एका साम्राज्याच्या शोधात; पितळखोरे गुंफा भाग 4

पितळखोर्‍यामधील 4 क्रमांकाच्या विहारातून परत बाहेर आल्यानंतर समोर पडलेल्या पाषाण खंडांकडे मी बघत असतानाच, माझ्या बरोबर असलेला पुरातत्त्व विभागाचा अधिकारी, गुंफेच्या मुखाच्या बर्‍याच वर, म्हणजे मी उभा आहे त्या स्थानापासून निदान 90 ते 100 फूट तरी ऊंचीवर, असलेल्या समोरच्या पाषाण कड्याकडे माझे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रथम नीटसे दिसत नाही. परंतु नंतर लक्षात येते की समोरच्या उभ्या कड्यावर एवढ्या ऊंचीवर काहीतरी कोरीव काम केलेले आहे. या एवढ्या ऊंचीवर काय कोरले असावे असे आश्चर्य व्यक्त करत असतानाच हे कोरीव काम म्हणजे खाली असलेल्या विहारातील कोठड्यांच्या द्वारावर जशा घोड्याच्या नालाच्या आकाराच्या चैत्य कमानी कोरलेल्या आहेत, बरोबर तशाच, पण आकाराने बर्‍याच मोठ्या असलेल्या कमानींच्या रांगा आहेत हे माझ्या लक्षात येते आहे. कड्याचा बराचसा भाग ढिसूळ झाल्याने पडला असल्याने, आता फक्त 4किंवा 5 कमानी वर दिसत आहेत. या प्रत्येक कमानीमधील आतल्या खड्डेवजा भागात एकापेक्षा एक मोठा व्यास असलेल्या 3 किंवा 4 बेर्म रेल कमानींचा (berm-rail arches) एक संच कोरलेला आहे तर दोन कमानींच्या मधल्या (आडव्या पातळीवर) भागात लाकडी जाळी समान दिसणार्‍या जाळ्या (wooden lattice design) कोरलेल्या आहेत. मोठ्या आकाराच्या कमानींच्या रांगेच्या खाली तशाच पण लहान आकाराच्या चैत्य कमानींची रांग दिसते आहे. या रांगेपैकी सुद्धा फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच कमानी आता शाबूत आहेत. जरा उजवीकडे नजर फिरवल्यावर 3 क्रमांकाच्या चैत्यगृहाच्या डोक्यावरच्या पाषाणात सुद्धा, मला बेर्म रेल कमानींचा एक संच दिसतो आहे. म्हणजेच चैत्य कमानींचे डिझाइन येथेही कोरलेले होते.

या चैत्य कमानी, बेर्म रेल कमानी व लाकडी जाळी पॅटर्न, या प्रकारचे कोरीव काम सर्व हीनायन पंथांच्या बौद्ध मठात दिसून येते.त्यात विशेष असे नाही. कार्ले यथील चैत्यगृहाच्या आतल्या भिंतीवर हे डिझाइन खालील पातळीवरील शिल्पांच्या डोक्यावर अगदी 30 ते 40 फूट ऊंचीपर्यंत केलेले आढळते किंवा अजंठ्याच्या 9 क्रमांकाच्या व पितळखोर्‍याला समकालीन असलेल्या चैत्यगृहाच्या मुखावर (Facade) सुद्धा हे डिझाइन आढळते. परंतु 3 क्रमांकाचे चैत्यगृह व 4 क्रमांकाचा विहार यांच्या मुखाच्या वर असलेल्या उभ्या कड्यावर, 50 ते 60 फूट ऊंचीपासून ते खाली पार गुंफेच्या तळापर्यंतच्या कड्यावर येथे कोरीव काम केलेले होते. या सर्व कोरीवकामामुळे त्या काळात ही गुंफा केवढी भव्य व नेत्रदीपक दिसत असेल याची फक्त कल्पनाच आज करता येते. टॉलेमीच्या लेखनापासून ते बौद्ध महामयूरी या बौद्ध इतिहास सांगणार्‍या ग्रंथामध्ये पितळखोर्‍याच्या गुंफांचा का उल्लेख केलेला होता याचे कारण या गुंफांच्या भव्यतेमध्ये सापडते असे मला वाटत राहते. पितळखोरे गुंफा माझ्यासमोर आणखी किती आश्चर्ये सादर करणार आहेत हेच मला आता कळेनासे झाले आहे.

कड्यांवरील कमानींकडे परत एकदा डोळे भरून मी पाहून घेतो व जमिनीवर पडलेल्या पाषाण खंडांकडे माझे लक्ष वळवतो. 4 क्रमांकाच्या विहारासमोर असलेल्या हत्तींच्या शिल्पांपैकी एक हत्तीचे डोके समोरच्या वाळूवर पडलेले दिसते आहे. त्याची सोंड मात्र पूर्णच तुटून गेलेली दिसते आहे. माझ्या आजूबाजूला पडलेल्या शिलाखंडांपैकी बरेचसे समोरच्या कडा तुटून खाली आलेले असले पाहिजेत. एका शिलाखंडावर बौद्ध पद्धतीचे रेलिंग कोरलेले मला दिसते.(या पद्धतीचे रेलिंगचे डिझाइन सांची व अमरावती येथील समकालीन स्तूपांच्या भोवताली केलेले आढळते.) तर एका शिलाखंडावर लाकडी जाळीचा पॅटर्न कोरलेला आहे. पलीकडे अगदी छोट्या छोट्या चैत्य कमानी व लाकडी जाळ्यांचा पॅटर्न कोरलेले एक पॅनेल पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांनी आधार देऊन उभे करून ठेवलेले दिसते आहे. 3 क्रमांकाचे चैत्यगृह वा 4क्रमांकचा विहार यांच्या मुखाच्या भागावर (Facade) या प्रकारचे डिझाइन संपूर्णपणे कोरलेले होते हे या पॅनेलवरून लक्षात येते आहे.
ज्या शिलाखंडांवर सुस्थितीत असलेली बास रिलिफ शिल्पे होती असे सर्व पाषाणखंड, पुरातत्त्व विभागाने त्यांची अधिक हानी होऊ नये किंवा ते चोरली जाऊ नयेत या साठी आधीच येथून निरनिराळ्या ठिकाणच्या संग्रहालयांत हलवलेले आहेत. यापैकी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात असलेली शिल्पे सातवाहन साम्राज्यकालातील सर्वसामान्य लोक किंवा राजेरजवाडे यांचे आयुष्य किंवा त्यांची वस्त्रप्रावरणे या बद्दल काही माहिती आपल्याला देऊ शकतील असे मला वाटते. या संग्रहालयातील पितळखोरे शिल्पांसंबधी थोडी चर्चा आपण नंतर करणार आहोत.

क्रमांक 5 पासून ते क्रमांक 9 पर्यंत असलेल्या गुंफा या सर्व बौद्ध विहारच होत्या.मात्र या सर्व गुंफांची आता खूपच पडझड झालेली आहे. या गुंफात थोडीफार शिल्पे का रंगकाम आहे असे मी वाचले आहे. परंतु पुरातत्त्व विभागाने त्यांची डागडुजी करून त्या भेट देता येतील अशा अवस्थेला आणल्याशिवाय तेथे जाणे शक्य नाही हे लक्षात आल्याने नदीच्या पलीकडच्या तीरावर असलेल्या दक्षिणाभिमुखी गुंफांकडे जाण्याचा मी प्रयत्न करतो. परंतु या गुंफाकडे जाणारा मार्ग एकतर अतिशय चिंचोळा व अरूंद आहे. एका बाजूला खोल नदी व दुसर्‍या बाजूस उभा कडा यांच्यामधून हा रस्ता जातो. एकंदरीत हा रस्ता जाण्यास फारसा सुरक्षित नाही हे थोडे पुढे गेल्यावर माझ्या लक्षात येते व त्या गुंफांना भेट देण्याचा माझा प्रयत्न मी अर्धवट सोडून देतो व नाईलाजाने दरीत खाली उतरलेल्या 175 पायर्‍या चढून आमची गाडी पार्क केलेली आहे त्या ठिकाणाकडे जाण्यासाठी पायर्‍या चढण्यास प्रारंभ करतो.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात पितळखोर्‍याला सापडलेल्या शिल्पांपैकी 4 शिल्पे प्रदर्शित केलेली आहेत. त्यांच्याकडे आपण वळूया. यापैकी पहिले बास रिलिफ शिल्प एका प्रेमी युगुलाचे आहे. हे युगुल हातात हात गुंफून उभे असल्याचे या चित्रात दर्शवलेले आहे. या युगुलापैकी उजव्या बाजूला असलेल्या स्त्रीने नाभी प्रदेशाखाली नेसलेला असा एक लांब स्कर्ट परिधान केलेला आहे. हा स्कर्ट तिच्या पावलांच्या थोड्या वर म्हणजे घोट्यांपर्यंत लांब आहे. कंबरेजवळ या स्कर्टला चुण्या (pleated) ठेवलेल्या आहेत व कंबरेजवळ या स्कर्टलाच, भरतकाम केलेल्या शेल्यासारखे एक वस्त्र जोडून टाकलेले आहे. या स्त्रीने अंगावर बरेच दागदागिने परिधान केलेले दिसतात.गळ्यात अनेक पदरी मोती किंवा मण्याचे हार घातलेले आहेत व या हाराला मध्यभागी एक रत्नजडित पेंडट जोडलेले आहे. कर्णभूषणे लोंबती व पेंडंट लावलेली आहेत. हातात 2 तरी पाटल्या व 6 बांगड्या दिसत आहेत. कपाळाजवळ या स्त्रीच्या लांब केसांच्या दोन वेण्या घातलेल्या असून या वेण्या कपाळावरून दोन्ही बाजूंना खांद्यांपर्यंत पोचतील एवढ्या लांब व मुंडावळ्या बांधल्यावर दिसाव्या तशा सोडलेल्या आहेत. डाव्या बाजूच्या पुरुषाने गुढग्यापर्यंत येईल असे धोतर परत नाभीखालीच नेसलेले आहे. या धोतरावर त्याने पोढे गाठ मारलेला शेला कंबारेवर बांधला आहे. हातात त्याने 4 ब्रेसलेट्स घातलेल्या आहेत तर गळ्यात एक पुष्पमाला आहे. खांद्यापर्यंत लांब असलेल्या केसांचा त्याने आपल्या कपाळाजवळ बुचडा बांधलेला आहे. हा पुरुष एका पडद्यासारख्या बांधलेल्या वस्त्राच्या पदराजवळ उभा असल्याचे दिसते आहे.

दुसरे बास रिलिफ शिल्प एक राजा व राणी यांचे आहे. कोणत्या सातवाहन राजाचे हे शिल्प आहे हे कळण्यास वाव नसला तरी सिमुक, कृष्ण किंवा श्री सातकर्णी यांच्यापैकी एका राजाचे हे शिल्प असले पाहिजे. उजव्या बाजूच्या राणीने केलेली केशरचना गुंतागुंतीची वाटते आहे. पहिल्या शिल्पाप्रमाणेच राणीच्या पुढच्या केसांच्या वेण्या कपाळाजवळ घातलेल्या असून त्या मुंडावळ्यांप्रमाणे खांद्यांपर्यंत आलेल्या आहेत. मागच्या बाजूस राणीच्या केसांचा एक मोठा अंबाडा बांधलेला आहे. राणीच्या अंगावर भरपूर दागदागिने अर्थातच आहेत. यात गळ्यात हार, लांब व लोंबती कर्णभूषणे, दंडावर असलेली पोची, हतात पाटल्या व बांगड्या आणि पायात रत्नखचित कडी यांचा समावेश आहे. भरत नाट्यम करणार्‍या नर्तकींसारखी तिची साडी दोन्ही पायांभोवती घट्ट गुंडाळलेली असून ती खाली घोट्यांपर्यंतच्या लांबीची नेसलेली आहे. साडीवर व काठांना जरीचे भरतकाम केलेले आहे. कंबरेभोवती रत्नखचित शेला बांधलेला आहे. एका दासीने पुढे केलेल्या तबकातून ती फुलांसारखे काहीतरी उचलताना दाखवलेली आहे. डाव्या बाजूल कोरलेल्या राजाच्या अंगावर गुढग्यापर्यंत येणारे धोतर असून त्यावर शेला गाठ मारून बांधलेला आहे. त्याच्या गळ्यात एक हार आहे. दंडावर 2 पोची दिसतात आणि कानात कुंडले घातलेली आहेत. त्याचे खांद्यापर्यंत येणारे केस कपाळाजवळ बुचडा करून बांधलेले आहेत. एका बारीक नक्षीकाम केलेल्या दगडी किंवा लाकडी सिंहासनावर किंवा मंचकावर व्याघ्रांबर पसरून त्यावर राजा व राणी बसलेले दाखवलेले आहेत. त्यांच्या मागे त्यांचे 3 दास दासी दाखवलेले असून त्यांची वेशभूषा साधारण राजा राणी यांसारखीच वाटते आहे.

तिसर्‍या बास रिलिफ शिल्पात 2 युगुले व त्यांच्या मध्ये 2 घोडे दिसत आहेत. स्त्री पुरुषांची एकूण वेशभूषा आधी उल्लेख केलेल्या शिल्पातील स्त्री- पुरुषांसारखीच असली तरी साधी वाटते आहे. पुरुषाचे कपडे पितळखोर्‍यातील यक्ष द्वारपालासारखेच एकूण दिसत आहेत. दाखवलेले दोन घोडे शिल्पात फक्त एक सुशोभन म्हणून कोरलेले असावेत.

4थ्या शिल्पात बुद्धाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण; त्याने केलेला राजगृहाचा त्याग (Great Renunciation) हा दर्शवलेला आहे. हीनयान पंथाच्या पद्धतीप्रमाणे, बुद्ध अर्थातच दाखवलेला नाही. एक सजवलेला घोडा वा त्याच्यापुढे हातात मशाल घेऊन चालणारा एक सेवक हे दाखवलेले आहेत. मागे 2सेवक आणि त्याने स्वीकारलेला नवीन या नवीन पंथाचे द्योतक म्हणून स्तूपाच्या प्रवेशमार्गावर ज्या पद्धतीची तोरणे उभी करत असत तसे एक तोरण दाखवलेले आहे. या शिल्पातील सेवकांची वेशभूषा सुद्धा आधी वर्णन केलेल्या पुरुष वेशभूषेप्रमाणेच आहे.

पितळखोर्‍याच्या माझ्या भेटीत मी काय बघितले याचा सारांश घ्यायचा ठरवला तर या लेण्यांमध्ये सातवाहन राजांबद्दल थेट कोणतेच संदर्भ मिळत नाहीत हे मान्य करावेच लागेल. परंतु लेण्यांमध्ये जे शिलालेख सापडलेले आहेत त्यातील हस्ताक्षराचे वळण पूर्णपणे मौर्य किंवा सम्राट अशोककालीन ब्राम्ही लिपीचे असल्याने पितळखोरे येथील लेणी सातवाहन राजे सिमुक, कृष्ण व श्री सातकर्णी यांच्या राज्यकालात खोदली गेलेली आहेत हे निर्विवाद्पणे सिद्ध होते.

सातवाहन राजे स्वत: हिंदू ब्राम्हण होते. तरीही इतर धर्मांविषयी त्यांची अधिकृत भूमिका सर्व धर्म सहभाव व आदर अशीच होती.या राजांचा, प्रतिष्ठान किंवा पैठण या ठिकाणी असलेल्या राजधानीत वास्तव्य करणारा, राजवैद्य मोगिला याने या बौद्ध मठाला विहार खोदण्यासाठी देणगी देणे हे काही राजाच्या विरोधात जाऊन केले असणे शक्य नसल्यामुळे राजाचे अधिकृत धोरण काय होते याची आपण कल्पना करू शकतो.

राजा स्वत: राणी व इतर सर्वसामान्य जनसामान्य यांची वेशभूषा अतिशय साधी आणि रोजच्या व्यवहारास अनुकूल होती हे पितळखोरे येथील बास रिलिफ व पूर्णाकृती शिल्पांवरून दिसून येते आहे. या शिल्पातील स्त्रियांच्या काही फॅशन्स अजूनही प्रचलित आहेत हे कोणासही सहजपणे लक्षात येऊ शकते.

पितळखोरे लेणी ही त्या काळात किती भव्य आणि नेत्रदीपक दिसत असली पाहिजेत याची फक्त कल्पनाच आता आपण करू शकतो. ही लेणी एवढ्या दुर्गम ठिकाणी का बांधली असावीत? असा एक प्रश्न मनात येतो. परंतु चाळीसगावच्या बाजूने आल्यास कदाचित एखादा सोपा मार्ग या लेण्यांकडे येत असल्याची शक्यता नकाशावरून तरी वाटते. पितळखोर्‍याच्या दरीतील नाला किंवा नदी पुढे पाटण या खेडेगावावरून वहात जाते. या नदीच्या काठाने हा रस्ता असण्याची बरीच शक्यता आहे.

पितळखोर्‍याच्या लेण्यांमधील शिल्पांवर असलेला ग्रीक प्रभाव बघता या लेण्यांचा मुख्य वास्तुशिल्पकार यवन किंवा यवनांच्याकडे शिक्षण घेतलेला तरी असला पाहिजे असे माझे मत झाले आहे. यानंतर याच कालात निर्माण झालेल्या दुसर्‍या म्हणजेच अजंठ्याच्या लेण्यांकडे आपण वळूया.

समाप्त

14ऑगस्ट 2012

या लेखासोबत असलेली छायाचित्रे बघण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम लेखमाला

पितळखोर्‍याच्या लेण्यांवरची ही लेखमाला उत्तम आहे. फार आवडली.

विशेषतः या भागातील शिल्पांची वर्णेने फारच सुरेख आहेत.

राजा राणीच्या शिल्पात राणी राजाच्या मांडीवर बसली असावी. राजाचा हातही तिला कवेत घेतो आहे. कदाचित अंतःपुरातील आराम या शिल्पातून व्यक्त होत असावा.

लेखमाला आवडली

सर्वच लेख आवडले. धन्यवाद.

शेवटच्या चित्रातील तोरण हे सांचीच्या प्रसिद्ध तोरणाप्रमाणे वाटते.

>पितळखोर्‍याच्या लेण्यांमधील शिल्पांवर असलेला ग्रीक प्रभाव बघता या लेण्यांचा मुख्य वास्तुशिल्पकार यवन किंवा यवनांच्याकडे शिक्षण >घेतलेला तरी असला पाहिजे असे माझे मत झाले आहे.

मला असे वाटत नाही. पत्नी पुरुषाच्या मांडीवर बसली असल्याचे ग्रीक उदाहरण पटकन डोळ्यासमोर येत नाही. या शिल्पकारांनी ग्रिकांकडे "शिक्षण" घेतले असेल हे गांधार शैलीवरून म्हटले असते तर पटायला हरकत नव्हती. पण गांधार शैली नंतर विकसित झाली. प्रभाव यवनी असावा यात शंका नाही पण जाणीवा भारतीय वळणाच्या असाव्यात.

यवनी प्रभाव

पितळखोरे वा अजंठा ही दोन्ही लेणी समकालीन आहेत. परंतु अजंठ्यामधील चित्रकलेत असा यवनी प्रभाव अजिबात जाणवत नाही. पितळखोरे लेणी बनवली तेंव्हा गांधार शैली अजून विकसित व्हायची होती, त्यामुळे हा प्रभाव गांधार शैलीचा असणे संभवनीय नाही. श्री भटक्या यांच्या प्रतिसादाप्रमाणे भाजे लेण्यांत हा यवनी प्रभाव आढळतो. भाजे लेणी ही सर्वात जुनी म्हणजे पितळखोर्‍याच्या आधीची समजली जातात. त्यामुळे या काळात यवनी (भाजे-पितळखोरे) वास्तुशिल्पकार असणे मला तरी शक्य वाटते.

अजंठ्यातील चित्रात तोरण मात्र आढळते. (समकालीन गुंफा 9 आणि 10 मध्ये)

झकास...

वाचतोय.

झकास

झक्कास असेच म्हणतो.

चंद्रशेखर यांचे लेख नेहमीच वाचनीय असतात.

उत्तम

लेखमाला अतिशय उत्तम झाली आहे.
पितळखोर्‍यासारख्या तुलनेने दुर्लक्षित पण अजोड लेणीसमूहाबद्दल अतिशय सुरेख माहिती मिळाली.
अजिंठा लेणीमालिकेची वाट पाहातो आहेच.

पूर्णपणे सहमत

भटक्या ह्यांच्याशी पूर्णपणे सहमत. ह्याचे ड्रूपलबुक बनवायला हवे. पुढील मालिकेची वाट पाहतो आहे.

 
^ वर