ढोबळेंसारखे अधिकारी आम्हाला हवे आहेत का?

नाना पाटेकरांनी नुकतेच "पुण्यातही ढोबळेंसारखा अधिकारी हवा" असे विधान केले आहे. वसंत ढोबळे यांना "मुंबईचे सिंघम" म्हणून ओळखले जात आहे. ढोबळे हे कोण आहेत, त्यांच्या कारकिर्दीचा थोडासा आढावा खालील लेखावरून येईल.

http://www.esakal.com/esakal/20120701/5008644537254304655.htm

पोलिस उपायुक्‍त वसंत रघुनाथ ढोबळे यांनी फोन उचलला तर समोरचा "इन्फॉर्मर' पोपटासारखी माहिती देतो. विश्‍वासानं धागेदोरे सांगितले जातात आणि मग ती रात्र ढोबळे नावाच्या पोलिस अधिकाऱ्याच्या कारवाईची ठरते. आज पन्नाशीच्या आसपास असलेले मुंबईकर ते कॉलेजात असताना सायकलची चेन फिरवत कॉलेजाच्या नाक्‍यानाक्‍यावर फिरणाऱ्या त्या वेळच्या या पोलिस अधिकाऱ्याच्या वावराची माहिती उत्साहाने देतात. "मुलींची छेडछाड करू नका', "बिडी-काडी ओढू नका' अशी जरब या करड्या चेहऱ्यावर वाचता येत असे; त्यामुळे त्यांच्या हातातल्या सायकलच्या चेनचं कुणाला फारसं काही वाटत नसे.

ढोबळे आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करणारा एक लेख येथे वाचा.

http://www.globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=4934905722634053445...

सुरुवातीला ढोबळे यांच्या या 'सिंघमगिरी'चे खूप कौतुकही झाले. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तर ते खास मर्जीतले बनले. पण आता या हिरोगिरीचा अतिरेक सगळयांच्याच लक्षात येऊ लागला आहे. त्यांच्या या कारवायांमध्ये अनेकदा निरपराध लोकांनाही असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून त्यांच्या दंडुकेशाहीचा मार बसला. प्रसिध्दी माध्यमांतून त्यांची बदनामी झाली. हॉटेलवाल्यांचे, पबवाल्यांचे नुकसान झाले ते वेगळेच!

या बातम्यांवरून काही प्रश्न पडतात.

  1. ढोबळेंसारख्या अधिकार्‍यांची गरज आहे का?
  2. ढोबळेंच्या वर्तनाला हिरोगिरी म्हणावे की कर्तव्यदक्षता?
  3. पोलिसी कार्यकक्षेत ढोबळेंचे वर्तन येत नसल्यास एखाद्या सामान्य नागरिकाने चेन आणि हॉकी स्टिक घेऊन सुव्यवस्था राखण्यासाठी दहशत पसरवल्यास दोहोंत फरक असेल का?

Comments

ढोबळे

ढोबळे प्रकरणी अधिक ठाउक नाही. टाइम्स समूहाने अचानक बोंबाबोंब सुरु केली होती त्यात हे नाव समजले.
एखाद्या कायद्याची अंमलबजावणी ढोबळे करायला जाताच् एकाएकी टाइम्स खवळले आणि
"सुखासुखी पार्ट्याही करु देत नाहीत् हो हे राक्षस" असा आव आणला.
रात्री बेरात्री पार्ट्या करु द्याव्यात असे त्यांचे म्हणणे, त्यासाठी त्यांना ढोबळेंना यथेच्छ बदनाम केले, ते कायदा हाती घेतात असे चित्र उभे केले.
माझा प्रश्न :- ह्यांच्या पार्ट्या कायदेशीर होत्या का?(अर्थातच नव्हत्या. म्हणून हे लगेच टिपिकल् "विक्टोरिअन लॉज्" बदलले पाहिजेत चे नारे टीव्हीवर देउ लागले.) ह्यांना कायद्याबद्दलच आक्षेप होता, तर त्यांनी तशी वैधानिक मागणी करावी, हक्क् मागावा.
उपलब्ध कायद्याची फक्त अंमलबजावणी केल्याबद्दल बोंब मारणे हा दुटप्पीपणा झाला.
समजा मला समजले की माझ्या कंपनीत काळ्या कपड्यात अतिरेकी येणारेत, कुणाही काळ्या पोकशाखातील व्यक्तिला आत सोडू नये. हा कायदा माझे सुरक्षारक्षक पाळत असतील, तर तो त्यांचा दोष कसा? ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी येउन मालकाशी बोलावे, निष्ठेने काम करणार्‍या रक्षकास का बडवावे?

--मनोबा

ढोबळे

ढोबळेंबद्दल ऐकले आहे. मुंबईत बरेच फेमस आहेत. माझ्या काही मित्र-मैत्रिणींनी त्यांना सायकलची चेन फिरवताना वगैरे पाहिलेही होते. (आमच्या कॉलेजात कट्टेगिरी करण्यात फार ढ आणि नर्डी पोरं असावी, तेथे कधी आल्याचे आठवत नाही किंवा तो भाग त्यांच्या अखत्यारीत नसावा.) ढोबळेंची दहशत होती हे मात्र नक्की. लोकांना ढोबळेंच्या रुपाने मसिहा मिळाला. त्यांचे नाव हल्ली वृत्तपत्रांतून गाजते आहे खरे. वर मनोबाने म्हटल्याप्रमाणे टाइम्ससमूहातून त्यांच्यावर ओरड होते आहे पण या प्रसंगी ढोबळे किंवा पिडीत यांची बाजू घ्यावीशी वाटत नाही. एक मात्र आहे,

लोकांना मसिहा हवा असतो. या मसिहाने कायद्यात न बसणार्‍या गोष्टी केल्या तरी जोवर तो मसिहा त्यांच्या घरात जन्माला येत नाही आणि त्यांच्या घरातल्या व्यक्तीला त्रास देत नाही तोवर त्याला पाठिंबा देण्यास ते अग्रेसर असतात.

ढोबळेंसारख्या अधिकार्‍यांची गरज आहे का?

कायदा हातात न घेणार्‍या कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांची गरज सर्वत्र असते. ढोबळे हा निकष पूर्ण करतात की नाही याची कल्पना नाही.

ढोबळेंच्या वर्तनाला हिरोगिरी म्हणावे की कर्तव्यदक्षता?

मला तरी हिरोगिरीचा वास येतो पण ते कर्तव्यदक्ष नाहीत असे म्हणता येत नाही.

पोलिसी कार्यकक्षेत ढोबळेंचे वर्तन येत नसल्यास एखाद्या सामान्य नागरिकाने चेन आणि हॉकी स्टिक घेऊन सुव्यवस्था राखण्यासाठी दहशत पसरवल्यास दोहोंत फरक असेल का?

सायकलची चेन आणि हॉकी स्टिक घेऊन फिरणे नक्कीच ढोबळेंच्या कार्यकक्षेत नसावे. सामान्य नागरिकाने "मॉरल पोलिसिंग" केलेले अनेकांना आवडत नाही पण ढोबळेंचे मात्र अनेक फॅन असावेत. ;-)

-------------

बायदवे, पुण्याची परिस्थिती इतकी वाईट आहे का की तेथे ढोबळेंची उणीव भासते आहे किंवा पुण्यातले अधिकारी कर्तव्यदक्ष दिसत नाहीत त्यामुळे त्यांनी नानाचे वाक्य चालवून घेतले असावे. असो. मुंबईतील अनेकजण ढोबळेंना पुण्याला पाठवायला एका पायावर तय्यार असतील. ;-)

ऑ?

>>पोलिस उपायुक्‍त वसंत रघुनाथ ढोबळे यांनी फोन उचलला तर समोरचा "इन्फॉर्मर' पोपटासारखी माहिती देतो. विश्‍वासानं धागेदोरे सांगितले जातात आणि मग ती रात्र ढोबळे नावाच्या पोलिस अधिकाऱ्याच्या कारवाईची ठरते. आज पन्नाशीच्या आसपास असलेले मुंबईकर ते कॉलेजात असताना सायकलची चेन फिरवत कॉलेजाच्या नाक्‍यानाक्‍यावर फिरणाऱ्या त्या वेळच्या या पोलिस अधिकाऱ्याच्या वावराची माहिती उत्साहाने देतात. "मुलींची छेडछाड करू नका', "बिडी-काडी ओढू नका' अशी जरब या करड्या चेहऱ्यावर वाचता येत असे; त्यामुळे त्यांच्या हातातल्या सायकलच्या चेनचं कुणाला फारसं काही वाटत नसे.

आज पन्नाशीत असलेले मुंबईकर कॉलेजात असताना म्हणजे ३०-३५ वर्षापूर्वी. सध्या उपायुक्त असलेले ढोबळे तेव्हा उपनिरिक्षक असण्याची शक्यता आहे. म्हणजे त्यांचे कार्यक्षेत्र एखाद्या पोलिस स्टेशन पुरते मर्यादित असावे. त्यातही ते पोलिसस्टेशनचे मुख्य नसतील. मग ते मुंबईभर प्रसिद्ध कसे होतील? कदाचित त्यांचे कार्यक्षेत्र एसएनडीटी सारख्या मुलींच्या कॉलेजाच्या आसपास असेल तर तिकडे मुंबईभरातून येणार्‍या 'पक्षीनिरीक्षकांना' अडचण होऊन ते मुंबईभर प्रसिद्ध झाले असतील. :-)

अवांतर : १९८५-९० च्या सुमारास कल्याणमध्ये यादवराव पवार हे अधिकारी अशाच प्रकारे सुरस कहाण्यांसहित प्रसिद्ध होते.

नितिन थत्ते

 
^ वर