एका साम्राज्याच्या शोधात: पितळखोरे गुंफा भाग 3

४ क्रमांकाची गुंफा

पितळखोरे येथे असलेली 4 क्रमांकाची गुंफा, ही सुद्धा तसे बघितले तर भिख्खूंचे निवासस्थान किंवा एक विहार आहे. परंतु माझ्या समोर असलेल्या भग्नावशेषांवर एक नजर टाकता क्षणीच, हा विहार प्रमुख किंवा वरिष्ठ आचार्यांसाठी खोदला गेला असला पाहिजे याची खात्री पटते. अर्थात या विहारात असलेल्या कोठड्या मात्र इतर विहारांतील कोठड्यांप्रमाणेच तेवढ्याच आकाराच्या व तशाच साध्या स्वरूपातील आहेत. पण ती बहुदा त्या काळातील पद्धत असावी. कदाचित हा विहार VIP साठी असल्याने येथील सर्व कोठड्यांना लाकडी द्वार झडपा बसवण्याची व्यवस्था होती. दगडात लाकडी खुंट्या मारण्यसाठी पाडलेली चौकोनी छिद्रे काय ती आता फक्त उरलेली आहेत.

मात्र या विहारातील बाकी सर्व काही मोठे वैशिष्ट्यपूर्ण किंवा (Exquisite) आहे यात शंकाच नाही. गुहेच्या दर्शनी भागापासून (Facade) ते आतील भिंतीपर्यंतच्या सर्व जागी, कलाकुसर, बास रिलिफ शिल्पे आणि पूर्णाकृती शिल्पे यांनी हा विहार संपूर्णपणे सजवला होता याच्या खाणाखुणा अजूनही स्पष्टपणे दिसत आहेत. या कालातील कोणत्याच विहारात किंवा स्तूपावर संपूर्ण कोरलेली शिल्पे (Rounds) आढळून येत नाहीत. त्या दृष्टीने पितळखोरे मधील हा विहार वैशिष्ट्यपूर्णच मानावा लागेल.

गुंफा क्र. ४ येथील विहार

या विहाराच्या अगदी समोर, पण जमीन पातळीवर मी आता उभा आहे. गुंफेसमोरचे प्रांगण, मी उभ्या असलेल्या जमीन पातळीपेक्षा निदान 5 ते 6 फूट तरी, म्हणजे बर्‍याच जास्त उंचीवर आहे. हे संपूर्ण प्रांगण व त्याचा जमिनीलगतचा समोरचा भाग हा पुरातत्त्व विभागाने एका मोठ्या पिवळ्या रंगाच्या ताडपत्रीने आच्छादून टाकला आहे व त्यामुळे या समोरच्या भागाच्या भिंतीवरचे कोणतेही कोरीवकाम बघणे मला शक्य दिसत नाहीये. परंतु माझ्या नशीबाने, पुरातत्त्व विभागाचा तेथे आलेला अधिकारी मला मदत करण्याचे मान्य करतो आणि ती ताडपत्री वर उचलून मला तो समोरचा भाग बघता येईल अशी व्यवस्था करतो.

विहाराचे प्रवेशद्वार

5 किंवा 6 फूट ऊंच असलेला व एखाद्या भिंतीप्रमाणे दिसणारा प्रांगणाचा हा बाह्य पृष्ठभाग, एका टोकापासून ते दुसर्‍या टोकापर्यंत भरगच्च दिसणार्‍या, बास रिलिफ व पूर्णाकृती शिल्पांनी संपूर्णपणे भरलेला आहे. डावीकडून सुरूवात केली तर या भिंतीच्या कोपर्‍यात व भिंतीला काटकोन करणार्‍या एका पाषाणावर, कोरलेल्या पूर्णाकृती पुतळ्याच्या खाणाखुणा मला दिसतात. पुतळा आता तेथे नाही परंतु हा पुतळा नाग राजाचा असला पाहिजे हे पुतळ्याच्या पार्श्वभूमीला असलेल्या 3फणाधारी नागाच्या बास रिलिफ शिल्पावरून लक्षात येते आहे.

नाग राजाच्या पुतळ्याच्या खाणाखुणा

या नाग राजाच्या पुतळ्याला लागूनच परंतु समोरच्या भिंतीच्या कोपर्‍यात एक द्वारपालाचा पूर्णाकृती पुतळा होता. त्याच्या फक्त खाणाखुणा उरल्या आहेत. (हा पुतळा मुंबई येथील संग्रहालयात आता प्रदर्शित केलेला आहे.) या द्वारपालाच्या डोक्यावर एका हतीचे बास रिलिफ शिल्प आहे. पुढे पाऊल टाकण्यासाठी या हत्तीने आपले पुढचे डावे पाऊल वर उचललेले दिसते आहे. या द्वारपालाच्या खाणाखुणांशेजारी, डाव्या हाताला पाषाणात कोरलेली दाराची एक चौकट आहे. या संपूर्ण चौकटीवर, फुले व पाने यांची नक्षी कोरलेली आहे. दाराच्या चौकटीच्या डाव्या हाताला, उजव्या बाजूस असलेल्या हत्तीच्या शिल्पाप्रमाणेच असलेले, एक बास रिलिफ शिल्प त्या शिल्पाच्या अगदी समोरच कोरलेले आहे. मात्र या हत्तीने आपले पुढचे उजवे पाऊल वर उचललेले दिसते आहे. दोन्ही हत्तींच्या सोंडा व मस्तकाचा काही भाग नष्ट झाला आहे. दरवाज्याच्या डाव्या हाताला असलेला द्वारपाल पुतळा मात्र सुदैवाने अजूनही शाबूत आहे. हे शिल्प बास रिलिफ पद्धतीने कोरलेले नसून पूर्णाकृती आहे. हा द्वारपाल सुद्धा एक यक्ष प्रतिमाच असल्याचे या विषयातील तज्ञ मंडळी सांगतात. सातवाहन कालातील सामान्य पद्धतीप्रमाणे, या द्वारपालाची केशरचना आहे. याच्या डोक्यावर, कपाळाजवळ, केसांचा एक बुचडा बांधलेला दिसतो आहे. त्याच्या डोक्यावर असलेले पागोटे किंवा पगडी बांधतानाच ती या बुचड्याला घट्ट बांधून टाकलेली आहे. या पागोट्यासाठी जे वस्त्र वापरलेले आहे, त्या वस्त्राच्या काठावर केलेले नक्षीकाम, पुतळ्याच्या पुढच्या बाजूस स्पष्टपणे दिसेल असे कोरलेले आहे. हा द्वारपाल यक्ष असल्याचे त्याच्या हत्तीसारख्या कानांवरून दिसून येते. हे मोठे कान या यक्षाच्या दैवी सामर्थ्याचे द्योतक मानले जात होते. या मोठ्या कानात त्याने पिळाचे डिझाइन असलेली कर्णभूषणे घातलेली आहेत. हाताच्या मनगटाजवळ याने चार जाडजूड ब्रेसलेट्स घातलेली आहेत तर डाव्या दंडावर पोची आहे.आपल्याकडे कोकणात शेतकरी कुणबी पद्धतीचे धोतर नेसतात. साधारण याच पद्धतीचे धोतर हा द्वारपाल नेसलेला आहे. या धोतरावर त्याने एक उत्तरीय घेतलेले आहे. हे उत्तरीय व कंबरेवरचे धोतर यांच्या काढलेल्या निर्‍या त्याने कंबरेला घट्ट बांधलेल्या शेल्याजवळ दिसत आहेत. कंबरेवरच्या शेल्यात त्याने तलवारीचे म्यानही अड्कवलेले दिसते आहे. मात्र तलवारीचे पाते महाराष्ट्रात किंवा भारतात वापरल्या जाणार्‍या तलवारींसारखे वक्र नसून सरळ आहे. (तलवारीचे हे सरळ पाते बहुदा त्या काळातील ग्रीक प्रभावामुळे कोरलेले असावे. याच काळात काढलेल्या अजंठा लेण्यातील चित्रात सैनिकांकडे वक्र तलवार दर्शवलेली दिसते.) आपल्या उजव्या हातात या द्वारपालाने एक जाड भाला धारण केलेला दिसतो आहे. मी या द्वारपालाची केशरचना व कपडे यांचे एवढ्या बारकाईने वर्णन करतो आहे, कारण शिल्पकाराने त्या काळातील सर्वसामान्य सैनिक काय प्रकारची वेशभूषा करत असतील तीच वेशभूषा या द्वारपालाचे शिल्प कोरताना दाखवणे स्वाभाविक आहे असे मला वाटते. त्यामुळेच या द्वारपालाची केशभूषा बघून तत्कालीन सर्वसामान्यांच्या वेशभूषेबद्दल एक चांगली कल्पना आपल्याला येऊ शकते.

या द्वारपालाच्या डाव्या बाजूसपासून ते गुंफेच्या डाव्या टोकाच्या भिंतीपर्यंत पसरलेल्या या पेडस्टलच्या बाह्य पृष्ठभागावर 6भले थोरले हत्ती कोरलेले आहेत. या हत्तींचे मस्तक व पुढचे दोन पाय हे संपूर्णपणे कोरलेले आहेत व शरीराचा उर्वरित भाग बास रिलिफ शिल्पामधून दाखवलेला आहे. हत्तींच्या सोंडा व मस्तकाच्या बराचसा भाग हा तुटून नष्ट झाला आहे. एका हत्तीचे तुटलेले मस्तक मला विहाराच्या समोरच जरा लांबवर पडलेले दिसते आहे. हतींच्या पायात जाडजूड कडी घातलेली आहेत आणि गळ्यात मण्यांच्या निदान 8तरी माळा घातलेल्ल्या दिसत आहेत. माझ्या जवळ असलेल्या एका हत्ती शिल्पाच्या पाठीवर भरतकाम केलेली व गोंडे लावलेली झूल घातलेली स्पष्टपणे दिसू शकते. या झुलीला छोट्या घंटा अडकवलेल्या दिसत आहेत. या संपूर्ण बाह्य पृष्ठभागावर अगदी बारकाईने कोरीव काम केलेले असल्याने मला पितळखोर्‍याच्या आपल्या भेटीचे चीज झाल्यासारखे वाटते आहे हे मात्र खरे!

वर उल्लेख केलेल्या दोन द्वारपालांच्या पुतळ्यांच्या मध्ये जी दाराची चौकट दिसते आहे त्या चौकटीमधून आत गेल्यावर गुंफेसमोरच्या प्रांगणात जाण्यासाठी, खडकामध्ये काढलेला एक जिना आहे. परंतु या सर्व भागावर पुरातत्त्व विभागाने एक पिवळी ताडपत्री पसरून टाकलेली असल्याने वर जाण्यास काही मार्ग दिसत नाहीये. परंतु पुरातत्त्व खात्याचा तेथे आलेला अधिकारी मला सुचवतो की हा विहार व याच्या उजवीकडे असलेला 5कमांकाचा विहार यांच्या मधली भिंत आता ढासळलेली असल्याने मला 5 क्रमांकाच्या गुंफेतून परत 4 क्रमांकाच्या गुंफेत सहज येता येईल. मी त्याचा सल्ला मानतो व 5क्रमांकाच्या गुंफेत चढून मधल्या भिंतीला पडलेल्या मोठ्या भगदाडातून 4 क्रमांकाच्या वैशिष्ट्यपूर्ण व अती महत्त्वाच्या व्यक्तींसाठी खोदलेल्या या विहारात प्रवेश करतो.

जेम्स बर्जेस 1880 साली लिहिलेल्या आपल्या पुस्तकात, या विहाराचे वर्णन करताना लिहितो की,

"डावीकडे, कोसळलेल्या दगडांच्या एका भल्या थोरल्या ढिगार्‍याच्यामागे, मुखाचा संपूर्ण भाग (Whole front) कोसळून नष्ट झालेली अशी एक आश्चर्यजनक विहार गुंफा आहे. मागच्या टोकाला ही गुंफा 50 1/2 फूट तरी रूंद आहे. वेरूळ मधील 'दशावतार' किंवा 'तीन थाल' या नावाने ओळखल्या जाणार्‍या गुंफाप्रमाणे, मुखद्वाराला समांतर अशा खांबांच्या ओळींनी ही गुंफा अनेक कॉरिडॉर्स (Corridors) मध्ये विभागलेली आहे. हे सर्व खांब तळाला छताजवळ चौरस आकाराचे आहेत आणि मधल्या भागात कडांना चप (Chamfered) मारलेला आहे. अंदाजे 6 फूट लांबीवर असलेले हे खांब छतालगत असलेल्या एका मोठ्या दगडी तुळईला (Architrave) आधार देताना दिसतात. दोन तुळयांच्या मध्ये असलेल्या प्रत्येक कॉरिडॉरमधील छताला आधार देण्यासाठी चपटे दगडी वासे ( Rafters) खोदलेले आहेत.

गुंफेच्या मागच्या अंगाला असलेल्या भिंतींमध्ये 7कोठड्या खोदलेल्या आहेत. त्यातील निदान 5 कोठड्यांना तरी प्रवेशद्वारांबरोबर जाळीचे डिझाइन असलेल्या खिडक्या खोदलेल्या आहेत. प्रत्येक कोठडीचे प्रवेशद्वार व जाळीची खिडकी या दोन्हींवर मिळून घोड्याच्या नालाच्या आकाराची असलेली चैत्य गवाक्ष कमान कोरलेली आहे. अजंठा येथील या गुंफेला समकालीन असलेल्या 12 क्रमांकाच्या गुंफेप्रमाणे या गुंफेत सुद्धा बाजूंच्या भिंतीवर मुखाच्या दिशेने आणखी अशाच 2 चैत्य कमानी कोरलेल्या आहेत. यातल्या प्रत्येक (शेजारी शेजारी असलेल्या) दोन कमानींच्या मध्ये (दुसरी व तिसरी चैत्य कमान वगळून) अर्ध्या खोलीपर्यंत (Half depth) खोदलेला एक अष्टकोनी स्तंभ व त्याच्यावर बास रिलिफ पद्धतीने कोरलेला एक कॅपिटल (Capital) हे कोरलेले आहेत. घंटेच्या आकाराचे असलेले हे कॅपिटल, खूप प्रमाणातील कोरीव कामाने सजवलेले आहेत. मात्र कोरीव कामाची खोली (Depth) ही कॅपिटलच्या एकूण रूंदीच्या मानाने खूपच कमी आहे. (कोरीव काम पृष्ठभागावर अगदी वरवर कोरलेले आहे.) काही कॅपिट्ल्स् वरचे कोरीव काम खूपच बारकाईने केलेले आहे.”

बर्जेस यांनी केलेल्या या अचूक वर्णनाप्रमाणे, या विहारातील अंतर्गत वास्तूरचना ही या गुंफेला समकालीन असलेल्या अजंठ्याच्या 12 क्रमांकाच्या गुंफेसारखीच जवळपास आहे. कोठड्यांच्या द्वारावरील चैत्य कमानी सुद्धा तशाच आहेत. फरक आहे तो कमानींच्या मध्ये असणारे स्तंभ आणि स्तंभांवरील बास रिलिफ पद्धतीने कोरलेले कॅपिटल्स यांचा! अजंठा गुंफेत कमानींमध्ये काहीच कोरीवकाम केलेले नाही व भिंती तशाच ठेवलेल्या आहेत. मी या भिंतीला समांतर चालत जातो. घंटेच्या आकाराची असलेली ही कॅपिटल्स फुले,पाने,पक्षी आणि प्राणी यांचा वापर केलेल्या अगदी बारीक नक्षीने सजवलेली आहेत. प्रत्येक कॅपिटल वरील डिझाइन निराळे आहे.

मात्र आश्चर्यचकित करणारी खरी गोष्ट निराळीच आहे. कोरलेले प्रत्येक कॅपिटल व छत यांच्यामधल्या मोकळ्या जागेत प्राण्यांची एक जोडी कोरलेली आहे. अगदी डाव्या भिंतीलगत असलेल्या कॅपिटल्च्या वरची प्राण्यांची जोडी कसली आहे ते मला आधी समजत नाही. जरा बारकाईने बघितल्यावर लक्षात येते की छत आणि कॅपिटल यांच्या मधल्या जागेत बसलेले दोन प्राणी, ग्रीक पुराणांतील स्फिंक्स आहेत. यातील उजव्या हाताचा स्फिंक्स बरोबर एखाद्या सिंहाच्या पोजमधेच बसलेला दाखवलेला आहे. या स्फिंक्सने आपला पुढचा डावा पंजा उचलेला असून त्याला दोन पंखही दाखवलेले आहेत. मात्र डाव्या हाताचा स्फिंक्स मोठ्या विचित्र पोजमध्ये आहे. एखादे उताणे पडलेले लहान मूल दिसेल तसा काहीसा हा स्फिंक्स दिसतो आहे. बहुदा पहिला स्फिंक्स कोरल्यावर डाव्या बाजूला भिंत येत असल्याने पूर्ण स्फिंक्स कोरण्यास जागा राहिलेली नसावी त्यामुळे शिल्पकाराने हा मार्ग स्वीकारलेला असावा. दोन्ही स्फिंक्सना अर्थातच मानवी शिरे आहेत. हे स्फिंक्स दैवी अंशाचे असल्याने परत त्यांचे कान खूप मोठे दाखवलेले आहेत,डोळे मोठे व बट्बटीत आणि कानात लोंबणारी कर्णफुले आहेत. या दोन्ही स्फिंक्सची केशभूषा बघताना मला परत एकदा या शिल्पकारावरील ग्रीक प्रभाव जाणवतो आहे. या दोन्ही स्फिंक्सच्या मस्तकावर, ग्रीक पुतळ्यांवर दाखवतात तसेच कुरळे छोटे केस दाखवलेले आहेत.

उरलेल्या सहा कॅपिटल्सवर लांडगे, बकरे, हत्ती, घोडे आणि सिंह यांच्या बसलेल्या जोड्या कोरलेल्या आहेत. मात्र या सर्व प्राण्यांना पंख दाखवलेले आहेत. बर्जेसच्या म्हणण्याप्रमाणे या प्रकारचे पंखधारी प्राणी, सांची येथील स्तूपाची तोरणे सोडली तर बाकी कोठेही समकालीन शिल्पकलेत सापडत नाहीत. (कदाचि भाजे येथील गुंफेत असू शकतात असे मला वाटते.) पितळखोर्‍याची ही गुंफा त्यामुळेच अद्वितिय अशी मानली जाते.

अगदी उजवीकडे असलेल्या कोठडीच्या दारावर मोर्य किंवा अशोकाच्या कालात रूढ असलेल्या अक्षरांत लिहिलेला ब्राम्हीमधील एक शिलालेख आहे. प्राकृतातील हा शिलालेख असा आहे.

“राजवेजास वछिपुतास ‌ (मा) गिलासा दुहुतु दत्ताय दानम"

बर्जेसने याचे भाषांतर असे केलेले आहे.

“ Gift of Data, daughter of the Royal Physician Magila, the son of Vachhi”

या शिलालेखाचा थेट संदर्भ त्या वेळच्या सातवाहन राज्यकर्त्यांशी लावता येतो. हा शिलालेख सांगतो आहे की (आजचे पैठण किंवा त्या वेळचे प्रतिष्ठान येथे राज्य करणार्‍या राजाच्या) वछिपुत्र मागिला या राजवैद्याच्या दत्ता या कन्येने हा विहार बनवण्यासाठी देणगी दिलेली आहे.

विहारातील मागच्या व बाजूच्या भिंतीमधील कोठड्यांचे भग्नावशेष बघून मी पुढच्या व्हरांड्यात येतो. येथे आणखी आवर्जून बघावे अशी एक गोष्ट आहे. या विहारासाठी स्वतंत्र पाणी पुरवठ्याची सोय केलेली होती. विहाराच्या छतावरच्या खडकात लांब भुयारे खोदलेली होती. खडकामधूनखाली झिरपणारे पाणी या भुयारात जमा करून ते खडकातच खोदलेल्या एका उभ्या भुयारातून गुंफेच्या प्रवेशद्वाराजवळ आणलेले होते. गुंफेचा मुखाजवळचा भाग कोसळल्यानंतर या उभ्या भुयाराचा भाग उघडा पडला व हे सर्व पाणी गुंफेच्या छतामध्ये असलेल्या एक मोठ्या छिद्रातून विहाराच्या तळावर पडते आहे. हे पाणी पडून विहाराची आणखी नासधूस होऊ नये म्हणून पुरातत्त्व विभागाने एक मोठे प्लॅस्टिक पात्र या उघड्या भुयाराखाली ठेवलेले आहे व त्याला एक नळ जोडून हे पाणी खाली नदीत सोडलेले आहे.

गुंफा क्रमांक 5 मधून मी परत बाहेर येतो आणि गुहेच्या मुखाजवळचा व छताजवळचा संपूर्ण भाग कोसळून समोर खच पडलेल्या शेकडो दगड धोंड्यावर काही कोरीवकाम असल्यास ते शोधण्याचा प्रयत्न सुरू करतो.

क्रमश:

10ऑगस्ट 2012

या लेखासोबत जोडलेली छायाचित्रे पाहण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.

(वरील दुव्यावरून छायाचित्रे ह्या लेखात टाकण्यात आली आहेत. स्लाइडशो बघण्यासाठी कुठल्याही चित्रावर क्लिक करा. -- व्यवस्थापन)

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम्

अतिशय माहितीपूर्ण लेख.

पंखधारी बैल, पंखधारी घोडे भाजेलेणीतही कोरलेले आहेत.

पुतळा आता तेथे नाही परंतु हा पुतळा नाग राजाचा असला पाहिजे हे पुतळ्याच्या पार्श्वभूमीला असलेल्या 3फणाधारी नागाच्या बास रिलिफ शिल्पावरून लक्षात येते आहे

नाशिकच्या पांडवलेणीतील नहपानविहाराच्या एका हाती मुसळ आणि दुसर्‍या हातात जंबिया असलेली आणि मस्तकी नागाचा फडा धारण् केलेली द्वाररक्षक यक्षमूर्ती कोरलेली आहे. पितळखोर्‍याची मूर्ती साधारण अशीच असावी.

नाग् राजा मूर्ती

धन्यवाद् भटक्या

नाशिक मूर्तीच्या मागे 5 फणाधारी नाग आहे तर पितळखोर्‍यात 3 फणाधारी. पितळखोर्‍यातील मूर्ती बसलेली असावी असे खाणखुणांवरून वाटते. नाशिक मूर्ती निदान 200 वर्षे तरी नंतरची असावी. परंतु दोन्ही मूर्तीत साम्य असणारच आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे पितळखोर्‍याला समकालीन असलेल्या अजंठा मधे या कालातील जी चित्रे सापडलेली आहेत त्यात नाग राजा म्हणून सातवाहन राजांचे चित्रण केले आहे असे मानले जाते.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सुरेख

आणखी एक वाचनीय भाग.

यक्ष हे उत्तर दिशेचे रक्षण करतात असे ऐकले आहे. या यक्षमूर्ती कोणत्या दिशेकडे तोंड करून आहेत त्याबद्दल काही माहिती मिळेल का?

ग्रीकांकडून त्यांच्या संस्कृतीतील शिल्पे घेतली तर त्यांच्या भाषेतील शब्द का नाही घेतले असा नेहमी प्रश्न पडतो मला पण उत्तर मिळत नाही.

द्वारपाल यक्ष

द्वारपाल यक्ष, गुंफा उत्तराभिमुखी असल्याने अर्थातच उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत. तेंव्हा प्रियालीताई म्हणतात ते योग्यच असावे. कदाचित भारतीयांनी काही ग्रीक शब्द घेतलेही असतील त्या काळी! मिनॅंडर राजा जसा मिलिंद झाला तसे कालांतराने त्या शब्दांचे भारतीयीकरण झाल्याने आपल्याला त्या शब्दांचे मूळ जाणवत नसावे. अर्थात मला या बाबतीत काहीच ज्ञान नाही हे मी मान्य करतो. हा आपला एक ढगात गोळीबार इतकेच!
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

+१

प्रियाली

आणखी एक वाचनीय भाग.

+१

ग्रीकांकडून त्यांच्या संस्कृतीतील शिल्पे घेतली तर त्यांच्या भाषेतील शब्द का नाही घेतले
नको. आता पुन्हा नको. हा प्रतिसाद पु ना school of thoughts ना उचकावण्यासाठी लिहिलाय का? बरे चालले आहे ते बघवत नाही का? असो.
माझ्या माहितीत पितळखोर्‍याला खूप चांगली झाडे होती. त्याचा रस इथले लोक वापरायचे लांब गुंडाळी बनवायला. हे बघून "त्यांनी" ती झाडे तिकडे नेली. तिथे त्याचे नाव "पेत्तीयोरस" (पितळखोर्‍याहून् आणलेली झाडे) असे ठेवले. गमग त्याचा अपभ्रंश होत "पेपीरस/पपायरस" नामक झाड बनले. पेपीरस मधूनच पुढे "पेपर"/कागद निघाला.
तस्मात हा शोध ग्रीस देशात राहणार्‍या आर्यांनी पितळखोर्‍यातल्या आर्यंकडून इजिप्शिअन आर्यांमर्फत नेला.

समजलें?

--मनोबा

फार फार आवडली

ही मालिका फार आवडली आहे. वर्णनाची शैली तिथला परिसर जिवंत करते. मालिका अत्यंत माहितीपूर्ण आहे हे वेगळे सांगायला नकोच. पुढील भागाची वाट पाहतो आहे.

चित्रांसहित लेख

चंद्रशेखर यांचा चित्रांसहित लेख सुरेख दिसतो आहे.

द्वारपाल यक्ष, गुंफा उत्तराभिमुखी असल्याने अर्थातच उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत. तेंव्हा प्रियालीताई म्हणतात ते योग्यच असावे.

मागे कोणीतरी म्हणाले होते की कुबेर हा उत्तर दिशेचा स्वामी आहे त्यामुळे उत्तरेकडील घराचे दार धनसंपत्ती देते आणि यक्ष त्याची राखण करतात. :-) त्यावरून आठवले.

 
^ वर