घरमालकांनो सावधान.....भाडेकरूची माहिती द्या....नाहीतर...!!!

रोज सकाळी उठल्या उठल्या हातात वर्तमानपत्र लागते, (फक्त वाचण्यासाठी) आता न्यूज चानेल च्या भाऊगर्दीत वर्तमानपत्राचे काय एवढे महत्व...असे डायलॉग मारू नका. पण आख्या दिवसाच्या बातम्या एकदाच वाचायला मिळतात ना...तर असो, तर सकाळी-सकाळी सकाळ वाचायला घेतला अन सकाळचा (वर्तमानपत्राचा) मथळा पाहून सकाळीच माथा सरकला, बातमी होती, "भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या 28 घरमालकांवर गुन्हे." भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या 28 घरमालकांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, अटक आणि अर्थीक दंड हि होऊ शकतो.

मी व्यवसायाने वकील असल्यामुळे ऑफिसला येणाऱ्या प्रत्येक अशिलास याविषयी मी नेहमी सल्ला देत असतो, परंतु त्यांच्या कडून नेहमीची उत्तरे मिळतात, भाडेकरू आमच्या ओळखीचा आहे, भाडेकरू आमचा नातलग आहे, आम्हाला फक्त थोडेच दिवस ठेवायचे आहे, आम्हाला हे आणि आम्हाला ते, काही घरमालक तर एवढे निर्बुद्ध असतात कि, त्यांना असे वाटते कि, भाडेकरू ला आपण काही लिहून दिले कि, मिळकत भाडेकरुच्याच मालकीची होते. लिव्ह अन्ड लायसेन्स चा करारनामा करून दिल्यानंतर मी त्यांच्या सोयीसाठी भाडेकरूंची माहिती देणारा अर्ज देखील सोबत देतो आणि तो अर्ज कसा भरून कोठे द्यायचा हे सांगून देखील घरमालक लोकांत नेहमीच उदासीनता दिसून येते. पोलिसांकडून याबाबतचे निवेदन वारंवार जाहीर करण्यात येते. मात्र अजूनही बहुतांश लोकांना अशा प्रकारची माहिती पोलिसांना द्यायची असते, याची माहितीच नाही. लोकांमध्ये याबाबत जागृती होणे आवश्यक आहे. म्हणून आज हि बातमी वाचून या लेखाच्या (?) माध्यमातून थोडी जागृती करावीशी वाटली म्हणून हा छोटासा प्रयत्न...!!!

पुण्यातील नुकत्याच झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. गतवर्षी जर्मन बेकरीमध्ये बॉंबस्फोट झाल्यावर पोलिसांनी खऱ्या अर्थाने (?) ही मोहीम हाती घेतली आहे. जर तुम्ही तुमचे घर भाड्याने देणार असाल, तर तुमचा भाडेकरू कोण आहे ? तसेच त्याचे छायाचित्र, त्याचा व्यवसाय, मूळ पत्ता, राहण्याचा उद्देश आदींची संपूर्ण माहिती नजीकच्या पोलीस स्टेशनला तातडीने कळविणे आवश्यक आहे. फौजदारी दंड संहितेतील कलम १४४ अन्वये घरी काम करणारे नोकर, सुरक्षारक्षक आणि भाडेकरू यांची इत्यंभूत माहिती देण्यासाठी सक्ती करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. जर पोलिसांनी ही माहिती मागितली आणि ती देण्यास आळस किंवा टाळाटाळ केल्यास संबंधितांना भारतीय दंड संहितेतील कलम १८८ अन्वये दंड किंवा शिक्षा होऊ शकते. दहशतवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर भाडेकरू ठेवणार्या घरमालकांना नजीकच्या पोलीस ठाण्यात माहिती कळविण्याचे पोलिसांनी गेल्या काही वर्षात अनेकदा घरमालक यांना आवाहन करूनही अनेकांनी अद्यापपर्यंत पोलिसांना ठेंगाच (सतत दुर्लक्ष केल्यास ठेंगाच म्हणणार ना) दाखविला आहे.

शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशाच्या विविध भागांतून आलेले लोक महाराष्ट्राच्या विविध शहरात स्थायिक होत आहेत. गेल्या काही काळात अगदी लगतच्या पुण्या पासून मुंबई, बंगळूर, अहमदाबाद, दिल्ली आदी ठिकाणी बॉंबस्फोटाच्या घटना घडल्या आहेत. भविष्यात अतिरेकी संघटनांचे सदस्य; तसेच कारवाया करणार्‍या व्यक्ती बेमालूम पणे भाड्याने आपल्या परिसरात राहून अशा घटना घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुमारे अडीच वर्षांपूर्वी पुणे येथील शिवाजीनगर भागात भाड्याच्या खोलीत राहणार्या शेख लालबाबा बिलाल हा लष्कर-ए-तोयबाचा सक्रिय सदस्य असलेल्या अतिरेक्यास दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती. संशयित बिलाल याच्याकडून पथकाने आरडीएक्स बरोबरच प्रमुख ठिकाणांचे छायाचित्रण, विदेशी चलन हस्तगत केले होते.

पोटापाण्याच्या प्रश्नांच्या शोधात आलेल्या राज्य व परराज्यातील लोकसंखेच्या लोंढ्यांना उत्पन्नाचे साधन करून त्यांना भाडेकरू म्हणून ठेवून महिन्याकाठी हजारो रुपये पदरात पाडून घेणार्‍या घरमालकांनी असामाजिक प्रवृत्तींनाही न कळत थारा दिल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरात वास्तव्यास आलेल्या लोकांची माहिती घेण्यासाठी कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार आपले फ्लॅट, बंगला, खोली अथवा आपल्या ताब्यातील जागेमध्ये भाडेकरू ठेवण्यापूर्वी अथवा ती जागा कोणास तात्पुरती वापरण्यास देण्यापूर्वी संबंधितांची संपूर्ण माहिती घेऊन ती जवळच्या पोलिस ठाण्यात कळविणे बंधनकारक आहे. जागामालकाने ही माहिती कळवायची आहे. त्याचप्रमाणे जागेची खरेदी-विक्री करणारे किंवा जागा भाड्याने देण्याचे व्यवहार करणार्‍या एजंटांवरही हे बंधन टाकण्यात आले आहे. याचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. या आदेशानुसार कारवाई करण्यासाठी भारतीय दंड संहितेतील कलम १८८ चा आधार घेतला जाणार आहे.

काय आहे कलम १८८ ? - (Section 188 - Disobedience to order duly promulgated by public servant) - म्हणजेच भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १८८ नुसार शासनाच्या आदेशाचे पालन न केल्याचा गुन्हा दाखल दाखल होऊ शकतो. या कलमाद्वारे दोषी व्यक्तीला आर्थिक दंड किंवा एक ते सहा महिने इतका तुरुंगवास होऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतो.

शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन शहरात भाड्याने राहत असलेल्या देशी, परदेशी लोकांची माहिती पोलिसांकडे उपलब्ध असावी, म्हणून भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहरातील भाडेकरूंची माहिती संकलित करण्यासाठी पोलिसांकडे अद्याप कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे लोकांनी स्वत:पुढे येऊन आपली जबाबदारी ओळखून पोलिसांपर्यंत माहिती पोहचविणे आवश्यक आहे.

भाडेकरूंची माहिती भरून देण्यासाठी लागणारा अर्ज आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशन मध्ये मिळेल. तसेच पुणे पोलिसांच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे. त्याची प्रिंट काढून तो फॉर्म भरून पोलिसांना देता येऊ शकतो. यात भाडेकरूची संपूर्ण माहिती, तो शहरात कुठे शिकत आहे, किंवा नोकरी करत आहे का, त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत का आणि असतील तर सध्या त्याची काय परिस्थिती आहे, याची माहिती भरून द्यावी लागते. फॉर्मबरोबर भाडेकरूचा फोटो आणि लिव्ह अॅण्ड लायसन्सच्या कराराची (भाडे करार) झेरॉक्स प्रत जोडावी लागते. करार सब रजिस्ट्रार कडील नोंदणीकृतच असावा असे बंधन नाही. परंतु नोदनीकृत करार असेल असेल तर घरमालक भाडेकरू मध्ये भविष्यात वाद झाल्यास तो महत्वाचा कायदेशीर पुरावा होतो.

प्रत्येक पोलीस स्टेशनला अर्ज घेण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. भाडेकरूला घर दिल्यानंतर घरात किंवा त्याच्याकडून शहरात गुन्हा घडल्यास पोलिसांना त्याचा तपास करण्यासाठी या माहितीचा उपयोग होतो.

पोलिसांच्या भितीपोटी अनेकजण पोलिसांपासून चार हात दूर राहणेच पसंत करतात. त्यामुळे पोलीस स्टेशनला माहिती देण्यासाठी जाणेही अनेकजण टाळतात. उच्चभू सोसायट्यांमध्ये राहत असलेल्या सुशिक्षितांनाही पोलिसांच्या या नियमाची माहिती नसल्याचे त्यातून उघड झाले. भाडेकरूंची माहिती देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेल्यावर, पोलिसांकडून अडवणूक होत असल्याची काही नागरिकांची तक्रार आहे. याबाबत पोलिस धमकावत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिक स्वतःहून माहिती देण्यासाठी पोलिस ठाण्यात येत असतील, तर त्यांची माहिती तेथील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे. नागरिकांची अडवणूक होणार नाही, यासाठी संबंधित उपायुक्तांनीही त्यात लक्ष घालावे. नागरिकांनी भाडेकरूंबाबत पोलिस ठाण्यात दिलेली माहिती स्वीकारली जात नसेल, तर त्यांनी नियंत्रण कक्षात किंवा संबंधित उपायुक्तांच्या अथवा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तक्रार करावी.

तर मित्रानो या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता किंवा नुसती प्रोसिजर म्हणून न पाहता आपण भारतीय नागरिक आहोत आणि पोलिसांएवढीच आपलीही काही देश्याच्या सुरक्षिततेची जबादारी आहे हे लक्ष्यात घ्या, आणि आपल्या भाडेकरू व्यवस्थित तपासूनच त्याला राहणेस जागा द्या आणि त्याची नोंद आपल्या स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये करा, जर एखादा घरमालक माहिती कळविण्यास टाळाटाळ करत असेल तर भाडेकरूने स्वत माहिती द्यावी. पोलिसांच्या भितीपोटी अनेकजण पोलिसांपासून चार हात दूर राहणेच पसंत करतात. परंतु पोलिसांना घाबरू नका, तेही माणूसच आहेत, तुमची जबाबदारी ओळखा आणि आज पोलिसांना तुम्ही मदत करा, उद्या तुमचे संरक्षण हेच करतील...!!!

- अँड. राज जाधव...!!!

लेखनविषय: दुवे:

Comments

माहिती म्हणून ठिक.

पोलिसांच्या भितीपोटी अनेकजण पोलिसांपासून चार हात दूर राहणेच पसंत करतात. परंतु पोलिसांना घाबरू नका, तेही माणूसच आहेत, तुमची जबाबदारी ओळखा आणि आज पोलिसांना तुम्ही मदत करा, उद्या तुमचे संरक्षण हेच करतील...!!!

त्ये आमाला काय सांगता? ह्येनला सांगा, ह्ये फोलिस हायेत. :)

ऑन अ सिरीयस नोट, पोलिसां बद्दलची भिती घालवायची असेल तर पोलिसांनी त्यांची प्रतिमा बदलण्याची गरज आहे.

मागे, स्टँडवरच्या एका रिक्षावाल्यानी (बंगळूरु मध्ये) जयानगरला यायला नकार दिल्यावर (नकार द्यायची पद्धत म्हणजे अव्वाच्या सव्वा भाडं सांगतात) तिथेच दोन पावले पुढे उभा असलेल्या ट्रॅफीक हवालदाराला सांगितलं तर तो "मग बस नी जा की" असं म्हणाला होता.

(टर्रेबाज) दादा

प्रतिमा

तुम्हास आलेला अनुभव हा कॉमन म्हणजे नेहमीचा आहे, आता तुम्ही ट्राफिक हवालदारला सांगितले त्यामुळे त्याच्या जबाबदारीत आणि कामात बंधने आलीच, परंतु एखाद्या पोलिसाला सांगितले असते तर वेगळे उत्तर मिळाले असते, असे मला हि नाही वाटत, मी जसे वर नमूद केले "पोलीसही माणूसच आहेत" त्यामुळे त्यात काही नमुने असणारच, परंतु सर्वच पोलीस वाईट, हे मानणे अवघड, लाच घेणारे, अरेरावी करणारे, हे पोलीस असले तरी, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले शहीद हेमंत करकरे.शहीद अशोक कामटे, शहीद विजय सालसकर, शहीद बाबुराव धुरगुड़े , शहीद प्रकाश मोरे,शहीद विजय खांडेकर, शहीद ए.आर.चित्ते, शहीद बळवंत भोसले, शहीद तुकाराम ओम्बाले, शहीद जयंत पाटिल, शहीद योगेश पाटिल, शहीद अम्बादास पवार, शहीद शशांक शिंदे हे दिखील पोलिसच होय.

व्यवहार्यता

समजा पुणे शहरातील प्रत्येक भाडेकरुची नोंद पोलीसांकडे ठेवायची झाल्यास किती वेळ, मनुष्यबळ. कागद खर्ची पडेल?
खर तर नोंदवलेल्या प्रत्येक करारनाम्यात ही माहीती नोंदणी कार्यालयात असतेच. त्याचे संगणकीकरण देखील झाले
आहे. मध्यंतरी अशी माहिती पोलिसांनी नोंदणी कार्यालयाकडून एकत्रीत संगणकीय स्वरुपात घ्यावी असे सजग
नागरिक मंचाने सुचवले होते.
कायदे नियम करताना वा केल्यावर त्याची कालसुसंगत चिकित्सा झाली पाहिजे. लॉजमध्ये येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकाची
नोंद पोलिसांना ठेवता येणे शक्य आहे का? लॉज मालक मिळालेली माहिती ठेवतच असतो.
पोलिसांची जनमानसातील प्रतिमा नेहमीच खालावलेली दिसते. ती तशी का? हा संशोधनाचा विषय आहे.

काही प्रमाणात योग्य

घाटपांडे साहेब तुमचे काहीअंशी बरोबर आहे, परंतु भाडेकरूंची नोंद केल्यास, त्या माहितीचा उपयोग गुन्हा घडल्यानंतरच होतो असे नाही, भाडेकरूंची माहिती सुरुवातीलाच भाडेकरू ठेवताना दिल्यास तो पोलिसांना हवा असलेला एखादा गुन्हेगार असेल तर ते लगेच कळून येईल, आणि परिणामी त्याला अटक देखील होईल,

नोदणीकृत करारनामा करावाच, परंतु नोंदणीकरण संगणीकृत झालेमुळे एकूण फक्त हवेली विभागाच्या १९ हवेली नोंदणी कार्यालय आहेत. त्यामुळे तुम्हाला कोथरूडच्या मालमत्तेची नोंदणी करावयाची असेल तर तुम्ही ती पिंपरी मध्ये देखील करू शकता त्यामुळे, पोलिसांच्या हद्दीचा प्रश्न येतो, आणि दररोज होणाऱ्या करारनाम्याची अपडेट रोजच्या रोज घेणे काहीसे किचकट आहे. आणि ती माहिती घेतली तरीही भाडेकरुणा वेरीफिकेशनसाठी पोलीस स्टेशन मध्ये यावेच लागेल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे करारनाम्या मध्ये तो कुठे काम करतो, त्याच्या शरीरावरील जन्मखून, त्याचा नोकरीचा कालावधी, तो आपले मूळ ठिकाण सोडून कोणत्या कारणासाठी इथे भाड्याने राहतोय हे नमूद नसते त्यामुळे पोलिसांना नोदणी कार्यालयातून अपूर्ण माहिती मिळेल. आणि राहिल्या मनुष्यबळ आणि कागदाचा खर्च तर पोलीस स्टेशन मध्ये एक कर्मचारी आणि फक्त २ पानाचा अर्ज लागेल, परंतु नोंदणी कार्यालयातून माहिती घ्यावयाची झाल्यास एक तर अपूर्ण माहिती आणि तो करारनाम्याची प्रत घेताना वेळ आणि कागद यावूनही जास्त वाया जाईल, आणि कोणताही करारनामा घ्यावयाचा झाल्यास तो हार्डकोपी मधेच मिळतो सोफ्टकोपी मध्ये देण्याची सोय नोदणी कार्यालयात उपलब्ध नाही.

पोलिसांची प्रतिमा खालावलेली दिसते...होय यास कारण देखील काही प्रमाणात भ्रष्ट असलेले पोलीस च जबादार आहेत. परंतु याने सर्वाना सारखे लेखाने चुकीचे ठरेल.

लॉज मध्ये तात्पुरत्या स्वरुपात लोक राहतात आणि त्यांची नोंद लॉज ला ठेवणे गरजेचेच आहे, लॉजवाले स्वतच्या मर्जीने हि नोंद ठेवत नसून ते देखील पोलिसांनी आदेश दिल्यामुळेच ठेवतात. त्याच प्रमाणे कॉईन बॉक्स वरून बॉम्बच्या अफवा किंवा निनावी धमकी दिल्या जात असत परंतु त्याची नोंद देखील कम्पल्सरी केल्यामुळे याचे प्रमाण काही अंशी कमी झाले. शेवटी कायदा हा योग्यच असतो परंतु त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने केली नाही तर तो फोलच ठरतो.

चांगली चर्चा होऊ शकते

या विषयावर माझ्यामते चांगली चर्चा होऊ शकेल. परदेशात राहणारे अनेकजण आपापली घरे भाड्याने देतात. यांत काहीजणांचा घर भाडे मिळवणे हा उद्देश असतो तर काहीजणांचा घर बंद राहू नये असा असतो.

भाडेकरू म्हणून राहणार्‍या व्यक्तीची तपासणी करावी हे खरे आहेच पण ती केवळ घरमालकानेच न करता जर घर को-ऑप. सोसायटीत असेल तर तेथील कमिटीनेही ती करावी. कारण एकदा घर भाड्याने दिल्यावर मालक तेथे नसतो. उलट, शेजार्‍यांना धोका अधिक असतो.

अनेक ठिकाणी ही माहिती घेतली जाते. सोसायटी घरे कोणाला द्यावीत याचे नियम बनवतात.* असे केल्याने एकदम पोलिस स्टेशन गाठले नाही तरी सोसायटीच्या ऑफिसमध्ये एक फाइल ठेवणे फार कठीण नाही असे वाटते.

* माझे मुंबईतील घर ज्या भागात आहे तेथे अनेक टीव्ही कलावंतांना घरे असणे सोयीचे पडते पण या लोकांमुळे इतरांना अतिशय त्रास होतो हे लक्षात आल्यावर सोसायटीने टीव्ही कलावंतांना घरे भाड्याने देऊ नयेत असा नियम केला होता असे ऐकले आहे. :-)

आमच्या सोसायटीत

आमच्या सोसायटीत पोलिस व्हेरिफिकेश आणि एन ओ. सी असल्याशिवाय सामान आणूच दिले जात नाही असे ऐकले आहे.

योग्य आणि आवश्यक

आमच्या सोसायटीत पोलिस व्हेरिफिकेश आणि एन ओ. सी असल्याशिवाय सामान आणूच दिले जात नाही असे ऐकले आहे.

आमच्या सोसायटीतही पण ही टीव्ही कलाकारांची भानगड नव्याने कळली होती. :-) मला वाटतं, सोसायट्यांनी या वेरिफिकेशनची खबरदारी घ्यावी. बरेचसे प्रश्न आटोक्यात येतील.

पण

पण यासाठी आमच्या सोसायटीत एक आयपीएलचा बेटिंगचा धंदा उघडा पाडण्यासाठी एक धाड पडावी लागली. तोवर कोणालाही माहित नव्हते.

हाहाहा!

अशी शहाणपणे मागाहूनच येत असतात. आमच्याकडेही एका प्रसिद्ध टिव्ही दांपत्याने फ्लॅट लीजवर घेतला, तो कोणालातरी परस्पर विकून टाकला आणि पैसे घेऊन पोबारा केला. त्यानंतर सर्व जागे झाले.

शक्य नाही

भाडेकरू हा कितीही वर्षे भाड्याने त्याच मालमत्तेत राहिला तरी तो कधीही मालक होऊ शकत नाही आणि खऱ्या घरमालकाच्या सही शिवाय मालमत्ता विकू शकत नाही, (अपवाद - खोटे दस्तेवज करून )

मूर्खपणा

सहसा सोसायटीच्या खाली खर्‍या सभासदाचे नाव लिहिलेले असते. विकत घेणार्‍यांनी काहीच शहानिशा केली नाही? सोसायटीचे एन ओ सी वगैरे....

बिंग फुटलेच की

खोटे दस्तऐवज होते त्यामुळे बर्‍यापैकी रक्कम घेऊन सदर व्यक्तींनी दिल्लीच्या दिशेने पोबारा केला हे नेमके ठाऊक आहे. अर्थातच, ही गोष्ट लगेच कळून चुकली पण या सर्वात जो त्रास झाला त्यामुळे सोसायटीने वैतागून हे पाऊल उचलले. तरी मला ते थोडेसे कठोर वाटले पण नंतर कळले की दुसर्‍या एका फ्लॅटमध्ये रात्रीबेरात्री लोक येत जात, तेथे राहणारा कलावंत झिंगलेल्या अवस्थेत परतत असे त्यामुळे टीव्ही कलाकारांना घरे देऊ नयेत असा "फतवा" काढला गेला.

फ्ल्याट संस्कृती

फ्ल्याट संस्कृती मध्ये आपल्या शेजारी कोण राहते, याची दाखल घेण्यास हि कोणास वेळ नसतो, त्यामुळे आपला शेजारी किंवा सोसायटीत राहणेस येणारा प्रत्येक व्यक्ती गुन्हेगार नसावा असेच सर्वांनाच वाटत असे, नाही का ? आणि नंतर एखादा गुन्हा घडला तरीही पोलिसांत नोंद असेल तर आपल्याला त्रास देखील कमी होईल.

खास

खास हा धागा बगुन इथे सभासद झालो.
हे वेरिफिकेशन करने अत्यंत आवश्यक आहे.
कारण माझ्या माहितीत एकांचा फ्लेट कॉलेजमधल्या ३ मुलींना रहायला दिला होता. त्यापैकी एकीने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली. त्या फ्लेटचा मालक अमेरिकेत! इथे वडील कारभार बघत. आत्महत्या झाल्यावर पोलिसही हात वर करुन मोकळे झाले की इथे ठेवलेल्या भाडेकरुंची आम्हाला माहिती नव्हची, सारी जबाबदारी केवळ मालकांची आहे.

त्या माझ्या परिचितांना (वडीलांना) पळाता भुई थोडी झालीच. आता कोर्टाची तारीख लागली की वकीलाच्या सल्यानुसार मुलाला अमेरिकेतून इथे यावेच लागते. एक वेरीफिकेशन नसल्याने कायमचा ताप होऊन बसला आहे

स्वागत जुनेरकर

उपक्रमवर स्वागत आहे.

तुम्ही दिलेली माहिती धक्कादायक आहे. विशेषतः, कोर्टाची तारीख लागली की मालकाला यावे लागते ही. यावर कोणी प्रकाश टाकू शकेल का?

प्रत्येक नाही

म्हंनजे त्यांना प्रत्येकक तारखेला नाहि यावे लालाग, तरी वर्षाकाठी दोनदा तरी यावे लागते. वकिलाच्या सल्ल्याने आवश्यक त्याच तारखेंना ते येतात

कोर्टाची तारीख

जुनेरकराणी सांगितले.. एका मुलीने आत्महत्या केली आणि पोलिसांनी हात वर केले वगैरे, हे परंतु घर मालकावर कोणता गुन्हा टाकला हे काळे असते तर जास्त प्रकश तक्ता आला असता, पण मी शक्यता असणाऱ्या गोष्टीन बद्दल सांगू शकतो, १) फौजदारी दंड संहितेतील कलम १४४ अन्वये घरी काम करणारे नोकर, सुरक्षारक्षक आणि भाडेकरू यांची इत्यंभूत माहिती देणे व त्याचे वेरीफिकेशन करावे लागते व ते नसल्या मुळे फौजदारी दंड संहितेतील कलम १८८ अन्वये घरमालकावर गुन्हा दाखल होऊ शकतो, त्यानुसार दोषी व्यक्तीला आर्थिक दंड किंवा एक ते सहा महिने इतका तुरुंगवास होऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतो. आणि हि क्रिमिनल प्रोसिजर असल्यामुळे दोषी व्यक्ती हा आरोपी होऊन त्याला अटक होऊन जामिनावर सुटका होऊ शकतेम, परंतु देश सोडता येत नाही, त्यामुळे घरमालक परदेशी असल्यामुळे फक्त हीच श्यक्यता नाही, २) दुसरी गोष्ठ म्हणजे मुलीने आत्महत्या केल्यामुळे तपासा साठी मिळकत सील केली असेल व ती सोडवण्यासाठी न्यायालयाचा आदेश घ्यावा लागतो. व त्यासाठी मुल मालकाला हजर राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे ते येत असतील ३) मूळ मालक परदेशी असल्यामुळे त्यांचे वडील सर्व कारभार पाहत होते, परंतु त्यांना मुल मालकाने कुलमुखत्यार पत्र करून दिले होते का ? जरी वडील असले तरी कुलमुखत्यार पत्र आवशक आहे, आणि नसेल तर त्यांना करारनामा केला आहे का नाही ? केला असेल तर त्यावर मुल मालकाची सही कोणी केली ?
? का खोटी सही केली, त्यामुळे दुसऱ्या ही केसेस टाकल्या असतील,... फौजदारी केसेस मध्ये समोरचा व्यक्ती हा आरोपी असतो त्यामुळे त्याला प्रत्येक तारखेस कोर्टात येणे भाग असते, काही केसेस मध्ये आरोपीस कोर्टात येण्यास काय अडचण आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध केल्यास कोर्ट त्या आरोपीला एक्झमशन देखील देवू शकते. म्हणजे त्यला कोर्टात प्रत्येक तारखेस हजर राहणे बंधनकारक राहत नाही.

माहिती नाही

नक्की माहित नाही कोनत्या नंबरखाली केसेस टाकल्या अहेत ते.
त्यांना उगाच खोदून विचारणे चांगले वाटत नाही :(

पण मुलाला वर्षातून दोनदा यावे लागते हे मात्र खरे

 
^ वर