एका साम्राज्याच्या शोधात कार्ले गुंफा भाग 4

सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याच्या 24 वर्षाच्या राज्यकालानंतर इ.स.110 मध्ये त्याचा पुत्र वशिष्ठीपुत्र पुळुमावी हा सातवाहनांच्या गादीवर आला. पुळुमावीने 28 वर्षे राज्य केले. इ.स. 115ते 125 या कालखंडात राज्यावर असलेल्या उज्जैन येथील क्षत्रप राजा चष्टन याचा तो समकालीन होता. उत्तरेकडील पर्थियन सम्राटाने चष्टन याला सातवाहनांचा बिमोड करून दख्खन परत जिंकून घेण्यासाठी पाठवले तेंव्हा तो अजमेर येथे होता. चष्टन क्षत्रपाने चढाई करून माळव्यामधील उज्जैन व त्या पाठोपाठ कच्छ व उत्तर गुजराथ हे भाग पुळुमावी कडून जिंकून घेतले व तो उज्जैन मधून राज्यकारभार पाहू लागला. पुळुमावी या युद्धात पराभूत झाल्याने माळवा व उत्तर गुजराथ हे भाग आपल्या राज्यातून गेल्याचे नाईलाजाने त्याला बघत बसावे लागले. मात्र राज्याचा आणखी कोणताही भाग हातातून जाणार नाही याची काळजी तो घेऊ लागला. दरम्यान चष्टन राजाचा मृत्यू झाल्याने त्याचा मुलगा जयदमन हा गादीवर आला. आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या काळात पुळुमावीने जयदमनचा पराभव करून त्याला परत मांडलिक केले असावे असे मानले जाते. पुळुमावीच्या राज्यकालाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध असल्याने तो किंवा त्या कालातील सातवाहन साम्राज्याचा इतिहास बराचसा अज्ञातच आहे. परंतु जी तुटपुंजी माहिती उपलब्ध आहे त्यावरून अतिशय कर्मठ हिंदू असलेला पुळुमावी राजा आपल्या कर्तुत्ववान वडिलांचा यथार्थ वारसदार होता असे दिसते. सर्व धर्मांबद्दल समभाव बाळगण्याचे आपल्या वडिलांचे धोरण त्याने पुढे चालवले असावे असे दिसते. अनेक बौद्ध मठांना त्याने सढळ हाताने देणग्या दिल्याचे आढळून येते.

कार्ले येथील 14 क्रमांकाच्या शिलालेखात कार्ले बौद्ध मठाला एक गाव इनाम म्हणून दिल्याची नोंद आहे. प्राकृतमधील हा शिलालेख असा आहे.

1.सिधं [I ] रञो वसिठिपुतस सामिसिरि [पु][ळुमावि]स
सवछरे सतमे [गि]म्हपखे पचमे
2. [दि]वसे पथमे एताय पुवाय ओखळ्कियान महारथिस
कोसिकिपुतस मितदेवस पुतन
3. [म] हारथिना वासिठिपुतेन सोमदेवेन गामो दतो वलुरकसघस
वलुरकलेतात सकरूकरो सदेय
4. मेयो [ I]

बर्जेस याने केलेल्या भाषांतराप्रमाणे या शिलालेखाचा मजकूर याप्रमाणे आहे.

“King Vasisthiputa, the illustrious lord (Swami Shree) (Pulumavi) in the year 7th of summer the fifth fortnight and first day. On that day , a great warrior, Vasithiputa Somadeva, son of the great warrior of Okhalakiyas, Kosikiputa Mitadeva gave a village to the Sangha at Valuraka”

शिलालेखाचा अर्थ सहज समजण्यासारखा आहे. ओखळक येथील महारथी कौशिकीपुत्र मित्रदेव याचा पुत्र महारथी वासिष्ठीपुत्र सोमदेव याने एक गाव वलुरक लेण्यातील वलुरक संघाला दिल्याचे यात नमूद केलेले आहे. हा गाव लहान मोठ्या करांसह व देय (रोख नाणी) व मेय (धान्यादिक) यांसह दिलेला आहे. प्र्स्तुत शिलालेखाचा काल वासिष्ठीपुत्र पुळुमावि याच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षातील पाचव्या ग्रीष्म पक्षातील प्रथम दिवस हा असल्याचेही येथे नमूद केलेले आहे.

कार्ले येथील 20 क्रमंकाचा शिलालेख हा मुख्य चैत्यगृहामध्ये नसून बौद्ध भिख्खूंचे वसतीस्थान असलेल्या 12क्रमांकाच्या विहारामधील 2क्रमांकाच्या द्वाराच्या वरील बाजूस कोरलेला आहे.

1.सिधं रञो वासिठिपुतस सिरिपुळुमाविस सवछरे चतुर्विसे
हेमंतान पखे ततिये दिवसे बि-
2.तिये उपासकस हरफरणस सेतफरणपुत्तस्य सो [व] सकस्य अबुला-
माय वथवस्य इम देयधम म[ड] पो
3.नवगभ माहासघियानं परिगहो सघे चातुदिसे दिन मातापितुनं
पुजा[ये] सवसतानं हितसुघस्थये एकविसे स-
4.वछरे निठितो सहेत च मे पुन बुधरखितेन मातर चस्य
[उ]पासिकाय बुधरखितस मातु देयधंम पाठो अनो

बर्जेसच्या भाषांतराप्रमाणे या शिलालेखातील मजकूर याप्रमाणे आहे.

“ To the perfect! The king Vasisthiputa, the illustrious _Shree) Pulimavi in the year (of his reigh) twenty four, in the third fortnight of the winter months, the second day. This meritorious gift of a nine celled-mandapa by the (Upasaka) layman Harapharans, son of Satapharana, a Sovaska, native of Abulama, for the possesion of Sangha of the mahasanghas of the four quarters. For the continuance in welfare and happiness of father and mother abd all people and living beings. Established in 21st year and with me Budharakhita and his mother Upasika. And in addition the meritorious gift of another passage by the mother of Budharakhita”

या शिलालेखातील महत्त्वाचा वाटणारा भाग म्हणजे हरफरण व त्याचे वडील असलेले सतफरण या दोन व्यक्तींची नावे. ही दोन्ही नावे भारतीय वाटत नाहीत. बर्जेसच्या मताने ही नावे पार्थियन वाटतात. त्याच प्रमाणे या व्यक्ती जेथून आलेल्या होत्या ते अबुलामा हे गाव भारतातील असेल असे वाटत नाही. पुळुमवी राजाच्या काळात सातवाहन साम्राज्याला सतत पार्थिअन सम्राटाचा क्षत्रप असलेल्या राजा चष्टन याच्या आक्रमणाचे भय होते. त्यामुळे या काळात महाराष्ट्राता असलेल्या एक बौद्ध मठाला दोन पार्थियन व्यक्तींनी दिलेली ही देणगी मोठी वैशिष्ट्यपूर्ण वाटते.
या लेखमालिकेत उल्लेख आलेल्या सर्व राजांनी आपली छबी असलेली नाणी आपापल्या कारकिर्दीमध्ये पाडलेली होती. या नाण्यांवरून हे राजे कसे दिसत असत याची कल्पना येऊ शकते. कार्ले गुंफांमधील शिलालेख त्या काळच्या इतिहासावर फारसा प्रकाश टाकू शकत नसले तरी ते खोदले गेल्याचा कालसमय निश्चित करू शकतात. यामुळे इ.स.पहिल्या शतकामध्ये महाराष्ट्रात वास्तव्य करणार्‍या स्थानिक जनतेचे आयुष्य कसे असेल? ते कोणत्या प्रकारचा पेहराव करत असत याची थोडीफार तरी कल्पना नक्कीच येऊ शकते. कार्ले गुंफांचे तेच महत्त्व आहे असे मला वाटते.

समाप्त.
21जुलै 2012

(क्षमस्व: माझ्या फ्लिकर खात्यातील 200 छायाचित्रांची मर्यादा ओलांडली गेली असल्याने या लेखासोबतची छायाचित्रे मला येथे देता आलेली नाहीत. ती पहाण्यात ज्यांना रस असेल ते माझ्या http://www.akshardhool.com/2012/06/traces-of-empire-rock-cut-buddhist_25... या ब्लॉगवर जाऊन ही छायाचित्रे बघू शकतात.)

लेखनविषय: दुवे:

Comments

नवे खाते

नवे खाते

नमस्कार,

(क्षमस्व: माझ्या फ्लिकर खात्यातील 200 छायाचित्रांची मर्यादा ओलांडली गेली असल्याने...

आपण आपले जुने खाते अबाधित ठेवून फ्लिकर वर नवे खाते उघडून हा प्रश्न सोडवू शकाल असे सुचवितो.

--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

फ्लिकर्

माझी या आधीच् उघडलेली दोन् खाती फ्लिकरवर् आहेत् त्यामुळे आणखी एक् उघडायचे म्हणजे परत् एक् नवीन् लॉग इन नाव् व पासवर्ड् लक्षात् ठेवणे आले. हे सगळे करण्यापेक्षा येथे माझ्या ब्लॉगचा दुवा देणे मला सोपे वाटते आहे.

उपक्रमींना ही पद्धत् फारशी रुचत् नाहीये असे वाटते त्यामुळे या लेखमालिकेतील् पितळखोरे व अजिंठा लेण्यांसंबंधीचे पुढचे भाग् उपक्रमवर् टाकताना परत् एकदा विचार् केला पाहिजे असे वाटते.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

वाचतो आहे.

लेख माला वाचतो आहे. माहितीपुर्णलेख आहेत.
तुमच्या ब्लॉगवर चित्रे कशी येत आहेत? ती जर तिथे दिसत असतील तर् अन्यत्र दिसण्यात काही करणे सोपे आहे.





चांगला भाग

चांगला भाग आणि मालिका.

लेखात उल्लेख केलेला पार्थियन सम्राट कोण हे कळते/ले का?

उपक्रमींना ही पद्धत् फारशी रुचत् नाहीये असे वाटते त्यामुळे या लेखमालिकेतील् पितळखोरे व अजिंठा लेण्यांसंबंधीचे पुढचे भाग् उपक्रमवर् टाकताना परत् एकदा विचार् केला पाहिजे असे वाटते.

छे! छे! असे काही नसावे. जर लोक तुम्हाला सूचना देत असतील तर ते तुमचे लेख अधिक उठावदार व्हायला किंवा तुम्ही "जमत नाही" असा उल्लेख केल्याने मदत करायला. जर जमत नसेल तर तुमच्या ब्लॉगवर जाऊन बघतीलच पण इथेच फोटो दिलेत तर लेख उठावदार होईल.

पर्थियन् सम्राट्

उत्तर् व वायव्य भारतात शकांचे साम्राज्य इ.स.पूर्व 90ते 60 या कालात कधीतरी आले व इ.स. 80 ते90 च्या सुमारास कुषाणांनी हा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला असे वाटते. या मधल्या कालात शकांनंतर, पार्थिअन् व पहलवी राजे या भागात् राज्य् करत् होते. यापैकी कोणत्या राजाने क्षत्रप् चष्टनाला पुळुमावी विरुद्ध् मोहिम् काढण्याची आङ्या दिली ते सांगणे कठीण् आहे. परंतु सनावळ बघता हा राजा गोंडोफेरेस असू शकतो किंवा कोणी पहलवी राजा असू शकतो. कुषाण राजा कनिष्क किंवा त्याच्या आधीचा राजा विमा काडफिसेस सुद्धा असू शकतो. सांगणे खूपच कठिण आहे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

वाचतोय....

उत्तम् सुरु आहे.

अवांतर शंका क्र १ :- मानववंश शास्त्र दृष्टीने शक = सिथियन हे बरोबर का?(मागील भागांत शकांचा उल्लेख होता, म्हणून विचारले.)
आणि सिथियन हे आजच्या अनेक राजपूत घराण्यांचे पूर्वज; हे ही बरोबर का?
कारण तसे असेल तर शकांचे भारतीयीकरण झाले असे म्हणणे ठीक; पण शकांना पिटाळून लावले, शकांपासून मुक्ती मिळ्वली असे
बरेच जण म्हणतात, ते बरोबर कसे?

अवांतर शंका क्र २ :- पर्थियन म्हणजे इराणच्या उत्तर पूर्व भागाच्या आसपास(पश्चिम उत्तर अफगाणिस्तान व् त्यापलीकडील मध्य आशिया) असणार्‍या पठारी भागातील जमाती ना?
काहीजण दक्षिणेतील पल्लव राजवंशाची नाळ पर्थिअयनांशी जोडतात, म्हणून विचारले.

अवांतर शंका क्र३ :- शिलालेखातील भाषा आजच्या मराठीच्या थोडीही आसपासची वाटत नाही. सातवाहन कालात मराठीची पायाभरणी होउन गेली होती असे ऐकले होते.(तिकडे "अभिजात भाषा" वरील फडात वाचले.)

--मनोबा

अवांतर शंका

1.. शक म्हणजे सिथिअन हे बरोबर आहे. त्यांचे राज्य राजस्थान मध्ये बराच काळ होते त्यामुळे काही राजपुत राजघराण्यात त्यांचा वंश आला असण्याची शक्यता आहे. परंतु असे जनरलायझेशन करता येईल असे वाटत नाही. जिनिऑलॉजिकल संशोधनाप्रमाणे सर्व उत्तर भारतीय एकाच हॅपलो गटाचे आहेत हे सिद्ध झालेले आहे.

2. पल्लव राजे मुळात कोठून आले हे कसे सांगणार? जर चीन मधून आलेले शक व कुषाण किंवा युरोप मधून आलेले इंग्रज भारतावर राज्य करू शकले तर अफगाणिस्तान मधल्या पार्थियन लोकांनी दक्षिणेकडे राज्य स्थापण्यात काहीच असंभव नाही.

3. प्राकृत भाषा ही सर्व भारतीय (तमिळ वगळून) भाषांचे उगमस्थान आहे.संस्कृत मधून प्राकृत आले की प्राकृत मधून संस्कृत हे आधी कोंबडी का अंडे हे सांगण्यासारखेच आहे. शिलालेखांच्यातील प्राकृत वा मराठी यात खूपच साधर्म्य आहे असे मला तरी वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

 
^ वर