एका साम्राज्याच्या शोधात: पितळखोरे गुंफा भाग 2

आधी उल्लेख केल्याप्रमाणे, पितळखोरे दरीत एकूण 14 गुंफा आहेत. अजंठा गुंफांच्या मानाने हा आकडा बराच लहान आहे. त्याचप्रमाणे या गुंफांचा शोध सुद्धा अजंठा गुंफांच्या नंतरच म्हणजे 1853 च्या सुमारास लागलेला आहे. मी आता माझ्या सर्वात उजव्या बाजूस असलेल्या 1 क्रमांकाच्या गुंफेसमोर उभा आहे. माझ्या डाव्या हाताला समोरच्याच कातळकड्यावर खोदलेल्या आणखी 8गुंफा लांबवर पसरत गेलेल्या मला दिसत आहेत. माझ्या मागे असलेल्या खोल दरीच्या पलीकडच्या अंगाला 10ते 14 क्रमांकच्या आणखी 4 गुंफा आहेत.

माझ्या समोर असलेल्या 1ते9क्रमांकांच्या गुंफांची मुखे उत्तरेकडे आहेत आणि मागे असलेल्या बाकीच्या अर्थातच दक्षिणाभिमुख आहेत. चैत्यगृह असलेली माझ्या समोरची 3 क्रमांकाची गुंफा सोडली तर माझ्या समोरच्या बाजूच्या किंवा उत्तराभिमुख सर्व गुंफा या बौद्ध विहार आहेत. तर नदीच्या दुसर्‍या बाजूस असलेल्या सर्व गुंफा या चैत्यगृहे आहेत व यापैकी 11क्रमांकाच्या चैत्यगृहात, उपासना केले जाणारे (Votive) स्तूप आहेत.

दुर्दैवाने आजमितीला, पितळखोरे येथे असलेल्या सर्व गुंफा मोडतोड झालेल्या व भग्नावस्थेत असलेल्या अशा आहेत. असे जरी असले, तरी जे काय थोडे फार उरले आहे ते बघितल्यावर या गुंफा मूळ अवस्थेत किती भव्य व दिमाखदार दिसत असतील याची सहजपणे कल्पना करता येते. क्रमांक 2 ते 4 या गुंफांच्या समोरचे सामाईक प्रांगण पाषाणामध्ये खोदलेले असले तरी एकाच पातळीवर असल्याने, या गुंफा समान कालावधीतच खोदल्या गेल्या असल्या पाहिजेत याची सहज कल्पना करता येते. पुरातत्त्व विभागाने बांधलेला लोखंडी पूल पार केल्यावर मी, खालच्या उतारापासून 3 ते 5 फूट एवढ्या उंचीवर असलेल्या, याच प्रांगणात थेट येऊन पोहोचलो आहे. माझ्या अगदी समोर, भिख्खूंच्या मोडक्यातोडक्या अवस्थेत असलेल्या कोठड्या, तळाला असलेला, एक तुटलेला कडा दिसतो आहे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे ही गुंफा क्रमांक 1 होती. याच्या उजव्या बाजूला गुंफा क्रमांक 2 आहे. ही गुंफा म्हणजे सुद्धा अगदी साध्या स्वरूपात असलेला बौद्ध भिख्खूंचा एक विहार आहे. या विहाराच्या अगदी आतल्या अंगाला, भिख्खूंच्या कोठड्यांची काही द्वारे दिसत आहेत. या विहार गुंफेचा तल हा समोरच्या प्रांगणाच्या पातळीपेक्षा निदान 2ते 3 फूट तरी उंचीवर आहे. व या गुंफातलावर चढून जाण्यासाठी पाषाणातच दोन पायर्‍या खोदलेल्या आहेत. गुंफा तल आणि समोरचे प्रांगण यांच्या सीमारेषेवर गुंफातलापासून 1 फूटभर तरी वर येणारी व कठड्याचे कार्य करणारी अशी एक भिंत कोरलेली दिसते. या भिंतीच्या बाह्य पृष्ठभागावर उभे खांब व आडवे रेलिंग यांचे डिझाइन कोरलेले दिसते आहे. पितळखोरे येथे असलेल्या एकूण विहारांची संख्या बघता येथे बर्‍याच मोठ्या संख्येने बौध भिख्खू वस्तीस असले पाहिजेत याची सहज कल्पना करता येते.

3 क्रमांकाची व चैत्यगृह असलेली गुंफा ही दरीच्या या बाजूला असलेल्या गुंफांमध्ये सर्वात महत्त्वाची गुंफा होती. त्यामुळे या चैत्यगृहापासून सुरूवात करावयाचे मी ठरवतो. बौद्धधर्मातील हीनयान पंथाच्या अनुयायांसाठी खोदलेल्या या चैत्यगृहाच्या आतील रचना त्या कालातील वास्तूशास्त्रानुसार व कार्ले येथील चैत्यगृहाप्रमाणेच एकूण दिसते आहे. मात्र हे चैत्यगृह कार्ल्यापेक्षा बरेच लहान आणि बरेच आधी निर्माण झालेले असल्याने तेथे दिसणार्‍या कोरीवकामासारखे काहीच कोरीवकाम न केलेले, असे दिसते आहे. मात्र अजंठा येथील 9 किंवा 10 क्रमांकाची चैत्यगृहे व हे चैत्यगृह यात विलक्षण साम्य दिसते आहे. अर्थात अजंठा येथील या दोन्ही गुंफा याच कालखंडात खोदलेल्या आहेत व कार्ले येथील चैत्यगृह निदान 100ते 200 वर्षे नंतर खोदलेले आहे ही गोष्टही लक्षात घेणे गरजेचे आहे. 1880 मध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या पुस्तकात, जेम्स बर्जेस या चैत्यगृहाचे वर्णन करताना लिहितो की,

“ तेथील पाषाणाचा चुरा झाल्याने, मुखाचा संपूर्ण भाग नष्ट झालेले हे चैत्यगृह 34 ½ रूंद व 50फूट तरी खोल आहे. त्याच्या वक्र छताच्या सर्वात ऊंची असलेल्या जागी या चैत्यगृहाची ऊंची 30 ½ फूट आहे. या प्रार्थनागृहाच्या मध्यवर्ती भागाची रूंदी 20फूट 8 इंच आहे व 14 फूट उंच असलेल्या 25 अष्टकोनी खांबांनी हा मध्यवर्ती भाग बाजूच्या पॅसेजेस पासून अलग केला गेला आहे. 11खांब शाबूत स्थितीत आहेत व इतर 14खांबांचे तुकडे पडलेले दिसू शकतात. खांबाच्या वरील छताला लाकडी वक्राकार तुळया बसवलेल्या होत्या. आता फक्त त्या बसवण्यासाठी केली गेलेली पाषाणातील चौकोनी छिद्रे फक्त जागेवर आहेत. बाजूच्या पॅसेजेस वर अजंठ्यातील 10 क्रमांकाच्या गुहेप्रमाणेच, वक्राकार दगडी तुळया खोदलेल्या आहेत. मूळ गुंफा खोदताना, काम चालू झाल्यानंतर, कामगारांना एका ठिकाणी 4-1/2 फूट जाडीचा एक जरासा मृदू असलेला पाषाणाचा स्तर लागलेला असावा. या स्तरामुळे त्यांच्या कामात बर्‍याच अडचणी निर्माण झाल्याने, स्तूपाच्या जवळपास असलेल्या 20खांबांचा तळाचा भाग त्यांना अधिक मोठा व मजबूत करावा लागला असला पाहिजे. याच कारणासाठी या स्तरामधे बाजूच्या पॅसेजेसचा जो भाग आला तेथे दगडाच्या 6 ते 8 इंच जाड फरशा टाइल्स सारख्या बसवल्या गेल्या होत्या. या सर्व फरशा आता पडून गेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे स्तूपाचा सर्वच भाग या मृदू पाषाण स्तरामध्ये आल्यामुळे तोही पूर्णपणे पडून गेला आहे आणि आता फक्त स्तूपाचा तळाचा भाग शिल्लक उरला आहे. संपूर्ण चैत्यगृह हे बुद्धाचे चेहरे व निरनिराळ्या मुद्रांमधील बुद्ध रूपे यांच्या चित्रांनी रंगवलेले होते. मात्र या सर्व चित्रात बुद्धाच्या शिरावर तिहेरी छत्री रंगवलेली दिसते आहे. अजंठ्यामधील 10 क्रमांकाच्या व पितळखोर्‍यातील चैत्यगृहाच्या खोदण्याचा कालावधी एकच असल्याने हे सर्व चित्रण बर्‍याच नंतरच्या कालात केलेले असणार आहे हे उघड आहे. हे चैत्यगृह व अजंठा येथील 10क्रमांकाचे चैत्यगृह या दोन्हींच्या बांधणीत अतिशय साम्य आहे.”

हा अहवाल सुमारे 130वर्षांपूर्वी लिहिलेला आहे हे लक्षात घेता, मला आणखी पडझडीच्या खाणाखुणा समोर दिसत आहेत. पुरातत्त्व विभागाने पडलेल्या सर्व खांबांच्या जागी छताला आधार देण्यासाठी दगडी बांधकाम केलेले चौकोनी खांब उभारलेले दिसत आहेत. परंतु काही मूळ खांब अजूनही दिसू शकत आहेत. मूळ खांबांवर काढलेली चित्रे अधिक जीर्ण झालेली असली त्यांचे मूळ सौंदर्य अजूनही मनात ठसल्याशिवाय रहात नाही. दोन खांबांच्यावर, इ.स. पूर्व दुसर्‍या शतकातील अक्षर वळणांत, खोदलेले ब्राम्ही लिपीमधील शिलालेख आहेत. सातवाहन राजांची राजधानी असलेल्या प्रतिष्ठान (पैठण) या गावामधील दोन धनिकांनी हे खांब खोदण्यासाठी दिलेल्या देणगीचा या शिलालेखांत उल्लेख आहे. खांबांवरील चित्रात अनेक रंगांची वस्त्रे परिधान केलेल्या बुद्धाचे चित्रण आहे. त्यात लाल, गुलाबी व नील वस्त्रे परिधान केलेल्या बुद्धाची चित्रे विशेष खुलून दिसत आहेत. बाजूच्या पॅसेजेसच्या भिंतीवर अनेक बुद्ध मुखे रंगवलेली आहेत. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण प्रकारचे शिरस्त्राण परिधान केलेल्या व बुद्धाकडे बघत असलेल्या एका मुलीचे (किंवा मुलाचे) सुंदर चित्र कालौघात टिकून राहिले आहे. या चैत्यगृहात असलेल्या सर्व चित्रात हे छोटे चित्र माझ्या मताने तरी सर्वात सुंदर आहे. पितळखोरे मठाच्या गुंफा मूळ कधीतरी इ.स. पूर्व दुसर्‍या शतकात खोदल्या गेलेल्या आहेत. म्हणजेच सिमुक, कृष्ण किंवा श्री सातकर्णी यापैकी कोणत्या तरी राजांच्या कारकिर्दींमध्ये या खोदलेल्या आहेत असे म्हणता येते. या नंतरच्या काही शतकांनंतर, पितळखोरे मठातील बौद्ध भिख्खूंचे वास्तव्य, काही अज्ञात कारणास्तव संपुष्टात आल्यासारखे दिसते. वाकटक राजांच्या कारकिर्दीत, म्हणजेच 5व्या शतकाच्या आसपास या मठात परत एकदा राबता सुरू झाला असावा. चैत्यगृहातील सर्व चित्रे या काळात रंगवलेली आहेत. मात्र या गुंफांतील मूळ शिल्पे आणि कोरीव काम हे मात्र सातवाहन राजांच्या कालातील असल्याने त्या काळातील लोक आणि जनजीवन यांच्यावर या शिल्पांच्यातून काही प्रकाश पडू शकेल अशी आशा मला वाटते आहे. चैत्यगृहात फिरताना बर्जेस यांचा 1880 साली लिहिलेला अहवाल किती अचूकपणे लिहिलेला आहे याची जाणीव मला होते आहे.

चैत्यगृह बघून झाल्यामुळे मी परत समोरच्या प्रांगणात येतो आहे. तिथे मला मॉन्सूनच्या पावसापासून या लेण्यांतील शिल्पे व कोरीवकाम हे अधिक नष्ट होता त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून त्यावर ताडपत्री पसरून घेण्यासाठी आलेले पुरातत्त्व विभागाचे अधिकारी नशिबाने भेटतात. त्यांच्याशी चर्चा करत असताना मला प्रांगणापासून खाली जमिनीवर जाण्यासाठी असलेल्या 8 किंवा 10 पायर्‍या दिसतात. मुळात असे दोन पायर्‍यांचे जिने येथे होते. परंतु त्यातील एक जिना आता संपूर्णपणे नष्ट झालेला दिसतो आहे. पायर्‍या उतरून खाली जमिनीवर आल्यावर पुरातत्त्व विभागाचा अधिकारी या जिन्याच्या त्रिकोणी आकाराच्या बाजूंकडे माझे लक्ष वेधून घेतो. या त्रिकोणी दगडी पृष्ठभागावर काही बास रिलिफ शिल्पे कोरलेली मला दिसत आहेत. जरा लक्षपूर्वक त्या शिल्पांकडे बघितल्यावर, माझ्या अपेक्षेप्रमाणे, पितळखोरे गुंफा, अनेक लपलेली आश्चर्ये मला आज दर्शवणार आहे याची एक चुणूक मला मिळते आहे. या जिन्याच्या दोन्ही त्रिकोणी बाजूंपैकी प्रत्येक बाजूवर कमी होत जाणार्‍या उंचीची तीन शिल्पे कोरलेली आहेत. यापैकी सर्वात मोठे शिल्प हे दोन्ही हात उंचावून विकट हास्य करणार्‍या यक्षाचे आहे. हा यक्ष हात उंचावून जिन्याला आधार देतो आहे असे दर्शवतो आहे. या यक्षाच्या कानाच्या पाळ्या हतीसारख्या विशाल दाखवलेल्या आहेत व त्याची नाभी मोठ्या लंबगोल आकाराची आहे. या यक्षाच्या शेजारी कोरलेली या यक्षाचीच आणखी एक छोटी आवृत्ती आपला हात उंचावून जिन्याला आधार देते आहे. या छोट्या यक्षाच्या शेजारी व त्रिकोणाच्या अगदी कोपर्‍यात कोरलेले चित्र बघून मात्र मी आश्चर्याने थक्क होतो आहे. ग्रीक पुराणांच्यात वर्णन केलेल्या व पंख असलेल्या पेगॅसस या घोड्याचे शिल्प येथे कोरलेले आहे. इ.स. पूर्व दुसर्‍या शतकात किंवा बावीसशे वर्षांपूर्वी कोणत्या तरी दूरवरच्या जंगलातील कडेकपारीत खोदलेल्या या बौद्ध मठामध्ये, ग्रीक पुराणातील एक काल्पनिक प्राणी कोरलेला सापडावा हे माझ्या दृष्टीने खरोखरच अद्भुत किंवा कल्पनाशक्तीच्या पलीकडचे आहे. अलेक्झांडरच्या भारतातील स्वारी नंतरच्या एका शतकानंतरही भारतात ग्रीक प्रभाव कसा टिकून कसा राहिला होता याचे हे एक मोठे प्रभावी उदाहरण आहे. पितळखोरे मठ, त्या वेळी भारताच्या वायव्येला असलेल्या ग्रीक किंवा यवन प्रभावाशी काही ना काहीतरी स्वरूपात संबंधित होता हे यावरून स्पष्टपणे दिसते आहे.

पितळखोरे गुंफांमध्ये सापडलेला एक मोठ्या आकाराचा यक्ष पुतळा, दिल्लीमधील राष्ट्रीय संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवलेला आहे. परंतु कोरलेली मूळ स्वरूपातील बास रिलिफ यक्ष शिल्पे अशी पितळखोर्‍याला बघता येतील, असे मला स्वप्नात सुद्धा कधी वाटले नसते आणि म्हणूनच येथे मला खूपच आनंद वाटतो आहे हे सत्य आहे. मागे मी उल्लेख केलेल्या महामयूरी या बौद्ध इतिहास सांगणार्‍या ग्रंथात " पितंगालया येथील सांकरी यक्ष" असा एक उल्लेख सापडतो. कोणी सांगावे! या ग्रंथात वर्णन केलेला यक्ष, दिल्ली संग्रहालयातील, पूर्णपणे कोरलेला, स्वतंत्रपणे उभा राहू शकणारा, व मोठ्या आकाराचा असा यक्ष पुतळा आहे की जिन्याच्या बाजूंना कोरलेल्या छोट्या बास रिलिफ यक्ष शिल्पांचे ते वर्णन आहे.
नवी दिली येथील राष्ट्रीय संग्रहालयात प्रदर्शित केलेला पितळखोरे येथील यक्षाचा पुतळा मात्र खचितच मनावर जास्त छाप उमटवणारा वाटतो. आपल्या डोक्यावर ठेवलेले पात्र सांभाळण्यासाठी या यक्षाचे दोन्ही हात वर केलेले दाखवलेले आहेत.परंतु डाव्या हाताचा पुढचा भाग मोडलेला असल्याने वरच्या पात्राला फक्त उजव्या हाताने आधार दिलेला सध्या दिसतो. यक्षाचे पोट खूप मोठे दाखवलेले आहे व त्यावर एखाद्या शंकरपाळ्याच्या आकाअराची मोठी व खोल अशी नाभी दाखवलेली आहे. हात पाय जाड-जाड आणि मांसल व एकूण आकार बुटका असे या शिल्पाचे स्वरूप आहे. चेहरा गोल आणि मोठा दाखवलेला आहे. डोळे मोठे, बटबटीत व बाहेर आलेले, लहान नाक व फेंदारलेल्या नाकपुड्या, मोठे कान आणि जाड ओठ अशी चेहेरेपट्टी आहे. त्याला कसला तरी खूप आनंद झाला असल्याने तो खदाखदा हसतो आहे. डोक्यावर त्याने अनेक कडी ठेवलेली आहेत. कदाचित वरच्या पात्राला आधार देण्यासाठी ही असावीत. त्याच्या शरीराचा वरचा भाग अनावृत्त आहे व त्यावर दोन मानवी शिरे अडकवलेली माला त्याच्या गळात दिसते आहे. याशिवाय कर्णकुंडले, दंडावर पोची, मनगटावर कडी हे अलंकारही त्याच्या अंगावर दिसत आहेत. कमरेवर नाभी प्रदेशाच्या खाली नेसलेले धोतर जागेवर रहावे म्हणून त्याने कंबरेभोवती एक कडे अडकवलेले आहे व धोतराची या कड्याला गाठ मारलेली दिसते आहे.

इतिहासाच्या दृष्टीने या यक्षमूर्तीच्या उजव्या तळहाताच्या मागील बाजूस कोरलेला शिलालेख मला सर्वात महत्त्वाचा वाटतो. मोर्य किंवा सम्राट अशोककाली जी ब्राम्ही अक्षरे वापरात होती तीच अक्षरे येथे कोरलेली असल्याने हा यक्ष व हा जेथे सापडला त्या पितळखोर्‍यातील गुंफा हे सर्व इ;स; पूर्व दुसर्‍या किंवा तिसर्‍या शतकातील आहेत हे निर्विवाद्पणे सिद्ध होते. या शिलालेखामधील मजकूर असा आहे.

पात्रवाहक यक्ष
कान्हादासेन हिरनकरेन काता
बर्जेस याने याचा अनुवाद असा केलेला आहे.

Pot carrier Yaksha
sculpted by Krishnadasa goldsmith

या शिलालेखामुळे दोन महत्त्वाच्या गोष्टी प्रकाशात येतात असे मला वाटते. एकतर हे पाषाण शिल्प एका सुवर्णकाराने कोरलेले आहे. आणि कृष्णदास हे त्याचे नाव! या नावावरून प्रथम एकतर कृष्ण ही व्यक्ती त्या वेळेपर्यंत दैवी समजली जाऊ लागली होती याचे हे नाव द्योतक आहे व हे हिंदू नाव धारण करणार्‍या व्यक्तीने एका बौद्ध मठासाठी हे शिल्प कोरलेले आहे.
जरा जड पावलांनीच, हे सर्व यक्ष आणि पेगॅसस यांचा निरोप घेऊन, मी आता डाव्या बाजूसच असलेल्या 4 क्रमांकाच्या गुंफेकडे वळतो आहे.

क्रमश:

6ऑगस्ट2012

या लेखासोबत जोडलेली छायाचित्रे बघण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.

लेखनविषय: दुवे:

Comments

हाही भाग छान....

यक्ष
सुरेख . सुम्दर. माहितीपूर्ण. अभ्यसनीय. हे आणि इतकेच.
.
आता अवांतराचा भडिमार :-
बर्‍याच मोठ्या संख्येने बौध भिख्खू वस्तीस असले पाहिजेत याची सहज कल्पना करता येते.

हे भिख्खू एक्झॅक्टली काय करायचे सतत एकत्रित जमून? पुरोहित कसे नेहमीच एकत्र जमलेले नसत. ते लोकांची लग्ने लावून देत, समरंभ्, य्ज्ञ करीत.
तसे हे भिक्खू मोठ्या संख्येने येउन् नक्की काय करायचे?
हे संन्यस्त्, भ्टाके नसायचे का? स्थिर होते का?

दोन खांबांच्यावर, इ.स. पूर्व दुसर्‍या शतकातील अक्षर वळणांत, खोदलेले ब्राम्ही लिपीमधील शिलालेख आहेत.
ब्राम्ही वाचलीत? कमाल आहे. आश्चर्य आहे.

सातवाहन राजांची राजधानी असलेल्या प्रतिष्ठान (पैठण) या गावामधील दोन धनिकांनी हे खांब खोदण्यासाठी दिलेल्या देणगीचा या शिलालेखांत उल्लेख आहे.
ह्जा जागतिक phenomena आहे, वैश्विक सवय आहे. राज्धानीच्या ठिकाणचे श्रेष्ठी सत्तेशी चांगले जुळवून घ्यायला असे काम करत, मर्जीत रहात. मध्यपूर्वेत अकराशे वर्षांपूर्वी कित्येक मशीदी स्वतः खलिफानं बांधलेल्या नाहीत. त्याला इंप्रेस करायला विविध व्यापरार्‍यांनी धनिक खलाशी समूहांच्या प्रमुखांनी देणग्या देउ देउ त्या बांधल्या.

त्यात लाल, गुलाबी व नील वस्त्रे परिधान केलेल्या बुद्धाची चित्रे विशेष खुलून दिसत आहेत

रंग् अजून् टिकलेत? मसतच् आहे. पण् त्यांना काही काचेचे आवरण् वगैरे होते का? काहीतरी संरक्षक असे हवे ना.
मी ऐकलय् की निळा, जांभळा हा रंग तिथे वापरायला आणत ते थेट त्या काळाच्या पर्शिया मधून्(आजचा इराण, पश्चिमोत्तर अफगाणिस्तान, आणि मध्य आशियाच्या पठाराचा त्यालगतचा बहग(उझबेकिस्तान , ताजिकिस्तान वगैरे.))

पितळखोरे मठाच्या गुंफा मूळ कधीतरी इ.स. पूर्व दुसर्‍या शतकात खोदल्या गेलेल्या आहेत.
बाब्बो. बौद्ध् गुंफा आहेत् ना? पण म्हणजेच अशोक् मृत्यू पावला इ स् पू २३२ मध्ये. त्याच्या नंतर त्याच्या बौद्ध मिशनर्‍यांनी प्रचार सुरु ठेवला असं मानलं तरी तिथून पुढं निदान दोन् अडीच शतकं त्या धर्माचं भक्कम अधिष्ठान् प्रस्थापित् व्हायला लागली असवीत असं वाटत होतं. पण हे फारच झपाट्याने झालेलं दिसतय.

यापैकी सर्वात मोठे शिल्प हे दोन्ही हात उंचावून विकट हास्य करणार्‍या यक्षाचे आहे
यक्ष ना. विकटहास्यच करणार. स्मितहास्य नाही. यक्ष, गंधर्व, किन्नर ह्या आपल्याकडे demi God योनी मानल्या जातात. त्यामुळे वरवर पाहिले तर हे सगळेच "देव" किंवा "सज्जन/चांगलेच" असतील असं वाटातं. पण ते तसं नाही. यक्ष भयंकर वगैरेही असू शकतात. यक्षिणी रात्रीच्या वेळी बाहेर पडून लहान बाळांना खातात अशा आख्यायिका अहेत.
त्या काळात तरी यक्ष हे भयंकरही मानले जायचे.

हात पाय जाड-जाड आणि मांसल व एकूण आकार बुटका असे या शिल्पाचे स्वरूप आहे. चेहरा गोल आणि मोठा दाखवलेला आहे. डोळे मोठे, बटबटीत व बाहेर आलेले, लहान नाक व फेंदारलेल्या नाकपुड्या, मोठे कान आणि जाड ओठ अशी चेहेरेपट्टी आहे.

तर्क देणार होतो ह्याबद्दल. वरच्या माहितीच्या आधारवर. पण उगाच वंशवादी म्हणून टिका व्हायची. त्यामुळे पास.

या नावावरून प्रथम एकतर कृष्ण ही व्यक्ती त्या वेळेपर्यंत दैवी समजली जाऊ लागली होती याचे हे नाव द्योतक आहे
कृष्ण हे नाव काही उपनिषदांतही येतं (प्रक्षिप्तही मानलं जात नाही. ऑथेंटिक व्हर्जनमध्ये आहे.). किम्वा अजून काही महाभारत पूर्व मानल्या जाणार्‍य वाङ्मयातही येतं. जैनांकडेही एक कृष्ण् आहे. जैनांचे ग्रंथ इसवीसनाच्या बरेच आधीचे असावेत.
(पार्श्वनाथ् वगैरेंचा काळ् लक्षात घेतला तर.)व्यापारी हिंदू होता, हे नक्की का?
बादवे, कृष्णदास, छबिलदास, करमचंद अशी नावे तेव्हापासूनच धनिक व्यापारी वापरायचे असं दिसतय. भारतीय समाज चौकट्, उतरंड तेव्हापासून् कसली घट्टपणे टिकली आहे.
कमाल् आहे. त्या अजून् एका लेखाच्या शिलालेखातही असाच उल्लेख् दिसला.

जातक कथांत कित्येकदा राम - कृष्ण ह्यांचे उल्लेख येतात म्हणे. ते बुद्धाचे पूर्वावतार होते अशी त्यांची मान्यता/समजूत आहे. खरे खोटे ठाउक नाही.
कृष्ण् हे नाव त्या काळात त्यामुळं जैन् व् बौद्धांतही प्रचलित असू शकेल ना.

--मनोबा
माझ्या उपक्रमावरच्या अतिदर्शनाला इतरांप्रमाणेच मीही कंटाळलोय. दोन चार दिवस(च) विश्रांती घेतो आता. अजून कुठल्या धाग्यांवर आता डोकावत नाही.

नेग्रॉइड वंशाचे

हात पाय जाड-जाड आणि मांसल व एकूण आकार बुटका असे या शिल्पाचे स्वरूप आहे. चेहरा गोल आणि मोठा दाखवलेला आहे. डोळे मोठे, बटबटीत व बाहेर आलेले, लहान नाक व फेंदारलेल्या नाकपुड्या, मोठे कान आणि जाड ओठ अशी चेहेरेपट्टी आहे.

तर्क देणार होतो ह्याबद्दल. वरच्या माहितीच्या आधारवर. पण उगाच वंशवादी म्हणून टिका व्हायची. त्यामुळे पास.

नेग्रॉइड वंशाचे लोक असाच तर्क ना. तसे लोक आजही भारतात आहेत आणि तेव्हाही होते. त्यात वंशवादी म्हणण्यासारखे काय आहे. लिहावं की बिनधास्त!

यक्ष

यक्षाचा पुतळा मला तरी निग्रॉइड वंशाचा वाटला नाही. यक्ष आणि अप्सरा या दोन आकृती बौद्ध चित्रकलेत अगदी आजमितीला काढलेल्या सुद्धा आढळतात (उदा. कर्नाटकातील दोन्ही बौद्ध मठ) त्या कोठून आल्या हा संशोधनाचा विषय आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अवांतर

1.मनोबांच्या अवांतरातील मुद्यांचा मला शक्य तेवढा खुलासा खाली देतो आहे.
सध्या कर्नाटक मध्ये दोन बौद्ध मठ तिबेटी स्थलांतरितांसाठी म्हणून चालवले जातात. या प्रत्येक मठात हजार ते पंधराशे भिख्खू सहज रहात आहेत. प्तयेक भिख्खू हा काही सर्वसंगत्याग केलेला मुनी नसतो. त्यात अध्ययन करणारे विद्यार्थी असतात. थोड्या कालासाठी या पंथाला आलेले काही असतात.

2.थोडी ब्राम्ही मूळाक्षरे मला वाचता येतात.परंतु त्याची आवश्यकता नाही. पुरातत्त्व विभागाच्या पूर्वीच्या गोर्‍या साहेबांनी हे काम आधीच करून ठेवलेले आहे.

3.हे रंग खनिजांपासून केलेले असल्याने टिकू शकले आहेत. निळा रंग 4 थ्या शतकापासून पुढे वापरला जाऊ लागला. Lapis lazuli या पासून हा रंग बनवला जात असे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

वाहवा! मजा आली

सुंदर लेख, मस्तच! वाचताना मजा आली. चित्रे तर सुरेखच.

नावावरून प्रथम एकतर कृष्ण ही व्यक्ती त्या वेळेपर्यंत दैवी समजली जाऊ लागली होती याचे हे नाव द्योतक आहे व हे हिंदू नाव धारण करणार्‍या व्यक्तीने एका बौद्ध मठासाठी हे शिल्प कोरलेले आहे.

असे काय करता? आपण इथेच उपक्रमावर पूर्वी चर्चा केली नाही का की कृष्ण अलेक्झांडरच्या काळातच दैवत्वाला पोहोचला होता असे. :-) तेव्हा तुमचा तर्क बरोबरच आहे.

बौद्धांनी स्तूप बांधायची कला ग्रीकांकडून घेतली. पूर्वीच्या स्तुपांना खांब नव्हते. खांबांवर इमारत उभी करणे हे ग्रीक स्थापत्य. मूर्तीकला हे देखील ग्रीकांकडून घेतलेले. बौद्ध स्तुपांवर हळूहळू संस्करण कसे होत गेले त्याचे एक चित्र येथे बघा. तरीही, तो एकटा पेगॅसस तेथे काय करत असावा याचे आश्चर्य वाटते. रोचक आहे खरेच.

खांब तोलून धरणारे यक्ष प्रसिद्ध आहेतच. हे शिल्प त्यातीलच एक वाटते पण गंमत म्हणजे एक गोष्ट ध्यानात आली. पौर्वात्य संस्कृतींमध्ये "लाफिंग बुद्धा" म्हणून बोचके बांधून नेणारा एक ढेरपोट्या नजरेस पडतो. तो गोतम बुद्ध नाही असे सांगितले जाते. त्यांचा या यक्षांशी दूरगामी संबंध असावा. चू. भू. दे. घे.

Picture taken from http://net4.ccs.neu.edu

लाफिंग बुद्ध

यक्ष आणि लाफिंग बुद्ध यांचा काहीतरी संबंध असावा असे मलाही वाटले होते. परंतु लाफिंग बुद्धाच्या चेहर्‍यावरील हास्य नेहमीच फ्रेन्डली दाखवले जाते तर यक्षाचे हास्य विकट असते.मनोबा म्हणतात तसे यक्ष हे व्हिलन कॅटेगोरी मधे कदाचित मोडणारे असू शकतात. बौद्ध साहित्याचा कोणी अभ्यासक यावर प्रकाश कदाचित टाकू शकेल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

गणपती

दुष्ट देवतांचे सुष्ट देवतांमध्ये रुपांतर अलमोस्ट सर्व संस्कृतींमध्ये होत असते. यक्ष रुपाचे लाफिंग बुद्ध हे रुपांतर होणे अशक्य नाही. त्या चित्रातून काय दर्शवायचे आहे हे महत्त्वाचे ठरते. आपल्याकडे "गणपती" हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. दुष्टांचे रुपांतर सुष्टांत झाले की त्यांच्या चेहर्‍यावरचे भीतीदायक भाव जाऊन प्रसन्न मुद्रा यायचीच. शेवटी ही सर्व शिल्पकाराची आणि त्याच्या भावनांची किमया आहे.

उत्तम

उत्तम व माहितीपूर्ण लिखाण.

इथल्या चैत्यगृहाच्या स्तूपाच्या पाठीमागील दगडी खांब अगदी जवळजवळ दिसत आहेत. सहसा इतके दाटीवाटीने असलेले खांब फारसे पाहाण्यात येत नाहीत.

या यक्षाच्या शेजारी कोरलेली या यक्षाचीच आणखी एक छोटी आवृत्ती आपला हात उंचावून जिन्याला आधार देते आहे

भारवाहक यक्षांचे एक आगळेवेगळे शिल्प नाशिकच्या पांडवलेणीतल्या क्र. ३ च्या देवीलेणी येथे आहे. जणू काही ही लेणीरूपी पालखी यक्ष आपल्या खांद्यावर वाहात आहेत. पालखीचे दांडे त्यांनी आपल्या खांद्यावर धारण केले आहेत.

ग्रीक पुराणांच्यात वर्णन केलेल्या व पंख असलेल्या पेगॅसस या घोड्याचे शिल्प येथे कोरलेले आहे.

ग्रीक शिल्पांचा प्रभाव महाराष्ट्रातील बर्‍याच लेण्यांमध्ये दिसतो. व्यापाराबरोबरच संस्कृतीच्या आदानप्रदानाचा हाही एक पुरावाच.

भाजे लेणीतही पेगॅसस आणि सेंटोर ही शिल्पे कोरलेली आहेत तर् नाशिक लेण्यांमध्ये स्फिन्क्स, ग्रिफीन्, नेमियन लायन आणि अथेनाची शिल्पे कोरलेली आढळतात.

भाजेलेणीतील हे पेगॅससचे शिल्प बघा.

ह्या शिल्पाच्या समोरच भाजेतील सर्वात महत्वाचे सूर्यगुंफेचे शिल्प आहे.

 
^ वर