संतप्त भारतीयांची महासत्ता - तुम्हाला हवीय?

Do we really want a superpower India populated by angry Indians? ( http://economictimes.indiatimes.com/opinion/comments-analysis/do-we-real...) हा लेख नुकताचा वाचनात आला. गेल्या काही वर्षांत घडणार्‍या व्यथित/त्रस्त/दु:खी/उद्वीग्न करणार्‍या अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर विचार करण्यास प्रवृत्त करणारा हा लेख आहे.

या लेखाच्या संबधाने पुढील प्रश्न पडले.

१. भारत खरेच एका व्यापक सामाजिक उद्रेकाच्या उंबरठ्यावर उभा आहे का?
२. लेखकाने दिलेली कारणे तुम्हाला पटतात का? त्याशिवायही काही कारणे असू शकतील असे तुम्हाला वाटते का?

३. अश्या उद्रेकाचे परिणाम आणि त्यातून निष्पन्न होणारे जे काही असेल ते काय असू शकेल?
४. (ऑप्शनल) तुम्हाला व्यक्तिगत आयुष्यात 'फेलो इंडियन्स'च्या रागाचा त्रास सहन करावा लागला आहे का?

ता. क. :
१. हा चर्चा प्रस्ताव "आभाळ पडले पळा पळा"-छाप नाही, त्यामुळे पुरेश्या गांभीर्याने चर्चा व्हावी अशी नम्र अपेक्षा आहे.
२. होकार/नकाराबरोबर त्याचे विश्लेषण दिल्यास फारच चांगले.

Comments

उतार्‍यावरील प्रश्नांची उत्तरे

१. भारत खरेच एका व्यापक सामाजिक उद्रेकाच्या उंबरठ्यावर उभा आहे का?
याचे उत्तर देता येण्याइतका विदा नसल्याने ठोस उत्तर देता येणार नाही, फारतर फार माझे मत/ढोबळ अंदाज देऊ शकतो - जो अर्थातच योग्य तो विदा मिळाल्यास बदलु शकतो. चर्चाप्रस्तावकाने किंवा अन्य कोणही योग्य तो विदा सादर केल्यास मत बदलण्यास तयार आहे. शिवाय माझे मत मध्यमवर्गीयांपर्यंतच सिमीत आहे.

माझ्यामते नाही. माझ्यामते सध्या दिसणारा त्रास-असंतोष हा 'लिविंगरूम' उद्रेक आहे. दिवाणखान्यात बसून (प्रसांगी तावातावाने) चर्चा करण्यापलिकडे प्रत्यक्षात असा असंतोष असल्याचे मध्यमवर्गीयांमध्ये तरी दिसत नाही. सध्या मध्यमवर्गीयांना लेखात उल्लेख केलेल्या गोष्टींनी त्रास होत असला तरी त्यांची कामे गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत जलद होत आहेत. विविध सरकारी सेवा ऑलनाईल उपलब्ध झाल्याने उलट योग्य त्या ठिकाणी आपली मागणी करून सेवा पदरात पाडल्या आहेत. आरटीआय नंतर मध्यमवर्गाने त्याचा केलेला उपयोग स्पृहणीय आहेच शिवाय आपली कामे करण्याचा राजमार्ग उपलब्ध असल्याने उद्रेक संभवत नाही. तेव्हा असा असंतोष असला - नव्हे आहेच- तरी तो उद्रेक होण्याइतपत तीव्र नाही असे मत आहे

२. लेखकाने दिलेली कारणे तुम्हाला पटतात का? त्याशिवायही काही कारणे असू शकतील असे तुम्हाला वाटते का?

नाही वरील प्रश्नात का तो उहापोह केला आहे

३. अश्या उद्रेकाचे परिणाम आणि त्यातून निष्पन्न होणारे जे काही असेल ते काय असू शकेल?

गैरलागु

४. (ऑप्शनल) तुम्हाला व्यक्तिगत आयुष्यात 'फेलो इंडियन्स'च्या रागाचा त्रास सहन करावा लागला आहे का?

ऑप्शनल ठेवल्याबद्दल आभार :प्

======

बाकी महासत्ता कोणास म्हणावे याचे ठोस निकष नसल्याने कोणत्याही देशास महासत्ता का, कसे व कधी म्हणावे हा वेगळा मुद्दा आहे. परंतु सदर प्रस्तावात अवांतर ठरेल म्हणून सोडून देतो

------------------
ऋषिकेश
------------------

मध्यमवर्गापुरते मर्यादित नाही

मत दिल्याबद्दल धन्यवाद. सदर लेखात उपस्थित केलेले मुद्दे मध्यमवर्गापुरते मर्यादित नाहीत. उलट लेखात दिलेली उदाहरणे; मानेसरच्या मारूतीच्या कारखान्यातील प्रकरण, आसाम, कर्नाटकातील महिलांच्या विनयभंग, खून, बलात्कार, लूट/दरोडे; पाहता मध्यमवर्गापेक्षा निम्नमध्यमवर्गात असंतोष वाढतो आहे असे लेखकाला सुचवायचे असावे. (मी चर्चाप्रस्तावात चुकून थेट दुसर्‍या पानाचा दुवा दिला होता, तुम्ही पहिले पान वाचले का?)

असंतोषाशिवाय लेखकाने 'असहिष्णुतेचा' मुद्दा उपस्थित केला आहे. 'भावना दुखावल्या'च्या माध्यमातून हा असंतोष बाहेर पडतो आहे. निमित्त जेम्स लेनचे पुस्तक, वाघ्या कुत्र्याचे स्मारक, अफजलखानाच्या वधाचे पोस्टर, मुर्तीची/पुतळ्याची विटंबना काहीही असू शकते हे आपण आपल्या प्रगत/पुरोगामी महाराष्ट्रातच पाहिले आहे. यात मध्यमवर्गाची तशी थेट भूमिका नाही.

लेखकाने श्रीमंत वर्गाच्या; कायद्याच्या वर असण्याच्या; बदलत्या मानसिकतेविषयीही टिप्पणी केली आहे. या मानसिकतेबरोबर न्यायव्यवस्थेतील दिरंगाई, माध्यमांचा वाढता प्रभाव यातून उघड उघड दिसणारा भेदभाव असंतोषाचे कारण होऊ पाहत आहे असे लेखकाचे म्हणणे आहे असे वाटते.

मत पास!

निम्नमध्यमवर्गीयांशी संबंध बर्‍याच प्रकारे येत असला तरी त्यांच्या मानसिकतेबद्दल मी लिहिणे योग्य होणार नाही. ज्याचे सुख्/दु:ख त्यालाच माहित.
त्यामुळे त्यांच्य्याबद्दलचे मत पास!

बाकी असहिष्णुता मात्र सर्वत्र अगदी मराठी आंतरजालावरही दिसते. ;) त्यास देशाचे बंधन नसावे

------------------
ऋषिकेश
------------------

दुसर्‍या पानाचा दुवा

चर्चा प्रस्तावात दिलेला दुवा चुकून दुसर्‍या पानाचा आहे. योग्य दुवा असा आहे.

रागावलेले की घाबरलेले?

चर्चा प्रस्तावात दिलेला दुवा चुकून दुसर्‍या पानाचा आहे.

काल लेख वाचला तेव्हा गोंधळ उडाला होता त्याचे कारण आत्ता समजले. :-)

भारतातले लोक रागावलेले आहेत की घाबरलेले आहेत? माझ्यामते दोन्ही आहेत. बायकांनी असे करू नये, तसे करू नये वगैरे विधाने रागापोटी येण्यापेक्षा भीतीपोटी आलेली असतात. वंशद्वेश, सामाजिक आणि आर्थिक विषमता यांत रागासह भीतीही असते.

आत्ताच रांचीमध्ये "मुलींनी जीन्स घालून फिरू नये, अन्यथा जाळून मारू" अशी धमकी दिली गेल्याचे वाचले. याला चक्क खोडसाळपणा म्हणून पोलिसांनी लेबल लावल्याचे दिसते. "येथे मुलींनी जीन्स घालू नये" असे असते तर एकवेळ खोडसाळपणा म्हणता आले असते पण "जाळून मारू" हे खोडसाळपणा म्हणून सोडून द्यावे असे का बरे वाटते?

तूर्तास, एवढेच. सध्या लेख वाचते आहे. नंतर सविस्तर प्रतिसाद देईन.

घाबरलेलेही आहेत

घाबरलेले'ही' आहेत हे म्ह्णणे बरोबर असावे. पण ही भीती केवळ स्वतःच्या किंवा स्वतःच्या जवळच्या व्यक्तींच्या, व्यक्तिगत मालमत्तेच्या संबधातच असते असे वाटते. तुम्ही दिलेल्या उदाहरणात आपल्या मुलींना, बहिणींना, नातलगांना काही अपाय होऊ नये म्हणून त्यांनी असे करू नये (उदा. जीन्स घालणे, रात्री उशीरा फिरणे वगैरे) असे काही जणांना वाटू शकते. पण त्या परीघाबहेरील बायका मुलींविषयी तितकीच संवेदनशीलता असेल असे नाही, किंबहुना नसतेच असे म्हणायला वाव आहे. याउलट आपल्या परीघातील स्त्रियांचा रक्षक असणारे इतर स्त्रियांच्या बाबतीत उघड वा चोरून भक्षक बनण्याची उदाहरणे अनेक आहेत. उदा. दिल्ली, गुडगांव इथे वारंवार होणार्‍या बलात्काराच्या घटनांतील आरोपी हे नोकरदार, सुशिक्षित, सभ्य कुटुंबातील असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असाममध्ये झालेल्या विनयभंगाच्या घटनेतील आरोपीही सोशल नेटवर्किंग साइट्स वर वेळ घालवण्याइतपत सुशिक्षित, सधन होते. हे जे शोषणाचे प्रकार होतात ते रागातून (इतरांना मिळणारी गोष्ट मला का मिळत नाही, उदा. शरीरसुख, पैसा) होतात असे वाटते.

घाबरलेले का म्हणते....

आपल्या आप्तांविषयी संवेदनशील आहेत म्हणून घाबरलेले आहेत हे ठीकच आहे पण एकंदरीत घाबरलेले आहेत असे म्हणते कारण आपल्या हातातील सत्ता जाते आहे, आपल्या हातून काहीतरी निसटून जाते आहे, संस्कृती आणि धर्म यांना धोका पोहोचतो आहे अशा बिनबुडाच्या कल्पनांमधून विशेषतः बायकांना लक्ष्य केले जाते.

पण तुम्ही म्हणता

हे जे शोषणाचे प्रकार होतात ते रागातून (इतरांना मिळणारी गोष्ट मला का मिळत नाही, उदा. शरीरसुख, पैसा) होतात असे वाटते.

हे ही योग्यच आहे

संतप्त समुह म्हणा समाज नाही

१. भारत खरेच एका व्यापक सामाजिक उद्रेकाच्या उंबरठ्यावर उभा आहे का?
नाही, भारतीयांमध्ये जर असा सामाजिक उद्रेक होत असता तर आज भारत बराच वेगळा असता.

२. लेखकाने दिलेली कारणे तुम्हाला पटतात का? त्याशिवायही काही कारणे असू शकतील असे तुम्हाला वाटते का?
५०-५०. भारतातली कारणे एकदम स्टँडर्ड आहेत आणि असतात. ती कशी हाताळायची हे सरकारला चांगले माहित आहे.

३. अश्या उद्रेकाचे परिणाम आणि त्यातून निष्पन्न होणारे जे काही असेल ते काय असू शकेल?
बरेच काही. भारताचे जात्याधारीत, भाषाधारीत, विभाजन इत्यादी. अथवा एखादा समुह सगळ्याला कंटाळून हळूहळू स्थलांतरीत होईल, धर्मांतर करेल आणि उरलेला भरडेल.

४. (ऑप्शनल) तुम्हाला व्यक्तिगत आयुष्यात 'फेलो इंडियन्स'च्या रागाचा त्रास सहन करावा लागला आहे का?
प्रश्न कळला नाही. समजुन सांगाल का?

आता माझी काही मते:
भारतात सामूहिक उद्रेक नेहमीच होत असतात. सामाजिक नाही. भारत वेगवेगळ्या समुहात विभागलेला आहे. एकिकडे आपण विविधतेत एकता वगैरे मानतो, पण प्रत्येकाला आपापली विविधता मुळापासून जपायची आहे. त्याचा अभिमान नाही तर अहंकार सुद्धा जपायचा आहे. काही समूह असे आहेत ज्यांना राजाश्रय आहे. त्यांच्या भावना लगेच दुखावतात अथवा सरकार लगेच त्यांच्या मदतीला धावते. निवडणुकांचे राजकारण एका पक्षाला एवढे चांगले कळते ती सगळे समूह कधीच एक होऊन उद्रेक होणार नाही याची ते पुरेपुर काळजी घेतात. हा त्या पक्षाच्या नेत्यांच्या एका शब्दावरुन लगेच भावनोद्रेक होतो, एरवी मात्र ते आणि त्यांचे सुभेदार मुग गिळुन गप्प बसणे म्हणजे काय याचे योग्य उदाहरण देता येईल इतके गप्प असतात.
भारतात सामाजिक क्रांती वगैरे होणार नाही. वर्गांचाच विचार केला, तर उच्चवर्गीय आपल्याला हवे ते करतात, गरज पडल्यास विकसित देशांमध्ये स्थायिक होण्याची कुवत त्यांच्याकडे आहे. त्यांना समाज काय करतो हे फारसे पडलेले नसते. मध्यमवर्गाला काहीच सुचत नाही. त्यांना एकतर कोणीतरी क्रांती करावी मग आम्ही जाऊ मागुन झेंडे घेऊन हा विचार असतो. गरिब वर्गाला रोजीरोटीची काळजी असते, त्यामुळे त्यांचे खोबरे तिकडे चांगभले असते. त्यामुळे समाज म्हणजे नक्की कोण हा प्रश्नच आहे. बाकी हे प्रसंग म्हणाल तर मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये सुनील दत्त ज्या प्रकारे सांगतो चोराला तसा प्रकार आहे. राग बाहेर पडतो काही कारणाने. एवढेच.






बरोबर आहे

"संतप्त समूह" असे तुम्ही म्हटले आहे ते बरोबरच आहे. समाज म्हणून जे काही आहे ते अश्या समूंहांनीच बनलेले आहे. या समूहांच्या गरजा, समस्या, आकांक्षा, संवेदनशीलता एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत. पुन्हा आर्थिक, धार्मिक, प्रादेशिक, जातीय, वैचारिक अश्या वेगवेगळ्या आधारावर हे समूह बनत असल्याने आपल्या समाजाची रचना आणि त्याची गतिमानता (डायनॅमिक्स) अतिशय क्लिष्ट आहे. सदर लेखकाचा रोख या समूहांच्या बदलत्या मानसिकतेवर आहे असे वाटते. भारतात असे समूह कित्येक वर्षांपासून आहेत पण त्यांची संवेदनशीलता, असंतोष वाढतो आहे असे लेखकाला म्हणायचे आहे असे वाटते.

सामाजिक उद्रेकाबद्दल म्हणाल तर बहुतेक 'सामाजिक उद्रेक' हे समूहांचेच उद्रेक असतात. काही अपवाद वगळता जसे की परकी सत्ता, अमानवी राज्यकर्ते; अनेक समूहांनी एकत्र उद्रेक केल्याची उदाहरणे नाहीत. उलट एका समूहाने उद्रेक केल्याची उदाहरणे प्रामुख्याने आर्थिक, सामाजिक, राजनैतिक विषमतेतून, बरीच आहेत. भारताच्या संदर्भात "आहे रे" समूह कोणत्याही उद्रेकात सामील होईल असे वाटत नाही असे तुम्ही म्हटले आहे ते बरोबरच आहे.

मुख्य म्हणजे

मुख्य म्हणजे प्रत्येक समुहाला एक समाज बनायचे नाही. सामजिक उद्रेक म्हणाल तर भारतात तो फक्त एकदाच होऊ शकतो जेंव्हा पाकिस्तान हल्ला करेल. मला नाही वाटत बाकी कोणाला समाजात काही रस आहे. खोलवर विचार केल्यास आत्ताचा भारत हा स्वातंत्र्या पुर्वीच्या विस्कटलेल्या भारता सारखाच आहे. फक्त त्यावेळचे संस्थानिक जाऊन आज नवे आले आहेत ज्यांनी आपली बस्ताने बसवली आहेत. जसे की पवार संस्थान, गांधी संस्थान, देशमुख संस्थान, शिंदे संस्थान, कदम संस्थान. मुख्य गांधी संस्थानाचे लाचार असे असलेले सगळे मांडलिक. जनतेचे जनतेने जनतेसाठी चालवलेले राज्य हे पुस्तकात आहे.

 
^ वर