एका साम्राज्याच्या शोधात कार्ले गुंफा भाग 3

मगध देशामध्ये राज्य करणार्‍या शुंग राजघराण्याची इ.स.पूर्व 26 मध्ये संपुष्टात आलेली कारकीर्द व कुषाणांचा इ.स. नंतरच्या पहिल्या शतकामध्ये झालेला उदय या दोन घटनांच्या मधल्या कालखंडातील उत्तर व वायव्य भारताचा इतिहास, फार अल्प माहिती उपलब्ध असल्याने, बराचसा अज्ञातच आहे असे म्हणता येते. इ.स.पूर्व 170 मध्ये कुषाण (Yueh-chi) या नावाने ओळखल्या जाणार्‍या भटक्या टोळ्यांना चीनच्या वायव्य भागातून पिटाळून लावून त्यांना पश्चिमेकडे प्रस्थान करण्यास भाग पाडले गेले. या टोळ्यांच्या पश्चिमेकडच्या प्रस्थानात त्यांची प्रथम उझबेकीस्तान मधील सिर दर्या (Syr Darya) नदीच्या उत्तरेला वसाहत करून राहणार्‍या शक किंवा शे (Saka or Scythians or Se) या दुसर्‍या टोळीच्या लोकांशी गाठ पडली. हा प्रदेश सुपीक असल्याने साहजिकच या दोन्ही टोळ्यांमध्ये युद्धे होऊन त्यात कुषाण किंवा Yueh-chi टोळ्यांनी, शक टोळ्यांना सिर दर्या नदीच्या खोर्‍यातून हाकलून लावले व या टोळ्या तेथे स्थायिक झाल्या. पराभूत शक टोळ्यांनी दक्षिणेकडे हेलमंड (Helmand)नदीच्या खोर्‍यात आपले बस्तान बसवले. अफगाणिस्तानातील सध्याच्या सिस्तान(Sistan) या शहराजवळ असलेला या नदीच्या खोर्‍याचा भाग शकस्तान (Sakastan) या नावानेच ओळखला जाऊ लागला. काही कालानंतर Yueh-chi टोळ्या द्क्षिणेकडे सरकल्या व त्यांनी शक टोळ्यांना शकस्तान मधूनही आणखी दक्षिणेकडे पिटाळण्यास सुरुवात केली. शक टोळ्या इ.स.पूर्व 90 ते 60 या कालात कधीतरी भारतामध्ये उत्तरेकडून आल्या. मौस किंवा मोगा (Maues or Moga) हा भारतातील पहिला शक सम्राट; त्याने पाडलेल्या नाण्यांमुळे इतिहासकारांना माहिती आहे. सिस्तान मधून प्रयाण करून त्याने प्रथम सिंधू नदीचे खोरे व मुखाचा प्रदेश ताब्यात घेतला. या नंतर शकांनी सिंधू खोरे व पंजाब मधे आपले बस्तान बसवले व शक साम्राज्य भारतात प्रस्थापित केले. पहिल्या शतकात, कुषाणांचा उदय होईपर्यंत, शक राज्यकर्ते उत्तर व वायव्य भारतावर राज्य करत होते.
शक राज्यकर्त्यांपैकी एक पाती याच कालखंडात पश्चिम भारतावर आपले राज्य स्थापण्यात यशस्वी झाली. मात्र हे शक राज्यकर्ते स्वत:ला क्षत्रप म्हणूनच ओळखत असत. त्यांनी उत्तरेकडील सिंध व पंजाब मधील शक राज्यकर्त्यांचे मांडलिक किंवा feudatory governors म्हणूनच राज्य केले. पुढे पेशवाई मध्ये ज्या प्रमाणे संपूर्ण सत्ता हातात असूनही पेशव्यांनी सातार्‍याच्या महाराजाचे पंतप्रधान पेशवे म्हणून राज्यकारभार पाहिला त्या पद्धतीचीच बहुदा ही व्यवस्था होती. उत्तरेकडे शक राजांची राजसत्ता उलथवून कुषाण राजसत्ता स्थापन झाली तेंव्हा पश्चिम भारतातील शक राज्यकर्त्यांनी त्यांचे मांडलिक म्हणून स्वत:ला घोषित केले. क्षत्रप(Ksatrapa) हा शब्द मुळात इराणी शब्द क्षत्रपवंश (Ksatrapavans) या शब्दावरून आलेला आहे. अखमद राजांच्या पुरातन लेखांत प्रांतीय राज्यपालांना (provincial governors) क्षत्रपवंश या शब्दाने उल्लेखिलेले आहे. क्षत्रप शब्दाच्या या परदेशी मूळावरून, पश्चिम भारतातील क्षत्रप राज्यकर्ते, मुळात परकीय असण्याच्या शक्यतेला चांगलीच पुष्टी मिळते. क्षत्रपांच्यापैकी सर्वात प्राचीन राजघराणे हे क्षहरत किंवा क्षसरत (Ksaharata) या नावाने ओळखले जाते. आधी बाघितल्याप्रमाणे, भुमक (Bhumaka) हा या राजघराण्याचा सर्वात आधीच्या काळातला म्हणून परिचित असलेला राजा आहे. नहापन (Nahapana) हा भुमकानंतर राजा म्हणून गादीवर आला. भुमक व नहापन यांच्यामधील नाते हे ज्ञात नसले तरी नहापन भुमकाचा पुत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नहापन साधारण इ.स. 55 मध्ये गादीवर आला आणि त्याने इ.स. 105 पर्यंतच्या प्रदीर्घ कालावधीत राजसत्ता अनुभवली. या काळात नहापनाने आपले राज्य माळवा, दक्षिण गुजराथ, कोंकण व उत्तर महाराष्ट्र या भागापर्यंत वाढवले. राज्याचा हा विस्तार त्याने प्रामुख्याने सातवाहनांचे राज्य जिंकून केला.
नहापनाची कन्या दक्षमित्रा हिचा विवाह ऋषभदत्त किंवा उषभदत्त याच्याबरोबर झालेला होता. त्यांच्या पुत्राचे नाव मित्रदेवनक असे होते. ( कार्ले येथील चैत्यगृहातील डाव्या बाजूच्या सातव्या स्तंभावर, या उषभदत्तपुत्र मित्रदेवनकाचे नाव कोरलेले आहे. या स्तंभावरील शिलालेखाचा दोन कारणांसाठी विशेष उल्लेख केला पाहिजे. पहिले कारण म्हणजे प्रचलित पद्धतीनुसार या मित्रदेवनकाने आपल्या नावाचा उल्लेख दक्षमित्रापुत्र असा न करता पित्याचे नाव लावून उषभदत्तपुत्र असा केला आहे. दुसरे कारण म्हणजे हा मित्रदेवनक आपण धेनुकाकट, या अजूनपर्यंत तरी शोध न लागलेल्या, गावाचा रहिवासी असल्याचे सांगतो आहे. धेनुकाकट ही नहापनाच्या राज्याच्या व उषभदत्त व्हाइसरॉय असलेल्या प्रांताची राजधानी असण्याची यामुळे शक्यता वाटते.) उषभदत्त किंवा ऋषभदत्त याचे नाव जरी भारतीय वाटत असले तरी मुळात तो शक किंवा परकीयच होता व दक्षिण गुजराथ, भडोच ते सोपारा हा उत्तर कोंकणातील भाग आणि महाराष्ट्राचे नाशिक व पुणे जिल्हे या सर्व भागांचा राज्यकारभार, नहापनाचा व्हाइसरॉय (viceroy) म्हणून चालवत असे. ऋषभदत्त हा सढळ हाताने धार्मिक स्थळांना देणग्या देत असे व याचसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने दिलेल्या देणग्या व दानांचा दूरदूर ठिकाणी पसरलेल्या अनेक शिलालेखांत उल्लेख सापडतो. कदाचित आपण परकीय राज्यकर्ता असल्याने या देणग्या देण्याने स्थानिक जनतेला आपल्याबद्दल आत्मियता वाटावी हे कारणही या देणग्यांमागे असू शकते.

कार्ले येथील 13क्रमांकाचा शिलालेख याच पद्धती प्रमाणे उषभदत्तने कार्ले मठातील भिख्खू:ना दिलेल्या देणग्यांचे एक दानपत्र आहे. याबरोबरच आपण किती दानशूर आहोत हे ही लोकांना पटवून देण्याचा तो येथे प्रयत्न करताना दिसतो आहे.

मूळ प्राकृतातील लेख असा आहे.


(1) सिधं रञो खहरातस खतपस नहापानस जामातरा दिनिकापुतेन उसभदातेनत्रि
(2) गोसतसहसदेण नदिया बणासयं सुवण(ति) रयकरण (देवा)ण ब्रम्हणानंसोळस गा-
(3) मदे(न) पभासे पूततिथे ब्रम्हणाणं अठभायाप(देण)गावसापि त्रिसतसहसं
(4) दाययिता वलूरकेसु लेणवासान पवजितान चातुदिससघस
(4) यापणय गामो करजिको दतो सवानं(व)सावासितानं

ई.सेनार्टच्या भाषांतराप्रमाणे हा शिलालेख सांगतो की


“Success ! By Usabhadata, the son of Dinika (and) son-in-law of the Kharata Khatapa Nahapana, who gave three-hundred-thousand cows, who made gifts of gold and a tirtha on the river Banasa, who gave to [the Devas] and the Bramhanas sixteen villages, who at the pure tirtha Pabhasa gave eight wives to the Brahmanas and who also fed annually a hundred-thousand (Bramhanas), - there has given the village of Karajika for the support of the ascetics living in the caves at Valuraka without any distinction sect or 0rigin, for all who would keep the warsha (Rainy season) (there).”

या शिलालेखाचे प्रचलित मराठीमध्ये भाषांतर केले तर साधारण असे होईल.


" सिद्धं! दिनिका पुत्र आणि क्षरत क्षतप नहापन याचा जामात ऋषभदत्त, ज्याने 3लक्ष गाई दान दिल्या, ज्याने सुवर्ण दान केले आणि बाणसा नदीवर तीर्थक्षेत्र निर्माण केले, ज्याने देवाब्राम्हणांना सोळा गावे दान दिली, ज्याने सोमनाथ किंवा प्रभास पट्टण येथे आठ ब्राम्हणांना कन्यादान केले, जो प्रतिवर्षी एक लक्ष ब्राम्हण भोजने घालतो, त्याने वालुरका येथील गुंफांमध्ये वास्तव्य करणार्‍या व मूलत: कोणत्याही प्रदेशातील किंवा कोणत्याही पंथाचे असले तरी त्यांच्यात कोणताही भेदभाव न करता या भिख्खू:ना वर्षा कालातही उदरनिर्वाह करता यावा म्हणून करजिका हे ग्राम दान दिले आहे.”

काही खुलासा केल्यावर या शिलालेखाचा अर्थ स्पष्ट होतो. बाणसा या नावाच्या दोन नद्या या कालात अस्तित्वात होत्या. पहिली नदी गुजरातच्या अबु पर्वतावरून उगम पावून कच्छ्च्या रणात समुद्राला जाऊन मिळत असे. तर दुसरी नदी पूर्व राजस्थानमध्ये उगम पावून चंबळ नदीला जाऊन मिळत असे. यापैकी एका नदीवर या ऋषभदत्ताने एक तीर्थक्षेत्र निर्माण केले होते. सोमनाथ मंदिराजवळच्या गावात राहणार्‍या 8ब्राम्हणांचा विवाहखर्च याने केला होता. परंतु माझ्या दृष्टीने या शिलालेखाचे खरे महत्त्व हे आहे की हा शिलालेख, आपण जिंकलेल्या प्रदेशातील संस्कृतीशी, तिथल्या चालीरितींचे पालन करून, आपण किती एकजीव झालो आहोत हे दाखवण्याचा शक राज्यकर्त्यांचा हा एक प्रयत्न आहे. मात्र मूळ शिलालेख अतिशय खराब अवस्थेत असल्याने प्रत्येक शब्दनशब्द सत्य असेल असे मानता येणार नाही. मात्र नाशिक किंवा इतर ठिकाणच्या ऋषभदत्ताच्या शिलालेखांवरून साधारण हा अर्थ काढता येईल असे वाटते.

यानंतर मी 19 क्रमांकाच्या शिलालेखाकडे वळतो. हा शिलालेख, बाह्य व्हरांडा व चैत्यगृह यामध्ये असलेल्या पडद्याच्या समोरील पृष्ठभागावर (नंतरच्या काळात बसवल्या गेलेल्या) बुद्धमूर्तीच्या वरील भागावर आणि या पडद्याला असलेले मध्यवर्ती द्वार व उजव्या हाताचे द्वार यामध्ये कोरलेला आहे. हा शिलालेख मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो कारण वर निर्देश केलेल्या शिलालेखाच्या (क्रमांक 13 ) कालानंतर झालेल्या एका महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेचा, हा शिलालेख मूक साक्षीदार आहे. वर मी म्हटल्याप्रमाणे, क्षत्रप नहापन इ.स. 55 मध्ये राज्यावर आला व त्याने इ.स. 86 पर्यंत सततच्या युद्धांमध्ये सातवाहन सैन्याचा पराभव करून, सातवाहन साम्राज्याचा महाराष्ट्र, कोकण व दक्षिण गुजराथ मधील बहुतेक प्रदेश जिंकून घेतला. शक राज्यकर्ते भारतीय नसून अफगाणिस्तानातून आलेले असल्याने, नहापनाच्या विजयानंतर हा भाग परकीय राज्यसत्तेच्या अंमलखाली किंवा पारतंत्र्यात गेला होता असे म्हणता येते. या कालात, हल मंतलक, पुरिंद्र्सेन, सुंदर, सातकर्णी, चकोर स्वातीकर्ण आणि शिवस्वाती या राजांनी उरल्या-सुरल्या सातवाहन साम्राज्यावर राज्य केले होते.
इ.स. 86 मध्ये, शिवस्वाती या राजानंतर गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा सातवाहन गादीवर आरूढ झाला व दख्खनमधील तत्कालीन राजकीय परिस्थितीला वेगळेच वळण मिळाले. शिवस्वाती या आधीच्या राजाबरोबर गौतमीपुत्राचे काही नातेसंबंध होते किंवा नाही हे ज्ञात नाही. मात्र त्याच्या राज्यारोहणाच्या वेळी सातवाहन साम्राज्याचे ग्रह सर्वात नीच स्थानावर पोचलेले होते हे खात्रीलायकपणे म्हणता येते. नहापनाने सातवाहन राज्याचे अनेक प्रांत जिंकून घेऊन त्यावर पूर्ण स्वामित्व मिळवलेले होते. उत्तरेला कुषाण राजा कनिष्क हा सत्तेवर आला होता व तो पूर्वेकडून आक्रमण करून सातवाहन राज्याचा मिळेल तो भाग गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात होता. परंतु आपल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत, अतिशय तेजस्वी व आकर्षक व्यक्तिमत्व असलेल्या या राजाने, उच्च दर्जाचे व्यक्तिगत शौर्य, रणनीती आणि सेनानेतृत्व यांचे प्रदर्शन करून नहापनाच्या ताब्यात असलेला सातवाहन साम्राज्याचा प्रदेश तर परत जिंकून घेतलाच परंतु युद्धकक्षा नहापनाच्या राज्यामध्ये नेऊन काठेवाड व आग्नेय राजस्थानमधील कुकुर प्रांतही जिंकून घेतला. गौतमीपुत्र सातकर्णी याच्या नहापनावरच्या विजयानंतर नहापन राजाचे तर उच्चाटन झालेच पण त्याचा क्षहरत किंवा क्षसरत राजवंशही नष्ट झाला. गौतमीपुत्र सातकर्णी राजाचे नहापन राजा विरूद्धचे हे युद्ध म्हणजे महाराष्ट्राचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते आणि नंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी अदिलशाही व मुघली साम्राज्यंविरूद्ध केलेल्या स्वराज्य स्थापनेच्या युद्धाइतकेच हे ही युद्ध महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होते असे मला वाटते.

एवढ्या विवेचनानंतर आपण परत एकदा 19 क्रमांकाच्या शिलालेखाकडे वळूया. हा शिलालेख ज्या राजाच्या कारकिर्दीत खोदला गेला आहे त्याचे नाव दुर्दैवाने कालौघात नष्ट झालेले आहे. मात्र मजकुरावरून, हा शिलालेख 13क्रमांकाच्या किंवा राजा नहापनाच्या कालानंतर लिहिला गेल्याचे स्पष्ट होते. 13क्रमांकाच्या शिलालेखात करजिका हे ग्राम भिख्खूंच्या उदरनिर्वाहासाठी दान दिल्याचा स्पष्ट उल्लेख असल्याचे आपण बघितले आहे. हा शिलालेख परत एकदा हे ग्राम याच कारणासाठी इनाम दिले असल्याचे सांगतो आहे. याचा स्पष्ट अर्थ असा लावता येतो की दुसरी राजवट आलेली असल्याने आधीच्या राजवटीत दिली गेलेली इनामे, नवीन राजवटीत तशीच चालू ठेवण्यासाठी नवे शासकीय आदेश आवश्यक होते व ते दिले गेल्याचे हे एक रेकॉर्ड आहे. लाभार्थींजवळ नवा आदेश काढल्याचा पुरावा हवा म्हणून हा शिलालेख कार्ले येथे कोरलेला आहे.

मूळ प्राकृतमधील शिलालेखाची प्रत मला मिळू शकली नाही. ई. सेनार्टने केलेल्या भाषांतराप्रमाणे शिलालेखातील मजकूर असा आहे.


“ [King........ ] commands the officer at Mamada : For the support of the sect of the Mahasamghikas, of the mendicant friars dwelling here in (these} caves of Valuraka, all pervaded with religion (?), we give as monks' land the village Karajaka here in theMamda district on the northern road. To them I have secured the property of the village ofKarajaka as monks' land, and to this village of Karajaka we grant the immunities belongingto monks' land, not to be entered (by royal officers) and to enjoy (all kinds of)limmunity ; with all these immunities I have invested it. And this village of Karajaka and the immunities enjoyed by monks' land I have had registered here. Ordered verbally, writergiven at the victorious camp (?) The deed was executed by Sivaskandagupta in the year 14, on the 1st day of the 4th fortnight of the rainy season.”

या शिलालेखावरून हे स्पष्ट होते की शिवस्कंदगुप्त या शासकीय लिपिकाने, 14व्या वर्षातील हेमंत ऋतूच्या 4थ्या पंधरवड्यातील पहिल्या दिवशी, विजयी झालेल्या राजाच्या तोंडी आज्ञेप्रमाणे, ही सूचना काढलेली आहे. या सूचनेप्रमाणे मामदा किंवा मावळ जिल्ह्यातील करजका गाव हे वेलुरका मठातील भिख्खूंच्या उदरनिर्वाहासाठी इनाम गाव म्हणून दिलेले आहे आणि या गावात राजाच्या अधिकार्‍यांच्या प्रवेशावर प्रतिबंध असून या गावाला सर्वप्रकारचे संरक्षण दिलेले आहे हे स्पष्ट होते.

या शिलालेखामध्ये निर्देश केलेले 14 वे वर्ष हे इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे वाटते. शके 14 हे वर्ष म्हणजे इ.स. 92 हे वर्ष येते. या वर्षी म्हणजे राज्याभिषेक झाल्यापासून फक्त 6वर्षात गौतमीपुत्र सातकर्णी राजाने सध्याच्या पुणे जिल्ह्याचा हा भाग, शक राजवटीपासून मुक्त केल्याचा हा स्पष्ट पुरावा आहे. व या नोंदीमुळेच हा शिलालेख याच राजाच्या कारकिर्दीत खोदला गेला असला पहिजे असे आपण स्पष्टपणे म्हणू शकतो.

क्रमश:
12जुलै 2012

(क्षमस्व: माझ्या फ्लिकर खात्यातील 200 छायाचित्रांची मर्यादा ओलांडली गेली असल्याने या लेखासोबतची छायाचित्रे मला येथे देता आलेली नाहीत. ती पहाण्यात ज्यांना रस असेल ते माझ्या http://www.akshardhool.com/2012/06/traces-of-empire-rock-cut-buddhist_25... या ब्लॉगवर जाऊन ही छायाचित्रे बघू शकतात.)

लेखनविषय: दुवे:

Comments

धन्यवाद

लेखमालिका कुतुहलाने वाचत आहे.

रोचक

हा भागही माहितीपूर्ण.

धेनुकाकट म्हणजे सध्याचे डहाणू असावे. आंध्रप्रदेशातील अजून एका शहरालाही धेनुकाकट मानले जाते. किंबहुना या नावाची दोन शहरे असावीत. पैकी क्षत्रपांचा पश्चिम किनारपट्टीवरील वावर बघता उपरोक्त ठिकाण डहाणू हेच असावे. तेव्हाच्या व्यापारात हे बंदर भरभराटीला आलेले होतेच.

शिलालेख क्र्. १९ चे प्राकृत रूप पुढीलप्रमाणे (संदर्भ . वा. वि. मिराशी )

(१) . . . . . . . . . . .[आनपयति] [*] मामाडे अमच परगत . मसु एथ लेनेसु वालुरकेसु वाथवान
(२) पवजितान भिखुन निकायस महास[घि]यान यपनय एथ मामालाहा उतरेमगे [गामे] करजके[सु*]
(३)भिखुहले[ल] ददम [|*] एतेस तु गाम करजके भिखुहल ओयपापेहि [|] एतस चस
(४) गामस करजकान भिखुहलपरिहार वितराम [|] अपावेस अनोमस पारिहारिक च [|*] एतेहि न परिहारेहि परिहरह [|] एतस चस गामे करजकेसु
(५)भिखुहलपरिहारे च एथ निबधापेहि [|*] अवियेन आनत . . . छतो विजयखधावारे दतो ठे रञा [|*] पटिका सव १० [+*] [८]**
(६) वा प ४ दिव १ सिवखदगुतेन कटा [|]

** ब्युह्ररने हे चिन्ह '४' चे मानले आहे. सेनार्टला ते संशयास्पद वाटले तरी त्यानेही तेच दिले आहे. पण ते '८' चे द्योतक असावे असे रॅप्सनने दाखवले आहे.

प्राकृतातील प्रत आणि डहाणू

प्राकृत प्रत येथे उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
धेनुकाकट म्हणजे डहाणू असण्याची खूपच शक्यता वाटते. क्षत्रपांचे राज्य मध्य प्रदेशातील सागर या ठिकाणापर्यंतच सीमीत असल्याची नोंद आहे. त्यामुळे आंन्ध्र प्रदेशातील गाव धेनुकाकट किंवा धेनुककट असण्याची शक्यता खूपच कमी. या शिवाय डहाणू जवळील भाग क्षत्रपांच्या ताब्यात होताच.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

डहाणू

महाराष्ट्रामधील डहाणू आणि आजूबाजूचा सीमावर्ती प्रदेश पुष्कळसा गुजराती प्रभावाखाली आहे. गुजरातीमध्ये डहाणू साठी 'ढाणुं' असा शब्द लिहिलेला वाचला आहे. हे तर मला ठाणे (आणि अंतिमतः स्थान )या शब्दाशी साधर्म्य दाखवणारे वाटते.

नहापनचे राज्य्

नहापन् क्षत्रपाची राजधानी भडोच येथे बहुदा होती असे मानले जाते. उत्तर कोकण व पुणे नाशिक हे जिल्हे त्याच्या राज्याचे सर्वात दक्षिणेकडचे जिल्हे असल्याने या जिल्ह्यांसाठी नियुक्त व्हाइसरॉयचे निवासस्थान डहाणूला असणे तर्कसंगत आहे. धेनुकाकट येथे वास्तव्य असलेल्या आणखी काही लोकांनी,ज्यात 2 ग्रीक (यवन) आणि काही इराणी नावे आहेत, कार्ले येथील स्तंभ दान केलेले आहेत. या कारणांसाठी धेनुकाकट हे गाव फारसे दूर नसावे. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशात तर मुळीच नसावे असे मला वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

चांगला भाग

वाचते आहे. हा वाचण्यास जरा अंमळ उशीर झाला पण चांगला भाग. आवडला. तूर्तास ही पोच.

 
^ वर