सीरियात चाललेली उलथापालथ

सीरियात चाललेली उलथापालथ
लेखकः सुधीर काळे

सीरियात सध्या चालू असलेल्या उठावाबद्दल चर्चा करण्याआधी आपल्याला सीरियाचा (सीरियन अरब प्रजसत्ताक) थोडा परिचय करून घ्यायला हवा. कारण त्याशिवाय परिस्थितीचे नीट आकलन होणार नाहीं. या देशाचे भूगोलातील स्थान मध्यपूर्वेत आहे व ते नकाशा क्र. १ मध्ये दिलेले आहे. या देशाच्या उत्तरेला तुर्कस्तान असून पश्चिमेला लेबॅनॉन आणि भूमध्यसागर आहे. दक्षिणेला जॉर्डन व इराक असून पूर्वेलाही इराक आहे. या देशाची सीमा कुठेही इराणशी जोडलेली नसली तरी इराकमधून हे देश जोडलेले आहेत.

नकाशा क्र. १

सीरियाची लोकसंख्या सव्वादोन कोटी आहे व त्यात ७४ टक्के जनता सुन्नी मुस्लिम (जास्त करून अरबी वंशाचे सुन्नी पण त्यात कुर्ड, सिर्काशियन आणि तुर्कमानी लोकही येतात) असून १२ टक्के अरब वंशाचे अलावाईत आणि शिया आहेत. उरलेल्यांत १० टक्के ख्रिश्चन आहेत (त्यात अरब, अस्सिरियन आणि आर्मेनियन वंशाचे लोक येतात) आणि ३ टक्के ड्रूझ (यांनाही शियापंथीय मानले जाते) आहेत. म्हणजेच ८७ टक्के सीरियन लोक मुस्लिम असून जास्त करून अरब वंशाचे आहेत.

भूतपूर्व संरक्षणमंत्री ’मुस्ताफा तलास’[१] माजी राष्ट्राध्यक्ष हाफिज अल अस्साद (सध्याच्या अध्यक्षांचे वडील) यांच्याशी त्यांचे भावासारखे संबंध होते. सीरिया आणि इजिप्त ही राष्ट्रे १९५८ ते १९६१ च्या दरम्यान अब्दुल गमाल नासर यांच्या प्रेरणेतून "संयुक्त अरब प्रजासत्ताक" या नावाने एक झाली होती त्यावेळी हाफिज अल अस्साद आणि मुस्ताफा तलास हे दोघेही लष्करात होते आणि त्यांनी सत्ताधारी बाथ पक्षातर्फे कैरो येथून या प्रजासत्ताकाबाबतची आपली जबाबदारी उचलली होती. पण हा प्रयोग फसल्यावर ही दोन राष्ट्रे पुन्हा वेगळी झाली आणि ते दोघे परत सीरियाला परतले आणि त्यांनी एकत्र काम करून १९६३ साली बाथ पक्षाला सत्तेवर आणण्याची मोठी कामगिरी बजावली. १९६०च्या दशकात नेहमीच घडणार्या "राज्यक्रांती, ऊठसूठ नेतृत्वपालट आणि प्रति-राज्यक्रांती"च्या आवर्तनांना यशस्वीपणे तोंड देत सत्ता अबाधितपणे "बाथ" पक्षाकडेच राखली.

तलास यांच्या खंबीर पाठिंब्याच्या बळावर हाफीज यांनी रक्तपात होऊ न देता यशस्वी राज्यक्रांती घडविली आणि तलास यांना १९७० साली संरक्षणमंत्र्याचे पद देऊ केले. तलास कुटुंबियांच्या व्यापक लष्करी आणि व्यावसायिक संबंधांच्या सहाय्याने सुन्नी-अलावी[२] यांच्यामधील सत्तेच्या सर्वोच्च पातळीवरील एकोपा आतापर्यंत अनेक दशके टिकून राहिलेला आहे. म्हणूनच २००० साली हाफीज अल अस्साद मृत्यू पावल्यानंतर तलास यांच्या पितृसदृश छायेखाली त्यावेळी राजकारणात अगदीच नवखे असलेले सध्याचे राष्ट्रपती बशार अल अस्साद नव्याने मिळालेल्या सत्तेवर आपली पकड दृढ करू शकले.

पण गेल्या आठवड्यात ब्रिगेडियर तलास यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशीर अल् अस्साद यांची साथ सोडली आणि ते बंडखोरांना जाऊन मिळाले. ही घटना अस्साद यांच्या राजवटीला कलाटणी देणारी घटना ठरण्याची शक्यता आहे. अस्साद यांच्या अल्पसंख्यांक ’अल्वाईट’ राजवटीला याच कुटुंबामुळे सुन्नी मुसलमानांकडून खंदा पाठिंबा मिळत आलेला आहे हे वर सांगितले आहेच.

नातेवाईकांच्या किंवा जातीवर आधारलेल्या राजकारणात रक्ताच्या नात्यांनाच शेवटी महत्व येते. सध्या सरकारविरोधी उठावात रस्त्यावर सांडले जाणारे रक्त आहे सुन्नी मुसलमानांचे. त्यामुळे एव्हाना तलास कुटुंबियांवर सुन्नींची बाजू घेण्यासाठी प्रचंड दबाव येऊ लागला असावा. याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे या शिया पंथाला जवळ असणार्या ’अलावी गटाच्या सत्ताधार्यां ना समर्थन देण्याची जी किंमत भविष्यकाळात मोजावी लागेल ती तेंव्हां मोजण्याऐवजी आता आपण आपले समर्थन मागे घेण्याची वेळ आताच आलेली आहे असा हिशेब तलास कुटुंबियांनी केलेला असावा! या निर्णयामागचे नक्की कारण स्पष्ट झालेले नाहीं. ते कांहींही असो, पण गेली कित्येक दशकें अस्साद कुटुंबाबरोबरचा आपला करार संपवायचा निर्णय तलास कुटुबियांनी घेतल्यामुळे लष्करातील आणि व्यवसायक्षेत्रातील इतर उच्चभ्रू कुटुंबियांवरही असाच निर्णय घेण्याबद्दलची मागणी आता जोर धरू लागेल यात शंका नाहीं.

सीरियातील पेचप्रसंगाबाबत एका चाणाक्ष, डोळस निरीक्षकाने एक स्पष्टीकरण दिलेले आहे ते पटण्यासारखे आहे. त्यांच्या मते अस्साद याच्या राजवटीला एका वितळणार्या बर्फाच्या लादीची उपमा देता येईल. त्याच्या केंद्रस्थानी आहे अलवाईत गोटाकडील सत्ता. या राजवटीला अलवाईत व इतर अल्पसंख्यांकानी एकाद्या पदार्थाला तो टिकावा म्हणून जसे रेफ्रिजरेटर/शीतपेटीत घालून ठेवतात तसे ठेवले आहे. कारण या अल्पसंख्यांकांना बहुसंख्य असलेल्या सुन्नी पंथाच्या राजवटीची भीती वाटते. अद्याप लष्कराच्या हुकुमतीवर आणि नियंत्रणक्षमतेवर खंड पडण्याइतक्या थरावर लष्करातील अधिकार्यांीत आणि सैनिकांत फाटाफूट झालेली नाहीं व या गटात अद्याप तरी एकजूट आहे असे दिसते. पण या केंद्रस्थानाला टिकवून धरून त्यातून राज्याचा रथ हाकण्यासाठी लागणारे सुन्नी समर्थनाचे जाळे हळू-हळू वितळू लागलेले आहे. जसजसा या केंद्रस्थानी असलेल्या बर्फाच्या लादीतला भाग विरळू लागेल तसतसा ती लादी नाजूक होत जाईल आणि केंद्रापर्यंत पोचणारे तडे उघड होत जातील. असे झाल्यास अस्साद राजवट अंतर्गत बंडाळीमुळेच कोसळेल.

सीरियात शेवटी सुन्नी राजवटच येईल?
अस्साद राजवटीला अद्याप तडे गेलेले दिसत नाहींत. पण सीरियावर सुन्नी पंथियांच्या लोकांची राजवट आल्यास प्रादेशिक स्तरावर होणार्या परिणामांकडे जरासे अलिप्तपणे आणि गंभीरपणे पहाणे आवश्यक आहे हे नक्की. खास करून असे झाल्यास इराणच्या या भागातील पकडीवर काय परिणाम होतील याचा अभ्यास करणे जरूरीचे आहे.

सीरियावर कुणाला सहजासहजी प्रभुत्व मिळविता येईल काय हे सर्वप्रथम पहायला हवे! वर्षभर या बंडाळीवर सार्या जगाचे लक्ष का वेधले गेले आहे? केवळ मानवाधिकारांची पायमल्ली हे स्पष्टीकरण पुरेसे नाहीं. गेल्या दशकात इराकमधील सुन्नी राजवटीला उखडून टाकण्यात आणि युफ्रेटीस आणि टायग्रीस या दोन नद्यामधील ’मेसोपोटेमिया’ भागात शिया राजवट आणण्यात इराणला यश मिळाले आहे (नकाशा क्र. २ पहा). आज इराकमध्ये भले एकीचा अभाव असो व तो कितीही भग्न अवस्थेत असो, पण आज तो इराणच्या प्रभावक्षेत्राखाली येतो आणि सद्दामच्या काळात इराकमध्ये निरंकुश सत्ता भोगलेली सुन्नी प्रजा आज पार फडतूस झालेली आहे! इराकमधील इराणच्या यशाने या भागातील सत्तेचा समतोल इराणच्या बाजूला झुकला आहे आणि त्यामुळे शिया पंथियांची सत्ता पश्चिम अफगाणिस्तानापासून इराण-इराक-सीरिया या मार्गाने पार भूमध्य सागरापर्यंत पसरली आहे.

नकाशा क्र. २

सत्तेच्या समतोलातील या बदलामुळे या भागाशी हितसंबंध असलेल्या राष्ट्रांवर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. अमेरिकेच्या पाठिंब्याने सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि कतार या राष्ट्रांनी एक होऊन इराणविरुद्ध युती बनविली आहे. अमेरिकेने इराकला नाइलाजास्तव इराणच्या प्रभावक्षेत्राखाली जाऊ दिले असेल पण सीरियातीतील उठावामुळे त्यांना इराणची भूमध्य सागराच्या दिशेने लेवांट भागाकडे होणारी प्रगती रोखण्याची संधी मिळाली आहे (नकाशा क्र. ३ पहा). सौदी अरेबिया शियांचा अरबस्तानातील खदखदता असंतोष काबूत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुर्कस्तान या भागात सुन्नी पंथियांचे पुनरुत्थान व्हायला मदत व्हावी म्हणून एक सुन्नी प्रतिष्ठान उभे करू इच्छित आहे. याचा परिणाम म्हणून जास्त पैसा, जास्त साधन-सामुग्री, जास्त शस्त्रें, जास्त प्रशिक्षण आणि हेरगिरीतून मिळालेली भरपूर माहिती सीरियातील बंडखोरांना गुप्त मार्गाने पोचविली चात आहे. असे केल्याने अति खर्चिक अशा प्रत्यक्ष युद्धात पडण्याची टळेल आणि अस्साद यांची राजवट अंतर्गत बंडाळीने कोसळेल अशी आशा त्यांना आहे. सैद्धांतिक दृष्ट्या हे डावपेच बरोबर वाटले तरी प्रत्यक्षात हे डावपेच वापरणे बरेच गुंतागुंतीचे काम आहे!

नकाशा क्र. ३

किचकट सत्तापालट

सीरियात सुन्नी पंथियांची सत्ता जेव्हां येईल तेंव्हां प्रचंड गोंधळ माजेल. कारण अलावी गटाची सत्ता आता दमास्कसमध्ये आणि सीरियातील इतर शहरांत चांगलीच प्रस्थापित झालेली आहे. या कांहींशा कट्टर नसलेल्या, पाखंडी समाजाने लष्कर, सुरक्षादलें, हेरगिरीविभाग अशा संस्थांतील सर्वोच्च जागांवर आपला चांगलाच प्रभाव प्रस्थापित केलेला आहे आणि या समाजाला जर सत्तेपासून वंचित केले गेले तर ही सारी कौशल्यें त्याच्याकडेच रहातील. म्हणूनच जर अलवाईत आणि इतर अल्पसंख्यांक संख्येने जरी कमी असले तरी सहजासहजी सत्तेपासून दूर करून त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या वायव्येकडील किनारपट्टीवरील डोंगराळ भागात घालवून देणे अशक्यच दिसते. (नकाशा क्र. ४ पहा).

नकाशा क्र. ४

या उलट अरबी आणि तुर्की राजवटीच्या पाठिंब्याने राज्यावर आलेल्या सुन्नी राजवटीविरुद्ध अलवाईत गट लढाऊ प्रतिकाराची मोहीम उघडू शकतो. सध्या सीरियात सत्ताधारी असलेल्या "बाथ" पक्षात अलवाईत गटाचेच निर्विवाद वर्चस्व आहे. या लोकांनी इराकमध्ये सद्दामच्या पाडावानंतर इराकी "बाथ" पक्षाचा चुटकीसरशी झालेला पाडाव आणि त्या पक्षाची त्यानंतर झालेली ससेहोलपट पाहिलेली आहे. आपला पराभव झाल्यास आपलीही अशीच गत होऊ नये म्हणून अलवाईत गट स्वत:ची सत्ता टिकविण्यासाठी नक्की "जिंकू-किंवा-मरू" धर्तीचा लढा देईल आणि या क्षेत्रातला आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी इराण अलवाईत गटाला कायम मदत करत राहील यात शंका नाहीं. त्यामुळे हे युद्ध नक्कीच लेबॅनॉनमध्येही पसरेल कारण तिथेही पंथीय झगडा चालूच आहे.

अस्साद यांच्या राजवटीच्या पाडावात बहुराष्ट्रीय जिहादी योद्धेही मोठी भूमिका बजावतील. आता सीरियात चाललेल्या बंडाळीत कट्टर सुन्नी उग्रवाद्यांचा, सलाफी उग्रवाद्यांचा अणि बहुराष्ट्रीय अल कायदा जातीच्या जिहादी योद्ध्यांचा वाढता सहभाग आहे. त्यापैकी सलाफी उग्रवादी अणि बहुराष्ट्रीय अल कायदा जातीचे जिहादी योद्धे सीरियात लेबॅनॉन, जॉर्डन आणि इराकमधून दाखल होत आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून सीरियाचे हेरखाते आपल्या परराष्ट्रीय धोरणाचा एक भाग म्हणून लेबॅनॉन आणि इराकमध्ये जिहादी योद्धे पोचविण्याच्या कामात गुंतले आहे. या उलट सौदी अरेबियासुद्धा सीरियात जिहादी योद्धे घुसविण्यासाठी हेच तंत्र वापरत आहे. बहुराष्ट्रीय जिहादी योद्ध्यांनी सीरियात आपला जम बसविल्यास ते सौदी राजवटीसाठी नवीन समस्या निर्माण करतील हे जुन्या अनुभावापासून माहीत असल्यामुळे सौदी अरेबिया असे करण्याबाबत कांहींसा उदासीन आहे. पण इराण आणि इराणच्या शिया समर्थकांबाबत सौदी अरेबियाला असलेली काळजी वरील धोक्यापेक्षा मोठी आहे. सौदी अरेबिया सीरियन राजवट आणि तिचे इराणी आणि शिया समर्थक यांच्या विरुद्धच्या (त्यांच्या मते रास्त असलेल्या) जिहादला प्रोत्साहन देत आलेला आहे हे खरेच आहे.

पण एका बाजूने जिहादी युद्धाला प्रोत्साहन देणे आणि दुसर्या बाजूने जिहादी प्रवृत्तीला आवर घालणे अशा दोन परस्परविरोधी कृती एकाच वेळी करणे सौदी राजवटीला सोपे नाहीं. धर्मवेड्या जिहादी योद्ध्यांना एकाद्या देशात घुसविणे हा भाग सोपा आहे, पण एकदा का इराण आणि शियांविरुद्धच्या सामायिक हितसंबंधांची धार बहुराष्ट्रीय जिहादी योद्ध्यांच्या कट्टर तत्वावर आधारित कार्यक्रमापुढे कमी झाली कीं त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे महाकठीण आहे.[३]

मेसोपोटेमियाच्या रणभूमीचे पुनरुत्थान?

सध्याच्या अलवाईत राजवटीचे पतन आणि सुन्नी समर्थनाने उभरणार्या नव्या राजवटीचा कांहींसा वादळी जन्म यांच्या दरम्यानच्या काळात चांगलीच अराजकता माजणार हे नक्की. दोन पंथात माजलेल्या अराजकापायी कट्टर तत्वांमुळे प्रेरित झालेल्या आणि इराक आणि सीरियात लढाया लढून कणखर झालेल्या उग्रवाद्यांची (त्यात सुन्नी राष्ट्रवादी आणि बहुराष्ट्रीय जिहादी असे दोघेही आले!) एक पिढी रणभूमीवर लढत राहील. आणि सीरियात विजय मिळाल्यानंतर इराकमध्ये धडपडत असलेल्या आपल्या मित्रसंघटनांना मदत करण्याची तयारीही हे जिहादी करतील. थोडक्यात फारसे नियंत्रण नसलेल्या जिहादींची इराकमध्ये नव्याने घुसखोरी सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

प्रादेशिक प्रभावासाठी इराणविरुद्ध चाललेली ही मोहीम सीरियात संपण्याची शक्यता कमीच आहे. सीरियात जर सुन्नी गोटाचा विजय झाला तर लेबॅनॉनमधील हिजबुल्ला आणि त्यांच्या मित्रसंघटनांच्य़ा नेतृत्वाखालील शिया पंथींच्या गोटाचे प्रभावी स्थान डळमळेल. लेवांत विभागात तुर्की, सौदी आणि कतारी राजवटींचे सुन्नींना मिळालेले समर्थन आणि अरब राजवटींत कट्टर इस्लामी प्रवृत्तीचा उदय यामुळे त्यांचे संपूर्ण लक्ष इराण आणि अरबी शियांविरुद्ध तटबंदी उभी करण्यात केंद्रित होईल.

याबाबतीत सर्वात जास्त महत्वाच्या इराकमधील युद्धाकडे लक्ष द्यायला हवे. इराकमध्ये इराणचा पाठिंबा लाभलेले शिया गटाचे सरकार सत्तेवर आलेले आहे हे इथल्या अनेक प्रादेशिक शक्तींना पसंत नाहीं आणि या प्रादेशिक शक्तींचे या भागात हितसंबंध अडकलेले आहेत. सीरियातील संघर्षामुळे उभ्या राहिलेल्या सुन्नी उग्रवादी शक्तींचीही या भागात मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू होईल. या उग्रवाद्यांना नेहमी कुठल्या तरी मोहिमेत गुंतवून ठेवायची गरज आहे अन्यथा ही उग्रवादी मंडळी घरी परतून स्वगृही नवे संघर्ष उभे करतील. सध्या शियांच्या वर्चस्वाखाली रहात असलेल्या दुबळ्या सुन्नी गटांना मदत करण्यासाठी ही मोहीम उभी केलेली आहे. सध्या इराणला इराकमधील परिस्थितीबद्दल काळजी वाटत नसेल पण सीरियामधील पराभवाचा चक्री परिणाम होऊन इराकमध्येही इराणला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागेल. असे झाल्यास पुन्हा एकदा अरबी सुन्नी गट विरुद्ध इराणी शिया गट असा संघर्ष विभागीय प्रभावासाठी पेटेल. या गोष्टी घडायला वेळ लागेल आणि अद्याप सीरियात सुन्नींना विजय मिळालेला नाहीं कारण अलवाईत गटाची सत्तेवरील पकड अद्याप ढिली झालेली दिसत नाहीं. पण दूरवरचा विचार केल्यास असे होईल.....?
------------------------------------------------------
टिपा:
[१] यांना आधुनिक तलास घराण्याचे ’कुलपुरुष’ मानले जाते.
[२] अलावी (किंवा अलावाईत) उपजातीबद्दल ’विकिपीडिया’ खालील माहिती उपलब्ध आहे. (The Alawis, also known as Alawites, Nusayris and Ansaris are a prominent mystical religious group centred in Syria who follow a branch of the Twelver school of Shia Islam.) जास्त माहिती http://en.wikipedia.org/wiki/Alawi इथे वाचा. या उपजातीच्या पुरुषांना ’अलावी’ म्हणतात तर स्त्रियांना ’अलाविया’!
[३] याबाबतीतले पाकिस्तानचे उदाहरण बोलके आहे. तिथेही भारतात आणि खास करून काश्मीरमध्ये उत्पात करण्यासाठी उभारलेल्या बहुराष्ट्रीय जिहादी तुकड्या आता भस्मासुराप्रमाणे जनकावरच उलटलेल्या आहेत!
हा लेख Stratfor या संस्थळावरील लेख आणि Wikipedia वरील माहिती यांचे संकलन आहे. दुवे आहेत (१) http://www.stratfor.com/weekly/considering-sunni-regime-syria?utm_source...
आणि (२) http://en.wikipedia.org/wiki/Syria

लेखनविषय: दुवे:

Comments

नवी माहिती

बरीच नवी माहिती मिळाली. सध्या लेख वाचते आहे. पूर्ण झाला की सविस्तर प्रतिक्रिया देईनच.

उत्तम लेख..

लेख जबरदस्त.. जकार्तावाले मध्यपूर्वेबद्दल देखील उत्तम लिहितात म्हणायचं.. :)

शिया आणि सुन्नी कॉरिडोर या दृष्टीने कधी पहिले नव्हते याकडे.. आणि अमेरिकेची भूमिका ही मस्त मांडलीय.. त्यांचा या सर्व धामधूमीमधला खरा हेतू इराकच्या गुंत्यातून बाहेर येण्याची धडपड म्हणावी की मध्यपूर्वेत अस्तिव राखण्यासाठी केलेली तडजोड हे काही स्पष्ट होत नाही पण अजून..

त्याचबरोबर असे वाटतेय की या खेळातला एक महत्त्वाचा मोहरा (प्यादा? उंट ? घोडा ?) तो म्हणजे इस्राइलच्या भूमिकेबद्दल देखील माहिती करून घ्यायला आवडेल.. शेवटी या सगळ्यांच्या धोरणांचा एक महत्त्वाचा सामायिक पदर ज्यूविरोध तर आहेच..

त्याचबरोबर असे दिसतंय की जसे अमेरिकेचे बरेच विश्लेषक याकडे अतिशय धर्म, पंथ आणि कबिला या दृष्टीतून पाहतात तसे पहिले जातेय.. म्हणजे की याचबरोबर इथली जनता बदलती आहे.. जग बदलतंय.. लोक तितकेसे फक्त कट्टर पणे यामध्ये सहभागी असतील असे नाही वाटत.. म्हणजे की मान्य आहे इथे एक कंगोरा मांडला आहे पण तो एकच निर्णायक factor होईल असे नाही वाटत..

बाकी तलास यांनी साथ सोडणे तसे आश्चर्यकारक होते.. असाद यांचे काम आणि धोरण तरी चांगले वाटत होते (आहे?).. तरी पण आता काय होईल ते पाहणे interesting असेल..

चांगला लेख

चांगला माहितीपूर्ण लेख. अलवी जमातींच्या प्रभुत्व असलेला सीरिया सेक्युलर आहे. ही अलवी मंडळी प्रीइस्लामिक आहेत असे म्हणतात. भारतासाठी असद राजवट सत्तेवर राहणे गरजेचे आहे आणि नवीन सुन्नी राजवट आली तर सीरियाचे आणि मध्यपूर्वेचे काही खरे नाही असे काहींचे म्हणणे आहे. घाईत तूर्तास एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सर्व प्रतिसाद लिहिणार्‍यांचे मनःपूर्वक आभार!

सर्व प्रतिसाद लिहिणार्‍यांचे मनःपूर्वक आभार! प्रियालीताईंच्या सविस्तर प्रतिसादाच्या प्रतीक्षेत!!
----------------
सुधीर काळे

लेख आवडला

शिया आणि सुन्नी पंथीयांच्या शीतयुद्धात इराण आतापर्यंत वेगळा दिसत असे. शिया पंथीयांची वाढलेली पकड, अमेरिकन राजकारण वगैरेंचा घेतलेला लेखाजोखा आवडला. सिरिया, लेबनॉन, जॉर्डन वगैरे देशांत अल्पसंख्येने का होईना पण ख्रिश्चन समाज राहतो. यांचा राजकारणात काही सहभाग आहे का?

इराकमध्ये शियापंथीय बहुसंख्य असूनही तिथे शियांचे शिरकाण कां?

पाकिस्तानसारख्या सुन्नी बहुसंख्य असलेल्या देशात शियांचे नियमितपणे शिरकाण होत असते हे वाचून आहे. त्यांची संख्या जास्त करून उत्तर पकिस्तानात (खैबर पख्तूनख्वा आणि पाकव्याप्त काश्मीर) आहे. बर्‍याचदा इराण शेजारी असूनही त्याविरुद्ध कधीच आवाज कसा उठवत नाहीं याचेही आश्चर्य वाटत आलेले आहे. पण इराकमध्ये शियापंथीय बहुसंख्य असूनही तिथे शियांचे नियमितपणे शिरकाण होत आहे हे पाहून ते लोकही हिंदूंसारखे mild and meek असावेत असेही वाटू लागले आहे. खरे काय ते कळायला बरेच वाचन करावे कलागेल व त्याला वेळही लागेल! या विषयाची 'तयार' माहिती कुणाकडे असल्यास वाचायला आवडेल.
----------------
सुधीर काळे

शियांचे प्रश्न

मध्यपूर्वेत राहणारे काही पाकिस्तानी शियापंथीय माझ्या ओळखीचे होते. सुन्नींपेक्षा ते मला कमी कट्टर वाटत. याचे कारण बहुधा त्यांना होणारा त्रास हा असावा. त्यांच्यापैकी बरेचजण मध्यपूर्वेत राहणे पसंत करत कारण कायदे कडक असल्याने त्यांचे संरक्षण बरे होते आणि काहीजणांनी कॅनडासारख्या देशाचे नागरिकत्व स्वीकारून आपली सोय करून ठेवली होती. त्यांच्याशी बोलताना त्यांना इराणकडून सहानुभूती दाखवल्याचे किंवा त्यांना इराणबद्दल सहानुभूती असल्याचे कधी दिसले नव्हते.

काही मुद्दे

१. एकेकाळी सुन्नी-शियांचे दंगे लखनऊ नित्यनेमाने होत असत. लखनऊत शियांची संख्या लक्षणीय आहे.

२. शिया सौम्य आणि दुर्बळ आहेत असे वाटत नाही. कट्टर वहाबी दहशतवादापुढे इराणी कट्टरपणा सौम्य आहे. शिवाय इराणला एक समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमीही आहे. पण खोमेंनीची फतवे, इराण-इराक युद्ध वगैरे बघता इराण हा सौम्य आणि दुर्बळ देश आहे असे वाटत नाही.

३. इराकच्या नजफ वगैरे भागात त्यांचे सुरवातीपासूनच प्राबल्य आहे. बगदादमधल्या सद्र सिटीसारख्या भागात शियांचाच अंमल आहे. मोहम्मद अल सादेक सद्रचे पाठीराखेही हिंसाचाराच्या बाबतीत काही कमी नाहीत. इराकमधल्या शिया लोकांना सत्तेतली भागीदारी गेल्या काही वर्षांत मिळाली आहे. हळूहळू त्यांचे वर्चस्व वाढले आहेच. पुढे आणखी वाढत जाईल.

४. सद्दामने अतिशय क्रूरपणे शियांचे दमन केले ते तो सुन्नी होता म्हणून नव्हे. कुर्दही सुन्नीच होते. मध्यपूर्वेतल्या इतर देशांप्रमाणेच इराक मध्येही कबिलेशाही होती.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कुठल्याही विरोधकाला सद्दामने जिवंत ठेवले नाहीं....

(१) सुन्नी सद्दामने आपल्या मुलीला आणि जावयालाही जिवे मारले. त्याने शिया-सुन्नी-कुर्द असा 'भेदभाव' कधीच केला नाहीं. कुठल्याही विरोधकाला त्याने जिवंत ठेवले नाहीं.
(२) इराकमध्ये शिया लोकसंख्या ६५% आहे तर इराणमध्ये ९०+%. उत्तरेला इराणला लागून असलेल्या अझरबाईजानमध्ये ८०+%. सीरियात १०-१२% शिया आहेत.
(३) मी शियांच्या इराकमधील शिरकाणांबद्दल लिहिले होते ते इराकमध्ये सध्या अल कायदातर्फे जी कत्तल होते त्याबद्दल होते. याचे उल्लेख 'न्यूक्लियर डिसेप्शन'मध्येही आहेत. या उलट शियापंथीय सुन्नींना असे मारताना दिसत नाहींत.
----------------
सुधीर काळे

बहुंताशी सहमत

माझा वरचा प्रतिसाद मी बराच घाईघाईत दिला आहे. मी तुमच्याशी बहुंताशी सहमत आहे. खाली मन ह्यांनी दिलेल्या प्रतिसादाशी अगदी सहमत आहे. एवढ्या मेहनतीने लिहिलेला हा अभ्यासपूर्ण लेख एखाद्या पेपरात यायला हवा. जास्तीत जास्त लोकांपर्यत पोचायला हवा.

अवांतर: शिया हे तर कट्टर सुन्नींच्या लेखी मुसलमानच नाहीत. शियांच्या इमामांवरील (12 इमाम) वरील अतूट श्रद्धा हे त्यामागचे सगळ्यात मोठे कारण आहे. हे 12 इमाम सर्वज्ञ आहेत, स्खलनातीत आहेत ही ती अतूट श्रद्धा आहे. ही गोष्ट कट्टर सुन्नींना फार खटकते कारण त्यांच्यामते ही केवळ सर्वशक्तिमान परमेश्वराची (अल्लाह) गुणवैशिष्ट्ये असू शकतात. आणि ह्याशिवाय बारीकसारीक गोष्टी आहेत. मुता विवाह वगैरे वगैरे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सकाळ

सकाळमध्ये आला आहे.

सलाम...

ज्या चिकाटीनं तुम्ही वाचता, लिहिता, माहिती गोळा करता, त्या जिद्दीला सलाम.
पोटापाण्याचा व्यवसाय नसतानाही व्यवस्थित डिट्टेलवार माहिती जमा करता ह्याचं कौतुक् वाटतं.

--मनोबा

पोटापाण्याचा व्यवसाय

पोटापाण्याचा व्यवसाय नसतानाही व्यवस्थित डिट्टेलवार माहिती जमा करता ह्याचं कौतुक् वाटतं.
मनोबा, गैरसमज व्हायचे हो लोकांचे. लेखन/पत्रकारिता हा काळेकाकांचा पोटापाण्याचा व्यवसाय नाही असे आणखी स्पष्ट लिहायला हवे होते. आणि ज्यांचा हा पोटापाण्याचा व्यवसाय आहे ते पोटार्थी पत्रकार एवढी चिकाटी, मेहनत वा जिद्द दाखवत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हो...

लेखन/पत्रकारिता हा काळेकाकांचा पोटापाण्याचा व्यवसाय नाही असे आणखी स्पष्ट लिहायला हवे होते.
हे बरोबर आहे.

आणि ज्यांचा हा पोटापाण्याचा व्यवसाय आहे ते पोटार्थी पत्रकार एवढी चिकाटी, मेहनत वा जिद्द दाखवत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
हे वाक्य फक्त " आणि आपल्याकडे ज्यांचा हा पोटापाण्याचा व्यवसाय आहे ते पोटार्थी पत्रकार एवढी चिकाटी, मेहनत वा जिद्द दाखवत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे." असे असेल तर अजून अचूक होइल. उदा:- तिबेट, चीन ह्याविषयीचं १९६२ च्या काळातलं प्रशासकीय सेवेतल्या संबंधित अधिकार्‍यांचं अज्ञान आणि त्याचे अफाट किस्से ऐकून चकित् झालो होतो. पत्रकार तर लांबची गोष्टा राहिली.
पाश्चात्त्य देशात त्या त्या विषयांचे तज्ञ म्हणवली जाणारी मंडळी असतात असे ऐकले आहे, आणि त्यांच्याकडाची माहितीही बर्‍यापैकी अप् टू डेट असते.
आपल्याकडे सगळे नेपाळी म्हणजे "चीनी" असतात , सगळे इशान्य भारतीय हे "नेपाळी" असतात; आणि सगळे पाकिस्तानी उर्दू/पंजाबी असतात असे बरेच ग्रह पसरलेले दिसतात.
इत्यंभूत माहिती तर दूरची गोष्ट.

--मनोबा

माझा पोटापाण्याचा व्यवसाय आहे.....पोलाद बनवणे!

धम्मकलाडूसाहेब आणि मनोबासाहेब,
धन्यवाद. पण माझी इतकी लायकी नाहीं. अजीबात ग्लॅमर नसलेला आणि फारच नीरस असा माझा पोटापाण्याचा व्यवसाय आहे.....पोलाद बनवणे (steelmaking). पण लहानपणापासून मला वाचनाचे वेड होते त्यातून लेखनाची आवड निर्माण झाली. लिहिलेले वाचकांना आवडते याचा मला आनंद वाटतो.
----------------
सुधीर काळे

इस्पात भी हम बनाते हैं

माझा पोटापाण्याचा व्यवसाय आहे.....पोलाद बनवणे (steelmaking). पण लहानपणापासून मला वाचनाचे वेड होते त्यातून लेखनाची आवड निर्माण झाली. लिहिलेले वाचकांना आवडते याचा मला आनंद वाटतो.

टाटा स्टीलची 'इस्पात भी हम बनाते हैं' (वी ओल्सो मेक स्टील) ही ट्यागलाइन आठवली.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर