आहे हे मात्र खरे! या टेकडीच्या माथ्यावर एक छोटेसे मंदिर दिसते आहे. या डोंगराळ भागानंतर आम्ही परत एकदा शेत जमिनींमधून गेलेल्या रस्त्याने आमचा प्रवास करतो आहोत. हा कृषी प्रधान टापू व मधे मधे लागणारी छोटी छोटी खेडेगावे हे सगळे सिल्लोड गाव लागेपर्यंत तसेच दिसत राहते. सिल्लोड गावाला खरे म्हणजे एक बाय पास रोड आहे. परंतु सतत विस्तार होणार्‍या गावाने आता हा बाय पास रस्ता गिळंकृत केल्याने हा रस्ता आता शहराचाच भाग झाला आहे. सिल्लोड गाव मागे टाकल्यावर परत एकदा त्या तशाच शेतजमिनी दिसू लागल्या आहेत. अजंठा गावात आमची गाडी शिरल्यानंतर अखेरीस या शेत जमिनी संपतात आणि काही किमी पुढे गेल्यावर अखेरीस सातमाला पर्वतराजीच्या पायथ्याशी असलेल्या पायटेकड्यांमधून आमची गाडी घाट चढू लागली आहे. या अजंठा गावाच्या नावामुळेच पुढे असलेल्या बौद्ध गुंफा, अजंठ्याच्या गुंफा म्हणून प्रसिद्ध झालेल्या आहेत. रस्ता बराच वळणावळणाचा व गर्द झाडीतून जातो आहे. अखेरीस आम्ही घाटमाथ्यावर पोचतो व गर्द झाडीत लपलेल्या व खाली दरीत असलेल्या गुंफाच्याकडे जाण्यासाठी म्हणून खाली उतरण्यास सुरूवात करतो.

घाट उतरून खाली पोचल्यानंतर लगेचच एक वळण, मला एका अजंठा गुंफांच्या आंतर्राष्ट्रीय पर्यटन स्थळ या पदवीला शोभेल अशा पद्धतीने अतिशय रेखीव आराखडा बनवला गेलेल्या मोठ्या वाहनतळाकडे घेऊन जाते. येथे आत शिरताना 10रुपये प्रवेश शुल्क व वाहन ठेवण्यासाठी अतिरिक्त शुल्क एवढे द्यावे लागते. ते दिले की तुमचे वाहन अतिशय सुरक्षित रित्या दिवसभर ठेवता येते. वाहन त्याच्या नियोजित जागेवर ठेवल्यानंतर मी जवळच असलेल्या शटल बसच्या थांब्याकडे निघालो आहे. हा मार्ग, अजंठा मॉल या नावाने ओळखल्या जाणार्‍या एक छोट्याशा बाजारातून जातो आहे. दुतर्फा असलेल्या अनेक दुकानांतून, खाद्य पदार्थांशिवाय पुस्तके, फिल्म, व्हिडिओ, पाषाणापासून बनवलेले क्यूरिओज, टी शर्ट वगैरेसारख्या असंख्य गोष्टी विक्रीस ठेवलेल्या दिसत आहेत. परत येताना या मॉल मध्ये थांबण्याचे ठरवत मी शटलबसच्या थांब्याकडे वळतो आहे. शटल बसचा हा थांबा मोठ्या उत्तम रितीने बांधलेला आहे. मात्र आज रविवार असल्याने पर्यटकांची भरपूर गर्दी दिसते आहे. परदेशी नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे. 10ते15मिनिटे वाट बघितल्यावर मला बस मिळते. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने चालवलेल्या या सेवेतील बसेस, प्रदुषण कमी व्हावे म्हणून सीएनजी वर चालणार्‍या अशा खास बनवून घेतलेल्या आहेत. बसेस मोठ्या व आरामदायी वाटत आहेत. बसचे भाडे म्हणून 12रुपये द्यावे लागतात. अर्थात हा बसचा प्रवास 5किंवा 10मिनिटाचाच असल्याने गुंफांपाशी पोचण्यासाठी फारसा कालावधी लागत नाही. त्याच प्रमाणे हा 3 किंवा 4 किलोमीटरचा रस्ता डोंगराळ व सभोवताली गर्द झाडी असलेल्या भागातून जात असल्याने हा प्रवास एकूण सुखकर वाटतो आहे यात शंकाच नाही. बरोबरच्या पर्यटकांत जळगावच्या एका शाळेतील मुलामुलींचा एक मोठा ग्रूप आहे. त्यांच्याकडे बघून मला 60 वर्षांपूर्वी एक शाळकरी विद्यार्थी म्हणून केलेल्या माझ्या आधी केलेल्या अजंठ्याच्या पर्यटनाची परतपरत आठवण होते आहे. आमची बस गुंफांच्या साधारण 150ते 200फूट खाली असलेल्या एका जागी थांबते व मी खाली उतरतो.

समोरच गुंफांकडे जाण्याच्या मार्गावर, पुरातत्त्व विभागाने उभारलेले कुंपण व प्रवेशद्वार दिसते आहे. आत गेल्यावर स्वागत कक्षातील तिकिट काऊंटर वर प्रवेश शुल्क द्यावे लागते. आतली व्यवस्था चांगली दिसते आहे. समोर एक कॅफे व स्वछतागृह आहे तर उजव्या हाताला एक छोटासा पण स्वच्छ बगीचा दिसतो आहे. मी जरा फ्रेश अप होतो व गुंफांकडे जाणार्‍या पायर्‍या चढण्यास प्रारंभ करतो.
गुंफाकडे जाणार्‍या पायर्‍या दगडी चिरे वापरून चांगल्या भक्कम बांधून काढलेल्या दिसत आहेत. तुम्हाला चालायचे नसले तर डोलीची व्यवस्थाही आहे. चढण फार लांब नसली तरी खूपच चढाची असल्याने ज्यांना गुढग्याच्या वगैरे काही समस्या असतील त्यांनी डोली केलेलीच बरी! चढ बराच असल्याने, एका दमात पायर्‍या चढणे मला शक्य होत नाही. 4 किंवा 5 वेळा थांबून दम घेतल्यावर अखेरीस शेवटचे वळण येते व ते चढून वर गेल्यावर, समोर अजंठा घळीचा संपूर्ण देखावा माझ्या नजरेसमोर अचानक फुलतो व माझी पाय आपसूकच थबकतात. अजंठा गुंफांची ही घळ, घोड्याच्या नालाच्या आकाराची आहे. बाहेरच्या वक्रतेवर गुंफा खोदलेल्या आहेत तर आतील वक्रता एवढी वर्तुळाकार होते आहे की एक डोंगर फक्त त्यात कसाबसा मावतो आहे. या घळीच्या तळाला असलेली वाघोरा ही छोटेखानी नदी, 180 अंशाचा कोन करून या नालाकृतीत वळण घेते आहे. समोरचे दृष्य बघून मला कसली आठवण होत असेल तर भारत-तिबेट यांच्या सीमेवर ब्रम्हपुत्रा किंवा यारलुंग त्सांगपो नदी जे विशाल वळण (great bend) घेते, त्याच्या पाहिलेल्या छायाचित्राची! त्या विशाल वळणाचे एखादे मॉडेल बनवावे तशी ही अगदी छोटेखानी अशी आवृत्ती आहे.

माझ्या उजव्या हाताला असलेली गुंफा ही 1 क्रमांकाची गुंफा आहे. या गुंफांना क्रमांक ज्या क्रमाने त्या खोदल्या गेल्या त्या क्रमाने दिलेले नाहीत. सर्वात मध्यभागी व सर्वात खालच्या पातळीवर असलेल्या गुंफा सर्वात प्रथम खोदल्या गेल्या होत्या व दोन्ही टोकांना असलेल्या गुंफा सर्वात शेवटी खोदल्या गेल्या होत्या. या क्रमांक पद्धतीने मध्यावर असलेल्या 9 ते 13 क्रमांकाच्या गुंफांचा गट हा सर्वात प्राचीन आहे तर कडेच्या 1, 2 तसेच 26, 27 या गुंफा सर्वात नवीन आहेत. कडेच्या गुंफा सर्वात नवीन असल्याने साहजिकच या गुंफांच्यातील रंगवलेली चित्रे, ज्यासाठी अजंठा गुंफा जगप्रसिद्ध आहेत, सर्वात जास्त सुस्थितीत आहेत.
इ.स.पूर्व 300ते 100 या कालात, बौद्ध धर्मियांनी, दख्खनच्या पठारावरील भाजे, कोंडाणे, पितळखोरे व नाशिक या सारख्या अनेक स्थानी नवनवीन मठ स्थापन करण्याची जी एक मोहिम सुरू केली होती त्या मोहिमेच्या अंतर्गत खोदलेल्या गुंफात, अजंठ्यातील प्राचीन गुंफांचाही (क्रमांक 9 ते 13) समावेश केला जातो. अजंठ्याला येणारे बहुतेक पर्यटक कडेच्या गुंफा बघण्यासाठी म्हणूनच आलेले असतात. मला सातवाहन साम्राज्याशी अजंठा गुंफांचा काही संबंध लागतो का? हेच शोधायचे असल्याने मला या 9 ते 13 क्रमांकाच्या प्राचीन गुंफांत खरा रस आहे.

20ऑगस्ट 2012

लेखासोबत असलेली छायाचित्रे बघण्यासाठी या दुव्यावर क्लिक करावे.

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगले

हाही भाग चांगला जमलाय. वाचतोय.

सुरुवात चांगली झाली

सुरुवात चांगली झाली, आता पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

या विहाराच्या मध्यभागी बुद्धांची 70 फूट ऊंचीची एक पाषाण मूर्ती आहे. या मूर्तीच्या माथ्यावर, कोणत्याही आधारशिवाय उभे असलेले, सात पायर्‍यांचे एक पाषाण छत्र (Canopy) आहे. या छत्रातील प्रत्येक पायरी 3 फूट उंच आहे. एका जुन्या वर्णनाप्रमाणे हे छत्र आपल्या जागेवर आचार्यांच्या शब्दाच्या ताकदीवर फक्त उभे आहे. असेही म्हणले जाते की हे छत्र आचार्यांच्या दैवी शक्तीमुळे जागेवर राहिलेले आहे तर इतरांच्या मते तेथे फासलेल्या व चमत्कार दर्शविणार्‍या एका मिश्रणामुळे हे जागेवर राहिलेले आहे.

या विषयी, विशेषतः अधोरेखिताविषयी वाचायला आवडेल.

बुद्ध प्रतिमेवरील छत्र

प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दोन हत्तींचे वर्णन असल्याने हे वर्णन अजंठ्यामधील 16वा17 क्रमांकाच्या गुंफाबद्दल आहे असे मानता येते. या दोन्ही गुंफांमध्ये बर्‍यापैकी मोठ्या बुद्ध मूर्ती आहेत. ( अर्थात 70फूट ऊंच वगैरे ही ऐकीव अतिशययोक्ती आहे.) या दोन्ही बुद्ध मूर्तींच्या मागे तेजोवलय कोरलेले आहे परंतु छत्र मला तरी कोठे दिसले नाही. कदाचित छतामधून टांगलेले दिसावे असे कोरलेले असण्याची शक्यता आहे. परंतु तेथे प्रकाश अतिशय कमी असल्याने जिथे स्पॉटलाइट टाकलेला असतो तेवढाच भाग स्पष्ट दिसू शकतो.

बुद्धांच्या चित्रावर तिहेरी छत्र बर्‍याच ठिकाणी रंगवलेले आढळते परंतु 7 पायर्‍यांची ( प्रत्येक पायरी 3 फूट जाड) कॅनपी ही जरा अतिरंजित अतिशययोक्ती वाटते. हत्तींच्या चित्कारण्याने पृथ्वी हादरते या वर्णनासारखी.
cave 19 in Ajantha

शुएन त्झांगच्या वर्णनाशी थोडेफार जुळणारी छत्री मला 19 क्रमांकाच्या गुंफेमध्ये आढळली. ही गुंफा चैत्यगृह असल्याने गुंफेच्या आतल्या टोकाला एक स्तूप आहे. या स्तूपाच्या दर्शनी भागावर बुद्ध मूर्ती कोरलेली आहे. स्तुपाच्या डोक्यावर 7 पायर्‍यांची छत्री आहे. यापैकी पहिल्या 4 पायर्‍या उलट्या पिरॅमिड सारख्या असून त्यावर 3 पायर्‍या उपड्या ठेवलेल्या वाट्यांप्रमाणे आहेत.

7 story canopy in cave 19

आता फासलेल्या मिश्रणासंबंधी: बील भाषांतराप्रमाणे येथे मुळात some magical compound असे शब्द आहेत. शुएन त्झांग कोणत्यातरी magical adhesive चा बहुदा येथे उल्लेख करत असावा.

शिल्पकलेचे ज्ञान

शुएन त्झांग कोणत्यातरी magical adhesive चा बहुदा येथे उल्लेख करत असावा.

शुएन त्झांग हा बौद्ध भिख्खू भारतात आला त्या वेळेस आपल्या एवढे शिल्पकलेचे (दगडात कोरलेली लेणी या संदर्भात) ज्ञान चीनी लोकांकडे नव्हते (चीनी लोकांची शिल्पकला याविषयी या लोकांचे पॅगोडा बांधण्याचे ज्ञान इतपतच मला माहिती/ज्ञान आहे, हे पॅगोडाही मुख्यत्वेकरून लाकूड सामानापासून बनवले जात), त्यामुळे शुएन त्झांग magical adhesive असे म्हणत असेल का?

शिल्पकला व चीन

आपल्या एवढे शिल्पकलेचे (दगडात कोरलेली लेणी या संदर्भात) ज्ञान चीनी लोकांकडे नव्हते

आपले हे वाक्य बर्‍याच धाडसाचे वाटते. चीन मधील डुनहुआंग शहराजवळ असलेल्या 1000 बुद्धांच्या किंवा मोगॅओ गुंफा या जगप्रसिद्ध आहेत. त्या इ.स.366 मध्ये खोदल्या गेल्या होत्या. हा काल शुएन त्झांगच्या कालाच्या निदान 200वर्षे तरी आधीचा आहे. त्यामुळे शुएन त्झांगच्या कालात चिनी लोकांना पाषाणावर शिल्पकला कोरण्याची कला अवगत नव्हती असे म्हणणे योग्य वाटत नाही.

जंजिरा

मुरुडजवळच्या जंजिर्‍याची इथे आठवण येते कारण जंजिर्‍याला दगड जोडण्यासाठी जो दर्जा भरला आहे तो इतका बळकट आहे की समुद्रांच्या लाटांनी दगडांची झीज झाली आहे पण हे मिश्रण तसेच्या तसे आहे. या "मॅजिकल अडेजिव"मुळे सहज आठवले.

चंद्रशेखर, चिन्यांना गुंफा आणि चित्रे काढता येत होती पण दगड कोरून शिल्पकला (जी बहुधा येथे ग्रीकांकडून उसनी घेतली) ती माहित होती का? त्याचे काही प्रमाण मिळते का?

चिनी शिल्पकला

युनगॅन्ग येथील 252 गुंफांमध्ये 51000 बुद्ध पुतळे आहेत असे विकिपिडिया म्हणतो. या दुव्यावर बघा . या गुंफा 5 व्या शतकात खोदलेल्या आहेत. अर्थात भारतीयांनी याच्या बरीच वर्षे आधी हे तंत्र आत्मसात केलेले होते हे मात्र खरे आहे.

माझे चीनी शिल्पकलेचे ज्ञान सीमित आहे.

बरोबरच असणार आपले, वर मी म्हटल्याप्रमाणे माझे चीनी शिल्पकलेचे ज्ञान पॅगोड्यापर्यंतच सीमित आहे. म्हणूनच मी “असे म्हणत असेल का” असे विचारले होते.

आपण दिलेली विकिपेडियाची लिंक पाहिली पण त्यात दगडी कोरीव कामापेक्षा विविध माध्यमावर केलेली गुंफाचित्रे (paintings) आणि म्युरल्सविषयीची जास्त माहिती आढळली.

चिनी शिल्पकला

मोगॅओ गुंफा 4 थ्या शतकातील असल्याने तेथे फ्रेस्को जास्त प्रमाणात आढळतात. युनगॅन्ग गुंफा 5 व्या किंवा 6 व्या शतकातील असल्याने तेथे पुतळे जास्त आहेत असे म्हणता येईल.

भटक्या

भटक्या यांना काही माहित असावे का? त्यांची माहिती चांगली असते. ते काही प्रकाश टाकू शकतील का?

एक अंदाज

या बाबत मला तरी काहिही माहिती नाही. पण माझ्या अंदाजानुसार हे छत्र कातळातल्या छताच्या बाजूने कोरून काढलेले असू शकते साहजिकच ते अंधांतरी असल्याच्या भास निर्माण व्हावा. (छताला लटकवलेल्या झुंबराप्रमाणे)

अजून खोलात आवडेल

इतरांच्या मते तेथे फासलेल्या व चमत्कार दर्शविणार्‍या एका मिश्रणामुळे हे जागेवर राहिलेले आहे................... अजून खोलात सांगितले तर बरे होईल.

 
^ वर